हेच आमचे उत्तर*

आमच्याकडे नाशिकच्या एका गृहस्थाचे 'रा. शिंदे व बहिष्कृत समाज' असा मथळा दिलेले एक पत्र आले आहे.  आमच्या नाशिककर बंधूंची व त्यांच्याप्रमाणेच ज्यांचे विचार आहेत त्यांची समजूत करण्याच्या भानगडीत आम्ही पडू इच्छित नाही.  हा वाद केव्हाही मिटण्यासारखा नाही.  कारण आमच्या बंधूंचा दृष्टिकोणच मुळी निराळा आहे, त्याला काय करावयाचे ?  नाहीतर निराश्रित साहाय्यकारक मंडळीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसणाऱ्या जागरूककरांना ज्या गोष्टीविषयी योग्य कल्पना होते त्या गोष्टीविषयी एवढी लांब लांब पत्रे लिहिणाऱ्या व रा. शिंदे ह्यांच्या हेतूंचा सहज विपर्यास करणाऱ्यांना रा. शिंदे यांच्या कार्याचे खरे स्वरूप कळू नये असे थोडेच आहे ?  ह्यासाठी जागरूककार जे तिऱ्हाईत त्यांच्या शब्दांनी आम्ही पुढील उत्तर देतो. - सं. सुबोधपत्रिका

----------------------------------------------------------------------------
*सुबोधपत्रिका, २२ ऑगस्ट १९२०
------------------------------------------------------------------------------

रा. शिंदे यांच्या निराश्रित साहाय्यकारी मिशनावर काही अस्पृश्यवर्गातील व्यक्तींकडून होणाऱ्या टीकेचा पूर्वी एकवार आम्ही निषेध केलाच होता.  पुन्हा त्याच बाबतीत त्याच स्वरूपाच्या आक्षेपांचे पत्र आम्हाकउे आले आहे.  टीकाकाराची मुख्य तक्रार ही की, रा. शिंदे यांनी एवढी मोठी रक्कम विद्यार्थ्यांना साह्य करण्याकडे खर्चण्याऐवजी इमारतीतच का घातली ?  हा पैशाचा अपव्यय नव्हे का ?  यावर पहिले उत्तर हे आहे की, हा अपव्यय नव्हे.  चालू खर्चाइतकीच संस्थेला चिरस्थायित्व येण्यास इमारतीचीही आवश्यकता असते.  दुसरी गोष्ट इंदूरच्या महाराजांनी व सरकारने दिलेली रक्कम इमारतीतच का घातली, हे विचारणारे टीकाकार होण ?  आणि ती दुसरीकडेच खर्चण्यास रा. शिंदे कोठे स्वतंत्र होते ?  देणगी देणाराची इच्छाच जर आपल्या देणगीचा व्यय इमारत बांधण्याकडे व्हावा अशी होती, तर त्या बाबतीत नाहक आक्षेप घेत बसण्यात अर्थ काय ?  आमच्या मते असली टीका सर्वस्वी विघातक व कार्यकर्त्या माणसाच्या मार्गात विघ्ने उपस्थित करणारी आहे.  टीकाकारांना इमारतीसाठी पैसा खर्च होणे अनष्टिच वाटत असेल तर त्यांनी अन्य खर्चासाठी म्हणून धनिकांकडून मिशनला साहाय्य मिळवावे.  त्यांपैकी एक पैदेखील रा. शिंदे इमारतीकडे खर्चणार नाहीत अशी आम्ही टीकाकारास हमी देतो.