प्रकरण आठवे
आता काही मुख्य जातींच्या नावांची मूळ व्युत्पत्ती काय असावी, ह्याचे भाषाशास्त्राच्या निर्विकार दृष्टीने विवेचन करून ह्या हीन मानलेल्या जाती खरोखर मुळातच हीन होत्या, किंवा त्यांचया नावांतूनही काही उज्ज्वल पूर्वेतिहासाचा पुरावा बाहेर डोकावत आहे, हे पाहण्याचा मी प्रयत्न करीत आहे. हे विवेचन करण्यासाठी ज्या थोडया जाती मी निवडल्या आहेत; त्या जातींच्या लोकांमध्ये मी स्वतः बहुशः दोन-दोन, चार-चार महिने, क्वचित वर्ष वर्षभरही, जाऊन राहिलो आहे. त्यात माझा हेतू हा होता की, त्यांचे खाद्य, पेय, पेहराव, डामडौल, व्यक्तिविषयक आवडी, घरगुती चालरीत, जातीय परंपरा, ह्या गोष्टी समक्ष निरखून पहाव्या. आज माझ्या तीस वर्षांच्या सूक्ष्म निरीक्षणानंतर मला ह्या कित्येक हतभागी जातींचे ऊर्फ राष्ट्रांचे मूळ उज्ज्वल असावे, असे स्वतंत्रपणे वाटत आहे. पुढील व्युत्पत्तीमध्ये माझे भाषाशास्त्र सपशेल जरी चुकले असले, तरी त्यामुळे माझ्या इतर निरीक्षणाला बाधा येत नाही. उलट पक्षी, माझी व्युत्पत्ती खरी ठरल्यास मात्र तो एक स्वतंत्र पुरावा होईल. एवढयाच उद्देशाने माझ्या ह्या ऐतिहासिक विषयाला हे जे व्युत्पत्तीचे ठिगळ जोडण्याचे धाडस मी केले आहे, ते अगदी अनाठायी ठरेल, असे मला वाटत नाही.
महार (महाराष्ट्र)
महार ह्या नावाचा विस्तार मराठी भाषेपुरता अथवा महाराष्ट्रापुरताच नसून पंजाबी, सिंधी, गुजराथी, राजस्थानी, हिंदी, बंगाली, ओरिया, तेलगू, आसामी, इतक्या भाषांतून व अनुक्रमे देशांतून आढळतो. तो असा :- महार, म्हार - आधुनिक महाराष्ट्र, मध्य हिंदुस्थान; म्हेतर, म्हेर, मेर - गुजराथ, मारवाड, माळवा, राजपुताना आणि मध्य प्रांताचा हिंदी भाग; मेघ, मघ-मेघवाळ, मोघिया-पंजाब, गुजराथ, ग्वाल्हेर; माल, मालो, माली, मलयन-बंगाल, ओरिसा, आंध्र, मलबार.
महार ह्या नावाची आजवर अनेक निरुत्तेफ् सुचविण्यात आली आहेत. त्यांपैकी काही विक्षिप्त आहेत, तर काही विचार करण्यासारखी आहे. महाअरी = मोठा शत्रू अशी व्युत्पत्ती जोतीबा फुले ह्यांनी सुचविली आहे. दुसरी अशी आहे : पार्वतीच्या कपाळावर घामाचा बिंदू आला, तो एका कमळ पत्रावर पडला; त्याचे सुंदर मूल होऊन खेळू लागले. ते रांगत बाहेर जाऊन एक मेलेली गाय खाऊ लागले. म्हणून शिवाने रागावून त्यास महा आहारी - मोठा खादाड - होशील असा शाप दिला. तो महार झाला; ही विक्षिप्त निरुत्तेफ्.
मृताहर : परलोकवासी डॉ. सर भांडारकर ह्यांनी मृताहर अशी व्युत्पत्ती सुचविली होती. इ.स. १९१२ साली पुण्यात डी. सी. मिशनची पहिली अस्पृश्यतानिवारक परिषद भरली, तिचे अध्यक्ष ह्या नात्याने डॉक्टरसाहेबांनी ही प्रथमतःच पुढे आणिली. मृत + आहार = मेलेली गुरे ओढून नेणारा, हा अर्थ ह्या लोकांच्या चालू धंद्याला लागू पडतो. पण संस्कृत वाङमयात ह्या नावाचा असा प्रचार कोठे आढळत नाही. माडेय पुराणातील ३२ व्या अध्यायात पुढील श्लोक आहेत :
उदक्याश्वशृगालादीन्सूतिकान्त्यावसायिनः ।
स्पृष्ट्वा स्नायीत शौचार्थ तथैव मृतहारिणः ॥३३॥
मृतनिर्यातकाश्वैव परदारारताश्च ये ।
एतदेव हि कर्तव्यं प्राज्ञैः शोधनमात्मनः ॥४०॥
अभोज्यसृतिकाषंढमार्जाराखुश्वकुक्कुटान ।
पतिताविध्दचंडालान् मृताहारांश्च धर्मविद् ॥४१॥
संस्पृश्य शुध्दयते स्नानादुदक्याग्रामसूकरौ ।
तद्वच्च सूचिकाशौचदूषितौ पुरुषावपि ॥४२॥
वरील उताऱ्यास चांडाल, अन्त्यावसायी, असे शब्द योजून पुनः मृताहार, मृतहारि, मृतनिर्यातक असे शब्द घातले आहेत. मृत ह्याचा अर्थ मनुष्य अथवा प्रेत असाच आहे. मेलेली ढोरे अशा अर्थाचा संदर्भ ह्या ठिकाणी मुळीच संभवत नाही. वरिष्ठ जातीच्या माणसांची प्रेते महार नेऊ शकणार नाही, म्हणून मृतांचे आप्त असाच येथे अर्थ आहे. मृताहार म्हणजे मेलेली ढोरे ओढणारा असा अर्थ डॉ. भांडारकर ह्यांनी नव्यानेच केलेला दिसतो. महार असे मागाहून संभावित मराठीत रूपान्तर झाले, त्याचे मूळ रूप म्हार असे गावंढळांचे तोंडांत अद्यापि आहे, तेच रूप पहिले असावे. माळव्यात व नागपुराकडे हिंदी भाषेत 'म्हेर' असे रूप हल्लीही आहे; त्यावरून मराठीत म्हार असे होणेच जास्त संभवनीय आहे. त्याचा संभावित अपभ्रंश महार असा करून पुनः त्याचे 'मृताहर' असे संस्कृत रूप मानण्यात फारच दुरान्वय होत आहे. म्हार हे पूर्वीपासूनच मेलेली गुरे ओढणारे होते, ही कल्पना इतिहासाला धरून नाही; म्हणून ही व्युत्पत्ती असमर्थनीय ठरते. माळव्याप्रमाणे गुजराथेतही म्हारांना म्हेत्तर असे म्हणतात. त्यापासून म्हेर असे रूप होणे शक्य आहे. अजमीर-मेरवाडामध्ये म्हेर असे रूप आहे. म्हेतर (महत्तर) म्हणजे मोठा अथवा जुना माणूस. म्हातारा शब्दाचीही हीच व्युत्पत्ती आहे. आणि हीच व्युत्पत्ती ह्या प्राचीन जातीच्या इतिहासाला अधिक सुसंगत दिसते.
म्हार म्हात्म्य : ह्या पुराणाची हस्तलिखित पोथी इ.स. १९०७ साली परळ येथील आमच्या रात्रीच्या शाळेतील एका भाविक म्हार मुलाने मला दिली. तिची भाषा मासलेवाईक म्हारी आहे. ह्यात म्हार, म्हादेव, म्हामुनी असे नमुनेदार शब्द आहेत. ह्याच्या दुसऱ्या अध्यायाच्या आरंभी खालीलप्रमाणे मूळ वर्णिले आहे.
आद्यन्त तुमच्या ववस्याचे म्हैमा । सेस न वर्णवी झाली सीमा । वेदा न कळे आगमा । सोमववष अप्रंपार ॥२॥ हे म्हार म्हात्म्य कथा आगळी । जो का धरील हृदयकाळी । तयाचे द्वीतभावाची होळी । करील रुषि माडी ॥३॥ ... तरी हा माडी मूळ पुरुष । तयापासून म्हाराचा ववस । ऐसा सजना हो सावकास । चित्ती विश्वास धरुनिया ॥५॥ अनंत यौगापासून । कितीक राजाचे ढळले जन ॥ परी हा म्हार जुनाट पुरातन । न ढळेची कल्पान्ती ॥६॥ देव झाले उदंड । परि हा म्हार अक्षय्य काळदंड । ह्याच्या स्वाधीन नवखंड । केले मुळीच क्रत्यांनी ॥७॥
मुसलमानांचा संबंध मोठा चमत्कारिक उल्लेखिला आहे.
म्हार आणि मुसलमान । हे दोघे एक वंशे उत्पन्न । चंद्र वंश पूर्ण । सोम म्हणती तयालागे ॥ अ. ३ ओवी १९.
तिसऱ्या अध्यायाच्या आरंभी विलक्षण आचार सांगितला आहे. ह्या अध्यायाची ७६ वी ओवी अशी आहे :
म्हाराचा मूळ पुरुष सोमाजी नाम । दैवत सिव, देस मार्वड उत्तम । रुषि माडेय तयाचा उत्तम । घाई पूर्ण गरजतसे ॥७६॥
सहाव्या अध्यायात ४९ व्या ओवीपासून आद्य शून्यवादाचे वर्णन आहे. ह्यात महायान बौध्द धर्माची छटा दिसते. सातव्या अध्यायात कर्त्याचे नाव आहे.
''पूर्वी व्यास वाल्मिक मनी । सुखसनकादिक आदि करुनी । तयाने हे म्हार म्हात्म्य रत्नखाणी । कल्पित करोनी ठेविले ॥१६॥ तयाची चतुरा ऐसी । कलियुगी अवतरला बाळकदास । त्यांनी ह्या म्हार म्हात्म्याचा प्रकास । करोनि दाखविला कलियुगी ॥''
सातव्या अध्यायाच्या शेवटी ग्रंथसमाप्तीचे स्थळ व काळ सांगितला आहे.
''पूर्वे सन्निध पने पाकन । पावणे दोन योजन । दक्षिणेस गोदावरी पूर्ण । तीन योजने जाण बा ॥८०॥ पश्चिमेस नीराबाई मध्ये । उत्तरभागी पाडेगाव आहे । ग्रंथकर्त्याचा अवतार पाहे । तेथे झाला जाणिजे ॥८१॥ शके १८८८ (?) । सर्वधारी नाम संवत्सर प्रवेसी । वैशाख वद्य पंचमीस । ग्रंथ समाप्त झाला पै ॥८२॥ चंद्रवार ते दिसि । सोमवंश प्रवेसी । प्रथम प्रहारासी । ग्रंथ समाप्त केला हो ॥८३॥
शके १८८८ असे चुकून पडले असावे. शके १७८८ असावे. येरवी पुढील ओवीचा प्रास जुळणार नाही. शके १८८८ पुढे यावयाचे आहे.
माल (बंगाल, आंध्र)
माल, मालो, माली : ह्या नावांच्या जाती बंगाल, ओरिसा, तेलंगण देशांत पुष्कळ आहेत. त्या अगदी महारांप्रमाणेच आहेत. हे वंशाने एकच असावेत असे म्हणवत नाही. त्यांचा आपसांत रोटी-बेटी व्यवहारही होत नाही. त्यांची व्युत्पत्ती मल्ल आणि मार ह्या दोन भिन्न शब्दांपासून संभवते. गौतम बुध्दाचे काळी झल्ल, मल्ल नावाची क्षत्रिये राष्ट्रे शाक्यांच्या शेजारी राहत होती. किंबहुना, तीही शाक्यांचीच पोटजात असावीत. कालवशाने ही राष्ट्रे झालो, मालो ह्या नावाने अस्पृश्यतेप्रत पोचली असावीत. तुकारामाच्या अभंगात सालो, मालो म्हणजे यःकश्चित माणूस ह्या अर्थाने हा शब्द आला आहे. साळी माळी ह्याच मूळ क्षत्रिय नावांपासून आले असावेत. एका प्रांतात जी जात प्रतिष्ठेप्रत चढली किंवा पूर्वी प्रतिष्ठेत होती; तीच दुसऱ्या प्रांतात हीनत्वाप्रत गेलेली अशी आणखीही उदाहरणे ह्या अफाट देशात आहेत. बंगाल्यात माळी ही जात अस्पृश्य आहे, ती मालाकार म्हणजे फुलमाळी ह्या जातीपासून अगदी वेगळी आहे. मालाकार हे नवशाखा शूद्रांपैकी आचरणीय आहेत. माळी अनाचरणीय आहेत. हरप्रसाद शास्त्री म्हणतात त्याप्रमाणे पूर्वीचे मल्ल राष्ट्र पूर्वी बौध्द असून मुसलमानांच्या स्वारीनंतर बौध्द धर्माचा उच्छेद झाल्यामुळे बहिष्कृत झाले असावे. झालिया (जळी विणणारे) म्हणून दुसरी बहिष्कृत जात आहे ती झल्ल असावी. महाराष्ट्रात जसे मांगाबरोबर महार, तसे आंध्रदेशात मादिगाबरोबर माल म्हणून एक अस्पृश्य ग्रामबाह्य जात आहे. मराठयांचा महारांशी, मागांशी जसा सेव्य-सेवक अथवा जेते-जित असा संबंध आहे, तसाच आंध्र देशात रेड्डी ह्यांचा मालांशी आणि मादिगांशी आहे. रेड्डींनी (रट्टांनी) ह्या मालांना आपल्या मूळ मगध देशातून निघताना तेलंगणात आपल्या ग्रामसंस्थेच्या योगक्षेमसाठी बरोबर आणले असावे. महारांप्रमाणेच मालही बलुतेदार आहेत. त्यांची महारांप्रमाणे मरीअम्मा ही ग्रामदेवता प्रत्येक गावाच्या शिवेवर असते. तिला रेड्डी फार भजतात. कित्येक ठिकाणी ह्या मरीअम्मेचा पुजारीपणाही रेड्डींकडेच असलेला मी पाहिला आहे. पण मुळात ही मारीअम्मा मालांचीच ह्यात शंका नाही. बुध्दाचे काळी, मार नावाच जे दुष्ट व खुनशी दैवत होते त्याचीच नातलग ही मरी दिसते. ओरिसाच्या पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात खोंड वगैरे रानटी जाती, ह्या मरीआईला भयंकर रीतीने नरबळी देत असत. ते बंद करण्याचे प्रयत्न लॉर्ड डलहौसीच्या काळापर्यंत ब्रिटिश सरकार करीत आले. पण अद्यापि हा प्रकार तुरळक चालू आहेच. मार आणि मरी हे शब्द फार चिंतनीय आहेत. मॅक्स मूलरने आपल्या Physical Religion Gifford Lectures मध्ये पान ३२० वर म्हटले आहे : ''पाली भाषेमध्ये मारु असे पद दुष्ट देवतेसंबंधी योजिलेले आढळते.'' मला वाटते ह्या पदात मल अथवा मर = डोंगर ही द्राविड धातू मूळ असावी. तिच्यापासून मार, माल, म्हार वगैरे पर्याय होणे अगदी संभवनीय आहे.
मेघ (पंजाब, गुजराथ)
मघ, मेघ, मेघवाळ : Maggi - मॅग्गी नावाची एक जादूटोणा करणारी इराणी लोकांची देवपूजक जात इराणच्या पश्चिमेकडे होती. ती सूर्योपासक होती. शिवदेवतेचा सूर्याशी संबंध आहे. हिंदुस्थानात पूर्वी जेथे जेथे सूर्योपासना चालू होती तेथे तेथे त्याच जातीकडे पौराहित्य होते. ''सूर्याने प्रसन्न होऊन आपली प्रत्यक्ष तेजोमयी मूर्ती सांबाला पूजेकरिता दिली. उपास्य मिळाल्यामुळे सांबाला आनंद झाला. व त्याने सूर्याच्या आज्ञेवरून चंद्रभागेच्या तीरावर मनोहर देवालय बांधिले. तेथे देवस्थानाच्या पूजाअर्चादी व्यवस्थेकरिता हे सूर्यभक्त 'मग' नावाचे ब्राह्मण सांबाने शकद्वीपातून आणले. तेथे निमंत्रणावरून मगांची आठरा घराणी राहिली.''
-चित्रावशास्त्रीकृत 'चरित्रकोश', पान ४२०;
(सांबपुराण, २६; भविष्यपुराण, ब्राह्मखंड, ११७)
वरील सांब हा शिबि कुलातली जांबवती नावाची 'अस्पृश्य' (?) कन्यका श्रीकृष्ण वासुदेवांनी वरिलेली. तिच्या पोटी श्रीशंकराच्या प्रसादाने झालेला, पुढे राजा झाला; असा महाभारतात उल्लेख आहे. हे 'मग' लोक हिंदुस्थानात जिकडे तिकडे तिरसकरणीय मानले गेले, असेही पुराणांतून उल्लेख आहेत. ह्या मघ अथवा मेघ ह्याला र हा द्राविडी अनेकवचनी प्रत्यय लागून मेघर असा शब्द तयार होतो. त्याचा अपभ्रंश मेहर होणे अगदी सहज आहे, हे मेहर, म्हेर, मेर असामात, राजपुतान्यात, मध्यप्रांतात विपुल आहेत. पंजाबातील मेघ आणि गुजराथेतील मेघवाळ ह्या अस्पृश्य जाती तर प्रसिध्दच आहेत.
येणेप्रमाणे तीन अगदी भिन्न व्युत्पत्ती आपल्या पुढे आहेत त्या अशा :
महत्तर, म्हेतर, म्हार - ह्यांत मह = मोठा, जुना, पसरणारा, ह्या अर्थाची संस्कृत धातू आहे.
मार, माल - ह्यांत मर-मल = डोंगर ह्या अर्थाची द्राविड धातू आहे.
मघ, मेघ - ह्यांत मघ-धातू. हे एका वंशाचे (Maggi) नाव होते. कदाचित ह्या तिन्ही शब्दांचे मागे मह = पसरणे अथवा मर = पर्वत हीच धातू असावी. व्युत्पत्ती कशीही असो, महार ही जात फारच पुरातन असून अभिजात असावी, असे माझे मत झाले आहे.
मांग (महाराष्ट्र)
ह्या जातीचे दक्षिणेस कानडी व तेलगू देशांत मादिग, मध्य महाराष्ट्रात मांग, आणि उत्तरेकडे सुरतेच्या आसपास व गुजराथेत मांगेले असे तीन प्रकार आढळतात. मात्र मांगेले, हे अस्पृश्य समजले जात नाहीत. तरी पण जात एकच. हे मुळात कोल (कोळी) वंशाचे असावेत. मादिग अथवा मातंग हे संस्कृतीकरण मृताहराप्रमाणे मागाहूनचे शहाणपण दिसते. मूळ माँग, मांग, मंग हाच शब्द खरा. हा ब्रह्मी शब्द मनुष्य अथवा भाऊ अर्थाचा असावा. इंग्रजी भाषेत आडनावाच्या मागे जसा मिस्टर लागतो, तसा ब्रह्मी भाषेत माँङ् हा लागतो. गल् हा प्रत्यय अनेकवचनी आहे, तो द्राविडी आहे. माँगल हे राष्ट्रवाचक नाव असे तयार झाले. माँगल, मांगेला, मोग्गल अशी रूपे जुन्या पाली भाषेत, तशीच अद्यापि मराठी प्रचारात प्रसिध्द आहेत. किष्किंधा म्हणून तुंगभद्रेच्या काठावर जो प्राचीन देश होता त्यात मंग (माँग) ह्या राष्ट्राची वस्ती होती. त्यांची रामायणात वानरात गणना केलेली आहे. पण ती केवळ लक्षणा होय. मंग म्हणजे वानर असा कानडी शब्द आहे. तो द्राविडी असून तोच इंग्रजीतल्या मंकी ह्या शब्दातही आहे. मातंग असा शब्द सामान्यनाम आणि विशेषनाम ह्या दोन्ही रूपाने पाली आणि संस्कृत पौराणिक वाङमयात आढळतो. पण तेथे कोठेही जातिवाचक अर्थ नाही. असलाच तर तो अगदी अलीकडचा प्रचार होय. थोर आणि श्रेष्ठ अशा अर्थाने नाग शब्द आढळतो, त्याच-हत्ती किंवा सर्प अशा- अर्थाने मातंग हा शब्द आढळतो. महाभारताच्या अनुशासन पर्वात २७-२९ अध्यायांत मातंगाची कथा आहे. चांडाल असून ब्राह्मण होण्यासाठी ह्याने घोर तप केले. ह्याला स्वर्गीय ऐश्वर्य मिळाले पण ब्राह्मण्य मिळाले नाही. ब्राह्मण्य कर्मावर अवलंबून नसून केवळ जन्मावरच अवलंबून आहे, असा अर्थ दाखविण्यासाठी ही कथा आहे. अर्थात हे मागाहून आलेले शहाणपण महाभारतात घुसडून दिलेले आहे, हेही उघडच आहे.
इ.स. च्या ६ व्या शतकाच्या अखेरीस मांगलीश नावाच्या चालुक्य राजाने मातंगांना जिंकले, अशा अर्थाचा एक शिलालेख बादामी येथील माकुटेश्वराच्या देवळाजवळ पडलेल्या एका जयस्तंभावर आढळतो. मांगलांना जिंकणारा म्हणून मांगलीश हे नाव ह्या राजाला पडलेले ह्यावरून दिसते. ह्या ठिकाणी मांगलांचे राज्य होते. माकटेश्वर = मांग+कट+ईश्वर हा मांगांचाच देव दिसतो. गोव्याकडे मंगेश व शांतादुर्गा अशी जी दोन दैवत आहेत, ती ह्या लोकांची मूळची नसावीत कशावरून ? 'मंगेश-देवस्थान-इतिहास' ह्या पुस्तकाच्या पान ३ वर जी मंगेश नावाची व्युत्पत्ती दिली आहे ती, मंग नावाच्या पुरुषापासून ह्या देवस्थानाची उत्पत्ती आहे अशी दिली आहे. शांतारी ह्या नावाची मांगांची देवी कोकण किनाऱ्यावर आहे.
तिरुपती येथील वेंकटेशाला मंगापति असे एक नाव आहे. हे नाव त्या प्रांतातील ब्राह्मणेतरात, विशेषतः नायडू लोकांत, आढळते. मंगा ही वेंकटेशाची एक पत्नी. 'अलमेल मंगा' = कमलावर प्रतिष्ठिा झालेली मंगा, अशा नावाने हिचे एक विस्तीर्ण आणि सुंदर देवालय तिरुपती टेकडीच्या पूर्वेस सुमारे सात मैलांवरील तिरुचन्नुर ह्या गावात आहे. तिरुपतीहून पश्चिमेस चंद्रगिरीस जाताना वाटेत मंगापूर म्हणून एक गाव आहे. तेथे मंगा देवीचे एक भव्य पण ओसाड देऊळ आहे. आत देवीची मूर्ती मात्र नाही. वेंकटेशाची मूर्ती एका बाजूस अंधारात पडली आहे. ह्या ठिकाणी मंगी देवीशी वेंकटेशाचे लग्न झाले. पण पुढे वेंकटेशाने कोल्हापूरच्या महालक्ष्मीशी लग्न लावले म्हणून मंगादेवी रुसली व वरील तिरुचन्नुर गावी अलमेलमंगा ह्या नावाने प्रतिष्ठित झाली. हिला येथे पद्मावती असेही नाव आहे. हे देखावे मी स्वतः जाऊन पाहिले व ह्या कथा निरनिराळया लोकांच्या तोंडून ऐकल्या आहेत. मंगापूर येथील मांगवाडयात एका वृध्द मांग गृहस्थाच्या तोंडून वरील मंगावतीचे नाव जंबावती असे ऐकून तर माझ्या मनावर निराळाच प्रकाश पडला. आठव्या शतकातील तिरुमंगाई नावाच्या एका वैष्णव आळवाराने ह्याच वेंकटेशाची हरिहर ह्या रूपाने काही स्तोत्रे रचली आहेत. एकंदरीत मंग हे नाव फार जुने असावे हे सिध्द होते. मंगल, मांगल नावाच्या राष्ट्राचे राज्य ह्या प्रांती होते. ते चालुक्यांनी नष्ट केल्यावर ह्यांना हीनदशा प्राप्त झाली. ह्या झटापटीशी ह्या मंगादेवीचा संबंध कसा काय पोहचतो हा भावी संशोधकांनी शोधून पाहण्यासारखा विषय खास आहे. चंडी जशी चंडालांची, मुंडी जशी मुडाळांची तशीच मंगा ऊर्फ मातंगी ही देवी मांगांची, हे ठरण्यास मात्र फारशा संशोधनाची जरुरी लागेल असे मला वाटत नाही.
हुलया, पुलया (कर्नाटक, तामील नाड)
ह्या नावाची शेतावरच्या गुलामांची जात द्राविडदेशात - कर्नाटक आणि मलबारात - अफाट पसरली आहे. जुन्या कानडीतील प ह्या अक्षराचे नव्या कानडीत ह असे रूपांतर होते. जसे, पल्लु - हल्लु = दांत, पालू - हालु = दूध, इत्यादी. पुलय हाच मूळचा शब्द, तो पुल्कस किंवा पुलह ह्याचा अपभ्रंश होय. पुल-हुल = विटाळ, हा द्राविडी अर्थ रूढीमुळे मागाहून झाला असला पाहिजे. रावण हा पौलस्त्य होता. मलबारात आणि बनवासीत पूर्वी पुलयाचे राज्य होते असा उल्लेख वर झालेलाच आहे. हे राज्य मयूरवर्मा नावाच्या उत्तरेकडील कदंब घराण्यातील राजाने इ.स. सहाव्या शतकाच्या सुमारास दक्षिणेकडे केलेल्या स्वारीत नष्ट झाले असावे. मयूरवर्म्याने अहिक्षेत्राहून ब्राह्मण आणिले. ते हल्ली हैग, शिवळळी ह्या नावाने नैर्ॠत्य किनाऱ्यावरील जमिनीचे मालक होऊन बसले आहेत. त्यांच्या दक्षिणेस नंबुद्री ब्राह्मणांनी जमिनीची मालकी पटकावली आहे. त्यांच्या जमिनीवर हे हुलया आणि पुलया जातींचे हतभागी लोक हुट्ट आळ, पण्णु आळ, मूळाड, सालाड, म्हणजे प्राचीन कर्जाखाली दडपून गेलेले पिढीजाद गुलाम बनून जनावराप्रमाणे कसातरी गुजराणा करीत आहेत. (आळ ह्याचा अर्थ माणूस व राष्ट्र असा कानडी भाषेत होतो.) महाराष्ट्रातील महारांचा व आंध्रातील मालांचा तेथील रट्टांनी मालकी हक्क हिरावून, त्यांना बलुत्याचा तरी हक्क दिला आहे. पण नैर्ॠत्येकडील ब्राह्मण जमीनदारांनी तोही न देता केवळ गुलामगिरीत ह्यांना पुरून टाकिले आहे.
चेरुमा (मलबार)
मलबारात पुलयांनाच चेरुमा असे दुसरे नाव आहे. ह्याचा अर्थ चेर माक्कळ म्हणजे चेरपुत्र, चेर देशाचे मूळ रहिवासी, असा होतो. एल. के. अनंत कृष्ण अय्यर, ह्यांनी आपल्या 'कोचीन एथ्नीक सर्व्हे नं. ६' (इ.स. १९०६) ह्या ग्रंथात म्हटले आहे की, पुलय हेच पूर्वी मलबारचे राज होते. एक्कर यजमान नावाचा पुरुष त्या राजवंशातला समजून अद्यापि सर्व चिरुमा जातीतले लोक त्याला फार मान देतात. त्रावणकोरची राजधानी त्रिवेंद्रमजवळ वेली नावाचे तळयाचे काळी 'पुलयनार कोटा' नावाची टेकडी आहे, तेथे पुलयांचे सिंहासन होते. मी स्वतः ही टेकडी पाहिली व कथा ऐकली आहे. ओढिया जगन्नाथाच्या मूर्तीशी जसा तेथील अस्पृश्य शबरांचा, म्हैसूर इलाख्यातील मेलकोट येथील मूर्तीशी जसा तेथील होलयांचा संबंध आहे; तसाच त्रिवेंद्रम् येथील पद्मनाभाच्या देवळाशी व मूर्तीशी तद्देशीय पुलयांचा संबंध आहे. तथापि ह्या देवळात आता ब्राह्मणाशिवाय इतर सर्वांस मज्जाव आहे. महात्मा गांधींनाही तेथे मज्जाव झाला हे प्रसिध्दच आहे. एखाद्याचे राज्य पचविण्यास त्याचे देवस्थान पचवावे लागते. ही राजनीती आर्यांना कोणी शिकवायला नको. चेरुमान पेरुमाळ अशी मलबारच्या राजाला पूर्वी संज्ञा होती. पुलया हे पूर्वी बौध्द होते. अद्यापि त्यांच्या देवतांना चाटन = शास्ता अशी नावे आहेत. संस्कृतात त्यांची पारंगतता आहे. 'केरळ' हा आदिद्राविड ग्रंथ एका पुलयानेच केला आहे.
परैया (परयन) - (तामील नाड)
हे नाव तामीळ भाषेत परै म्हणजे ढोल ह्या अर्थाचा शब्द आहे; त्यावरून पडले असावे, असा तामीळ देशात बऱ्याच विद्वानांचा समज असलेला मला आढळून आला. पण ही व्युत्पत्ती मृताहर शब्दापासून महार ह्या नावाचा छडा लावू पाहण्यासारखीच असमर्थनीय आहे. तामीळ भाषेत परयन् असा एकवचनी व परयर असा अनेकवचनी नाववाचक शब्द आहे. ह्यात मूळ पर अशी धातू. तिला य असा आदेश लागला आहे; जसा मलबारात मल = डोंगर ह्याला य लागून मलयन असा नाववाचक शब्द तयार झाला आहे, तसाच हाही तयार झाला असला पाहिजे. बिशप कॉल्डवेलच्या 'द्राविडी भाषांचे तौलनिक व्याकरण' ह्या पुस्तकाच्या इ.स. १८७५ साली प्रसिध्द झालेल्या दुसऱ्या आवृत्तीच्या पान ४६३ वर तौलनिक शब्दांची एक यादी दिली आहे. डॉ. गुंडर्टचे मते द्राविड भाषेतून संस्कृतात शिरलेले जे काही शब्द आहेत अशांची ही यादी आहे. ह्या यादीत फल ह्या संस्कृत शब्दाचे मूळ रूप पळ असा द्राविड शब्द असून त्यात पर = प्राचीन, जुना अशा अर्थाची अस्सल द्राविड धातू आहे, असे कॉल्डवेलचे म्हणणे आहे. संस्कृतात पर = थोर, प्राचीन, असा शब्द आहे, तोही द्राविडच ठरतो. त्यापासूनच परयन् हे नाव आले असावे असा माझा तर्क आहे. मह = मोठा, महत्तर = म्हातारा, ह्यापासून म्हार हे नाव जसे आले, तसेच परपासून परयन् हे ह्या प्राचीन थोर जातीचे नाव उद्भवणे इतिहासाला अधिक धरून आहे. ह्या जातीला हीनत्व आल्यावर ही ढोलके वाजविण्याचे हीन काम करू लागली आहे. पण अनादी कालापासून ही जात ढोलकेच वाजवीत होती, असे समजणे महार अनादी कालापासून मेलेली ढोरे ओढत आले आहेत, असे समजण्याप्रमाणे निराधार आहे. अगोदर ह्या हतभागी लोकांचे स्वातंत्र्य व ऐश्वर्य हिरावून घ्यावयाचे आणि नंतर त्यांचा इतिहासही हिरावून घ्यावयाचा आणि सर्वांवर कळस म्हणून त्यांच्या हल्लीच्या हीनत्वाला शोभेल अशीच त्यांच्या नावांची निराधार व्युत्पत्ती त्यांना चिकटवावयाची ! हा प्रकार अन्यायाला अडाणीपणाची जोड देऊन दुःखावर पुनः डाग देण्याप्रमाणेच निष्ठुर आहे. हे सर्व जाणूनबुजून होत नसले तरी अनुकंपनीय खास आहे. पर धातू आर्य भाषेतली असो, द्राविड भाषेतली, किंवा दोन्ही भाषांतली समान असो. तिचा अर्थ पिकलेला, प्राचीन, जुना, थोर असा आहे खास. त्यापासून परयन् हे नाव पडणे, म्हणजे त्या प्रदेशात नवीन आलेल्या वंशांनी जुन्या वंशांना हे नाव देणे, अधिक संभाव्य आहे. भाषेशिवाय इतिहासाचाही अधिक पुरावा आहे. बिशप कॉल्डवेल ह्या विद्वान भाषाशायाने ह्याच पुस्तकात (पान ५४०-५५४) परयर हे मूळचे द्राविड आहेत, की कोणी भिन्नवंशी आहेत, ह्यावर साधकबाधक प्रमाणे दिली आहेत. ते वंशाने कोणी असोत, दर्जाने मोठे अभिजात होते, हे मात्र उघड होते. ती सर्व प्रमाणे येथे देण्यास स्थळ नाही. कॉल्डवेलचा एकच उल्लेख मार्मिक आहे; तो येथे दिल्याशिवाय मात्र राहवत नाही. मद्रास शहरात जॉर्जटौन नावाचा एक जुना भाग आहे. त्यात मारी देवीचा एक वार्षिक उत्सव होत असतो. ही मारी ऊर्फ शीतला म्हणजे भूमिमाता हीच देवी होय. आमच्याकडील तुळशीच्या लग्नाप्रमाणे हे मारीचे वार्षिक लग्न असते. त्या वेळी मारी देवीच्या गळयात ताळी बांधावयाची असते; ती अर्थात तिच्या नवऱ्यानेच बांधावयाची असते. ती बांधण्याचा अधिकार परयाहून इतर कोणालाही मिळू शकत नाही. ह्यावरून परया हाच भूमीचा अर्थात देशाचा पहिला पती असा स्पष्ट ध्वनी निघतो, असे कॉल्डवेलचे म्हणणे आहे. ह्या विधीला 'एगताळ' असे नाव आहे. अशा प्रकारचा थोरपणाचा मान महाराष्ट्रात म्हारांना व राजपुतान्यात भिल्लांना मिळत असलेले पुरावे पुष्कळ गोळा करता येतील असे मला वाटते.
येझवा अथवा तिय्या (मलबार)
ह्या जातीची मोठी संख्या मलबार, त्रावणकोर व कोचीन संस्थानांत आढळते. त्रावणकोर संस्थानचे इ.स. १९०१ च्या खानेसुमारीचे अधिकारी एन. सुब्रह्मण्णय्यर हे आपल्या रिपोर्टात पान २७८-७९ वर ह्या जातीच्या नावाच्या व्युत्पत्तीची मीमांसा करिताना लिहितात की ही जात मूळ सिंहलद्वीपातून मलबारात व तामीळ देशात आली. सिंहल ह्या नावाचा अपभ्रंभ ईझम असा होऊन, त्यापासून येझवा असे हल्लीचे नाव आले. इळवा असाही अपभ्रंश होय. तिय्या असेही ह्यांना नाव आहे. ते द्वीप ह्या शब्दाचा अपभ्रंश होय. नायर लोकांप्रमाणे ह्या लोकांची पूर्वी सैन्यांत भरती होत होती. ह्या लोकांनीच ताडीचे झाडाची लावगवड सिंहलद्वीपातून प्रथम हिंदुस्थानात आणली. ह्यांचा हल्लीचा धंदा शेतीचा - विशेषतः ताडी काढण्याचा व विकण्याचा - आहे. त्यांची राहणी स्वच्छ आणि सुसंपन्न असूनही ताडीच्या निषेधामुळे ह्यांना अस्पृश्यता आली आहे. पण मूळचे हे अभिजात आहेत. ह्यांचा मूळ धर्म बौध्द. तेही एक ह्यांच्यावरील बहिष्काराचे मुख्य कारण आहे.
पळळन् (तामील नाड)
महाराष्ट्रात जशी महारांना मांगांची जोड, तशी तामीळ देशात परैय्यांना पळळांची जोड आहे. कर्नाटकाच्या खाली दक्षिणेत सर्वत्र खालच्या वर्गात बलगै (उजव्या हाताकडचे) आणि यडगै (डाव्या हाताकडचे) असा भेद आढळतो. हा ग्रामसंस्थेतील दर्जाचा मान दिसतो. ह्या उजव्या-डाव्या मानाबद्दल नेहमी तंटे आणि मारामाऱ्याही होतात. परयन् उजव्या मानाचा व पळळन् डाव्या मानाचा आहे. पण हे दोघे अगदी भिन्न वंशांचे आहेत. कांचीचे पल्लव राजघराणे कोणी म्हणतात की इराणातून आलेले पार्थव, तर कोणी म्हणतात इकडचे कोणीतरी मूळ एतद्देशीय. दुसऱ्या पक्षी, हेच आता अस्पृश्य बनलेले पळळ असावेत.
चक्किलियन अथवा शक्लीया (तामील नाड)
कातडयाची काम करणाऱ्या ह्या जातीची संख्या ही मद्रासेकडे बरीच मोठी आहे. शिकलगार म्हणजे हत्यारांना शिकल करणारी एक फिरस्ती गुन्हेगार जात मी कर्नाटकात पाहिली आहे. त्यांचा व चक्किलियनांचा नावाचा संबंध दिसतो. हत्यार पाजळण्यासाठी ह्यांच्याजवळ एक चाक किंवा चक्की असते. त्यावरून चक्किलियन हे नाव पडले असावे. हत्यार पाजळण्याचा निषेध आहे व कातडयाची कामेही घाणेरडी असतात, त्यावरून ह्यांना अस्पृश्यता आली असावी. बंगाल्यातील शक्ली जातीचाही ह्यांच्याशी संबंध असावा.
चांभार (सर्व प्रांत)
सर्व मानीव अस्पृश्यांमध्ये चांभारांची संख्या अतिशय मोठी म्हणजे १,११,३७,३६२ आहे. ह्याचे कारण हिंदुस्थानातील बहुतेक प्रांतांत कातडयाची कामे करणारे ह्याच नावाने ओळखले जातात. पण ह्यावरून हे सारे एकाच वंशाचे असावेत, असे मुळीच नाही. अस्पृश्यता किंवा बहिष्काराच्या दृष्टीनेही ह्यांची स्थिती सर्व प्रांतांत सारखी नाही. ह्या दृष्टीने काही प्रांतांत हे इतरापेक्षा उच्च दर्जाचे आहेत, तर दुसऱ्या प्रांतांत नीच दर्जाचे आहेत. चेहरेपट्टीवरून व वर्णावरून काही प्रांतांत हे इतके उजळ आणि नीटस दिसतात की, ते आर्यच असावेत, अशी खात्री होते. ते वेदकाळात खात्रीने अस्पृश्य व बहिष्कृत नव्हते. असते तर तसा उल्लेख असता. चांभार हा चर्मकार ह्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. मोची म्हणून जी गुजराथेत जात आहे, ती मुळीच अस्पृश्य नाही. ह्यांचा धंदाही कमाईचा असल्याने व खाणेपिणे स्वच्छ असल्याने ह्यांना अलीकडे अस्पृश्यांत गणलेले आवडत नाही.
नमशूद्र आणि राजबंशी (बंगाल)
नमशूद्र, राजबंशी, कोच, पोड वगैरे बंगाल्यात व आसामात बऱ्याच जाती आहेत; त्यांना बऱ्याच शतकांपासून जी चांडाल ही संज्ञा होती, ती भाषेच्या दृष्टीने खरी असो किंवा नसो, ते पूर्वी अस्पृश्य व बहिष्कृत नसावेत. चंडाल म्हणून अगदी प्राचीन काळी हे स्वतंत्र राष्ट्र असावे. हे लोक चंड असले तरी अस्पृश्य खास नसावेत. विशेषतः पोड (पौंड्र) हे व्रात्य क्षत्रिय होते असा मनुस्मृतीत उल्लेख आहे. अलीकडे जोराची चळवळ करून खानेसुमारीत ह्या जातीने आपली चंडाल ह्या संज्ञेपासून सुटका करून घेतली आहे. तथापि त्यांची अस्पृश्यता पार नाहीशी झालेली नाही. पूर्व बंगाल्यात मी ह्यांच्यामध्ये दोनदा जाऊन दोन-चार महिने प्रत्यक्ष राहून ह्यांची घरगुती व सामाजिक स्थिती पाहिली आहे. त्यावरून ते पूर्वी बौध्द असावेत आणि ह्यांची एकंदरीत प्रागतिकता पाहून ह्यांची अस्पृश्यता हे लवकरच झुगारून देतील ह्यात मला संशय वाटत नाही.
बाउरी, बाथुरी (ओरिसा)
पहिल्या खंडातील पाचव्या प्रकरणात ह्या नावाच्या जातीचा विस्तृत शोध कसा लागला ह्याचे वर्णन आहे (पान ५५-५६ पहा). हे मूळ ब्राह्मण जातीचे आर्य असावेत असे प्रसिध्द बंगाली संशोधक बाबू नगेंद्रनाथ बसू ह्यांचे म्हणणे आहे. व त्यांनी सिध्दांताडंबर ह्या बाथुरी लोकांच्या ओरिया भाषेतील ग्रंथावरून आपल्या Modern Buddhism ह्या ग्रंथात (पान २३-३० भाग १ ला) तसे सिध्द केले आहे.
सवर, शबर (ओरिसा)
शबर, शक वगैरे जातीही व्रात्य क्षत्रिय म्हणून प्रसिध्दच आहेत. ही आता हीनत्वाला पोहचलेली प्राचीन राष्ट्रे ओरिसा देशातील, रानावनातून हल्ली आपल्या बुध्द धर्माचे गुप्तपणे अनुष्ठान लपूनछपून करीत आहेत. त्यांच्या कित्येक जाती अगदी अस्पृश्य मानल्या जाऊन बहिष्कृत झाल्या आहेत, वगैरे माहिती मागील प्रकरणातून वरील Modern Buddhism ह्या ग्रंथावरूनच दिलेली आढळेल.
बळाई (माळवा)
उत्तर हिंदुस्थानात विशेषतः माळव्यात ह्या जातीची मोठी संख्या आढळते. ह्यांना अस्पृश्य गणावे की नाही हा मोठा प्रश्न आहे. हे शेतकरी गुलाम असावेत. ह्यांच्यापैकी पुष्कळांनी वैष्णव धर्म स्वीकारून मांसाहार अगदीच वर्ज्य केला आहे. तरी दर्जा फारसा वर चढला नाही. ह्या नावाची व्युत्पत्ती नीटशी लागत नाही. बळ-बढ-बुढ-वृध्द = प्राचीन, असा मी तर्क करीत आहे; पण ह्याला ऐतिहासिक पुरावा नाही.
ढाणक (गुजराथ गंगथडी वगैरे)
ह्या जातीची संख्या फार मोठी आहे. ह्यांची अस्पृश्यता अनिश्चित आहे. हे गुजराथेत जंगली असले तरी अस्पृश्य नाहीत. स्थानिक अथवा धान्यक ह्या संस्कृत शब्दापासून ह्या नावाची व्युत्पत्ती असावी. जैनांक ढाणक असा पंथ आहे. त्यांच्या नावाचे मूळ स्थानकवासी असे आहे. ही जमात अगदी मूळची एतद्देशीय असावी. हे मूळचे शेती करणारे असावेत. त्यावरून धान्यक हे मूळचे नावही संभवते. कापड विणण्याचा धंदा जसा वर्ज्य ठरवून खादी विणणारे धेड जसे अस्पृश्य ठरले; तसेच कृषिकर्म करणे वर्ज्य ठरवून जैनांनी प्रथम व इतर हिंदूंनी नंतर ह्या शेतकरी गुलामांना अस्पृश्य ठरविले असल्यास हिंदी इतिहासाच्या परंपरेला अगदी धरूनच आहे !
तुबायाझा (ब्रह्मदेश)
ब्रह्मदेशातील अस्पृश्य जातीत तुबायाझा या नावाची जात प्रमुख आहे. ह्या नावाची मूळ व्युत्पत्ती अशुभ राजा असा संस्कृत शब्द आहे. हल्ली ह्या लोकांकडे जरी ब्रह्मदेशात थडगी खणण्याचे काम आल्याने त्यांच्या वसाहती स्मशानाजवळच आढळतात, तरी ब्रह्मदेशात मध्ययुगीन काळात ज्या वेळोवेळी राज्यक्रांत्या झाल्या, त्या वेळी यशस्वी राजांनी जिंकलेल्या राजघराण्यातील सर्व माणसांनाच नव्हे, तर प्रजेलाही गुलाम करून त्यांना हलक्या दर्जात डांबून कसे ठेविले, ह्याचे वर्णन पहिल्या खंडात ब्रह्मदेशाचे प्रकरणात आलेच आहे. आत व्युत्पत्तीच्या दृष्टीनेही हीच माहिती खरी ठरते. ब्रह्मीभाषेत संस्कृत मूळ च, स, र, ह्या वर्णांचा उच्चार अनुक्रमे स, त, य, असा होतो असेही त्या प्रकरणात सांगितले आहे. अशुभ राजा ह्या शब्दाच्या पहिल्या 'अ' चा लोप होतो. काही असो. ही जात पूर्वी अतिशय अभिजात होती हे सिध्द होते.
संडाला, डूनसंडाला (ब्रह्मदेश)
संडाला हे नाव संस्कृत चंडाल आणि डूनसंडाला हे डोम चंडाल ह्या नावांचा अपभ्रंश आहे. पूर्वी चंड, मुंड, गंड, वगैरे प्रतापी मोगलवंशी राष्ट्रे होती. त्यात आळ ह्या पदाची भर पडून चंडाळ, मुंडाल = मंडळ अशी रूपे सिध्द झाली आहेत. आळ हा शब्द द्राविड असून त्याचा अर्थ राष्ट्र असा आहे. मल्याळ ह्या शब्दातही हाच आळ शब्द आढळतो. मुंडाळ नावाचेही राष्ट्र असावे. मुंडारी ही भाषा मुंडाळांचीच असावी. पूर्व बंगाल्यातील अनेक नमःशूद्र घराण्यांना 'मंडळ' असे उपनाव असलेले मी पाहिले आहे. ते नाव मुंडाल ह्या शब्दावरूनच आले असावे. चंड म्हणजे प्रतापी असा संस्कृतात जो शब्द आहे तो व चंडी, मुंडी, चामुंडी ह्या देवतांची नावे पुराणात आढळतात, त्यावरूनही चंडाल, मुंडाळ, ही राष्ट्रे फारच प्राचीन इतकेच नव्हे, तर अभिजातही असावीत, पण राजकारणाच्या धकाधकीत फार प्राचीन काळीच त्यांना ही अवनती प्राप्त झाली असावी, असा तर्क करण्यास जागा आहे.
फचाचून अथवा फयाकून (ब्रह्मदेश)
ह्या नावाची व्युत्पत्ती पूर्णपणे समाधानकारक लागत नाही. तरी अर्धीमुर्धी लागते. फया हा शब्द बुध्द ह्या शब्दाचा ब्रह्मी भाषेतील अपभ्रंश आहे, हे वाचून पुष्कळांस आश्चर्य वाटेल. पण तो तसा आहे की निश्चित आहे. बुध्द = बुढ्ढ = बुऱ्ह = फर्र = फय्य = फया, अशी उत्क्रांती झाली आहे. शेवटी आश्चर्य हे की फया म्हणजे देव असाच अर्थ होऊन न राहता देऊळ असाही अर्थ झाला आहे. पण चून ह्या शब्दाची व्युत्पत्ती शोधून काढावयास मला ब्रह्मदेशात वेळच मिळाला नाही. कदाचित फया सूनु = देऊळ पुत्र, देवळी, असा अर्थ असेल. पण सुनू ह्याचा अपभ्रंश तूनु असा व्हावयाला पाहिजे. आणि तूनु ह्याचा पुढे चून अथवा कून कसा झाला हे सांगवत नाही. तरी ते संभवनीय आहे. व्युत्पत्ती कशीही असो. पगानच्या अनिरुध्द नावाच्या ब्रह्मी राजाने दक्षिण ब्रह्मदेशातील मनुहा ह्या नावाच्या तेलंग राजाला इ.स.च्या ११ व्या शतकात युध्दात पादाक्रांत करून पगान येथे त्याच्या परिवारासह नेऊन देवळी गुलाम बनविले ह्याचे वर्णन पहिल्या खंडात आलेच आहे.