इंग्लंडमधील रोजनिशी (१४ जुलै १९०२)
१४ जुलै १९०२
ऑक्सफर्डहून ९।। वाजता सकाळी इंग्लंडचे उत्तरेस लेक डिस्ट्रिक्टमध्ये बॉरोडेल येथे कारपेंटरसो. बरोबर १ पंधरवडा राहवयास निघालो. बरोबर स्नेही मि. कॉक आणि बार्न्स हे होते. नॉरथँपटनपासून लँकस्टरपर्यंत इंग्लंडच्या मोठमोठ्या वखारींच्या शहरांचा प्रदेश लागला. येथे धूर आणि धुरळ्याने बेजार केले. तोंडावर व हातावर कोळशांची भुकटी साचली. ह्यास इथे ब्लॅक कंट्री (काळा देश) असे म्हणतात. सुधारणेची ही काळी व खरबरीत बाजू दिसली. गाडीच्या खिडकीबाहेर पाहिले की चोहिकडे गिरण्यांची धुराडीच दिसत. ही जगाची वखार. हितली धडधड केवळ असह्य होती. ६ वाजता केसिक् स्टेशनावर पोचलो. कारपेंटरसो. आणि मि. फर्ग्यूसन् आम्हाला घरी नेण्यास आले होते. सामान बसमधून पाठवून आम्ही बोटीने डरवेंटवॉटर सरोवरांवरून व डरवेंट नदीवरून घरी आलो. पाळीपाळीने दोघादोघांनी वल्हविले. बोटीत वजन फार झाल्यास आधी शिंद्यांना (मला) नदीत ढकलू अशी कारपेंटरसो. नी थट्टा केली. अत्यंत धडधडीच्या प्रदेशातून अत्यंत शांत स्थळी आल्यामुळे मनास विलक्षण आनंद व विराम वाटला. सरोवराचे पाणी स्तब्ध व स्वच्छ होते. जणू एक मोठा आरसाच. दोन बाजूस उंच पर्वत. स्किडो पर्वताची उंची ३०५८ फूट आहे. हे सरोवर बॉरोडेल नावाच्या दरीत शिरते. एका बाजूस १००० फूट (सुमारे) उंचीचा कडा तुटलेला, दुसरीकडे गवताने आच्छादलेली टेकडी, मध्ये आमची बोट चालली. पर्वताच्या प्रतिबिंबाची तर काय बहार ! सृष्टिसुंदरी एकांतात आरशात आपले रूप पाहून धन्य मानीत असता पाहून कोणास धन्यता वाटणार नाही. एथे प्रतिध्वनी फार श्रवणीय होतात. त्यासाठी एक तोफ ठेवली आहे. ह्यासंबंधी मी डीक्विन्सीचा उल्लेख आठविला.४१ संध्याकाळी जेवणानंतर प्रो. सा. बरोबर आम्ही पाच-सहा विद्यार्थ्यांनी दरीत शतपावली केली. ह्या उन्हाळ्यात सर्व विद्यार्थ्यांचा (२०।२२) प्रो. सो. असा पाहूणचार करणार आहेत.
१५ जुलै १९०२
सकाळी ७ वाजता उठलो. ८ वाजता न्याहारी झाली. नंतर मि. कॉक्, बार्न्स, फर्ग्यूसन, लॉकेट व मी बोटीतून फिरावयास गेलो. डरवेंट नदीतून डारवेंटवॉटर सरोवरात सुमारे २ मैलावर हर्बट नावाच्या लहानशा बेटापर्यंत गेलो. बेटावर दाट झाडी होती. तेथे वनभोजनाकरिता आलेल्या लोकांनी बीच झाडांच्या सालीवर आपली नावे कोरलेली दिसली. विशेषकरून नवविवाहित दंपतींनी वर्तुलांत आपली नावे कोरली होती. वर्तुले अंतःकरण दर्शविण्यासाठी. लग्नाची अगर तेथे आल्याची तारीखही कोरलेली असे. दोन प्रहरी प्रोफेसर साहेबाबरोबर आम्ही सर्वजण स्किडो नावाच्या एका सुमारे १००० फूट उंच डोंगरावर फिरावयास गेलो. सकाळी प्रोफेसर पाली, बुद्धधर्म ग्रंथाचे संशोधनाचे काम करीत होते. प्रोफेसर जसे विद्वान तसेच हौशी, उल्हासी आणि काटक आहेत. ३०-३५ मैलांची अशा डोंगरात ते सहज मजल करितात. डोंगराच्या माथ्यावर मी दोन फोटो घेतले. आठ वाजता घरी परत आलो. केसविक् स्टेशनाहून घरापर्यंत डारवेंटवॉटर सरोवरातून बोटीने आलो. मला वल्हवू न देता प्रोफेसरांनी स्वतःच वल्हविले. ९ वाजता जेवण आटपल्यावर मि. कॉक ह्याजबरोबर पुनः बॉरोडेल दरीतून शतपावलीस निघालो.
बॉरोडेलमधील भेट
ही शतपावली कधी विसरणार नाही. दोन्ही बाजूस १००० फुटांचे उंचवटे. मधून डरवेंट नदीचे मंजूळ गाणे चाललेले. चहूकडे इतके निवांत की पातळ पानही लवत नव्हते. बाह्य शांतीमुळे अंतःकरणातील शब्द अधिकाधिक स्पष्ट ऐकू येऊ लागले. सुधारलेल्या जगाची धडपड शेकडो मैल दूर होती. सुधारणा-उद्धारणा वगैरेंचा गवगवाही बंद पडला होता. ९।। वाजले होते तरी असा गोड संधिप्रकाश पडला होता की वाचता सहज येत होते. आम्ही दोघेही समानशील. दरीतून पुढे पुढे जात असता सृष्टी आपल्या अंतःपुरात बोलावतेच जणूंसें भासले. खोल दरीतून नदीच्या काठाने जात असता कॅसलरॉकचा अगदी सुळकेदार मनोरा समोर होता. त्यावर दशमीचा चंद्र लोंबत होता. असा आसमंतच्या देखाव्यात आम्ही स्वतःस विसरलो. अैहिक अत्यंत प्रिय विषयांचाही विसर पडला हे सांगणे नको. अगदी आपलेच असे काही येथे मिळाले म्हणूनच असा हा विसर पडला! `ह्या उदात्त भेटीच्या प्रसंगी` विचारास अवकाश नव्हता.
"Prayer is the burthen of a sigh, the falling of a tear
The upward glancing of an eye, when none but God is near!!४२"
१०।। वाजले तरी परतवेना. येत्या पौर्णिमेच्या रात्री उपासनेस येथे येऊन सारी रात्र येथेच काढावयाची व पर्वतशिरावरून सूर्यदर्शन घेऊन घरी जावयाचे असा आम्ही दोघांनी बेत केला व परतलो. देवा, अशी वारंवार भेट दे ! (तथापि रानातील देवापेक्षा गावातील देव अधिक धडे शिकवतो!).