इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ७ मंगळवार एप्रिल १९०३)
ता. ७ मंगळवार एप्रिल १९०३
मोस्यु रोज हे पारीसहून ८ मैलावर सोक नावाच्या खेड्यात राहवयास गेले होते. खेडे पहाण्यास मी आज त्यांचेकडे गेलो. येथे उंचसखल भाग, उघडी हवा, स्वच्छ वातावरण. फार आनंद झाला. दोन प्रहरी जेवणानंतर रोज नवरा-बायको, धाकटी मार्सेला, तान्ही मुलगी, दायी, रोज ह्यांचे वडील आणि मी सर्व बाहेर रानात फिरावयास गेलो. हा पारीसचा भोवतालचा भागही पारीसला योग्यच आहे. प्रत्येक लहान गावात एक प्लास अथवा पार्क म्हणजे फिरण्यास मोकळी जागा असते. त्यात चौफेर सारख्या साच्याची झाडे असतात. ती पाने व फांद्या तोडून सारखी केली होती. मध्ये १८७० (च्या) फ्रांकोजर्मन युद्धात कामास आलेल्या एका योद्ध्याचा पुतळा होता. नंतर फिरता फिरता एका मोठ्या बागाईत शिकविण्याच्या सुंदर शाळेसमोर आलो. हे पूर्वी १४ लुइचा मुख्यप्रधान कोलबेर ह्याचे घर होते. हल्लीच्या शांतीच्या आणि लोकसत्तात्मक कालास शोभेल असे आता झालेले ह्या वाड्याचे हे रूपांतर पाहून मनास समाधान झाले. बागेत फळझाडाची जोपासना किती चतुरतेने केली जाते तीही दिसली. नंतर आम्ही वरील रॉबिनसन ठिकाणी आलो. येथे नुसती सुमारे ४०।५० विश्रामालये Restaurants च होती. येथे करमणूक करण्यास पारीस येथील उद्योगधंद्याचे लोक आदित्यवारी सुमारे ४।५ हजार जमतात. येथे निरनिराळ्या घाटाची कॉफीगृहे आहेत. दोन ठिकाणी जुन्या झाडाच्या फांद्यावर दोन, ३।४ मजली घरे केली आहेत. आणि खाण्यापिण्याचे पदार्थ खालून वर चाकावरून ओढून घेण्यात येतात. भोवती जंगली डोंगरी देखावा आहे. येथे स्त्रीपुरुषे नाना क्रीडा करितात. येथे पुष्कळ गाढवे ठेविली आहेत. ती बसण्याकरता मंडळी भाड्याने घेतात. सुमारे ६० साठ वर्षापूर्वी एथे कोणीच नव्हते. एका धोरणी पुरुषाने प्रथम एक विश्रामालय उघडले. तेव्हा तो रॉबिनसन क्रूसोप्रमाणे जंगलात एकटाच येऊन राहिला म्हणून ह्या ठिकाणास आता रॉबिनसन हे नाव पडले आहे. त्याला इतकी किफायत झाली की त्यांचे अनुकरण होऊन आता हे मोठे करमणूकीचे स्थान बनले आहे. मोठमोठ्या जत्रा आणि क्षेत्रे कशी बनतात ह्याचे एक चांगले उदाहरण आहे. १९ व्या शतकातले हे पारिशिअन क्षेत्रच होय !!
ता. ९ गुरुवार एप्रिल
म्युजी दी गिमे नावाची धर्माची म्यूझीयम पाहिली. आज चीन, जपान व इजिप्तचा भाग मोकळा होता. जपानच्या कलेचा व धार्मिक वस्तूचा फार चांगला संग्रह केला आहे. बुद्धाच्या काही मूर्ती पाहून आनंद झाला. एका झाडाचे चित्रही पहाण्यासारखे आहे. नंतर नातर दाम येथे गेलो. आज पारीसचे मुख्य (आर्च) बिशप धर्मगुरू बारा गरीब माणसांचे पादप्रक्षाळण स्वतः हाताने करितात. ख्रिस्ताची नम्रता दाखविण्याकरिता हा विधी आहे. मी आल्यावर लवकरच विधी संपला. गुरुवर्यानी आपला उत्तम भरजरी पोषाक केला होता. बाहेर जाताना एका बाईने आपले मूल पुढे आणिले. आपला हात गुरूने त्याचे डोक्यावर ठेविला !
गुड फ्रायडे अथवा व्हेद्र दी सां
ता. १० एप्रिल ०३
आज भावीक लोक उपवास करितात. मासे खाण्यास परवानगी आहे. खाटकांची सर्व दुकाने बंद होती. धार्मिक लोक मुख्य मुख्य सर्व देवळात दर्शनास जातात. सकाळपासून संध्याकाळ सर्व देवळांत गर्दी असते. मी आज सां व्हिन सां दी पॉल, सां रोक्, मादिलेन ह्या तीन मोठ्या देवळात गेलो. गायनवादन आणि मंत्रघोष, उपदेश वगैरे चालू होती. पुष्पवेली, पाने ह्यांनी काही देव्हारे अत्यंत सजवलेले होते. एका टेबलावर मखमालीच्या गिर्दीवर सुळावर चढवलेल्या येशूची लहान मूर्ती ठेवलेली असे. जवळ एक लहान मुलगा बसला असे. स्त्रीपुरुषे एकामागून एक येत व मोठ्या भक्तीने येशूचे दोन्ही बाहू, गुडघे, पावले चाटून जात. वृद्ध बाया फारच प्रेमाने चाटीत. जवळ ठेवलेल्या ताटात एक पैसा टाकून पुढे जात. मग जवळ बसलेला मुलगा रुमालाने प्रत्येक वेळी मूर्ती पुशीत असे. असा प्रकार सर्वत्र एकसारखा चालला होता. मोठ्या देवळात दोन मूर्ती ठेवल्या होत्या. सां रोक येथे येशूला सुळावर चढवल्याचा व थडग्यात नेण्याचा हुबेहूब देखावा दाखविण्या मोठमोठे पुतळे देवळाच्या मागील भागी आहेत, तो भाग आज उघडा होता. तो पाहून मनावर फार जोरदार परिणाम होतो.
नंतर मी सां क्लू येथील पार्क पाहवयास गेलो. येथे काल गेलो असता हे स्थान इतके आवडले की फिरून मी आज गेलो. ह्याचे वर्णन मी रुक्मिणीच्या पत्रात घरी पाठविले आहे. १८७० च्या युद्धात जर्मन लोकांनी येथील वाड्याचा उध्वस्त केला !
मॅडेमोझील् द्युगा
ता. २ गुरुवार एप्रिल ०३
वरील बाई (कुमारी) मोलरी नावाच्या येथील स्त्रियांच्या कॉलेजात वाङमय व तत्त्वज्ञान विषयाची अध्यापिका आहे. पारीस येथील स्त्रीशिक्षणाविषयी माहिती मिळविण्याकरिता ह्या बाईची भेट घेतली. बाई अत्यंत गरीब, सभ्य व साधी आहे. हिचा पोषाख व वागणूक तर इतकी साधी दिसली, की ही पारीस नगरीत राहण्यास जवळ जवळ अयोग्यच दिसली. हरएक माहिती पुरवण्याची हिची अत्यंत उत्कंठा दिसली. लगेच आम्ही मन मोकळे करून बोलू लागलो. मी अनेक प्रश्न विचारले. त्याची तिने समर्पक, साधार उत्तरे दिली. सुमारे दोन तास बोललो तरी बोलणे संपले नाही की तिने कंटाळा दाखविला नाही. उलट माझी उदार मते पाहून तिला आनंद, आश्चर्य वाटले. तिने बोलून दाखविले. हिंदुस्थानचे लोक म्हणजे गहन विचारात गुंतलेले वैराग्य वृत्तीचे असावयाचेच असा हिचा समज होता. माझी ही प्रवृत्तीची, प्रगमनशील, शुद्धबुद्धिवादी सुधारकी मते पाहून आपणास आश्चर्य वाटते असे बोलून दाखविल्याबद्दल तिने माफी मागितली. मला तिचे भाषण व वर्तणूक फारच आवडली. दुसरे दिवशी शुक्रवारी तिने मला जेवणास बोलावले.