इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ४ जानेवारी १९०३)

ऑक्सफर्ड
ता. ४ जानेवारी १९०३
सन १८९७ पासून एका प्रश्नासंबंधी माझ्या मनात मोठा तात्त्विक विचार चालू आहे. तो प्रश्न वैवाहिक नीतीसंबंधी. पुरुष व स्त्री ह्यांचा परस्पर कौटुंबिक संबंध कसा असावा ? समाजात दोघांच्या कर्तव्यांत व स्थितीत तात्त्विक मूळ भेद आहे काय ? दोघांच्या गुणांत, शक्तीत काही मूळ फरक आहे ? असल्यास शिक्षणात फरक असावा काय ? ह्या बाबतीत तात्त्विक नीती कोणती व नियम कसे असावे म्हणजे व्यक्तीला, समाजाला सुख व हित होईल ? इ. प्रश्न मूळ माझ्याच मनात उद्भवले. इतके दिवसांत बाहेरून मदत मिळाली नाही. गोळे ह्यांच्या (हिंदुधर्म, सुधारणा) लिलावतीने काही विचार सुचविले.६७ त्यावर आज प्लेटोच्या रिपब्लीक भाग ५ मध्ये ह्याच वि. चर्चा आढळली.६८ माझ्या मनात जी आजवर धांदल तीच येथेही आहे.

७ जानेवारी १९०३
संध्याकाळी ४ वाजता सायकलवरून चाललो असता ऑक्सफर्डच्या पूर्वेस ६ मैलावर व्हेटले नावाच्या एका जुन्या खेड्याजवळ आलो. टेकडीवर बरोबर उजवीकडे दुस-या एका टेकडीवर एक पवनचक्की पाहिली.६९ एक मोठा राक्षस हात हालवीत उभा आहे अशी दिसली. नंतर मी तिच्या आत जाऊन पाहिले. वा-याने शिडी फिरत होती. तिच्यामुळे आत सारी चक्रे फिरत होती. वारा सारखा सुटल्यास रोज १५ पोती गहू दळून पीठ होतो. ही १८२४ त बांधली. सध्या एका बाईकडे हिची मालकी. ती तेथेच राहते. दिसण्यात ती फार गरीब दिसली. तिचा एकटाच मुलगा ही गिरणी चालवतो. अगदी खेडयातले अशिक्षित लोक देखील अशी यांत्रिक कामे चालवितात !

फ्रान्स/पारीस
४६ रु दी शाब्रॉल् होतेल्
ता. १४ मार्च ०३ शनिवार
सकाळी १०.४३ वाजता ऑक्सफर्डहून पारीसला निघालो. रात्री १०।। वाजता इंग्लंडच्या किना-यावर न्यू हेव्हन एथे आलो. समुद्र शांत व चांदणे स्वच्छ असल्याने प्रवास सुखाचा झाला. पारीस येथे सकाळी ७ वाजता पोचलो. पहिल्या प्रमाणेच आताही पारीस प्रथम पाहून थोडी निराशा झाली.

ता. १८ मार्च ०३
लुक्षंबर्ग राजवाडा, पँथिऑन व सोबान अथवा पारीस युनिव्हर्सिटी पाहिली. पथिआनची इमारत पाहून मनास अत्यंत समाधान झाले. ग्रीक पूर्वजांचे फ्रेंच बंधूंनी नाव राखिले आहे. कला, कल्पना आणि कारागिरी ह्यांत फ्रेंचांची सर कोणाकडूनही होणार नाही. सौंदर्याची रुची ग्रीकांप्रमाणे ह्यांच्यात आहे. अचाट कृत्य इजीप्त्याप्रमाणे आहे. पँथिआनमधील कामाची सफाई पाहून भान हारपले. विशेषकरून सेंट जिनीव्ही आणि जोन ऑफ आर्कची चित्रे पाहण्यासारखी आहेत.
ता. २०
ट्रायंफल आर्क, प्लेस डी कंकॉर्ड, शँफ एलेजी वगैरे पाहिली.