अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास*

उत्पत्ती  :  अस्पृश्यतेचा इतिहास निदान हिंदुस्थानात तरी आर्यन् लोकांच्या आगमनाइतकाच जुना आहे.  चांडाल हा शब्द वैदिक वाङमयात आणि बौध्द ग्रंथांतून आढळतो.  बुध्दाच्या वेळेच्या पूर्वीपासून तरी निदान चांडाल आणि इतर जित राष्ट्रे अस्पृश्य गणली जात होती असे उल्लेख आढळतात.  इराणातील झरथुष्ट्रपंथी आर्य हिंदुस्थानातील देवयज्ञी व इतर देवोपासक आर्यांनाही अस्पृश्य आणि तिरस्करणीय समजत असत, असे पार्श्यांच्या जुन्या व अर्वाचीन ग्रंथांत पुरावे मिळतात.  आर्यांचा हिंदुस्थानात कायमचा जम बसल्यावर त्यांनी येथील दस्यू ऊर्फ शूद्र नावाच्या जित राष्ट्रांना आपल्या वस्तीजवळच पण बाहेर रहावयास लावून त्यांच्या व आपल्या संस्कृतीत भेसळ होऊ नये म्हणून त्यांना अस्पृश्य ठरविले.  ज्या अर्थी जपानात हेटा, हीना नावाच्या अस्पृश्य जाती अद्यापि आहेत; त्या अर्थी अस्पृश्यता ही संस्था आर्यांनीच निर्माण केली नसून तिचा प्रादुर्भाव मोगल लोकांतही पूर्वी होता हे सिध्द होते.  हेटा किंवा ऐटा ही जात फिलीपाईन बेटातून जपानात गेली असावी.  अथ्रवण (ब्राह्मण), रथेस्ट्र (राजन्य), वस्ट्रय (वैश्य) आणि हुइटी (शूद्र) असे झरथुष्ट्राच्या वेळी इराणात चार भेद होते.  वेदात शूद्र हा शब्द आढळत नाही, पण महाभारतात अभिर आणि शूद्र ह्यांचा उल्लेख असून सिंधू नदीच्या मुखाजवळील भागात त्यांची वस्ती असावी असे दिसते.  (ॠग्वेदात पुरुषसूक्तात शूद्र हा शब्द आला आहे व शुल्क यजुर्वेदात ८ वेळा या शब्दाचा उल्लेख आला आहे.  २३.३०.३१  इ.-संपादक :  ज्ञानकोश)  'कास्टस् ऑफ इंडिया' या पुस्तकात वुईल्सनने म्हटले आहे की, कंदाहार प्रांतात शूद्रोई नावाचे प्राचीन राष्ट्र होते आणि सिंधू नदीवर शूद्रोस नावाचे शहर होते (रसेल ह्यांचे कास्टस् ऍण्ड ट्राईब्स् सी.पी. हे पुस्तक पहा).  इराणातील हुइटी अथवा शूद्रोई आणि फिलीपाईन बेटातील ऐटा ह्या जातींचा संबंध असल्याचे सिध्द करता आल्यास अस्पृश्यतेचा उत्पत्तीवर बराच प्रकाश पडण्यासारखा आहे.

--------------------------------------------------------------  
* महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७ वा
--------------------------------------------------------------
आर्यांचा विसतार उत्तर हिंदुस्थानात होऊन आर्यावर्ताची स्थापना झाल्यावर शूद्र राष्ट्रांचा आर्यांच्या वर्णव्यवस्थेत समावेश होऊन पुढे दुसरी जी कोणी जंगली जित राष्ट्रे आर्यांच्या खिदमतीस राहण्यास कबूल झाली; ती हळूहळू अस्पृश्य गणली जाऊन गावाच्या शिवेबाहेर राहू लागली, अशी उपरिनिर्दिष्ट उपपत्ती रसेलच्या ग्रंथात आहे.  मनुस्मृतीच्या काळानंतरची अलीकडच्या अस्पृश्य जातीची चांगली माहिती मिळण्यासारखी आहे.  मनुस्मृतीत ब्राह्मण स्त्री आणि शूद्र पुरुष यामधील प्रतिलोक संततीस 'चांडाल' अशी संज्ञा आहे.

इंग्रजी शिक्षणामुळे हिंदुस्थानात जी आधुनिक सुधारणेची प्रवृत्ती सुरू झाली, तिच्यामुळे वरील अस्पृश्यतेच्या निवारणार्थ केवळ हिंदू लोकांकडून जे प्रयत्न होत आहेत, त्यांचा संक्षिप्त इतिहास एवढाच प्रस्तुत विषय आहे.

ह्या विषयाचे दोन मुख्य भाग पडतात, ते असे :  इ.स. १९०६ मध्ये भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई येथे स्थापन झाली.  हिचा पूर्वकाळ आणि उत्तरकाळ असा : पूर्वकाळी अनुक्रमे महाराष्ट्र, बंगाल, बडोदे आणि मद्रास प्रांती काही उदार व्यक्तींनी थोडेसे प्रयत्न केले, पण त्यांच्यांत सातत्य, संघटना, परस्पर संबंध नसल्यामुळे त्यांना यावी तशी दृढता आली नाही; पण ही मंडळी मुंबईत स्थापन झाल्यावर सर्व हिंदुस्थानभर हिच्या शाखा झपाटयाने पसरल्या.  त्यांच्यांत कमी अधिक परस्परसंबंध जडल्यामुळे व त्यांच्या द्वारा सर्वत्र लोकमताचा विकास झाल्यामुळे शेवटी सन १९१८ साली कलकत्त्याच्या काँग्रेसने मंडळीचे जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांच्या पत्रावरून अस्पृश्यतानिवारणाचा ठराव सर्वानुमते पास केला व पुढे लवकरच महात्मा गांधी ह्यांच्या पुरस्कारामुळे ह्या प्रयत्नाला आता अखिल राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.  कलकत्त्याच्या काँग्रेसमध्ये मिसेस बेझंट या अध्यक्ष होत्या व त्यांचा ह्या मंडळीशी बराच परिचय होता.  म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांच्या जोरावर हा ठराव पास केला.

रा. फुले यांचा प्रयत्न  :  इंग्रजी विद्येचा उगम एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी तरी प्रथम बंगाल्यात झाला, आणि तेथे राजा राममोहन रॉय ह्यांनी इ.स. १८३१ त ब्राह्मसमाजाच्या रूपाने सर्व आद्य प्रगतीची ध्वजा उभारती.  तरी अस्पृश्यतानिवारणाचा अग्र आणि अंतिम मान महाराष्ट्रसच आणि विशेषतः जोतीबा फुले ह्या महात्म्यानेच मिळविला.  ह्यांचा जन्म पुणे येथे फुलमाळी जातीत झाला.  सन १८४७ पर्यंत ह्यांचे मराठी आणि इंग्रजी शिक्षण मिशनरी शाळेत झाले.  रा. लहूजी नावाच्या एका तालीमबाज मांग जातीच्या गृहस्थाच्या आखाडयात ह्यांचे शारीरिक शिक्षण झाले होते.  तेव्हापासून अस्पृश्योध्दाराकडे ह्यांचे लक्ष वेधले होते.  पुढे बंगाल्यात बाबू शशिपाद बानर्जी ह्या गृहस्थांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, अस्पृश्योध्दार वगैरेसंबंधी सामाजिक प्रगतीची जी कामे चालविली; ती त्याच्या पूर्वीच २० वर्षे आधी महाराष्ट्रात ह्यांनी चालविली.  ''डेक्कन असोसिएशन'' नावाची एक प्रागतिक विचारप्रसारक संस्था पुण्यास होती.  तिच्या वतीने सरकारांनी जोतीबास २०० रुपयांची शाल, मोठी जाहीर सभा करून १८५२ साली नजर केली.  त्याचे कारण १८४८ साली जोतीबांनी मुलींची पहिली शाळा स्थापन केली, आणि १८५२ साली आरंभी महारमांगांच्या मुलांसाठी पहिली शाळा स्थापन केली.  ही शाळा मुंबई इलाख्यातच नव्हे, तर अखिल जगात अस्पृश्यांसाठी हिंदू लोकांनी उघडलेली पहिलीच खासगी शाळा होय.  सरकारी इन्स्पेक्टर मेजर कँडीसाहेबांनी हिची पहिली परीक्षा, ता. २१ मार्च १८५२ रोजी शुक्रवार पेठेतील शाळेत घेतली असे त्या दिवशी प्रसिध्द झालेल्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात नमूद झाले आहे.  ''त्या वेळेस शुध्द लिहिणे व वाचणे वगैरे गोष्टींत ह्या शाळेतील मुलांनी विश्रामबागेतील (वरिष्ठ वर्गाच्या) किती एक विद्यार्थ्यांपेक्षाही उत्तम परीक्षा दिली, असे मेजरसाहेबांनी म्हणून दाखविले, असे ज्ञानप्रकाशने त्याच अंकात प्रसिध्द केले आहे.  ता. ५ डिसेंबर १८५३ च्या ज्ञानप्रकाशात शाळेच्या पहिल्या वाषर्िाक रिपोर्टासंबंधाने संपादकांनी जे स्पष्ट व सविस्तर मत दिले आहे त्यातील खालील उतारे विशेष लक्षात घेण्यासारखे आहेत.  ''एक मुलींची शाळा आपल्या घराजवळ घातली.  त्या कालावधीत व पुढेही त्यास त्यांच्या जातीच्या लोकांकडून फार त्रास सोसावा लागला.  त्यास शेवटी तीर्थरूपांनी त्याच कारणावरून घरातून काढले.  आपल्या नीच बंधुजनांस अज्ञानसागरातून काढून ज्ञानामृताचे सेवन करण्याकरिता त्यांनी संकटे भोगली, हा त्यांचा त्या जातीवर मोठा उपकार आहे.  आम्हीही त्यांचे आभार मानितो.  ब्राह्मण लोकांमुळे अतिशूद्रांचे ज्ञानेकरून व द्रव्येकरून बिलकुल बरे होऊ नये, अशी उंच जातीची इच्छा खरी, परंतु त्यात ब्राह्मण काय ते अग्रेसर असा ह्यांचा लिहिण्याचा हेतू कळून येतो.  त्याशिवाय स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही.  प्रायः आम्ही ही गोष्ट खरी समजतो, असे फुलेराव जाणत असता, ज्या ब्राह्मणांनी अशाच कामात द्रव्याची वगैरे मदत केली, त्यापेक्षा त्यांची स्तुती तर इतरांपेक्षा जास्त केली पाहिजे व त्यांचे स्मरण सवा्रंस राहावे यास्तव त्यांचे नावे जोतीरावांनी (रिपोर्टात) अवश्य लिहावी असे आम्हास वाटते.''  ह्या शाळेत चांभाराच्या मुलींस जोतीबा स्वतः व त्यांची बायको किती कळकळीने शिकवीत असत, ह्याविषयी एक पत्र ज्ञानप्रकाशात प्रसिध्द झाले आहे.  ह्यांचे तीन मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे, सदाशिवराव बल्लाळ गोवंडे ह्यांची जोतीबांना बरीच मदत असे.  ''महारमांगांच्या शाळांत बरीच गर्दी होत असे.  ह्या लोकांस त्यांनी आपल्या राहत्या घराच्या विहिरीवर पाणी भरण्यास परवानगी दिली.''  (अ. ए. गवंडीकृत फुले यांचे परित्र, पान ८) ता. ४ सप्टें. १८५६ च्या ज्ञानप्रकाशाच्या अंकात खालील मजकूर आहे :  ''गेल्या शुक्रवारी येथील अति शूद्रांच्या शाळांची परीक्षा झाली.  मुख्य स्थानी मिस्तर स्विससाहेब रिविन्यू कमिशनर हे बसले होते, युरोपियन, नेटिव्ह बरेच आले होते.  आरंभी कमिटीने रिपोर्ट इंग्रजीत व नंतर मराठीत वाचला व त्यावरून असे समजते की, एकंदर शाळा तीन आहेत व त्यांमध्ये मुलांची संख्या सुमारे ३०० वर आहे.  परंतु महारमांग आदिकरून नीच जातीखेरीजकरून इतर मुले पुष्कळ होती.  शिक्षक सुमारे ८ आहेत.  ह्या शाळांत मुली मुळीच नाहीत.  गेल्या दोन वर्षात मुली असत, परंतु एक शाळा ह्या वर्षी जास्त वाढविली आहे.  स्थापन झाल्यापासून दिसत आहे की, त्या शाळांच्या अभ्यासाची धाव पलीकडे जात नाही व ह्याचे कारण काय ते कळत नाही.  कमिटी असे म्हणते की, शिक्षक चांगले मिळत नाहीत.''

सन १८७५ सप्टेंबर ता. २४ च्या मुंबई सरकारच्या रेव्हिन्यू खात्याच्या नं. ५४२१ च्या ठरावावरून जोतीबांच्या ह्या शाळांविषयी खालील ठराव १८५५-५६ च्या सुमारास महारमांगांच्या मुलांच्या शाळेसाइी इमारत बांधण्याकरता सरकारांनी पुणे येथे एक जागेचा तुकडा दिला असे दिसते व तसेच इमारत खर्चासाठी दक्षिणा फंडातून ५००० रुपये देण्याचे सरकारांनी वचन दिले.  ही रक्कम वसूल करण्यात आली नाही.  तरी ह्या जागेवर एक झोपडी उभारण्यात येऊन तिच्यात गेल्या वर्षापर्यंत महारांसाठी एक शाळा भरत होती.  आता शाळा बंद आहे.  ह्या शाळेच्या मंडळीचे सेक्रेटरी रावबहादूर सदाशिवराव बल्लाळ.  त्यांच्या ताब्यात ही जागा आहे.  शाळेला लागणाऱ्या जागेखेरीज इतर भाग एका मांगाला लागवडीने सेक्रेटरी देत आहेत.  तिचे लावणी उत्पन्न दरसाल ८० ते १०० रुपये येत असते.  रावबहादूर सदाशिव ह्यांच्या मनात ही जागा व शाळा सरकारास द्यावयाची आहे.  ही जागा लोकलफंड कमिटीस द्यावयाची आणि शाळा तिच्या उत्पन्नातून सदर कमिटीने पुढे चालवावी.  दक्षिणाफंडातून ८०० रुपये ग्रँट देण्यास सरकारांना हरकत वाटत नाही.  मुंबई सरकारच्या विद्याखात्याचा तारीख १३ नोव्हेंबर १८८४ नंबर १९, २१ चा ठराव झाला, त्यावरून ही शाळा लोकफंड कमिटीकडून पुणे म्युनिसिपालिटीकडे येऊन सरकारातून वेगळी ग्रँट मिळण्याची तजवीज झाली.  येणेप्रमाणे महारमांगांसाठी जोतीबांनी जी प्रथम संस्था काढली, तिच्या मिळकतीची हकीकत आहे.  भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीने नानापेठेत पुणे म्युनिसिपालिटीकडून सन १९१४ तारीख १८ माहे जून रोजी भोकरवाडीजवळील ७ एकन जागा आपल्या प्रशस्त इमारतीकरिता ९९ वर्षांच्या कराराने घेतली आहे, ती हीच मिळकत होय.  सरकारकडून म्युनिसिपालिटीला जी शाळा मिळाली तीदेखील हल्ली ह्या मंडळीच्या शाळांतच सामील झाली आहे.


शशिपाद बंदोपाध्यायांचे प्रयत्न  :  बंगाल्यात अस्पृश्यतानिवारणाचा प्रथम मान वरील ब्राह्मण गृहस्थांकडे आहे.  हे कलकत्त्याजवळील बारानगर गावी सन १८४० त कुलीन ब्राह्मण जातीत जन्मले.  १८६६ साली ब्राह्मधर्मी झाले. तेव्हापासून ते अगदी खालच्या जातींशी मिळूनमिसळून जेवूखाऊ लागले.  सन १८६५ च्या नोव्हेंबरच्या पहिल्या तारखेस ह्यांनी बारानगर येथील गिरणीतील मजूरवर्गाची एक सभा भरविली.  त्यात ठराव होऊन त्यांच्यासाठी रात्रीच्या आणि दिवसाच्या शाळा काढल्या.  हा अनाचार, टवाळ लोकांस न खपून त्यांनी त्या उठविल्या.  पण ह्यांनी स्वतःच्या खर्चाने इमारती बांधून त्या कायम केल्या.  इकडील चोखामेळयाप्रमाणे बंगल्यातील कर्ताभजापंथी चांडाळवर्ग भजनाचा शोकी आहे.  त्यांचा बिहालपारागावी एक उत्तम सारंगी तयार करण्याचा कारखाना आहे.  तेथे जाऊन बाबूजी चांडाळांचे कीर्तन ऐकत.  सन १८७० च्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी अशा मजूरवर्गाचा एक क्लब काढला.  त्याच्या द्वारा त्यांना वाचनाची गोडी लाविली आणि मद्यपान वगैरे दुष्ट चाली सोडविल्या.  वेडीवाकडी गाणी सोडून ही मंडळी सात्त्वि कीर्तने करू लागली.  १८७१त जेव्हा बाबूजी विलायतेस निघाले, तेव्हा ह्या गरीब मजुरांनी त्यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक मानपत्र दिले.  ह्या दीनांच्या सेवेबद्दल बाबूजींचा सत्कार ते विलायतेस गेल्यावर ब्रिस्टल शहरी एका मिशनरी संस्थेने त्यांना एक मोठे मानपत्र देऊन केला.  परत आल्यावर त्यांनी गरिबांसाठी एका पैशाचे एक मासिकपत्र काढले.  दर महिन्यास त्याच्या १५००० प्रती खपू लागल्या.  त्यात पंडित शिवनाथशायांसारख्यांनी लेख लिहिले व श्रीमंतांची चांगली मदत असे.  'बारानगर समाचार' नावाचे साप्ताहिकही काढले.  ते चांडालाबरोबर जेवीत, मेहेतरांच्या मुलांची शुश्रूषा करीत. सरकारने नुकत्याच उघडलेल्या सेव्हिंग बँकेत त्यांचे पैसे ठेवून त्यांना काटकसर शिकवीत.  बारानगर येथे ब्राह्मसमाज स्थापन झाल्यावर ह्या लोकांसाठी बरेच काम होऊ लागले.  ह्या मजुरांच्या संस्थेच्या २३ व्या वार्षिक उत्सवाचे वर्णन १८८९ सालच्या सप्टेंबर महिन्याच्या २० ता. च्या 'इंडियन डेली न्यूज' नावाच्या इंग्रजी पत्रात सविस्तर आले आहे.  बक्षीस-समारंभात १०० वर मुलांस व गडयांस बक्षिसे दिली.  बडया मंडळींनी सहानुभूतीची भाषणे केली.  याशिवाय बंगाल्यास दुसरे कोणते प्रयत्न झालेले ऐकिवात नाहीत.  हल्ली जे डिप्रेस्ड मिशनचे काम गावोगावी चालले आहे, त्याचे मूळ महाराष्ट्रातील मिशनमध्ये आहे.  वरील माहिती सीतानाथ तत्त्वभूषण यांनी निवेदिलेल्या शशिपाद बाबूंच्या चरित्रावरून व इतर साधनांवरून मिळविलेली आहे.

श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचे प्रयत्न :   महाराजांनी आपल्या राज्यात वेळोवेळी कानाकोपऱ्यात स्वतः जाऊन अस्पृश्य, जंगली, गुन्हेगार जातींची स्थिती स्वतः निरखिली.  नवसारीजवळ सोनगड म्हणून महाराजांचा एक जंगली मुलूख आहे.  तेथे ढाणका नावाची जंगली जात आहे.  तेथे महाराज गेले तेव्हा हे सर्व लोक वानरांप्रमाणे झाडांवर चढून बसले.  ते काही केल्या खाली उतरेनात.  महाराजांनी ३२ वर्षांपूर्वी या लोकांच्या १०० मुलामुलींसाठी दोन बोर्डिंगे आणि शेतकीची नमुनेदार शाळा काढलेली मी स्वतः १९०५ साली पाहिली.  तिचा उत्तम परिणाम दिसून आला.  तेथील सुपरिंटेंडेंटने ह्या लोकांसाठी एक प्रार्थनासमाज चालविला होता, तो मी दोनदा पाहिला.  त्याच्या द्वारा मुलांस उच्च धर्माची तत्त्वे शिकण्याची सोय होती.  गुजराथी व इंग्रजी शिकलेले प्रौढ मुलगे व मुली बोर्डिंगात मी पाहिल्या.  त्यांच्यात लग्ने लावून कायमची सुधारणा करण्याची महाराजांची कल्पना घेण्यासारखी दिसली.  थक्क झालो. अस्पृश्यांच्या शिक्षणाचे एक निराळे खातेच आहे.  त्याचे मुख्य अधिकारी पंडित आत्माराम ह्यांनी पाठविलेल्या रिपोर्टाचा अल्प सारांश खाली दिला आहे :

सन १८८३ सालापासून 'अस्पृश्यां'करिता निराळया मोफत शाळा उघडण्यास सुरुवात झाली.  १९८४त ७ व १८९१त १० शाळा झाल्या व हिंदू शिक्षक मिळणे अशक्य असल्यामुळे मुसलमानांवरच काम भागवावे लागे.  अधिकाऱ्यांतही सहानुभूती कमी असल्यामुळे फार अडचणी आल्या.

ह्याचसाठी मुंबईत नि. सा. मंडळी स्थापण्यात आली आणि बडोद्यात सक्तीच्या शिक्षणाचा ठराव पास होऊन शिक्षणाचा प्रसार झपाटयाने चालला.
तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

अंत्यजांच्या धर्मशिक्षणार्थ १९२३ साली त्यांच्या पुरोहितांना संस्कृत शिकविण्यासाठी एक खास संस्कृत पाठशाळा उघडली व तीत प्रत्येकी ८ रु. प्रमाणे २५ गारोडयांना विद्यार्थिवेतने दिली.  पेटलादच्या रा. शिवराम नावाच्या अंत्यज व्यापाऱ्याला धारा सभेचे सभासद नेमिले.  त्याच्या मृत्यूनंतर मुंबईचे बी.ए. महार गृहस्थ रा. आंबेडकर यांना नेमण्यात आले.  १९११ साली शिक्षणखात्यात २००, लष्करात १९, म्युनिसिपालिटीत १०, पोलिसांत ७, सर्व्हेखात्यात ३ आणि इतर ३ असे एकंदर २४२ अस्पृश्य इसम सरकारी नोकरीत होते.  बडोदा कॉलेजात स्कॉलरशिपा ठेविल्या.  अंत्यज बोर्डिंगात वैदिक पध्दतीचे धर्मशिक्षण संस्कृतात देण्यात येते.  मुलांना राजवाडयात जमवून सर्वांसमक्ष समारंभ करण्यात आला.

१७ वर्षांच्या एका अंत्यज अनाथ मुलीचे लग्न एका वरिष्ठ स्पृश्य वर्गातील मुलाशी १९१९ साली करण्यात आले.  वसतिगृहातील सर्व मुलींना शिवण आणि गृहोपयोगी सर्व कामे शिकविण्यात येतात.  रा. आंबेडकर ह्यांना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीत ४ वर्षे ठेवून पीएच. डी. करविले आणि एकाला मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एल. एम. एस. करविले.  त्या सर्व सत्कार्यात लोकांकडून नेहमी टीका आणि पुष्कळ वेळा उघड विरोध सहन करावा लागला.  वसतिगृहातील प्रौढ विद्यार्थ्यांकडून आता बडोदे राज्यात आत्मोद्वाराच्या चळवळीला चांगली मदत होऊ लागली आहे.  महात्मा गांधींना हल्लीही विरोध होत आहे; मग नि. सा. मंडळीला पूर्वी गुजराथसारख्या सोवळया प्रांती किती विरोध झाला असेल, ह्याची कल्पनाच करावी लागणार.

कर्नल ऑल्कॉट (थिऑसोफिकल सोसायटी, मद्रास)  :  कर्नल ऑल्कॉट थिऑसोफिकल सोसायटीचे अध्यक्ष ह्यांनी १९०२ साली 'पुअर पराय' नावाची एक लहानशी चोपडी प्रसिध्दी केली.  तिच्यात पान १७-२३ मध्ये खालील हकीकत आहे.  अस्पृश्यतानिवारणाचा उत्तम उपाय म्हणून मद्रास शहरी त्यांनी आपली पहिली शाळा सन १८९४ साली एका झोपडीत काढली.  दुसरी १८९८ त व तिसरी १८९९ त उघडली.  १९०१ च्या रिपोर्टात सर्व शाळांतून मिळून त्या सालच्या २० डिसेंबर रोजी ३८४ मुलगे व १५० मुली आणि १६ शिक्षक होते.  ४ इयत्तेपर्यंत तालीम, हिशेब, व्यावहारिक इंग्रजी हे शिकविण्यात येते.  त्यांच्या धर्मात मुळीच हात घालण्यात येत नाही.  शिक्षणापलीकडे विशेष काही करण्याचा सोसायटीचा उद्देश ऐकिवात नाही.  १९०३ साली मी स्वतः मद्रास शहरी या सोसायटीच्या चार शाळा पाहिल्या.  तेथे किंडरगार्डन पध्दतीचे नमुनेदार शिक्षण मी पाहिले.  एक दिवस बाई फारच कळकळीने देखरेखीचे काम खुषीने करीत होती.  ह्या शाळांचे काम अद्यापि चालत आहे.  

रा. सा. के. रंगराव मंगळूर  :  मद्रास इलाख्यात - विशेषतः पश्चिम किनाऱ्यावर - अस्पृश्यांचे हाल कल्पनेच्याही पलीकडे आहेत.  अस्पृश्यांची गोष्टच नको; पण वरिष्ठ जातींच्या व्यक्तींपासून ६०-७० फुटांच्या अंतरात येण्यास त्यांना अद्यापि मनाई आहे.  म्हणून त्या प्रांती सर्वांच्या मागून ह्या कामी सुरुवात झाली हे लक्षात आणून मंगळूर ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रावसाहेब के. रंगराव ह्यांनी मंगळून येथे १८९७ साली आपली पहिली शाळा काढली, ही मोठी स्तुत्य गोष्ट आहे.  ह्या कामी त्यांना लोकांचा छळ सोसावा लागला.  पुढे १० वर्षांत ह्या छळाला न जुमानता बरीच प्रगती करता आली.  सरकारच्या मदतीने त्यांना त्या अवधीत ह्या संस्थेसाठी स्वतःची विस्तीर्ण जागा व इमारत, उद्योगशाळा आणि वसाहतीसाठी सुमारे २० एकर शेतकीची जागा इतकी सामग्री संपादन करता आली.  मुंबईस रा. शिंदे ह्यांनी १९०६ साली आपली भारतीय नि. सा. मंडळी स्थापिली.  तिला ही संस्था जोडण्यात आल्यापासून हिची भरभराट होत आहे.

ब्रिटिश सरकार आणि ख्रिस्ती मिशने  :  यांनी अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याकरिता जे काही केले आहे ते प्रसिध्द आहेच.  त्याचे सविस्तर वर्णन करण्याचे हे स्थळ नव्हे.  ह्यांच्या मार्गात अडथळा काय तो नोकरशाहीची नबाबी पध्दती आणि धर्मांतराचे वेड एवढाच होता.  हे अडथळे नसते तर दोघांच्या हातून - निदान हिंदुस्थान सरकारच्या एकाच्या हातून - हा अस्पृश्यतेचा प्रश्न ह्यापूर्वीच सुटावयाला पाहिजे होता.  मद्रासेकडील ख्रिस्ती मिशनांच्या विशेषतः रोमन कॅथोलिक पंथाच्या पध्दतीत तर उघड उघड दोष दिसत आहेत.  ते हे की, जातिभेदाचे निर्मूलन करण्याचे त्यांच्या धर्मात सांगितले असूनही केवळ आपली संख्या वाढावी ह्या हेतूने, त्या लोकांना ख्रिस्ती धर्मात येऊन पुन्हा त्यांचा दर्जा खालचाच ठेवला आहे.  त्यामुळे त्यांना आता दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत.  ह्याचे पुरावे मी स्वतः दक्षिण देशी जागजागी पाहिले.  ख्रिस्ती लोकांत हल्ली जी राष्ट्रीय चळवळ चालू आहे ती कायम राहिली आणि काँग्रेसची चळवळ शब्दांपलीकडे जाऊन कृतीत उतरली तर लवकरच हे लोक पुनः धर्मांतर करून हिंदुधर्मात येतील असे वाटते.

इंग्रज सरकारने सक्तीचे शिक्षण देऊन सरकारी नोकरीत घेण्याच्या बाबतीत त्यांनी या लोकांवर आजवर जो अक्षम्य अन्याय केला आहे, त्याचे निराकरण करतील तरी ताबडतोब अस्पृश्यतेला ओहोटी लागेल.  तथापि अशा बाबतीत परकीय नोकरशाही आणि परधर्मी ब्राह्मणशाही ह्यांना नावे ठेवण्यापेक्षा सर्व दोष स्वकीयांनीच पत्करावा, हेच योग्य आहे.

विठ्ठल रामजी शिंदे  :  ह्यांचा जन्म कर्नाटकातील जमखिंडी येथे ता. २३ एप्रिल १८७३ रोजी झाला.  ह्यांचे पूर्वज सन १२ व्या शतकात प्रसिध्द असलेल्या सिंदा नावाच्या मांडलिक राजघराण्याचा अवशेष म्हणून विजापूर जिल्ह्यातील १८ व्या शतकाच्या शेवटी जे सुरापूर नावाचे संस्थान होते, त्यातील जहागिरदार होते.  हे फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए.ची परीक्षा १८९८त पास झाले आणि विलायतेहून ऑक्सफर्ड विद्यालयातील आपला धर्म आणि समाजशास्त्राचा अभ्यास संपवून १९०३ साली सप्टेंबर महिन्यात स्वदेशी परत आल्यावर 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' अथवा 'भारतीय निराश्रित साह्याकारी मंडळी' च्या स्थापनेस लागले.  लगेच १९०३ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ह्यांनी बडोद्यातील कामाची प्रगती महाराजांच्या आदेशावरून पाहून रिपोर्ट आणि सूचना केल्या.  पुढे तीन वर्षे मुंबई प्रार्थनासमाजाच्या प्रचारकाच्या कामानिमित्त ह्यांनी सर्व हिंदुस्थानात प्रवास केला.  तेव्हा, विशेषतः प्रांतोप्रांतीच्या अस्पृश्य, गुन्हेगार आणि जंगली जातींची स्थिती समक्ष पाहिली.  १९०५ पासून हिंदुस्थानातील सेन्सस रिपोर्टावरून ह्या लोकांच्या संख्येची वट्ट अजमावणी करून लेखांच्या व व्याख्यानांच्या द्वारे आपले अनुभव आणि सूचना ते प्रसिध्द करू लागले.  प्रार्थनासमाजाचे अध्यक्ष सर नारायणराव चंदावरकर आणि उपाध्यक्ष्या शेठ दामोदरदास सुखडवाला यांनी आपल्या वजनाच्या आणि द्रव्याच्या द्वारे साह्य केल्यावर मुंबई येथे तारीख १८ ऑक्टोबर १९०६ कार्तिक शुध्द प्रतिपदेच्या सुमुहूर्तावर सकाळी १० वाजता मंडळीची स्थापना परळ येथे पहिली शाळा उघडून केली.  पुढे १९०७ पासून १९१२ अखेर काँग्रेसच्या सभा अनुक्रमे सुरत, मद्रास, कलकत्ता, लाहोर, बांकीपूर आणि कराची येथे झाल्या.  त्या वेळी अस्पृश्यतानिवारणार्थ लोकमत तयार करण्याकरिता त्या त्या सर्व ठिकाणी रा. शिंदे ह्यांनी त्याविषयी स्वतंत्र परिषदा भरविल्या आणि शक्य त्या ठिकाणी स्थानिक मदत घेऊन आपल्या मिशनच्या स्वतंत्र शाखाही उघडल्या.  मात्र प्रत्यक्ष कार्य; उत्तर हिंदुस्थानात आर्यसमाजाने व बंगाल्यात ब्राह्मसमाजाने आपल्या अंगावर घेतल्यामुळे संस्थेशी पुढे ह्या कामाचा प्रत्यक्ष संबंध उरला नाही.  पण दक्षिणेत व पश्चिमेकडे मुंबई इलाख्यातील मूळसंस्था ही कोणत्याही समाजात आपले कार्य स्वतंत्र चालवून मुंबईतील मध्यवर्ती कमिटीच्या विद्यमाने ठिकठिकाणी प्रांतिक शाखा व जिल्ह्याच्या ठिकाणी तिच्या पोटशाखा उघडण्यात आल्या.  १९१२ पर्यंत साधारणपणे घटनेची रूपरेखा करण्यात आली.  पैशांच्या व स्थानिक मंडळीच्या कळकळीच्या मानाने ठिकठिकाणच्या कामात विषमता राहिली; आणि पुढे तर मद्रास इलाख्यातील ठाणी मूळ संस्थेपासून स्वतंत्रही झाली.  हल्ली ह्या भारतीय मिशनच्या मूळ मध्यवर्ती कमिटीच्या ताब्यात खालील पाच मुख्य शाखा तिच्या देखरेखीखाली चालू आहेत.  त्यांचा प्रत्यक्ष कारभार स्थानिक कमिटया चालवीत आहेत.  मुंबई शाखा (परळ), महाराष्ट्र (पुणे, भोकरवाडी), कर्नाटक शाखा (हुबळी), मध्यप्रांत वऱ्हाड शाखा (नागपूर, पाचपावली), तामील शाखा (बंगळूर कँटोनमेंट) ह्यांची कामे व रिपोर्ट वेळोवेळी प्रसिध्द होत असतात.  ह्या मिशनच्या कार्याला आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे व ह्याचे व्यवस्थित कार्य सर्व हिंदुस्थानभर चालू झाले आहे.  जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांनी राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता येथील अधिवेशनाच्या अध्यक्ष डॉ. बेझंटबाई यांना निकडीचे पत्र पाठवून त्यांच्या मान्यतेचा ठराव पास झाल्यावर पुढे नागपूरच्या सभेत महात्माजींनी अस्पृश्यांचा प्रश्न नॉन को-ऑपरेशनच्या मुख्य ठरावात ठेवून दिला.  त्या वेळी सबजेक्ट्स कमिटीत रा. शिंदे होते.  त्यांनी अस्पृश्योध्दाराचा प्रश्न नॉन को-ऑपरेशनच्या चळवळीपासून काँग्रेसमध्येच पण स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला.  पुढे गोदरेज नावाच्या उदार पार्शी गृहस्थाने दीड लाख रुपयांची देणगी अस्पृश्यतानिवारणाच्या खास कामाकरता काँग्रेसला दिली. तिच्या मदतीने ठिकठिकाणच्या प्रांतिक व जिल्ह्याच्या कमिटीच्या द्वारा प्रयत्न चालू आहेत.  विशेषतः चरखे चालविणे व ह्या लोकांचा पाठिंबा राष्ट्रीय सभेस मिळविणे; ह्या शिवाय अस्पृश्यतानिवारणाच्या प्रत्यक्ष कामाला काय मदत होत आहे, हे कळत नाही.

कामाची दिशा :  येथवर डिप्रेस्ड क्लास मिशनच्या स्थापनेच्या पूर्वीच्या चळवळी आणि डी. सी. मिशनची प्रत्यक्ष स्थापना ह्या संबंधी माहिती सांगितली.  पूर्वीच्या कामाची मुख्य दिशा शिक्षणाचा प्रसार करून तद्वारा ह्या वर्गाची उन्नती करण्याची सोय एवळीच होती. पण ह्या मिशनची दिशा अथवा उद्देश मुख्यतः अस्पृश्यतेचे निवारण हेच असून त्याप्रीत्यर्थ ह्या वर्गात शिक्षणाचा प्रसार, स्वाभाविक आणि वैयक्तिक सुधारणा, उदार हिंदू धर्मतत्त्वांचा प्रचार, औद्योगिक उन्नती, राजकीय हक्कांची योग्य जाणीव, इत्यादी वेळोवेळी सुचतील ते सर्व उपाय करून पाहण्याचा आहे.  येणेप्रमाणे मिशनचा पाया खोल आणि पध्दतशीर घातला गेल्याने आणि त्याचा प्रत्यक्ष कार्याचा प्रचार सर्व देशभर संस्थांच्या रूपाने विस्तार झाल्याने त्याला लवकरच सरकार, परोपकारी मंडळया आणि शेवटी राष्ट्रीय सभेचीही मान्यता आणि सहकार्य मिळू लागले. इतकेच नव्हे, तर जुन्या व नव्या विचारांच्या सर्वच लहानथोरांची अस्पृश्यतानिवारण हे एक राष्ट्राचे आणि स्वराज्य संपादण्याचे आद्य व आवश्यक कर्तव्य आहे, अशी जाणीव होऊ लागली.  ह्या स्थूल दृष्टीने मिशनच्या कार्याला यश आले असे म्हणता येईल.  पण तपशिलात अद्यापि यश येण्याला बरेच झगडावे लागेल.  शाळांतून, पाणवठयांवर हिंदूंच्या देवळांतून ह्या निराधार लोकांना मोकळी वाट मिळण्यासाठी काँग्रेस, कॉन्सिले, म्युनिसिपालिटया, हिंदुसमाज, धर्मपरिषदा आणि एतद्देशीय संस्थाने ह्यांनी हल्लीपेक्षा जास्त आणि कळकळीचे प्रयत्न करावयाला पाहिजे आहेत.

मिशनचा विकास  :  वरील प्रयत्न व्हावेत म्हणून मिशननेही आपल्या कार्याचा प्रसार आणि पध्दती वेळोवेळी कालानुसार बदललेली आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.  इ.स. १९१२ सालच्या ऑक्टोबर महिन्याच्या ता. ५ ते ७ रोजी पुणे येथे सर डॉ. भांडारकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या मिशनने जी पहिली मोठी अस्पृश्यता निवारण परिषद भरवली, तिच्यात मोठमोठे प्रांतिक पुढारीच नव्हते तर डॉ. कुर्तकोटीसारखे जुन्या विचाराचे गृहस्थ आणि इचलकरंजी सांानाधिपतींसारखे ब्राह्मण रजवाडे ह्यांनीही सहानुभूतीने भाग घेतला; सर्व जातींच्या, धर्मांच्या लोकांनी फंडास मदत केली आणि तरुणांनी तीन दिवस जिवापाड स्वयंसेवा केली.  महार, मांग, चांभार, ढोर, भंगी, ब्राह्मण, मद्रासी, ब्राह्मो, ख्रिस्ती, मुसलमान अशा १० समाजाचे मुंबई इलाख्यातून बाहेरच्याही निरनिराळया १७ जिल्ह्यांतील ५४ गावांतून २३० डेलीगेट्स अथवा प्रतिनिधींनी परिषदेत भाग घेतला.  जे मुख्य सहभोजन झाले, त्यात सुमारे ३५० 'अस्पृश्य'वर्गाचे आणि ५० निरनिराळे ब्राह्मणादी 'वरिष्ठ वर्गाचे पाहुणे एकाच पंक्तीस होते.  जनरल सेक्रेटरी रा. शिंदे ह्यांनी आपल्या मुख्य भाषणात तेव्हा मिशनच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली असलेल्या संस्थांचा गोषवारा सांगितला; तो परिषदेच्या रिपोर्टात असा नमूद केला आहे :  मुंबई, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजराथ, खानदेश, कोकण, कानडा, मद्रास वगैरे भागांतील - ''एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा ५५ शिक्षक, २,१०० मुले ५ वसतिगृहे इतर १२ संस्था आणि ५ आजन्म वाहून घेतलेले प्रचारक असून एकंदर वार्षिक खर्च २४,४८५ रुपये आहे.''  याशिवाय बंगाल्यात ब्राह्मसमाजाने चालविलेल्या संस्थांशी अप्रत्यक्ष संबंध होता, तो निराळा.

ह्यानंतर सुमारे ६ वर्षांनी म्हणजे ता. २३-२४ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे श्रीमंत सर सयाजीमहाराज गायकवाड ह्यांच्या अध्यक्षतेखाली मिशनची दुसरी म्हणजे अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारण परिषद भरली.  त्या वेळी लो. टिळक, मिसेस बेझंट, महात्मा गांधी, सर नारायणराव चंदावरकर, नामदार परांजपे वगैरे मंडळींनी भाग घेतला होता.  प्रेक्षकसमूह तर रोज सांजसकाळ ५ पासून ७ हजारांपर्यंत लोटत होता.  मुख्य काम, अस्पृश्यता प्रत्यक्ष जातीने मोडू असा व्यक्तीविषयक प्रतिज्ञेचा एक राष्ट्रीय जाहीरनामा काढून त्यावर निरनिराळया गावांतील व हिंदू जातींतील ३८० प्रमुख पुढाऱ्यांच्या दस्तुरखुद्दच्या सह्या मिळविण्यात येऊन जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला.  पण खेदाची गोष्ट ही की, लो. टिळकांनी आपल्या काही अनुयायांच्या भिडेला बळी पडून आपली सही देण्याचे नाकारले.  तथापि, ह्या परिषदेत स्वतः लोकमान्यांनी ठराव मांडला की, राष्ट्रीय सभेनेच हा प्रश्न आपल्या हाती घ्यावा.  त्यामुळे थोडा तरी परिणाम झाला आणि त्याच वर्षी कलकत्त्यास काँग्रेस भरली असता मिसेस बेझंट ह्या अध्यक्ष असल्यामुळे रा. शिंदे ह्यांच्या आग्रहावरून त्यांना अस्पृ।यतानिवारण्याचा ठराव काँग्रेसच्या कार्यक्रमात घेऊन पास करता आला.  १९२० साली नागपूरच्या काँग्रेसमध्ये महात्मा गांधीनी ह्या विषयास सर्वमान्यता देण्याचे श्रेय घेतले.

अस्पृश्यवर्गातील जाणीव  :  ह्याप्रमाणे मिशनचया परिषदांचा परिणाम घडला तरी प्रत्यक्ष ह्या वर्गातच जाणीव झाल्याशिवाय कार्यभाग होणार नाही, अशी रा. शिंदे यांची खात्री होती.  म्हणून राष्ट्रीय सभेचे लक्ष्य अस्पृश्यवर्गाकडे ओढण्याची अधिक जोराची चळवळ केली.  ती विशेष ध्यानात घेण्यासारखी आहे.  पण ह्या प्रयत्नात रा. शिंदे ह्यांना मुळीच यश न मिळता उलट अस्पृश्यवर्गाचा जोराचा विरोध सहन करावा लागला.  तथापि त्यामुळे अस्पृश्यवर्गाच्या पुढाऱ्यांत काही अंशी एक प्रकारची जागृती झाली, हा एक फायदाच समजावयाचा.

राजकीय चळवळ  :  लखनौच्या काँग्रेसमध्ये हिंदी राज्यसुधारणेची ऊर्फ स्वराज्यसंपादनाची चळवळ प्रथम हिंदी-मॉस्लेम-स्कीम पास होऊन सुरू झाली.  तिला हिंदुस्थानातही सर्व जातींचा पाठिंबा पाहिजे होता.  ह्या योजनेला सर्व ब्राह्मणतेरांचा - विशेषतः अस्पृश्यवर्गाचा - पाठिंबा मिळवून देण्यासाठी रा. शिंदे यांनी जिवापाड मेहनत केली.  सन १९१७ च्या नवंबर महिन्यात पुणे येथे रा. शिंद्यांनी जो 'मराठी राष्ट्रीय संघ' म्हणून स्थापिला, त्याचा उद्देश केवळ मराठयांतच राष्ट्रीय निष्ठा उत्पन्न करण्याचा नसून अस्पृश्यादी सर्वच मागासलेल्या जातींमध्ये स्वराज्याची नवीन उत्कंठा पसरविण्याचा जास्त होता.  म्हणून गुरुवार दिनांक ८ नवंबर १९१७ रोजी सायंकाळी रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे शनिवारवाडयासमोर जी निरनिराळया जातींच्या ८,००० पुणेकर लोकांची प्रचंड जाहीर सभा भरली होती, तिच्यात अस्पृश्यवर्गाच्याही महार, मांग, चांभार वगैरे जातींच्या दोन-दोन प्रतिनिधींनी लखनौ हिंदी-मॉस्लेम-स्कीमला इतरांबरोबर पाठिंबा दिला होता, इतकेच नव्हे, तर त्याच दिवशी मुंबईसही खास अस्पृश्यवर्गाची एक जंगी जाहीर सभा सर नारायणराव चंदावरकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली रा. शिंदे यांच्या प्रयत्नाने भरविण्यात आली.  स्वराज्याप्रीत्यर्थ ठराव पास करण्यात आले. पण कदाचित ही चळवळ सरकारास आवडणारी नसल्यामुळे म्हणा; किंवा त्याच वेळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर ही चळवळ दुसऱ्या बाजूने सुरू झाल्यामुळे म्हणा पुढील पाच वर्षात अस्पृश्यवर्गातील काही पुढाऱ्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध रा. शिंदे ह्यांना सहन करावा लागला.  सर्व ब्राह्मणेतर समाजात अप्रिय व्हावे लागले.  तरी त्यांनी आपली चिकाटी सोडली नाही.

माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा :  पुढे लवकरच हिंदी राज्यसुधारणेचा पहिला हप्ता कसा द्यावा, हे ठरविण्यासाठी साउथबरो कमिटी हिंदुस्थानात आली.  तिच्यापुढे रा. शिंदे ह्यांची महत्त्वाची साक्ष झाली.  तिच्यात त्यांनी मुंबई इलाख्याच्या कायदेकौन्सिलात अस्पृश्यांसाठी त्यांच्या संख्येच्या मानाने नऊ जागा मागितल्या.  तरी शेवटी एकच मिळाली.  म्हणून त्यांची निराशा झाली.

एतद्देशीय संस्थानिकांची सहानुभूती  :  म्हैसूर  :  डी. सी. मिशन निघण्यापूर्वीपासूनच बडोद्याच्या श्रीमंत गायकवाड महाराजांनी पुढाकार घेऊन ह्या बाबतीत कसे स्तुत्य उदाहरण घालून दिले, हे वर सांगितले आहे.  इ.स. १९१२ चे सुमारास इंदूरचे सर सवाई तुकोजी महाराज होळकर ह्यांनी रा. शिंदे ह्यांना मुद्दाम बोलावून नेऊन त्यांनी केलेल्या पुणे येथील इमारतीच्या योजनेप्रीत्यर्थ वीस हजार (२०,०००) रुपयांची उदार देणगी दिली.  संस्थानातूनही अस्पृश्यवर्गाच्या शिक्षणासाठी मदत व इतरही बऱ्याच सवलती देण्यात येत आहेत.  विशेषतः म्हैसूरच्या मुख्य विद्याधिकाऱ्याच्या जागी मिस्टर रामलिंग रेड्डी हे प्रागतिक आणि हुशार गृहस्थ असताना ह्या प्रश्नाची बरीच प्रगती झाली.  अस्पृश्यवर्गाच्या दोन परिषदा झाल्या.  संस्थानाच्या शाळांतून इतर 'स्पृश्य' वर्गाच्या मुलांबरोबरच 'अस्पृश्य' मुलांना बसविण्यात यावे असे कडक हुकूम सुटले.  ह्या सुधारणेस श्री. शंकराचार्यांकडून विरोध होऊ लागला तरी धोरणात माघार घेण्यात आली नाही.  म्हैसूर येथे 'अस्पृश्यां'साठी सुमारे ५० विद्यार्थ्यांचे नमुनेदार फुकट वसतिगृह आहे.  तेथे उत्तम प्रकारचे औद्योगिक उच्च शिक्षण दिले जाते.  याशिवाय दुय्यम व उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप्सची चांगली योजना आहे.  इतर सुधारणांकरिता खटपट 'सिव्हील ऍण्ड सोशन प्रोग्रेस असोसिएशन'च्या साहाय्याने चालविण्यात आली आहे.  तिचे अध्यक्ष स्वतः महाराजांचे बंधू हिज हायनेस युवराज सर क्रांतिराव नरसिंहराज वोडियार बहादूर हे आहेत.  शिवाय लोकांनी आपल्याच बळावर 'हिंदू डिप्रेस्ड क्लासेस मिशन' नावाची एक निराळी संस्था काढली आहे.  तिच्या कित्येक वाङमय व औद्योगिक शाळा रा. शिंदे यांनी चांगल्या स्थितीत पाहिल्या.  तूर्त याच मंडळींकडे त्यांनी आपल्या भारतीय नि. सा. मंडळींची बंगळूर येथील शाखा सोपवून दिली आहे.  

त्रावणकोर  :  शिक्षणासंबंधी या संस्थानाची फार प्रसिध्दी आहे.  पण अस्पृश्यांच्या बाबतींत सबंध मलबार अथवा केरळ देशात फार शोचनीय स्थिती आहे.  तथापि, कित्येक सार्वजनिक रस्त्याने फिरण्याचीदेखील मोकळीक पुलया, चिरुमा, परय्या, नायाडी वगैरे 'अस्पृश्य' जातींना नाही.  पुष्कळ वेळा मुख्य रस्त्यात फिरल्याबद्दल या गरीब जातींना वरिष्ठ हिंदूंकडून मार बसल्याची व कोर्टात खटले झाल्याबद्दलची रा. शिंद्यांनी स्वतःची ब्रिटिश हद्दीतील मॅजिस्ट्रेटकडून खात्री करून घेतली आहे.  आपल्या भारतीय मिशनकडून रा. शिंदे हे दरवर्षी पत्रे पाठवून मोठमोठया संस्थानिकांकडून माहिती मागवीत असत.  इतरांकरिता जातवार प्रतिनिधींच्या तत्त्वाच्या जरी ते उलट होते तरी अस्पृश्यांसाठी निराळे मतदारसंघ घडवून देणे अशक्य नसून त्या कामी मदत करण्याचेही त्यांनी वरील कमिटीस सांगितले होते.  त्या वेळी सरकारने पत्करिलेल्या धोरणाउलट त्यांनी जोराची टीका केली.  मध्यप्रांतात दोनच जागा आणि मद्रासेत ह्या वर्गाची प्रचंड संख्या असूनही पाचच जागा सरकारने दिल्या, म्हणून रा. शिंदे ह्यांनी बेंगलूर येथील आपल्या जाहीर भाषणातही नापसंती दर्शविली.

 
मिशनमध्ये अस्पृश्यांची भरती  :  येणेप्रमाणे काँग्रेसकडून नाउमेदीचा आणि सरकारकडून जवळजवळ निराशेचा अनुभव येऊ लागल्यामुळे प्रत्यक्ष आपल्या मिशनमध्ये तरी अस्पृश्यांनी अधिक जोराचा भाग घ्यावा असा रा. शिंद्यांनी प्रयत्न चालविला.  अस्पृश्यांची कामे सरकारकडून करून घेण्यासाठी १९२०त स्वतः कौन्सिलात जाण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.  पण एकीकडे काँग्रेसच्या असहकार्याचा प्रयत्न तर दुसरीकडून स्वतः अस्पृश्यांचाच विरोध ह्या कात्रीत सापडल्यामुळे राजकीय चळवळीत त्यांना म्हणण्यासारखे यश आले नाही.  तरी सामाजिक बाबतीत मिशनच्या परिषदांमुळे जे यश आले, ते वर सांगितले आहे.  महायुध्दाच्या कटकटीचा काल, राजकारणाच्या गुंतागुंती, भयंकर महागाई, मिशनच्या स्थानिक शाखांची सर्व कामे कर्ज होऊ न देता जोमात ठेवणे वगैरे कामास वाहून घेऊन काम करणाऱ्या माणसांचा तुटवडा, इत्यादी अनेक अडचणी येऊ लागल्या.  मदतीपेक्षा मिशनवर टीकेचाच भडिमार होऊ लागला.  अशा परिस्थितीत पुणे येथील इमारती उभारण्याचे काम उरकावे लागले.  १९२१ साली सप्टेंबरच्या ५ व्या तारखेस पुणे भोकरवाडी येथील मुख्य शाळागृहाची कोनशिला म्हैसूरचे युवराज एच. एच. सर कांतिराव नरसिंहराज वोडियार बहादूर ह्यांच्या हस्ते बसविण्यात आली.  त्या वेळी अस्पृश्यवर्गातील पुढाऱ्यांनी मिशनच्या कारभारात अधिकाधिक भाग घ्यावा अशी रा. शिंद्यांनी विनंती केली.  त्या पूर्वीही मिशनच्या काही शाखांचा कारभार 'अस्पृश्य'वर्गाच्या माणसांकडून चालविण्याचा उपक्रम चालू होता.  पुढे ठिकठिकाणच्या स्थानिक कमिटयांतून 'अस्पृश्यांचे' लायक सभासद घेण्यात आले.  १९२३ सालच्या मार्च अखेरीस रा. शिंद्यांन 'ज्ञानप्रकाश' (ता. २९-३-१९२३) आणि 'केसरी'तून (ता.३ एप्रिल १९२३) आपले स्पष्ट मत आणि सविस्तर निवेदन जाहीर केले.  त्यात अतःपर सर्वस्वी जबाबदारी' अस्पृश्य' वर्गांनी आपल्यावरच घ्यावी आणि आपण स्वतः केवळ सामान्य देखरेखीपलीकडे अंतर्व्यवस्थेची जबाबदारी आपल्याकडे ठेवणार नाही, असे म्हटले आहे.  त्याचा परिणाम त्या त्या संस्थानांतील शिक्षण खात्यांवर १९१४ सालापासून होऊ लागला आहे, असे दिसते.  पुढील तीन साली त्रावणकोर येथील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची खालीलप्रमाणे वाढ झाल्याचे त्या संस्थानच्या रिपोर्टात नमूद आहे.

अस्पृश्य वर्गांचे नाव विद्यार्थ्यांची संख्या सालावार दरवर्षी झालेली वाढ सालावार
  १९१४ १९१५ १९१६ १९१४ १९१५ १९१६
पुलया २०१७ ४२५६ ८४९४ ८२६ २२३९ ४२३८
परया १८१६ २६५२ ७१९ ८३६

तथापि, रस्त्यातून फिरण्याच्या हरकतीमुळे व वरचेवर दंगे व मारामाऱ्या अलीकडेदेखील ऐकिवात येत आहेत.  विशेष चमत्कारिक गोष्ट शिक्षणखात्याच्या रिपोर्टावरून दिसते ती अशी की, ब्रिटिश राज्यात ज्याप्रमाणे 'अस्पृश्यां'साठी आणि युरोपियनांसाठी शिक्षण खात्यामार्फत खास संस्था चालविण्यात येत असलेल्या या खात्याच्या रिपोर्टातून नमूद झाल्याचे उल्लेख आढळतात व त्याप्रमाणे त्रावणकोर शिक्षणखात्याच्या रिपोर्टात मलबार ब्राह्मणांकरिता एक खास शिक्षणखाते असल्याचे आढळते.  पण जी प्रगती अस्पृश्यांच्या शिक्षणात वर दाखविल्याप्रमाणे नमूद झालेली दिसते; तसा ब्राह्मणांसंबंधी उल्लेख नसून उलट ते खाते नीट न चालल्यामुळे शिक्षणखात्याला १९१६ साली मल्याळी ब्राह्मणांची एक खास परिषद भरवावी लागली.  आणि पुष्कळशा सवलती एक खास अधिकारी नेमून द्याव्या लागल्या, इत्यादी उल्लेख त्या वर्षांच्या रिपोर्टाचे पान ५१ वर आढळतो !  हे एक गूढच आहे म्हणावयाचे.

निजाम हैद्राबाद  :  ह्या संस्थानच्या शिक्षणखात्याच्या रिपोर्टात 'अस्पृश्य' ह्या नावाचा उल्लेख कोठे आढळत नाही.  पण १९११ सालच्या रिपोर्टात (पा. १४२) वर जी जातवारी दिली आहे, त्यात चक्कलन, चांभार, मादिग, महार, माल व मांग ह्या सहा 'अस्पृश्य' मानिलेल्या जातींचा उल्लेख असून त्यांची एकंदर लोकसंख्या ४,७९,१८५ इतकी दिली आहे.  संस्थान मुसलमानी असल्याने कदाचित दरबाराकडून 'अस्पृश्यता' मानली जात नसेल.  तरी काही खात्री सांगवत नाही.  'अस्पृश्य' वर्गातील जे लोक आपली आर्य किंवा ब्राह्मसमाजात गणना करून घेतात; त्यांना लष्करी व मुलकी खात्यात नोकऱ्या मिळण्यास फारशी अडचण पडत नाही, हे खरे.  सन १९१५ सालच्या सुमारास रा. शिंदे ह्यांनी हैद्राबादच्या ब्राह्मसमाजास भेट दिली व अस्पृश्यतानिवारणासंबंधी त्या शहरात जाहीर व्याख्याने दिली.  त्या वेळी तेथील ब्राह्मसमाजात बहुतेक मूळच्या तेलगू 'अस्पृश्य' वर्गाचाच भरणा त्यांना दिसला व त्यांचा सामाजिक दर्जा व सांपत्तिक स्थिती बरीच समाधानकारक दिसली.  सन १९११ सालच्या रिपोर्टात जरी अशा ब्राह्म-सभासदांची संख्या ३६च दिली आहे तरी रा. शिंदे यांनी आपल्या भेटीच्यावेळी पुष्कळच जास्त ब्राह्म आणि इतर उच्च दर्जाला पोचलेल्या लोकांना प्रत्यक्ष पाहिले.

कोल्हापूर  :  वरील संस्थानच्या मानाने हे संस्थान जरी विस्ताराने लहान आहे, तरी हिंदुपदपादशाही स्थापनकर्ते आद्य छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अस्सल क्षत्रिय वंशात जन्मलेले कै. श्री. शाहू छत्रपती हे सर्व मराठयांचे मुख्य पुढारी होते.  म्हणून सहानुभूतीचा व प्रत्यक्ष कृतीने केलेल्या पुरस्काराचा परिणाम महाराष्ट्रभर व विशेषतः मराठा जातीवर फार इष्ट घडला.  तरुणपणी महाराज जुन्याच विचारांचे होते, पण रा. शिंद्यांचा व त्यांचा बऱ्याच दिवसांचा परिचय असल्यामुळे विचारांचा हा जुनेपणा फार दिवस टिकणे शक्य नव्हते.  सन १९०७ सालीच डी.सी. मिशनची एक शाखा मिस क्लार्क विद्यार्थी वसतिगृहाच्या रूपाने कोल्हापुरास स्थापन झाली.  पुढे महाराजांची सहानुभूती ह्या मिशनकडे झपाटयाने वाढत चालली.  महायुध्दात विलायतेस जाऊन आल्यावर तर त्यांनी ह्याच विषयाचा ध्यास घेतला.  नागपूर येथील अखिल भारतीय 'अस्पृश्य' परिषदेचे ते अध्यक्ष होते.  ते दिल्ली येथील ह्या परिषदेच्या अधिवेशनात मुद्दाम हजर होते.  त्यांच्या राज्यातच नव्हे, तर त्यांच्या राजवाडयात अस्पृश्यांना सर्वत्र मुक्तद्वार असे.  राजरोस ते ह्यांना पंक्तीस घेऊन जेवीत.  सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांवर व सार्वजनिक स्थळी अस्पृश्यांना मज्जाव न करण्याचे स्वदस्तुरचे फर्मान त्यांनी स्वतः शिंद्यांना मोठया अभिमानाने दाखविले.  शेवटी खालील पत्र पाठवून त्यांना कोल्हापुरास बोलविले होते.

रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे यासी,

मी कोल्हापुरास असताना आपण एकदा येऊन जावे.  हल्ली कोल्हापूर म्युनिसिपालिटीचे चेअरमन हे अस्पृश्य जातीचे असून, म्युनिसिपालिटीत एक व्हटकर नावाचा क्लार्क तीस रुपये पगारावर अस्पृश्य जातीतील आहे.  कम्युनल रिप्रेझेंटेशन अस्पृश्यांना व ब्राह्मणेतरांना दिल्याने हा त्यांना चान्स मिळाला आहे.  सॅनिटेशनच्या पॉइंटवर आजवर ब्राह्मणांकडून अस्पृश्य मानिलेल्यांना जो त्रास होत असे तोही आता नाहीसा झाला आहे.  तेव्हा ही सर्व परिस्थिती आपण येऊन अवलोकन करून जाल अशी आशा आहे.  कळावे लोभाची वृध्दी व्हावी ही विनंती.  (सहीदस्तूरखुद्द शाहू छत्रपती.)

स्वतःच्या वाडयात छत्रपती शाहू महाराजांनी ५० अस्पृश्य विद्यार्थ्यांचे फुकट वसतिगृह आणि भोजनगृह काढले होते व केव्हा केव्हा ते स्वतःच शिकवीत, असे त्यांनी रा. शिंद्यांस सांगितले.  काही 'अस्पृश्य' सुशिक्षित तरुणांस वकिलीच्या सनदा मिळाल्या होत्या.  हत्तीवरील मुख्य माहुताचा मान महाराला दिला होता.  आपल्या राजवाडयातील खास विहिरीतील पाणी भरण्याची परवानगीही मांगाना दिली होती.  ह्या प्रकारे शिक्षणविषयक, सामाजिक व राजकीय इत्यादी सर्व सवलती महाराजांनी सढळ हातांनी दिल्या होत्या.  त्यामुळे त्यांच्या संस्थानात अस्पृश्यतेला बराच आळा बसला आहे.

उपसंहार  :  येणेप्रमाणे गेल्या ७० वर्षांत हिंदुस्थानातील अस्पृश्यतेच्या निवारणार्थ खास हिंदू लोकांकडून कोणते व कसे प्रयत्न झाले ह्यांचा संक्षिप्त गोषवारा देण्याचा प्रयत्न केला आहे.  ह्याशिवाय परधर्मीय मंडळींनी व ब्रिटिश सरकारांनी जे स्तुत्य प्रयत्न केले आहेत, त्याचे विस्तारभयास्तव वर्णन करता आले नाही.  किंबहुना तो प्रस्तुत विषयच नसल्यामुळे आम्हांस येथे अधिक विस्तार करता येत नाही.

परधर्मीय प्रयत्नांची दिशा ह्या वर्गास आपल्या कळपात ओढण्याची असणार हे साहजिकच आहे.  पण त्या प्रवृत्तीचा जेथे जेथे अतिरेक झाला तेथे तेथे त्याची प्रतिक्रिया बारीक निरखून पाहणाऱ्यास दिसण्यासारखी आहे.  ब्रिटिश सरकारकडून जे प्रयत्न झाले ते मात्र अधिक निरपेक्ष बुध्दीने झालेले दिसतात.  तरी पण सरकारच्या अगाध साधनसमुच्चयाच्या अपेक्षेने पाहता त्यांचे प्रयत्न अतिशय कमी आहेत.  इतकेच नव्हे, तर आलेली संधी सरकारांनी बरेच वेळा दवडली आहे.  उदाहरणार्थ, चालू राजकीय सुधारणेत 'अस्पृश्यांची' खडतर निराशा झाली आहे.  गेल्या महायुध्दात रणांगणावर 'अस्पृश्य' वर्गाची प्रतयक्ष व अप्रत्यक्ष रीतीची कामगिरी अतिशय नावाजण्यासारखी झाली असूनही युध्द संपल्याबरोबर महारांच्या १११ व्या पलटणीचे सरकारांनी महारांच्या निषेधाला न मानता विसर्जन केले, हे तर फारच वाईट झाले.  पोलीस आणि लष्कर खात्यांत योग्य प्रमाणात शिरकाव करून घेण्याचा ह्या वर्गाचा प्रयत्न निदान गेल्या वीस वर्षांत अविश्रांत चालू आहे व एका लायक महार गृहस्थाचा पोलीस सबइन्स्पेक्टरसारख्या लहानशा जागेसंबंधी अर्ज एका मोठयात मोठया युरोपियन अधिकाऱ्याच्या कळकळीच्या शिफारशीने गेला असताही ती जागा मिळाली नाही, यात जरी काही आश्चर्य नसले, तरी उलट कौन्सिलातील प्रश्नास ह्या लोकांकडून अर्जच येत नसतात अशा अर्थाची जी उत्तरे मिळतात, तीच मात्र आश्चर्यकारक आहेत.  सरकारची अशी हयगय करणारी एक बाजू; तर दुसरी बाजू जी आज इतक्या उशिरा जागी झाली, तीही लवकरच हा प्रश्न उशाला ठेवून झोपी जाई अशी चिन्हे दिसत आहेत.  म्युनिसिपालिटयांपैकी पुढारी अशी जी पुण्याची म्युनिसिपालिटी तिने नुकतेच तिला सार्वजनिक पाठबळ असूनही 'अस्पृश्यांस' हौद मोकळे करण्याचे साफ नाकारिले.  त्यांत अशिक्षित व हजारो वर्षे चिरडलेले हे वर्ग त्यांची अशी पुनःपुनः सर्वांकडून निराशा आणि हिरमोड झाल्यामुळे त्यांचा तोल राखला जाणे दिवसेंदिवस अशक्य होऊ लागले आहे.  हिंदुधर्मावरील त्यांची निष्ठा जरी अढळ आहे, तरी हिंदी राष्ट्राच्या राजकीय महत्त्वाकांक्षांच्या उलट त्यांची कमान साहजिकच त्वेषाने चढत चालली आहे, हे महात्मा गांधींसारख्या म्होरक्यांच्या लक्षात आले तरी त्यांचया अनुयायांच्या लक्षात येत नाही, त्यात सर्व राष्ट्राला भयंकर धोका पोहचत आहे हे खास.

मोठमोठया शहरांतून अस्पृश्यता पुष्कळ कमी झाली आहे यात शंका नाही; तरी पण खेडयापाडयांतून, विशेषतः रेल्वेपासून लांब प्रदेशात, तिचे रामराज्य अद्यापि चालू आहे.  दक्षिण देशात विशेषतः नैर्ॠत्य किनाऱ्यावर आणि सर्व मलबारात ती अमानुष रीतीने पाळण्यात येत आहे.  स्वतंत्र जमिनी वाहणे किंवा इतर धंदे करणे यास, किंबहुना सार्वजनिक रस्त्याने बिनधोक फिरण्याचीही सक्त मनाई आहे.  फार तर काय, एक समंजस श्रीमंत जमीनदार रा. शिंद्यांपुढे आपल्या मालकीच्या जमिनीवरच्या शेकडो पिढीजाद गुलाम मुलांना केवळ घोडयाबैलांप्रमाणे दुसऱ्यांकडे कामाला लावून त्यांचे वेतन तो बिनदिक्कत आणि हक्काने घेत होता.  जमिनीबरोबर कुळेही जणू विकली जातात.  जुलुमाला कंटाळून कोणी मजूर नव्या मालकाकडून जुन्याकडे पळून गेल्यास नव्याची जुन्या मालकाविरुध्द फिर्याद कायदेशीर कोर्टात चालू शकते.  मग गुलामगिरी ह्याहून निराळी ती कोणती ?

 
अंत्यज अथवा पंचम वर्गाच्या काही मुख्य जातींची सर्व हिंदुस्थानातील एकूण संख्या पुढीलप्रमाणे :  (शिरगणती : साल १९०१)
तक्ता (PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
 


वरील आकडे सन १९०१ च्या इंपीरियल सेन्सस रिपोर्टातून घेतले होते.  त्या नंतरच्या दोन खानेसुमारीच्या रिपोर्टातून अस्पृश्यांची प्रांतवार गणती दाखविण्याची पध्दत बदलल्यामुळे तुलना करणे कठीण पडले.  तरी एकूण संख्येत म्हणण्यासारखा फरक पडेल असे वाटत नाही.  वर मुख्य १८ अस्पृश्यवर्गांतील नावे दिली आहेत.  त्याशिवाय निरनिराळया प्रांतांत खालील व इतर बरीच नावे आढळतात.

१९ पुलिया, २० चिरुमा, २१ नायाडी, २२ ढोर, २३ पल्ल, २४ हारी, २५ कोरी, २६ रहार, २७ सरेरा, २८ मेघवाळ, २९ मेघ, ३० धेड, ३१ गंड इ.इ.

गुन्हेगारी जाती  :  मांग, रामोशी, मांग गारुडी, बेरड वगैरे कित्येक 'अस्पृश्य' किंवा 'अस्पृश्यवजा' मानिलेल्या जातींची गणना सरकारदृष्टया गुन्हेगार जातीत होत आहे.  ह्या बाबतीत डी.सी. मिशनच्या पुणे शाखेकडून १९१४ साली जे प्रयत्न झाले, त्यांचा अहवाल मिशनच्या त्या वर्षाच्या ८ व्या वार्षिक रिपोर्टात पान १७-२६ वर नमूद आहे.  सातारा जिल्ह्यात सुमारे एक हजार एकर पडिक जमीन मुंबई सरकारने देऊ केली होती.  रा. शिंदे आणि पुणे शाखेचे तेव्हाचे अध्यक्ष डॉ. मॅन ह्या दोघांनी सातारा जिल्ह्यात जमिनीचा एक सोयीचा भाग निवडून काढण्यासाठी दौरा केला.  रा. शिंद्यांनी तर त्या उद्देशाने सातारा जिल्ह्यातील बहुतेक खेडयांतून जवळजवळ १००० मैल प्रवास करून गुन्हेगार गणलेल्या मांग लोकांची स्थिती पाहिली व जमिनी तपासल्या.  शेवटी २०,००० रुपये खर्चाची एक योजनाही तयार केली होती.  पण महायुध्दामुळे एवढी रक्कम जमा करणे झाले नाही व शेवटी जमिनीही युध्दात कामगिरी केलेल्या लोकांना देण्यात येऊ लागल्या.  म्हणूनही या महत्त्वाच्या योजनेत यश आले नाही.  पण सरकारमार्फत विजापूर, हुबळी, वगैरे ठिकाणी गुन्हेगार जातीसाठी खास वसाहती स्थापण्यात येत आहेत व त्यामुळे ह्या जातीच्या गुन्हेगारीला आळा बसत चालला आहे.  तथापि, गुन्हेगारीच्या सबबीवरून अद्यापि बऱ्याच ठिकाणी त्या जातीवर जो पोलिसांकडून हजेरीचा दाखला लावण्यात आला आहे, त्यासंबंधी मात्र तक्रारी मिशनकडे येत आहेत.  त्यांचा विचार सरकारकडून लवकर झाला पाहिजे.