राजकारण

प्रकरण अकरावे

ह्या पुस्तकाची मागील १० प्रकरणे १९३२ सालच्या ऑगस्ट महिन्यातच तयार करून छापखान्याकडे पाठविण्यात आली होती.  अलीकडे दोन चार वर्षांत अस्पृश्यांच्या राजकारणाला अगदी चुरशीचे स्वरूप आल्यामुळे, विशेषतः महात्मा गांधींच्या १९३२ सालच्या सप्टेंबर महिन्यातील उपोषणामुळे, हे प्रकरण लिहिण्याचे लांबणीवर टाकून काही काळ वाट पहावी लागली.  पुढे पुण्याचा करार झाला.  चालू (१९३३) सालच्या मे महिन्यात महात्माजींनी पुनः २१ दिवस उपोषण केले.  आता ह्यापुढे हे पुस्तक ताबडतोब प्रसिध्द झाले पाहिजे; म्हणून हे प्रकरण लिहून संपविले आहे.

अस्पृश्यांचे राजकारण किंवा त्याच्यासंबंधी स्पृश्यांचे राजकारण म्हणजे काही नुसती आजकालची धामधूम आहे अशातला मुळीच अर्थ नव्हे.  हे राजकारण अस्पृश्यतेइतकेच पुरातन आहे, असे म्हणण्यात मुळीच अतिशयोक्ती होणार नाही.  माझी तर स्वतःची अशी खात्री होऊन चुकली आहे की, हिंदूंतील अस्पृश्यता म्हणजे त्यांच्या दूषित राजकारणाचा एक मासला होय.  पहिल्या प्रकरणात केलेल्या व्याख्येप्रमाणे अस्पृश्यतेचे संघटित स्वरूप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी विकासच होय.  ह्या विकासाची पोलादी चौकट मागे केव्हा एकदा जी घडविली गेली, ती आजवर जशीच्या तशीच जवळ जवळ शाबूत आहे.  म्हणून घडविणारांच्या दृष्टीने हिला यशस्वी म्हटले आहे.  कालांतराने मूळ चार वर्णांच्या पुढे हजारो जाती-पोटजाती झाल्या, कालमहात्म्याने त्यांचे आपासांत स्थलांतर व रूपांतरही झाले.  पण ह्या चौकटीबाहेरील अस्पृश्यांवर प्रत्यक्ष काळाच्या हातूनही काही अनुकूल परिणाम घडविता आले नाहीत.  उलट, वहिवाटीच्या दाबाखाली जणू काय ते कायमचेच दडपले गेले आहेत असे दिसते.  'सवय म्हणजे प्रतिसृष्टीच' ही म्हण सार्थ झाली आहे.

ह्या प्राचीन राजकारणाचा खडान्खडा इतिहास उपलब्ध नाही, हे खरे आहे.  त्या काळचा प्रत्यक्ष जेत्यांचाच इतिहास उपलब्ध नाही, तेथे जितांचा कोठून असेल ?  ज्यांचे सर्वस्व गेले, त्या जितांचा इतिहास तरी कसा उरणार ?  असा कोण जेता आहे की, जो आपल्या कृतकर्माची कथा जशीच्या तशीच लिहून ठेवील ?  आणि स्वतःचा इतिहास लिहिण्याची अक्कल आणि करामत असती तर हे बिचारे आजचे अस्पृश्य; जित तरी का झाले असते ?  ह्या प्रकरणी इतिहास मागणे म्हणजे 'बाप दाखीव नाही तर श्राध्द कर' म्हणण्याप्रमाणेच आहे.  बिचारे बाप कोठून दाखवतील ?  मुकाटयाने श्राध्द करीत आहेत, झाले !  तथापि अगदी तपशीलवार इतिहास नाही, तरी त्याचे दिग्दर्शन काही अंशी मागील प्रकरणांतून आलेलेच आहे.  त्यावरूनही ज्यांना अंदाज करण्याची इच्छा होत नाही, त्यांच्यापुढे समग्र इतिहास आणून ठेविला, म्हणून तरी काय लाभणार आहे ?  

ह्या इतिहासाची पुनरावृत्ती जगात वेळोवेळी पुष्कळदा झाली आहे.  गेल्या पाच शतकांत अमेरिका खंडात ती झाली आहे व हल्ली आफ्रिकेत, ऑस्ट्रेलियात वगैरे चालली आहे.  युरोपातून सुधारलेली म्हणविणारी अनेक राष्ट्रे उत्तर व दक्षिण अमेरिकेत जाऊन तेथील मूळ रहिवाश्यांचा हळूहळू नाश करून किंवा त्यांना दूर घालवून देऊन त्यांच्या जमिनीवर आता आपले ठाण मांडून बसली आहेत.  प्राचीन भारतवर्षात बाहेरून अशीच अनेक राष्ट्रे वेळोवेळी आली.  त्यांनी एतद्देशीयांचा नाश केला, त्यांच्यापैकी कित्येकांना घालवून दिले व कित्येकांना आपल्या दास्यात ठेविले.  अमेरिकेतील अत्याचारांचा इतिहास उपलब्ध आहे व तो प्रसिध्दही होत आहे.  येथला होण्याची आशा नाही.  हाच काय तो फरक.  अमेरिका हे नावही जेत्यांनी आपले दिले तसेच भारत हे नावही जेत्यांचेच आहे.  अमेरिकेतील मूळ एतद्देशीयांचा नायनाट झाला आणि जे अगदी थोडे उरले ते उपऱ्या जेत्यांच्या खिदमतीला खुशी अगर लायक नव्हते, म्हणून नवीन वसाहत करणाऱ्यांना आपल्या काबाडकष्टासाठी इतर खंडांतून जबरीने दासांना धरून आणावे लागले.  हिंदुस्थानात वसाहत करणारांची गरज येथल्या येथेच भागली.  पण जोरजबरीचा मामला दोहोकडे सारखाच आहे.  अमेरिकेतील प्रकार निष्ठुर होता आणि येथला फार कनवाळूपणाचा होता असे भासविण्याचा प्रयत्न वेळोवेळी आमच्यातले काही इतिहासकार करतात, तो एक नुसता कोडगेपणाचा मामला आहे.  ह्यापेक्षा अधिक काही म्हणवत नाही.  गेल्या दहा प्रकरणांत, मलबारात नंबुद्री आणि नायर जातींच्या जमीनदारांनी आज हजारो वर्षे तेथील चेरुमा, पुलया वगैरे अस्पृश्य जातींना किती घोर अवस्थेत आपल्या मालकीच्या अगर खंडाच्या शेतांवर गुरांप्रमाणे राबविले आहे, ह्याचा उल्लेख आलाच आहे.  त्यावरून, ज्या ज्या काळी अशा क्रांत्या घडून आल्या, त्या त्या काळच्या राजकारणाचे उग्र स्वरूप दिसून येणार आहे.

जगातील राजकारणाचे मुख्य लक्षण म्हणजे बलिष्ठाने दुबळयावर सत्ता चालविणे; हे आजकालच्या सुधारलेल्या काळातही खरेच आहे.  ही सत्ता एकदा आपल्या हाती आल्यावर नामोहरम झालेल्या जातींनी अथवा राष्ट्रांनी पुनः आपले डोके वर काढू नये म्हणून त्यांचा राजकीयच नव्हे; तर सामाजिक दर्जाही खाली दडपून बेपत्ता करण्यासाठी, सामुदायिक अस्पृश्यता हे प्राचीन राजकारणातील एक थोर साधन आहे व हे साधन हिंदुस्थान व सरहद्दीवरील देशांत मध्ययुगातही उपयोगात आणले गेले.  ह्याचा पुरावा ब्रह्मदेशाचा जो मिळतो, त्याचे वर्णन सहाव्या प्रकरणात केलेच आहे.  इतकेच नव्हे, तर बौध्द धर्मातून हिंदू धर्मात, बंगाल व मद्रासकडे परत क्रांती झाली तेव्हा, ज्या पाखंडी समजलेल्या जमाती हिंदू शासनाखाली सहजासहजी आल्या नाहीत, त्यांना हिंदू धर्माधिकाऱ्यांच्या कारवाईला बळी पडावे लागले.  तत्कालीन हिंदू राजांनी अशा स्पृश्य जमातींना एकजात अस्पृश्य आणि बहिष्कृत कसे ठरविले, ते पाचव्या प्रकरणात सांगण्यात आले आहे.  ह्यावरून प्राचीन राजकारणाचा हा तोडगा, ह्या देशात अगदी मध्ययुगाच्या अंतापर्यंत बिनदिक्कत चालविण्यात आला आहे हे दिसून येत आहे.  आता आपण ह्या वर्णद्वेषाच्या पायावर उभारलेल्या राजकारणाच्या टप्प्याचे कालानुक्रमे पुरावे म्हणून वाङमयातून काही उतारे मिळाल्यास पाहू.


वैदिक काळातील कटकट

ॠग्वेदकालीन आर्यांची शासनपध्दती कशी होती ह्यासंबंधी कलकत्ता विद्यापीठातील एक अध्यापक प्रफुल्लचंद्र बसू यांनी  Indo Aryan Polity ह्या नावाचा इ.स. १९१९ साली इंग्रजीत एक प्रबंध प्रसिध्द केला आहे.  त्यातील सहावे प्रकरण,  Polity (राजव्यवस्था), मननीय आहे.  अर्थात ही आर्यांच्या किंवा आर्य म्हणविणाऱ्या जमातींशी मिळते घेऊन राहणाऱ्या आर्येतर जमातींपुरतीच होती, हे सांगावयास नको.  ह्या काळी आर्यांची समजली जाणारी व्यवस्था तीन वर्णांची, किंबहुना चार वर्णांची बनत चालली होती.  पण ह्या चातुरर््वण्याबाहेर ज्या आर्येतर जमाती हिंदुस्थानात पूर्वीच ठाण मांडून राहिलेल्या होत्या, ज्यांच्याशी आर्यांच्या लढाया होत, त्या जमाती सर्व आर्यांहून कमी संस्कृतीच्या होत्या असे मुळीच नव्हे.  उलट काही जमाती तर सर्व आर्यांहून पुष्कळ सुसंपन्न व सुसंघटित स्थितीत होत्या.  काही असो; ह्या दोन्ही दर्जांचे आर्येतर अस्पृश्य किंवा बहिष्कृत स्थितीत मुळीच नव्हते.  ते येथील मूळचे रहिवासी किंवा आर्यांच्या पूर्वी बाहेरून आलेले व येथे कायम वसाहत करून राहिलेले, पण भिन्न संस्कृतीचे होते.  मात्र त्यांच्याशी आर्यांचे संधिविग्रह होऊन (१) जे आर्यांशी समानबल किंवा अधिक सुसंपन्न होते ते आर्यांच्या तिन्ही वरिष्ठ वर्णांत गुणकर्मशः समाविष्ट झाले;  (२) जे किंचित कमी संस्कृतीचे होते ते आर्यांतील चवथा शूद्रवर्ण म्हणून त्यांच्यात मिसळले; ह्याशिवाय जो मोठा कमी अधिक संस्कृत वर्ग होता त्याचा आर्यांनी अगदी पाडाव केला  (३) तोच कालवशाने पुढे अस्पृश्यत्वाप्रत पोचला; आणि (४) जो कधी विशेष संस्कृत नव्हता, आणि ज्यांचा आर्यांशी संबंधच आला नाही, किंवा जे आर्यांच्या कटकटीला कंटाळून डोंगर, झाली, किनारा, बेटे वगैरेंचा आश्रय करून दूर राहिले, ते अद्यापि त्याच स्थितीत आहेत.  पण ह्या चारी प्रकारच्या आर्येतरांना वेदमंत्रांतून दस्यु अथवा दास, हे एकच सामुदायिक नाव आहे.  ह्याशिवाय कित्येक विशेषणवाचक नावे ॠग्वेदातून आढळतात, त्यांच्याशी आर्यांचा किती द्वेष होता व त्यांच्या एकमेकांशी कशा लढाया होत हे वर पहिल्या खंडातील दुसऱ्या प्रकरणाचे शेवटी ज्या ॠचा अवतीर्ण केल्या आहेत त्यावरून कळण्यासारखे आहे.

ह्या परजातीच्या द्वेषाचे एक मुख्य कारण, त्यांच्या धार्मिक भावना, उपासना व आचार भिन्न असत हे होय.  ह्यामुळे परकीयांना अब्रह्मा, अयज्यु, अश्रध्द, अक्रतु, अकर्म, अमानुष, अदेव्य, अशा अनेक शिव्या दिलेल्या वेदमंत्रांतून आढळतात.  ह्याच शिव्यांचा व द्वेषभावनांचा विकास पुढे ज्या काळी ह्या परकीयांचा पूर्ण पाडाव होऊन ते आर्यांच्या राजकीय व आर्थिक गुलामगिरीतून दडपून गेले, त्या काळी आताच्या अस्पृश्यतेत व बहिष्कारात झाला हे उघड आहे.

अच्छा कविं नृमणोगा अभिष्टौ स्वर्षाता मघवन् नाधमानम् ।
ऊतिभिस्तमिषणो दयुम्नहूतौ नि मायावानअब्रह्मा दस्युरर्त ॥

ॠग्वेदसंहिता, मं. ४ सू. १६ ॠ.९.

ह्यात मायावान् व अब्रह्मा म्हणजे 'जादूगार' व 'ब्रह्म म्हणजे स्तुती किंवा प्रार्थना न करणारा' अशी निंदा आहे.

न्यक्रतून् ग्रथिनो मूध्रवाचः पणीरँश्रध्दाँ अवृधाँ अयज्ञान् ।
प्र प्र तान् दस्यूँरग्निर्विवाय पूर्वश्चकारापराँ अयज्यून् ॥

ॠग्वेदसंहिता, ७.६.३.


ह्यात पणी नावाचे दस्यूंचे एक निराळेच राष्ट्र निर्दिष्ट झाले आहे.  मद्रासेकडील हल्लीचे पळळ नावाचे अस्पृश्य किंवा प्राचीन फिनिशयन यांच्याशी ह्यांचा संबंध येतो की काय, हा संशोधनीय विषय आहे.  अग्नीने त्यांचा अत्यंत नाश केला असा ह्या श्लोकाचा अर्थ आहे.

प्रान्यच्चक्रमवृहः सूर्यस्य कुत्सायान्यद्वरिवो यातवेऽकः
अनासो दस्यूँरमृणो वधेन नि दुर्योण अवृणङ् मृध्रवाचः ॥

ॠग्वेदसंहिता, ५.२९.१०.


ह्यात दस्यूंना अनास असे म्हटले आहे.  अनास = तोंड, भाषा नसलेले = म्लेंच्छ, असे सायणाचार्य म्हणतात.  अनास = नाक नसलेले = नकटे असे मॅक्स मूलर म्हणतात.

हे दस्यू किती तरी अधार्मिक, कुरूप व दुर्गुणी असले तरी त्यांच्याशी लढण्याची हीच तेवढी कारणे नसून ते संपत्तिमान, सुसंस्कृतिवान् आणि सुसंघटित होते आणि त्यांचया संपत्तीचा आर्यांना हेवा वाटत होता, हे दुसरे अधिक बलवत्तर कारण होते. दस्यू हे किल्ले बांधून शहरांत राहत असत.  आर्यापेक्षाही ते अधिक स्थाईक झालेले होते.

इंद्राग्नी नवतिं पुरो दासपत्नीरधूनुतम् ।  साकमेकेन कर्मणा ॥
ॠग्वेदसंहिता, ३.१२.६.

इंद्र व अग्नी ह्या दोघांनी दासांचया आधिपत्याखालील नव्याण्णव पुरे म्हणजे किल्ले एकदम पाडून टाकले.  असा ह्या मंत्राचा अर्थ आहे.

प्र ते वोचाम वीर्या या मन्दसान आरुजः ।  पुरो दासीरभीत्य ॥
ॠग्वेदसंहिता, ४.३२.१०.

मन्दसानः = सोम पिऊन माजलेला (इंद्र)
आरुज = (किल्ल्याचा) फडशा उडविला.

आभिः स्पृधो मिथतीररिषण्यन् अमित्रस्य व्यवथया मन्युमिन्द्र ।
आभिर्विश्वा अभियुजो विषूचीरार्याय विशोऽवतारीर्दासीः ॥
ॠग्वेदसंहिता, ६.२५.२.

ह्या मंत्रात आर्यांभोवती दासांचा वेढा पडला आहे, किंवा आर्यांच्या वस्तीभोवताली दस्यूंच्या वसाहती आहेत, इंद्राने त्यांचा नाश करून आर्यांच्या सेनेचे रक्षण करावे, असा अर्थ आहे.

प्र ये गावो न भूर्णयस्त्वेषा अयासो अक्रमुः ।
हनन्तः कृष्णामपत्वचम् ॥
ॠग्वेदसंहिता, ९.४१.१.

कृष्ण नावाचा एक काळया रंगाचा असूर होता.  तो दहा हजार सेनेसह अंशुमती नदीचे काठापर्यंत चाल करून आला, त्याचा पराभव झाला, त्याच्या अंगाची कातडी सोलून काढली, वगैरे कथा आहे.  मं. १ सू. १३० ॠ. ८ पहा.

अमेरिकेतील हल्लीचा लिंचिंगचा असाच प्रकार आहे.


उत दासं कौलितरं बृहतः पर्वताधि ।  अवाहन्निन्द्र शाम्बरम् ॥
ॠग्वेदसंहिता, ४.३०.१४.

कुलितराचा मुलगा शंबर ह्याला इंग्राने मोठया पर्वताच्या खाली ओढून मारिले.

त्वं तदुक्थमिन्द्र बर्हणा कः प्र यच्छता सहस्त्रा शूर दर्षि ।
अव गिरेर्दासं शम्बरं हन् प्रावो दिवोदासं चित्राभिरूती ॥
ॠग्वेदसंहिता, ६.२६.५

हा शंबरासुर व दिवोदास (आर्य) ह्यांच्यामध्ये बरीच कटकट झालेली दिसते.  ह्या कटकटीला कंटाळून शंबर डोंगरी किल्ल्याचा आश्रय घेऊन राहिला.  हा शंबर वरील कृष्ण व इतर अनेक आर्येतर नायक सुसंपन्न व सुसंघटित नेते होते.  त्यांच्या संस्कृतीचा एक विशेष असा होता की ते अभिचार ऊर्फ जादूक्रिया वगैरे गूढविद्येत प्रवीण होते.  सुमारे २३०० वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र नामक ग्रंथाच्या प्रलंभने भैषज्यमन्त्रयोगः ।  ह्या १७८ व्या प्रकरणात ह्या आर्येतर राजांचा पुनः खालील उल्लेख आढळतो :

बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम् ।
भण्डीरपाकं नरकं निकुम्भं कुम्भमेव च ॥
देवलं नारदं वन्दे वन्दे सावर्णिगालवम् ।
एतेषामनुयोगेन कृतं ते स्वापनं महत् ॥
यथा स्वपन्त्यजगराः स्वपन्त्यपि चमूखलाः ।
तथा स्वपन्तु पुरुषा ये च ग्रामे कुतूहलाः ॥
कौटिलीय अर्थशास्त्र, (श्यामशास्त्री यांची आवृत्ती) पान ४१९

वरील मंत्राचा प्रयोग केला असता रक्षक व इतर माणसांना झोप लागते अशी समजूत होती.  हा प्रयोग करण्यापूर्वी एका श्वपाकी (मांगीण) कडून हातापायांची नखे विकत घेऊन ती कृष्ण चतुर्दशीला स्मशानात पुरावीत. ती पुढच्या चतुर्दशीला उकरून, कुटून त्यांच्या गोळया तयार कराव्यात.  त्यामुळे सर्व निद्रिस्त होतात असे ह्याच प्रकरणात सांगितले आहे.  आंध्र देशात जादूटोणा करणारी एक विशिष्ट अस्पृश्य जात आहे.  त्या जातीच्या बायकांची मदत वरिष्ठ वर्गही अशा कामी घेतात असे मी त्या प्रांतात फिरत असताना ऐकिले आहे.  ह्याच प्रकरणात पुनः खालील श्लोक आढळतात :

बलिं वैरोचनं वन्दे शतमायं च शम्बरम्
निकुम्भं नरकं कुम्भं तन्तुकच्छं महासुरम् ॥
अर्मालवं प्रमीलं च मंडोलुकं घटोद्वलम् ।
कृष्णकंसोपचारं च पौलोमं च यशस्विनीम् ॥
अभिमन्त्रय्य गृह्णमि सिध्दार्थ शवसारिकाम् ॥
कोटिलीय अर्थशास्त्र (श्यामशास्त्री यांची आवृत्ती), पान ४२१

चण्डीलीकुम्वीतुम्भकटुकसाराघः सनीरीभगोसि स्वाहा ।
सदर, पान ४२३

हा मंत्र म्हटला असता कसलेही बळकट दार उघडते आणि सर्वांना झोप लागते.  वरील मंत्रातील पौलोमी ही चंडाली मोठी यशस्विनी होती.  अशा प्रकारे अस्पृश्यांतील प्रवीण स्त्री-पुरुषांचा गतयुगातील राजकारणातही उपयोग होत असे, हे ह्या पुस्तकातील उल्लेखावरून दिसते.  

प्रत्यक्ष वेदकाळात अस्पृश्यता नव्हती.  पण त्या काळी ज्या आर्येतर कमकुवत जमातींचा आर्यांनी पाडाव केला, त्या पुढे अस्पृश्य व बहिष्कृत झाल्या.  बुध्दोदयकाली त्या पूर्णपणे ह्या हीन स्थितीला पोचल्या होत्या; हे वर पहिल्या खंडातील दुसऱ्या तिसऱ्या प्रकरणांत सांगण्यात आले आहे.  बौध्द-जैन-काली अस्पृश्यता थोडी शिथिल झाली.  पण अजीबात नष्ट झाली असे मुळीच नव्हे. गौतम बुध्दाने आपल्या भिक्षुसंघात अगदी हीन अस्पृश्यांनाही घेतले व ते अर्हत् पदाला पोचले, असे पाली ग्रंथांत उल्लेख आहेत.  ते असे :

सोपाक (श्वपाक) नावाच्या भिक्षूच्या थेरगाथेत सात पाली गाथा आहेत.  त्यांचे मराठी भाषांतर :

(१) प्रासादाच्या छायेत चंक्रमण करीत असताना नरोत्तमाला पाहून मी तिकडे गेलो, आणि त्याला वंदन केले.  (२) चीवर एका खांद्यावर करून व हात जोडून त्या विशुध्द सर्वसत्त्वोत्तमाच्या मागोमाग मीही चंक्रमण करू लागलो.  (३) तेव्हा त्या कुशल प्रश्न विचारणाऱ्याने मला प्रश्न विचारले आणि न भिता मी त्या गुरूला उत्तरे दिली.  (४) प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल यथागताने माझे अभिनंदन केले, व भिक्षुसंघाकडे वळून तो म्हणाला, (५) 'ज्या अंगाचे व मगधाचे चीवर, पिंडपात, भैषज्य आणि शयनासन हा स्वीकारतो, तो त्याचा मोठा फायदा समजला पाहिजे.  जे ह्याचा मानमरातब राखतील, त्यांनाही फायदा होतो.  (६) सोपाक, तू आजपासून माझ्या भेटीला येत जा; व हीच तुझी उपसंपदा झाली असे समज.'  (७) सात वर्षांचा असताना मला उपसंपदा मिळाली, आणि आता मी हे अंतिम शरीर धारण करीत आहे.  धन्य धर्माचे सामर्थ्य !

सुनीत हा भंग्यांच्या कुळात जन्मला.  थेरगाथेच्या बाराव्या निपातात ह्याच्या गाथा आहेत.  त्यात ह्याचे चरित्र आले आहे.  त्याचे मराठी रूपांतर येणेप्रमाणे -

(१)  मी नीच कुळात जन्मलो.  मी दरिद्री होतो.  आणि माझे खाण्यापिण्याचे हाल होत असत.  माझा धंदा हलकट होता.  मी भंगी (पुप्फ छड्डक) होतो.  (२) लोक माझा कंटाळा करीत.  निंदा करीत.  तरी मी नम्र मनाने कितीतरी लोकांना नमस्कार करीत असे.  (३) अशा स्थितीत भिक्षुसंघासहवर्तमान मगधांच्या श्रेष्ठ नगरात प्रवेश करणाऱ्या महावीर संबुध्दाला मी पाहिले.  (४) मी कावड (सोनखताची, मूळ पालीत हिला व्याभंगि असा शब्द आहे.)  खाली टाकिली आणि नमस्कार करण्यास पुढे सरसावलो.  केवळ माझ्या अनुकंपेने तो पुरुषश्रेष्ठ उभा राहिला.  (५) त्या गुरूच्या पाया पडून एका बाजूला उभा राहून त्या सर्वसत्त्वोत्तमाजवळ मी प्रव्रज्या मागितली.  (६) तेव्हा सर्व लोकांवर करुणा करणारा तो कारुणिक गुरू ''भिक्षू इकडे ये'' असे मला म्हणाला, तीच माझी उपसंपदा झाली.  (७) तो मी एकाकी सावधानपणे अरण्यात राहिलो, व जसा त्या जिनाने उपदेश केला, त्याप्रमाणे त्या गुरूच्या वचनाला अनुसरून वागलो.  (८) रात्रीच्या पहिल्या यामात पर्वजन्याची आठवण करण्यास मी समर्थ झालो.  रात्रीच्या मध्य यामात मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली व रात्रीच्या पश्चिम यामात मी तमोराशीचा (अविद्येचा) नाश केला.  (९) तदनंतर रात्र संपत आली असता व सूर्योदय जवळ आला असता इंद्र आणि ब्रह्मा येऊन मला नमस्कार करून हात जोडून उभे राहिले  (१०) ते म्हणाले, ''हे दान्त पुरुषा, तुला नमस्कार असो.  ज्या तुजे आसव क्षीण झाले आहेत, तो तू, हे मित्रा !  दक्षिणार्ह आहेत.''  (११) नंतर देवसंघाने माझा आदरसत्कार केलेला गुरूने पाहिला, आणि स्मित करून तो असे बोलला.  (१२) ''तपाने, ब्रह्मचर्याने, संयमाने आणि दमाने ब्राह्मण होतो.  हेच ब्राह्मण्य उत्तम आहे.''

प्रो. धर्मानंद कोसंबीकृत 'बौध्द संघाचा परिचय', पान २५४-५६.

ही उदार वृत्ती बौध्द भिक्षूंची झाली.  केवळ ध्येयदृष्टीने पाहून गेल्यास हिंदुधर्मातील काही परमहंस संन्याशांचीही वागणूक अशीच उदात्त झाली असेल.  पण ह्यावरून अशा काळी सामान्य लोकव्यवहारातून अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले होते, किंवा अशा उदार वृत्तीचा फायदा घेऊन अस्पृश्यांनी आत्मोध्दाराचे मोठे बंड उभे केले, किंवा त्यांच्या वतीने स्पृश्यांनी मोठी राजकारणी अथवा सामाजिक पुनरुध्दाराची एखादी राष्ट्रीय चळवळ चालविली, असे ऐतिहासिक दाखले मुळीच उपलब्ध नाहीत.  इ.स. च्या १९ व्या शतकाच्या मध्यसमयी महात्मा जोतीबा फुले ह्यांनी महारामांगांसाठी शाळा काढल्या, त्यांना आपली स्वतःची विहीर मोकळी केली; किंबहुना, आगरकरांनी त्या शतकाचे शेवटी, सामाजिक समसमानतेची आपल्या 'सुधारक' पत्रात मोठी झोड उठविली म्हणून सामान्य लोकव्यवहारात तेव्हा तादृश खरीच क्रांती घडली असे झाले नाही; तोच प्रकार बौध्द जैनांच्या ह्या अपवादक औदार्याचा झाला.  इतकेच नव्हे, तर पुढे जेव्हा प्रत्येक बौध्द भिक्षुसंघातच, ज्यांच्या हाडीमासी वर्णाश्रम भेदभावाची संस्कृती बेमालूम खिळली होती; अशा ब्राह्मणवर्गाचा बेसुमार शिरकाव झाला, तेव्हा 'महायान' नावाचे रूपांतर घडून बौध्द धर्माचे हे वैशिष्टय लोपून गेले.  ह्यापुढचाही खेदकारक परिणाम असा घडला की राजकारणात क्रांती घडून पुनः हिंदू मताभिमानी राजे व बादशहा प्रमुखपदारूढ झाल्यावर त्यांचे मंत्रिपद व गुरुपद ज्या वर्णाश्रम अतिवाद्यांकडे (extremists) सहजच गेले त्यांच्याकडून अस्पृश्यांच्या बाबतीत मोठी जोराची प्रतिक्रिया सुरू झाली हे मनुस्मृतीसारख्या ग्रंथांतून, ह्यांच्यासंबंधी जे निर्घृण दंडक ठरविले गेले त्यांवरून उघड दिसत आहे.  ह्या दंडकांचा ऐतिहासिक पोकळपणा व कृत्रिमपणा कसा होता हे वर चवथ्या प्रकरणात स्पष्ट झालेच आहे.  आता एवढे खरे आहे की, जरी बौध्द काळातील सामान्य जनतेत अस्पृश्यांच्या बाबतीत राजकीय अथवा सामाजिक क्रांती घडली असे दर्शविणारी ऐतिहासिक उदाहरणे उपलब्ध नाहीत; तरी तत्कालीन सुशिक्षित व बहुश्रुत लोकमतात केव्हा केव्हा बरेच उदार व प्रागतिक विचार प्रचलित झाले असावेत, हे पाली वाङमयातूनच नव्हे तर संस्कृत वाङमयातीलही खालील उताऱ्यावरून दिसून येण्यासारखे आहे.

बौध्दांचे औदार्य अगदीच नष्टप्राय झाले असे नसून ते भगवद्गीतेसारख्या हिंदूंच्या धर्मग्रंथांतूनच नव्हे, तर शुक्रनीतीसारख्या राजकारणावर लिहिलेल्या ग्रंथांतूनही केवळ विचारसृष्टीत व उपदेशसृष्टीत अद्यापि चमकत आहे.  चातुरर््वण्य हे गुणकर्मानुसार आहे असे गीता म्हणते तशची शुक्रनीतीत खालील शिकवण स्पष्ट आहे.  ही गीता, ही नीती वगैरे हल्लीच्या स्वरूपात आढळणारी जी मनुस्मृती तिच्या काळातल्या, म्हणजे बौध्द धर्माला उतरती कळा लागल्यावर, म्हणजे गुप्त साम्राज्यानंतरच्या इ.स. च्या ४ थ्या ५ व्या शतकांतल्या किंवा पुढच्या आहेत.  शुक्रनीतिसार ह्या ग्रंथात पहिल्या व चौथ्या अध्यायांत व इतर ठिकाणीही पुढच्यासारखी विधाने स्पष्ट आढळतात.

न जात्या ब्राह्मणश्चात्र क्षत्रियो वैश्य एव न ।
न शूद्रो व वै म्लेंच्छो, भेदिता गुणकर्मभिः ॥३८॥
ब्रह्मणस्तु समुत्पनाः सर्वे ते किं नु ब्राह्मणाः ।
न वर्णतो न जनकाद् ब्राह्मतेजः प्रपद्यते ॥३९॥
शुक्रनीतिसार, अ. १.


अर्थ  :   ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा म्लेंच्छ हे वर्ण जातीने झालेले किंवा होणारे नसून केवळ गुण व कर्म ह्यांच्या भेदानेच होणारे आहेत.  केवळ ब्रह्मापासून झाले म्हणून काय ते सर्व ब्राह्मण झाले ?  ब्राह्मतेज काही केवळ वर्णापासून किंवा बापापासून ठरत नाही.

त्यक्तस्वधर्माचरणा निर्घृणाः परपीडकाः ।
चंडाश्च हिंसका नित्यं म्लेंच्छास्ते ह्यविवेकिनः ॥४४॥

सदर, अ.१

अर्थ  :  ज्यांनी आपले कर्तव्य सोडले, जे निंद्य, परपीडक, उग्र, नेहमी हिंसा करणारे, अविवेकी तेच म्लेंच्छ होत. चवथ्या अध्यायाच्या तिसऱ्या प्रकरणाच्या आरंभी, जे सनातन देशधर्म, जातिधर्म आणि कुलधर्म आहेत त्यांची धारणा राजाने करावी; कारण तोच एक देव आहे दुसरा देव नाही, असे म्हटले आहे; व पुढे प्रस्तुत जातिभेदाची मीमांसा अशी केली आहे :

चतुर्धा भेदिता जातिर्ब्रह्मणा कर्मभिः पुरा ।
तत्तत् सांकर्यसांकर्यात् प्रतिलोमानुलोमतः ॥
जात्यानन्त्यं तु संप्राप्तं तद् वत्तुंफ् नैव शक्यते ॥१२॥
मन्यन्ते जातिभेदं ये मनुष्याणां तु जन्मना ।
त एव हि विजानन्ति पार्थक्यं नामकर्मभिः ॥१३॥
कर्मणोत्तमनीचत्वं कालतत्सु भवेद्गुणैः ।
विद्याकलाश्रयेणैव तन्नाम्ना जातिरुच्यते ॥१५॥

अर्थ  :-  पूर्वी देवाने चारच जाती निर्माण केल्या.  प्रतिलोम-अनुलोम संकरामुळे ह्या मूळ जाती आता अनंत झाल्या आहेत.  त्यांची आता व्याख्या कारणे अशक्य आहे.  जन्माने जे जाती मानतात त्यांनाच पृथकपणे ह्या जातींची नावे व काम माहीत असावीत !  (हा औपरोधिक टोमणा दिसतो !)  पण खरे पाहता कर्मापासूनच उत्तमपणा, नीचपणा अंगी येतो व कालांतराने ह्या कर्मज संस्कारांचे स्वभावगुणांत रूपांतर होते.  म्हणून विद्या आणि कलांच्या आश्रयामुळे त्या त्या जातीची घटना तयार होते.

येणेप्रमाणे शुक्राचार्यांच्या नावावर विकणारा ह्या मध्ययुगीन ग्रंथाचा कर्ता बराच प्रागतिक मताचा दिसतो व तो स्वतः वर्णाश्रमधर्माभिमानी असूनही बौध्द विचारांच्या वळणाचा दिसतो.  ह्याची विधाने नुसती तात्त्विच नसून राजकारणातही तो स्पष्टाणे प्रागतिक, शुध्द बुध्दिवादी आणि निर्विकार आहे.  सैन्याची भरती करताना व सेनापतीची निवडणूक करताना कोणत्या तत्त्वावर करावी हे सांगताना याने दुसऱ्या अध्यायात असे स्पष्ट म्हटले आहे :

नीतिशास्त्रास्त्रव्यूहादिनतिविद्याविशारदाः ।
अबाला मध्यवयसः शूरा दान्ता दृढाङ्गकाः ॥१३७॥
स्वधर्मनिरता नित्यं स्वामिभक्ता रिपुद्विषः ।
शूद्रा वा क्षत्रिया वैश्या म्लेंच्छाः संकरसंभवः ॥१३८॥
सेनाधिपाः नैतिकाश्च कार्य्या राजा जयार्थिना ॥१३९॥

अर्थ  :  नीती, शास्त्रे, अस्त्रे, व्यूह (सैन्याची रणांगणावर मांडणी) जाणणारे, लहान नव्हेत व म्हातारे नव्हेत असे मध्यमवयाचे, शूर, आत्मसंयमी, बळकट शरीराचे, केवळ आपल्याच कर्तव्यात निरंतर लक्ष घालणारे, स्वामिभक्त व शत्रूला कधीही फितूर न होणारे, अशांनाच जय चिंतणाऱ्या राजाने सैनिक व सेनापती म्हणून निवडावे.  मग ते जन्माने शूद्र असोत, क्षत्रिय, वैश्य किंबहुना मिश्र जातीचे म्लेंच्छही असोत !  केवळ लष्करी खात्याचेच नव्हे, तर मुलकी राजव्यवस्थेचे धोरण ठरवितानाही ह्या शुक्राचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे :

व्यवहारविदः प्राज्ञा वृत्तशीलगुणान्विताः ।
रिपौ मित्रे समा ये च धर्मज्ञाः सत्यवादिनः ॥१६६॥
निरालसा जितक्रोधकामलोभाः प्रियंवदाः ।
सभ्याः सभासदः कार्या वुध्दांः सर्वासु जातिषु ॥१६७॥
शुक्रनीतिसार, अ. २ (पृ. १३६)

लष्करातील निवडणुकीहून भिन्न तत्त्वांवर दिवाणी आणि मुलकी कार्यसभेतील सभासदांची निवड सांगितली आहे.  पण तीत सर्व जातींतून वरील सद्गुणी माणसे निवडावीत असे स्पष्ट म्हटले आहे.  हे सर्व खरे असले, तरी ह्या उदार धोरणाची अंमलबजावणी प्रत्यक्ष अस्पृश्य मानलेल्या ग्रामबहिष्कृतांच्या वाटयाला कितपत आली होती, ह्याची उदाहरणे दाखविणारे तपशीलवाद ऐतिहासिक वाङमय ह्या मध्ययुगीन काळातील तूर्त तरी उपलब्ध नाही, ही मोठी खेदाची गोष्ट आहे.  इतकेच नव्हे, तर ह्या उदारमतवादी ग्रंथांतही मधून मधून मनुस्मृतिकारांना शोभणारे खालीलप्रमाणे पक्षपाती विचार कालमाहात्म्याने चमकतात, हा मोठा चमत्कार आहे !  आणि तेही ह्या दुसऱ्याच अध्यायात !!  नोकरी आणि पगार देताना शूद्र आणि ब्राह्मण ह्यांमध्ये तारतम्य कसे राखावे हे निर्भीडपणे ठरविले आहे !

अन्नाच्छादनमात्रा हि भृतिः शूद्रादिषु स्मृता ॥
तत्पापभागन्यथा स्यात् पोषको मांसभोजिषु ॥४०१॥
यद् ब्राह्मणेनापहृतं धनं तत् परलोकदम् ।
शूद्राय दत्तमपि यन्नरकायैव केवलम् ॥४०२॥
अध्याय २ (पान १९५)

अर्थ  :  शूद्र नोकरीस ठेवावयाचा झाल्यास नुसते पोटाला अन्न आणि पाठीला वस्त्र इतकेच द्यावे.  मांस खाणाऱ्यांना ह्यांहून जास्त वेतन दिल्यास धन्याला पाप लागते !  ब्राह्मणाने एखाद्याच्या घरचे धन चोरले तरी ज्याचे धन गेले त्याला स्वर्गप्राप्ती घडते, पण शूद्राला हात उचलून काही दिले तर उलट देणारा केवळ नरकालाच जातो !

''शूद्राला सामर्थ्य असले तरी त्याने धनसंचय करू नये; असा श्रीमंत झालेला शूद्र ब्राह्मणाला बाधा करितो,''  ह्या मनुस्मृतीच्या शिकवणीची, (मागे पृ. ५२ पाहा) ही अस्सल नक्कल दिसते.  राणीच्या जाहीरनाम्यात अघळपघळ समसमानता जाहीर करून प्रत्यक्ष किफायतीच्या कामावर नेमताना विलायतेहून आलेल्या अस्सल गोऱ्या बाळांची ज्या धोरणामुळे वरणी लागते, ते पाश्चात्त्यांनी ह्या शुक्रनीतीतूनच जणू उचलले आहे की काय, अशी क्षणमात्र शंका येते !

ख्रिस्ती शकाच्या सुमारे ५०० वर्षांनंतर हिंदुस्थानात बौध्द धर्मास कायमची उतरती कळा लागून वर्णाश्रमाच्या पायावर, ब्राह्मणी ऊर्फ शब्दसंस्कृतीच्या सनातनी म्हणविणाऱ्या दुहीप्रिय सोवळया हिंदुधर्माची घडी कायम बसल्यावर बहिष्कृत अस्पृश्यतचे उच्चाटन होण्याची शेवटी आशा नष्ट झाली.  इतकेच नव्हे, तर हजारो वर्षाच्या सवयीने मानीव अस्पृश्यांनादेखील ह्या सोवळया धर्माने ठरविलेली अत्यंत हीन स्थिती आपला स्वभावच आहे असे वाटू लागले.  त्यातच तृप्त राहणे हाच आपल्या स्वधर्म असून त्याच्या उलट प्रयत्न करणे मोठा अधर्म आणि सामाजिक गुन्हा होय अशी त्यांची स्वतःची मनोरचना झाली. मग अशा अभाग्यांचे स्वतंत्र राजकारण ते काय उरणार ?  जगाच्या कृत्रिम इतिहासात जे आजपावेतो चमकत आले आहे असे राजकारण चट सारे जेत्यांचेच असणार.  जितांच्या राजकारणाला वाव तरी कसा मिळणार ?  चुकूनमाकून अपवाद म्हणून कधीकाळी वाव मिळालाच, तरी त्याला लेखी इतिहासात प्रवेश कसा मिळणार ?  ही अपवादक घटना जितकी मानवी स्वभावाच्या विरुध्द आहे, तितकीच सृष्टिक्रमाच्याही उलट आहे.  कारण मानवी स्वभाव हा तरी एक सृष्टिक्रमच आहे ना ?  ह्या क्रमाला स्थितिस्थापकतेच्या दडपणाखाली गारद झालेला हिंदुस्थानच कसा अपवाद होणार ?  असो.  धर्मक्रांती आणि राज्यक्रांती ही जुळी भावंडेच होत.  धर्म म्हणून जो शब्द येथे योजिला आहे, त्याचा अर्थ मतलब एवढाच खरा आहे.  शुध्द अध्यात्मात क्रांतीला वावच नाही.  ते स्वयंभू, स्वप्रकाशित आणि निरंतर सरळ उन्नतीच्या मार्गानेच जाणारे असते.  त्याच्या उलट धर्म म्हणून जो रज आणि तमोगुणाचा प्रकार आहे, तो राजकारणाहून मुळीच भिन्न नाही.  ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र इत्यादी वरून भिन्न भासणारे कितीतरी बैल ह्या धर्म ऊर्फ राजकारणाच्या गाडयाला जुंपले असले, तरी गाडा एकच आहे. ह्या सर्वांची आपसांत एकी असते, तोवर हे गाडे सुरळीत चाललेले दिसते. वितुष्ट माजले की क्रांती झाली, असे इतिहासात नमूद होते.

हिंदुस्थानात अशा क्रांत्या वेळोवेळी झाल्या आहेत. पण ज्या क्रांत्या वर्णव्यवस्थेच्या अभिमानी चालकांनी घडवून आणिल्या त्यांना बहुतकरून क्रांती हे नाव मिळत नाही.  ज्या वर्णव्यवस्थेच्या उच्छेदकांनी घडवून आणिल्या त्या एक तर यशस्वी झाल्या नाहीत, आणि त्यांचा जो भाग यशस्वी झाला, तो इतर सामान्य विकासात असा बेमालूम समरस झालेला आहे, की त्यालाही क्रांती हे नाव मिळत नाही; कारण त्याची क्रिया हळू व अदृश्य पध्दतीने घडलेली असते. म्हणून ती कोणाच्याही डोळयांवर येऊ शकत नाही.  अर्थात कृत्रिम इतिहास तर अशा विकासाला बोलूनचालून डोळयांआडच राखणार.  एरवी त्याला तरी कृत्रिम हे नाव कोण देऊ शकेल ?

राजपूत, जाट, गुरखे, मराठे, कुणबी, चित्पावन, नंबुद्री, नायडू, मुदलियार, नायर, पाळेगार (पळळीकार), बेडर (व्याध), इ. काही उपऱ्या जमाती, आणि येथे अगोदरपासूनच मिरासीचे ठाणे मांडून बसलेल्या काही इतर जमाती; बरावाईट पराक्रम अथवा निदान अतिक्रम तरी करून आता हिंदुधर्माच्या पोलादी चौकटीत वरिष्ठ पदवी पटकावून आहेत.  पण ह्या सर्वांच्या आधी येथे असलेले, जे एकदा पादाक्रांत झाले त्यांना मात्र पुनः पराक्रम करावयाला वाव मिळाला नाही, म्हणून ते आज ह्या चौकटीच्या बाहेर पण हद्दीवरच गुलामगिरीत दिवस कंठीत आहेत.  आणि ज्या प्राचीन जमाती पराक्रम नाही तर नाही पण नुसता अतिक्रम करूनच रानावनांतून अद्यापि आपली पोटे जाळीत आहेत, त्यांची गणना 'गुन्हेगारी जाती' ह्या सदरात होत आहे.  असो, कसे का होईना; अनादी किंवा सनातन हिंदू संस्कृतीचा हा गावगाडा ह्या खंडवजा अवजड देशात, आरबस्तानात ७ व्या ८ व्या शतकांत इस्लामी धर्माचा उद्रेक होईपर्यंत, कसाबसा रखडत चालला होता.  एकाएकी परचक्राच्या टोळधाडी ह्या गाडयावर येऊन आदळू लागल्यापासून ह्या देशाला आधुनिक युग प्राप्त झाले.  ह्या युगात तरी अस्पृश्यता नष्ट झाली, असे मुळीच नव्हे. जिचे निवारण बौध्दांच्या मवाळ औदार्याने झाले नाही ते मुसलमानांच्या कठोर अत्याचाराने थोडेच होणार आहे.  तलवारीच्या जोरावर मुसलमानांनी आपला धर्म व संस्कृती हिंदूंमध्ये पसरली असाही बोलवा आहे.  तो खरा असो, खोटा असो; येथील मानीव अस्पृश्यांमध्ये जे इस्लामी जुलमामुळे धर्मांतर झाले, त्याचे प्रमाण उत्तर हिंदुस्थानात, पंजाब, संयुक्त प्रांत, बंगाल वगैरे प्रांतांत ज्या मानाने पडते त्या मानाने नर्मदेच्या दक्षिणेस मुळीच पउत नाही हे खरे.  ह्याची कारणे तीन,  एक, उत्तर हिंदुस्थानात, विशेषतः बंगाल्यात व बिहारात बौध्द धर्मसंप्रदाय फार दिवस जीव धरून होता.  त्याला शेवटची गचांडी ह्या मुसलमानांच्या स्वाऱ्यांनी दिली.  ह्या धामधुमीत जे बौध्दसमाज मुसलमानी संप्रदायात शिरले, ते वाचले.  ज्यांनी मागे बौध्दच राहण्याचा आग्रह धरला ते नवे अस्पृश्य कसे बनसले, ते वर पाचव्या प्रकरणात सविस्तर सांगण्यात आले आहे.  दुसरे कारण असे की, उत्तरेपेक्षा दक्षिणेकडील अस्पृश्यता अधिक दृढमूल आणि उग्र स्वरूपाची होती.  म्हणून तिला बळी पडलेल्या हीन जातींमध्ये इस्लामची नजर गेली नाही किंवा तिच्या संख्याबलाची मातबरी मुसलमानांनाही फारशी वाटली नाही.  तिसरे कारण असे, की उत्तरेइतका जोम व करारीपणा स्वतः मुसलमानांतच दक्षिणेकडे आल्यावर राहिला नाही; म्हणून इकडे आलेल्या मुसलमानांना स्वतः हिंदूंच्या पोलादी चौकटीशीच तारतम्याने आणि गोडीगुलाबीने वागावे लागले हे इकडील बहामनी राज्यातील बादशहांच्या नरमपणावरूच उघड होते.  काही असो, मुसलमानांच्या आदळआपट अमलाखाली येथील अस्पृश्यांनी मुसलमानी धर्माचा आश्रय घेतल्यामुळे जी त्यांची संख्या कमी झाली असेल, त्याहूनही ह्या निराश्रित व बेबंदशाही धामधुमीत घडलेल्या धर्मक्रांतीमुळे व नवीन हिंदुधर्माच्या जुलुमामुळे नवीन अस्पृश्यांच्या भल्या मोठया संख्येचीच अधिक भर पडली हेच खरे आहे.  जे मुसलमान झाले, ते राजमान्य झाल्यामुळे प्रतिष्ठित स्पृश्य झाले.  त्यांचे जे राजकारण झाले असेल त्याचा अस्पृश्यांचया राजकारणाशी (जो आमचा प्रस्तुत विषय आहे.)  अर्थाअर्थी मुळीच संबंध नाही.  आणि मागे जे अस्पृश्यच उरले, ते जितांचे जित ह्या नात्याने दुहेरी गुलामगिरीत रुतून पडले.  मग अशांचे राजकारण ते काय असणार ?  जेथे ह्यांच्यावर आजपर्यंत जपय गाजविणारांची तोंडे खाली झाली, तेथे ह्या गरिबांनी तोंडे कशी वर करावी ?  अकबरासारख्या प्रथम प्रथम जम बसविणाऱ्या बादशहांनी आपले बूड जड करण्यासाठी हिंदूंना कितीही लष्करी व मुलकी कामगिऱ्या दिल्या असल्या तरी त्यांनी, अशा ह्या दुहेरी गुलामांपैकी ज्यांनी आपला हिंदूपणा ऊर्फ अस्पृश्यता कायम राखिली अशांना आचारी, पाणके आणि हलालखोर ह्यापलीकडे फारसे जवळ केलेले दिसत नाही.  ह्यापलीकडे फाजील दया दाखविणे व्यवहाराला जरूर नव्हते; आणि जरी कोठे अशी अपवादक व व्यक्तिविषयक उदाहरणे घडली असली, तरी बेगुमान बखरकारांना अशा अपवादक उदाहरणांची तमा थोडीच वाटणार आहे ?  अशा अनेक कारणांमुळे मुसलमानांची कारकीर्द ही आमच्या या प्रस्तुत विषयाच्या दृष्टीने अगदी सुनीसुनी भासत आहे, हे खरे !

अस्पृश्यांच्या राजकारणाचा माग काढीत काढीत आम्ही येथवर मुसलमानी अंमलाच्या अखेरीस आलो.  तरी हे राजकारण मृगजलाप्रमाणे आमच्या डोळयांपुढे लांबच दिसत आहे, पण हाताशी प्रत्यक्ष लागत नाही. ह्या वेळी देशात आणखी एक राज्यक्रांती घडली.  तिला आम्ही आमचे मनाच्या समाधानासाठी क्षणभर स्वराज्य म्हणू या.  हे स्वराज्य जरी शिराळशेटी थाटाचे औट घटकेचे ठरले, तरी ते शिराळशेटाप्रमाणे केवळ काल्पनिक नसून खरेखुरे व बऱ्याच दृष्टीने अभिमानास्पदही होते.  ह्या परत मिळालेल्या स्वराज्यात तरी अस्पृश्यांची आर्थिक व राजकीय स्थिती कशी होती ते आता पाहू या.

ज्याला आम्ही वर स्वराज्य म्हटले त्याचे एक मुख्य लक्षण, महाराष्ट्रात देशी ऊर्फ मराठी वाङमयाचा उदय, हे होय.  ह्या वाङमयात मानभावांचे व पंढरपूर संप्रदायाचे नुसते धर्मग्रंथच नसून ऐतिहासिक बखरी, सनदा, महजर, टिपणे वगैरे महाराष्ट्राच्या इतिहासाची अमूल्य साधने आहेत.  ह्या मराठी वाङमयाचे महत्त्व संस्कृत पौराणिक वाङमयाहून भिन्न व अधिक भरवी अर्थाचे आहे.  हे इतिहासाला तारक व बोधक आहे, पुराणांप्रमाणे इतिहासाला भ्रामक किंबहुना मारक नाही.  ह्यातून मिळतील ते उतारे घेऊन आमच्या विषयाची संक्षेपाने सजावट करणे भाग आहे.

मनुस्मृती, पुराणे वगैरे धर्मशास्त्राच्या दृष्टीने पाहता अस्पृश्य मानलेल्या जाती असून नसल्याप्रमाणेच होत्या.  पण खरा प्रकार असा नसून महाराष्ट्राच्या पुरातन ग्रामसंस्थेत ह्या पुरातन जातींचे महत्त्व अद्याप जीव धरून होते.  त्यातल्या त्यात महार जात महाराष्ट्रात मुख्य बलुतेदार म्हणूनच नव्हे तर वतनदार म्हणून नांदत होती; ह्यासंबंधी जे तुरळक पुरावे अद्यापि आढळतात, ते फार महत्त्वाचे आहेत.  ह्यासंबंधी योग्य संशोधन झाल्यास मी म्हणतो त्याप्रमाणे महाराष्ट्राची पहिली वसाहत महारामांगांची असून पुढे ती मराठयांनी बळकावलेली आहे, हे सिध्द होण्याचा पुष्कळ संभव आहे.  ज्यांनी मूळ गाव वसवावा त्यानेच त्या गावाचा पाटील व्हावे आणि तत्कालीन जो कोणी मध्यवर्ती राज्यसत्ता असेल तिच्याशी जुळते घेऊन गाव राखावा.  हिला राजवाडयांनी 'गणराज पध्दती' म्हटले आहे.  महाराष्ट्राची ही पध्दती मराठे येथे येण्यापूर्वी व आल्यावरही चालत असली पाहिजे.  मराठे येण्यापूर्वी जे गावाचे वतनदार पाटील होते ते मराठयांपुढे हार खाऊन त्याचे अव्वल बलुतेदार आश्रित होऊन राहिले.  एरवी आजही गावाला अगदी लागून असलेल्या अस्सल प्रतीच्या जमिनी महारकी वतनाच्या काय म्हणून असाव्यात ?  ह्याचे एकच कारण की, गावचे आणि राष्ट्राचे नवीन मालक जरी हे अधिक सुधारलेल्या शिस्तीचे मराठे झाले तरी त्यांनी देशाचे लष्करी संरक्षणाचा अधिकार मात्र आपल्याकडे ठेवून, उरलेले स्थानिक संरक्षणाचे ऊर्फ पोलीस अधिकार ह्या मूळ मालक लढाऊ जातीकडेच राखिले असावे.  म्हणून महार जागला हा नुसता मुलकी बलुतेदार नसून मुलकी बलुतेदार नसून राजकारणी पोलीस-कोतवाली हक्काचा ग्रामाधिकारी मराठयांहून पुरातन असावा असे दिसते.  इतकेच नव्हे, तर बऱ्याच गावच्या पाटिलक्या ह्या महारांच्या होत्या.  त्या इतरांनी कालवशात कशा बळकावल्या ह्याचे एक उदाहरण खाली दिले आहे.  ह्याचप्रमाणे हवेलाी तालुक्यातील देहू गावची पाटीलकी व भीमथडी तालुक्यातील बाबुर्डी गावची पाटीलकी मूळ महारांची आहे, असे काही महारांचे म्हणणे माझ्या कानी आले आहे.  अशा वतनाचा वाद माजला असता, अव्वल मराठेशाहीत कोणते तरी दिव्य करून आपला हक्क दिवाणात शाबीत करावयाचा रिवाज असे.  खालील उताऱ्यावरून 'धार दिव्य' म्हणजे लढाईत तलवार गाजविण्याचे दिव्य करून ताब्यातून गेलेल्या पाटीलकीचे हक्क महारांनी पुनः मिळविले अशी साक्ष पटते.


नागेवाडीचा महार पाटील व किल्ले वैराटगड

भारत इतिहास मंडळाचे सप्तम-संमेलन-वृत्त पान ५४ वर संशोधक शंकर ना. जोशी वाईकर ह्यांनी पुढील महत्त्वाच्या एका महजराचा शोध लावल्यासंबंधाचे स्पष्टीकरण प्रसिध्द झाले आहे.


एका महार वीराचे धार दिव्य

''छत्रपती संभाजीनंतर मराठेशाहीत अव्यवस्था होऊन ती मोडकळीस आली असता महाराष्ट्रातील ब्राह्मण, मराठे, प्रभू वगैरे सर्व जातींनी स्वराज्यप्रेमाने, एकदिलाने व मुत्सद्देगिरीने नेटाचे प्रयत्न करून अनेक संग्राम करून, मराठेशाहीत सावरून धरिले व तीस बळकटी आणिली.  त्या कामी मराठे, ब्राह्मण, प्रभू ह्याप्रमाणेच स्वराज्यप्रेमी महारांनीही संग्राम, पराक्रम केले...

''मौजे नागेवाडी प्रांत वाई येथील कदीम पाटीलकी मूळची महाराची.  छत्रपती राजारामाचे वेळी महजूर सेटी बिन नागनाक महार हा पाटील होता.  त्याने नागेवाडी येथील नागवडसिध्द ह्या देवाची पूजा करून राहण्याकरिता धांडेघर व गौडाली येथील मोरोजी व चिंतामणी हे दोन गुरव आणिले.  हे दोन गुरव घेऊन राहिल्यानंतर त्यांनी पाटलाशी 'मारेचुरे' करून त्याची पाटीलकी बळकावली.  तेव्हा सदर पाटलाने गुरवाविरुध्द परशरामपंत प्रतिनिधीकडे फिर्याद केली.  प्रतिनिधींनी गुरवास बोलावले, पण ते आले नाहीत.  तेव्हा प्रतिनिधींनी सिवधडे ह्यास (म्हणजे नागेवाडीजवळील गावचे मुकादमास) विचारले.  त्यांनी पाटीलकीचे वतन महारांचेच, गुरवांनी देव पुजून असावे; पाटीलकीस त्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही असा, महार पाटलाचे बाजूचा निकाल दिला.  उभयता गुरवांनी पुनः छत्रपतीकडे फिर्याद नेली.  त्या वेळी छत्रपती रांगण्यास होते.  तेव्हा ही पाटीलकीची फिर्याद पुनः आलेली पाहून राजारामंनी महारास धार दिव्य करण्यास सांगितले.  म्हणजे मोगलांनी घेतलेला वैराटगड (हा वाईजवळ आहे.)  स्वराज्यास जोडून द्यावा व पाटीलकीचे वेतन अनुभवावे असा निकाल दिला.  त्या वेळी मोगलांनी एक एक किल्ला घेऊन पुढे जावे व मागून मराठयांनी ते ते किल्ले स्वराज्यास जोडावे असे चालू होते.  अशातच वैराटगड हा नागेवाडीच्या महारांनी मोगलांनी लढून घेतला व पाटीलकीचे वतन मिळविले.  ह्या पाटीलकीचे वतनाबद्दल नागेवाडीच्या गुरवां-महारांमध्ये तीन वेळा फिर्यादी झाल्या.  तीनही वेळा महारांचेच वतन ठरले.  शेवटची फिर्याद शके १९७४ मार्गशीष शु. ४ इ.स. १७५३ दिसंबर, ता. ९ रोजी होऊन अखेर निकाल झाला.''

हा झाला नुसता मुलकी पाटीलकीचा हक्क.  मेटे नाइकी म्हणून एक केवळ लष्करी हक्क आहे.  प्रत्येक डोंगरी किल्ल्याच्या शिबंदी संरक्षणासाठी किल्ल्याच्या उतरणीवर ठिकठिकाणी जेथे थोडी सपाटी असेल तेथे कायम वस्ती करण्यात येत असे.  त्याला मेट्ट = मेटे अशी संज्ञा आहे.  हा मूळ शब्द कानडी आहे.  हे मेट्टकर बहुधा महारच असत.  उदाहरण :

मेटे नाइकी

भा. इ.सं. मंडळ पुरस्कृत शिवचरित्रसाहित्य खंड ३ रा, पान १९७ वर लेखांक ६०९ ह्या बाबतीत महत्त्वाचा असा आहे :

शके १६६८; इ.स. १७४६.

''करीना (हकीकत) खंडनाक वलद रामनाक महार मौजे करंजिये त. भोर ता. रोहीडखोर लेहोन दिल्हा ऐसाजे.  इदिलशहा निजामशहाचे कारकीर्दीस किल्ले रोहिडा येथे आपले बापाचा चुलता काळनाक महार मौजे मजकूर व येसनाक महार सोंडकर ह्या दोघांच्या नाइक्या होत्या.  ते समयी वतनदारीचे चाकरीस कमळनाक महार मौजे नाटंबी ता. मजकूर व वाडी व धावडी ता. उतरोली हे दोघेजण दुतर्फाचे (किल्ल्याच्या दोन्ही बाजूंच्या उतरणीवर) महार होते.  निमे निमे प्रमाणे उत्पन्न घेऊन चाकरी करून होते.  त्या दोघांनी बदमामली (काही गैरवर्तणूक) केली म्हणून अजम सेखजी किल्ल्ेदार किल्ले रोहिडा यांणी दोघांची डोचकी मारावीसी केली व मुले बाळे ढाणकासी (ढाण्या वाघास खाण्यास रानात सोडणे !)  द्यावीसी केली.  ते सोंडकराने रदबदली करून कमळनाक महार मौजे नाटंबी यासी आपले हाती घेऊन खंड कबूल केला.  वाडी धावडीचा महार अटकेत ठेविला ... त्यावरी किल्ला महाराज राजश्री थोरले स्वामीस (श्रीशिवाजीस) हस्तगत झाला.  मोगलाई बुडाली.  तेव्हा काळनाकाची नाइकी व सोंडकर महाराची नाइकी करार केला आणि वाडीचा महार अटकेत होता त्यास खंडाचा पैका न मिळे, याकरिता त्यास सर्जा बुरुजाच्या (रायगड) खाली पायात घालावयाचा हुकूम महाराजांनी केला.  त्यावरून... घातला.  त्यावरी काळनाक व सोंडकर महार मयत झाला.  पोरांडा झाला.  त्यावरील रामनाक आपला बाप गावावरी आला.  त्याणे रायगडास जाऊन महाराज राजश्री कैलासवासी पूर्वीचा दाखला मनास आणून पूर्ववतप्रमाणे सनद दिली.  ते किल्ल्यास आणिली.  मेटे (ठाणे उतरणीवरची) वसविली.  नाइकी वतनदारी चालवू लागला.  पुरातन घरठाणा बांधला, टाके पाणी खावयासी एक दिल्हे ... त्याचा लेक आपण.  भोजनाक राजाणी वस्ती वाडी ता. उत्रोली त्याची लेकी लग्नाची केली.  ते लहान म्हणोन त्याचे घरी येके ठायी राहिलो.  वतनदारीची चाकरी व किल्ल्याची नाइकी करीत होतो... आपण वेगळा निघालो तेव्हा भोजनाक कजिया करू लागला.  दसरीयाचे शांतीच्या टोणग्याचे सीर आपले वडील व आपण घेत.  भोजनाकाने कजीयाखाले सीर नेत होता.  त्यास आपण दोही दिली.  त्या तागाईत दरवाजानजीक श्री जननीजवळ टोणगीयाचे सीर पुरू लागला.''

रा. जोशी ह्यांनी वर दिलेल्या स्पष्टीकरणापुढे आपल्याला सापडलेला मूळ अस्सल महजर जोडला आहे.  त्यात सरकारी दिवाणातून व गावचे गोताकडूनही मंजुरी वेळावेळी कशी मिळत गेली ह्याविषयी स्पष्ट उल्लेख आहेत.

हे गोत म्हणजे केवळ वादी-प्रतिवादीचे वारसदार नातेवाईकच नव्हेत; तर ज्या व्यक्तींच्या अथवा गावांच्या हद्दीबद्दल अगर इतर हक्कांबद्दल तंटा माजून दिवाण ऊर्फ पंचायत भरविण्यात येई तिच्यात भाग घेण्यास त्या त्या गावांच्या सर्व लहान-थोर जातींची वडीलमाणसे जमविण्यात येत असत, त्या सभेस 'गोत' अशी संज्ञा असे.  व अशा गोतात महारही प्रामुख्याने बसत.  ह्याला उदाहरण खालील गोत दिले आहे.  त्यात प्रत्यक्ष छत्रपती मातोश्री जिजाबाईचे शेजारी बापनाक भिकनाक महार आढळतो.

गोतात महाराचा समावेश

मराठयांच्या इतिहासाची साधने, खंड १६ कानदखोरे मरळ देशमुख प्रकरणी पान ३७ वर लेखांक २२ असा आहे :

''महजरनामा सके १५८८ पराभव नाव संवछरे माघ सुध दसमी वार गुरुवार तदिनी हाजीर मजालसी गोत व मातुश्री आवाजी (जिजाबाई श्रीशिवाजीची आई) स्थल मुक्काम सो. धानीब, ता. कानदखोरे.''  ह्या गोतात हजर असलेल्यांच्या नावांत प्रथम जिजाबाईचे नाव आल्यावर मग पुढे वेदमूर्ती ब्राह्मण, मराठे, तेली, न्हावी, गुरव, परीट वगैरे अनेक जातींची नावे झाल्यावर शेवटी बापनाक व भिकनाक महार वृत्तिकार मौजे धानीब, आणि खंडनाक व भिकनाक, वरगण ता. मजकूर ह्यांचाही स्पष्ट उल्लेख आहे.  शेवटी म्हटले आहे की, ''सदरहू गोत बैसोन, बाबाजीराव झुंझारराव देशमुख तर्फ कानदखोरे ह्यांचे भाऊ मलोजी पतंगराव या हरदो जणामध्ये वृत्तींचा कथळा होत होता.  त्याबद्दल सदरहू गोत बैसोन हरदो जणाचे वाटे केले, व घरातून वेगळे निघाले.''

त्याच खंडात, लेखांक ५८ पान ६६ वर खालील निवाडा असा आहे :  ''बिदाणे इनाम राजश्री बाबाजी बिन नारायणजी झुंझारराव मरळ देशमुख ता. कानखोरे यांचे इनाम मौजे गेवंढे येथे आहे, त्याची बिदाणे (चिन्हे) श्रीचा अंगारा बादनाक व मातनाक बिन धाकनाक व धारनाक बिन राधनाक माहार मौजे म ॥ यांणी सत्य स्मरोन सांगितले.  शके १७०३ प्लवनाम संवछरे वैशाख व ॥  पंचमी शनवार सन इहिदे समानीन मया व अलफ.''

अशा मामुली हक्काच्या वादात जी दिव्ये करून निकाल लावण्याची वहिवाट असे, त्यात धार दिव्य, ऐरण दिव्य, रवा दिव्य, असे प्रकार असत.  आणि ही दिव्ये करण्यास महार हीच जात उत्तम प्रकारे पात्र ठरलेली असे.  कारण ती पुरातन, विश्वासू आणि वादविषयक हक्काची मूळ मालकीण म्हणूनच होय.  केव्हा केव्हा तर अशी दिव्येही न करता केवळ वतनदार महार मेहतराच्या तोंडी साक्षीवरूनही निवाडा होत आहे, हे वरील लेखांक ५८ वरून स्पष्ट होते.


ऐरण दिव्य

मराठयांच्या इतिहासावी साधने, खंड १५, पान २९९ वर लेखांक २९०, शके १६३१ श्रावण वद्य १ चा, खालीलप्रमाणे आहे ;

''सु ॥ अशर मया अलफ कारणे झाले साक्षपत्र ऐसे जे मौजे माडरदेव प्र ॥  वाई व मौजे अबडे व बललु व नेने ता. उत्रोली या गावांत सिवेचा गरगशा (तंटा) होता.  म्हणौन खोपडे देशमुख व माडरे मोकदम हुजूर राजश्री पंतसचिव स्वामीजवळ जावून राजश्री सुभेदारास व समस्त गोतास आज्ञापत्रे घेऊन आले की, सिवेवरी जाऊन सीव नजर गुजार करून हरहक निवाडा हुजूर लिहिणे ... त्यावरून रा. सुभेदार व समस्त गोत मौजे अबडे येथे येऊन, खोपडे व माडरे आणून खोपडिया पासून दिव्य घ्यावे.  त्यास अनसोजी व बयाजी माडरे याणी रदबदली करून दिव्य आपण करितो म्हणून मागोन घेऊन राजीनामा लिहोन दिला.  त्यावरून श्रावण शुध्द द्वादसी सणवारी गोदनाक बिन भादनाक महार मौजे माडरदेव ह्याच्या हातास साबण लावून दोन्ही हात धुतले.  कृष्ण न्हावी मौजे खेडी बु ॥ प्र ॥ सिरवळ ह्याजकडून नखे काडून हाताची निशाणे लिहिली.  मग दोही हाती पिशव्या घालून लखाटा केला.  कैदेत राखिला.  दुसरे दिवशी आदितवारी... सिवेवर जेथे माडरे जाऊन उभे राहिले तेथे रा. सुभेदार व समस्त गोत बैसोन क ॥ सिरवळचा लोहार आणवून त्याजकडून ऐरण ताविली.  महार उभा करून हातीच्या पिशव्या काढून सात मंडळे काढिली.  पहिल्या मंडळात उभा करून हातावरी सेवल घालून त्यावरी सात पाने पिंपळाची ठेवून त्यावरी लोणी घातले.  लोहाराने सांडसे ऐरण धरून महाराच्या हातावरी ठेविली.  सात मंडळे चालून सिवेवरी वोल्या गवताचा भारा ठेवला होता, त्यावरी टाकली.  डोंब जाला.  महाराचे हाती पिसव्या घालून लखाटा केला.  कैदेंत ठेविला.  तीन रात्री होऊन चौथे दिवसी बुधवारी रा. सुभेदार व समस्त गोत बैसोन हातीच्या पिशव्या काढिल्या.  हात पाहता महार दिव्यास लागला.  (म्हणजे हातास जखमा होऊन दिव्य अपयशी ठरले.)  उजव्या हातास आंगठयापाशी मधले रेघेवर फोड पावटयाप्रमाणे एक, व त्याच बोटास पुढे लहान फोड दोन जाले.  डाव्या हातास मधल्या बोटापाशी एक फोड व त्याचे सेजारी संधीस एक फोड आला.  सदरहूनप्रमाणे दिव्यास लागला.  खोटा झाला.  हे सक्ष पत्र सही छ १४ माहे जमादिलावर.''

ह्या दिव्याने खोटा ठरला तो महार नव्हे, तर मूळ मराठा वादीच होय.  बिचाऱ्या महाराचे हात मात्र हकनाक जळले.  ह्या धोक्याला भिऊनच वादी-प्रतिवादी स्वतः आपण दिव्य करण्यास धजत नसत.  हे पुढील रवा दिव्यावरून दिसत आहे.


रवा दिव्य

मराठयांच्या इतिहासाची साधने, खंड १८, लेखांक ४, पान ६ वर परगणे पुणे, कसबे सुरे, मौजे वढाणा येथे शेताचे शिवेबाबत तंटा पडून खून झाला.  त्याबाबत महजर होऊन निवाडा झाला.  त्याची हकीकत आहे.  हा काळ शहाजी महाराजांच्या अंमलाचा आहे.  शके १५४० मार्गशीर्ष व॥ १२ रोजी शहाजीच्या सांगण्यावर हा दिवाणी महजर घउला आहे.  ह्या निवाडयात ''शके १४४६ तारण संवच्छरे मार्गेश्वर वद्य रवौ तदिनी दसकत कान्हो लुखो, पेधो लुखो, मलो कोंडो माहार विर्तिकार मौजे वढाणे आत्मसुखे पेधो मालोस व पेधाई मालीस लेहोन दिधले ते से जे मौजे चिचोली मजरा सुपाचा तेथील सिवेची सेते वढाणे याखाली पडली होती.  ते दिव करून साधली ते लेकुराचे लेकुरी औलादी अफलादीनसी खाइजे ए बाबे मी उभा राहे माझीए वंसीचा उभा राहे...'' वगैरे मागील पुराव्याचा कागद पुढे आणला होता.  पण हा कागद मंजूर केला गेला नाही.  कारण ''जे वक्ती दिव होते ते वक्ती हरदो माहालीचे कारकून व देशमुख व देशक व जबार व कोने कुए मेळवून दिवाण होते तेथे महजर त्यांची नावे निशाणे करून महजर करताती.  ए कागदी तैसा अमल नाही.  यासी तो कागद रुजू न पडे...''  नंतर ह्या खटल्यास महाराने ऐरण दिव्य करावे, असे सुचविण्यात आले.  पण तेही साधेना म्हणून शेवटी खुनापर्यंत पाळी आली.  तेव्हा रवा दिव्य करावयाचे ठरले.  म्हणजे ''तेल ५ छटाक व तूप ५ छटाक ऐसे तपेलियात घालून तावून दोघा मोकदमाचे (वादी-प्रतिवादीचे) हात एकवट बांधोन घालावे...'' पण शेवटी गोताने दोघा मोकादमांची समजूत घालून प्रकरण आपसांत मिटवले.  रवा दिव्य करण्याचे धाडस कोणी केले नाही.  बिचाऱ्या महारांची दगदग वाचली.

नुसती पाटीलकी अगर मेटे नाइकीच नव्हे तर अस्सल सरदारीचेही उदाहरण, जे पेशवाईअखेर भडकलेल्या सोवळयाच्या दिव्यातूनही टिकून उरले ते तर हृदयंगम आहे.  ते असे :

शिदनाक महार

भारतवर्ष मासिक पुस्तकातून जुन्या ऐतिहासिक गोष्टी ह्या मथळयाखाली कृष्णाजी विष्णू आचार्य कालगावकर, शाळामास्तर कासेगाव, ह्यांनी लिहिलेल्या व प्रसिध्द कै. पारसनीस ह्यांनी इ.स. १९०० मध्ये छापलेल्या हकीकती पुणे येथील इतिहास मंडळाचे संग्रही आहेत.  त्यात ३२ वी गोष्ट शिदनाक महाराची खालीलप्रमाणे फार मनोरंजक आढळते.

''सातारा जिल्ह्यात तासगाव तालुक्यात कळंबी म्हणून एक गाव आहे, तेथचा हा वतनदार महार.  औरंगजेबाचे हातून संभाजी मारला गेल्यावर पुढे जी महाराष्ट्रात बंडाळी माजली, ती पंचवीसतीस वर्षे जास्तकमी चालूच होती.  त्या वेळी शिदनाकाने महार लोकांचे एक पथक उभारून धामधूम केली.  पुढे त्याचा मराठे लोकांस पुष्कळ उपयोग झाला.  शाहुराजा मोगलाचे कैदेतून सुटून ताराबाईपासून आपले राज्य मिळविण्याकरिता आला, तेव्हा जे लहानमोठे सरदार त्यास मिळाले त्यांत हा शिदनाकही मिळाला.  शाहूस राज्यप्राप्ती झाल्यावर ज्यांनी त्यास मदत केली, त्यास सर्वांस त्याने त्यांच्या योग्यतेप्रमाणे देणग्या दिल्या.  त्या वेळी शिदनाक ह्यास कळंबी गाव इनाम दिला.  तो अद्यापि त्याच्या वंशजाकडे चालत आहे.

ह्या शिदनाकाचा नातू त्याच्याच नावाचा होता, तो खडर्याच्या लढाईत होता.  खडर्याच्या मैदानावर जेव्हा मराठयांचया फौजेचा तळ पडला तेव्हा सरदार आपापल्या लोकांसह मिसली (मानाचा हक्क) प्रमाणे उतरले.  शिदनाकाच्या गोटाच्या आसपास दुसऱ्या ब्राह्मण व मराठा सरदारांचे गोट होते. पेशवाईत सोवळयाओवळयाचा विचार बराच फाजील वाढत चालला होता, त्यामुळे कित्येकांनी सवाई माधवराव कचेरीच्या डेऱ्यांत बसले असता, विनंती केली की, महाराचा गोट मध्येच आहे तो बाजूस काढावा.  पेशव्यांनी विनंती ऐकून आपल्या बाजूस बसलेल्या हिरोजी पाटणकर नावाच्या वयोवृध्द सरदाराकडे पाहिले.  तेव्हा तो मराठा सरदार बोलला की, ही काही जेवणाची पंगत नव्हे, म्हणून मध्येच महाराचा गोट असल्यास हरकत नाही.  ही तरवार धरणाऱ्या शूरांची पंगत आहे.  येथे जातीचा विचार नाही.  'ज्याची तलवार खंबीर तो हंबीर' पाटणकरांचे बोलणे ऐकून पेशव्यांनी मान डोलविली.

''पुढे लढाईचे दिवशी सरदार लोक पेशव्यास मजुरी करून लढाईस चालले.  तेव्हा शिदनाकही मुजऱ्यास आला.  मुजरा करून हात जोडून पेशव्यांस म्हणाला, ''महाराज !  मी शिदनाक महार आहे.  मी महार म्हणून काही लोक माझा तिरस्कार करीत आहेत.  आज आपल्या पायाचा दास कामगिरी कशी करितो ती पाहावी.'' असे म्हणून निघून गेला.  पुढे लढाई चालू झाली.  परशुराम भाऊवर पठाणांनी मोठी गर्दी करून भाऊस घोडयावरून खाली आणिले.  त्या वेळी मराठे व पठाण ह्यांची जी चकमक झाली तीत शिदनाकाने अप्रतिम शौर्य दाखविले.  त्याची पटवर्धन मंडळीने मोठी तारीफ केली.  पेशवाई बुडाल्यावरही हा शिदनाक बरीच वर्षे होता.  चिंतामणराव अप्पा सांगलीकर दुखण्याने फार आजारी असता त्यांचया भेटीस हा गेला होता.  तेव्हा त्यांनी मोठया समारंभाने ह्याची मुलाखत घेतली.  आणि आपल्या पदरच्या मंडळीस त्याची माहिती करून दिली.''

महारांचे बावन हक्क

महारांच्या मुलकी हक्कांत त्यांचे विशेष गाजलेले 'बावन हक्क' हे एक विशेष प्रकरण आहे.  त्याच्या दोन सनदा महत्त्वाच्या आहेत.  पैकी एक बेदरचा बहामनी बादशहा दुसरा महमदशहा (१४६३-१४८२) याच्या काळापासूनची आहे.  तिच्या नकलेची नक्कल म्हणून एक प्रत संशोधक राजवाडयांनी प्रसिध्द केली, तिचा आशय पुढे दिला आहे.  दुसरी सनद ह्याच तोडीची मराठयांच्या इतिहासाची साधने, खंड विसावा, ले. १७४, पान २२४ वर प्रसिध्द झाली आहे.  हिच्यात महाराचे बरोबर ५२ हक्क लहानसान मिळून दिले आहेत.  ही निझामशाहीतली शके १५६७ राक्षस नाम संवत्सरे (इ.स. १६१५) मधली आहे.  ह्या दोन्ही सनदांतील हक्कांच्या तपशिलाचा मेळ बसत नाही.  पण पहिली अधिक जुनी, तपशीलवार, अधिक हक्कांची आणि महत्त्वाची आहे.  दुसरा महमदशहा बहामनीच्या कारकीर्दीत इ.स. १४७५ साली दक्षिणेत भयंकर दुष्काळ पडला होता.  त्या वेळी मंगळवेढयास दामाजीपंत नावाचा एक सात्त्वि ब्राह्मण कमावीसदार होता.  त्याने दुष्काळात सरकारी धान्य पुष्काळपीडितांस वाटले, ही आख्यायिका प्रसिध्द आहे.  त्या प्रकरणात मंगळवेढयात एक विठू महार होता, त्याने दामाजीपंताचे सरकारी देणे आपले स्वतःचे पुरून ठेवलेले धन देऊन भागविले, आणि वरील सनद स्वतः दामाजीपंताच्या हातून लिहिलेली बादशहाकडून मिळविली असे राजवाडयांचे म्हणजे खाली दिले आहे.  पण सनदेत अंबरनाक असे महाराचे नाव आहे.  अमृतनाक महारास ही मूळ सनद मिळाली असे कित्येक महारांचे म्हणणे मी ऐकले आहे.  ह्या सनदेची नक्कल हस्तलिखित मी माझ्या काही महार मित्रांकडेही पाहिली आहे.  ह्या सनदेतील हक्कांचे विशेष स्वरूप खाली दिल्याप्रमाणे दिसते :

हाडकी हाडोळी वगैरे केवळ ग्रामसंस्थेतील निकृष्ट हक्कच यात नमूद नसून, ब्राह्मण-मराठयांपासून तो चांभार, मांग आणि फासेपारधी अशांच्याही लग्नावर महारांचा कर दर लग्नास २। रु. स्पष्ट नमूद आहे.  लग्नात मराठे ब्राह्मणांचा वर घोडयावर, महारांचा बैलावर (कर्नाटकात विशेष) व मांग व इतर कनिष्ठांचा हेल्यावर बसवून वरात काढण्याची वहिवाट असे.  ह्या सनदेत कोणत्या जातीचा वर घोडयावरून, कोणाचा बैलावरून, कोणाचा रेडयावरून निघावा ह्याचा तपशील स्पष्ट केला आहे.  त्यात महारांनी घोडयावरचा हक्क संपादन करण्याचे कारण अंबरनाकाने बादशहाची बेगम विश्वासूपणाने सांभाळली असे दिले आहे.  ह्याशिवाय जकातीचे हक्क; बाहेरून येणाऱ्या पुष्कळ मालावर दर गाडीमागे किंवा पशूमागे किती कर घ्यावयाचा तो स्पष्ट उल्लेखिला आहे.  हे हक्क केवळ बलुत्याचे नसून प्रत्यक्ष राजसत्तेने उपभोगावयाचे असतात.  ते महारांस कसे मिळाले ?  हे केवळ बहामनी बादशहाने नवीन दिल्याने मिळण्यासारखे नसून पुरातन चालत आलेले, मध्यंतरी मागे पडलेले व पुन्हा उजळलेले दिसतात.  अशी महत्त्वाची सनद मुंगी पैठण (महाराष्ट्राची अति प्राचीन राजधानी) येथे ब्रह्मवृंदाची व इतर हक्कदारांची सभा होऊन देवळात मंजूर झालेली आहे.  हे हक्क ब्राह्मण-मराठयांकडूनच उगवून घ्यावयाचे नसून, तेली, तांबोळी, कोष्टी, न्हावी, परीट, चांभार, मांग, जीनगर इ. वरील खालील तमाम जातींकडून महारांनी आपली कामे काय काय करून घ्यावयाची हेही तेथे सांगितले आहे.  लग्नटक्का २। व पायली तांदूळ वगैरे हक्क आता जे ब्राह्मण घेत आहेत, ते महारांना मिळावयाचे असे स्पष्ट नमूद आहे.  ह्यांत मांग वगैरे इतर अस्पृश्यांचा संबंध नाही अशीही सोडवणूक केली आहे.  ह्यावरून पूर्वी मांगांचेही असेच मालकी हक्क असावेत अशी शंका येते.  कारण काही प्रांतांत मांगांची लहानसान राज्ये होती, असे मागे आठव्या प्रकरणात सांगितले आहे. (पान १०५ पाहा.)  जकातीचे हक्क हल्ली आंग्लाईत मध्यवर्ती बादशाही आहेत.  पण मध्ययुगात हे रस्ते राखण्याचे काम जंगलांत व डोंगरांत राहणाऱ्या ह्या विश्वासू व काटक जातीनेच केल्यामुळे हा जकातीचा हक्क त्यांच्याकडेच उरला असल्यास नवल कोणते ? आणि प्रत्येक गावाशिवाराची अतिशय उत्पन्नाची जमीन महारांच्या मिराशीची असल्याचे तरी काय नवल ?  अशा महत्त्वाच्या सनदेची पहिली उजळणी झाली तेव्हा ''एणे प्रमाणे सनद पैठणचे मुक्कामी एकनाथस्वामीचे रावळांत जाहली हे तुम्हास कळावे.  पांढरीस कळावे.  आठरा लाख सोमवंशास कळावे.'' अशी दखलगिरी अभिमानाने करणे साहजिक आहे.

भारत इतिहास संशोधक मंडळाचे चतुर्थ संमेलन-वृत्त, पान ५३ वर प्रसिध्द संशोधक वि. का. राजवाडे ह्यांचा खालील आशयाचा कागद प्रसिध्द झाला आहे.

दामाजीपंत व विठया महार

१.  ''सातारकर महाराजांच्या दप्तरात नकलेची नकल केलेला एक महजर सापडला.  त्यात शहरांत व खेडयात महारांना कोणकोणते हक्क पूर्वापार आहेत याची यादी दिली आहे.  मूळ महजर बेदरची पादशाहत असताना झाला.  तदनंतर एकनाथस्वामीच्या मृत्यूनंतर पैठणास एकनाथाच्या देवालयात पुनः मूळ महजराची उजळणी झाली.  ही उजळणी हिजरी सन १०५१ श्रावण शुध्द १३ रविवारी झाली.  (शके १५६३) .... महारांच्या हक्कांचा तपशीलवार निर्देश केल्यावर खालील वाक्ये ह्या सारांशात आली आहेत :

'' हे देणे पाच्छायाचे व दामाजीपंत ह्याच्या हातचा कागद असे.  विठया महार मंगळवेढयाचा पाच्छायाचे कामी पडला.  व दामाजीपंत कामी पडला म्हणोन पादशहाणी विठया महारास हक करून दिले.''

ह्या वाक्यानंतर आणखी काही राहिल्यासाहिल्या हक्कांचे गणन करून पुनः खालील हकीकत लिहिली आहे :

''बेदरास जाऊन पाच्छा व याची लेक बेगम आनली आणि पाच्छाव यासी हात जोडोन उभा राहिला.  पाच्छाव याचे घोडयाची जागल करावयास गेला.  तो तेथे मांग चोरीस आला.  तेव्हा महार जागा होता.  मग पाच्छाव यास जागे केले.  विश्वासूक महार ठरला.  म्हणोन घोडा वरातीस दिल्हे.  अंबरनाक महार यास कृपा करून दिल्हे.  बाच्छाव याची तीळकोठीतील कोठाडी लुटल्या.  त्याजबद्दल तगादा दामाजीपंतास केला.  ते वेळेस श्री विठोबाचे विठया महाराने रूप धरून बाच्छाव याची रसद पोचती केली.  दामाजीपंताचा पैका भरून विठया महाराने दिल्हा आणि बाच्छायाणे पुनः पावती दिली व दामाजीपंत याजपाशी विइया महाराने आनोन दिल्ही.  बाच्छाव यांणी चौकशी केली व दामाजीपंत याची चौकशी केली.  त्याजवरून विठया महार यास दर उपकार पोटास भाकरी व बसावयास जागा करून दिल्ही.  महाराचे बंदोबस्त करून दिल्हे.''

ह्या महजरीवरून राजवाडे ह्यांचे असे म्हणणे आहे की, मंगळवेढयास विठया नावाच्या एका खरोखर असलेल्या ऐतिहासिक महार गृहस्थाने दामाजीपंतावर आलेले संकट जाणून आपल्या स्वतःचे जमिनीत पुरलेले द्रव्य परस्पर बादशहाकडे भरणा करून त्याची पावती दामाजीपंतांना आणून दिली.  पुढे ह्या गोष्टीला काव्यमय स्वरूप येऊन विठया महाराचे ऐतिहासिक अस्तित्वाचा लोप झाला व त्याला श्री विठोबाचे रूप आले.

ते कसेही असो.  वर निर्दिष्ट केलेले जे ५२ किंवा जास्त हक्क आहेत, त्यांपैकी काही क्षुल्लक आहेत तर काही फारच मोठे म्हणजे खुद्द राजकीय सत्तेनेच उपभोगावयाचे आहेत.  शिवाय हे हक्क एकादोघा महार व्यक्तीचे नसून ग्रामसंस्थेत प्रतिष्ठित झालेल्या सगळया महार जातीने हे हक्क उपभोगावयाचे आहेत, हे वर निर्दिष्ट केलेल्या ''आठरा लाख सोमवंशाला कळावे'' ह्या घोषणेवरून सिध्द होते, हे ध्यानात घेण्यासारखे आहे.

हल्ली अस्पृश्य बनलेल्या सर्वच जातींनी पूर्वी राजवैभव किंवा जमिनीचा मालकी हक्क अनुभवलेला आहे असे म्हणणे मुळीच नाही.  पण ह्यांपैकी बऱ्याच जाती पूर्वी उत्तम स्थितीत होत्या, त्याचे पुरावे अशा ह्या सनदांतून अद्यापि संशोधकांस आढळतात, एवढेच सांगणे आहे.  इतकेच नव्हे, ह्या दैवहतक जातींचे पूर्वीचे गेले ते गेलेच, उलट मध्ययुगातील ह्यांच्या गुलामगिरीचेही पुरावे अशा सनदांतून आढळतात, तेही उघडकीस आणणे आमचे काम आहे.

शिवेचा वाद पडल्यास ह्या पुरातन मालकांची साक्ष घ्यावी, त्यांच्याकडून दिव्ये करावीत हे ठीक आहे.  पण एखाद्या किलल्याची भिंत चढेनाशी झाली, एखाद्या तळयात पाणी ठरेनासे झाले, तर त्याखाली नेमके एका गरीब महारास किंवा धेडास बळी द्यावयाचा रिवाज होता.  तो त्याच्या असह्य गुलामगिरीचा द्योतक आहे.  

प्राचीन रोमन राष्ट्रांत एखादे दिव्य करावयाचे असल्यास आपल्या घरच्या विकत घेतलेल्या गुलामांकडून ते करावयाचे अशी चाल असे; किंवा जीवास जीव मोबदला द्यावयाचा असल्यास गुलामांचा जीव देण्याची चाल असे हे मी वाचले आहे.  तोच प्रकार ह्या अस्पृश्य असहायांना बळी देण्याचा दिसतो.  पाटण नावाची गुजरातची प्रसिध्द राजधानी होती.  तेथे इ.स. १०९४-११४३ पर्यंत प्रसिध्द सिध्दराजा राज्य करीत होता.  त्या वेळी तेथील तळयात पाणी ठरेना म्हणून मायो नावाच्या धेडाला बळी दिल्याचे उदाहरण प्रसिध्दच आहे.  मायो आपला जीव लोककार्यास्तव वाहण्यास सिध्द झाला म्हणून त्याने मागितलेला वर म्हणून त्याच्या तिरस्कृत जातीला शहरांजवळ व गावांजवळ राहण्यास परवानगी देण्यात आली.  (काठेवाड डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर, पुस्तक ८, पान १५७ पाहा.)  पण त्याचाच बळी का घेण्यात आला, ह्या प्रश्नाचे उत्तर त्याला इतर वरिष्ठांप्रमाणे स्वतंत्र जगण्याला हक्क नव्हता, तो गुलाम जातीत जन्मला होता, हेच.  तसेच पुढील उदाहरण रा. ब. गणेश चिमणाजी वाड बी.ए. ह्यांनी निवडलेल्या सनदा व पत्रे ह्यांत प्रकरण २, पान ७ वर दिले आहे.

बेदरच्या बादशहाचे ताम्रपट

''इनामपत्र येसाजी नाईक चिबे, हैबतजी नाईक खोमणे, हणमंतजी नाईक भाडवलकर यास बेदर पातशाही सुरू सन सबा समानीन खमस मया, हे ताम्रपत्र लिहिले जे :  किल्ले पुरंधर येथे शेंदरी बुरजास कामास लावले, तेव्हा काम शेवटास जाईना.  सबब पादशहास दृष्टांत जाहला जे, जेष्ठ पुत्र व ज्येष्ठ सून अशी उभयता बुरुजात दिल्ही असता काम शेवटास जाईल.  असा दृष्टांत होताच, पादशहा जागृत होऊन येसाई नाईक चिबे यास वर्तमान सांगितले.  तेव्हा येसाजी नाईक म्हणो लागले जे मी आपला पुत्र व सून देतो.  मग बहीरनाक सोननाक याचा पुत्र नाथनाक व देवकाई अशी उभयतां आश्विन वद्य अष्टमीस शेंदरी बुरुजात गाडली.  मग बुरुजाचे काम सिध्दीस नेले.  मग पादशहा बेदराहून निघोन किल्ले पुरंधरास आले.  तेव्हा शेंदरी बुरूज पाहून बहुत खुषमर्जी होऊन येसजी नाईक ह्यांस पुरंदर किल्ला सरंजामसुध्दा दरोबस्त बक्षिस दिला.  बहीरनाक सोननाक यास किल्ले पुरंदर येथे होन २०५ (दोनशे पाच) होन दिल्हे.  व न्हावी, भोंगोली सातशे पाच होनाचे दोन गाव दिल्हे.  नंतर बादशहाची स्वारी बेदरास गेली.''

हिंदुपदबादशाही नवीन निर्माण करणाऱ्या श्री शिवाजीने रोहिडा किल्ल्यावर अटकेत ठेवलेल्या वाडीकर महाराला आपला खंड ऊर्फ लाच देऊन आपली सुटका करून घेण्याचे सामर्थ्य नव्हते.  एवढयाच कारणावरून रायगडच्या सर्जा बुरजाखाली त्या बिचाऱ्याला पुरण्याची सजा दिली; तीदेखील ह्या गुलामगिरीचेच उदाहरण.  ज्या बहीरनाक महाराने आपला ज्येष्ठ पुत्र नाथनाक व ज्येष्ठ सून देवकी हिला बळी दिले, तो केवळ गुलाम होता काय ?  एरवी येसजी नाईक मराठयाने आपला पुत्र बळी देतो म्हणून बादशहास सांगून शेवटी बहीरनाकाच्या मुलास कसे दिले ?  त्याच्या घरच्या विकत घेतलेल्या गुलामाची ही कथा की काय ?  काही असो, ज्येष्ठ पुत्रास दत्तकही देणे अधर्म आहे.  पण त्यास बळी दिला.  बहीरनाकाचा हा अविचार झाला, म्हणून त्याच्या घराण्याला अविचारे हे आडनाव पडले.  सासवड तालुक्यात अवचरे ह्या नावाचे महार घराणे वरील बादशाही उत्पन्न भोगणारे भिवंडी गावी अद्यापि आढळते.

असो.  महाराष्ट्राच्या राजकारणात मध्ययुगात किंवा मराइी रियासतीत महाराइतका मांग किंवा इतर अस्पृश्यांचा उल्लेख आढळत नाही.  महार व मांग ह्यांचे हाडवैर असल्याचे व त्यांच्यांत तंटे असल्याचे अजूनदेखील दृष्टोत्पत्तीस येते.  मराठयांनी जसे महारांस जिंकले, तसे त्यापूर्वी मांगांना महारांनी जिंकले असेल काय ?  पण ह्यासंबंधी काही पुरावा नाही.  महार हे मध्ययुगात जमिनीचे मालक, वतनदार,निदान बलुतेदार म्हणून तरी वावरत आलेले आहेत.  इंग्रजी अमलापूर्वी व नंतरही महार ही जात अत्यंत इमानी अशी ख्याती चालत आलेली आहे.  सरकारी खजिना बिकट परिस्थितीतून सुरक्षित पोचविण्यासंबंधी त्यांची वाहवा अद्यापि कानांवर येते.  रा. बहादूर वाड ह्यांच्या रोजनिशीच्या प्रसिध्द झालेल्या ९ भागांतून 'देशातील बंडे' सदराखाली भिल्ल, कोळी, रामोशी, बेरड वगैरेंच्या धामधुमी वाचण्यास मिळतात.  पण महार जात गुन्हेगार ह्या सदरातही आढळत नाही.  उलट मध्ययुगीन हिंदुराज्य असो, मोगलाई असो, मराठेशाही असो, किंवा आंग्लाई असो, चालू सत्तेशी जिवापाड इमानाने राहून शेवटी जीवही अर्पण करण्याचा निष्ठेचा बहाणा ह्या जातीचा दिसतो.  ह्या बाबतीत ब्रिटिश सी.आय.डी. खात्यातील बडे पेन्शनर इतिहासज्ञ श्री. बाबासाहेब देशपांडे ह्यांनी मोठया अभिमानाने महारांसंबंधी अत्यंत अनुकूल अभिप्राय मला समक्ष दिला आहे.

नाशिक आणि ठाणे ह्या दोन जिल्ह्यांचे हद्दीवर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वाघेरा म्हणून एक जुना डोंगरी किल्ला आहे.  तो आता ओसाड पडला आहे.  आजूबाजूस कोळी लोकांची वस्ती आहे.  तेथे पूर्वी परवारी जातीचा राजा होता अशी माहिती मिळते.  पण परवारी जात सेन्सस रिपोर्टातही आढळत नाही.  महारांना तिकडे परवारी म्हणत असावेत.  हल्ली ब्रिटिश पलटणीतून पेन्शन घेतलेली जी कोणी सुभेदार, जमादार कोकणी महार मंडळी माझ्या ओळखीची आहेत, त्यांच्या जुन्या सर्व्हिस बुकांतून त्यांची जात परवारी असे नमूद केलेले मी स्वतः पाहिले आहे.  पूर्वी मद्रासकडे प्रथम पारिया पलटणी इंग्रजांनी उभ्या केल्या.  त्यानंतर इकडील काही कोकणी महारचांभारांची इंग्रजी लष्करात भरती झाली.  त्यांनाच चुकून परवारी असे म्हटले असणे संभवनीय आहे.  वाघेऱ्याच्या ह्या परवारी राजाचे राज्य गेले.  त्याच्या तैनातीतले काही महार, कोळी वगैरे सावरगाव, गोरठाणे वगैरे ठिकाणी राहत आहेत अशी ऐकीव माहिती आहे, पण हा राजा स्वतः महार, मांग, की कोळी होता हे निश्चित होत नाही.  मात्र तो मारला गेल्यावर त्याची बायको सती गेली व जवळ जो घाटरस्ता आहे त्याला हल्ली सतीघाट हे नाव आहे, असे सांगतात.  इकडील कोळी मृतमांस खातात असेही एकाने सांगितले.  पण ते अस्पृश्य खास नाहीत.  सुरतेकडे मांगेले नावाचे कोल-कोळी वंशाचे लोक आहेत.  पण तेही अस्पृश्य नाहीत. (मागे प्रकरण आठवे, पान १०५ पहा.)

ते कसेही असो.  कोणत्याही जातीचा मनुष्य असो, तो लष्करी पेशात राहून वाढला किंवा निदान पोलिसांत राहून मानमान्यतेला चढला, तर त्याला एक प्रकारचा सामाजिक आढयपणा येतोच.  त्याबरोबर सामान्य धर्माचा सोवळेपणाही येऊन, तो धर्मगुरू ब्राह्मणांच्या आश्रयाखाली जाऊ पाहतो.  महारांची लग्ने ब्राह्मण उपाध्यायांनी लावण्याचा रिवाज नाही असे मी म्हटले आहे.  (मागे प्रकरण ९ वे, पान ११८-१२० पाहा.)  पेशवाईच्या अखेरीस लष्करी नोकरपेशात इभ्रतीत चढलेल्या काही महारांनी आपल्या जातीतील काही लग्ने ब्राह्मण वतनदार जोशांकडून लावून घेण्याचा आग्रह धरला व तो काही वेळ टिकवलाही.  पण अखेरीस सवाई माधवरावांकडे फिर्याद होऊन महारांचा हा डाव फसला.  तो येणेप्रमाणे :


महारांची लग्ने जोशांनी लावण्याबाबत

सवाई माधवराव पेशवे यांची रोजनिशी (वाड यांनी संपादिलेली, भाग १८, पान २७९ इ.स. १७८५-८६)

''रघुनाथ ज्योतिषी बिन त्रिंबक ज्योतिषी व कृष्ण ज्योतिषी बिन दामोदर ज्योतिषी मामले पाल पंचमहाल याणी हुजूर विदित केले की, तर्फ कोरबरशे ऊर्फ पौड खोरे येथील वृत्ति पुरातन आमचेकडे आहे, त्यात महारांची लग्ने तर्फ मजकुरी ज्योतिष्यांनी लावण्याची चाल पुरातन नसता, सन अर्बा समानीनात आप्पाजी कृष्ण कमावीसदार याजकडे तर्फ मजकूरचे महार फिर्याद होऊन आपली लग्ने ज्योतिषी याणी लावावीत, ते लावीत नाहीत म्हणोन सांगितल्यावरून पुर्ती चौकशी न करिता पेशजी रखमाजी वाकडे हवालदार कोरीगडास होते त्यांचे वेळेस किल्ल्याचे चाकरमाने महारांचे लग्न लावण्याचे होते, ते समयी लग्न लावणार मेढया महार हाजर नव्हता, सबब किल्ले मजकूर हवालदार व सबनीस याणी आमचा बाप, भाऊ विनायक ज्योतिषी दहापंधरा वर्षांचा अज्ञान होता, त्यावर निग्रह करून महारांचे लग्न लावले.  त्यास आजमासे पंचावन्न वर्षे झाली.  तेवढयाच दाखल्यावरून महारांची लग्ने ज्योतिष्यांनी लावीत जावी म्हणोन कमावीसदारांनी महारास भोगवटीयास पत्र करून दिल्हे.  आम्ही अतिशूद्राचे लग्नास मुहूर्त मात्र सांगतो, लग्ने लावण्याची नवी चाल होणार नाही असे उत्तर केले.  कमावीसदारांनी विषाद मानून.... जबरदस्ती करून आमचे वतनाची जप्ती करून वृत्तीचे कामकाजास नवा गुमास्ता ठेवला.... येविशीची चौकशी करून दाखले मनात आणता, महारांची लग्ने ज्योतिषांनी लावण्याची चाल फार करून नाही, कोठे कोठे लावीतही असतील; परंतु कोकणप्रांती नाही.  त्म्यांचे जातीत मेढेमहार आहेत तेच लावतात.  याप्रमाणे तळकोकणचे जमीनदार व ज्योतिषी हुजून आहेत त्यांणी विदीत केले.  वेदमूर्ती रंग जोशी जुन्नरकर यांणी लिहून दिले की, शहर जुन्नर बरहुकूम पेठासुध्दा व तर्फेचे गाव पाऊणशे व शिवनेर वगैरे किल्ले पाच ह्या ठिकाणी ज्योतिषपणाची वृत्ती परंपरागत आपली आहे परंतु आपले वृत्तीत अतिशूद्राची लग्ने आम्ही लावीत नाही.  अतिशूद्राचे जातीत ढेगोमेगो (पुढारी) आहेत, तेच त्यांची लग्ने लावीत आले असता, पूर्वी एक वेळ किल्ल्याचे चाकरमाने व प्रांतातील दोनचार हजारपर्यंत महार मिळोन व गवगवा करोन औरंगजेब बादशहाजवळ फिर्याद केली, तेव्हा त्याणी पुरातन चाल मनास आणून ज्योतिषी यांनी महारांची लग्ने लावू नयेत असा ठराव केला, त्याप्रमाणे हा कालवर चालते.'' ...याचा निवाडा महारांच्या उलट व ज्योतिषांना अनुकूल झाला तो असा :

''सदरहू अन्वये समस्त महार तर्फ कोरबारसे ऊर्फ आप्पाजी कृष्ण यांजकडून पत्र करून घेतले आहे, ते ज्योतिषी याजवळ माघारां देणे.  तुमचे जातीमध्ये मेढे महार लग्ने लावीत असल्याप्रमाणे लावतील या उपरी ज्योतिषी ह्यास खटला केल्यास मुलाहिजा होणार नाही.''

मागे धर्म ह्या नवव्या प्रकरणात मंदिर प्रवेशाच्या हल्लीच्या सत्याग्रहाच्या चळवळीला राजकारण म्हटले आहे (पान १२३ पहा.)  त्याचप्रमाणे ह्याही प्रयत्नाचा मी राजकारणातच समावेश केला आहे. असो.  आता आपण मराठेशाहीच्या अखेरीस व हल्लीच्या ब्रिटिश अमलाच्या अगदी हद्दीवर येऊन पोहचलो आहोत.  येथून अगदी नव्या मनूत आम्ही शिरणार, हे वाचकांनी ध्यानात आणावे, व आपला दृष्टिकोण अगदी बदलून पुढील विषयाचे अवलोकन करावे.

भारतीय राजयघटनेवर द्राविड, आर्य, शक, हूण, म्लेंच्छ इ. अनेक नावांखाली हल्ले ह्या कालापर्यंत झाले.  पण त्यांत समाजशास्त्रदृष्टीने विशेष फरक नव्हता.  पण दोन शतकांपूर्वीपासून हिंदी राज्यपध्दतीवरच नव्हे तर समाजपध्दतीवरही युरोपातून जो अपूर्व हल्ला चढविण्यात आला आहे, त्यात एक विशेष आहे.  ह्या हल्ल्याने नुसत्या भारतीय बादशाहीत क्रांती झाली इतकेच नव्हे; तर प्रत्यक्ष युरोपातच एका नव्या जागतिक क्रांतीचा उदय झाला होता, तिचा प्रवेशही ह्या जरठ भारतीय समाजात होऊ लागला.  ही क्रांती म्हणजे औद्योगिक जगातील मजुरांच्या बाहुबळात यांत्रिक शक्तीची अपूर्व भर पडून, अगोदर समाजाचा सांकेतिक पायाच बदलला आणि मग त्यावरची केवळ रूढिवशात चाललेल्या वर्गावगाअची तारांबळ उडाली हे दृश्य होय.  मात्र ही उलाढाल एकाच रात्री घडून आली असे नव्हे.  उलट ह्या भरतखंडात, दोन भिन्न दृष्टीने जी समाजरचना दृढ बनून जवळ जवळ अनादी भासू लागली होती; ती रचना आज झपाटयाने बदलत आहे. मात्र ती अजूनही नामशेष व्हावयाला वेळ लागणार आहे.

पहिली दृष्टी धर्माची आणि केवळ भावनेची.  तिच्यामुळे वर्णव्यवस्था म्हणून एक रचना घडली होती.  व दुसरी तिच्याहून पुरातन, स्वाभाविक व बळकट दृष्टी अर्थाची, जी मानवी गरजांच्या पायावर रचली गेली होती; तिच्यामुळे ग्रामसंस्थेचा पाया घातला गेला.  भारतवर्षात मौर्य कालापासून जरी मोठमोठाली साम्राज्ये विकास पावली व विसकटली तरी भारतवर्ष म्हणजे केवळ खेडेगावांचा समुदाय आणि कृषिप्रधान समाजाचा एक अवाढव्य गट होता.  अयोध्या, मथुरा, अवंती, कांची, काशी, द्वारावती अशी शहरे केवळ हाताच्या बोटांवरच मोजण्यासारखी होती किंवा उरत.  जी नाश पावत त्यांचा पुनः खेडयांतच विलय होत असे.  नद्या जसे आपले ओघ बदलत आल्या आहेत, तशीच रणांगणे व नृपांगणे, क्षेत्रांगणांतून आपले रूप बदलीत असत.  इतकेच काय पण ब्राह्मण, क्षत्रिय म्हणविणाऱ्या स्वयंमन्य जमाती धुळीस मिळून शूद्र अतिशूद्र बनल्या आहत व उलटही प्रकार सामाजिक इतिहासाच्या परडयात घडले आहेत.  फक्त पाहणारास डोळे व ऐकणारास कान मात्र पाहिजेत !

ग्रामसंस्था ऊर्फ गावगाडा नावाचे एक अस्सल मराठी भाषेच्या साध्या सौंदर्यात नटलेले पुस्तक, इ.स. १९१५ साली श्री. त्रिंबक नारायण अत्रे ह्यांनी लिहून प्रसिध्द केले आहे.  हे अत्रे ब्रिटिश मुलखातील एक मुलकी अधिकारी असून बादशाही संशोधन खात्यातील एक मार्मिक मदतनीस होते.  भारतवर्षातून विशेषतः महाराष्ट्रातून ग्रामसंस्थेचे जे उच्चाटन ब्रिटिश रियासतीतून जाणून व नेणूनही चालले आहे, ते विशेष न शिकलेल्या लोकांनाही ह्या लहानशा पुस्तकांवरून कळणार आहे.  तिन्ही वर्णांचा व शूद्रातिशूद्रांचाही प्रचंड ओघ आज दोनशे वर्षे खेडयांतून शहराकडे चालला आहे, त्यामुळे वरील गावगाडयाचे स्वरूप थोडयाच काळात केवळ अशा पुस्तकांतूनच उरणार आहे. कुणबी म्हणजे शूद्र; आणि अडाणी म्हणजे कुणबी अथवा प्रतयक्ष श्रम न करणारे, वरचे अथवा खालचे सर्व प्रतिष्ठित-अप्रतिष्ठित वर्ग, अशा मार्मिक अर्थाने हे शब्द ह्या पुस्तकात वापरले आहेत.  ''फुकटखाऊपणाचे सर्व अवगुण अडाण्यांत जसे शिरले तसे कुणब्यांमध्येही उतरले.  चौकोनी चिरा बनविण्यासारखी परिस्थिती जातिधर्माने व वतनी पध्दतीने गुदमरली म्हणून कुणबी व अडाणी ह्यांचे सर्वसामान्य ज्ञान अगदी शून्यावर येऊन बसले.  तसेच अनेक शतकांच्या गुलामगिरीमुळे दुसऱ्याच्या पागोटयावर नजर ठेवण्याची खोड त्यांना लागली, आणि स्वाभिमान व प्रामाणिकपणा नष्ट झाला.  हा त्यांचा दोष नव्हे.  जातिधर्म व त्याचे अपत्य वतनपध्दती ह्यांचा हा दोष आहे.''  (गावगाडा, पान २१७) हे विधान अत्यंत खोल आणि खरे आहे.  चूक एवढीच की, जातिधर्म व त्याचे अपत्य वतनपध्दती असे नाते नसून वतनपध्दती व तिचे अपत्य जातिधर्म असा वारसा सबंध हिंदी समाजशास्त्र ओरडून सांगत आहे !  वतनपध्दती, जातिधर्माहून फार पुरातन आहे.  कारण हिंदी ग्रामसंस्था हिंदू वर्णव्यवस्थेला आजीबाई शोभेल इतकी जुनी आहे.  वर्णव्यवस्था ही एक भावनेचे जाळे आहे.  ग्रामसंस्था स्वाभाविक गरजांच्या नियमावर उभारली आहे.  म्हणून अधिक काळ टिकली आहे.  जातिधर्म हा एक भावनेचा विंचू आहे.  तर अस्पृश्यता तिला मागाहून फुटलेली नांगी आहे.  पुरातन ग्रामसंस्थेत एकामागून एक विकास पावलेल्या जातिधर्माने व शेवटी अस्पृश्यतेने आपापली घरे केलेली आहेत.  पण भारतवर्षात युरोपियनांबरोबर आलेल्या जागतिक क्रांतीमुळे ही घरे ऊर्फ छिद्रे आता हळूहळू बुजत चालली आहेत.

मोगलाईतील व स्वराज्यातील काही मराठी उताऱ्यांवरून दिसून येते की, निदान महाराष्ट्रातील काही अस्पृश्य मानलेल्या जाती केवळ अलुते-बलुतेदारच नसून, चांगले परंपरेचे वतनदार होते; इतकेच नव्हे, त्यांतील काही व्यक्तींनी शिलेदारी करून आपल्या तलवारीचे पाणी स्वकीय-परकीय गलीमांना पाजण्याची मिळालेली दुर्मिळ सुसंधी दवडलेली नाही.  इतर प्रांतांतील जुने-नवे वाङमय असेच धुंडाळल्यास भावी संशोधकास इतर प्रांतांतल्या 'अस्पृश्यां'मध्येही अशा जाती व व्यक्ती सहज आढळतील.  आणि मी जो ह्या हतभागी जातींच्या उज्ज्वल भूतकालाचा सुगावा ह्या ग्रंथद्वारे हुडकीत आहे, तो त्यांना सापडून ते माझ्यापेक्षा अधिक यशस्वी होतील.

ते कसेही असो, मध्ययुगात, आज अस्पृश्य मानलेल्या सर्व जाती, धर्म आणि अर्थ या दोन्ही दृष्टींनी केवळ नामोहरम झाल्या होत्या.  गावगाडयातील श्रमविभाग आणि हक्कवारसा खालीलप्रमाणे ठरला होता.  उच्च म्हणविणारे वरील तिन्ही वर्ण, अडाणी ऊर्फ बैठे किंबहुना ऐतखाऊ बनले.  काळी असो पांढरी असो, जमिनीचा मालक कोणीही ठरो, तिचा कामचलावू ताबा मात्र कुणब्याकडे आला व ते केवळ श्रमाचे अधिकारी झाले. गावकीच्या कसबी कामाची जबाबदारी व हक्कवारसा अठरा पगड जातींनी ऊर्फ बलुतेदारांनी उचलला.  ह्यात ज्योतिष्यांपासून तो ढोरांभंग्यांपर्यंत सर्वांच्या मिसली ऊर्फ हक्कमर्यादा निर्विवाद ठरल्या.  मैला उचलणारा भंगी व फाशी देणारा मांग (अर्थात ह्यांची कामे शहरांतूनच चालणारी) ह्यांनीदेखील आपली मिराशी ठरविली होती.  म्हणजे त्यावरील अतिक्रमण त्यांना असह्य असे.  शेवटी शिल्लक उरली ती बेकारी ऊर्फ महारकी.  ''गावकीच्या कसबी कामाची जातवार वाटणी झाल्यावर बेगार काम उरले; ते कोणतीही हुन्नरी जात पतकरीना.  असे हे पडून राहिलेले काम महारांच्या गळयांत पडले; म्हणूनच महार म्हणत की, आम्ही काय पडल्या कामाचे चाकर.  जे काम करण्याला अभ्यास, कला किंवा विशेषसे ध्यान नको त्याला बेगार म्हणतात.  रोख मेहनतान्यावाचून करावे लागते त्या कामाला तेलंगणात 'वेट्टी' म्हणतात; तेव्हा ह्या शब्दापासून 'वेठ' शब्द निघाला असावा.  गावगाडयाचा खराखुरा वेठबिगारी किंवा हरकाम्या फरास महार होय.''  (गावगाडा, पान ४९).  बेगार म्हटल्याबद्दल महारांना राग येण्याचे कारण नाही.  महाराष्ट्रात दुसरी बेहुन्नरी जात अगर जमात म्हणजे मराठे अगर कुणबी हीच होय.  महारांत मराठयांत फरक इतकाच की, रोख मेहनतान्यावाचून मराठा कधी कोणतीही बेगारी करणार नाही - मग ती बेगारी मुलखगिरीच्या नावाने खपो अगर भांडी घासण्याच्या नावाने चालो.  महाराला रोखीचा हक्क नसे.  तो मराठयांचा हुकमी बंदा.  पण त्याला पुरातन जमिनीचे हक्क असत.  बेगारी मराठा बहुधा उपऱ्याच असणार.  महाराष्ट्रात मराठयांच्याही पूर्वीचा महार खास होता.  मध्ययुगात केव्हाही मराठा स्वतंत्र आणि अतिक्रमण करणारा पण महार गुलामगिरीत रखडणारा आढळतो.  हाच प्रकार इतर प्रांतांतल्या क्षत्रिय व अस्पृश्य गणलेल्या वर्गांच्या परस्पर संबंधाचा आहे.  म्हणून भारतीय अस्पृश्यता ही एक भारतीयांचे भले मोठे दुष्ट राजकारण आहे, असे मी म्हणत आलो आहे.  ह्यात क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य ह्या तिघांची भागी आहे.

''मुलकी फौजदारी संबंधाने महारांची मुख्य कामे येणेप्रमाणे :  पट्टीसाठी असाम्यांना बोलावणे, वसूल तहसिलीत नेणे, कागदपत्र परगावी पोहचविणे, पाटील-कुळकर्ण्याबरोबर गावात व शिवारात हिंडणे आणि परगावी जाणे; गावात मुक्कामाला मोठे लोक अधिकारी आले म्हणजे त्यांच्यासाठी सरपण-चारा आणणे; जनावरांची मालीस करणे, दाणापाणी दाखविणे, शेण-लीद काढणे, त्यांच्या तळावर 'बशा' बसून राहणे, गावची व कामगाराची वेठबिगार वाहणे, वाटसरांना जंगलांतून नेऊन पोहचविणे, दौंडी देणे, गावची शीव व शेताच्या बांध उरुळया ध्यानात धरणे, त्या न मोडल्या जातील अशी खबरदारी घेणे व त्याबद्दलच्या भांडणात पुरावा देणे, दरोबस्त पिके व खळी राखणे, रात्री काळीत-पांढरीत गस्त घालणे, गावची जंगले व झाडे जतन करणे, जंगली जनावरे मारणे, रात्रंदिवस घाटात पहारा करणे, चोरवाटा व माऱ्याच्या जागा ह्यांची माहिती मिळविणे व त्या रोखणे, गावांत आल्यागेल्याची खबर काढणे, न देखल्या माणसांवर नजर ठेवणे, वहिमी माणसांची पाटलांना वर्दी देणे; गावातल्या माणसानमाणसांची चालचलणूक लक्षात ठेवणे, चोरांचा तपास लावणे व माग काढणे; चावडीपुढचे, वेशीपुढचे व गावचे रस्ते झाडणे, साफ ठेवणे, मेले जनावर ओढणे वगैरे होत.  ह्याशिवाय घरकी कामे महार करीत.  गावकीवर नेमून दिलेल्या महारांना पाडेवार म्हणत.  घरकी कामे करणाऱ्याला राबता महार, घर महार म्हणत.''  (गावगाडा, पान ४९,५०)

गावचे पोलीस, लष्कर, दिवाणी, वसुली, पोस्ट, हेर, सरबराई, म्युनिसिपालिटी, समाजसेवा, वगैरे कुल जबाबदारी महारांवर होती.  अर्थात ही सर्व जबाबदारी अखेर मराठा पाटलांवर होती, पण पाटलाला हरकदम महार जबाबदार होता.  गावगाडयातच नव्हे, तर बादशाही दरबारातही देशमुख-देशपांडयांचा तसाच पाटील-कुलकर्ण्यांचा हस्तक, तसाच पाठीराखा महार होता.  तसा कायद्याने किंवारिवाजात इतर कोणी नव्हता.  मग ही जात मराठयांबरोबर किंबहुना कांकणभर जास्तच राजकारणी होती म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.  ''वतनदार महाराची घरकी कामे येणेप्रमाणे आहेत :  कुणब्याचे बी, औत, काठी, वगैरे ओझ्यांचे शेतांत ने-आण करणे, दारापुढे झाडणे, गुरांचे गोठे साफ ठेवणे, सर्पण आणणे व फोडणे, मुऱ्हाळी जाणे, मिरासदार परगावी जाण्यास निघाला असता त्याचेबरोबर गडयाप्रमाणे जाणे, चिठ्ठयाचपाटया परगावी नेणे, मौतीची खबर परगावी पोचविणे, सरण वाहणे इत्यादी.''  (गावगाडा, पान ५०) एकूण महार म्हणजे नुसता एक सरकारी गुलाम नसून ग्रामसंस्थेतील एक पिढीजाद सर्वाजनिक गुलाम होता.  हे रहस्य काही और आहे.

महाराप्रमाणे मांगही एक बिनहुन्नरी बेकार दिसतो.  पण तो गावगाडयात महारापेक्षाही खाली दडपला गेला आहे.  ह्या दडपण्यात महाराचाही हात दिसतो.  ह्यावरून महाराच्याही पूर्वीचा हिंदभूमीचा पुत्र मांग दिसतो.  वर (पान १६०) जो दामाजीपंत आणि विठू महाराच्या नावानले एक महत्त्वाच्या जुन्या महजरीचा उल्लेख आला आहे, त्यात महाराच्या विशेष हक्कांची नोंद असून ''त्यात मांगांचा काही संबंध नाही'' असे ठिकठिकाणी बजावले आहे.  ''हरकी माहारकी सीतादेवी (जमीन) कुणब्याची मळणी जाहलेवर कुणब्याने सेतात महारास देत असावी.... १ मांगाचे लग्न रानात करावे.  ते दिवसी तिखटीचा मांडव घालून तीन मेढींचा करावा व रानात हल्यावर वरात काढावी.  गावात मिरवू नये, गाव पांढरीचा विडा त्यास द्यावा.  १ नगरीचे होळीचा नैवेद्य महाराने घ्यावा.  १ पोळयाचा निव्वेद व बैलाची ववाळणी माहाराने घ्यावी.  १ माहाराचे लग्नास मांगाणे पागुट व लुगडे देत जावे.  १ गाव पांढर मिळोन सरकारांचे पागेतला घोडा महाराचे वरातीस द्यावा.  मांगाहून वहिवाटदार - चालक हा खरा.  मांगाचा त्याचा संबंध नाही.  मांगाबद्दल कोणी बोलू लागल्यास तो जातीबाहेर पडेल.''  (भा.इ.सं. मंडळाचे चतुर्थ संमेलनवृत्त, पान ६४).  येणेप्रमाणे बेदरच्या बादशहाचे वेळी महाराने मांगावर वर्चस्व गाजवूनच न राहता, गावगाडयात त्रैवर्णिकाची जी खासगी गुलामगिरी ऊर्फ राबती त्याला करावी लागत होती, त्या राबतीच्या जाचातूनही स्वतःला सोडवून घेण्याची कारवाई केल्याचा वरील महजरीतच स्पष्ट ल्लेख आहे, तो असा :  ''देखमुख त्याचे घरात राबती महाराने करावी, त्यास पोटास भाकरी घालावी.  पाटील ह्याचे घरी महाराने राबती करावी, सबब त्याजला धडूत पांडरुनाबद्दल रुपये ६ देत जावे, दर रोज पोटास भाकरी घालावी.  ह्या सिवाय जमीन हराटीचे पाच बिघे देऊन राबती घ्यावी.  नाहीपेक्षा राबती विसी बोलू नये.''  (सदर वृत्त, पान ६३).  मराठी स्वराज्यात आणि विशेषतः आंग्लाईत ही राबतीची जबाबदारी महाराने अगदी संपुष्टात आणली आहे.  कर्नाटकातील देसाई-देशपांडयांचे पुरातन घराण्यांतूनही होलयांची राबतीची उदाहरणे अद्यापि आढळतात, तितकी महाराष्ट्रात महाराची आढळत नाहीत.  परंतु गाव स्वच्छ ठेवण्याची सार्वजनिक जबाबदारी खेडयांतून अद्यापि महारांकडेच आहे.  ''हे काम खासगी नसून सरकारी आहे, आणि ते घरकीचे आहे अशी महारांची समजूत होऊ देऊ नये, असे ता.२८ जून १८८८ च्या सरकारी ठराव नं. ४२७३ मध्ये फर्मावले आहे... गावचे रस्ते झाडण्याचे ते साफ नाकारतात.  कोणी मोठा अमलदार गावी येणार असल्यास ते गावकऱ्याचे मागे जिकडे तिकडे साफसूफ करण्याची निकड लावतात, आणि आपण फार तर चावडीपुढे आणि काही ठिकाणी येण्याजाण्याच्या रस्त्यावर खराटा फिरवतात.  ज्याचे हद्दीत घाण असेल त्याचेवर फौजदारी खटला होतो.  त्यामुळे स्वतः राबून किंवा महारामांगांना मोल देऊन जो तो आपली जागा साफ राखतो.''  (गावगाडा, पान ९४)

गावगाडयाची ही वतनी पध्दत ह्या युगात कोणत्याही दृष्टीने पाहता गैरसोयीची व कटकटीची आहे, हे नवीन इंग्रज सरकारच्या लक्षात प्रथमपासूनच आले आहे.  इतकेच नव्हे, तर पेशवाईअखेर आणि आंग्लाई-आरंभ दोन्ही डोळयांनी पाहून, लोकस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या परशराम कवीने केव्हाच भाकीत केले ...

पाटील कुळकर्णी नाव उगीच घालून दमले येरझारा
सत्ता साहेबी अगदी बुडाली महाराचा त्याहून तोरा ॥
(गावगाडा, पान ९४)

ह्यावरून लोकांना ही पध्दती डोईजड झाली होती.  इ.स. १८३९ च्या ऍक्ट २७ अन्वये शेव, फसकी, वागणीसारखे यच्चयावत पांढरी हक्क ऊर्फ मोहतर्फा उकळण्याची, झाडून सर्व वतनदारांना सरकारने मनाई केली आहे.  सर्व्हे सेटलमेंटप्रमाणे परगणे वतनदार व पाटील-कुळकर्णी यांना घुगरी, सळई, बलुत्यासारखे काळीचे हक्क उकळण्याची बंदी केली; आणि पाटील-कुलकर्ण्याची चाकरी वंशपरंपरेने कायम करून त्यांच्या परभारे उत्पन्नाबद्दल वसुली रकमेवर रोकड मुशाहिरा तोडून दिला आहे.  महार जागले ह्यांना मात्र मामूलप्रमाणे बलुते हक्क उकळण्याची मोकळीक सरकारने ठेविली आहे.  (सदर पान ६८) कुळकर्ण्याची कायमची वतनेही पुढे सरकारांनी रद्द केली व पगारी तलाठी नेमले.  पण महारमांगांच्या बलुत्याची कटकट अद्यापि दोहोंपक्षी चालूच आहे.  ह्यासंबंधी कायदे मंडळात अगदी अलीकडेही महाराष्ट्रात आणि वऱ्हाडात बरीच चळवळ वेळोवेळी झालेली आहे.  पण सोक्षमोक्ष झाला नाही.  गाव आणि महारवाडा ह्यांचे काही मासलेवाईक तंटे मात्र ध्यानात घेण्यासारखे आहेत.

''लाखेफळ, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर येथे महारांचा व गावचा लढा पडला.  गावची घरे १२५, लोकवस्ती सुमारे ८०० आणि महारांची लोकसंख्या सुमारे २००.  काळीत सुमारे १०० नांगर चालत होते.  लोक नांगरामागे महारांना चार पायल्या धान्य व रोजची भाकर देण्याला कबूल होते.  महारांचे म्हणणे असे पडले की, गावाला आठ महार लागतात, तर आम्हांला रोज दर घरची एक भाकर, सणावाराला सर्व महारवाडयाला वाढणे, पडयाची माती व कातडे, आणि शेतात पिकेल त्याचा दहावा हिस्सा बलुते ह्याप्रमाणे मिळाले पाहिजे ... सन १९०५ साली महार जागल्याच्या वतनासंबंधाने चौकशी चालू होती.  तेव्हा ते स्वच्छ म्हणत की, माणसी दहा रुपये दरमहा दिला तरी परवडणार नाही.  टाकळीभान, तालुके नेवासे येथील महारांना पाच वर्षे सस्पेंड केले; तेव्हा पुनः कामावर रुजू करून घेण्याच्या खटपटीसाठी हजार रुपये देण्यास कबूल झाले.  सन १९१२ साली पारनेर तालुक्यात वडनर बुद्रुक गावी निजामशाहीतील एक महार आला, आणि त्याने एकाचे दोन रुपये चौथ्या दिवशी देण्याचा धंदा सुरू केला.  ह्या धंद्यात सदर गावच्या महारांनी ६००-७०० रु. घातले.''  (गाववाडा, पान १०६-१०७) ही एक बाजू झाली.  पण हिला दुसरी बाजू आहे.  ती 'गाववाडा' कर्त्याच्या ध्यानात इ.स. १९१५ च्या सुमारास आली नसली तरी; अस्पृश्यतानिवारणाच्या तीन तपांनंतर आता प्रत्येक तालुकानिहाय खेडोखेडी उदयोन्मुख अस्पृश्य पुढारी आणि सनातनी हिंदू ह्यांच्यामध्ये नुसता वादच नव्हे तर मारामाऱ्या व रक्तस्त्राव होत असतात व आमच्या मिशनला मध्यस्थी करावी लागते हे काही खोटे नाही.  अस्पृश्यांनी मृतमांस न खाण्याची शपथ घ्यावी, पड ओढण्याचे नाकारावे, की लगेच बलुत्याची गोष्ट दूरच राहिली; पण अस्पृश्य डोईजल झाले म्हणून सनातन्यांनी त्यांना सडकून काढावे, त्यांची पिके कापावीत, त्यांचे पाणी बंद करावे असा क्रम चालला आहे व त्याची नीट दाद लागत नाही.  ब्रिटिश मुलूखच नव्हे तर उत्तरेकडे इंदूर अथवा दक्षिणेकडे भोरसारख्या संस्थानांतूनही अशा कटकटी आमच्याकडे नित्य येत आहेत.  मात्र ह्याला राजकारण हे नाव मिळत नाही !

आता आपण ब्रिटिश रियासतीत अस्पृश्यवर्गाची लष्करात भरती कशी काय झाली, ह्या रहस्यमय विषयाकडे वळू या.  ५७ हजार मैलांवरून येऊन मूठभर इंग्रज लोकांनी जो सारा भरतखंड आता आपल्या मुळीत वळला आहे; तो काही सर्व लष्कर विलायतेहून आणून वळला नाही.  मुसलमान लोकांचे हल्ले झाले ते त्यांच्या तयार लष्करी टोळयांनी केले.  हल्ले यशस्वी होतात हे पाहून ह्या टोळयांच्या मुख्यांनी येथे बादशाह्या स्थापल्या.  तसे युरोपियनांचे झाले नाही.  डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे सर्व तलवारी घेऊन नव्हे, तागडी घेऊन व्यापाराकरिता येथे आले.  पैकी फ्रेंचांनीच राज्यस्थापनेची हाव प्रथम धरली.  पण मायदेशातच म्हणजे फ्रान्स देशात क्रांती झाल्याने बारभाई माजून इतक्या दूर देशातले विधायक राजकारण फ्रेंचांना आवरले नाही.  म्हणून इंग्रजांनी फ्रेंचांचा डाव आपल्या मनावर घेऊन तो आपण यशस्वी केला.  इंग्रजांच्या लष्कर-उभारणीचा इतिहास त्यांच्या राजकारणी काव्याला अगदी शोभण्यासारखा आहे.  त्यांच्या प्रथम सुरत, मद्रास, कलकत्ता येथे माल उतरण्याच्या व भरण्याच्या वखारी होत्या.  त्यांच्या राखणीसाइी लाठीकाठीवाल्यांची शिबंदी होती.  तिचाच विकास हल्लीच्या अजस्त्र बादशाही सैन्यात झाला आहे.  क्लाइव्हसारखे आपल्या बापाला नकोसे झालेले उनाड पोर मद्रासच्या वखारीत कारकुनाचे काम करीत असता अर्काटच्या हल्ल्यात शिपायाचा पोषाख करून गेले.  तेथे त्याला राज्य स्थापनेची स्वप्ने पडू लागली !  मद्रासेकडे अर्काट येथे त्याला अकस्मात विजय मिळाला, म्हणून त्याने आपली मद्रासेकडील खोगीर भरती टोळी कलकत्त्याकडील कटकटीत नशीब काढण्यासाठी नेली.  त्या भरतीत प्रथम शिरलेले तामील पारियाही होते.  पारियाइतका स्वस्ता शिपायी जगात कोठे मिळणार ?  आपण भातावरचे पाणी पिऊन भात गोऱ्या सोजिरांना देणारा भाडोत्री शिपाई म्हणून त्याने इतिहासात नाव कमावले आहे !  अर्काटचा वेढा इ.स. १७५१ साली झाला.  ह्यानंतर बंगालची कारवाई होऊन इ.स. १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईनंतर दिल्लीच्या बादशाहीचे इंग्रज हेच दिवाण बनले  पुढे इ.स. १८१७-१८१८ मध्ये इंग्रजांच्या दुसऱ्या पळपुटया बाजीरावाशी खडकी, कोरेगाव व शेवटी अष्टे येथे तीन चकमकी उडाल्या.  पेशवाई बुडून इंग्रजांची वाट साऱ्या हिंदुस्थानात निष्कंटक झाली.  मराठयांच्या लढायांत ज्या पारिया पलटणी म्हणून दक्षिणेकडील लष्कर होते, त्यात महाराष्ट्रातील शूर महारही पुष्कळ होते.  त्यांचे नाव पारिया पलटणी पडण्याचे कारण हिंदुस्थानात लष्करात भरती प्रथम अस्पृश्यांतील पारियांचीच होय.  म्हणूनच महार शिपायांची जात परवारी अशाच नावाने नमूद होत असे.

मराठयांनी मिळविलेला शेवटचा विजय म्हणजे खडर्याची लढाई.  तीत शिदनाक नावाचा महार सरदार, पहिल्या शाहूच्या एकनिष्ठ मराठी सरदाराचा नातू होता.  तेव्हापर्यंत मराठयांशी एकनिष्ठ राहिलेले महार कोरेगावच्या लढाईचे वेळी सन १८१८ साली म्हणजे अवघ्या २३ वर्षांत उपऱ्या इंग्रजांना इतके कसे वश झाले, हा मोठा चिंतनीय विषय आहे.  कोरेगावची लढाई इंग्रज बहाद्दरांनी मोठया ईर्षेने मारली.  तेथे आता एक जुना रणस्तंभ भीमेच्या काठी उभा आहे.  त्या लढाईत कामास आलेल्या शेकडो शिपायांची नावे ह्या खांबावर कोरलेली आढळतात.  त्यांत एकंदर खालील २३ महार शिपायांपैकी २० शिपाई ठार झाले, व शेवटचे तीन जखमी झालेले आहेत.  १. सोमनाक कमलनाक नाईक, २. रामनाक येमनाक नाईक, पुढील १८ जण शिपाई होते :  ३. गोदनाक कोठेनाक, ४. रामनाक येसनाक, ५. भागनाक हरनाक, ६. अंबनाक काननाक, ७. गणनाक बाळनाक, ८. बळनाक कोंडनाक, ९. रूपनाक लखनाक, १०. वपनाक रामनाक, ११. विटनाक धामनाक, १२. रामनाक, गणनाक, १३. वपनाक हरनाक, १४. रैनाक वाननाक, १५. गणनाक धर्मनाक, १६. देवनाक, आननाक, १७. गोपाळनाक बाळनाक, १८. हरनाक हीरनाक, १९. जेटनाक द्यैनाक, २०. गणनाक लखनाक.  पुढील तीन शिपाई जखमी झाले.... २१. जाननाक हीरनाक, २२. भीकनाक रतननाक, २३. रतननाक धाननाक, एका लढाईत इतके महार कामास आले तर तेव्हा अवघ्या सैन्यात हिंदुस्थानभर किती अस्पृश्य मानलेले शूर दर्म होते, ह्याची आता नुसती सुपट कल्पना करण्यापलीकडे साधन उरलेले नाही.  निदान तूर्त आम्हांस उपलब्ध नाही.  ही निष्ठेची थारेपालट होण्याला केवळ दुसऱ्या रावबाजीचा दिवटेपणाच कारण नव्हे.  ईग्रजांची समयज्ञता, शिस्त आणि वेळेवर रोख पगार देण्याची प्रसिध्दी ह्या गुणांची भुरळ पडून इंग्रजांना अस्पृश्य मानलेलेच नव्हे, तर चांगले नरपती, गजपती, क्षत्रिय आणि भूदेव सोवळे ब्राह्मण आपल्या तलवारी आणि लेखण्यांसह वश झाले.  पण आमचा मुद्दा ही निष्ठापालट नसू, तो हा आहे की, अव्वल इंग्रेजीत जर अस्पृश्यांची इंग्रज लष्करातही इतकी चहा होती, तर आता ती कशी आहे ?

लेफ्टनंट जनरल सर जॉर्ज मॅकमन्न नावाच्या एका लष्करी गृहस्थाने नुकतेच म्हणजे इ.स. १९३३ फेब्रुवारी महिन्यात The Martial Races of India-  (हिंदुस्थानातील लढाऊ जाती) हे एक मोठे पुस्तक लिहून प्रसिध्द केले आहे.  त्यात इंग्रजांच्या पूर्वापार लष्करी धोरणाचे रहस्य चांगले रेखाटले आहे.  अगदी प्रथम वाक्यातच प्रस्तावनेत ग्रंथकार स्पष्ट म्हणतात की, हे पुस्तक हिंदुस्थानात हल्ली बळावत असलेल्या महात्मा गांधीरूपी विषावर एक उतारा म्हणून लिहिले आहे.  लष्करी अथवा लढाऊ जातीची मीमांसा करीत असता पहिल्या प्रकरणाच्या पहिल्याच प्याऱ्यात ग्रंथकाराने अशा जातींच्या यादीत मद्रासच्या पारियांचीच काय ती गणना केली आहे. ती अशी : ''शीख, पंजाबी, सरहद्द मुसलमान, मराठा, गुरखा, राजपूत आणि मद्रासचा पारिया.''  शेवटच्या पारियाविषयी "Whom Baba Gandhi never fathered" म्हणजे ''त्याला बाबा गांधीने कधीच आपल्या पंखाखाली घेतले नाही.''  असा ग्रंथकाराने मार्मिक शेरा दिला आहे.  अव्वल इंग्रेजीत हिंदुस्थानात जी चहूकडे बेबंदशाही माजली होती; तेव्हा इंग्रजांनी आपले नशीब काढताना प्रथम कोणकोणत्या जातींना हाताशी धरले ते सांगताना ह्या ग्रंथकाराने काढलेले पुढील उद्गार नमुनेदार आहेत.  ''जसजशी ह्या देशात अंदाधुंदी माजू लागली, तसतसे हिंदुस्थानाच्या सर्व भागांतून व्यापारीवर्गाच्या तांडयांची रखवालदारी करणारे अगर इकडून तिकडे जासूद अथवा हेर म्हणून कामगिरी करणारे काही बाजारीवर्ग तेव्हा मुबलक आढळत असत.  मद्रासेकडे (प्रथम ह्याच प्रांतात ब्रिटिशांनी अकरा एतद्देशीय पलटणी उभारल्या.)  नेटिव्ह ख्रिस्ती व पारिया जाती मोठया कामास आल्या.  पोटात दोन घोट दारू आणि खांद्यावर तपकिरी रंगाचा पट्टा मिळाला की एतद्देशीय रजवाडयांच्या कसलेल्या सैन्यांच्या सामन्याला उभा राहावयाला पारिया गडी कधी अपात्र समजला जात नसे.  (Martial Races of India,  पान १६९) ही झाली अव्वल इंग्रजीची ढब.

पुढे जसजसे इंग्रजांचे बस्तान येथे बसत चालले तसतसे लष्करात एतद्देशीय लोकांची भरती करण्याचे बादशाही धोरण बदलत चालले आणि तशी लष्करातून ह्या अस्पृश्यांना हळूहळू बेमालूम बंदी होऊ लागली.  मग इंग्रजांना येथील जातीचा लष्करी दृष्टीने अस्सल अथवा कमअस्सल हा भेदभाव सुचू लागला आणि हिंदी लष्कराचे 'अस्सलीकरण' सुरू झाले.  सदर ग्रंथकाराने ह्या निवडानिवडीला आपल्या नवव्या प्रकरणात Brahmanization of the Army - असे न समजता म्हटले आहे.  सन १८५७ सालाच्या शिपायांच्या बंडापर्यंत बंगाली पलटणीत एक जात लखनौकडील रजपूत आणि पुरभय्ये ब्राह्मण शिपायांचीच भरती होत असे.  ह्या मोठया बंडात ह्या दोन जातींनी पुढाकार घेतला म्हणून पुढे ह्यांची भरती बंद झाली.  ह्यापुढे हिंदी लष्करासाठी नव्या दृष्टीने निवड होऊ लागली.  जातिवंत इभ्रतदार, वतनदार जातींतून ही भरती व्हावी असे वळण पडत चालले.

''तिसऱ्या मराठा युध्दात (इ.स. १८०२-१८०३) मद्रासी सैन्याने आर्थर वेलस्लीच्या निशाणाखाली मोठी प्रसिध्दी मिळविली; लॉर्ड लेकच्या बंगाली सैन्यालाही मद्रासी सैन्याहून अधिक कीर्ती मिळविता आली नाही.  असे असूनही ह्या वेळेपासून एतद्देशीयांच्या भरतीच्या बाबतीत ब्राह्मणीकरणाचे (जातिवंत इज्जतीचे) धोरण माजू लागले.  ह्याचे कित्येक जुन्या इंग्रज अम्मलदारांना फार दुःख वाटू लागले. अव्वल मद्रासी लष्करात जुन्या पेंढारांची - पठाण, अरब, तुर्क, अफगाण, हबशी, मेक्रानींची - भरती होत असे.  हे पेंढार दक्षिणेकडील मुसलमान बादशहाच्या लष्करात पूर्वीपासून भरणा होत असे.  अजुनी दक्षिण हैदराबादेस त्यांची भरती होतच आहे.  ह्याचप्रमाणे दुसरा मोठा वर्ग पारियांचा.  पोटात दारूचे घोट आणि खांद्यावर पट्टा मिळाला की झाली ह्यांची युध्दाची तयारी !  ह्यांनी हिंदी रजवाडयांच्या बेशिस्त सैन्याशी जरी मोठया नावलौकिकाचा सामना केला तरी अखेरीस त्या बिचाऱ्यांना लष्करी इज्जत संपादन करता आली नाही.  ते राष्ट्रीय दर्जाचे नव्हते.  इंग्रजांना जर भारतीयांवर राज्य करावयाचे होते व तेही त्यांच्या खुषीने, तर त्यांचे सैन्यातील शिपाई भारतीय समाजात ज्ञातीय मान्यता पावलेलेच असावयास पाहिजे होते.  म्हणून ज्यांची गावात व शिवारात मानमान्यतेची परंपरा आहे; अर्थात जे राष्ट्रमान्य आहेत, अशांची लष्करी पेशात भरती व्हावी अशी परंपरा पडू लागली.''  (सदर, पृ. १७१)

चौथ्या मराठा युध्दात 'मद्रासी तोफखाना' होता.  त्यात पारिया होते.  मराठे महारही पायदळात पुष्कळ होते.  कोरेगावच्या रणस्तंभावर त्यांची नावे अजुनी चमकतात.  तरी हे मॅकमन्न साहेब म्हणतात, ''ह्या शेवटच्या मराठा युध्दात, ह्या मद्रासी सैन्याने जयश्री मिळविली नाही.  मराठा, मेवाडी रजपूत व पेंढाऱ्यांच्या हल्ल्याला मुख्य तोंड देण्याचे श्रेय केवळ इंग्रजांकडील आरबांनीच मिळविले (म्हणून) इंग्रजांना आपले भरतीचे धोरण जातिवंतांच्या बाजूने वळवावे लागले.  (सदर, पान १७२) सन १८५७ सालच्या बंडानंतर भरतीच्या पिढीजाद पध्दतीचा (System of Regular Indian Army) अंतच झाला.  आतापर्यंत बंगालच्या सैन्यात जो अयोध्येकडील राजपूत आणि ब्राह्मण शेतकऱ्यांचा मक्ताच चालू असे, तो ह्यापुढे बंद पडला.  पुढे पुढे इंग्रजी शांतीच्या झेंडयाखाली जसजशी सुखासीनता वाढू लागली तसतशी दक्षिण देशातील (मद्रासी) सैन्याची लष्करी तडफ मंदावू लागली.  (सदर, पान २२२)

''लॉर्ड किचनेरचे कारकीर्दीपासून तर हिंदुस्थानातील जातीचे व वंशाचे लष्करी दृष्टीने अगदी बारीक अध्ययन सुरू झाले.  तेव्हापासून मराठयांची - विशेषतः कोकणी मराठयांची - आराधना (Cult) शिखरास पोचू लागली.  शेवटच्या महायुध्दानंतर ११७ वे (मराठा लाइट् इनफंट्री) पायदळ हे 'रॉयल' हा अत्यंत उज्ज्वल बहुमानाचा शिक्का मिरवीत आहे.''  (सदर, पान २९०)

ह्या सबंध पुस्तकात महार, चांभार वगैरे महाराष्ट्रातील कोणत्याही अस्पृश्य जातीचा चुकूनदेखील कोठेही उल्लेख झालेला दिसत नाही.  हे ब्रिटिश सरकारचे धोरण मोठेच निराशाजनक आहे.  ह्याच्या प्रतिकारार्थ निदान महाराष्ट्रात तरी जोराचे प्रयत्न झाल्याशिवाय राहिले नाहीत.  ह्या बाबतीत पुण्यातील महारांचे अनुभविक पुढारी श्री. शिवराम जानबा कांबळे ह्यांचे चिकाटीचे कार्य त्यांना भूषणावह आहे.  त्यांनी प्रथम पुण्याजवळ सासवड येथे ५१ गावच्या महारमंडळीची सभा भरवून मुंबई सरकाराकडे एक छापील अर्ज पाठविला.  त्यावर दूरदूरच्या डेक्कन व कोकण येथील १५८८ महार बांधवांच्या सह्या झाल्या होत्या.  त्यातील अस्पृश्यांकरिता मागण्या पुढीलप्रमाणे होत्या :  (१) खालच्या दर्जाच्या सरकारी नोकरीत घेणे, (२) सार्वजनिक सरकारी शाळेत मुलांना घेण्याबद्दलचे अडथळे नाहीसे करणे, (३) पोलिसांत चाकरी करण्याची मुभा देणे (४) हिंदुस्थानच्या सैन्यात चाकरी करण्याची परवानगी देणे.  ह्यांपैकी पहिल्या दोन मागण्यांना सरकाराने काहीतरी गुळमुळीत उत्तरे दिली, तिसऱ्या मागणीसंबंधी जातीच्या निकृष्टपणाची सबब सांगितली आणि चौथ्यासंबंधी मुंबई सरकार हात घालू शकत नाही, असे स्पष्ट उत्तर आले.  ह्या अत्यंत असमाधानकारक उत्तरावर तेव्हाच्या प्रसिध्द सुधारक पत्रात महारांना अनुकूल अशी खरमरीत टीका आली आहे.  (नवलकरकृत शि. जा. कांबळे ह्यांचे चरित्र, पान २५).  यानंतर सन १९०५ मध्ये ह्या बाबतीत हिंदुस्थान सरकाराकडे दुसरा अर्ज करण्यात आला; पण त्यालाही निराशाजनक उत्तर आले.  ह्यानंतर आम्ही मुंबईत १९०६ साली निराश्रित साह्यकारी (Depressed Classes Mission) स्थापन केली.  तिची एक शाखा कांबळे यांच्या विनंतीवरून पुणे येथे १९०८ साली उघडण्यात आली.  त्यानंतर ता. ५ एप्रिल १९१० रोजी महार जातीची जेजुरी क्षेत्रात मोठी परिषद भरविण्यात आली.  तेथे मी व आमच्या मिशनचे प्रतिनिधी हजर होतो.  त्यात २२ कलमांचा एक विस्तृत विचाराचा व बारीक माहितीने भरलेला अर्ज इंग्रजीतून ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठविण्यात आला.  परवेलचे सुभेदार बहादूर गंगाराम कृष्णाजी अध्यक्ष व श्री. शि. जा. कांबळे सेक्रेटरी ह्यांच्या सह्या होत्या.  टाइम्स ऑफ इंडिया, बंगालचे केशवचंद्र सेन, पुण्याचे नामदार गोखले वगैरे थोर थोर पुरुषांचे अधिकारयुक्त अनुकूल अभिप्राय समाविष्ट केले होते.  मुंबई सैन्यातील निरनिराळया २१ पलटणीतून मोठी बहादुरीची कामे करून जमादार, सुभेदार, सुभेदार-मेजरच्या रँकेपर्यंत चढलेल्या एकंदर २३३ महार गृहस्थांची नावनिशीवार यादी दिली आहे.  यात एक सरदार बहादूरही आहेत !  हा एक मोठा विशेष होय.  लॉर्ड किचनेरने, हा महार चांभाराचा हक्क बुडवून मोठा अन्याय केला, हे उत्तम सिध्द केले आहे.  जे महार गृहस्थ आपली जात व धर्म सोडून ख्रिस्ती होतात, त्यांना ख्रिस्ती धर्मात धर्मगुरूचेही स्थान मिळू शकते.  व त्यांना युरोपियनांनाही उपदेश करण्याची पात्रता येते.  पण त्यांच्याच भाऊबंदांनी केवळ आपली धर्माची परंपरा राखली म्हणून, इंग्रजांना इमानाने रणांगणात जीव मुठीत धरून राज्य मिळवून दिले आणि टिकविले तरी, शेवटी सैन्यातून नेमकी त्यांचीच हकालपट्टी व्हावी हे अत्यंत निराशाजनक व अन्यायाचे आहे, हे सिध्द केले आहे.  (शि. जा. कांबळे चरित्र, पान १४२-१५७) शेवटी हा सर्व प्रयत्न अरण्यरुदनाप्रमाणे निरर्थक ठरला.  अशाच प्रकारचा प्रयत्न मागे दापोडीचे मास्तर बाबा गोपाळराव वलंगकर ह्यांनीही केला असे ऐकिवात आहे.  ह्याशिवाय वरील चरित्रात श्री. कांबळे ह्यांनी पुण्यातील पर्वतीच्या व नाशिक येथील काळा रामाच्या देवळात प्रवेश करण्याचे जे आटोकाट श्रम केले त्याचीच साद्यंत हकीकत दिली आहे.

असो !  ज्या अस्पृश्यांनी इंग्रज हे हिंदुस्थानात नवखे असताना, फ्रेंचांविरुध्दच नव्हे तर प्रत्यक्ष पेशव्याप्रमाणे आपल्या एक वेळच्या धन्याच्याही विरुध्द झुंजण्यात शिकस्त केली; त्यांना आता सैन्यात लढाऊ कामावर घेण्यात येत नाही.  मध्यंतरी महायुध्दात त्यांची बरीच भरती झाली होती.  पण तीही आता बंद झाली आहे.  हे मोठेच आश्चर्य !  औंधचे पंतप्रतिनिधीबरोबर रायगडचा प्रवास करून त्याचे वर्णन श्री. द. ग. कुलकर्णी ह्यांनी जुलै १९३३ च्या किर्लोस्कर मासिकात दिले आहे.  त्यातील पुढील उल्लेख ह्या बाबतीत मासलेवाईक आहेत.  (कि. मासिक पान, ७२३)

''डाव्या बाजूस टकमक टोक आहे.  याला आज 'रायनाक' टोक म्हणतात.  पेशवाईच्या अखेरच्या काळात हा अभेद्य किल्ला सर करण्याची गुरुकिल्ली पाचाडच्या रायनाक नावाच्या महाराने इंग्रजांना सांगितली आणि इंग्रजांनी त्याप्रमाणे जगदीश्वराच्या उजव्या हातच्या डोंगरावरून तोफा डागून अत्यंत बिकट जागी असलेला मराठयांचा दारूखाना उडविला.  धूर्त इंग्रजांनी रायनाकाला पुढे ह्याच टोकावरून खाली लोटून दिले म्हणून त्याच्या नावाने ते आज ओळखले जात आहे.''  भावी सैन्यातून होणाऱ्या हकालपट्टीचे हा कडेकोट एक स्पष्ट पूर्वचिन्ह नव्हे तर काय ?  ह्याला म्हणतात धोरण !

अस्पृश्य लोकांना लढाऊ लष्करात भरती न करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या धोरणामुळे ह्या लोकांच्या उध्दाराची एक अमूल्य संधी दवडण्यात आली आहे ह्यात संशय नाही.  पण ह्या विक्षिप्त धोरणाला काय काय कारणे झाली हे मोठे रहस्य आहे.  महाराष्ट्रातील महारांचे अनुभवी व सन्मान्य पुढारी, माझे दोघे मित्र व आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनमधले सहकारी श्री. शिवराम जानबा कांबळे व सुभेदार राघोराम सज्जन घाटगे ह्यांनी अधिकृतरीत्या मला ह्या बाबतीत पुढील माहिती पुरविली आहे.  सुभेदार घाटगे ह्यांच्या दोन-तीन पिढयांनी ब्रिटिश लष्करात मोठया नेकीने नाव मिळविले आहे.  खुद्द घाटगे साहेबांनी गेल्या महायुध्दात व अगोदरही चांगली कामगिरी केली आहे.  सन १९२१ सालची गोष्ट.  एडनजवळील नोबद दकिन गावाजवळ सरहद्दीवर १११ व्या पलटणीचा तळ पडला होता.  आरबी डाकुंची एक टोळी चाल करून येत आहे अशी हूल उठली.  कंपनीचे नायक कॅप्टन होल्सवर्थ ह्यांनी सुभेदार घाटगे ह्यांना, ह्या टोळीला जवळच्याच खिंडीत थोपवून धरण्याचा हुकूम केला.  जवळ काही हत्यार नसताना व अंगावर भरपून पोषाकही नसताना केवळ छातीच्या हिमतीने ह्या एकटयाच बहाद्दराने ह्या टोळीस काही तास थोपवून धरिले व शिफारस मिळविली.  हेच घाटगे हल्ली डी. सी. मिशनच्या पुण्याच्या शाखेचे सन्मान्य सेक्रेटरी, पुणे शहर म्युनिसिपालिटीचे लोकनियुक्त सभासद व सरकारनियुक्त बेंच मॅजिस्ट्रेट आहेत.  दुसरे श्री. कांबळे हे तर महारांचे पुढारी म्हणून अखिल महाराष्ट्रात सुप्रसिध्दच आहेत. ह्यावरून पुढील तीन पाऱ्यांतील माहिती खरी मानण्यास हरकत नाही.

सुमारे १८९०-९१ पर्यंत ब्रिटिश लष्करात महार-चांभारांची भरती होत असता, तेव्हापासून नवीन ऑफिसर मंडळीची भरती बंद झाली; नंतर पूर्वीच्यांनाही रजा मिळू लागली.  ह्याविषयी दाद लावून घेण्याचे पहिले प्रयत्न महाड तालुक्यातील रावडुल गावचे पेन्शनर हवालदार गोपाळनाक विठ्ठलनाक वलंगकर नावाच्या वृध्द गृहस्थाने मोठया चिकाटीने केले.  महात्मा जोतीबा फुले, बाबा पद्मजीसारख्यांची ह्यांना शिकवण व मदत होती.  सन १८९५ साली पुण्यास भरलेल्या काँग्रेसचे वेळी ह्यांनी चळवळ केली होती.  दापोली येथील अस्पृश्यवर्गातील महार-चांभार लष्करी पेन्शनवाल्यांच्या वसाहतीत सदर गोपाळबाबांनी बरीच चळवळ केली.  पण चळवळ नवीन असल्यामुळे यश आले नाही.  ह्यांनी हिंदुस्थान सरकारकडे अर्ज केला असता ह्या पेन्शनर लोकांना त्या वेळी नुसत्या सह्या करण्याचेही धैर्य झाले नाही.  पुढे हीच चळवळ श्री. कांबळे ह्यांनी सन १९०३ पासून मोठया नेटाने इ.स. १९१० पर्यंत चालविली.  ती अद्याप चालूच आहे.

लष्करात भरती बंद होण्याची कारणे अनेक सांगतात.  पूर्वी कामगिरी असलेल्या शिपायांना रोज दोन प्रहरी २ तास, स्वयंपाक करून जेवण्यास वगैरे रजा मिळत असे.  पण आणीबाणीचे वेळी ही रजा देणेही शक्य नसल्यामुळे त्यांच्यासाठी स्वयंपाकघर उघडण्याचे ठरले.  तेव्हा एकत्र जेवणाचा प्रसंग येई,  म्हणून जातवार पलटणी कराव्या लागल्या.  पण ह्यापेक्षा अधिक खरे कारण म्हणजे इज्जतदार जातिवंत लढाऊ लोकांच्याच जातवार पलटणी कराव्या असे ठरले, हे होय, त्यामुळे ह्या निकृष्ट वर्गाचा ह्या इज्जतीच्या पिशाचाला बळी द्यावा लागला.  श्री. कांबळे ह्यांनी मुंबई आणि हिंदुस्थान सरकारकडे व खुद्द ब्रिटिश पार्लमेंटकडे वेळोवेळी अर्ज केले, तरी काहीच दाद लागली नाही.

शेवटी महायुध्द ओढवले.  तेव्हा मराठयांचया जयजयकाराबरोबरच महार, चांभारांचाही उदो उदो सुरू झाला आणि १११ व्या महार पलटणीची भरती सुरू झाली.  त्या वेळी मुंबई आणि पुणे टाऊन हॉलमध्ये आमच्या मिशनच्या साह्याने जाहीर सभा झाल्या.  महार व इतर पुढाऱ्यांनी प्रयत्न केले.  युध्द संपले.  फत्ते झाली.  पण अखेरीस चोहीकडे सामसूम झाल्यावर ही १११ वी पलटण सन १९२१-२२ चे सुमारास बरखास्त करण्यात आली !  कांबळे साहेबांनी लष्करात मोठी निषेधाची सभा भरविली.  इ.स.१८९० पूर्वी ६वी, ११वी, १२वी, १८वी, २४वी अशा अनेक पलटणींतून शेकडो महार-चांभार ऑफिसरांनी व हजारो शिपायांनी आपली आहुती दिली होती.  सन १८५७ सालच्या बंडात ह्या अस्पृश्यांनी इंग्रजांच्या बाजूने मोठी अतुल स्वामिनिष्ठा दाखविली होती.  म्हणून १८५७ सालच्या बंडात कामास आलेल्या शिपायांची नावे दिल्ली येथील काश्मीरी गेटावर कोरलेली आढळतात.  पण ह्या सर्वांचा काहीच उपयोग न होता; महायुध्दात व नंतर १११ व्या फलटणीने ५६ वर्षे मोठी नामंकित बहाद्दरी करूनही, पुनः शेवटी ह्या बिचाऱ्या लढाऊ जातीला आता घरी बसावे किवां मोलमजुरी करून पोट जाळावे लागले आहे.  ह्या रहस्याला इतिहासात दुसरी जोडच नाही !

असो.  होता होता आम्ही अगदी आजकालच्या काळात येऊन उतरलो.  राष्ट्राचा योगक्षेम चालविण्याच्या कामात राजे अथवा त्याची प्रभावळ ऊर्फ दरबार जसा भाग घेत आहे तसाच सर्व देशांत व सर्व काळांत अगदी सर्व जातींची प्रजाही भाग घेत आहे, हे हिंदुस्थानातील गावगाडयावरून व इतर देशांतील तशाच संस्थांवरून दिसून येते.  तरी आधुनिक राजकारणाची हल्ली ह्यापुढेही बरीच मजल थडकत चालली आहे.  केवळ अंतर्गत योगक्षेमातच नव्हे, तर सर्वच राजशासनपध्दतीत राजयंत्र प्रत्यक्ष हालविण्याचे कामी सर्व दर्जाच्या स्त्रीपुरुष प्रौढ व्यक्तींस वाव मिळावा, सर्वांना महत्त्वाचे बाबतीत प्रत्यक्ष मत देण्याचा अधिकार असावा, व अशा मतदान पध्दतीने, कायदेमंडळात व विधिमंडळात व इतर स्थानिक कारभार मंडळात सर्व जातींचे व हितसंबंधाचे योग्य प्रमाणात वेळोवेळी निवडून जाणारे प्रतिनिधी असावेत, व येणेप्रमाणे ही राज्ययंत्राची धुरा खालपासून अगदी वरपर्यंत लोकसत्तेच्या मुठीत असावी, हे नवीन मत आता ह्या जुनाट भारतवर्षातही रुजत चालले आहे.  इ.स. १८८५ साली राष्ट्रीय सभा स्थापन झाली.  प्रथम हिच्यात शिकलेले पांढरपेशेचे जाऊ लागले.  यूरोप, आफ्रिका व आशिया ह्या तिन्ही खंडांतील लोकांवर ज्या महायुध्दाचा परिणाम झाला, त्याच्या लाटांसरशी ह्या नवीन भारतीय राजकारणावर परिणाम होऊन त्याची पाळेमुळे खोल रुजत चालली.  अखिल भारतीय अस्पृश्यांच्या उध्दारासाठी सन १९०६ साली मुंबई जी 'भारतीय निराश्रित मंडळी' स्थापण्यात आली, तिचे कार्य आणि शाखा झपाटयाने सर्व देशभर पसरून केवळ शिक्षण, सामाजिक सुधारणा, आर्थिक उन्नती वगैरेंच्याच दृष्टीने नव्हे; तर ह्या नवीन राजकारणी दृष्टीनेही अखिल भारतातील अस्पृश्य जमातीची जागृती होऊ लागली.  शेवटी सन १९१४-१८ च्या महायुध्दानंतर हिंदी राज्यपध्दतीत जी मोठी सुधारणा होऊ घातली त्या वेळी ह्या वरील मंडळीच्या प्रमुखांनी व प्रांतोप्रांतीच्या प्रचारकांनी मोठा भाग घेतला.  अर्थात हे सर्व प्रचारक स्पृश्यवर्गाचेच असल्याने अस्पृश्यांनी ह्या नवीन जागृतीच्या कार्यात राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्यास शिकावे व नवीन मनूत आपली जागा ठरवावी असे त्यांचे धोरण होते.  पण तेव्हापासून अस्पृश्यांतूनच काही लहान मोठे प्रांताप्रांतांतून स्वतःचे पुढारी ह्या अनेक जातींतून पुढे येऊ लागले.  त्यांना हे राष्ट्रीय सभेशी सहकार करण्याचे धोरण पटेनासे झाले.  ते काही अंशी स्पृश्यांच्या साह्याने तर बऱ्याच अंशी केवळ आपल्याच धोरणाने व स्वतंत्रपणाने आपापल्या हक्काची मांडणी करू लागले.

ह्या बाबतीत मुंबईचे डॉ. आंबेडकर, डॉ. सोळांकी, मद्रासचे रा. एम. सी. राजा, श्रीनिवासन, मध्य प्रांतातले रा. गवई, नंदा गवळी, बंगालचे रा. विश्वास मल्लीक वगैरेंची कामगिरी ध्यानात घेण्यासारखी आहे.  १९१९ साली साउथबरो कमिटीपुढे तसेच अलीकडे सायमन कमिशन व लोदियन कमिटीपुढे वगैरे ह्या व अशाच इतर वर्गांच्या पुढाऱ्यांनी जी कारवाई केली आहे ती नजरेआड करून चालावयाचे नाही.  राउंड टेबलचे सत्र तर अद्यापि चालूच आहे.  प्रथम प्रथम ह्या पुढाऱ्यांच्या स्वतंत्र मागण्यांचा अर्थ नीट न कळल्याने म्हणा किंवा कळूनही म्हणा, राष्ट्रीय सभेने प्रथम दुर्लक्ष केले; नंतर ह्या पुढाऱ्यांच्या स्वतंत्र चळवळीला आवरून धरण्याचा यत्न करून पाहिला; महात्मा गांधीजींसारख्या धीरोदात्त पुढाऱ्यांच्याही पुढाऱ्याने असेच अळम् टळम् करून शेवटी भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचाच दृष्टिकोण पत्करून आता सर्वस्वी ह्या निराश्रितांना आपला आश्रय देण्याकडे, किंबहुना त्यांचा आश्रय घेण्याकडे आपला कल वळविला आहे.

पण ह्या चालू गोष्टी आहेत.  आमचे हे प्रकरण व सर्व पुस्तकच आता आपल्या घालून दिलेल्या मर्यादेवर येऊन ठेपले आहे.  शिवाय ह्या गोष्टी अस्पृश्यतानिवारणाच्या पुढील प्रकरणाखाली जातात.  पुढील दुसरे पुस्तक ईश्वरकृपेने तयार होईल तेव्हा त्यातील पहिला खंड अस्पृश्य, दलित समाजाच्या उध्दाराचा व अस्पृश्यतानिवारणाचा इतिहास आणि दुसरा खंड उपायचिंतन व उपसंहार असे होतील.  त्यातूनच शिल्लक उरलेल्या विषयाची मांडणी करणे बरे होईल.

 हे पुस्तक व ह्यातील निस्पृह आणि नवे विचार लोकादरास कसे काय पात्र ठरतात, हे पाहूनच पुढील विचारांची तयारी व मांडणी करण्यास उत्तेजन येणार आहे.  हे सर्व विचार, माझ्या गत आयुष्यातील सार्वजनिक सेवेच्या प्रकाशात मला ह्यापूर्वीच सुचलेले होते.  ते आता प्रसिध्द करण्यास कोणत्याही बाह्य उत्तेजनाची वास्तविक पाहता जरूर नसावी.  तथापि प्रथम मनुष्यकृती अंतर्बाह्य स्फूर्तीला केव्हाही वश होणार, म्हणून वरील विनय प्रकट केला आहे.  वाचकांकडून त्याचा योग्य तो स्वीकार होवो.  अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून हे पुस्तक संपवितो.