भारतीय निराश्रित साह्यकारी व साह्यकारक मंडळी

भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी 

ही संस्था सन १९०६ च्या ऑक्टोबरच्या १८ व्या तारखेला स्थापन झाली.  ही धर्मार्थ संस्था या सदराखाली सन १८६० च्या २१ व्या कायद्याप्रमाणे नोंदलेली आहे.

या संस्थेचे सध्याचे कार्यकारी मंडळ

सर नारायण गणेश चंदावरकर - अध्यक्ष
शेट दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला, जे. पी. - उपाध्यक्ष
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए. -जनरल सेक्रेटरी
रा. रा. व्ही. एस. सोहोनी -ऍसिस्टंट जनरल सेक्रेटरी
रा. रा. पी. बी. गोठोस्कर, बी.ए. - ऑनररी ट्रेझरर
डॉ. कु. काशीबाई नवरंगे, बी.ए., एल.एम. ऍंड एस.
श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे
रा.रा. लक्ष्मण बाळकृष्ण नायक, बी.ए.
रा. रा. जी. बी. त्रिवेदी, बी.ए.
रा. रा. अमृतलाल व्ही. ठक्कर, एल. सी.ई.
रा. रा. एन. जी. वेलिनकर, जे. पी. एम. ए., एल.एल.बी.
रा. रा. एन. बी. पंडित, बी.ए.

ट्रस्टी
शेठ दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला, जे.पी.
रा. रा. हरी सीताराम दीक्षित, बी.ए., एल.एल.बी.
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए.

संस्थेसंबंधी सर्व माहिती, रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे, बी.ए. जनरल सेक्रेटरी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन यांजकडे, डिप्रेस्ड क्लासेसमिशन स्कूल परळ, येथे मिळेल.

पुरवणी सुबोधपत्रिका ता. ६ मार्च १९१०

भारतीय निराश्रित साह्यकारक मंडळी

स्थापना
शके १८२८ कार्तिक शुद्ध प्रतिपदा, ता. १८ ऑक्टोबर सन १९०६
नामदार न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरकर - अध्यक्ष
रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे -  जनरल सेक्रेटरी

लोकसंख्या  :  हिंदुस्थानांतील एकंदर लोकवस्ती २९,४३,६१,०५६ पैकी एकून हिंदूंची संख्या २०,७१,४८,०२६.  पैकी अस्पृश्य मानलेल्या लोकांची संख्या ५,३२,०६,६३२ सहा हिंदूंमध्ये किंवा ४ हिंदूंमध्ये एक अस्पृश्य !  १९०१ सालची खानेसुमारी पहा.

हेतू  :  हिंदुस्थानांतल महार, मांग, चांभार, पारिया वगैरे (विशेषेकरून पश्चिम हिंदुस्थानांतील) निकृष्ट वर्गांना व इतर अशाच रीतीने निराश्रित झालेल्या लोकांना (१) शिक्षण, (२) कामधंदा, (३) ममतेची आणि समतेची वागणूक, (४) धर्म, नीति, आरोग्य आणि नागरिकता इत्यादीविषयक उदार तत्त्वांचा उपदेश व अशाच इतर साधनांच्याद्वारे आत्मोन्नती करण्याचे कामी साहाय्य करणे, हा ह्या मंडळीचा हेतू आहे.  हिच्या विद्यमाने सध्या खालील संस्था काम करीत आहेत.

१.  मुंबई  :  परळ, भायखळा, कामाठीपुरा, देवनार येथे ४ शाळांतून ४०० च्या वर मुले शिकत असतात.  परळ आणि भायखळा येथे रविवारी सकाळी गीतावर्ग व सायंकाळी भजन समाज भरतो.  शिवाय शनिवारी कीर्तने, पुराणे, व्याख्याने इत्यादी होतात.  निराश्रित सदनांस ह्या कामी वाहिलेल्या ४ स्त्रिया व ३ पुरुष गरिबांच्या घरोघर जाऊन त्यांचा समाचार घेणे, शुश्रूषा करणे वगैरे कामे करितात.  परळच्या शाळेत पुस्तके बांधण्याचा व काळबादेवी रोडवरील बायबल सोसायटीजवळच्या दुकानात कातडयाचा कारखाना चालू आहे.  मंडळीच्या 'प्युरिटी सर्व्हंट' नावाच्या इंग्रजी मासिक पुस्तकात ठिकठिकाणचे मासिकवृत्त प्रसिद्ध होते.  वार्षिक वर्गणी २॥ रु. सेक्रेटरी : रा. वा. स. सोहनी, ग्रांटरोड

२.  पुणे  :  १ दिवसाची, २ रात्रीच्या, १ रविवारची शाळा.  २०० विद्यार्थी.  १ भजन समाज.  सेक्रेटरी  :  रा. ए. के. मुदलियार, रास्तेपेठ

३.  मनमाड  :  १ रात्रीची शाळा. ४५ विद्यार्थी. सेक्रेटरी :  रा. मोहनसिंह मोतीसिंह

४.  इंदूर  :  १ रात्रीची शाळा.  २० विद्यार्थी.  सेक्रेटरी  : रा. रा. गो. मिटबावकर, ब्राह्मसमाज

५.  अकोला  :  २ रात्रीच्या शाळा.  ७२ विद्यार्थी.  भजनसमाज.  सेक्रेटरी :  एस. सी. होसळळी, ब्यारिस्टर

६.  उमरावती  :  २ रात्रीच्या शाळा.  ५३ विद्यार्थी.  सेक्रेटरी :  रा. गोविंदराव काणे, वकील.

७.  दापोली  :  सेक्रेटरी :  डॉ. वा. अ. वर्टी

८.  महाबळेश्वर  :  १ विणण्याचा कारकाना.  ५० निराश्रित माणसांचा परिवार.  सेक्रेटरी :  मिसेस जेम्सन.

९.  नाशिक  :  एजंट रा. गणेश आक्काजी गवई.  सेक्रेटरी : रा. पाटणकर वकील.

१०.  ठाणे :  सेक्रेटरी :  डॉ. संतुजी रामजी लाड, बाँबे रोड.

११.  मंगळूर  :  १ दिवसाची शाळा, १ बोर्डिंग, १ विणण्याचा कारखाना, १ वसाहत.  सेक्रेटरी :  रा. के. रंगराव, वकील.

१२.  मद्रास :  २ दिवसाच्या, २ रात्रीच्या शाळा, १३० विद्यार्थी, १ रविवारची शाळा.  सेक्रेटरी :  मि. व्ही. गोविंदन. बी.ए.

ह्याशिवाय कोल्हापूर, राजकोट, कलकत्ता रावळपिंडी, डेहराडून वगैरे ठिकाणी ह्याच धर्तीवर कामे चालली आहेत.

इ.स. १९०९ साली नुसत्या मुंबई येथील संस्थांचा ७,३५७ रुपये ११ आणि ५॥ पै इतका खर्च झाला.  मंडळीचे दरसाल वर्गणीचे उत्पन्न सुमारे ३,००० रु.चे आहे.  बाकीची तूट अकस्मात देणग्यांच्या द्वारेच कशीतरी भरून काढावी लागते.  एकषष्ठांश भारताला साह्य करण्याच्या कामी किती मदत पाहिजे, हे वेगळे सांगावयाला नकोच.

वि. रा. शिंदे
जनरल सेक्रेटरी
राममोहन आश्रम,
गिरगांव - मुंबई

निराश्रित साहाय्यक मंडळी

महिला समाज

वरील समाजाचा पहिला वार्षिक उत्सव, मदनपुरी, मार्लेड रोडवरील इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या चार माडयांसमोरील मंडपात गेल्या ता. २० रोजी सायंकाळी ४॥ वाजता श्री. सौ. लक्ष्मीबाई चंदावरकर यांच्या अध्यखतेखाली साजरा करण्यात आला.  या प्रसंगी सौ. लेडी चंदावरकर, मिसेस बोवेन, मिसेस निकंबे, मिस काब्राजी, सौ. जमनाबाई सक्कई, मिसेस पंडित, मिसेस परुळकर, कु. कृष्णाबाई जव्हरे, सौ. चंद्राबाई यंदे, सौ. लक्ष्मीबाई रानडे, सौ. सुशीलाबाई वैद्य, मिसेस जयकर, मिस ताराबाई केळकर, सौ. काशीबाई भोसले, श्री. जनाबाई रोकडे इत्यादी सुमारे ५० आर्यभगिनी व निराश्रित समाजाच्या सुमारे पाचशे स्त्रिया व मुली हजर होत्या.

सौ. लेडी चंदावरकर या अध्यक्षस्थानी विराजमान झाल्यावर प्रार्थनेचे पद म्हणण्यात आले व निराश्रित साहाय्यक मंडळीच्या शाळेतील लहान मुलींनी बाहुल्यांचे खेळ व गाणी म्हणून दाखविली.  नंतर सौ. सुशीलाबाई वैद्य व ताराबाई केळकर यांनी दिलरुबा वाजवून सुस्वर गाणी म्हणून दाखविल्यावर निराश्रित साहाय्यक मंडळीच्या महिला समाजाच्या सेक्रेटरी सौ. जनाबाई यांनी भायखळयाच्या शाळेचा पुढील वार्षिक रिपोर्ट वाचून दाखविला :

वार्षिक रिपोर्ट

निराश्रित सहाय्यक मंडळीची स्थापना झाल्यावर लवकरच चालकांना असे आढळून आले की, निराश्रितवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांच्या बायकामुलांच्या घरगुती अडचणी काय आहेत हे समजून घेऊन त्यांच्याशी अगदी मिळूनमिसळून त्यांच्या हिताची कामे सतत करीत राहिल्याशिवाय मंडळीच्या हेतू, नुसत्या काही शाळा चालवून, मुळीच साधणार नाही.  ह्या कामाला वाहून घेणाऱ्या काही थोडया भगिनींची साहाय्यता मिळाल्यावर 'निराश्रित सदन' ह्या नावाची संस्था ता. २१ मे १९०७ रोजी ग्लोब मिलजवळील चाळीत उघडण्यात आली. प्रथमपासून १९१० जूनअखेर ह्या संस्थेच्या खर्चासाठी एका परोपकारी गृहस्थाकडून दरमहा नियमाने १०० रु. मिळत असत.  एवढीच काय ती मदत ह्या सदनास होती.  तीही आता बंद पडल्यामुळे खर्चाच्या दृष्टीने सदनाची स्थिती चिंता बाळगण्यासारखी झाली आहे.  तथापि अजूनपर्यंत ईश्वरकृपेने सर्व कामे तशीच चालून, काही नवीही उत्पन्न होत आहेत.  

सन १९१० जून अखेर ह्या सदनाचे काम परळ येथेच चालले होते.  त्यानंतर सौ. कल्याणीबाई सैय्यद ह्यांची जोड सदनास मिळून परळप्रमाणेच भायखळा येथेही काम चालविण्यास सवड मिळाली व त्यामुळे गेल्या वर्षी एकंदर १५ सभा भरविण्यात आल्या.  व या प्रसंगी स्वामी धर्मदास. रा. रा. ब. शिंदे, रा. जव्हेरे, रा. खरे, सौ. गुलाबबाई जव्हेरे, रा. नाईक. रा. नाडकर्णी, सौ. लक्ष्मीबाई गाडगीळ व रा. गोपाळ कृष्ण देवधर यांनी भजने, पुराणे व व्याख्याने देऊन सभेच्या कामाला प्रोत्साहन दिले.  याशिवाय निरनिराळया प्रसंगी हळदीकुंकवाचे समारंभही साजरे करण्यात आले.

महिला समाज  :  वर सांगितल्याप्रमाणे गतसालच्या चातुर्मास्यात हळदीकुंकवाचे समारंभ निराश्रितवर्गाच्या प्रमुख बायकांनी आपल्या मोहल्ल्यात मोठया उत्साहाने साजरे केले व त्याचा खर्चही आपणच सोसला.  ह्या गोष्टीचा शेवटी परिणाम असा झाला की, आपला एक निराळा समाजच असावा असे ह्यांना वाटू लागले.  म्हणून गेल्या हरतालिकेच्या मुहूर्ताने 'आर्यमहिलासमाजा'च्या धर्तीवर भायखळा येथे एक महिला समाज स्थापन झाला.  आरंभी त्याच्या १८ स्त्रिया सभासद झाल्या पण वर्षअखेर त्यांपैकी ९च नावे पटावर राहिली आहेत.  प्रत्येक बाई दरमहा निदान एक आणा तरी नियमाने वर्गणी देत असते.  आपले इलाखाधिपती नामदार सर जॉर्ज क्लार्क ह्यांचा गेल्या नवंबरमध्ये विवाह झाल्यावेळी त्यांच्या अभिनंदनार्थ जी बायकांची सभा झाली, तेव्हा ह्या समाजाच्या सभासदांनी मोठी मदत केली.

शिवणकामाचा वर्ग  :  भारखळा येथील शाळेत हा वर्ग शनिवार-रविवार खेरीजकरून रोज भरतो.  तेव्हा सरासरीने ४५ बायका आपले घरचे शिवण येथे शिवून घेऊन जातात.  ह्या वर्गासाठी एक शिवण्याचे यंत्र मुख्यतः सौ. लक्ष्मीबाई गाडगीळ ह्यांच्या श्रमामुळे मिळाले आहे.  सौ. शांताबाई खरे व कुमारी सीताबाई मराठे ह्यांनीही ह्या यंत्रासाठी वर्गणी जमविली आहे.

समाचार  :  घरोघर भेटीला जाऊन समाचार घेण्याचे काम वर्षभर सतत चालले होते.  ह्या कामाचा फायदा आमच्या निराश्रितवर्गाच्या भगिनींना कितपत मिळतो, हे आम्हांस सांगवत नाही; परंतु त्याचा आम्हां स्वतःला मात्र फारच मोठा अनुभवाचा फायदा मिळत आहे.  ह्या लोकांसाठी नम्रभावाने व कराराने काम करणाऱ्या मंडळीचा संग्रह व्हावा हा एक ह्या सदनाचा जो हेतू आहे, तो सिद्ध होणार असेल तर त्याच कामामुळे होईल असे आम्हास आता कळून चुकले आहे.

सौ. जनाबाई शिंदे यांनी वरील रिपोर्ट वाचून दाखविल्यानंतर सौ. कल्याणबाई यांनी परळ येथील निराश्रित सदनाच्या कामाच्या हकीगतीचा पुढील रिपोर्ट वाचून दाखविला.

परळ येथील कामाची हकीगत

सदनाच्या परळ येथील कामाचा चार्ज मजकडे १९१० जानेवारीपासून देण्याता आला.  तेव्हापासून गेल्या वर्षअखेर खालील कामे झाली :

१.  घरातील वर्ग (होम क्लास) :  १९०९ ऑक्टोबरपासून पत्र्याच्या चाळीत एक व ग्लोबमिलजवळील चाळीत एक असे दोन वर्ग सुरू करण्यात आले.  पहिल्यात ७८ महार-चांभाराच्या बायका आठवडयातून दोन वेळ १॥ तास शिकत होत्या व दुसऱ्यात १० बायका होत्या.  पहिला मार्चपर्यंत व दुसरा फेब्रुवारीपर्यंत चालून हे दोन्ही वर्ग बंद पडले.  घरच्या कामामुळे किंवा केवळ कंटाळयामुळे बायका नीट जमेनाशा झाल्या.  त्या पुढे ह्या दोन्ही वर्गांत येणाऱ्यांपैकी ३४ बायका परळ येथील सदनातच शिकावयास येऊ लागल्या, एवढाच काय तो ह्या वर्गाचा परिणाम झाला.

२.  प्रसूती आणि शुश्रूषा :  गेल्या वर्षी एकंदर १३ बायकांची प्रसूती करण्यात आली पैकी एकीची स्थिती फारच कठीण होती.  म्हणून तिला 'कामा हॉस्पिटल' मध्ये पाठविण्यात आले.  तेथे तिची चांगल्यारीतीने सुटका झाली.  घरोघरी आजारी बायकांची केव्हा केव्हा शुश्रूषा करण्यात आली व पुष्कळांना सेवासदनाच्या दवाखान्याचा लाभ देण्यात आला.

३.  सभा :  महिन्यातून एक किंवा दोन बायकांच्या सभा होत असत; त्या मेपासून सप्टेंबरपर्यंत बंद होत्या.  त्या वेळी पुराणातील काही भागांचे वाचन किंवा एखाद्या विषयावर सोपे व्याख्यान होत असे.  ह्या कामी श्रीमती सीताबाई अनगळ, भिमाबाई ठाकूर, सौ. गोपिकाबाई लेले, रा. मोरोपंत खरे, रा. नाईक, वगैरे मंडळीची मोठी मदत झाली.

४.  इतर कामे :  पोलीस कमीशनरकडून बेवारशी बालके व मुली मिळून ५ आली.  त्यांची निगा ठेवली.  त्यांपैकी चांभाराच्या २ मुली मालाड येथील सेवासदनाच्या आश्रमात पाठविल्या.  बोर्डिंगातील २ मोठया मुलींस घरी लिहिणे-वाचणे शिकविले व परळ येथील बोर्डिंगाची साधारण देखरेख ठेवली.

ह्या समाजास मदत करण्यासाठी मुंबईतील निरनिराळया वरिष्ठ वर्गातील प्रमुख स्त्रियांची एक कमेटी नेमण्यात आली आहे.  सौ. लक्ष्मीबाई रानडे ह्या तिचे चिटणीस आहेत.  शाळेतील मुलींना ह्या समाजाकडून लहान स्कॉलरशिपा देण्याचे ठरले आहे.  उदार भगिनींनी ह्या सत्कार्यास हातभार लावावा अशी त्यांस सविनय विनंती आहे.

जनाबाई शिंदे

सेक्रेटरी
राममोहन आश्रम,
गिरगांव, मुंबई.

''स्वार्थावर लाथ मारून गळयात झाळी अडकवून संस्थेकरिता-अर्थात आमच्या लोकांकरिता - संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार फिरतात व त्यांना त्यात कितीही अल्प यश आले तरी ते पर्वा न करता चंदनासारखे स्वतः झिजून दुसऱ्यांना-आम्हांला-सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू ठेवतात त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतांपेक्षा आम्हांला यंत्किंचितही कमी वाटत नाही.  कित्येकांना ती जास्त वाटेल.''

गणेश आकाजी गवई
डी. सी. मिशनच्या महाराष्ट्र परिषदेत केलेले भाषण
पुणे, १९१२

''इतिहास असे सांगतो की, ज्यापासून राष्ट्राचा विकास होतो अशा सर्व प्रकारच्या चळवळींचा उगम
थोडयाशा व्यक्तींच्या कार्यात सापडतो. प्रस्तुतच्या बाबतीत त्या व्यक्ती म्हणजे ज्यांची प्रथम प्रथम हेटाळणी झाली ते डिप्रेस्ड क्लासेस मिशनचे गृहस्थ होत.  त्यांचया कार्याने प्रचंड अशा हिंदू समाजाची सदसदविवेकबुध्दी जागृत झाली.''

न्यायमूर्ती सर नारायणराव चंदावरक
डी.सी. मिशनची अस्पृश्यतानिवारक परिषद
मुंबई, १८१८

''शिंद्यांचा जिला भरीव हातभार लागला नाही अशी लोकसेवेची व समाजोन्नतीची चळवळ दाखवून देणे कठीण आहे.  राजकारण, समाजकारण, धर्मकार्य, शिक्षणकार्य इतकेच नव्हे तर वाङमयसेवा आणि इतिहाससंशोधन या सर्वांत शिंद्यांचा भाग आहे, आणि फार महत्त्वाचा भाग आहे.  ज्या काळी विधवाविवाहासारखे साधे प्रश्न सुटणे दुरापास्त होते अशा त्या घनदाट धर्मवेडाच्या काळात अस्पृश्योध्दाराची चळवळ सुरू करणे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढणे, इतकेच नव्हे तर अस्पृश्यांत जाऊन त्यांच्यापैकी एक झाल्याप्रमाणे त्यांच्यात वागणे या गोष्टींसाठी अतुल स्वमतधैर्याची, एवढेच नव्हे तर मूलमार्गी बुध्दीची व समाजाविषयी खऱ्या कळकळीचीही गरज होती.  इतक्या व्यापक व सूक्ष्म दृष्टीच्या कार्यकर्त्याची दृष्टी सबंध देशाइतकी विशाल विस्तृत असावी लागते.  म्हणूनच श्री. शिंदे सामाजिक चळवळीप्रमाणेच अनेक राजकीय चळवळीतही भाग घेताना दिसत.''

न्यायमूर्ती भवानीशंकर नियोगी
महाराष्ट्र साहित्य संमेलन
नागपूर, १९३३

''मला राहून राहून एका गोष्टीविषयी दुःख होते.  अस्पृश्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीला हात घातला रा. विठ्ठलरावांनी.  त्या कामी कमालीचा स्वार्थत्याग करून त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी देशभर जागृती घडवुन आणली.  ह्या प्रश्नाला राष्ट्राची मान्यता मिळण्याचे श्रमही त्यांचेच.  पण अलीकडे अस्पृश्यांच्या उन्नतीच्या प्रश्नाचा जेव्हा जेव्हा उल्लेख करण्याचा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा ज्यांनी ह्या बाबतीत केवळ वाचिक कार्य केले आहे अशांनाच जागृतीचे श्रेय अर्पण करण्यात येते व भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी व विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यावर पद्धतशील बहिष्कार घालून त्यांचा चुकूनही नामनिर्देश केला जात नाही.  अशा संघटित बहिष्काराने सत्याचा अपलाप होतो.''

वामन सदाशिव सोहोनी
आत्मनिवेदन, मुंबई, १९४०

''विठ्ठल रामजी शिंदे हे माझ्या चार गुरुंपैकी एक होते.  माझ्या जन्मदात्यानंतर मी त्यांनाच मानतो.  त्यांच्या पायांशीच मी सार्वजनिक कार्याचे धडे घेतले.  माझ्यापेक्षा ते वयाने लहान असले तरी राष्ट्रहितासाठी करावयाच्या चळवळीबाबातच्या अभ्यासात त्यांची फार मोठी प्रगती होती.  ही गोष्ट सर्वज्ञात आहे, की मुंबई प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे ते जनक होत.  पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकारच्या कार्याचा प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होते.''

अमृतलाल व्ही. ठक्कर ऊर्फ ठक्करबाप्पा
इंडियन सोशन रिफॉर्मर
६ एप्रिल १९४४