दिवस पहिला
या परिषदेत ठरल्याप्रमाणे ऑक्टोबर ता. ५ शनिवार रोजी फर्ग्युसन कॉलेजवर सुरुवात झाली. सुरुवातीच्या अगोदरच परिषदेकरिता आलेल्या प्रतिनिधींनी व प्रेक्षकांनी ऍम्फिथिएटर भरून गेले होते. येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याकरिता जनरल सेक्रेटरी रा. रा. शिंदे व परिषद-कमिटीचे सभासद तयार होते. पाहुण्यांना ठरलेल्या जागी बसविण्याची व्यवस्था स्वयंसेवक मंडळी फार तत्परतेने व मेहनतीन करीत होती. परिषदेतील वक्तयांना व थोर थोर पाहुण्यांना उच्चासनावर बसविण्याची व्यवस्था केली होती. जमलेल्या थोर मंडळींत अध्यक्ष डॉ. भांडारकर, नि. सा. मंडळीचे अध्यक्ष सर चंदावरकर, डॉ. मॅनसाहेब, भावनगरचे दिवाण श्री. पट्टणीसाहेब, नामदार मौलवी रफिउद्दिन, रा.ब.सी. वि. पटवर्धन, कोल्हापूरचे श्री. जाधवराव, मुंबईच्या श्री. लक्ष्मीबाई रानडे, रा. लक्ष्मणराव नायक, रा. रा. गोपाळराव देवधर, रा.रा.बी. एस. कामत, प्रो. कर्वे, रे. रॉबर्टसन, मिसेस हारकर, तेलगू समाजाचे एक पुढारी डॉ. पोरेडा वगैरे मंडळी व अस्पृश्यांपैकी सुभेदार मेजर भाटणकर, रा. डांगळे, रा. कांबळे, रा. शिवरामजी कांबळे, रा. श्रीपतराव नांदणे, रा. नाथमहाराज वगैरे मंडळी हजर होती. प्रारंभी मुलांचे ईशस्तवनपर गीत झाल्यावर रा. शिंदे यांचे प्रास्तविक भाषण झाले. ते म्हणाले :
रा. शिंदे ह्यांचे भाषण
सभ्य गृहस्थहो आणि सद्भगिनींनो !
आजचा दिवस महत्त्वाचा आहे. येथे जमलेल्या जनसमूहाकडे नुसते निरखून पाहिले तरी सहृदय माणसाला आनंद होण्यासारखा आहे. आमच्या पुढे विश्वबंधुत्वाचे ध्येय-शिखर स्पष्ट दिसत आहे. त्याच्या चढणीची एक महत्त्वाची पायरी आम्ही आज चढणार आहोत. जातिभेदामुळे आमच्या देशाचे असंख्य तुकडे झाले आहेत. याजबद्दल आम्ही पुष्कळ वेळा दुःख मानले आहे. परंतु आज त्यापैकी बहुतेक तुकडे एकत्र आणि एकोप्याने जुळून आलेले दाखविणारा सुखाचा दिवस आम्हांला आला आहे. याबद्दल प्रथम आपण आपल्या विश्वजनकाचे आभार मानू या.
ह्या चळवळीचा इतिहास
अस्पृश्यवर्गांच्या हीन स्थितीचा प्रश्न आज जवळजवळ दोन हजार वर्षांचा जुनाट आहे. ह्या प्रश्नाविषयीची आधुनिक पद्धतीची जाणीव आणि ह्या वर्गा विषयी उच्च वर्गांमध्ये सहानुभूती ह्यांचा उदय व्हावयाला लागूनही आज जवळजवळ पन्नास वर्षे होत आली आहेत. दोन-चार शतकांमागे काही उदार संतांच्या अंतःकरणामध्ये ह्यांच्याविषयी सहानुभूती उदय पावली होती, पण ती आधुनिक पद्धतीची नव्हती. तसेच अलीकडे पन्नास वर्षांत जरी यांच्याविषयीची सहानुभूती काही व्यक्तींच्या आणि लहानसहान संस्थांच्या प्रयत्नांनी उदयास येत होती तरी तिला हल्लीचे संघटित स्वरूप आले नव्हते.
हल्लीची स्थिती
आता या पाच वर्षांत या प्रश्नाची जागृती सर्व देशभर होऊन निरनिराळया भागांमध्ये व्यवस्थित कार्य होऊ लागले आहे. इतकेच नव्हे, तर प्रत्यक्ष अस्पृश्यवर्गांमध्येही स्वतःची जाणीव उत्पन्न होऊन त्याचे अल्पस्वल्प प्रयत्न सुरू होऊ लागले आहेत. कोठे एखाद्याने काढलेली शाळा, कोठे एखादे बोर्डिंग, कोठे एखादा समाज किंवा एखादे लहानसे वृत्तपत्र अशी ही दहा-बारा वर्षांपूर्वीची तुटकतुटक स्थिती जाऊन आता सदरील मंडळीच्या नावाखाली पश्चिम आणि दक्षिण हिंदुस्थानातील ह्या विशिष्ट कार्याची संघटना बनत चालली आहे. आणि ह्याच वळणावर किंबहुना डिप्रेस्ड क्लासेस मिशन हे नाव घेऊनही बंगाल आणि पंजात ह्या दूरदूरच्या प्रांतीही अगदी स्वतंत्र पण जोमाचे काम चालले आहे.
पण सर्वत्र चाललेल्या कामामध्ये सहानुभूती, सहकार्य आणि संघटना ह्यांचे अंकुर दिवसेंदिवस अधिकाधिक बळावत आहेत, ही ह्या कार्याची आशाजनक सुचिन्हे आहेत. सर्व देशांत ह्या कार्यासंबंधी चळवळीचे एकवटलेले स्वरूप कधी दिसून येईल तेव्हा येवो; तूर्त यांच्यामध्ये विरोध नसून मोठमोठया भागांमध्ये ह्यांची घटना बळावत चाललेली आहे, ही देखील मोठी समाधानाची गोष्ट आहे.
भा. नि. सा. मंडळीचा इतिहास
ज्या मंडळीच्या आश्रयाखाली आजची ही परिषद भरत आहे ती मंडळी १९०६ ऑक्टोबर तारीख १८ रोजी स्थापित झाली; म्हणजे आणखी तो दिवसांनी तिचे सहावे वर्ष संपेल. पहिल्या दोन वर्षांत मंडळीच्या मुंबई आणि पुणे येथे शाखा सुरू झाल्या. दुसऱ्या दोन वर्षांमध्ये मुंबई इलाख्यात निरनिराळया दहा ठिकाणी आणि मद्रास इलाख्यात दोन ठिकाणी शाखा उघडण्यात आल्या. शिवाय तिसऱ्या व चौथ्या वर्षी निरनिराळया वीस मुख्य मुख्य शहरी मंडळीच्या वाढदिवसानिमित्त अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीसंबंधी सभा झाल्या. या प्रकारे या नवीन प्रश्नासंबंधी चोहोकडे जोराची चळवळ ह्या चार वर्षांत चालू राहिल्यावर तिला दृढता आणण्यासाठी पाचव्या वर्षी मंडळीचे प्रचारक ह्या इलाख्याच्या निरनिराळया भागांतून संचार करून आले. त्यामुळे पूर्वेकडे वऱ्हाड, उत्तरेकडे गुजराथ, पश्चिमेकडे कोकण व दक्षिणेकडे कर्नाटक ह्या चारी भागांतील शाखांना किंचित दृढता आली. सहाव्या वर्षाच्या आरंभी कर्नाटकामध्ये मंडळीच्या एका कायमच्या प्रतिनिधीची स्थापना होऊन बेळगाव, धारवाड व विजापूर ह्या तीन जिल्ह्यांसाठी मंडळीच्या प्रत्यक्ष सत्तेखाली एक शाखा सुरू झाली. येथपर्यंत झालेल्या प्रयत्नांचे आजची परिषद हे फळ आहे. प्रथम मुंबईसारख्या ठिकाणी संस्थापना, नंतर निरनिराळया मुख्य शहरी सहानुभूतीचा उद्भव, ह्यानंतर मंडळीच्या प्रचारकांचा संचार ह्या प्रकारे या कार्याच्या तीन अवस्था झाल्यानंतर त्याला ओघानेच जी चौथी अवस्था आज प्राप्त झाली आहे, ती ही की, ह्या प्रांतांतील निरनिराळया ठिकाणांहून अस्पृश्यवर्गाचे लोक आणि त्यांचे हितचिंतक या सर्वांनी मिळून या प्रांताची खरी राजधानी जे पुणे शहर ह्या ठिकाणी एकत्र जमावे.
भा. नि. सा. मंडळीचा हल्लीचा विस्तार व तिच्या कार्याचे क्षेत्र याची माहिती खाली आहे :
कार्याचे क्षेत्र (तक्ता क्रं. १ पहा)
सध्या एकंदर १४ ठिकाणी २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुले, ५ वसतिगृहे, इतर १२ संस्था व ५ प्रचारक असून खर्च एकंदर २४,४८५ रुपये आहे. संस्थेच्या कमाचा विस्तार खाली दिलेल्या कोष्टकात दिसून येईल. (तक्ता क्रं. २ पहा)
परिषदेची आवश्यकता
वरील विस्ताराचे निरीक्षण केल्यावर असे दिसून येईल की, निरनिराळया चार भाषा चालू असलेल्या सात प्रांतांमध्ये मंडळीला आपले प्रयत्न करावयाचे आहेत, आणि म्हणून तिला हल्ली भरलेल्या परिषदेसारख्या निरनिराळया ठिकाणी प्रांतिक परिषदा भरविण्याची अगदी जरुरी आहे. अशा परिषदेशिवाय मंडळीला आपल्या कार्याचा विस्तार आणि दृढीकरण करण्याचा दुसरा मार्ग नाही.
परिषदेचे स्वरूप
या परिषदेचे विशेष सवरूपही ध्यानात घेण्यासारखे आहे. आजकाल आमच्या देशात विवक्षित जातीच्या अनेक परिषदा भरत आहेत. त्या बऱ्या आहेत किंवा वाईट आहेत याची चर्चा करण्याचे हे स्थळ नव्हे. पण त्या सर्व परिषदांहून ही परिषद अगदी भिन्न स्वरूपाची आहे. त्या परिषदांचे कारण जाती व ह्याही परिषदेचे कारण जाती हेच होय. पण त्या परिषदांचे कार्य एकेक जाती निरनिराळया बसूनच व्हावयाचे असून हिचे कार्य सर्व जातींनी एकत्र बसल्याशिवाय साधण्यासारखे नाही. पण यावरून हिचा हेतू हिंदुस्थानातील ज्ञातिभेद मोडून टाकून नुसता सबगोलंकारच करावयाचा आहे, असेही नाही. जातिभेद राहो वा जावो, सर्व ज्ञातींनी मिळून आपल्या सहानुभूतीच्या जोराने ह्या दीन जातींना वर ओढल्याखेरीज प्रस्तुत कार्यभाग साध्य होणार नाही. ह्या दृष्टीने पाहता ही परिषद इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी भरलेल्या सर्वजातीय परिषदेची एक लहानशी प्रतिमाच आहे असे म्हटले तरी चालेल.
परिषदेचे कार्य
ह्या परिषदेला जितक्या निरनिराळया दिशांनी आणि निरनिराळया प्रमाणांनी सहानुभूतीची आणि सहकार्याची जोड मिळेल तितकी थोडीच आहे. हे परिषदेपुढे आलेल्या विषयांचे व परिषदेला आलेल्या वक्तयांचे अवलोकन केले असता उघड दिसून येणार आहे. अस्पृश्यवर्गाचे कल्याण व्हावे; हा ह्या सर्व वक्तयंचा मनःपूर्वक सामान्य हेतू आहे, परंतु त्यांची विचाराची दृष्टी, सहानुभूतीचे प्रमाण आणि कार्याची पद्धती ही परस्परांहून अगदी भिन्न आहेत. असे असूनही ज्या अर्थी ते एकत्र आले आहेत त्या अर्थी कल्याणचिंतनाचा त्यांचा सर्वसामान्य हेतू खरा आणि बळकट आहे, हे उघड आहे.
सहानुभूतीचा आणि सहकार्याचा हाच क्रम कायम ठेवून त्यांच्या मार्गातील अडथळे हळूहळू काढून टाकून त्यांना अमर्याद केल्याशिवाय ह्या फार दिवस मागे पडलेल्या महत्कार्याला खरे यश येणार नाही. सरकार आणि संस्थानिक, म्युनिसिपालिटया आणि परोपकारी संस्था, सर्व जाती आणि सर्व धर्म - एकूण ह्या प्रचंड देशातील सर्व शुभशक्ती ह्यांचे केंद्र ह्या कार्यात जितक्या अंशाने जास्त साधेल, तितक्या अंशाने अधिक यश येईल, हे ध्यानात वागवून आजच्या परिषदेचे सर्व सभासद शांतपणे व सात्त्वि वृत्तीचे विचार करतील, अशी उमेद आहे. रा. शिंदे यांचे वरील भाषण झाल्यानंतर स्वागत कमिटीचे अध्यक्ष डॉ. मॅनसाहेब यांनी योग्य शब्दांनी डॉ. सर भांडारकर यांची श्रोतृजनांना माहिती करून देऊन त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी सूचना केली व तिला रा. रखमाजीराव कांबळे व रा. पांडुरंगराव डांगळे यांचे अनुमोदन व पुष्टी मिळाल्यावर ते स्थानापन्न झाले. नंतर त्यांनी भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले :
अध्यक्ष सर रामकृष्णपंत भांडारकर ह्यांचे भाषण
प्राचीनकाळी वैदिक भाषा बोलणारे आर्य जेव्हा भरतखंडांत प्रविष्ट झाले, तेव्हा त्या राष्ट्रांत मूळचे अनेक जातींचे लोक राहत असत. त्यांचा आणि आर्यांचा संबंध बहुतकरून विरोधाचाच असे. ठिकठिकाणी युध्दे होऊन आर्यांनी त्यांच्या गावांत आपली वस्ती केली. त्या सर्व मूळच्या लोकांसस 'दस्यू' किंवा 'दास' ही संज्ञा आर्यांनी दिली होती. काही काळाने या दस्यूंपैकी काही लोक आर्यसमाजात जाऊन मिळाले, परंतु त्यांचा एक स्वतंत्र वर्ग करण्यात आला. आर्यांमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य असे तीन वर्ग होते, आणि हा जो नवीन चवथा वर्ग त्यांस मिळाला त्यांस 'शूद्र' अशी संज्ञा प्राप्त झाली. 'शूद्र' ह्याची व्युत्पत्ती काय याचा निर्णय करणे कठीण आहे; परंतु मूळ रहिवाशांमधील जी जात आर्यांस मिळाली तिचे नाम शूद्र असे असावे; आणि नंतर काही काळाने जसजसा आर्यांचा प्रसार पूर्वेस व दक्षिणेस होऊ लागला, तेव्हा त्या ठिकाणी जे मूळचे नवीन लोक त्यांना आढळले त्यांसही, शूद्र या संज्ञेचा उत्तरोत्तर व्यापक अर्थ करून, ती संज्ञा ते देते झाले. प्रथमतः जी मूळ रहिवाशांची जात त्यांत मिळाली. त्या जातीचे आर्यांची संस्कृत भाषा घेतली. परंतु संस्कृत उच्चार यथायोग्य करण्याचा अभ्यास त्यांच्या जिव्हेस नसल्यामुळे संस्कृत शब्दांचा अपभ्रंश होऊन पाली भाषा सिद्ध झाली, आणि हा संयुक्त समाज भरतखंडाच्या दुसऱ्या भागात पसरला; तेव्हा त्या अपभ्रष्ट भाषेत आणखी काही अपभ्रंश होऊन शौरसेनी, मागधी, महाराष्ट्री अशा नवीन भाषा सिद्ध झाल्या. ह्या दुसऱ्या भागांतही ज्या लोकांचा उद्योग निंद्य प्रकारचा नव्हता, त्यांचा समावेश पूर्वीच्या शूद्रात होऊन त्यांची सामाजिक स्थिती काही नीच प्रकारची झाली नाही. परंतु त्यांचा उद्योग नीच प्रकारचा होता, त्यांची स्थितीही नीच अशा प्रकारची झाली. अशा नीच जातींची नावे चांडाल, पुक्कस अथवा पुल्कस, निषाद, वेण, वेळुकार, श्वपच, क्षत्तृ, उग्र, धिग्वण, मद्गु इत्यादी होती. निषादांचा धंदा मासे मारणे हा होता; मद्गु व दुसऱ्या काही जातींचा उद्योग पारध करून अरण्यातील श्वापदे मारणे हा होता; पुक्कस वगैरेंचा धंदा बिळांत रहाणाऱ्या प्राण्यांचा वध करणे हा असे; धिग्वण म्हणून जात होती तिचा धंदा चर्मकार्य; दुसऱ्या कित्येकांचा उद्योग राजाच्या आज्ञेवरून वध्य जे त्यांचा वध करावा आणि ज्यांचा वध झाला त्यांची वस्त्रे, त्यांची शय्या आणि त्यांचे अलंकार ही त्याने घ्यावी हा होता; आणि ज्यांना कोणी संबंध नाही अशांचे प्रेत गावाबाहेर नेणे हाही काही जातींचा धंदा होता; गावामध्ये किंवा शहरामध्ये मेलेल्या कोणत्या तरी जातीच्या प्राण्याचे शरीर गावाबाहेर टाकण्याचे कामही कित्येकांचे असे. (मनु, अध्याय १०, श्लोक ४७-५६.) चांडाल, श्वपच इत्यादी जातींनी शहर किंवा गावाबाहेर वस्ती करावी; त्यांचे धन म्हणजे कुत्रे आणि गाढवे; दुसऱ्या उच्च जातींच्या पात्रांमध्ये त्यांनी भोजन करू नये; शवावरील वस्त्रे त्यांनी वापरावी; त्यांचे अलंकार नेहमी लोखंडाचे असावे; इतर जातींचा त्यांच्याशी संबंध नसावा; उच्च जातीच्या मनुष्यांनी त्यांना प्रत्यक्ष अन्न देऊ नये, परंतु आपले चाकरनोकर असतील त्यांच्याद्वारा ते द्यावे. चांडालांनी ब्राह्मण जेवीत असता त्यांच्याकडे आपली दृष्टी लावू नये. (मनु, अध्याय ३, श्लोक २३९) दीर्घ आयुष्य ज्यांना पाहिजे आहे, त्यांनी चांडालांच्या किंवा पुल्कसांच्या बरोबर बसू नये. (मनु, अध्याय ४, श्लोक ७९) चांडालाचा किंवा मृतहाराचा स्पर्श झाला असताना स्नान करून शुद्ध व्हावे. (माडेय पुराण, अध्याय ५६, श्लोक ३७) ह्या माडेय पुराणामध्ये मृतहार किंवा मृतहारिन् ह्या नावाची एक जात सांगितली आहे. मृतहार ह्यांचा अपभ्रंश 'म-अहार' असा आहे, आणि त्यांचेच पुढे 'महार' असे रूप झाले. तेव्हा शहरातील किंवा गावातील मेलेल्या प्राण्यांची मढी बाहेर टाकावी हा महारांचा मुख्य उद्योग होता असे दिसते. ह्यावरून असे स्पष्ट होते की, ह्या ज्या अत्यंत नीच जाती त्यांना मढी टाकणे, वध्य मनुष्याचा वध करणे, स्मशानाच्या ठायी राहणे आणि प्रेतांची वस्त्रे घेणे इत्यादिक धंद्यांवरून नीचता प्राप्त झाली, परंतु जेव्हा कालेकरून अशा प्रकारच्या एखाद्या जातीची वृध्दी होते तेव्हा हे धंदे त्यांस पुरत नाहीत असे होते, तेव्हा काही तरी दुसरा धंदा त्यास करावा लागतोच. परंतु त्यांची नीचता ही या कामी त्यांस बाधक होते, तथापि या नीच जातींनी उत्तरोत्तर दुसरेही धंदे मिळविले हे सिद्ध आहे. आमच्याच महाराष्ट्र राज्यामध्ये हे पूर्वी मृतहार जरी होते तथापि काही कालेंकरून खेडयातील वसूल ग्रामांतरी सरकार-खजिन्यामध्ये जाऊन भरावा हा उद्योग त्यांस प्राप्त झाला आणि केवळ पुष्कळ द्रव्य अशा प्रकारे एकटेच महार खजिन्यात पोचवीत असत. गावात एखादा पाहुणा आला तर त्याची व्यवस्था करणे हे महारांचे काम समजले जाते, आणि त्याप्रमाणे वहिवाट अजून आहे; आणि अशा प्रकारची कामे महारांच्या स्वाधीन केली होती म्हणूनच काही जमिनी महारांस लावून दिल्या आहेत. त्यांस 'महारकीच्या जमिनी' म्हणतात आणि इतर शेतांच्या संबंधाने जे बलुते आहेत त्यांपैकी मुख्य बलुते महार आहेत. तेव्हा आमच्या महाराष्ट्रात तरी या जातीस जनसमाजामध्ये नियत स्थान प्राप्त झाले आहे.
आता विद्या व विशेष विज्ञान यासंबंधाने ह्या वर्गाची स्थिति फारच शोचनीय आहे. त्याचप्रमाणे अस्पृश्यतेचा डाग जो त्यांस लागला आहे तो अजून निघाला नाही, तथापि याही संबंधाने आजपर्यंत काहीएक यत्न झाले नाहीत असे नाही. भगवान बुद्ध यांनी ह्या नीच जातीतील मनुष्यांस आपल्या भिक्षुवर्गात स्थळ दिले. 'स्थविर' (ज्याचे रूप पाली भाषेत 'थेर' असे होते व ज्या शब्दांचा अर्थ 'वृद्ध पुरुष' असा होतो, त्या) नावाच्या साधूंचे लेख पाली वाङमयामध्ये आहेत, त्यामध्ये 'सुनीतो थेरो' या नावाच्या एका 'थेरा'चा लेख आहे, त्यातील काही श्लोक असे आहेत :
नीचे कुलम्हि जातोऽह दळिद्दो अप्पभोजनो ।
हीनं कम्मं ममं आसि अहोसिं पुप्फछड्डको ॥
जिगुच्छितो मनुस्सातनं परिमूतो च वम्भितो ।
नीचं मनं करित्वानं वन्दिस्सं बहुकं जनम् ॥
अर्थ : नीच कुळामध्ये माझा जन्म झाला; मी दरिद्री होतो; पुरेल इतके खायला मला मिळत नसे; माझे कर्म अत्यंत हीन महणजे नीच असे; मी शौचकूप झाडणारा होतो, सर्व मनुष्ये माझा किळस करीत असत; सर्व मला तुच्छ मानीत असत आणि माझा धिक्कार करीत असत; आणि पुष्कळ जनांस मी अत्यंत नम्र मन करून वंदन करीत असे.
अथद्दसासि संबुद्ध भिक्खुसंघपुरक्खतम् ।
पविसन्तं महावीरं मगधानं पुरुत्तमम् ॥
निक्खिपित्वान व्याभंगिं वंदितु उपसंकमिं ।
ममेव अनुकम्पाय अठ्ठासि पुरिसत्तमो ॥
अर्थ : नंतर संबुद्ध (उत्तम ज्ञानी) व भिक्षूंच्या संघाने परिवेष्टित असे जे महावीर त्यांस मगध देशाच्या राजधानीत प्रवेश करताना मी पाहिले. माझी टोपली एकीकडेच टाकून त्यांचे वंदन करण्याकरिता मी पुढे उपस्थित झालो, आणि मजवरती दया करून तो पुरुषोत्तम उभा राहिला.
वन्दित्वया सत्थुनो पादे एकमन्तं ठितो तदा ।
पब्वज्जं अहं आयाचिं सब्बसत्तानं उत्तमम् ॥
ततो कारुणिको सत्था सब्बलोकानुकम्पको ।
एहि भिक्खुति मं आह; सा मे आसुपसम्पदा ॥
अर्थ : ते जे बुद्ध भगवान शास्ते त्यांच्या पायांचे वंदन करून मी एकीकडे बसलो आणि सर्व प्राण्यांना उत्तम अशी जी प्रवज्येची (संन्यासाची) स्थिती; ती मी मागितली. मग परमदयाळ शास्ता - सर्व लोकांवर दया करणारा - असा तो मजला उद्देशून म्हणाला, 'हे भिक्षू, इकडे ये,' आणि हीच माझी उपसंपदा झाली, म्हणजे भिक्षुवर्गामध्ये माझा प्रवेशसंस्कार झाला.
ह्याचप्रमाणे 'सोपाक थेरी' या नावाच्या श्वपाकाला - चांडालाला - आपल्या भिक्षुवर्गात भगवान बुद्ध यांनी घेतल्याची कथा आहे. अशाप्रमाणे ह्या नीच जातीतील मनुष्यांचा भिक्षुसंघामध्ये प्रवेश होऊन त्यांना शाश्वत सुखाच्या मार्गास बुद्धांनी लाविले. आणि असाच प्रकार बौद्ध भिक्षूंमध्ये होत असे. म्हणून एका समयी अशोक म्हणून इसवी सनाच्या पूर्वी २५० वर्षे मौर्यकुलांत उत्पन्न झालेला पाटलीपुत्रामध्ये भरतखंडाचा राजा राज्य करीत होता. त्याच्याविषयी गोष्ट सांगतात, ती ही की, बौद्ध भिक्षु आढळला की, त्याच्या पायाचे वंदन राजाने करावे. हा प्रकार त्याच्या यश नामक एका अमात्यास रुचला नाही. तो म्हणाला, बौद्ध भिक्षू हे सर्व वर्णांतून - अत्यंत नीच जातीतूनही - आलेले असतात; तेव्हा अशांचे राजाने वंदन करावे हे काही ठीक नाही. मग राजाने त्या अमात्यास काहीएक प्रसंग बनवून आणून निरुत्तर केले. ही गोष्ट अलीकडेच आम्ही सांगितली आहे. म्हणून त्याची पुनरुक्ती करण्याची आवश्यकता नाही. तसेच भगवान बुद्ध यांनी 'अस्सलायन सुत्त' नामक एक लहानसा लेख लिहिला आहे, त्यामध्ये अस्सलायन (म्हणजे आश्वलायन) याच्याशी वादविवाद करताना जातीविषयी कल्पना आणि भिन्नभिन्न जातींचा उत्तराधरी भाव ही सर्वथा निराधार आहेत, हा मनुष्याची प्रकृती अथवा स्वभाव यांच्यावर अवलंबून नाहीत, असे उपपादित केले आहे. आणि त्यात एक प्रकार सांगितला आहे तो असा : ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांनी उत्तम झाडांच्या काष्ठांच्या अरणी करून त्या परस्परांवर घासल्या तर अग्नी उत्पन्न होतो, आणि चांडाळ, निषाद आणि पुक्कस यांनी एखाद्या जुन्या डोणीच्या नीच काष्ठांच्या अरणी करून त्या परस्परावर घासल्या असता अग्नी उत्पन्न होत नाही असे आहे की काय ? म्हणून भगवान बुद्ध यांनी आश्वलायन यांस प्रश्न विचारला. आश्वलायन याने उत्तर दिले की, ''नाही, नीच जातीने घर्षित केलेल्या काष्ठांपासूनही अग्नी उत्पन्न होईल.'' या प्रश्नाचे तात्पर्य असे दिसते की, ब्राह्मणादिक जे तीन वर्ण आहेत, ते अरणीघर्षणाच्या योगे अग्नी उत्पन्न करतात, आणि त्या अग्नीच्या द्वारा भिन्न भिन्न प्रकारचे यज्ञ करितात. तर चांडालादिकांनीही कोणत्या तरी लाकडाच्या अरणी करून त्या परस्परांवर घासल्या असता जर अग्नी उत्पन्न होतो तर वरील तीन वर्णांसच त्या अग्नीवर यज्ञयाग करण्याचा अधिकार असावा आणि चांडालदिकांस नसावा, हे का ? म्हणजे आपण (बुद्ध भगवानाने) जसा त्या नीच जातीचा आपल्या धर्मात प्रवेश केला तसा ब्राह्मणांनी आपल्या यज्ञागादिक कर्मांमध्ये त्याचा प्रवेश करण्याला काहीएक वस्तुगत्या कारण नाही.
(अरणी म्हणजे जी काष्ठे घासून यज्ञार्थ अग्नी उत्पन्न करितात, ती काष्ठे.)
पुढे पुढेही जे दयाशील साधू उत्पन्न झाले, त्यांनी या नीच जातींची उपेक्षा केली असे नाही. भागवतामध्ये तर म्हटले आहे, ''भक्तिः पुनाति मत्संस्था श्वपाकानपि संभवात.'' (मजविषयीची भक्ती ही श्वपाक जे चांडाल त्यास पवित्र करते. आणि त्यांचा जन्मदोष घालविते.) ''तुका म्हणे मी न वजें यातिवरीं । पूज्य मान करीं वैष्णवाशी ।'' (तुकारामबोवा म्हणतात, मी जातीला धरून चालत नाही, वैष्णव झाला की त्यांचे वंदन करितो, मग तो कोणत्याही जातीचा असो.) दुसऱ्या ठिकाणी तुकोबा म्हणतात : ''ब्राह्मण तरी एक सगन कसाई । चक्रधारी गृहीं मांस विकी ॥ तुका म्हणे बह्म जाणे तो ब्राह्मण । येरो तें नमन करा परतें ॥'' मरू प्रदेशामध्ये बळदे म्हणून एक नगरी होती; तिच्यामध्ये देवमुरारी म्हणून एक हरिभक्त झाले. त्या नगरीमध्ये रोहिदास चांभाराचा एक शिष्य होता. तो प्रातःसमयी नित्य देवपूजा करून तीर्थ हातामध्ये घेऊन बाहेर येऊन ते तीर्थ घ्यावयास उच्च स्वराने लोकांस बोलावीत असे. देवमुरारी स्नानाकरिता नदीवरती गेले होते, तेथून परत येताना तो चांभार-भक्ताने केलेला घोष त्यांच्या कानी पडला, तेव्हा तीर्थ घ्यावयास ते त्याच्या घरी गेले आणि तीर्थ मागावयास लागले. 'हे ब्राह्मण आणि यांस मी चांभाराने तीर्थ द्यावे कसे ?' अशी त्याच्या मनात शंका उत्पन्न होऊन तो तीर्थ देईना. तेव्हा देवमुरारी त्यांना म्हणतात, ''तुझा सद्गुरू रोहिदास । त्याची आज्ञा ऐसी अस । उदक न म्हणावें तीर्थास । याति संतांशीं असेना ॥'' (तीर्थ हे काही सामान्य उदक नव्हे, आणि संतांच्यामध्ये हा महार, हा चांभार, अशा काही याती नाहीत.) आणि एकनाथ स्वामींचे एक मोठेच उदाहरण आमच्या डोळयांपुढे आहे. श्राध्दाचे प्रसंगी ब्राह्मणसंतर्पणासाठी त्यांच्या घरी अन्न तयार होत असताना त्याचा वास एक महार व त्याची स्त्री गल्ली झाडीत होती, त्यांस आला, आणि 'या प्रकारचे उत्तम अन्न आम्हांस कोठून प्राप्त होणार !' अशा प्रकारे आपल्या दैवाची गोष्ट बोलत असताना एकनाथस्वामींनी ऐकिले आणि त्यांस बोलावून ''हे शिजत आहे अन्न ते तुम्हास घालितो,' असे सांगितले, आणि त्यांनी ती गोष्ट आपल्या स्त्रियेस निवेदन केली. त्या वेळेस ती म्हणाली, ''दोनच महारांस हे अन्न घातले तर इतरांस चुटपूट लागेल. तेव्हा गावातील सर्व महारांस बोलवा आणि हे अन्न त्यांस घाला.'' त्यावरून सर्व महारांस बोलावून, पाने ठेवून, त्यांवर ती सर्व पक्वान्ने वाढिली आणि त्यांस भोजनास बसविले आणि ''जनीं जनार्दन आहे निश्चित । ऐसा भाव आणोनि चित्तांत । संकल्प सोडी एकनाथ । भोक्ता कृष्णनाथ म्हणोनि ॥'' म्हणजे सर्व मनुष्यांच्या अंतःकरणात परमात्म्याचा वास आहे. परमात्म्यास राहण्यास अमंगळ असे कोणाही मनुष्याचे अंतःकरण नाही; तेव्हा सर्व मनुष्यांवरती दया करणे याच्यायोगे देवच पूजिला जातो, देवाचीच आराधना केल्यासारखी होते आणि कोणाही मनुष्याचा अव्हेर केला असता त्याच्यायोगे देवाचीच निंदा होते, हा भाव मनात आणून एकनाथस्वामींनीं संकल्प सोडिला, आणि महारांचे तर म्हणणे आहे की, एकनाथस्वामी हे आपल्या (महारांच्या) घरी जेवीत असत. असो.
याप्रमाणे निकृष्ट जातींत उन्नत करण्याविषयी ह्या आमच्या मोठया राष्ट्रात आजपर्यंत काहीच यत्न झाला नाही असे म्हणता येत नाही. यासंबंधी खरे विचार जे; ते बुद्धांनी आणि इतर साधूंनी प्रकाशित केले, परंतु आमचे लोक हे जातिनिर्बंधाने इतके आखडून गेले आहेत की, अशा विचारांचा फैलाव होऊन ते आचरणात यावे असा त्यांचा योग्य परिणाम झाला नाही, परंतु आताचा मनू बदलला आहे, आणखी किती दिवसपर्यंत या जातीस अस्पृश्य म्हणून आपण एकीकडे ठेवणार आहोत ? सर्व जातींचा व सर्व प्रदेशांतील लोकांचा आम्हास समागम झाला आहे; त्यांतील कोणाच्या ठायी अस्पृश्यता हा दोष आहे, असे आम्ही मानीत नाही. मग आमच्याच राष्ट्रातील ज्या लोकांचा आणि आमचा तीन हजार वर्षांपर्यंत समागम आहे; ज्यांचा आणि आमचा संबंध कोणत्याना कोणत्या तरी प्रकारे होतच आहे, त्यांस अस्पृश्य मानून त्यांच्यावरती डाग द्यावा हे उचित आहे काय ? असो. अस्पृश्यता नाहीशी करणे हेच एक आमचे काम - दुसरे काही नाही - असे नव्हे. मुख्य काम हे आहे की, या जातीत विद्येची अभिरुची उत्पन्न करावी. काहीकांनी बी.ए., एम.ए. पर्यंत अभ्यास करून मोठमोठया वशिल्याची स्थळे संपादन करावी. आम्हांमधील जे सुशिक्षित आहेत त्यांच्याशी मानसिक संबंधाने बरोबरीच्या नात्याने वागावे, असा परिणाम घडवून आणणे हे आमचे कर्तव्य आहे. असे झाले असताना एखाद्या महार जातीच्या एम.ए. पदवीधर डेप्युटी कलेक्टरास ''शिवू नको. तू दूर रहा,'' असे म्हणण्याचे धाडस कोणाला होणार आहे ? तेव्हा अस्पृश्यतेचा दोष विद्यावृध्दीच्यायोगे आपोआप नष्ट होईल असे वाटते, आणि हल्लीच्या स्थितीत या दोषाचे बंधन थोडेबहुत तरी शिथिल झाले आहे, आता सर्वांनीच बी.ए., एम.ए. पर्यंत अभ्यास करावा असे कोणाचेही म्हणणे नाही. ह्या नीच मानिलेल्या जातीस दुसरेही धंदे शिकण्याचा मार्ग सुलभ केला पाहिजे. महार इत्यादिकांनी गवंडी व्हावे, सुतार व्हावे, पाथरवट व्हावे आणि शिंपी व्हावे, अशा रीतीने आपला चरितार्थ करावा आणि तसा करण्याविषयी त्यांस सोयीची अशी व्यवस्था करावी, हे आमचे कर्तव्य आहे. आणि स्वभावसिद्ध असे जे ईश्वराच्या जगामध्ये नियम चालू आहेत, त्या नियमांनी हा फेरफार बरीच वर्षेपर्यंत चालत आला आहे. अध्ययन-अध्यापन, यजन-याजन, दान-प्रतिग्रह, असे जे ब्राह्मणांचे धर्म सांगितले आहेत, त्यांच्यायोगे ब्राह्मणकुळ वाढल्यामुळे सर्वांचा चरितार्थ चालणे कठीण; म्हणूनच फार प्राचीन काळापासून ब्राह्मणांनी मूळ कर्मे सोडून इतर धंद्यांचा आश्रय केला. इसवी सनाच्यापूर्वी सरासरी १०० वर्षे काल्वायन ब्राह्मणकुळाने पाटलीपुत्राचे राज्य संपादन केले आणि तें चालविले. अर्वाचीन काळी ब्राह्मण पेशव्यांनी महाराष्ट्र देशाचे राज्य संपादन करून तेही चालविले. याप्रमाणे ब्राह्मणांनी क्षत्रियधर्माचे अवलंबन केले; आणि वैश्यधर्माचे अवलंबन करून तर सावकारी आणि शेतकी किती वर्षेपर्यंत ब्राह्मण करीत आले आहेत ! त्याचप्रमाणे दुसऱ्या निंद्य कर्मांचेही अवलंबन त्यांनी यथासंभव केलें. क्षत्रियांनी आपला धर्म सोडून इतर धर्माचे अवलंबन केले. असे जर आहे; तर नीच जातींनी मनूने सांगितलेल्या धर्मास अनुसरूनच चालले पाहिजे, हा आग्रह न्यायाचा होईल काय ? म्हणून त्यासही दुसरे उद्योग करण्याची सवड दिली पाहिजे. परंतु आजपर्यंत या नीच जातींच्या उन्नतीचे असले उद्योग नेटाने कोणी केलेच नाहीत आणि पुढेही आम्ही त्यांची उपेक्षा केली, तर आमच्या राष्ट्राची खरी सुधारणा होणे नाही. राष्ट्राची आबादानी म्हणजे त्यांतील सर्व वर्गांची आबादानी असे आहे. एखाद्या वर्गास दुर्दशेत ठेवून दुसरे वर्ग आपला उत्कर्ष करू असे म्हणाले तर तो उत्कर्ष खऱ्या प्रकारे व्हावयाचा नाही. म्हणून दुर्दशेत जे आपले बंधुवर्ग आहेत त्यांस उन्नतीस नेण्याविषयीचे प्रयत्न नेटाने झाले पाहिजेत. आता या कामास द्रव्याचे साहाय्य पाहिजे तसे अजून मिळाले नाही, आणि हा उद्योग जितक्या जोराने चालावा, तितक्या जोराने चालत नाही. राजकीय संबंधी सुधारणा कर्तव्य असली तर पाहिजे तितके द्रव्य मिळते; परंतु आपल्या लोकांमध्ये धर्माची अभिवृध्दी करावयाची म्हटल्यास किंवा दुर्दशेत असलेल्या लोकांस वर चढवावयाचे म्हटल्यास त्याला काही द्रव्यसाहाय्य मिळत नाही. ही आमची स्थिती आहे. अशी स्थिती असताना आता आमच्या राष्ट्राचे पाऊल खरोखरी पुढे पडत आहे असे ज्यांस वाटत असेल त्यांस ते वाटो; परंतु मला तर वाटते, सामाजिक उन्नती आणि धर्मोन्नती साधण्याविषयी आम्ही जर तत्पर नसलो तर कोणत्याच प्रकारची खरी उन्नती आमची व्हावयाची नाही, असे सांगून मी आपले भाषण पुरे करतो.
याप्रमाणे अध्यक्षांचे भाषण झाल्यानंतर मुलांची संगीत कवाईत व खालील स्वागतपर गीत झाले.
॥ स्वागत ॥
राग - (यमन कल्याण. ताल त्रिवट.)
स्वागत सुखकर होवो । घडवुनिया प्रिय संतत मस्तकिं ।
वरद ईशकर ठेवो ॥ ध्रु.॥
विनतिसि मानुनि येथ येउनी । केली उपकृति हो ॥
ज्ञाति श्रेष्ठ तुम्हि दीनजन आम्ही इच्छा धरुनी आहो ।
कीं लोभ आपुला राहो ॥ ध्रु. ॥
विनतिसिं मानुनि येथ येउनी -
दशा आमुची पाहुनिया तर । दुस्थितिमग्ना आम्हांसी वर ।
येण्यासाठी पुढती सत्वर । सज्जन द्यावा थोर मने कर ॥ विन. ॥
नंतर चर्चेचा पहिला विषय 'मंडळीला वाहिलेल्या माणसांची जरुरी' या विषयावर रा. शिंदे यांचे व नामदार मौलवी रफिउद्दिन यांचे भाषण झाल्यानंतर अस्पृश्यवर्गांतलेच एक सुशिक्षित गृहस्थ रा. गणेश अक्काजी गवई यांचे या विषयावर भाषण झाले. रा. गवई हे वऱ्हाडात अमरावती जिल्ह्यात थुगावचे राहणारे आहेत. या तरुण महार गृहस्थांस काही दिवस नि. सा. मंडळीच्या परळ येथील बोर्डिंगात शिक्षण मिळालेले असून ते हल्ली वऱ्हाडांत आपल्या जातिबांधवांकरिता प्रयत्न करीत आहेत. त्यांचया श्रमाने थुगाव येथे एक प्रार्थनासमाज व भजनमंदिर स्थापन झाले आहे. रा. गवई यांचे भाषण खाली दिले आहे.
रा. गवई ह्यांचे भाषण
भारतीय निराश्रित साहाय्यकारक मंडळीने स्थापन केलेल्या शाळांचा खर्च व त्यांचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ह्यांची हिंदुस्थानातील एकंदर ५६ कोटी अस्पृश्य लोकांच्या संख्येशी तुलना केली तर हा सर्व प्रकार 'दर्यामें खसखस' असाच दिसून येणार आहे. आमच्या वऱ्हाडात Roman Catholic Mission ची एक शाखा आहे. त्या शाखेच्या एलिचपूर, दर्यापूर व आकोट ह्या तालुक्यांतच फक्त महार लोकांकरिता ५० पेक्षा जास्त शाळा असून यांत सरासरी १५०० तरी विद्यार्थी शिकत असावे. परक्या धर्माच्या लोकांनी धर्मप्रसारार्थ चालविलेले अशा प्रकारचे प्रयत्न कोणीकडे आणि आपल्या भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीचे प्रयत्न कोणीकडे ? मी हे तुलनात्मक दृष्टीने पाहत आहे म्हणून आपण असे समजू नये की, आपल्या निराश्रित साहाय्यकारी मंडळीने जे प्रयत्न चालविले आहेत, त्यांची मला किंमत वाटली नाही म्हणून स्वार्थावर लाथ मारून गळयात झोळी अडकवून संस्थेकरिता अर्थात आमचया लोकांकरिता संस्थेचे जे चालक भिक्षांदेही करीत दारोदार बाहेर फिरतात व त्यांना यांत कितीही अल्प यश आले तरी त्याची पर्वा न करता जे चंदनाच्यासारखे स्वतः झिजून दुसऱ्यांना - आम्हाला - सुख देण्याकरिता, आमची स्थिती सुधारण्याकरिता आपला प्रयत्न चालू ठेवतात, त्या संतांची किंमत आजपर्यंत झालेल्या कोणत्याही संतांपेक्षा आम्ळाला यत्तिंफ्चितही कमी वाटत नाहीं. कित्यंकांना ती जास्तच वाटेल. माझ्या सांगण्याचे तात्पर्य हेच की, हा आमच्या उध्दाराचा प्रश्न हिंदी राष्ट्राने नव्हे - आमच्या स्वधर्मीय हिंदू लोकांनीसुध्दा- अजून सोडविला नाही. त्याचे त्यांना महत्त्व वाटत नाही. कित्येक तर उघड उघड विरुद्ध जातात. हिंदु युनिव्हर्सिटीकरिता ज्या हिंदू लोकांनी कित्येक लाख रुपये एक-दोन वर्षांत जमा केले, त्याच हिंदू लोकांनी, त्यांच्याच धर्मांतील ५६ कोटी अस्पृश्य मानलेले लोक; ज्यांना कोणती कला अवगत नसल्यामुळे जे विकल झालेले आहेत, ज्यांना विद्या नसल्यामुळे अविद्येने-अवदशेने घेरलेले आहे, ज्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावल्यामुळे ज्यांपैकी कित्येक धर्मांतर करून आपल्या जीविताचे रक्षण करितात, तर कित्येक खऱ्या धर्मशास्त्राच्या ज्ञानाभावामुळे आसुरी वृत्तीचे बनून एकंदर समाजाच्या स्वास्थ्यास बिघाड करितात. त्या लोकांना सुधारण्याकरिता चालविलेल्या संस्थेस लाखांचा - नव्हे काही हजारांचा तरी कायमचा फंड उभारून देऊ नये काय ? उच्चप्रतीचे शिक्षणरूपी पौष्टिक अन्न आपण अजीर्ण होईपर्यंत खाण्याचा प्रयत्न करावा व दुसऱ्याला भाकरभाजीसुध्दा न देता तसेच उपाशी रडत ठेवावे हा अन्याय आहे. ईश्वराला हे कधींही रुचावयाचे नाही. ह्या पक्षपातीपणाचा परिणाम आपणास भोगावा लागेल.
असो. ही स्थिती दिवसेंदिवस सुधारत जाईल अशी तजवीज नि. सा. मंडळीने व शक्य तितकी आम्हीही केली पाहिजे. उभयतांच्या एकवाक्यतेशिवाय हा प्रयत्न सिध्दीस जाणार नाही ही गोष्ट नि. सा. मंडळी जाणून आहे; तसे आमचे लोक जाणून नाहीत, ही त्यांची चूक आहे. म्हणून आम्हा निराश्रित लोकांमध्ये नि. सा. मंडळीच्या प्रयत्नाबद्दल आस्था उत्पन्न होऊन व त्यायोगे आमहाला स्वतःची ओळख पडून - आपली स्थिती लक्षात येऊन - ती सुधारण्याचा आम्हांकडून हरतऱ्हेने प्रयत्न व्हावा म्हणून प्रचारकांची अत्यंत जरूरी आहे; सर्व भारतातील निराश्रितांना साहाय्य करणे असा ह्या मंडळीच्या नावावरून अर्थबोध होत असला, तरी एकंदर भारतदेशातील लोकांपैकी फारच थोडया लोकांस - मग ते सुशिक्षित असोत किंवा अशिक्षित असोत - भारतीय नि. सा. मंडळीविषयी खरी माहिती, तिचा खरा हेतू ठाऊक असला पाहिजे. नाही तर पुण्यासारख्या शहरातील ज्या ठिकाणी मंडळी प्रत्यक्ष काम करिते; त्या ठिकाणातील एका सुशिक्षित माणसाने मंडळीविषयी खरी माहिती न मिळविता ही मंडळी वरच्या लोकांस खाली लोटून खालच्या लोकांस वर ओढण्याचा व त्यांच्यामध्ये वरच्या लोकांविषयी द्वेष उत्पन्न करण्याचा फक्त प्रयत्न करते, अशा प्रकारचे कर्णकठोर बदसूर काढून आपल्या मूर्खपणाचे - नव्हे आपल्या अत्यंत दुष्टपणाचे प्रदर्शन केले नसते. मानवी स्वास्थ्याला आवश्यक, समाजोन्नतीला पोषक व म्हणून ईश्वराला प्रिय असे जे प्रेम, भक्ती, सात्त्वि वृत्ती इत्यादी सद्गुण ज्या प्रार्थनासमाजाचे केवळ जीवन म्हणून आधारस्तंभ, त्या प्रार्थनासमाजाच्या अध्वर्यूंनी मुख्यतः चालविलेली ही चळवळ कधीही द्वेषी होणार नाही. द्वेषाचासुध्दा द्वेष करू नये तिचे ब्रीद आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. असो. तेव्हा संस्थेविषयी लोकांचा गैरसमज (जर असेल तर) दूर करणे व तिच्याविषयी सार्वत्रिक सहानुभूती मिळविणे हे प्रचारकांचे मुख्य काम आहे. ह्या कार्याला लोकांची सहानुभूती मिळविली म्हणजे अर्थात मंडळीला द्रव्यसाहाय्य चांगले होईल व मग तिला आपले काम अधिक नेटाने करिता येईल, नव्या शाखा काढता येतील; व द्रव्याच्या व कामकारी माणसांच्या अडचणीमुळे मंडळीच्या काही शाखा मोडल्या, त्यामुळे ख्रिस्ती मिशनऱ्यांना उपहासाचा एक विषय झाला व मंडळीचे जे अभिमानी आहेत त्यांना त्यामुळे खाली माना घालाव्या लागल्या, तसा प्रकार होणार नाही.
दुसरे, आम्हा अस्पृश्य लोकांमधील वाईट आचारविचार, गलिच्छपणाची राहणी व आमच्या वेडगळ धर्मसमजुती घालविण्याकरिताही प्रचारकांची जरुरी आहे. आमच्या लोकांना चांगल्या रीतीभातीची, आचारविचारांची ओळख पटवून दिल्याशिवाय त्यांना कळणार नाही व कळले तर ते वळणारही नाहीत. तमाशातील बीभत्स गाणी ऐकून जर लोकांची मने बिघडण्याचा संभव असतो तर उपदेशकाचा उत्तम उपदेश ऐकल्यानेही ती सुधारण्याचा अंशतः तरी संभव का असू शकणार नाही ? अलबत असू शकेल. शिवाय एका पाश्चात्त्य विद्वानाचा असा सिद्धांत आहे की, मनुष्याचा स्वभाव सृष्टी म्हणजे आनुवंशिक संस्कार, शिक्षण व सवय ह्या तीन कारणांनी बनतो. हे जर खरे असेल - आणि हे खरे आहे असे मला वाटते - व उपदेशकाच्या कामाचा शिक्षणामध्ये जर समावेश होत असला, तर उपदेशकापासून फारच फायदा होणार आहे हे निराळे सांगावयास नकोच. ख्रिस्ती मिशने व आर्यसमाज यांना जोर येण्याचे कारण त्यांच्यातील उपदेशकच होत. सुधारणेच्या गोष्टी वारंवार आमच्या लोकांच्या कानांवर पडावयाला लागल्या तर त्यासंबंधाने आमचे काही तरी लोक केव्हा तरी विचार करावयास लागतीलच व त्या गोष्टी आपल्या कल्याणाच्या आहेत असे त्यांना वाटावयास लागल्यावर त्या दिशेने वागावयाचा ते प्रयत्न करतीलही. तेव्हा एकंदरीत मंडळीच्या कार्याची सिध्दी प्रचारकाच्या कामावर फार अवलंबून आहे.
आता उपदेशक जन्मलेच पाहिजेत. जन्मलेल्या उपदेशकाच्या अर्थात कळकळीच्या माणसाच्या मुग्धतेचा जसा परिणाम होईल, तसा परिणाम वरपांगी माणसाच्या कर्तृत्वाचाही होणार नाही. उपदेशक तयार करून त्यांना त्या कामावर लावणे म्हणजे दुधाची तहान ताकावर भागविण्यासारखेच होय. पण दूध मिळत नाही म्हणून ताक पिणेच रास्त आहे, त्याचप्रमाणे जन्मलेले उपदेशक मिळाले नाहीत तरी कृत्रिम उपदेशक तयार करणे आवश्यक आहे. आता 'सर्वारंभास्तंडुलाः प्रस्थमूलाः' ह्या न्यायाने ह्या कार्याला पैशाची अत्यंत जरुरी आहे. पोट सर्वांनाच लागलेले आहे. त्यामुळे उपदेशक जर नसले तर त्यांच्या पोटापाण्याची सोय अगोदर झाली पाहिजे; व त्या कार्याकरिता काही तरी कायमचा फंड उभारणे अत्यंत जरुरीचे आहे. कित्येक म्हणतील की, उपदेशकांना आपल्या पोटापाण्याची सोय ते ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणच्या लोकांकडून लावता येईल. पण मला जो ह्या कामी अल्पसा अनुभव आलेला आहे त्यावरून असे वाटतें कीं, उपदेशकांना जर आपल्या पोटाचीही काळजी घ्यावयास लावले, तर पुष्कळ वेळ त्यांस आपल्या इष्टकार्याच्या सिध्दीकडे दुर्लक्ष करून पोटासाठी पैसे मिळविण्याच्याच व्यामोहात पडावे लागते व म्हणून 'काही न मागे कोणाशी, तोचि आवडे देवासी,' ह्या न्यायाने लोकांवर त्याच्या उपदेशाचा व्हावा तसा परिणाम होत नाही. शिवाय निराश्रित लोकांच्या उध्दाराचा प्रश्न सर्वसाधारण लोकांना अप्रिय असल्यामुळे त्यांच्याकडून त्या उपदेशकांना मदत मिळेल असाही पण संभव नाही. ख्रिस्ती वगैरे इतर धार्मिक संस्थांच्या उपदेशकांनाही पोटाची सोय पाहावी लागत नाही. त्यांच्या आश्रयदात्यांनी त्यांच्याकरिता कामचा फंड जमवून त्यांची व्यवस्था अगोदर लावून ठेविलेली असते. असो, तेव्हा हिंदुस्थानातील सर्व धर्मांच्या सर्व धर्मपंथांच्या, हिंदू, जैन, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी वगैरे लोकांना, कोणाला भूतदयेच्या दृष्टीने, कोणाला हे देशकार्य आहे असे वाटून तर कोणाला धर्मरक्षणाच्या दृष्टीने एकंदरीत ह्या कार्याला - आमच्या उध्दाराच्या प्रश्नाला - सर्वांना कोणत्या तरी हेतूने मदत करिता येईल, तेव्हा सर्व लोकांनी व विशेषतः आमच्या हिंदुधर्मांतील उच्च मानलेल्या सुशिक्षित लोकांनी - ज्यांचे पूर्वज आम्हा लोकांच्या अधःपातास अंशतः तरी कारणीभूत झालेले आहेत त्यांनी - ह्या कार्याला मदत करून हिंदुधर्माला व पर्यायाने त्यांना स्वतःला आम्हाला ढकलण्याबद्दल लागलेला कलंक धुवून टाकावा अशी त्यास माझी विनंती आहे. नि.सा. मंडळीला मदत करणे म्हणजे आमहालाच मदत करणे होय. अध्यक्षसाहेब व सभ्यगृहस्थहो ! ह्या निराश्रित सा. मंडळीला ज्या ज्या लोकांनी मदत केलेली आहे ती आमच्या पदरात तिने घातली आहे व त्या मदतीबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणखी मंडळीच्या कायमच्या फंडाला मदत करून आपण तिच्या कार्याला स्थायिकपणा आणावा व आम्हांला कायमचे ॠणी करून ठेवावे. निराश्रित सा. मंडळी ही आमच्याकरिता आहे. तिच्याविषयी आमच्या मनात प्रेम वाटते आहे. अर्थात ज्या लोकांच्या सहानुभूतीने ही संस्था चाललेली आहे, त्यांच्याबद्दलही आम्हांला प्रेम वाटत आहे. आमच्यामध्ये एकंदर बहुजनसमाजाबद्दल द्वेष उत्पन्न करणे हा मंडळीचा हेतू नाही. उलट, हल्लीचे शास्त्री आमच्याविषयी भलभलते सिद्धांत ठोकून देत असल्यामुळे त्यांच्याविषयी आमच्या समाजात साहजिकपणे जो द्वेषाग्नी किंवा त्वेषाग्नी उत्पन्न होण्याचा संभव असतो त्याला, आपल्या सदुपदेशरूपी जलसिंचनाने कोणी शांत करीत असेल, तर ती नि. सा. मंडळी किंवा तिचे हल्लीचे चालकच होत, हेही आपण लक्षात ठेवावे. तेव्हा अशा ह्या परोपकारी, देशहितवर्धक व प्रगतिपर संस्थेच्या फंडास सर्व लोकांनी मदत करावी, अशी आमची पुनः विनंती आहे.
रा. गवई यांचे वरील भाषण झाल्यानंतर चर्चेचा दुसरा विषय 'पुणे शाखेसाठी बोर्डिंगची आवश्यकता' यावर रा. बी. एस. कामत यांचे भाषण झाले. गुरुकुलात राहून शिक्षण संपादल्याने विद्यार्थ्यांचे शील बनण्यास मदत होते. त्यामुळे त्यास चांगली शिस्तही लागते. अशा प्रकारचे अनेक फायदे बोर्डिंगपासून होत असल्यामुळे पुण्यासारख्या सर्व प्रकारच्या चळवळीच्या केंद्रस्थानी निराश्रितांचे एक बोर्डिंग असणे फार अवश्य आहे, असे ते म्हणाले. सौ. लक्ष्मीबाई रानडे यांचे या विषयावर भाषण झाल्यानंतर रा. गोपाळराव देवधर यांचे भाषण झाले. 'निराश्रितांची सुधारणा करण्यास उपदेशकांची जरूर आहे; आणि तशी माणसे तयार होण्यास बोर्डिंगासारखे साधन नाही' असे ते म्हणाले. अलीगड कॉलेजातील विद्यार्थी आपल्या जातीच्या सुधारणेप्रीत्यर्थ खटपट करतात, त्याप्रमाणे आपल्या वर्गाच्या उन्नतीसाठी खटपट करण्याची त्यांनी निराश्रितवर्गाच्या मंडळीस विनंती केली.
नंतर सभासदांमध्ये बोर्डिंगच्या फंडासाठी भिक्षापात्रं फिरविण्यात आली. यावेळी मुलांचे खालील आभारप्रदर्शक गीत चालू होते.
॥ आभार ॥
पद - (चालो साहेली)
प्रेम धरुनी । येथ येउनी । उपकृति केली बहु सुजनांनी ॥ ध्रु.॥
आदरिले जे । वचन ऐकिले । दीन जनांचे । आपुल्या श्रवणी ।
दिन दिन वाढत । स्मृत प्रेमयुत । जन हा संतत । होवो सुमनी ।
सुशांत प्रेमळ । अतिशय निर्मळ । मानस सोज्वळ । या भुवनी ।
हेतू करुनि । परिपूर्ण सदाशिव । राखु कुशल ह्या । दिनरजनी ॥
प्रेम धरुनी । येथ येउनी । उपकृति केली बहु सुजनांनी ॥ ध्रु,॥
भिक्षापात्रांतून रोख व वचनांनी मिळून सरासरी दोनशे रुपयांची मदत या बोर्डिंगफंडाला मिळाली. नंतर 'निराश्रितांच्या औद्योगिक शिक्षणाची दिशा' यावर प्रो. केशवराव कानिटकर यांचे भाषण झाले. हिंदुस्थानातील धंदे खालावले असून त्यांची सुधारणा या नव्या काळात नव्याच उपायांनी केली पाहिजे, असे ते म्हणाले. या कामी शास्त्रीय ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे; यासाठी निराश्रितांनी उद्योगधंद्यांचे शिक्षण मिळविताना शास्त्रीय ज्ञानही मिळवावे. याच्या साहाय्याने धंदेशिक्षण प्राप्त केल्यानंतर निराश्रित लोकांनी कारखाने वगैरे काढले तर आपल्या पदरी वाटेल तितके पांढरपेशे कारकून ठेवण्याची त्यांस ऐपत येईल; मात्र त्यांनी आपला धंदा सोडून 'कारकून' होण्याची हाव धरू नये. तसे त्यांनी केल्यास ब्राह्मण लोक त्यांचे धंदे करू लागतील. त्यांनी आपल्या धंद्यांची पद्धती वगेरे सुधारली पाहिजे व या कामी त्यांस धनिकांनी साहाय्य केले पाहिजे असे सांगून प्रो. कानिटकर यांनी आपले भाषण संपविले.
त्यांचेमागून याच विषयावर कोल्हापूरचे रा. सा. जाधव यांचे भाषण झाले. निराश्रितांस शिकवावे अशी प्रवृत्ती दिसून येत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांचा अस्पृश्यपणा ही मोठी अडचण होत आहे, असे ते म्हणाले. या संबंधाने सुधारणा होणे अवश्य आहे. गाव निराळा व म्हारवडा निराळा असे होणे बरोबर नाही. निराश्रितांस आपली सुधारणा खरोखरच करून घ्यावयाची असेल तर त्यांनी ज्ञानार्जन करावे व आपले उद्योगधंदे सुधारावेत. निराश्रितांच्या शाळांत धंदेशिक्षणास अग्रस्थान दिले पाहिजे. त्यांना लिहिता-वाचताही आले पाहिजे; कारण धंदा यशस्वी होण्यास शिक्षण अत्यावश्यक आहे.
याप्रमाणे रा. सा. जाधव यांचे भाषण झाल्यावर रा. नाथाजी पुणे येथील मेहतरांचे प्रतिनिधी यांचे भाषण झाले.
यानंतर परिषदेच्या उद्देशाबद्दल ना. गव्हर्नरसाहेब सर जॉर्ज क्लार्क यांच्याकडून आलेले सहानुभूतिप्रदर्शक पत्र रा. शिंदे यांनी वाचून दाखविले.
याप्रमाणे भाषणे झाल्यानंतर पहिल्या दिवसाचे काम संपले.