इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ७ गुरुवार ऑगष्ट १९०२)
ता. ७ गुरुवार ऑगष्ट १९०२
संध्याकाळी ब्लॅकफर्ड हिलच्या भोवती फेरी केली. ब्लॅकफर्ड ओलांडून एका कड्यावर आलो तेव्हा मागच्या दरीचा अती शांत व सुंदर देखावा दिसला. खाली एका लाकडी पुलाच्या शेवटावर एक प्रेमी जोडपे बसले होते. मी दरीचा फोटो घेतला. मी पाहत असताही ह्या जोडप्याने एकमेकांचे चुंबन घेतले `कामातुराणां न भयं न लज्जा` हे सत्य ह्या टेकडीवर चांगले दिसून आले. इतके की लवकर मला ह्या आडरानात पोलीस अधिकारी दृष्टीस पडला. मी त्यास त्याचे येथे काम काय ते भीड सोडून विचारले. उघड्या जागेत `घडू नये तो प्रकार` घडू लागल्यास त्याचा प्रतिकार करण्यास व जुलूम जबरी तंटे वगैरे ही होऊ नयेत म्हणून ते तेथे हिंडत होते असे कळले.
शेवटी मी एका कड्यावर जाऊन एकांतात गात बसलो. इतक्यात मागून रा. भाटे ह्यांनी एकदम हाक मारिली. नंतर ते व रा. नायडू असे त्रिवर्ग घरी परत आलो.
ग्लासगो
Young Men's Christian Club
ता. ८ शुक्रवार आगष्ट
दोन प्रहरी १।।। वाजता ग्लासगो शहरास निघालो. सु. ४ वा. पोचलो. लखनौचे अझीझ अहमद हे नं. ३६ बँक स्ट्रीट हिल हेड, ग्लासगो येथे राहत होते तेथे गेलो. ह्यांनी एका इंग्रज बाईशी लग्न केले आहे. तिच्या पोटी हैदरी नावाची वडील १६ वर्षाची मुलगी, ११ वर्षाची सखिना आणि १४ वर्षाचा मुलगा उस्मान अशी मुले आहेत. सर्व अत्यंत गरीब मनमिळाऊ व आगत्यपर आहेत. अहमदसाहेब ख्रिस्ती आहेत पण मते ब्राह्म आहेत. ह्या शहरी हिंदुस्थानातून जे खलाशी मजूर येतात त्यांची उस्तवार ते करीत असतात. त्यांना शिकवणे, चाल-चलणूक सांगणे आणि उपयोगी पडणे वगैरे करितात. वर्गणी गोळा करून स्वतःचा व कुटुंबाचा निर्वाह करितात.
Y. M. C. 100, Bothwell Str.
Glassgow
ता. ९ शनिवार आगष्ट
आज बादशाहाचा राज्याभिषेकाचा दिवस. ११ वाजता येथील कॅथीड्रलमध्ये अभिषेकाप्रीत्यर्थ उपासना झाली तिला गेलो होतो. फेट्यामुळे मला बराच नेहमीप्रमाणे मान मिळाला. अगदी पुढची जागा मिळाली. मद्रासला एकदा मागे बिशप होते त्यांचा आज उपदेश झाला. भाषणात हिंदुस्थानासंबंधी बोलताना माझाही उल्लेख केला. मी फेट्याचे आभार मानिले. गर्दा बरीच झाली होती. गाणे फार आवडले.
ग्लासगो हे संयुक्त राज्यात लंडनच्या खाली दुस-या नंबरचे शहर आहे. त्या मानाने शहरात बराच शृंगार केला होता. रात्री रोशनायी फार झाली होती. विजेच्या ट्रॅमगाड्यांची इथे फार चांगली व्यवस्था आहे. तीन गाड्या (वर) बिजली दिव्याचे सुंदर कार्तीक५९ लावले होते. दिव्याचा रंगीबेरंगी मोठा मुकूट अग्रभागी होता. बाजूने राजाराणी ह्यांची मोठी चित्रे होती. वरती बँड सुरू होता. अशा ह्या गाड्या मुख्य रस्त्याने मध्यान्हपर्यंत हिंडत होत्या. लोकांत पुष्कळ उल्हास दिसला. गर्दीही मनस्वी होती. ट्रॅमवर तर खेचाखेची. सखीना, तिची आई व मी गाडीवर चढलो, पण जागाच मिळेना. मी मागे उभा राहून, त्या दोघी तिस-या चौथ्या पायरीवर उभ्या राहून सर्व रस्ता गेलो. तहाच्या दिवशी रात्री ऑक्सफर्डात व लंडनात जो आचरटपणा झाला तो येथे आजच्या आनंदाच्या प्रसंगी कोठे नजरेस आला नाही.
१० आदित्यवारी आगष्ट १९०२
११ वाजता युनिटेरिअन देवळात उपासनेस गेलो. येथील देवळास जुलै महिन्यात सुटी असते. सुमारे ५०।६० मंडळी हजर होती. उपदेश Living Crown ह्यावर जोराचा झाला. संध्याकाळी वनस्पतिसंग्रह Botanical garden पाहिली.
स्कॉच सरोवरे
ब्रॅड्`स हॉटेल अरखहर लाख लाँग