इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ८ नवंबर १९०१)

(खालील माहिती मी माझ्या दुस-या एका रोजनिशीच्या बुकातून वेचून आज ता. १८ मार्च १९२६ रोजी येथे लिहीत आहे.१३ :-

"ता. २ आक्टो. ०१ १२ वाजता आम्ही कॅडिया व क्रीट बेटाजवळ आलो. आगबोट फार हालू लागली. लाटा दोन दोन पुरूष येत होत्या.
ता. ३ आक्टो. मला जुलाब होऊन शक्ती क्षीण झाली. आम्ही सोबत्यांनी एकमेकांस आपले फोटो दाखविले. मला फार वाईट वाटू लागले. भजन केले प्रार्थनासंगीतच काय तो माझा जिवलग मित्र होता. दोन प्रहरी १।। वाजण्याचे पूर्वी इतालीचा किनारा दिसू लागला. किना-यावर मेलीटो, रेजिओ, सिला अशी तीन मोठी गावे लागली. सायंकाळी ५ चे सुमारास मेझीना सामुद्रधुनीतून गेलो. सायंकाळी ६ वाजता स्ट्रंबोली ज्वालामुखी स्पष्ट दिसला. ता. ४ आक्टो. १ ।। वाजता कॉर्सिका व सार्दिनिया बेटे दिसू लागली. तिसरे प्रहरी ४।। वाजता बोनिफॅशिओ सामुद्रधुनीतून गेलो. ता ५ आक्टोबर मार्सेय्यची (टेकडी) सकाळी ६ वाजता दिसू लागली. सकाळी ९।। वाजता मार्सेलीसचे किना-यावर पाय ठेविला. ११ वाजता हॉटेल डी जि नीव्हो येथे उतरलो. लगेच नॉटर दाम ल गार्ड१४ हे देऊळ पाहवयास गेलो. १ वाजता जेवण आटपून ३ वाजता पॅलेस डी लाँग शॉपकडे निघालो. सायंकाळी ५ वाजता स्टेशनवर पोचलो. ६ वाजता हॉटेल डी बफेत जेवलो. प्रत्येकास ५ फ्रांक पडले (१ फ्रांक =  १० आणे). रात्री ८-४० ला पॅरिसला निघालो. सकाळी ६ वाजता डी जॉन स्टेशनवर जागा झालो. पुढे अँव्हिग्नान, लिओ वगैरे स्टेशने लागली. गाडी दर तासी ५०-६० मैल धावत होती. ता. ६ ऑक्टोबर १९०१ रोजी १० वाजता पारीसला पोचलो. हॉटेल डी लिऑन डी मिलानी येथे उतरलो ३ वा. पॅलेस डी न्याशनल इन्व्हॅलिड (नेपोलीयनची कबर) पाहिली. ३।। (वाजता) बिग व्हील, ४ (वाजता) एफेल टॉवर पाहिली. वादळ फार होते. शिखरापर्यंत जाणे झाले नाही.

ता. ७ आक्टोबर १९०१ सकाळी ७ वाजता लंडन येथे पोचलो. इंग्लीश चॅनेलमध्ये समुद्र लागून फार हैराण झालो. पण आतापर्यंत समुद्राचा म्हणण्यासारखा कोठेच त्रास झाला नाही. टालबट रोड बेज वांटर नं. ८२ रोमेशचंद्र दत्त१५ ह्यांचे खोलीत उतरलो. स. १० वाजता रेव्ह. कोपलंड बोवीना१६ भेटलो. पारा ५५ अंशावर होता. ता. ८ आक्टोबर रोज ११।। ते ८ रात्रीपर्यंत युनिटेरिअन प्रॉव्हिन्सीअल असेंब्लीच्या वार्षिक सभेत घालविले. बोवीकडे जाण्यास व्हिक्टोरियांस २।। शिलिंग दिलेले पाहून बोवीसो० हासले. परत २ पेनी देऊन टालबट रोडवर आलो.

ऑक्सफर्ड

शुक्रवार ता. ११ आक्टो. सुमारे ३ वाजता निघालो तो ऑक्सफर्ड येथे ४ ला पोचलो. लंडन येथे टॅक्सीभाडे २ शिलिंग २ पें, ऑक्सफर्ड येथे २ शिलिंग पडले. लंडनहून माझी एक जड ट्रंक ऑक्सफर्डला पोचविण्याबद्दल कुक कंपनीला ७ शि. २ पेन्स दिले. माझा सर्व प्रवास खर्च पडताळून पाहता ता. १९ आक्टो. अखेर मजजवळ शिल्लक रोख ४ पौंड ७ शि. ३ पेन्स शिल्लक आढळली.``
वि.रा. शिंदे, पुणे ता. १८ मार्च १९२६).

ता. ८ नवंबर १९०१

चि. जनाबाईला आणि बाबाला अशी दोन पत्रे लिहिली. संध्याकाळी ७ वाजता मार्टिनो क्लबच्या जेवणास गेलो. सुमारे ४० जण हजर होते. जेवण आटपल्यानंतर चर्टकॉफ१७ नामक रशियन गृहस्थाने `रशियातील धार्मिक शिक्षण` ह्या विषयावर निबंध वाचला. सदर गृहस्थ टॉलस्टोईचे मित्र व अनुयायी असून पक्के सोशॉलिस्ट व अनॅर्किस्ट आहेत. त्यांनी रशियाची मोठी शोचनीय स्थिती सांगितली. ती किंचित् एकपक्षीय असावी अशी शंका आली. त्यांनी आपली काही पुस्तके व स्वतःविषयी माहिती मला पाठवून देण्याचे कबूल केले. `मार्टिनो क्लब` डा. मार्टिनोच्या स्मरणार्थ मँचेस्टर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व प्रोफेसरांनी काढिला आहे. प्रत्येक टर्ममध्ये हा दोनदा भरतो आणि कोणातरी मोठ्या गृहस्थाकडून निबंध वाचिला जातो. मग त्यावर विद्यार्थ्यांचा वादविदा होतो.

ता. ९ नवंबर १९०१

सकाळी ९ पासून ११ पर्यंत आनी बिझांट१८ Reincarnation `पुनर्जन्म` पुस्तकाची ४० पाने वाचिली. १ पर्यंत इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. तेथली लायब्ररी व वाचनालय पाहिले. दोन प्रहरी संध्याकाळपर्यंत मि. शोन ह्याजबरोबर भाड्याची खोली पाहण्यास हिंडलो. ५ वाजता तुर्की मित्र रा. हाकी यांजकडे चहाला गेलो. रात्री एक चित्र काढले.१९