इंग्लंडमधील रोजनिशी (२३ रविवार मार्च १९०२)
डेव्हनपोर्ट
४ स्टोक डेव्हनपोर्ट
२३ रविवार मार्च १९०२
मांजराने दार उघडावयास सांगितले.३६
मी माझ्या खोलीत बुद्धाचे शुभवर्तमान वाचीत बसलो होतो. घरचे मांजर खोलीत होते. त्याला बाहेर जावयाचे होते. पण दार घट्ट झाकले होते. ते दोन तीनदा ओरडले पण माझे लक्ष तिकडे गेले नाही. शेवटी मी जेव्हा तिकडे पाहिले तेव्हा मांजर मजकडे पहात आपल्या मागच्या पायावर उभारून दाराच्या कडीकडे आपले पुढचे पाय नेऊ लागले. येवढी खूण मला बस झाली. मी दार उघडल्यावर मांजर मुकाट्याने चालते झाले. काय ते `थँक यू` Thank you म्हणावयाचेच उरले होते.
२३ आदित्यवार मार्च
डेव्हनपोर्ट येथील युनिटेरियन मंदिरात सकाळी ११ वाजता माझी उपासना झाली. विषय Worldliness and Godliness लौकिक व धार्मिक जीवन हा होता. देऊळ भव्य आहे. पण युनिटेरिअन चळवळ येथे फार मंद आहे. उपासकांची संख्या ३० वर नव्हती. संध्याकाळच्या उपासनेत ब्रह्मसमाज हा विषय होता. उपासक ५० सु. होते. विशेष आगत्य दिसले नाही. सुधारक चळवळीस औदासिन्याप्रमाणे दुसरे काहीच वातूक नाही. पण ते येथे व दुस-या काही ठिकाणी दिसते.
२४ सोमवार मार्च
डेव्हनपोर्ट, प्लिमौथ व स्टोनहौस ही तिन्ही शहरे एकमेकास अगदी भिडून तिन्हीचे आता एकच गाव बनले आहे. एकंदर लोकसंख्या सुमारे २ लाख आहे. ही गावे अगदी टेकड्यावर वसली असल्याने एकही रस्ता सपाट नाही. ब-याच ठिकाणी इतके उंच चढउतार आहेत (की) गाडी हाकणे परक्यास अत्यंत धोक्याचे दिसते. तशात इंग्लंडचे रस्ते हिवाळ्यात बर्फ पडून इतके घसरट होतात की सपाट रस्त्यातही केव्हा केव्हा माणसे बदकन आपटतात. पण अशा चढउतारावरूनही विजेच्या ट्रॅमगाड्या अशा शिताफीने धावतात, मध्येच अशा उतारावर थांबतात की पहात राहावे. हे शहर आरमाराचे सैन्याचे मोठे स्थान असल्याने येथे लष्करी देखावे पुष्कळ दिसतात. आदित्यवारी लष्करचे लष्कर उपासनेस कवाइतीने जाताना मौज का वाटू नये ? समुद्रकाठ, डोंगराळ प्रदेश, आधुनिक सुधारणेची सर्व चिन्हे धारण करणारे शहर ही सर्व येथे एकत्र दिसतात. खोल द-यातून आगगाड्या धावतात. दोन्ही बाजूने उतरणीवर बराकीप्रमाणे घराच्या रांगा आहेत. तशात नदीचे पात्र रुंद असल्यामुळे समुद्र आगंतुकासारखा आत शिरला आहे. ब्लॉक हॉसस नावाचा एक लहानसा किल्ला असा चांगली मा-याची जागा आहे. येथे चार मोठ्या तोफा लावून ठेवल्या आहेत.
ता. २५ मंगळवार
८.३० वाजता युनिटेरिअन मंदिरात लिटररी सोसाईटीत माझे `पाश्चात्यांचे हिंदुसमाजावर परिणाम` हे व्याख्यान झाले. युनिटेरिअनांस हिंदुस्थानाबद्दल बरीच सहानुभूती आहे. आमच्या चालीरीती ऐकून त्यांस मोठा आचंबा वाटला.
ता. २६ बुधवार
(प्लिमथ) ऑक्सफर्ड स्ट्रीटमधील बोर्डस्कूल पाहिले. ३६४ मुले हाजर होती. ड्राईंग व नकाशे काढणे, गाणे, नीटनेटकेपणा, जरब ई. मुख्य लक्षणे दिसली. घरी तयार करण्यास फारसे धडे देत नाहीत. अशा शाळेत केवळ कामकरी लोकांची मुलेच येतात. शिक्षण सक्तीचे व मोफत. ड्रायिंगचे सामान, पाट्या, पुस्तके इ. सर्व शाळेमार्फत मिळते. चवदा वर्षानंतर मुलास कोणत्याही कामावर अगर धंद्याच्या शाळेत जाण्यास मोकळीक आहे. धंद्याच्या (शाळेत) नुसती एक प्रवेश फी आहे. बायबलची साधारण माहिती कोणत्याही पंथाची विशेष मते न शिकवता देण्यात येते. शाळा सुटताना प्रत्येक शिक्षक उपासना करतो. सर्व मुले प्रार्थना म्हणतात. नंतर शिक्षक बँडचे चालीवर पियानो वाजवितो व सर्व मुले पाय आपटीत कवाइतीने बाहेर जातात. बहुतेकांचे दप्तर वगैरे काही दिसले नाही. शाळेचे मुलांचा पोषाक चहूकडे सारखाच दिसतो. वर्गात एकादा प्रश्न विचारल्याबरोबर ज्यांना त्याचे उत्तर माहित असते ती सर्व मुले उठून आपला हात पुढे करतात आणि उत्तर देण्यास जो तो असा धडपडत स्-स-सर-सर करतो की विचारणा-या परक्याची तारंबळ उडते ! हेड्मास्तराने मोठ्या आगत्याने वर्ग दाखविले.