इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ८ आदित्यवार जून १९०२)
ता. ८ आदित्यवार जून १९०२
दोन प्रहरी ३ वाजता ऑक्सफर्ड पॅरिशचे वर्क हौस (कंगालखाना) पाहण्यास गेलो होतो. एक मोठे आवार आणि त्यात स्वच्छ अशा ४।५ इमारती होत्या. खान्याचे मुख्य पालक आम्हास दाखविण्यास होते. तेथे सुमारे २५० म्हातारी, दुबळी, अनाथ स्त्रीपुरुषे होती. सुमारे २५।३० अगदी वृद्ध अथवा आजारी होते. माझे मित्र मि. आणि मिस् कॉक ह्या आजा-यास काही गाणी म्हणून दाखविण्यास आले होते. दर आठवड्यास ह्यांच्या करमणुकीकरता मि. ग्रब (पालक) असे गाणे करवितात. ऐकण्यास ३ पुरुष आणि ९ वृद्ध बायका होत्या. बाकीचे आजारी येण्यासारखे नव्हते. असे गाणे ऐकून एक औदासिन्याने अगदी मरावयास टेकलेली बाई सुधरून बरीच वर्षे वाचली असे मि. ग्रब म्हणाले. बायका पुरुष उदास दिसले. नंतर आजारी निजले होते तेथे गेलो. एक नव्वद वर्षाची म्हातारी होती. तिला हांतरूण सोडून उठवत नव्हते. पण तिला ऐकू सुरेख येत असून खणकर बोलत असे. मी तिला नीट दिसते काय म्हणून विचारता मी नुकतेच पुस्तक वाचीत होते असे सांगून जवळचे बुक दाखविले. येथे चहूकडे व्यवस्था, स्वच्छता आणि टापटीप फार उत्तम होती. सार्वजनिक खर्चाने पोसले जाणारे हे अगदी कंगाल लोक असता व्यवस्था तर आमच्याइकडील वरच्या वर्गातील लोकांप्रमाणे होती. एका सोळा वर्षाच्या अंधळ्या मुलाची फारच कठीण स्थिती होती. त्याचे दोनी पाय उरावर आले होते. तो दोन वर्षे आंथरूणांतच आहे. घरची दाई त्याची आईप्रमाणे व्यवस्था करिते हे पाहून आश्चर्य वाटले. एकीकडे पुरुषांची व दुसरीकडे बायकांची व्यवस्था आहे. वृद्ध दांपत्य असल्यास व वर्तणूक बरी असल्यास एकत्र निजण्याची परवानगी आहे. सुमारे ८।१० एकर जमीनीची लागवड ह्या लोकांनी करावयाची असते. बायका धुणे वगैरे करितात. बागा, फुलेझाडे, जेवणाची , बसण्याउठण्याची सुरेख व्यवस्था दिसली. भटकणा-या भिका-यांची निराळी व्यवस्था आहे. भिकारी येथे आल्याबरोबर त्यांस प्रथम चांगले उन पाण्याने स्नान घालण्यात येते. नंतर त्यांचे सर्व गलीच्छ कपडे वाफवितात. दुसरे दिवसभर त्यांचेकडून काम करून घेऊन तिसरे दिवशी सकाळी न्याहारी देऊन त्यास घालवून देतात. रोज सुमारे २०।३० भिकारी येतात. काम बहूतकरून खडी फोडण्याचे असते. ज्यांचे हातून मुळी काम होत नाही अशा थकलेल्या वृद्धांची वर लिहिल्याप्रमाणे ह्या घरात कायमची व्यवस्था होते. ते सर्व फार संतुष्ट व सुखी दिसले. दायी व अधिका-याशी त्यांचे प्रेम दिसले. संस्था पाहून अत्यंत समाधान वाटले. हा खरा ख्रिस्ती धर्म !
जूनअखेर
बोर लढाई संपल्यावर अभिनंदनार्थ ऑक्सफर्ड येथे जो अदृष्टपूर्व प्रकार घडला आणि ७ व्या एडवर्ड बादशहाची प्रकृती बिघडल्यामुळे राज्यारोहण समारंभाचा कसा विरस झाला ह्याबद्दल थोडी हकीकत सुबोध पत्रिकेस पाठविली आहे.३८
सुट्टी
स्ट्रॅट्फर्डची यात्रा
ता. १० जुलै १९०२
हे शहर महाकवी शेक्सपिअरचे जन्मस्थान म्हणून बायसिकलवरून पाहवयास गेलो. हे ऑक्सफर्डहून ३८ मैल लांब आहे. सकाळी ११। वाजता निघालो. ७ मैलावर वुड्स्टॉकजवळ पावसाने भिजवले आणि वा-याने वाकविले. पण निश्चय इतका दृढ होता की आताच थकलो होतो तरी तसाच पुढे चाललो. एनस्टो येथे फराळ करून ४ वाजता निघालो. वारा तर छातीवर चालून येई. बरेच चालावे लागले. लाँग काँमटनजवळ सुंदर दरी लागली. ९ वाजता स्ट्रॅट्फर्डला पोचलो. जनाबाईस १ पत्र लिहिले.
दुसरे दिवशी न्याहारीनंतर १ वाजेपर्यंत शेक्सपिअरसंबंधी सर्व ठिकाणे पाहिली. तो जन्मल्याचे घर, त्याने लावलेल्या झाडाचा एक दुसरीकडे लावलेला भाग इ. चे फोटो घेतले. ४ वाजता बांनबरीस निघालो. डेडिंगटन येथे वसती करून दुसरे दिवशी जेवणास १२।। वाजता ऑक्सफर्डला आलो. शेक्सपिअर जन्मला त्या घराजवळ रस्त्यातील मुले एक पेनीकरिता त्याचे चुटकेदार चरित्र पाठ म्हणून दाखवितात त्याचे आश्चर्य वाटले. कदाचित् पत्रिकेस लिहीन.३९
इंग्लिश सरोवर प्रांत४०
English Lakes,
Leather's Cottege, Borrowdable