आवड आणि प्रीति

(ता. १४-७-१९०८ रोजीं रा. रा. भास्करराव तर्खड यांच्या येथें कौटुंबिक उपासनेच्या वेळीं झालेल्या उपदेशाचा सारांश.)

।। गोड तुझें नाम दयाळा आवडतें मज ||

आवड आणि प्रीती हे दोन शब्द व्यवहारात बहुधा आपण समानार्थीच योजीत असतो पण ह्यांचे अर्थ व संकेत परस्परांशी ताडून पाहून त्यांची किंचित परीक्षा केली तर लवकरच कळून चुकेल की ते परस्परांहून भिन्न आहेत, इतकेच नव्हे तर अगदी उलट आहेत. आपण म्हणतो की आपल्याला एकादी वस्तू आवडते, जशी एकादे दिवशी रूचकर झालेली ताटातली चटणी, अंगावरचा अलंकार किंवा पहाडातला अगर समुद्रकाठचा देखावा, अथवा कालिदासासारख्याच्या काव्यातील एकादा उतारा. दुस-या पक्षी आम्ही म्हणतो की एकाद्या प्राण्यावर प्रेम आहे, जसे आपले लाडके कुत्रे अथवा सलगीचा मित्र किंवा एकुलता एक पुत्र ह्यावर आम्ही करतो ते. ताटातल्या चटणीपासून तो कविराजाच्या काव्यापर्यंत परंपरेने उंच उंच होत जाणारे हे सर्व पदार्थ एक पक्षी आपल्या आवडीचे विषय होतात तर दुस-या पक्षी कुत्र्यापासून तो पोटच्या गोळ्यापर्यंत प्राणी आपल्या प्रीतीचे विषय होतात. आता व्यवहारात यद्यपि प्रीती आणि आवड ह्या शब्दांची योजना करिताना आपण अगदी सहज गोंधळ करून टाकतो, तरी वरील उदाहरणावरून सहज लक्षात येण्यासारखे आहे की आवडीचे सारे विषय आमच्या केवळ थोड्याबहुत उपभोगास कारण होतात, तर प्रीतीचे विषय मात्र आम्हांस कमी अधिक मानाने स्वार्थत्याग करावयास लावतात म्हणजे आवडीचे लक्षण उपभोग आणि प्रीतीचे लक्षण ह्याच्या उलट स्वार्थत्याग हे होय. आवडीचा विषय कोणताही अचेतन पदार्थ असू शकतो, पण प्रीतीचा विषय होण्याला चैतन्याचीच जरूरी असते, मग ते चैतन्य कुत्र्यामांजरातल्याप्रमाणे झाकलेले बद्ध चैतन्य असो किंवा साधुसंतातल्याप्रमाणे प्रकाशणारे मुक्त चैतन्य असो. एका पक्षी आमच्या आवडीच्या विषयाला आम्ही आपल्या सुखासाठी त्याचा अंत होईपर्यतही झिजविण्यास किंवा एकदम गट्ट करण्यासही तयार असतो, तर दुस-या आमच्या प्रतीच्या विषयासाठी आम्ही स्वतःचा अगदी अंत होईतोपर्यंत तनमन झिजून जातो. आता असेही काही विक्षिप्तराव आढळतात की जे आपल्या फाटक्या जोड्यासाठीही प्राण धोक्यात घालतील. ह्या उत्पटांग भावनेला आवडही म्हणता येत नाही व प्रीतीही म्हणता येत नाही. ती केवळ कृपणत; व तिचा विचारही येथे करावयास नको. पण वरील उदाहरणावरून आवड व प्रीती हे केवळ पर्यायवाचक शब्द नाहीत हे सिद्ध झाले. आणि म्हणून जरी आम्ही दिवाणखान्यतल्या आपल्या एका आवडीच्या सुबक आरामखुर्चीवर आपली प्रीती आहे असे केव्हा केव्हा व्यवहारात सहज म्हणून जातो तरी खरे पाहता हा अगदी चुकीचा व्यवहार आहे हे उघड आहे.

पण प्रस्तुत समयी मला केवळ भाषेची मीमांसा किंवा दुरूस्ती करावयाची नाही. आवड आणि प्रीती ह्यांचे खरे अर्थ ह्या प्रसंगी स्पष्ट करण्याचा उद्देश निराळाच आहे. आवड आणि प्रीती ह्यांची, भोग आणि त्याग अशी परस्पर विरूद्ध लक्षणे आहेत असे सांगितले. असे असूनही संसारात निरनिराळ्या माणसांशी आमचे जे स्नेहाचे संबंध जडतात त्यांना सरसकट प्रीती हेच नाव देण्यात येते. पण वस्तुत: बहुतेक प्रकार केवळ आवडीचेच असतात. एका मित्राने मला स्पष्ट सांगितले की, त्यांना लहान मुलांवर प्रीती करावीशी वाटते पण ती मुले मात्र सुंदर असली पाहिजेत. रस्त्यात जर एकादे गोजिरवाणे मूल पाहिले तर ते कोणाचेही असो उचलून त्याचे चुंबन घ्यावेसे त्यांना वाटते. स्पष्ट सांगितल्याबद्दल मित्राची मी तारीफ केली. पण ज्या गोड बालकाविषयी ह्या मित्राची अशी स्थिती होते त्याच्या आईची त्या बालकासंबंधी भावना व ह्या मित्राची भावना किती जमीनअस्मानाचा भेद. परवा एका वर्तमानपत्रात वाचले की दार्जिलिंगकडे एक आगगाडी धावत चालली असता एकाएकी गाडीबाहेर एक मूल पडले, त्यासरशी त्याच्या आईने खाली उडी टाकली. तिचा परिणाम असा झाला की गार्डाने गाडी थांबविली व दोघांचेही प्राण वाचले. कुठे कौतुकाचे नुसते चुंबन आणि कुठे हा कडेलोट. संसारात आम्ही परस्परांवर स्नेह करितो (ह्या मासिक कौटुंबिक उपासनांचा उद्देशही परस्पर स्नेह वाढविण्याचाच आहे.) तेव्हा आम्ही आपापल्या स्नेहाची आपल्याशीच पारख करावयाला पाहिजे आणि त्यात आवडीचा भोग किती आहे व प्रीतीचा त्याग किती आहे हे वेळोवेळी ठरविले पाहिजे. नाहीतर ही एक नित्यनैमित्तिक फसवणूक चालली आहे ती तशीच कायम राहील.

ह्यावरून कोणी कोणाच्या गुणावर लुब्ध होऊन त्याचे कौतुक करू नये असे म्हणणे नाही. उलट एकाची दुस-यावर आवड बसमे हा उदात्त आत्मिक व्यापार आहे हे खरे. तथापि ह्या व्यापाराचा प्रीतिरूपी याहून अत्यंत उदात्त आत्मिक व्यापाराशी विपर्यास होऊ न देण्याची खबरदारी घेतली पाहिजे हेच सांगण्याचा हेतू आहे.

आता आवड आणि प्रीती ह्या आमच्या भिन्न भावना ईश्वराचे ठायी कशा असतात ह्याचा विचार करू. आणि आजच्या विषयाचा हाच मुख्य उद्देश आहे. कोणताही अचेतन पदार्थ आमच्या आवडीचा विषय होऊ शकतो. पण प्रीतीचा होत नाही, म्हणजे तो पदार्थ कितीही आवडता असला तरी आम्ही त्याच्यासाठी कधी काही स्वार्थत्याग करीत नाही. मनुष्यप्राणी म्हणजे एक जड आणि चैतन्याचे मिश्रण आहे. तो केव्हा आवडीचा, केव्हा प्रतीचा, केव्हा दोन्हींचाही विषय होत असतो. एकाद्या आपल्या जिवलग मित्रावर आपले पुष्कळ प्रेम व आदर असतो पण काही मतभेदामुळे अगर रूचिवैचित्र्यामुळे अथवा दुस-या असल्या क्षुल्लक उपाधीमुळे त्याच्यावर आपली तितकी आवड नसते. तसेच एकाद्या खुशमस्क-या सोबत्याचा आपल्याला मोठा शोक लागून जातो तथापि त्याच्यावर तितकी प्रीती नसते, तसे आम्हा अपूर्ण मानवांचे संबंध असतात. पण शुद्धचैतन्य परिपूर्ण परमात्मा ह्याच्याशीदेखील आवड असल्यास प्रीती नाही, किंवा प्रीती असून आवड नाही, अशी अर्धवट धरसोडीची भावना असू शकेल काय?

अगोदर ईश्वरावर आमची नुसती आवडही जडणे दुर्मिळ. वेळोवेळी विषयाकडेच ओढ घेणारे आमचे मन त्याने विषयातील निराकार ज्योतीकडे धाव घेणे म्हणजे अपवादच. तथापि असे अपवादक पुरूष बरेच आढळतात. किंबहुना आमच्या सा-यांची ही अशी अपवादक स्थिती थोडीबहुत केव्हाना केव्हा तरी होत असते. विशेषत: एकांतात भजन, प्रार्थना, चिंतन हे करू लागलो असताना, आत्मपरीक्षण जोराने चालले असता, पश्चात्तापशुद्धीचा अनुभव घेत असता, भूत, भविष्य, वर्तमान विशाल विश्वातील सर्व चांगल्या आणि सामर्थ्यवान वस्तू एकवटून जणू आकारालाच येते आणि भक्तीच्या योगे मृदू झालेले आमचे मन त्या आकाराला साक्षी होते. अशा स्थितीत ईश्वर आपल्याला आवडू लागतो. ही वेळ अमोल सुखाची आणि उदात्त अनुभवाची हे सर्व खरे, पण अशा वेळी ईश्वरावर आम्ही प्रीती करतो किंवा त्याच्या अपार मंगल गुणांचे केवळ कौतुक करितो बरे? अशा वेळी सुख होत असते पण काही त्याची सेवा घडत असते काय? आध्यात्मिक सुख पुष्कळसे अनुभवून सेवेची पाळी आल्याबरोबर आम्ही चुकवाचुकवी करीत नाही काय? जसे आपल्या अडचणीत पडलेल्या मित्रासाठी किंवा मरणोन्मुख झालेल्या बालकासाठी अथवा आपल्या प्रिय मातेची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेक दु:खे सोसतो, तसे ईश्वराच्या इच्छेसाठी काही झीज सोसतो काय? असे जर होत नसेल तर ईश्वरावर आपली प्रीती नसून केवळ केव्हा तरी आवड मात्र बसते असे होते. पण किंचित सूक्ष्म विचार केला तर कळून चुकेल की ईश्वराची आवड लागणे आणि त्याजवर प्रीती न करणे, किंवा त्याजवर प्रीती करणे पण त्याची आवड न लागणे, ह्या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत. ह्या धरसोडीचे प्रकार आम्हा मनुष्यांच्या परस्पर संबंधात असणे शक्य आहे. पण शुद्ध चैतन्याशी असा अर्धवट संबंध जडणे मुळीच अशक्य आहे. तसा अर्धवट अनुभव येत असल्यास आपण आपली फसवणूक करून घेत आहो असे खास समजावे.

।। गोड तुझें नाम दयाळ आवडतें मज ।।
असें वाटल्याबरोबर
।। काया वाचा मन हें चरणीं डुल्ललें गहाण ।।
।। कृपा ऋण नचि फिटे अर्पिताही प्राण ।।

असाही अनुभव, नुसता आपल्यालाच नव्हे तर दुस-यालाही आला पाहिजे, नाहीं तर दोन्ही अनुभव खोटे आणि पोकळ समजावेत.