इंग्लंडमधील रोजनिशी (२ सप्टेंबर १९०१)
दोन प्रहर १२ घंटे शनिवार
२ सप्टेंबर १९०१
ता. २५ बुधवारी बोर्डवर नोटीस लागली की ता. २६ दिवशी सकाळी आगबोट एडनला पोचेल. तर ज्यांना पत्रे पाठवायाची असतील त्यांनी संध्याकाळी ५ ते ६ चे दरम्यान पोष्ट ऑफिस उघडे राहील तितक्यातच आपली सर्व पत्रे टाकावीत. १२ तासाचा अवकाश असता इतक्या आधी व इतका थोडा वेळच पोष्ट आफीस का उघडे असावे ह्याचे कारण समजले नाही. असो. ता. २५ चा दिवस माझा सर्व पत्रे लिहिण्यातच गेला. सुबोध पत्रिकेस १४ पानांचे एक पत्र लिहिले.१० त्यात पर्शिया आगबोटीचे व तेथील व्यवस्थेचे सविस्तर वर्णन केले आहे. मुंबईपासून एडनपर्यंतचा प्रवास थोडाबहुत कंटाळवाणा होतो. पहिले दिवशी सभोवती अगदीच नवीन देखावा असल्याकारणाने तो दिवस सहजच निघून जातो. दुस-या दिवशीचा प्रातःकाळही बरा जातो. पण दोन प्रहरपासून कंटाळा येऊ लागतो. पाहिलेले तेज नजरेस पडू लागल्यामुळे मनाचा उत्साह नाहीसा होतो. २४ तास आंग हालल्यामुळे तोंडाला थोडीबहूत मळमळ सुटते. नवीन सोबत्यांची नीट घसट अद्यापि न पडल्यामुळे एकांतवास वाटू लागतो. अन्नाचीही नीट सवय न झाल्याकारणाने शिसारी येते. अशा प्रकारे ४ दिवस गेल्यावर ५ वे दिवशी एडन लागते. मग सगळाच प्रकार बदलतो. मला स्वतःला दोनच दिवस १/२ तास मळमळले. पण पुढे बरे वाटू लागले. उद्या एडन दिसणार असे समजल्याबरोबरच मनास हुषारी येऊ लागते.
ता. २६ गुरुवारी सकाळी एडनजवळची टेकडी दिसू लागली आणि मनाला अत्यानंद झाला. मला ह्या वेळी कोलंबसाची आठवण झाली. बोटीत आमची सर्व प्रकारे सोय-चैन असता, आम्ही एडनला लवकरच व सुखरूप पोंचू अशी मनाची खात्री असता मुंबई सोडून ३।४ दिवस झाले नाहीत तोच, आम्ही कधी जमीन पाहू असे झाले होते; तर कोलंबसाचा ह्याच्या उलट अगदी भयंकर प्रकार असल्याने त्याने जेव्हा प्रथम जमीन पाहिली तेव्हा त्यास कसे झाले असेल ! असो. आम्हाला काही कमी आनंद झाला नाही. वेळ सकाळचा असल्याने तर एडन बंदर फारच सुंदर दिसले. ते उंच टेकड्यांमध्ये लपून बसल्यासारखे दिसते आणि मधून मधून डोकावते. टेकड्यांचे कडे उंच सुळकेदार व वर निमुळते होत गेलेले आहेत. पण कोठेही झाड झुडूप किंवा एक हिरवे पानही दिसत नाही. डोंगर काळा फत्तर नसून रेतीचा बनलेला असावा असा दिसतो. दुरून रेसिडेन्सी व इतर बंगले दिसू लागतात. सुमारे ७ वाजता आगबोट बंदराजवळ गेली पण अगदी जमीनीस जाऊन भिडली नाही. कारण येथे प्लेगसंबंधी क्वारंटाईन आहे. आगबोटीवर क्वारंटाइनचा काळा झेंडा व मेलाचा तांबडा झेंडा हे दोन्ही फडकू लागले. बंदराचे पश्चिम बाजूस बोट पूर्वेकडे तोंड करून उभी राहिली. मागले बाजूस शहर व आरबस्थानाचा किनारा लांबवर दिसू लागला. व्यापारी लोक लहान लहान भाड्याचे होड्यातून आपला माल विकण्यास अगदी आगबोटीजवळ येऊ लागले. होड्या हाकणारे लोक बहूत करून सोमाली अगर शिद्दी असत. व्यापारी गोरे आरबी असत. क्वारंटाइनमुळे त्यांस बोटीवर येण्यास अगर प्रवाश्यांस त्यांचेकडे जाण्यास परवानगी नव्हती. म्हणून खालूनच ते आपले जिन्नस आम्हांस दाखवीत व ओरडून किमती सांगत. `टू शिलिंगज, फोर` `व्हेरी फाइन, लेडी` वगैरे. आपल्या तुटक इंग्रजी भाषेत ते साहेब लोकांशीं व्यवहार करीत आणि केव्हा केव्हा आपल्या जिनसांनी किंवा भाषेने, केव्हा आपल्या आंगविक्षेपांनी ते गि-हाईकांचे चित्त वेधीत असत.
दोन प्रहर घंटे १२।। ता. १ ऑक्टोबर १९०१ मंगळवार
हे व्यापारी लोक मुसलमानी चांगले बोलत असत. ह्यांचा पोषाक बोहरी लोकासारखा असे. कानावर केसाची लांब झुलपी असत. ह्याशिवाय टाळूवर केस किंवा दाढी राखिली नव्हती. सोमाली पोरे अर्धी नागवी उघडीच होती. ही पोरेही स्वतः लहान सहान जिनसांचा व्यापार करीत. येथे विक्रीचे जिन्नस म्हणजे मडमा आपल्या गळ्याभोवती वापरतात ते काळ्या किंवा करड्या रंगाचे झुपकेदार पिसांचे लांब हार, सुटी लांबरुंद शोभिवंत पिसे, सांबराची शिंगे, माशांचे सांगाडे व हाडे, शहामृगाची अंडी, खजूर आणि मुख्यत्वेकरून सिगार्स किंवा चिरूट व इतर काही सटरफटर इतकेच होते. मी एक शिंपल्याचा व मोत्यांचा विणलेला हार व दोन बिंदल्या घेतल्या. त्यांची मला १ शिलिंग किंमत पडली. सोमाली पोरांनी मला त्यांची किंमत प्रथम चार शिलिंग सांगितली. येथे ह्याच तत्त्वावर व्यापार चालतो. माल खपेनासा झाला म्हणजे ही पोरे ८।१० मिळून बँडचे चालीवर इंग्रजी गाणी गाऊ लागतात. ती ऐकून मोठी मौज वाटते. मग कोणी त्यांजकडे पेनी दोन पेनी टाकतात. ह्या प्रकारचे संगीत बोट निघेपर्यंत मधून मधून चाललेच होते. पूर्वी प्रवाशी लोक लहान लहान नाणी समुद्रात फेकीत असत व ही पोरे चटकन पाण्यात बुडी मारून ती नेमकी बाहेर काढीत. फेकणारास मौज वाटे व ह्या पोरांचा तिच्यावर निर्वाह चाले. पण ह्यामुळे वरचेवर फार अपघात होऊ लागले म्हणून ही चाल सरकारांनी सक्त बंद केली वगैरे हकीकत मी ऐकीली होती. पण ह्या ठिकाणी असला काही प्रकार दिसला नाही.