आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज

(रविवार ता. २२-१-११ रोजीं केलेल्या उपदेशाचा सारांश.)
एकादा धाडसी पुरूष फार दूरच्या प्रवासास निघाला असता त्याच्या मनाची दोन प्रकारची स्थिती होते. एका बाजूने घरदार, बायकामुले, शेतीभाती ह्यांकडे ओढा लागतो. आजपर्यंत मिळविलेला लौकिक आणि केलेली लोकसेवा ह्यांत त्याचे मन गुंतते. दुस-या बाजूस ज्या दूरच्या प्रदेशी त्याला जावयाचे असते तेथील अनुभव, सुखे आणि कर्तव्ये, तेथील नवीन संपादणी ह्यांच्याकडे त्याचे मन ओढ घेते. ज्या ज्या मनाने त्याचा प्रवास अधिक लांबीचा आणि मार्गात अधिक विघ्ने असतील त्या त्या मानाने त्याच्या मनाची ही द्विधा वृत्ती अधिकाधिक जोरावते. व्यक्तीची ही जशी स्थिती होते, तशीच नवीन सुधारणेच्या मार्गाने जाण्यास निघालेल्या एकाद्या जुन्या जागृत राष्ट्राची स्थिती होते. आपले भूतकालचे वैभव, पुराण ग्रंथ, प्राचीन पुरूष, धर्मशास्त्रे आणि वाडम्य इत्यादिकांकडे त्या राष्ट्राचे लक्ष लागते. सुधारणेच्या मागे लागून स्थित्यंतर करण्यापूर्वी आपल्या प्राचीन संपादणीतून काही तरी निष्पन्न होणार नाही काय? ह्याच आशेने ते एका बाजूने त्यातच घोटाळ रहाते.
दुस-यापक्षी ह्या सर्व जाळ्यातून आपला पाय काढून घेऊन त्याच्या भोवती नवीन विचार, नवीन विश्वास, ताजी आशा आणि ताजा दम ह्यांचे जे वातावरण पसरलेले असते, त्यातून दूरवर दिसणा-या नवीन ध्येयाकडे ते धाव घेते. व्यक्तीच्या बाबतीत एकाच मनाची द्विधा वृत्ती होते, पण राष्ट्रात निरनिराळे पुढारी आणि त्यांचे अनुयायी ह्या दोन भिन्न वृत्तींचे द्योतक असतात, इतकेच नव्हे तर पुष्कळ वेळां प्रगतीच्या मार्गाने धावणा-यांचाही पाय वेळोवेळी मगे घेतो आणि पुराणप्रिय लोकही वेळोवेळी पुढे सरसावतात. ह्याप्रमाणे पुढे सरण्याची आणि थांबून रहाण्याची अशा दोन भिन्न भावना एकाच वेळी होतात. ब्राह्मसमाज ही आमच्या राष्ट्राची वर सांगितल्यापैकी पहिली भावना होय. त्या समाजाची स्थापना अथवा ह्या भावनेचा उदय प्रथम बंगाल्यात होऊन आता ८१ वर्षे पूर्ण झाली म्हणून ह्या समाजाचा ८१ वा महोत्सव ठिकठिकाणच्या ब्राह्म अथवा प्रार्थना समाजामध्ये साजरा होत आहे.

ह्याप्रसंगी आमचे राज्य आधुनिक युगाच्या वातावरणात हालत आहे आणि ज्याचे नवीन नवीन संस्कार त्याच्यावर घडत आहेत, त्या आधुनिक युगाची एक दोन लक्षणे काय आहेत ते आपण पाहू, म्हणजे ती लक्षणेच आमच्या ब्राह्मसमाजाची आद्यतत्त्वे होत हे पुन: निराळे सांगण्याची गरज रहाणार नाही. ज्यांना ज्यांना ह्या लक्षणाचा परिचय घडलेला आहे व ज्यांच्यावर त्यांचा संस्कार घडून ते जाणूनबुजून पुढे पाऊल टाकीत आहेत ते सर्व ब्राह्मधर्मानुयायीच म्हणावयाचे. मग त्यांचा संबंध ब्राह्मसमाजाशी जडलेला असो वा नसो. उलटपक्षी जे केवळ सृष्टिक्रमानुसार ब्राह्मसमाजामध्ये जन्मले आहेत आणि केवळ चालीच्या ओघाने त्यांच्यावर यद्यपि समाजाचे सोळाही ‘संस्कार घडले आहेत पण ज्यांना वरील लक्षणांचा परिचय आणि प्रत्यय प्रत्यक्ष घडलेला नाही ते ब्राह्म नव्हेत.’

मानवी इतिहासात जी निरनिराळी युगे झाली आहेत ती काही तरी कालाचे भाग आहेत असे नव्हे. ती प्रत्येक काही विशिष्ट लक्षणान्वित असतात. आधुनिक युगाचे पहिले लक्षण विश्वरूपदर्शन होय. ते अर्जुनाला कृष्णाने कसे दाखविले ह्याचा सुंदर उल्लेख गीतेमध्ये आहे.

अनेकबाहूदरवक्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वताSनंतरूपम् |
नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम् ||

यावर ज्ञानेश्वरांनी सुंदर मराठी भाष्य केले आहे ते असे :-

हे असों स्वर्गपाताळ | की भूमि दिशा अंतराळ | हे विवक्षा ठेली सकळ | मूर्तिमय देखतसे || तुजवीण एकादियाकडे | परमाणूहि एतुला कोंडे | अवकाश पाहतसे परि न सांपडे | ऐसे व्यापिले त्वां || इथे नानापरी अपरिमिते | जेतुली सांठविली होती महाभूते | तेतुलाही पवाड तुवां अनंते | कोंदला देखतसे || ऐसा कवणेठायाहूनि तूं आलासि | एथ बैसलासी की उभा आहेसी | आणि कवणीये मायेचीये पोटी होतासी | तुझे ठाण केवढे || तुझे रूप वय कैसे | तुज पैलीकडे काय असे | तूं कायिसयावरी आहासि ऐसे | पाहिले मियां || तव देखिले जी अवघेची | तरी आतां तुझा ठाव तूंचि | तूं कवणाचा नव्हेशी ऐसाची | अनादि आयता || तूं उभा ना बैठा | दिधडा ना खुजटा | तुज तळी वरी वैकुंठा | तूंच आहासी || तूं रूपे आपणयांचि ऐसा | देवा तुझी तुंचि वयसा | पाठी पोट परेशा | तुझे तूं गा || तुज महामूर्तिचिया आंगी | उमटलिया पृथक् मूर्ति अनेगी | लेइलासि वाने परीची आंगी | ऐसा आवडतु आहासी || नाना पृथक् मूर्ति तिया द्रुमवल्ली | तुझिया स्वरूपमहाचळी | दिव्यालंकार फुली फळी || सासिन्नलिया || ऐसा पवाड मांडूनि विश्वाचा | तूं कवण पां एथ कोणाचा | हे पाहिलें तव आमुचा | सारथि तोचि तूं || तरि आतां दिठीचा विटाळ गेला | तुवां सहजें दिव्यचक्षू केला | म्हणोनि यथारूपे देखवला महिमा तुझा ||

हे विश्वरूपदर्शन हल्लीच्या काळी आम्हां आधुनिकांना मिळालेले आहे. आधुनिक शास्त्रे ही श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे आम्हांस दिलेले दिव्य चक्षू होत.

न तुमां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा |
दिव्य ददामि ते चक्षु: पश्य मे यागमैश्वरम् ||

ह्या दिव्य चक्षूने आम्ही ईश्वरास यथारूप पाहतो, तथापि आमच्या दृष्टीचा विटाळ त्या निराकार तेजाला होत नाही. त्यामुळे आमची त्याच्यावर विशुद्ध श्रद्धा बसते. आमचा बिनमताचा विश्वास “Creedles faith” आहे. म्हणजे मतमतांतराच्या भानगडीत न पडता आम्ही त्याच्या प्रत्यक्ष दर्शनानेच तृप्त होतो. सर्व विश्वाचा विस्तार पाहून तो विश्वेवर आमचा सारथी आहे, आमचा मार्गदर्शक आहे, आमचा संसारशकट त्याचे हाती आहे, असा आमचा विश्वास होतो. कोणत्याही अनुदार आणि एकदेशीय मतामुळे आमचा हा विश्वेश्वरावरील विश्वास आकुंचित होत नाही. ह्या दर्शनामुळे ह्या युगामध्ये ज्ञानाची द्वारे खुली झाली आहेत, त्यावरील प्राचीन मतांचे दडपम उडून गेले आहे. चहूंदिशी वहाणारे ज्ञानाचे प्रवाह आम्हांस त्याचेच स्वरूप दाखवितात, “किंबहुना आता | तुझे तूंचिं आघवे अनंतां | हे पुढत पुढत पाहतां | देखिले मियां ||”

आधुनिक युगाचे दुसरे लक्षण अखंड उल्हास हे होय. बरेच दिवस गोठ्यात बांधलेल्या वासराला बाहेर एकदम उघड्या मैदानात आणले असता त्यास जसा अपूर्व उल्हास होतो आणि ते दशदिशा आनंदाने बागडू लागते, तसे आधुनिक मनुष्यास झाले आहे. आम्ही हवेतून उडू पहातो, लोहमार्ग आणि जलमार्ग ह्यांचीही बंधने आम्हांस नकोशी वाटतात, सर्वांहून प्रिय प्राण ह्याचीही पर्वा न करताना आम्ही अंतराळात हजारो कोस उंच जाऊन प्रवास करू पहातो, पृथ्वीचे कानेकोपरे, अत्यंत शीतल प्रदेशातील तिचे टोक, अत्यंत उष्ण आणि रूक्ष प्रदेशातील तिचा कटिप्रदेश आम्ही शोधून काढीत आहो. तिच्या गर्भात काय आहे, तिच्या भोवताली काय आहे, तिचे घटकावयव काय आहेत, तिचे वय काय, वजन काय, दूरदूरच्या खगोलांचीही वस्तुस्थिती काय, ह्या सर्वांचा शोध आम्ही उल्हासाने करीत आहो. आणि त्यात आमचा नवीन विश्वास, नवीन आशा, आकांक्षा उत्तरोत्तर बळावतच आहेत. नुसत्या अध्ययनातच नव्हे तर खेळ आणि विनोद ह्यांमध्येही आम्हां आधुनिकांचा धाडसी उल्हास दिसून येत आहे. केप कॉलनीपासून कैरो शहरापर्यंत आफ्रिकेच्या निर्जन प्रदेशातून मोटार गाड्यांची लौकरच एक शर्यत होणार आहे असे ऐकतो. सहारासारखी अरण्ये, दाट जंगले, मोठ्या नद्या आणि सरोवरे, ही सर्व उल्लंघून ही शर्यत मारली जाणार आहे! असा हा आधुनिक उल्हास; विश्वरूपदर्शनाचे हे आवश्यक पर्यवसना; ह्यास कोणी आधुनिकांचा जडवाद असे म्हणतात. पण खरे पहात असे म्हणणा-यांचाच हा जडवाद आहे.

तिसरे लक्षण सार्वत्रिक परस्पर सख्य हे होय. अनेक राष्ट्रे, अनेक भाषा, अनेक चाली आणि धर्म ह्यांचा प्रत्यक्ष एकमेकांशी संबंध जडू लागल्यामुळे हल्लीच्या काळी पृथ्वीवर अपूर्व स्नेहसंबंध अनुभवास येऊ लागला आहे. सत्याची सार्वत्रिकता आता जशी सिद्ध होत आहे, तशी पूर्वी कधी झाली नाही. त्यामुळे जातिजातीतील तिरस्काराची भावना आता अगदी संपुष्टात येऊ लागली आहे. कोणी म्हणतील की अद्यापि जातिमत्सर आणि जातिद्वेष पृथ्वीवर वाढत आहे, आणि ह्यास प्रत्यंतर पहावयाचे असल्यास इंग्लंडात होऊ घातलेली सर्व-जाति परिषद (Race Congress) ही होय. जातिमत्सर नसता तर ही परिषदच करण्याचे कारण नसते. पण आमचे तर ह्याचे उलट असे म्हणणे आहे की, ही परिषद जातिमत्सराचा वेग आता ओसरू लागला आहे हे दाखवीत आहे.

मनुष्यामनुष्यांमधील दुजाभावाचा पूर जो आजपर्यंत भरून वहात होता, त्याला आता ओहोटी लागली, आणि तो लवकर नाही, तरी काही काळाने आटून जाणार. भिन्न भिन्न काळी भिन्न भिन्न लोकांमध्ये सत्याचा, शीलाचा आणि स्नेहाचा आविर्भाव होत आला आहे. ही भावना आता बळावून सर्व धर्मामध्ये परस्पर सख्य जडत चालले आहे. युरोप, अमेरिका ह्या ठिकाणी आजपर्यंत उदार धर्माची माणसे आणि संस्था जे परधर्मातील सत्यशोधनाचे काम करीत होत्या ते आता गेल्या वर्षी एडिंबरो आणि ह्या वर्षी अलाहाबाद येथे भरलेल्या जुन्या ख्रिस्ती आणि हिंदुधर्माच्या परिषदेने चालविलेले आहे. हे आधुनिक युगाचे विशिष्ट लक्षण आणि अपूर्व महिमा होय.

ह्याप्रमाणे विश्वरूपदर्शन आणि तज्जन्य अकलुषित विश्वास, अखंडित उल्हास आणि सार्वत्रिक स्नेह ही आधुनिक युगाची तीन लक्षणे, हीच आमच्या ब्राह्मसमाजाची तीन आद्य तत्त्वे होत. आमच्या राष्ट्रात ब्राह्मसमाजाशिवाय इतरही समाज, राष्ट्रहिताची कामे करीत आहेत. आर्यसमाजाचा देशाभिमान, थिऑसाफीची सूक्ष्म विद्या, आणि रामकृष्ण मिशनचे वैराग्य ह्या निरनिराळ्या तत्त्वांच्या द्वारे आमचे हित होणार नाही असे आमचे म्हणणे नाही, पण ही तीन लक्षणे मागील निरनिराळ्या युगांची आहेत. सर्वात्मक भाव, सुस्पष्ट दर्शन आणि वृत्तीचा उल्हास ही आधुनिक युगाची लक्षणे आमच्या राष्ट्रास प्रगतीच्या मार्गाने पुढे ओढीत आहेत, आणि ही प्रगतीची भावना म्हणजे ब्राह्मधर्म होय.