(लेखक : नाथा महाराज मेहेतर, भवानी पेठ, पुणे.)
१. पेशव्यांनी पुणे शहर वसविल्यावर आम्हांला येथे आणले. तेव्हापासून पेशवाई संपेपर्यंत आम्ही आनंदात होतो. आम्हांला चांगली मिळत होती. त्यामुळे मुलामाणसांचा गुजारा होत होता व आमचा धंदा दुसरा कोणी करणार नाही अशी खात्री होती. त्या वेळी आम्हांला चांगला पगार मिळून शिवाय सणासुदीच्या दिवशी बक्षिसेही मिळत. शिवाय पुणे शहरातले सोनखत आम्हीच विकत होतो. त्यावर दुसऱ्या कोणाचा हक्क नव्हता.
२. आता आमच्या कामाची सर्व व्यवस्था म्युनिसिपल कमिटीकडे आहे व आमचे पहिले सर्व हक्क बुडवून ६७८९ प्रमाणे आम्हांला पगार मिळत आहे. पण एवढयात आमची गुजराण होत नाही.
३. महार, मांग वगैरे लोक इतर धंदे करून निदान आठ आणे तरी रोजी मिळवतात, पण आम्हाला जास्तीतजास्त पगार म्हणजे रोजी ४॥ आणे. तरी आमची अशी इच्छा आहे की, आम्हांला रोजी ८ आणे तरी मिळावे. एवढे उपकार आमच्यावर म्यु. कमिटीने केल्यास आम्हांस पोटभर भाकरी दिल्याचे पुण्य कमिटीला लागेल.
४. आम्हाला पगार फार थोडा असल्यामुळे आम्ही कर्जबाजारी बनतो व रुपयाला वेळेनुसार ३-४ आणे व्याज देऊनही कर्ज काढतो. तरी आम्हांला कमी व्याजाने कर्ज मिळेल अशी कोणी तरी व्यवस्था करावी.
५. आमचे काम पाहण्याकरिता आमच्याच जातीचे लोक मुकादम नेमिले होते, पण त्यांपैकी ६ जणांना पुढे कमी केले. तर म्यु. कमिटीने पुन्हा त्यांना नेमावे किंवा ते लोक शिकलेले आहेत म्हणून त्यांना दुसरीकडे नोकरी द्यावी.
६. पुणे शहरांत ड्रेनेजचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आमच्या धंदा बराच कमी होईल. तरी आम्हाला त्याऐवजी दुसरा धंदा द्यावयाची म्युनिसिपल कमिटीने तजवीज करावी.
७. आमची मुलेदेखील १२ वाजेपर्यंत कामधंदा करतात; तरी त्यांस शिक्षण देण्यासाठी आमच्या मोहल्ल्यात निराळी शाळा दयाळू सरकारने अगर म्युनिसिपालिटीने द्यावी. कारण इतर शाळांत आमच्या मुलांना घेत नाहीत. व आमच्या कामाच्या वेळेला इतर शाळा भरतात.
८. ड्रेनेजचे काम सुरू झाल्याने आमहांला फार चिंता लागून राहिली आहे. कारण आमचा धंदा बुडाला तर आम्ही खावे काय ? दुसरा कोणता धंदा करावा ? नोकरी कोण देणार ? दुकानदारी मांडली तरी गिऱ्हाइके कोण होणार ? अशी अनेक संकटे आम्हांला घेरून बसलेली आहेत. याचा विचार सरकार, म्युनिसिपल कमिटी व वरिष्ठ जातीचे सर्व लोक यांनी दयाळूपणाने व उदारबुध्दाीने करावा व आम्हांस मार्ग दाखवावा.
भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या पुणे शाखेचे फ्री बोर्डिंग
विनंतिपत्रक
हे बोर्डिंग येत्या फेब्रुवारीपासून सुरू करण्याचे ठरविले आहे. या बोर्डिंगात प्रारंभी पंधरा विद्यार्थी घेण्यात येतील. पुणे येथील राहणी मध्यम खर्चाची असली तरी शहरची वस्ती व जिनसांच्या वाढत्या किमती यांचा विचार करून दर मुलामागे सध्या दरमहा कमीत कमी तरी पाच रुपये खर्च येईल असा अंदाज आहे. भा.नि.सा मंडळीच्या सर्व शाळांतून विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळते. व त्याचा खर्च उदार हितचिंतकांकडून मिळालेल्या वर्गण्या व देणग्यांवर चालतो ही गोष्ट मशहूरच आहे. अशा बिकट मिळकतीच्या मानाने अशाश्वत स्थितीतदेखील प्रेमळ बंधुभगिनींकडून मिळणाऱ्या मदतीवर विश्वासून व ईश्वरावर पूर्ण भरीभार घालून ठिकठिकाणच्या आपल्या शाखांना फ्री बोर्डिंगे जोडून शिक्षणाच्या सोयी वाढविण्याचा व गरजा पुरविण्याचा प्रयत्न मंडळी करीत आहे. या रीतीने पाहिले तर मंडळीच्या वाढत्या कार्यक्षेत्राच्या प्रमाणाने मंडळीला जीवनाधार असलेला लोकाश्रयाचा ओघही जास्त जोराने वाहू लागला पाहिजे, हे सुज्ञांच्या सहज लक्षात येईल. या बोर्डिंगला सुरुवात करावयास प्राथमिक खर्च व पुढील दोन वर्षांचा खर्च धरून आज दोन हजार रुपयांची जरुरी आहे. तरी दयाळू बंधुभगिनींनी खाली दर्शविलेल्या मार्गांनी या बोर्डिंगला मदत करून मंडळीबद्दल आपली सक्रिय सहानुभूती दाखवावी, अशी त्यांना मंडळीची आग्रहाची विनंती आहे.
१. पहिल्या प्रतीचे वर्गणीदार : दरमहा पाच रुपये म्हणजे एका विद्यार्थ्याचा खर्च देणाऱ्या सदगृहस्थांना प. प्र. वर्गणीदार समजण्यात येईल. व तो विद्यार्थी त्यांचा बोर्डर म्हणून समजला जाऊन त्याला बोर्डिंगमध्ये दाखल केल्याबरोबर त्याचा फोटो त्यांजकडे पाठविला जाईल व त्याच्या विद्याभ्यासाची माहिती त्यांजकडे वरचेवर कळविली जाईल.
२. दुसऱ्या प्रतीचे वर्गणीदार : दरमहा अडीच रुपये देणाऱ्यांना दु. प्र. वर्गणीदार समजण्यात येईल. त्यांजकडेही त्यांच्या विद्यार्थ्याची माहिती वरचेवर कळविण्यात येईल.
३. तिसऱ्या प्रतीचे वर्गणीदार : दरमहा एक रुपया देणारे ति. प्र. वर्गणीदार समजण्यात येतील. त्यांजकडे व वरील सर्व वर्गणीदारांकडे बोर्डिंगचे रिपोर्ट प्रसिद्ध होतील तसतसे पाठविण्यात येतील.
४. साहाय्यक : या बोर्डिंगला सवडीप्रमाणे दरवर्षी ठरलेली रक्कम व धान्य, कपडे, भांडी वगैरे इतर सामान नियमितपणे देणाऱ्यांना साहाय्यक समजण्यात येईल, व त्यांजकडे बोर्डिंगचे रिपोर्ट वगैरे पाठविण्यात येतील.
या बोर्डिंगकरिता पाठवावयाची मदत पुणे येथील नि. सा. मंडळीच्या लष्करातील शाळेत नि. सा. मंडळीच्या फ्री बोर्डिंगचे सुपरिंटेंडेंट यांजकडे २००८ सेंट विन्सेंट स्ट्रीट येथे ताबडतोब पाठविण्याची विनंती आहे.
विठ्ठल रामजी शिंदे
जनरल सेक्रेटर, भा. नि. सा. मंडळी,
नि. मा. मंडळीची शाळा,
लष्कर-पुणे
भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची महाराष्ट्रीय बंधुभगिनींना विनंती
प्रिय बंधुभगिनींनो, आमची मंडळी स्थापन होऊन गेल्या दीपवाळींतील प्रतिपदेलाच सहा वर्षे पुरी होऊन सातवे वर्ष सुरू झाले आहे. वरिष्ठ हिंदू समाजाने टाकलेल्या - अस्पृश्य ठरविलेल्या - हिंदू बांधवांच्या उन्नतीकरिता हिंदूंनी चालविलेली ही एकच संस्था आहे. या संस्थेच्या बिकट कार्याची कल्पना व अस्पृश्यांच्या खऱ्या अडचणीची जाणीव हिंदूंखेरीज दुसऱ्या कोणालाही पूर्णपणे होणार नाही. अनदी कालापासून हिंदूंनी बाहेर टाकिलेल्या या अस्पृश्य समाजाला (१) शिक्षण देऊन, (२) सामाजिक व धार्मिक बाबतीत उदार मतांचा प्रसार करून, (३) वरिष्ठ हिंदूंन या जातीवर घातलेला अस्पृश्यपणा दूर करण्याबद्दल वरिष्ठ हिंदू समाजास विनंती करून आणि (४) हिंदू समाजाचा एक घटक या नात्याने अस्पृश्यांना उत्तम नागरिकत्वाचा व राजनिष्ठेचा उपदेश करून त्याची उन्नती करण्याचा आमच्या मंडळीचा संकल्प आहे. हा आमचा संकल्प पुरा करण्याचे काम परमेश्वराच्या आशीर्वादावर व उदार हितचिंतकांकडून मिळणाऱ्या मदतीवरच अवलंबून आहे. या मंडळींच्यामार्फत पंधरा शाखांच्या पंचवीस शाळा व पाच वसतिगृहे चालू असून त्यात अकराशे अस्पृश्य विद्यार्थ ज्ञानामृताचे सेवन करीत आहेत. या संस्था चालविण्यास मंडळीला दरसाल वीस हजार रुपयांवर खर्च करावा लागत आहे. हा सर्व खर्च मंडळीच्या हितचिंतकांकडून मिळणाऱ्या वर्गण्या, देणग्या व सरकारी ग्रँट यांवरच चाललेला आहे. महाराष्ट्रातल्या अस्पृश्य समाजाच्या लोकसंख्येकडे पाहिले तर मंडळीचे चालू प्रयत्न सिंधूत बिंदूप्रमाणे आहेत. मंडळीच्यामार्फत आणखी कित्येक ठिकाणी शाळा, वसतिगृहे, भजन समाज सुरू करावे अशी मागणी असून तसा मंडळीचा विचारही आहे. पण उदार बंधुभगिनींकडून मंडळीला मदत मिळाल्याखेरीज वरील विचार कृतीत आणण्यास मंडळी असमर्थ आहे. म्हणून मंडळीची प्रत्येक महाराष्ट्रीय बंधुभगिनीस आग्रहाची विनंती आहे की, प्रत्येकाने वर्षाकाठी निदान एक रुपया तरी मंडळीला देऊन मंडळीमार्फत चालणाऱ्या समाजकार्याला मदत करावी.
विठ्ठल रामजी शिंदे
जनरल सेक्रेटरी
भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची शाळा,
परळ, मुंबई.