कांहीं टिपणें

प्रकरण २९ वें
युनिटेरियन समाज
ज्या युनिटेरियन लोकांकडून हिंदुस्थानांतील ब्राह्मसमाजाच्या प्रतिनिधि-विद्यार्थ्याला मॅंचेस्टर कॉलेजांतून धर्मप्रचारासाठीं तयार करण्याप्रीत्यर्थ स्कॉलरशिप मिळते तो इंग्लंडांतील युनिटेरियन समाज आणि हिंदुस्थानांतील ब्राह्मसमाज या दोहोंचीं धर्मतत्त्वें, आचाराचे आणि कार्याचे धोरण स्थूलमानानें पाहतां जवळजवळ सारखेंच उदारपणाचें आहे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या ब्राह्मसमाजांची व प्रार्थनासमाजांची संख्या, मीं १९१२ सालीं प्रसिद्ध केलेल्या Theistic Directory मध्यें हिंदुस्थानांतील निरनिराळ्या प्रांतांतील मिळून एकंदर संख्या १६७ आहे. इंग्लंड, आयर्लंड व वेल्स मिळून एकंदर युनिटेरियन समाजांची संख्या १९०३ सालच्या Unitarian Pocket Book मध्यें दिल्याप्रमाणें ४५६ आहे. पण ब्राह्मसमाजापेक्षां युनिटेरियन समाजाची घटना किती तरी पटींनीं अधिक कार्यक्षम व सांपत्तिक स्थिति अधिक अनुकूल असल्यामुळें हिंदुस्थानांत आजन्म वाहून घेतलेलें ब्राह्मधर्म प्रचारक आणि आचार्य फार थोडे म्हणजे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके आहेत. आणि त्यांत पद्धतशीर रीतीनें तयार करून घेतलेले २।४ असतील किंवा नसतील. इंग्लंडांत अशा प्रचारकांची संख्या १९०३ मध्यें ३७४ होती. सर्व युनिटेरियन कामकाज आवरण्यासाठीं लंडनमध्यें British and Foreign Unitarian Association नांवाची एक संस्था आहे, तशी हिंदुस्थानांत नाहीं. साधारण ब्राह्मसमाज नांवाची कलकत्त्यांत एक मध्यवर्ति संस्था आहे. पण तिचा ताबा सगळ्यांवर सारखा चालत नाहीं. न्यूयॉर्कमध्ये American Unitarian Association नांवाची एक मध्यवर्ति संस्था आहे. कलकत्ता, लंडन आणि न्यूयॉर्क या तिन्ही मध्यवर्ति संस्थांकडून परस्पर सलोख्याचें सहकार्य घडतें. हें कार्य आजपर्यंत जवळ जवळ शेंसव्वाशें वर्षांपासून चालत आलें आहे.

साधन सभा
ता. १० नवंबर १९०१ च्या आदितवारीं संध्याकाळीं ६ वाजतां आमचे कॉलेजबंधु मि. कॉक यांचे घरीं साधनसभा होती. जेवण तेथेंच झालें. परस्परांची हकिकत सांगितली. त्यांच्या घरीं मि. कॉक व त्यांची बहीण दोघेच आहेत. मोठ्या आनंदानें दिवस घालवत आहेत. दोघे अत्यंत ममताळू व सात्त्विक आणि हिंदुधर्माचे व तत्त्वज्ञानाचे चाहते आहेत. दोघे Theosophist आहेत. मि. कॉक हा स्वतः खाटकाचा मुलगा असून पूर्वाश्रमीं बरेच दिवस खाटकाचा धंदा करूनही, हा आणि ह्याची बहीण आतां पुर्णतः शाकाहारी बनली आहेत. आध्यात्मिकभाव व भक्ति वाढवण्याकरतां नियमित वेळीं आम्ही एकत्र जमून कांहीं साधन करण्याचें त्यांनीं सुचवलें. माझे मनांत हें होतेंच. त्यांस मीं चांगलेंच प्रोत्साहन दिलें. घरीं परत आल्यावर जेवतांना मिस्टर व मिसेस ग्रेडन (ज्यांचेकडे मी भाड्यानें राहात होतों) यांच्याशीं मांसाहाराबद्दल कडाक्याचा वाद झाला. मी हिंदुस्थानांत असतां कधीं कधीं मांस खात असें. पण तें अजिबात सोडावें असें मला वाटत नव्हतें. येथें आल्यावर केवळ सात्त्विक अन्न घेत असें. दोघां ग्रेडननीं मला मांस घेण्याविषयीं फार आग्रह केला. सुमारें तीन महिने आमचा शाकाहार चालू होता. पण पुढें शाकाहार चांगलासा न मिळाल्यानें मला त्याची शिसारी आली. अंगांत फार अशक्तता आल्यानें मला शेवटीं तो सोडावा लागला.

नाताळाची पहिली सुटी
ता. ८ डिसेंबर १९०१ रोजीं दोन प्रहरीं १ वाजतां ऑक्सफर्ड येथून निघून लंडनला ३ वाजतां पोंचलों. ग्रेजइन रोड, कॅल्योर्म स्ट्रीट नं. ७ येथें खोली घेतली. स्वामी निर्विकल्प यांचे शिष्य रा. राजाराम पानवलकर आणि नाशिकचे व्यापारशिक्षणासाठीं आलेले रा. पंगे हे दोघे लगतच्या खोलींत असत. पानवलकर हातानें स्वयंपाक आम्हां तिघांसाठीं करीत तो आम्हांस फार गोड लागे. तो सात्विक व शुद्ध वनस्पतीचाच असे. यांचे सोबतींत लंडन चांगलेंच पहावयास मिळालें.

मिस् मॅनिंग
दोनप्रहरीं ३ वाजतां मिस् मॅंनिगचे घरीं गेलों. तिला किती आनंद झाला! इकडचे तिकडचें बोलणें झाल्यावर तिनें आपली लायब्ररी दाखवली. नंतर हिंदुस्थानचीं चित्रें, मौजेच्या वस्तू, रुप्याचीं भांडी वगैरे मोठ्या अभिमानानें दाखविलीं. प्रत्येक हिंदी मनुष्याबद्दल आणि वस्तूंबद्दल हिचें किती निष्काम प्रेम दिसलें! हिनें हिंदुस्थानांत प्रवास केला होता. आणि मिस् मेरी कार्पेंटर बाईप्रमाणें हिंदुस्थानच्या सामाजिक सुधारणा व शिक्षण यांबद्दल ती झटत असे. मिस मॅनिंगला, “द्रौपदी व सुदेष्णा,” हें रविवर्म्याचें चित्र मी भेटीदाखल दिलें. तें तिला फार आवडलें.

दादाभाई नौरोजी
लंडन इंडियन सोसायटी नांवाची लंडनमधील सर्व हिंदुस्थानवासियांची व मित्रांची सभा पार्लमेंटच्या इमारतीजवळ पॅलेस चेंबरमध्यें दर पंधरवड्यास शनिवारीं भरे. दर बैठकींत सोसायटीचे अध्यक्ष परमपूज्य दादाभाई नौरोजी हेच चेअरमन असत. एकदां आमचे मित्र रा. राजाराम पानवलकर यांचें ‘इंग्रजी साम्राज्याखालील स्वराज्याची आवश्यकता’ ह्या विषयावर एक तासभर इंग्रजींत भाषण झालें. त्यानंतर चौघांचीं भाषणें झालीं. मीही बोललों. बोलणारे सर्वच तरुण अजाण व अननुभवी होते. तरी दादाभाई सर्वांचें म्हणणें शांतपणें ऐकून घेत होते व त्यांचें आपल्या नातवाप्रमाणें कौतुक करीत होते. व्याख्यान आटोपतांच ह्या मुलांनीं त्यांस अनेक प्रश्न सवलतीनें विचारले. त्यांची फोड त्यांनी मोठ्या आवेशानें केली. म्हातारा देहानें वृद्ध असे खरा पण त्याचा उत्साह तरण्यापेक्षां तरुण असे. सभेचे सेक्रेटरी वागळे यांस बोलतां बोलतां सत्तेनें म्हणाले “अरे तूं मूर्ख आहेस रे, आतां मी तुला शिव्या हांसडीन पहा.”

एक जागृतीतले स्वप्न
एकदां पॅस्मोर इन्स्टिट्यूटमध्यें इटालियन चित्रकार ह्या विषयावर मॅजिकलॅंटर्न लेक्चर झालें. तें ऐकावयास गेलों असतां मनांत एक प्रेरणा झाली. माझे मित्र राजाराम पानवलकर यांस केव्हां सांगेन असें झालें. घरीं आल्यावर आम्ही रात्री १ वाजेपर्यंत ह्या प्रेरणेसंबंधीं बोलत बसलों. राजारामास ती फार रुचली. ती अशी - राजारामानें मजबरोबर ऑक्सफर्ड येथें राहावें. परवानगी घेऊन कांहीं व्याख्यानें, मॅंचेस्टर कॉलेजांतील ऐकावींत. राजाराम हे विशेषतः उद्धारक मताचे तर मी सुधारक मताचा. असे जरी आम्ही आहों तरी दोघांचीं अंतःकरणें शुद्ध हेतूने भरलेलीं असल्यानें आम्हीं एकमेकांस लवकर जाणलें व मैत्री जमली. तो हिंदुस्थानांतील “आर्य संघाचा” एक कट्टा सभासद आहे व मी प्रार्थना समाजाचा आहें. पण आतां भेद उरला नाहीं. इतकेंच नव्हे तर आम्ही एकमेकांच्या संस्थेचे सभासद झालों. आमच्या भावी आयुष्याचा मार्ग रोखूं लागलों. Theosophy, मांसाहारनिषेध, योगसाधन, ज्या पौरस्त्य चळवळी येथें चालू आहेत त्यांचें राजारामानें रहस्य जाणून घ्यावें, पुस्तकसंग्रह करावा; माणसें जोडावींत, युनिटेरियानिझम, युनीव्हरसॅलिझम (Universalism) सारख्या ज्या पाश्चात्य चळवळी आहेत त्यांचा ठाव मीं घ्यावा असें ठरलें. आम्ही दोघांनीं मिळून येथें दीडवर्ष राहिल्यावर प्रथम दोघांनीं मिळूनच युरोपखंडांतून प्रवास करावा. रोम, अथेन्स, पॅलेस्टाईन, मक्का, कैरो इत्यादि पुरातन व पवित्र स्थळीं यात्रा कराव्यात. तेथील देखाव्यांचे फोटो घ्यावेत. त्यासाठीं राजारामानें ऑक्सफर्ड येथें फोटोग्राफी शिकावी. उदार धर्मावर आम्हीं जागोजाग व्याख्यानें देऊन आपला निर्वाह करावा. युरोपांत प्रवास झाल्यावर नंतर जपान व चीन देशांतून परत कलकत्ता, मद्रास शहरांवरून स्वदेशीं जावें. वाटेंत व्याख्यान देणें, स्नेह संपादणें, बंधूता वाढवणें हाच धंदा ठेवणें इ. इत्यादि. गुरुवारचा दिवस पवित्र समजून त्या दिवशीं कोठें तरी बाहेर जाऊन यासंबंधानें व्रतग्रहण करण्याचें ठरवून आम्ही निजलों. पण झोंप लागली नाहीं. तथापि पुढें याप्रमाणें कांहींही झालें नांहीं, हें सांगावयास नकोच.

रे. चार्लस व्हायसे
दुपारीं ११ वाजतां रे. चार्लस व्हायसेच्या चर्चमध्यें उपासनेस गेलों. हें एका बोळांत आहे. एक तास गीतें गाणें, उतारे वाचणें, प्रार्थना करणें इत्यादि झाल्यावर १२ पासून १२॥ पर्यंत रे. व्हावसे यांनीं उपदेश केला. हे अगदीं कडक सुधारक असून एकेश्वरी पंथाचे आहेत. यांना युनिटेरियानिझमहि पसंत नाहीं. कारण त्यांत ख्रिस्ताचेंच पुढारीपण आहे. युनिटेरीयन लोकांत शुष्कवाद न करतां, मिळून काम करण्याचा मोठा गुण दिसून येतो. तो व्हायसे यांनीं घेतल्यास दोघांसही जास्त बळ येईल. पण या गोष्टीस व्हायसेचीच नाखुशी दिसते. चर्चमधील व्यवस्था फार चांगली आहे. उपासक सुमारें १०० हजर होते. दारांत व्हायसेची पुष्कळ पुस्तकें विकण्यास ठेविलीं होतीं. बोळांत शिरतांच एक छापील व्याख्यान फुकट मिळतें. संध्याकाळीं पुन्हा उपासना होते. दोन्ही वेळां धर्मार्थ पैसे गोळा होतात. सर्व इंग्लंडांत इतक्या उदार मताचें हें एकच Theistic चर्च आहे. हें आमच्या ब्राह्म समाजाप्रमाणेंच निव्वळ एकेश्वरवादी आहे. हें आठवून व्हायसेची धन्यता वाटते.

शेरलॉक होम्स
रात्रीं ८ वाजतां नाटकास गेलो. ‘शेर्लाक होम्स’चा प्रयोग झाला. तिकिटाची किंमत २॥ शिलिंग पडली. नाटकांत संगीत अगर कसलाही रस नव्हता. गुप्त पोलिस Sherlock Holmes चे काम छान वठले. ह्या लोकांचे लक्ष्य अभिनयाकडे जास्त आहे. तें त्यांना चांगलें साधलें आहे. रंगभूमि व नेहमींची रहाटी यांत मुळींच फरक दिसला नाहीं. हीच खुबी आहे. हें नाटक उत्तम गणलें गेलें आहे. पण मला कांहीं तें पाहून आनंद झाला नाहीं. नाटकगृहांत स्त्रियांची छानछोकी मात्र दिसली. Box चे तिकीटाला ४ गिनी म्हणजे ८४ रु. पडते.

Domestic Mission
रे. समर यांचे जॉर्जेस रो मधील मिशन पाहिले. ह्या भागांतील अत्यंत कंगाल लोकांची स्थिती चारपांच ठिकाणी त्यांचे घरीं नेऊन आम्हांस रे. समर यांनी दाखवली. पैकीं तीन ठिकाणीं म्हाता-या स्त्रिया आजारी होत्या. दोघां आजारी स्त्रियांजवळ मी प्रार्थना केली. एक अगदीं बहिरी असल्यामुळें मला तिच्या कानाजवळ ओरडून प्रार्थना करावी लागली. या बाईनें राजा राममोहन रॉयबद्दल मोठ्या आस्थेनें व आदरानें उल्लेख केला. रस्त्यांत हिंडत असतां आमच्या मागें २००।२५० मुलांचा जमला होता. कारण त्या वेळीं माझे डोक्यावर हिंदी साफा बांधला होता. काहींनीं आम्हांस थोडा त्रास दिला. एकाशीं हस्तांदोलन करून समजूत घातल्यावर सर्वांनींच तसें करण्याचा आग्रह धरला. त्रासाचे नुसते रूपांतर झाले. आम्ही घरांत शिरलों कीं ही गर्दी आम्ही बाहेर येईपर्यंत वाट पहात उभी असे. हा त्रास चुकवण्यासाठीं समरसाहेबांनी एक अशी युक्ती काढली कीं एका घरांत गेल्यावर मागील दारानें आम्ही दुस-या रस्त्यांवर गेलों. कामकरी बाया कामावर गेल्या असता त्यांचीं मुलें संभाळण्याची व्यवस्था एका घरांत केली होती. एकंदर लहानमोठी २३ मुलें होतीं. प्रत्येक मुलांस दोन पेन्स (२ आणे) प्रमाणें दर असे. गरिबांची घरें कितीही कंगाल असलीं तरी त्यांत निदान १०।२० चित्रें, कांहीं मूर्ति, कांहीं दिखाऊ सटरफटर सामान होतेंच. मिशनचे प्रार्थनामंदिर साधेच पण पुरेसें होतें. मिशनचा बहुतेक सर्व खर्च युनिटेरियन असोसिएशन मार्फत आहे. अशीं तीन मिशनें लंडनच्या निरनिराळ्या भागांत आहेत. अशीच मँचेस्टरसारख्या मोठमोठ्या शहरीं निरनिराळीं मिशनें आहेत. अशी मिशनें पाहून हिंदुस्थानांत परत गेल्यावर तेथील अस्पृश्य मानलेल्या लोकांसाठीं असेच प्रयत्न करावेत हा विचार मनांत आला.

Postal Misson (पोस्टल मिशन)
मिस् फ्लॉरेन्स हिलच्या आमंत्रणावरून युनिटेरियन पोस्टल मिशनचा कौन्सिलमध्यें मुंबईच्या बाजूला ब्राह्मो पोस्टल मिशनची एक शाखा काढण्याचा माझा विचार मी कौन्सीलपुढें ठेवला. कमिटीला तो पसंत पडून त्यांनीं मला लागेल तशीं पुस्तकें पुरवण्याचें आश्वासन दिलें. कमिटींत १०।१२ स्त्रिया होत्या. युनिटेरियन वाङ्मय पोस्टामार्फत वाटून व पत्रव्यवहार करून प्रसार करण्याचें काम सर्व देशभर केवळ स्त्रियाच करतात. पुढें माझे मित्र रा. वासुदेवराव सुकथनकर यांचेकडून मी मुंबईस अशा एका ब्राह्मो पोस्टल मिशनची स्थापना करविली.

संडेस्कुल असोसिएशन
चेअरमन मि. प्रिचर्ड यांचे घरीं जेवणांस गेलों होतों. जेवणानंतर मुलांसाठीं एक उपासना एका मंदिरांत झाली. ती मिस् प्रिचर्ड इनें चालविली. मला दोन शब्द बोलावे लागले. मुलांची वर्तणूक फार व्यवस्थेशीर होती. सुमारे २०० मुलें होती. २० वर्षांवरील सुमारें ७ तरुण मुलांचा एक वर्ग रविवारीं मिस्टर प्रिचर्ड स्वतः आपल्या घरीं घेत. या गृहस्थांचा स्नेह पुढें त्यांचा अंत होईतों टिकला.

साऊथ प्लेस नैतिक समाज
इंग्लंडच्या साऊथप्लेस नांवाच्या भागांत ह्या समाजाचें उपासना मंदीर आहे. फ्रान्सच्या ऑगस्टकॉम याने Positivism (निश्चितवाद) नांवाचा संप्रदाय काढला. या संप्रदायांत, ईश्वर, आत्मा वगैरे अज्ञेय गोष्टीला फाटा दिला आहे. याला Humanism (मानव्यधर्म) असेंही नांव देतां येईल. मोठमोठ्या थोर पुरुषांचे स्मृतिदिन पाळण्यांत येतात. केवळ नीतीपलीकडे धर्म म्हणून कांहीं बंधनें नाहींत. उपासना मंदीर व पद्धति इतर ख्रिस्ती देवळांतल्या प्रमाणें आहेत. पण परमेश्वर वगैरेंचा इथें उल्लेख देखील होत नाहीं. लोकांस जबरीनें लढाईवर पाठवणें हें निंद्य आहे असें उपासकांनीं प्रतिपादलें. ॲडम स्मिथ (अर्थशास्त्रज्ञ), सेज्वीक (नीतिशास्त्रज्ञ) वगैरेंचे उतारे वाचले. टेनिसनचीं कांहीं पदें गायिलीं. सुमारें २०० श्रोते हजर होते. हे बहुतेक अत्यंत उदार मताचे होते. फ्रेडरिक हॅरिसन या नांवाचे गृहस्थ ह्या संप्रदायाचे पुरस्कर्ते होते. ही संस्था पाहून मोठा विस्मय वाटला. ता. २९ डिसेंबर १९०२ रोजीं संध्याकाळीं ७ च्या गाडीनें, ऑक्सफर्डला निघालों. ९॥।वाजतां माझ्या बि-हाडीं पोचलों. मला फार दिवसांनीं घरीं आल्याप्रमाणें झालें.

पॅरिस
सुमारें १ वर्षभर मीं इंग्लंडांत घालवून इंग्रजी राहटीची मला बरीच कल्पना आली होती. इंग्लंड हा प्रॉटेस्टंट पंथाचा ऊर्फ सुधारलेल्या ख्रिस्तीधर्माचा देश. फ्रान्स हा रोमन कॅथोलिक पंथाचा, पोपच्या पंजाखालचा, जुन्या वळणाचा देश. युरोपच्या दक्षिण भागांत तो असल्यानें आणि फ्रेंच लोक निराळ्या वंशाचे असल्यानें तेथील राहटींत साहजिकच बराच फरक असणार. तो पाहाण्यासाठीं मी १९०३ सालच्या ईस्टरचे सुटींत १ महिना फ्रान्समध्यें घालविण्याचा विचार केला. हिंदुस्थानाहून इंग्लंडला येतांना वाटेंत फ्रान्समधून खुष्कीच्या मार्गें मी आलों होतों. पण त्या वेळीं घाईच्या प्रवासांत मार्सेल्स, पॅरिस व कॅले यांची घाईंत फार अंधुक कल्पना आली होती. ता १४ मार्च १९०३ रोजीं सकाळीं ऑक्सफर्डहून पॅरिसला निघालों. रात्रीं १०॥ वाजतां इंग्लंडच्या न्यू हेवन बंदरांत आलों. समुद्र शांत व चांदणें असल्यानें प्रवास सुखाचा झाला. इंग्लंडला येतांना हाच प्रवास वादळी हवेमुळें फार त्रासाचा झाला होता. पॅरिसला सकाळीं ७ वाजतां पोचलों.

बॉने मोरी
पॅरिस युनिव्हर्सिटीच्या कांहीं विद्वान पुढा-यांना व इतर उदार धर्मानुयायांना माझे गुरु डॉ. कार्पेंटर यांचेकडून ओळखीचीं शिफारसपत्रें घेतलीं होतीं. प्रथम बॉने मोरी या वृद्ध प्रोफेसरांस भेटलों. हे डॉ. भांडारकरांसारखे किंचित् कडक व उग्र दिसले. पॅरिसचे वरवरचे सौंदर्य पाहण्यासाठीं हुरळून आलेला मी एक तरुण असावा असें वाटून त्यांनीं प्रथम माझी थोडी हजेरी घेतली. पण ऑक्सफर्ड कॉलेजांतील ब्राह्मसमाजाचा एक प्रतिनिधी म्हणून कार्पेंटरसाहेबांच्या शिफारसीचें एक पत्र पाहून स्वारीनें आपला शांत सल्ला दिला. तुम्हांला पॅरिस खरे पाहायचें असल्यास येथील नटव्या इमारती पाहून न भुलतां त्यांच्या माळ्यावरील गाळ्यांत शिरून डोकावून पाहा. तेथें कंगाल, चोरटे व गुंड लोक बिळांतल्या उंदराप्रमाणें चोरून रात्रीं आश्रयास राहतात, त्याचीं कारणें शोधा, असें बजावलें.

प्रो. रेव्हील
प्रो. जाँ. रेव्हील यांचे संभाषणांतून अशी माहिती मिळाली कीं, प्रॉटेस्टंट लोकसंख्या फ्रान्सांत ६−७ लाख आहे. प्रॉटेस्टंट समाजाच्या एका स्थानिक मंडळीस कनसिस्टार्स असें म्हणतात. १०६ कनसिस्टार्सपैकीं ३३ सुधारक मताचे (युनिटेरियन) आहेत. १७८९ पर्यंत प्रॉटेस्टंटास धर्मस्वातंत्र्य मुळींच नव्हतें. आतां कॅथालिक, प्रॉटेस्टंट व यहुदी अशा तिन्ही संघांस सरकारांतून सारखाच आश्रय मिळतो. मदत देतांना सरकार मताची अट मुळींच घालीत नाहीं. सुधारक संघाची एक त्रैवार्षिक सभा भरते. तिचें नांव ‘ॲसेम्ली डी प्रॉतेस्तांत लिबाल’ असें आहे. ह्या सभेनें कमिटी निवडल्यावर तिच्या मार्फत सरकारांतून खर्च मिळतो. पॅरिसचा समाज फार जुन्या मताचा आहे. सोशॅलिस्टांची सामाजिक चळवळ फार जोरानें चालू आहे. पण ह्या चळवळींतले सर्व सुधारक जरी हुशार आणि स्वार्थत्यागी आहेत तरी धर्मबाबतींत हे अत्यंत नास्तिक आहेत. कारण कॅथालिक मताच्या जुलुमास कंटाळून सर्व धर्मविरुद्धच ते लोक बंडावले आहेत. त्याप्रमाणें एकीकडे कॅथालिक धर्माचा अडाणीपणा व जुलूम; दुसरीकडे सुधारकांचा बुद्धीचा अंधपणा आणि औदासिन्य यांमध्यें उदार धर्माचें काम मोठें कठीण झालें आहे. सोशॅलिस्ट लोकांचा कटाक्ष धर्म आणि भांडवल यांच्याविरुद्ध सारखाच आहे. मोस्यू वेग्नेअर आणि रॉबर्ती ऑ. फॉतेनी हे उदार धर्माचे मोठे वजनदार वक्ते आहेत. ‘ला प्रोतेस्तंत’ हें साप्ताहिक व ‘लिबरल एव्हॅन्जलीक’ हें मासिक हीं उदार मताचीं आहेत. उदार धर्माच्या प्रसाराचें काम व्हावें तसें जोरानें चालू नाहीं. धर्म बाबतींत आतां बहुतेक पूर्ण स्वातंत्र्य आहे. व्यक्तीच्याच स्वभावाची वाढ झाल्याशिवाय गत्यंतर नाहीं. जाँ रेव्हील हे आधुनिक धर्माच्या इतिहासाचे पॅरिस युनिव्हर्सिटींत व्याख्याते आहेत. व्याख्यानास सर्वांस मोकळीक आहे तरी थोडाच श्रोतृवर्ग हजर असतो. पॅरिस येथें धर्माचें नांव काढल्यास कित्येकांस हसें येतें. वरपांगी जुन्या धर्माचें ढोंग माजवण्याचा हा परिणाम!

मोस्यु रोज
ता. २५ मार्च १९०३ रोजीं ७ वाजतां रात्रीं मोस्यु रोज यांचे घरीं जेवणास गेलों. मादाम रोज ही फार गोड व कुशल बाई आहे. ती इंग्रजी शिकत होती. निदान तशी मोस्यु रोजची समजूत होती. मीं कांहीं इंग्रजींत विचारलें कीं मादामची कासावीस होई. मग ती अति नजरेनें नव-याकडे पाही. त्याचें मला मोठें कौतुक वाटलें. ३।४ वर्षांची मार्सेला मुलगी फार गोड होती. आदामनें काढलेलीं कांहीं चित्रें पाहून समाधान वाटलें. मला पाहाण्यासाठीं मादामचे आईबाप व बहीण ही मंडळी जेवणास आली होती. फ्रेंच तरुणीस इंग्रज तरुणीइतकी स्वतंत्रता मुलीच्या संमतीनें आईबापच लावतात. मुलींची विवाहमर्यादा कमींतकमी १६ वर्षांची असते. अलीकडे १० वर्षांत स्त्रीशिक्षणाची अधिक सोय व प्रवृत्ति होत आहे. स्त्रियांच्या प्रगतीबाबतींत इंग्रजांचेंच येथें अनुकरण होत आहे. इंग्रजांचा संसारी शहाणपणा फ्रेंच शिकतात व आपली छानी म्हणजे फॅशन त्यांना शिकवतात. इंग्रजांपेक्षां फ्रेंच अधिक मोकळ्या मनाचे. पॅरिसमध्यें गुलहौसी लोक घरीं न जेवतां रेस्तोराँतमध्येंच जातात.

बॉई बॉला
ता. २८ शनिवार मार्च १९०३ रोजीं रात्रीं ८ वाजल्यावर माझ्या मित्रानें बॉई बॉला नांवाचे सार्वजनिक नाचाचें ठिकाण दाखविण्यास नेलें. हें ठिकाण लॅटिन कार्टर्स नांवाचे युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी राहातात त्या भागीं आहे, हें ऐकून ऑक्सफर्डहून गेलेल्या मला फार आश्चर्य वाटलें. एक फ्रॅंक देऊन वाटेल त्यानें आंत करमणुकीसाठीं जावें. व्हायोलिनवाल्यांचा मनोहर बॅंड येथें वेळोवेळीं सुरू होतो, तेव्हां वाटेल त्यानें वाटेल तिच्याशीं नाचूं लागावें, क्रीडावें, हिंडावें, बोलावें, उपहार घ्यावा किंवा संकेत करावा. येथें येणा-या बहुतेकांबद्दल शंका येते. किंबहुना अशा ठिकाणीं शंका घेणें म्हणजेच रिकामटेकडेपणा आहे. पॅरिसच्या करमणुकी अशाच आहेत कीं, त्या परक्यांना सहसा सहन होत नाहींत. निदान त्या कळत तरी नाहींत. रंगेल स्त्रिया अगदीं उघड उघड येऊन विचारतात. सुमारें १००० तरुण माणसें येथें उल्हास करीत बसलीं होतीं. माझें मन विचारशील झालें. हल्लींच्या उद्योगाच्या झटपटींत मनुष्याला कसल्यातरी करमणुकीची आवश्यकता आहेच. धर्माधिका-यांनीं जर शुद्ध करमणुकी पुरवल्या नाहींत तर इथल्याप्रमाणें केव्हां केव्हां अशुद्ध व घातकी करमणुकी समाजांत शिरतात. इंग्लंडांत हल्लीं धर्माचे बाबतींत तरुणांचें लक्ष वेधण्याची खटपट करणारे मिशनरी, लोकांना शुद्ध करमणुकी पुरवीत आहेत; त्याचप्रमाणें तरुण कामकरी वर्गाचें मन धर्माकडे वळवण्याचाही प्रयत्न करीत आहेत. याबाबत माझें मत पूर्वीं फारसें अनुकूल नव्हतें. ही सोकावलेली तरुण मंडळी करमणुकीला पुढें व धर्माला मागें होतात असें माझें म्हणणें होतें, पण अशा शुद्ध करमणुकी पुरवल्या नाहींत आणि कॅथॉलिक धर्माप्रमाणें फाजील सोवळेपणाचा दंभ माजवला तर मग पॅरिसांतल्यासारखे मासले दिसणारच असें वाटूं लागलें.

परेला शाज
दुसरे दिवशीं परेला शाज नांवाची स्मशानभूमि पाहावयास गेलों. ही सर्व स्मशानांत मोठी आहे. हिच्यांत सुमारें ३० लक्ष प्रेतें पुरलीं आहेत. प्रथम गेल्याबरोबरच समोरल्या एका उतरणीवरच्या भिंतींत ज्यांच्यासाठीं कबरस्थान नाहीं अशासाठीं एक मोठें स्मारक भिंतींत कोरलें आहे. तें पाहाण्यासारखें आहे. मृत नवराबायको भिंतींतल्या दाराशीं अज्ञेय प्रदेशांकडे जात आहेत. दोहोंकडे कित्येक मृत विन्मुखपणें त्यांच्या मागून चालले आहेत, खालीं तेंच जोडपें अखेरच्या निद्रेंत उघडें पडलें आहे. आशादेवीनें (Hope) थडग्यावरील शिळा उचलून धरली आहे, त्यावर त्यांचें अर्भक पालथें पडलें आहे. हें चित्र फार परिणामकारक असून त्यांत करुणरस परमावधीला पोंचला आहे. पुष्कळ थडगीं म्हणजे लहान लहान देवळेंच आहेत. आंत वेदीवर येशूचा पुतळा, मेरीचा पुतळा, मृताचा पुतळा-निदान फोटो इ. ठेवले होते. त्यावरून फुलें, माळा घातल्या होत्या. मोठ्या मेणबत्या तेवत होत्या. त्यापुढें बसून प्रार्थना करण्याकरतां खुर्च्या ठेवल्या होत्या. अशा देवळांतून सर्व कुटुंबाचीं माणसें पुरलेलीं असत. स्मशानांत स्वच्छ व सुंदर सडका, दोहों बाजूंनीं उंच झाडें त्यांच्या खालीं एकाला एक चिकटून असलेलीं हीं देवळें असा एकंदर देखावा पाहून आपण पाताळ लोकांत मृतांच्या स्तब्ध शहरांतच आलों असें वाटतें. येथें प्रेतें जाळण्याचीही टोलेजंग व्यवस्था केलेली होती. एकंदरींत तत्त्वज्ञान, नीतिकाव्य व धर्म इत्यादि अनेक गहन विषयांवर गंभीर चिंतन करण्यास पॅरिसची हीं कॅथालिक स्मशानस्थळें अत्यंत अनुकूल आहेत.

रॉबिन्सन
७ मंगळवार एप्रिल १९०३ रोजीं मोस्यू रोज यांचेबरोबर पॅरिसपासून ८ मैलांवर एक खेडें पाहाण्यास गेलों. बरोबर मादाम व मार्सेला होती. ह्या खेड्यांत रॉबिन्सन नांवाचें एक वनभोजनाचें मोठें स्थळ होतें. त्यांत सुमारें ३०।३५ रेस्तोराँतस होती. येथें करमणुकीकरतां पॅरिसचे उद्योगधंद्यांतले लोक दोन आदितवारीं सुमारे ४।५ हजार जमतात. दोन ठिकाणीं जुन्या झाडांच्या फांद्यांवरून तीन चार मजली घरें केलीं आहेत आणि खाण्यापिण्याचे पदार्थ खालून वर चाकावरून ओढून घेण्यांत येतात. भोंवतांलीं डोंगरी देखावा आहे. चहूंकडे सहल करण्यासाठीं एथें पुष्कळ गाढवें भाड्यानें ठेवलीं आहेत. सुमारें ६० वर्षांपूर्वीं येथें शुकशुकाट होता. एका धोरणी पुरुषानें प्रथम एक विश्रांतिगृह उघडलें. तेव्हां तो रॉबिन्सन क्रूसोप्रमाणें जंगलांत एकटाच येऊन राहिला म्हणून ह्या ठिकाणास आतां रॉबिन्सन हेंच नांव पडलें आहे. त्याला इतकी किफायत झाली कीं, त्याचें अनुकरण होऊन आतां हें मोठें करमणुकीचें स्थान बनलें आहे. मोठमोठ्या जत्रा व क्षेत्रें कशीं बनतात यांचें हें एक चांगलें उदाहरण आहे. एकोणिसाव्या शतकांतलें हें एक पॅरिशियन क्षेत्रच होय.