माझ्या खोड्या
प्रकरण १४ वें
आग्रहीपणा
दंगा, मारामारी आणि स्वैर खेळ हे बालपणाचे जन्मसिद्ध हक्क होत; आणि ते मी माझ्या परीनें-आमचे बाबांचा आम्हांवर कितीही दाब असो-बजावयाला काहीं कमी केलें नाहीं. अगदीं लहानपणीं मी शेजारच्या मुलांना मारून आईकडे कागाळ्या आणीत असे हें मला अद्यापि आठवतें. आमचे आजोबा असतांना आमच्या वाड्याच्या बाहेरच्या पटांगणांत कांहीं भाडोत्रीं कुळें राहात असत. त्यांत पाटोळे नांवाचें एक गरीब कूळ असे. त्यांचा रामू नांवाचा एक माझ्याच वयाचा लहान मुलगा असे. सहज खेळतां खेळतां मी त्याच्या डोक्यावर हात ठेवण्याचा हट्ट घेतला. पण हात ठेवूं न देण्याचा हट्ट त्यानेंही घेतला. कारण हट्ट करणें दोघांचाही सारखाच जन्मसिद्ध हक्क होता नाॽ शेवटीं आम्हा लहानग्यांची मारामारी झाली. रामू आपल्या आईकडे रडत गेला. तरी मी त्याच्या मागें लागलोंच होतों. शेवटीं ह्या खटल्याचें अपील आमचे आईकडे आलें. कारण रामूची आई माझ्या आईची मोठी मैत्रीण होती. आईनें हा खटला साहजिकच आजोबांकडे वर्ज केला. आजोबांनीं आम्हां दोघा हेकेखोरांना आपल्या समोर घेतलें आणि दोघांला खाऊ देऊं केला. पण खाऊपेक्षां मला माझ्या दावेदाराचे डोक्यावर हात ठेवण्यांतच जास्ती ईर्षा वाटत होती. रामू खाऊंला कबूल झाला, आणि मी त्याच्या डोक्यावर हात ठेविला. खटल्याचा निकाल लागला. बरा म्हणा वाईट म्हणा हा आग्रहीपणा माझ्यांत अद्यापि केंव्हा केंव्हा चमकतो!
गांवढळ खोड
म्हातारबा सुतार म्हणून माझ्या वडिलांचे एक मित्र असत. त्यांची दोन मुलें रामू आणि कृष्णा हीं अनुक्रमें माझ्या आणि माझ्या वडील भावाच्या वयाचीं असत. मी मराठी शाळेंत असतांना ह्या चौघांची फार गट्टी असे. एकदां आम्ही चौघे एकीकडे व दुसरीं आळींतील मुलें दुसरीकडे ह्यांची आमच्या घराच्या पश्चिमेस असलेल्या तळ्यांत एक मोठी मारामारी झालेली आठवते. तळ्यांत पाणी नसे. त्यांत खेळण्यास विस्तीर्ण जागा असे. पण एकदां रामू आणि माझीच मारामारी जूंपूंन आम्ही दोघेही आमच्या आळींतील मोठ्या रस्त्यांत भलीं मोठीं खोल गटारें होतीं त्यांत घाणींत पडलों होतों. रामूच्या आईनें आम्हांला दोघांला धुतलें, पुसलें, खडे कांटे रुतले होते ते काढले. आणि माझ्यापेक्षां रामूला जरी मार जास्त लागला होता तरी त्याच्या आईनें माझेंच कौतुक करून मला माझ्या आईकडे पाठविलें. विहिरीच्या जुन्या भिंतीवर एक प्रकारची बारीक लव्हाळ्याप्रमाणें वनस्पति चिकटून वाढत असे. ती वाळल्यावर आम्ही काढून आणीत असूं. ती प्रतिपक्षाच्या मानेला न कळत फासल्यावर तेथें आग सुटे. हा खरोखर आमचा दुष्टपणा आणि भ्याडपणाही खरा. पण म्हणतात ना, प्रेमांत आणि युद्धांत सगळेंच कांहीं शोभतें. मग आम्हीच कसे अपवादॽ शिमगा आला म्हणजे ह्या बालयुद्धाला नवीन जोम येई. पण जसजसा मी वरच्या वर्गांत जाऊन ब्राह्मणांच्या मुलांना हाताशीं घेऊं लागलों तसा हा गांवढळपणा कमी झाला. तरी माझ्या कांहीं वैयक्तीक खोड्या चालूच होत्या.
रामतीर्थ
दर श्रावणी सोमवारीं जमखंडीच्या पश्चिमेस रामतीर्थ म्हणून एक रम्य ठिकाण आहे, तेथें जत्रा भरत असे. इ. स. १८५७ सालच्या बंडानंतर जमखंडीचे यजमान श्रीमंत आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनीं ह्या ठिकाणींच आपली वस्ती मांडली. पूर्वीं येथें रामेश्वराचें काय तें जुनें एक रम्य देऊळच होतें. पुढें २५।३० वर्षांत येथें विस्तीर्ण राजधानीचें स्थान झालें. पश्चिमेस डोंगराखालीं कडपट्टी म्हणून एक लहान खेडेगांव आहे. तेथें बसवण्णाचें लिंगायत पुरातन प्रतिद्ध देवालय आहे. येथें यात्रा मोठी भरत असे. ती मोडून आप्पासाहेबांनीं रामतीर्थ लोकप्रिय करण्यास ही यात्रा वर डोंगरांत आपण राहत, तेथें कांहीं वर्षें नेली. रामतीर्थास जाण्याला एक वरची डोंगराची व दुसरी खालची सपाट-गाड्या वगैरे जाण्याची-अशा दोन वाटा असत. ह्या दोन्ही वाटा सोडून अगदीं डोंगराच्या माथ्यावरून मेलगिरी लिंगाप्पाच्या देवळामागून रामेश्वराच्या देवळाला जाण्याची मीं नवीन टूम काढली. ह्याचें कारण पावसाळ्यांत डोंगरावरचीच नव्हे तर भोंवतालच्या दूरवर मैदानी प्रदेशांतील शोभा फार सुंदर दिसे.
विंचवाशीं खेळ
शिवाय आणखी एक कारण वेगळेंच होतें. ह्या डोंगरावर विंचू फार असत. ते भले मोठे काळे तांबडे असत. काळ्या विंचवाला इंगळी म्हणत. ती चावली कीं प्राणांतच! हे विंचू धरून त्यांची एक मोठी माळ करण्याची आम्हांला खोड लागली. दगड उचलला कीं खालीं विंचू आढळावयाचाच. मी तर विंचू धरण्यांत मोठा धीट व पटाईत झालों. पुढें पुढें विंचवाच्या नांगीतलें विष काढून त्याला अगदीं तळहातांत घेऊन मी इतर मुलांना चकीत करीत असें. विंचू नजरेस पडला कीं तो आपली नांगी आधीं वर करितो. तो मी चिमटींत मोठ्या शिताफीनें घट्ट पकडीत असें. मग माझ्या नखावर त्याच्या नांगीचे टोंक घासलें म्हणजे त्यांतून विषाचा एक लहानसा बिंदू बाहेर निघे. तो पुसून टाकला कीं विंचवाचें सर्व तेजच नाहींसें होई. तो आपोआपच नांगी खालीं टाके. मग त्याला कोणीही खुशाल हातावर घ्यावें. पण निस्तेज विंचवालाही हातांत घेण्याचें धैर्य कोणास नसे. मग माझ्या फुशारकीला कोठली सीमा उरणार! घरांत किंबहुना आमच्या शाळेंतही एकादां मोठा विंचू निघाला कीं मुलें मजकडे येत. मी चटकन् तो धरून त्याचें विष काढून हातावर घेई. अशा गडबडींत एकादे वेळीं चुकून मला विंचू चावतही असे. पण अभिमानास पेटून त्या वेदना मी मुकाट्यानें सहन करीत असें. कोण हा अर्कटपणा!
सहिष्णुता
दुखणें आलें किंवा जबर इजा झाली तर इतरांप्रमाणें मी विव्हळत नसें. स्वस्थ घुम्मेपणानें पडे. “विठ्या, काय तूं बेरड आहेस रे” असें आई म्हणे तिकडे माझें लक्षच नसे. ही स्पार्टन सहिष्णुता माझ्यांत जन्मतः नसून ती माझ्या मानीपणानें मी आणली होती. शिक्षकांनीं छडी मारली कीं, साधारण मुले मोठ्यानें किंकाळी फोडीत. इंग्रजी शाळेंत गेल्यापासून मला तर शिक्षकाच्या हातून मार खाण्याची कधीं अपवादादाखलही पाळी आली नाहीं. सहनशीलपणा वाढवावा म्हणून मी शिक्षक नसतांना त्यांची छडी घेऊन एकाद्या मुलाच्या हातांत देई. आणि माझ्या तळहातावरच नव्हे तर मनगटावर जोरानें मारण्यास सांगे. किती मारलें तरी मी हात खालीं घेत नसें. हात हिरवा निळा झालेला लपवून ठेवण्याचा जो त्रास होई तेवढाच काय तो. इंग्रजी सहाव्या किंवा सातव्या यत्तेंत असतांना घडलेली एक गोष्ट. आमचें नेहमीचें मित्रवलय बसलें होतें. मी दुःख किती सहन करतों, तें पाहाण्यासाठी व्यंकू कुलकर्णी ह्यानें एकदां जळती उदकाडी माझ्या उजव्या हाताच्या पंजाच्या मागील भागावर ठेवली. ती एकदम न ठेवतां हळूच जवळ आणतां आणतां लावली. उद्देश हा कीं, पहिला चटका लावल्याबरोबर मी कचरतों कीं काय पाहण्याचा. इतकेंच नव्हे तर माझ्या तोंडांतून शब्द किंवा डोळ्यांवरून कसलेंही चिन्ह दिसलें कीं मी हरलों असें समजावयाचें ठरलें होतें. शेवटीं जळती उदकाडी बराच वेळ ठेवली तरी हूं का चूं नाहीं. उदकाडीच विझूं लागली. इतक्यांत माझ्या आईनें अकस्मात् येऊन तें पाहिलें. ती रागें भरली! माझ्या उजवा हाताचे मागें तो लहानसा व्रण अद्यापि स्पष्ट दिसत आहे. ह्या अर्वाच्यपणास काय म्हणावेंॽ
विक्षिप्तपणा
विक्षिप्तपणाचें धाडस माझ्या उपजत स्वभावांत पेरलेलेंच दिसतें. कारण मी कॉलेजांत गेल्यावरही ब-याच वेळां मी चमत्कारिक वागलों आहें. पन्हाळगड - विशाळगडची सफर मी फर्ग्युसन कॉलेजांत असतांना केली. तेव्हां किल्ल्याच्या अवघड जागीं चढून जाऊन बसणें मला आवडावयाचें. इंग्लंडांत असतांना, इंग्लिश लेक्स् मध्यें मी एकदां डॉ. कारपेंटर-आमच्या मॅंचेस्टर कॉलेजचे प्रिन्सिपाल-ह्यांचा पाहूणा होतों. बरोबर कॉलेजमधील सहाध्यायी ७।८ होते. एके दिवशीं ठरलें कीं, सूर्योदय पाहण्याला रात्रीं उठून एका डोंगराच्या शिखरावर जावयाचें. सूर्योदयापूर्वीं तेथें पोंचण्यासाठीं भल्या पहाटे उठून निघालों. डोंगरांत कांहींशी वाट उंच गेल्यावर मोठा पाऊस आला. रात्र अंधारी होती. सगळी मंडळी परतली. पण मला परतावेसें वाटेना. मी एकटाच तसा पुढें चाललों. पाऊस थांबेना, वाट दिसेना. मुलूख अगदींच अपरिचित, बरोबर कोणीच नाहीं. शेवटीं जवळच एक लहानशी गुहा लागली. तींत शिरून पावसांतून आश्रय घेतला. सुदैवानें काड्याची पेटी होती. काडी ओढून पाहातां गुहा फार लहान होती हें दिसलें. उजाडेपर्यंत रात्र तेथेंच काढावी लागली. सकाळीं उठून एकटाच भुतासारखा घरीं आलों. मिसेस कारपेंटर चिंतेंत बसल्या होत्या. कारण हें माझे करणें त्यांना फार धाडसाचें वाटलें. पण मला त्यांत कांहीं विशेष वाटलें नाहीं. ह्याच वेळीं डॉ. कारपेंटर आणि आम्ही सर्व मंडळी इंग्लिश लेक्स् डिस्ट्रिक्ट (सरोवर प्रांतीं) मध्यें वनभोजनास गेलों असतां आम्ही सर्वजण डोंगरांत एका रम्य जंगली ठिकाणीं फराळास उतरलों. जो तो स्वच्छंदानें हिंडूं फिरूं लागला. मला एक उंच झाड दिसलें. त्यावर चढण्याची मला हुक्की आली! लागलेंच चढलोंही. पण उतरतां येईना. कारण पायांत बूट घालून कसातरी चढलों तरी उतरतांना बुटासह पाय घसरूं लागले. बूट नसते तर उतरणें सोपें होतें. पण मंडळींत बूट काढणेंही बरें नव्हतें. लागलों घुटमळायला. अखेर एका फांदीच्या शेवटीं जाऊन ती वाकवून खालीं उडी घेतली. त्यावेळीं तर मिसेस कारपेंटरनीं किंकाळीच फोडली. आणि पुनः असल्या चेष्टा करूं नकोस म्हणून तिनें गंभीरपणानें बजावलें. स्कॉटलंडांतील सरोवर प्रांतांत तर मी एकटाच रोज २०।२५ मैल सरोवरावरून बोटींतून जाई. आणि उंच डोंगराच्या अगदीं शिखरावर एकटाच तास न् तास जाऊन बसे. भीति वाटत नसे. भिण्यासारखे कांहीं नव्हतेंही. हॉटेलांत श्रीमंती चोचले करणा-या मंडळींत न मिसळतां कोठेंतरी अगदीं एकांतवासांतील गरिबांच्या झोंपडींत उतरत असें. सॅवरडेनॉन नांवाच्या खेड्यांत एका गरीब कुटुंबांत मी उतरलों होतों. तेथील लहान मुलांना घेऊन मी लॉक् लोमंड सरोवरावर एकदां फिरत होतों. मनांत आलें कीं पोहावें. कपडे काढून घेतली उडी! जरी उन्हाळा होता तरी सरोवराचें पाणी इतके थंड होतें कीं मी पडल्याबरोबर गांरठलों. अंगाची मूठ वळावयाला लागली. पायाला गोळे येऊं लागले. मग पोहतों कसचा! मोठ्या प्रयासानें कांठाला लागलों. लहान मुलें घाबरून गेलीं. हा जीवावरचा प्रसंग गुदरला!
शर्यत
मी मराठी शाळेंत असतांना १०।१२ वर्षांचा होईपर्यंत तर फारच उतावळा, चळवळ्या व खोडकर होतों. पण माझा वडील भाऊ पाठीराखा नेहमीं असे, म्हणूनच बाहेर गेलेला मी सुरक्षित घरीं येत असे. एरवीं आईला मोठी काळजीच असे. चैत्र महिन्यांत रामतीर्थांत श्रीमंत अप्पासाहेब गुरांचें जंगी प्रदर्शन करीत. त्यावेळीं मोठमोठ्या शक्तिवान बैलांची ओझ्याने भरलेल्या गाड्या ओढण्याची शर्यत होत असे. ती पाहण्यास गांवोगांवच्या लोकांची मोठी गर्दी जमे. एकदां ही शर्यत पाहाण्यास मी आणि माझा भाऊ गेलों होतों. गर्दीत आम्हां मुलांस कसें दिसणारॽ म्हणून आम्ही एका मोठ्या झाडावर चढलों. पण त्या झाडावरही अगोदरच पुष्कळ माणसें चढून पाहात होती. त्या झाडाच्या एका मोठ्या उंच आणि लांब फांदीवर इतकीं माणसें गर्दी करून बसलीं कीं शेवटीं भार सहन न होऊन ती सबंध फांदी माणसांसह तुटून खालीं पडली. पण खालीं देखील माणसांची गर्दींच होती. त्यामुळें मोठा हाःहाःकार झाला. त्यांत मीही उंचीवरून खालीं पडलों. गर्दींत पडलों म्हणून हातपाय मोडले नाहींत. पण विलक्षण ओरखडलें होतें. इतक्यांत पोलीसची धराधरी चालली. तेव्हां जीव घेऊन पळत सुटलों. पण माझे लग्नांतलें मोठें लांब लाल पागोटें झाडाच्या फांदींत अडकलेलें, लग्नांतला लांब चिटाचा अंगरखा फाटलेला, शिवाय धोतर पायांत अडकत होतें. पोलीस तर धरावयास जवळ आलेला. अहाहा! काय तो प्रसंग! पण सर्वांना चुकवून पोगोटेंही झटकन ओढून घेऊन शेंडी सावरीत जी धूम ठोकली तों दीड मैल मागें न पाहातां घरापर्यंत मजल गाठली. पण मरण पुढेंच अद्यापि होतें. घरीं बाबांनीं फाटके कपडे पाहिल्यावर काय दशा होईल ती आठवून पोलीसपेक्षांही ह्या नवीन धास्तीनें काळीज धडधडू लागलें. घरीं कांहीं प्रवेश करण्याची छाती होईना. वाकून पाहात बाबा आहेत काय, कोठें बसले आहेत ह्याचा कानोसा घेतल्यावर चोराप्रमाणें आंत शिरलों. बाबा घरीं नाहींत हें पाहून हायसें वाटलें व सर्व श्रमांचा परिहार झाला.
विशेष करामत
शिमग्यांत एकदां अशीच खोड मोडली. शिमग्याचे दिवसांत चांदण्या रात्रीं, बाबांच्या डोळा चुकवून उनाडक्या करीत फिरत असूं. विशेष करामत म्हणजे वेश्यांच्या आळींत बदफैली लोकांच्या नांवानें शिमग्यांतल्या अचकट विचकट म्हणी म्हणत अभद्र ध्वनि काढीत मध्यरात्र उलटून जाईपर्यंत हिंडावयाचें; आणि पुनः धुलवडीच्या सकाळीं भुताटकी करावयाची, ती निराळीच! एकदां काय झालें, मी कांहीं मुलांबरोबर एका वेश्येच्या घराजवळ वाईट गाणीं म्हणत बोंबलत गेलों. मुलांच्या नादीं लागून तिच्या दाराशीं दंगामस्ती करू लागलों. आंतून बाळा काणे नांवाचा एक तरुण ब्राह्मण त्रासून आला व त्यानें मलाच पकडलें. त्याच शिक्षकानें मला शाळेंत घालण्याचा प्रथम मुहूर्त करण्याचा धडा घालून दिला असें मागें सांगितलेंच आहे. तो फार रागीट व दांडगा होता. उभ्या वर्गांत मुलांना मारूं लागला तर एकाच हातानें न मारतां दोन्ही हातांनीं गुराला मारल्याप्रमाणें झोडपीत सुटे. ही त्याची मारकट प्रसिद्धी मला माहीत होतीच. अशा यमाच्या हातीं सांपडल्यानें माझी गाळण उडाली. त्यानें संतापून माझें डोकें धरलें होतें. त्याच्या हातांत माझा रुमालच ठेवून मी खालीं झुकांडी देऊन निसटलों, तों सूं बाल्या केला. बाळा काण्यांच्या हातून सुटलों; पण रुमालाशिवाय घरांत बाबांपुढें कसें चालणार! शेवटीं माझा वडीलभाऊ ह्या काण्याकडे गेला आणि मी रामजीबोवांचा मुलगा असें कळल्यावर त्या यमाचीच उलट गाळण उडाली. रुमाल परत देऊन झालेली गोष्ट बाबांना कळवूं नको अशी उलट माझ्या भावाचीच तो गयावया करूं लागला. अशानें हा प्रसंग टळला! मीं मोठा झाल्यावर शिमग्यांतले अनाचार व अत्याचार बंद करण्यासाठीं होलिका संमेलनाची महाराष्ट्रभर मोठी चळवळ केली, तींत बरेंच यशही आलें. मुंबईंत ह्या कार्याचा आद्य व मुख्य प्रवर्तक मीच हें सर्व खरें; पण बाळपणच्या माझ्या लीलांची वाट कायॽ मोठेपणीं होलिका संमेलनांत साळसुदपणें लंबी व्याख्यानें देतांना मध्येंच एकादेवेळीं बाळा काणे आठवल्याबरोबर माझी बोबडीच वळे. एवढ्या प्रसिद्ध वक्त्याच्या तोंडाला मध्येंच कां खीळ पडली असें श्रोत्यांस वाटे. पण अंदरकी बात राम जाने!