अस्पृश्यतानिवारणासंबंधाने वरच्या वर्गातील काही उदारविचारवादी लोक काही अस्पृश्य मानलेल्या लोकांस आपल्याबरोबर घेऊन कमी-अधिक प्रमाणावर प्रयत्न करतात. अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे, मनुष्यतेवरील, हिंदुधर्मावरील हा काळाकुट्ट डाग आहे, तो काढून टाकल्यावाचून आम्हाला कोणत्याही प्रकारचे हक्क मागण्याचा अधिकार पोचत नाही, असे कोणीही उच्च मानिलेल्या वर्गातील गृहस्थाने म्हटले, तर ते आमच्या अस्पृश्य मित्रांना ताबडतोब पटते. परंतु हेच आमचे बंधू आपआपसांतील अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न कुठे आला की बिचकतात. एवढेच केवळ नव्हे, तर एखादा कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यतेचा प्रश्न पुढे येताच ज्याप्रमाणे क्रोधायमान होऊन आपले श्रेष्ठत्व स्थापित करावयास व धर्माचे रक्षण करावयास सत्त्वर सिध्द होतो, त्याप्रमाणे आमच्या कित्येक अस्पृश्य बंधूंची स्थिती होऊन जाते. हा कटु अनुभव पदरात पडल्यानंतर अस्पृश्योध्दाराची चळवळ सर्वतोमुखी करावयास कारण झालेले रा. रा. विठ्ठलराव शिंदे नेहमी म्हणत असत की, अस्पृश्योध्दाराच्या मार्गातील मोठे धोंडे हे स्वतः अस्पृश्य मानलेलेच लोक ! ह्या उद्गाराची आठवण ह्या आठवडयात आम्हाला पुन्हा एकदा झाली.
---------------------------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, संपादकीय स्फुट, ११ फेब्रुवारी १९२१
---------------------------------------------------------------------------------
पुण्यास सरकारने स्वतःच्या खर्चाने अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी एक मोफत बोर्डिंग काढले आहे. तेथे मुलांचा स्वयंपाक महार स्वयंपाक्याने करावयाचा की, चांभार स्वयंपाक्याने करावयाचा हा वाद त्यांच्यातच उपस्थित झाला आहे ! चांभारांना महार अस्पृश्य वाटतात व महार चांभारांचे श्रेष्ठत्व कबूल करावयास तयार नाहीत. म्हणजे आपापसांतील स्पृश्यास्पृश्यत्वाचा व सोवळयाओवळयाचा हा सावळा गोंधळ कायम ठेवून उच्च जातींनी मात्र अस्पृश्यत्व मानू नये असा ह्या लोकांचा आग्रह आहे. परंतु आपापसांतील भेदभाव नष्ट केल्यावाचून श्रेष्ठपणाच्या लटक्या कल्पना घालविण्यावाचून उच्च वर्णाचे लोक अस्पृश्यत्वनिवारणाचा प्रश्न मनापासून हाती घेणे शक्य नाही हे 'बहिष्कृत भारत'कारांनीच दाखवून आपल्या बंधूंना सरळ मार्ग दाखविण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे, हे पाहून आम्हांस फार समाधान वाटले. त्यांनी असे स्पष्ट उद्गार काढले आहेत की, ''जे महार-मांगांना किंवा चांभारांना अस्पृश्य लेखतात किंवा जे चांभर अस्पृश्यांना अस्पृश्य लेखतात त्यांना आपली अस्पृश्यता ब्राह्मणांनी किवां ब्राह्मणेतरांनी काढून टाकावी असे म्हणावयास अधिकार नाही. महारांनी चांभारांचा किंवा चांभारांनी महारांचा विटाळ मानावा व ह्या दोन्ही जातींनी आपला विटाळ ब्राह्मणांनी किंवा ब्राह्मणेतरांनी मानू नये अशी मात्र इच्छा करावी, हे कोणालाही चमत्कारिक वाटल्याशिवाय राहणार नाही ? महार, मांग, चांभार यांनी आपसांतील अस्पृश्यता काढून टाकल्याशिवाय आम्ही त्यांची अस्पृश्यता काढून टाकणार नाही, असे कोणताही समजूतदार ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतर म्हणणार नाही हे खरे असले तरी खुद्द अस्पृश्य जातीच आपल्या स्वतःच्या अशा वर्तनाने आपली हानी करतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे.''
स्पर्शास्पर्शांचा आपणांस असा भेद ठेवल्याने अस्पृश्यता काढून टाकण्याची त्यांची चळवळ कशी लुळी पडते, ह्याचा विचार त्यांनी करणे जरूर आहे. अस्पृश्यता हा अन्याय आहे असे जर त्यांना खरोखर वाटत असेल तर त्यांनी आपसांतील अस्पृश्यताही काढून टाकली पाहिजे. एवढेच नवहे तर रोटी-बेटी व्यवहारही त्यांनी आपसात सुरू केला पाहिजे आणि असे त्यांनी केले तर त्यांच्या चळवळीला जोर येईल. वरिष्ठ जातींनी चालविलेले सामाजिक अन्याय नाहीसे केल्याशिवाय कोणीही ऐकणार नाही.
पुण्याच्या बोर्डिंगपुरताच हा प्रश्न नाही आणि तेवढयापुरता तो सुटलाही असेल. परंतु आमचे जे अस्पृश्य बंधू स्वतः अस्पृश्यतानिवारणाच्या चळवळीत पुढाकार घेत आहेत, त्यांनी बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ॥ ह्या साधुक्तीची इतरांस आठवण करून देताना ती स्वतः सही करून घ्यावी, हे बरे ! हा प्रश्न आता उंटावरून शेळया हाकून सुटण्यासारखा नाही. आता कृतीची वेळ आली आहे. ''वाचा वदे परि करणे कठीण'' असे मात्र म्हणू नये म्हणजे झाले.