भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळींची महाराष्ट्र परिषद -दुसरा दिवस

दिवस दुसरा

परिषदेची बैठक रविवार ता. ६ रोजी दुपारी ३॥ वाजता सुरू झाली.  या वेळी वेळेपूर्वी अगोदर सुमारे तासभर पाऊस सुरू झाल्यामुळे मंडळी जशी जमावी तशी जमली नाहीत.  जमलेल्या मंडळींना उच्चासनावर आदल्या दिवशी आलेल्या मंडळींखेरीज रा. ब. मराठे, कुर्तकोटीचे विद्याभूषण श्रीमन्महाभागवत, श्री. सरदार बाबासाहेब इचलकरंजीकर व त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी रा. जोग, श्रीमंत सरदार पोतनीस, रा. रा. लक्ष्मणशास्त्री लेले, रा. रा. आर जी. प्रधान, रा. रा. नरसोपंत केळकर, प्रो. लिमये, प्रो. भाटे वगैरे मंडळी दिसत होती.  याशिवाय दोन्ही दिवशी खालील सभागृहात वरिष्ठ वर्गांतील बऱ्याच बंधुभगिनी हजर होत्या.  दोन्ही दिवशी श्रोतृसमाज एक हजारावर होता.  अध्यक्ष सभास्थानी येऊन स्थानापन्न झाल्यावर 'निराश्रितवर्गांच्या अडचणी' या विषयावर निराश्रितवर्गांतलेच रा. शिवरामजी कांबळे व सुभेदार मेजर भाटणकर या महार गृहस्थांची व सातारचे श्रीपतराव नांदणे या मांग गृहस्थांचे, अशी भाषणे झाली व त्यावर मिसेस हारकर याचे हिंदीत भाषण झाले.

नंतर 'निराश्रित वर्गाच्या वाङमयात्मक शिक्षणाची दिशा' या विषयावर नामदार श्री. बाबासाहेब इचलकरंजीकर यांचे भाषण झाले.  ते म्हणाले, 'जातिभेद नसावा असे येथे जमलेल्या सर्व मंडळींस वाटत असावेसे दिसते.  जातिभेद समूळ नष्ट होणे शक्य किंवा सर्वथा श्रेयस्कर आहे, असे मला वाटत नाही.  परंतु ते हल्ली अतोनात झाले असून त्यांची संख्या कमी झाली पाहिजे.  तसेच स्पृश्यास्पृश्यत्वसंबंधाचे हल्लीचे कडक निर्बंध बरेच शिथिल झाले पाहिजेत, असे मला वाटते.  शीख, लिंगायत वगैरे लोकांनी जातिभेद मोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांस पूर्णपणे यश आले नाही.  मुसलमान व पोर्तुगीज राजांनी हिंदी लोकांस धर्मांतर करण्यास लावले, परंतु जातिभेद नाहीसा होण्यास हल्लीसारखी अनुकूल परिस्थिती केव्हावी नव्हती.  इंग्रजांचा हिंदुस्थानाशी ईश्वरी संकेताने संबंध जोडला आहे, असे न्या. मू. रानडे म्हणत, त्याची सत्यता यावरून पटण्यासारखी आहे.'

याप्रमाणे भाषणाची प्रस्तावना केल्यानंतर निराश्रितवर्गाच्या शिक्षणासंबंधाच्या मुख्य विषयाकडे वळून श्री. बाबासाहेब म्हणाले की, प्राथमिक, मध्यम, उच्च व धंद्यांचे शिक्षण असे शिक्षणाचे चार भाग पडतात.  पैकी प्राथमिक शिक्षण सर्वांस असावे याबद्दल मतभेद नाही.  स्त्री काय किंवा निकृष्ट वर्गाची मुले काय सर्वांस साधारण लिहिता वाचता येणे व हिशेब वगैरे करता येणे हे अत्यंत अवश्य आहे.  या दृष्टीने पाहता ना. गोखले यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे व तद्द्वारा सार्वत्रिक करण्यासंबंधीचे बिल सरकारात विचाराकरिता उपस्थित करून सर्व देशांत, विशेषतः मागासलेल्या जातींना, अत्यंत ॠणी करून ठेविले आहे.  परंतु मागासलेल्या लोकांस देण्यात येणारे शिक्षण असे असावे की, त्यामुळे त्यांस दोन पैसे मिळविता येऊन पुढे येता येईल.  उच्च प्रतीच्या शिक्षणार्थही त्यांचा प्रयत्न असावा, पण ते पदरात न पडल्यास त्यांनी धंदेशिक्षण प्राप्त करून घ्यावे.  उच्च शिक्षण प्राप्त करून घेतल्याने मागासलेल्या जातींतही बुध्दिवान माणसे आहेत, हे स्पष्ट होईल.

जातीतील एका माणसाने नशीब काढले तरी सर्व जातींचा उदय होण्याचा मार्ग सुलभ होतो.  उदाहरणार्थ, धनगर जातीचे होळकर राजे होताच आपण धनगर असल्याबद्दल त्या जातीच्या लोकांस अभिमान वाटू लागला.  जव्हार हे राज्य कोळयांचे आहे.  पेशवाईत एका ब्राह्मणाने नशीब काढले.  म्हणूनच ब्राह्मण पुढे आले.  यासाठी निराश्रितांतील निदान एखाद्या माणसाने तरी नशीब काढणे अवश्य आहे.

दुय्यम शिक्षणासंबंधाने बोलताना ना. बाबासाहेब महणाले, ''उच्च प्रतीच्या शिक्षणाचा ज्यांस लाभ झाला आहे, त्यांनीच दुय्यम प्रतीचे शिक्षण द्यावे व ज्याने त्याने आपल्या परिस्थितीप्रमाणे ते प्राप्तही करून घ्यावे.''

पुढे येण्यास सरकारी नोकरी हा प्रस्तुत परिस्थितीत एकच मार्ग असल्यामुळे सरकारी नोकरीवरच भिस्त ठेवण्याचा ना. बाबासाहेबांनी निराश्रितांस उपदेश केला.  मागासलेल्या लोकांस शिक्षण देणारे शिक्षक प्रथम प्रथम तरी उच्च दर्जाचे असावेत; कारण या शिक्षकांच्या शीलाचा, आचरणाचा व रीतिरिवाजाचा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसा उमटेल.  निराश्रितवर्गाच्या विद्यार्थ्यांची बरीच संख्या असेल तेथे त्यांच्यासाठी वेगळया शाळा असाव्यात.  परंतु अशा निराळया शाळा न करता उच्च वर्णांच्या मुलांबरोबर त्याच शाळेत निकृष्ट वर्गांच्या मुलांचा समावेश करता आला तर ते अधिक श्रेयस्कर आहे.  कारण नीच वर्णांच्या मुलांवर सदाचाराचे वगैरे जे संस्कार व्हावयाचे ते मुख्यतः उच्च वर्णांच्या मुलांशी संघटन झाल्यानेच होतात व वेगवेगळया वर्णांच्या लोकांकरिता वेगवेगळया शाळा काढल्याने असे परस्पर संघटन होण्यास अवकाश राहत नाही.

आपल्या भाषणाच्या अखेरीस ना. बाबासाहेबांनी उच्च वर्ग व निराश्रितवर्ग या दोन्ही वर्गांच्या लोकांस उपदेशाच्या दोन गोष्टी सांगितल्या.  उच्च वर्गास उद्देशून ते म्हणाले, ''तुम्हाला जर एकराष्ट्रीयत्व मिळवावयाचे असेल तर तुम्ही निराश्रितांची उन्नती करण्याचे कामी मदत केली पाहिजे.  तुम्ही त्यांस सहाय्य केले नाही; तर एका जातीने दुसऱ्या जातीस बळजबरीने दाबून टाकल्याने सर्व देशांत जे दुष्परिणाम झाले असल्याचे आपणास इतिहासावरून दिसून येते; ते परिणाम तुमच्या अनुभवास आल्यावाचून रहाणार नाहीत.  निराश्रितांच्या जागी तुम्ही असता तर तुम्हांला काय वाटले असते, हे लक्षात बाळगलेच पाहिजे.''

निराश्रितवर्गांस उद्देशून बोलताना ते म्हणाले, ''आपली उन्नती व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर ती तुम्ही पडून घेतल्यानेच होणार आहे.  उच्च वर्गाशी फटकून वागल्याने ती होणे शक्य नाही.  तुम्ही नम्रपणाने वागून पांढरपेशा लोकांची सहानुभूती मिळवावी.  सरकारने कायदा केला असे समजा, परंतु त्याची अंमलबजावणी होण्यावर सर्व काही अवलंबून आहे व ही अंमलबजावणी सामान्य लोकमत विरुद्ध असता सरकारासही करता येणार नाही, हे ध्यानात बाळगा.  माझ्या घरी एखाद्या निराश्रितवर्गाचा माणूस आला तर त्यास मी आपल्या घरात घेतलेच पाहिजे, असे सरकारला मला सांगता येणार नाही.  झाल्या त्या गोष्टी झाल्या.  त्याच हरहमेश उगाळीत बसू नका.  यासंबंधाने समाजात जे दोष दिसून येतात ते चालू पिढीचे नसून मागील पिढयांचे आहेत, हे लक्षात बाळगा.  आम्हालाही तुमच्या सहानुभूतीची गरज आहे.  तर निष्कारण दुही माजवून नसत्या अडचणी उत्पन्न करण्याच्या भरीस न पडता सध्याच्या अडचणीतून युक्तीने वाट काढण्यावरच सदैव दृष्टी ठेविली पाहिजे.

याप्रमाणे श्री. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर त्यांनी निराश्रित साहाय्यक मंडळीच्या परिषदेच्या खर्चासाठी ५० रुपये दिल्याचे जाहीर करण्यात आले.

यानंतर प्रो. भाटे यांचे भाषण झाले.  शिक्षणाने मनुष्याच्या निरनिराळया गोष्टींचा विकास होत असल्यामुळे सर्वांस शिक्षण अवश्यमेव प्राप्त झाले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादिले.  असे झाल्याने मानवजातीची पूर्ण वाढ व्हावी हा ईश्वराचा संकल्प सिध्दीस जाईल, असे ते म्हणाले.

यानंतर म्युनिसिपालिटया, परोपकारी संस्था व खाजगी शिक्षणविषयक संस्था यांच्याशी मंडळीची सहकारिता असण्यासंबंधाच्या विषयावर, रा. नरसोपंत केळकर यांचे भाषण झाले.  म्युनिसिपालिटयांच्या लोकनियुक्त सभासदांचे प्रमाण दोनतृतीयांश केले, या गोष्टीचा निर्देश करून लोकलबोर्डासही लवकरच तशी सवलत मिळेल अशी आशा त्यांनी प्रदर्शित केली.  प्राथमिक शिक्षणाचे बहुतेक सर्व काम स्थानिक संस्थांकडेच असते.  म्युनिसिपालिटयांच्या प्राथमिक शाळांत शिकत असलेल्या सात लक्ष विद्यार्थ्यांपैकी फक्त २५ हजार निराश्रित आहेत, म्हणजे एकंदर मुलांच्या संख्येच्या मानाने हे प्रमाण शेकडा ४ पडते.  ही स्थिती चांगली नाही.  म्युनिसिपालिटया व लोकलबोर्डे यांत निराश्रितवर्गाचा प्रतिनिधी असावा व म्युनिसिपालिटया, लोकलबोर्डे व खाजगी शिक्षणसंस्था यांच्याशी सहकारिता करण्यासाठी म्हणून निराश्रित मंडळीची एक स्वतंत्र संस्था असावी, असे ते म्हणाले.

प्रागतिक मताची माणसे म्युनिसिपालिटयांत येणे इष्ट असल्याचे सांगून रा. प्रधान म्हणाले की, ''महारमांगांनी म्युनिसिपालिटयांत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.  निराश्रितांनी शक्य असेल तेथे म्युनिसिपालिटयांचे सहकार्य मिळवावे.''

याच विषयावर बोलताना प्रो. हरिभाऊ लिमये म्हणाले, ''म्युनिसिपालिटयांत निराश्रितांचे प्रतिनिधी येतील तो सुदिन समजला पाहिजे.  परंतु म्युनिसिपालिटयांत त्यांचे प्रतिनिधी नाहीत म्हणून त्यांच्या उन्नतीच्या कामात अडथळा येता कामा नये.  ते काम हल्ली म्युनिसिपालिटयांत असलेल्या त्यांच्या हितचिंतक सभासदांनी करावे.  पार्लमेंटांत हिंदुस्थानचा एकही प्रतिनिधी नाही; म्हणून हिंदुस्थानाच्या हितसंबंधाचे संरक्षण होत नाही असे  नाही.

निराश्रितवर्गासंबंधाने खाजगी शिक्षणसंस्थांस म्युनिसिपालिटयांपेक्षाही अधिक काम करता येईल.  विद्यादेवीच्या मंदिरात भेदभाव असता कामा नये.  तसा भेदभाव राहिल्यास विद्यादेवीचे मंदिर भ्रष्ट झाले असे समजावे.  भेदभाव काढून टाकण्याबद्दल खाजगी संस्थांनी तर प्रयत्न अवश्य करावेत.  डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणसंस्थांत हा भेदभाव मुळीच मानण्यात येत नसून निराश्रित व उच्च दर्जाच्या मुलांचे शिक्षण त्या संस्थांतून एकत्र होते.  निराश्रितवर्गाची मुले या संस्थांत आली तर त्यांस गरिबीसंबंधाने मुळीच अडचण पडणार नाही.  त्यांस सोसायटीकडून मोठया आनंदाने मोफत शिक्षण देण्यात येईल, असे म्हणून प्रो. लिमये यांनी आपले भाषण संपविले.

शिक्षणप्रसार व अस्पृश्यता नाहीशी करणे या दोन गोष्टींनी निराश्रितवर्गाची उन्नती होणार असल्याचे सांगून कोल्हापूरचे रावसाहेब जाधवराव यांनी निराश्रितांची सरकारी नोकरीत शिरकाव होण्याची आवश्यकता प्रतिपादिली.  इंग्रजसरकारला जी गोष्ट करण्यास अडचण पडते, ती नेटिव्ह संस्थानिकांस कशी सहज करता येईल हे रावसाहेब जाधवराव यांनी कोल्हापूर संस्थानात महाराजांनी पिढीजाद महातांच्या गडबडीस न जुमानता हत्तीवर महार महात नेमल्याचे उदाहरण देऊन, स्पष्ट करून सांगितले.  महाराजांच्या खास घोडयाचे मोतद्दार महार असून त्यांचे कामही उत्कृष्ट असते.  यावरून निराश्रितांच्या अंगी कर्तबगारी आहे हे उघड होते, असे ते म्हणाले.  एवढेच की,त्यांस संधी मिळाली पाहिजे.  निराश्रितांसाठी वेगळया शाळा असणे अहितकारक आहे; उच्च व नीच वर्गांची मुले एके ठिकाणी बसली असता नीच वर्गाच्या मुलांस उच्च वर्गाच्या मुलांचे रीतिरिवाज, चालचलणूक वगैरे उचलता येईल.  महारमांगांच्या मुलांस इतर मुलांबरोबर शिक्षण देण्याची व्यवस्था कोल्हापूर सरकारकडून लवकर होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

निराश्रितांसंबंधाने इचलकरंजी संस्थानात काय व्यवस्था आहे, यासंबंधाची माहिती सांगताना रावसाहेब जागे म्हणाले, ''इचलकरंजी तालुक्यात निराश्रितांची वस्ती फार आहे.  या तालुक्यात गावे ८ असून अस्पृश्य जातींच्या मुलांसाठी पाच गावांत प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत.  मास्तर मिळताच शिरढोण व शिरदवाड या गावीही अशा शाळा निघतील.  बाकी राहिलेल्या आठव्या जंगमवाडी गावी निराश्रितांची वस्ती नाही.  या पाच शाळांत १६१ मुले शिकत असून त्यांपैकी २३ मुली आहेत.  इचलकरंजी येथे सदर शाळेशिवाय एक रात्रीची शाळा असून तीत २२ मुले शिकत आहेत.  लाठ येथे लवकरच एक रात्रीची शाळा निघणार आहे.  इचलकरंजी तालुक्यातील निराश्रितांच्या दोन हजार लोकवस्तीच्या मानाने शेकडा ८ असे शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण पडते.  या लोकांत आपल्या मुलांच्या शिक्षणाबद्दल इतकी तळमळ असते की, शाळा तपासण्याच्या दिवशी कित्येक आई-बाप आपल्या मुलासंबंधाने चवकशी करण्यास शाळेत जातात.  इतर जातीच्या मुलांप्रमाणे या मुलांची बुध्दिमत्ता असून रीतीरिवाजही त्यांच्याप्रमाणेच आहेत.  स्वच्छतेने राहण्याची त्यांना हौस वाटत असून त्यांच्या मनात विद्येची अभिरुची उत्पन्न झाली आहे असे दिसून येते.  मराठी सहाव्या व सातव्या इयत्तेच्या अभ्यास करणारांस दरमहा ३ रुपयेप्रमाणे दोन वर्षे मुदतीची एक व मराठी चौथ्या इयत्तेच्या परीक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यास दरमहा ३ रुपयेपर्यंत तीन वर्षे मुदतीची दुसरी, अशा दोन छात्रवृत्ती या विद्यार्थ्यांस उत्तेजन म्हणून इचलकरंजी येथील संस्थानाने ठेविल्या आहेत.  इचलकरंजीस मराठी शाळेत येणाऱ्या प्रत्येक मुलामागे मास्तरास अलावन्स देण्यात येत असून पास झालेल्या प्रत्येक मुलीमागे त्यांस एकेक रुपया बक्षीस दिले जाते.  या तालुक्यातील सदरहू शाळेवर २ मुसलमान, १ ढोर व २ चांभार असे शिक्षक आहेत.  शिक्षण देणे व मुलांची स्वच्छता राखणे यासंबंधात हे मास्तर फार मेहनत व काळजी घेत असतात.  ही मंडळी रात्री देवळात भजन करीत असल्यामुळे ते मद्यपानापासून परावृत्त होत चालले असूनही त्यांची इच्छा कृतीत उतरल्याचे दिसून येते.  ही मंडळी हरएक प्रकारच्या व्यवसनापासून अलिप्त राहण्याबद्दल आपल्या जातीच्या लोकांस उपदेश करतात.

यानंतर मुंबई व पुणे येथे मंडळीस स्वतःची इमारत असणे कसे अवश्य आहे हे रा. रा. शिंदे यांनी सांगितले व त्यांचे मागून त्याच विषयावर रा. नायक यांचे भाषण झाले.

आध्यात्मिक व सामाजिक बाबतीत निरनिराळया धर्मपंथांतील अनुयायांशी मंडळीचे साहचर्य व विषयावर कुर्तकोर्टाचे श्री. महाभागवत विद्याभूषण यांचे संस्कृतामध्ये भाषण झाले.  ते म्हणाले, मनुष्यप्राणी पूर्ण सुखप्राप्ती करून घेण्यासाठी जन्मास आलेला आहे व ती साधण्याचा उपाय आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती करून घेणे हाच आहे.  मनुष्यकोटीची इतर प्राणिमात्रापेक्षा श्रेष्ठता याच गोष्टीने सिद्ध होते.  जरी आध्यात्मिक ज्ञानप्राप्तीचे निरनिराळे मार्ग निरनिराळया धर्मांनी व निरनिराळया पंथांनी सांगितलेले आहेत तरी आध्यात्मिक ज्ञानभांडाराच्या इमारतीचा पाया नीती व ईश्वरविषयक भक्ती याच गोष्टींचा असावा याबद्दल सर्वांचे एकमतच आहे.

अशा रीतीने नीती व भक्तीच्या पायावर आध्यात्मिक बाबतीत उच्च पदवीला पोचलेली माणसे ज्या समाजाकरिता नि. सा. मंडळी काम करीत आहे, त्या अस्पृश्य समाजांतही निर्माण झालेली आहेत.  भगवदभक्त चोखामेळा, रोहिदास वगैरे अस्पृश्य संतांबद्दल उच्चवर्गीय मंडळीच्या मनामध्ये आदर व प्रेम दिसून येत होते.  अशा दृष्टीने पाहिले तर माणसाचे उच्चत्व किंवा नीचत्व, त्याच्या उच्च किंवा नीच कुलांतील जन्मावर नसून त्याच्या आध्यात्मिक उन्नतीवरच अवलंबून आहे हे स्पष्ट होईल.  नि. सा. मंडळीच्या अंत्यजोध्दाराच्या कार्यक्रमात भजनालाच मंडळीने प्रामुख्य दिलेले पाहून मला फार समाधान होत आहे.  नि. सा. मंडळीच्या या कार्याला तरी पुष्कळ सहानुभूती मिळाली पाहिजे.  कारण सर्व चांगल्या कामांना सहानुभूतिपूर्वक मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे.  नि. सा. मंडळीच्यातर्फे मी प्रत्यक्ष काम करणारा नसलो, तरी मंडळीच्या निराश्रितांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या कार्याला माझी पूर्ण सहानुभूती आहे म्हणून मंडळीला एक सूचना करावयाची आहे.

उच्चवर्णीय हिंदू व इतर मागासलेले अस्पृश्य वगैरे हिंदू यांचया हिताहितसंबंधाचा निरनिराळया दृष्टीने विचार करण्याची जरुरी नाही.  कारण ते एकाच समाजाचे घटक आहेत.  या सर्व वर्गांचे जेव्हा एकमेकांशी सलोख्याने सहकार्य होऊ लागेल तेव्हाच सर्वांच्या कल्याणाचा मार्ग दृश्य होईल.  म्हणून निराश्रितांच्या उन्नतीच्या प्रयत्नाबरोबरच अस्पृश्यबंधूंबद्दल उच्चवर्गीयांमध्ये सहानुभूती उत्पन्न करण्याचे प्रयत्नही झाले पाहिजेत.  उच्चवर्गीयांभोवतालचे पिढयानपिढया रुळलेल्या चालीरीतींचे व धर्मसमजुतींचे बळकट वेढे, एवढया कार्यानेच सैल होऊन त्यांच्याकडून पुष्कळ मदत मिळू लागेल अशीही खात्री बाळगता कामा नये.  या बाबतीत चाललेल्या प्रयत्नांना यश क्रमाक्रमानेच येईल.  तथापि, असे प्रयत्न ताबडतोब फलद्रूप झाले नाहीत व उच्चवर्गीयांकडून सहानुभूतिपूर्वक मदत झाली नाही याबद्दल, उच्चवर्गीयांबद्दल निराश्रितबंधूच्या मनात द्वेषभाव उत्पन्न न व्हावा, याबद्दलही फार काळजी घ्यावयास पाहिजे.

त्यांचे नंतर रा. लक्ष्मणशास्त्री लेले यांचे भाषण झाले.

व्याख्याते म्हणाले, ''तीस कोटी हिंदी लोकांपैकी सहा कोटी हिंदू लोकांवर धार्मिक-सामाजिक बहिष्कार असावा, ही गोष्ट मोठी खेदाची आहे.  आज हजारो वर्षे आपल्यापैकी एकषष्ठांश लोकांपासून आपण अलग राहिलो व हल्लीही राहत आहो, ही गोष्ट समंजस व उदार बुध्दीच्या माणसाला मोठी कठोरपणाची वाटल्यास नवल नाही.  अनेक कारणांनी हिंदू समाज आज विस्कळीत झालेला आहे.  त्याच्या ठिकाणी स्थैर्य व संघशक्ती आणावयाची असल्यास सर्व हिंदू समाज मनाने एक झाला पाहिजे.  कोणत्याही समाजातील एका वर्गाने आपले हित साधून अन्य वर्गांची उपेक्षा केली, तर एकंदरीने सगळया समाजाची प्रगती होणे नाही.  समाजाची सर्व अंगे सदृढ होऊन ती एकदम प्रगतीच्या मार्गाला लागणे ही गोष्ट समाजाच्या हिताची म्हणूनच अत्यंत श्रेयस्कर आहे.  आपल्यातील अस्पृश्य मानलेल्या जातींशीं आध्यात्मिक व सामाजिक बाबतींत सहकार्य कसे करता येईल या विषयांवर मला बोलण्याची सूचना झाली आहे.  तथापि, या मुद्दयाकडे वळण्यापूर्वी रूढ असलेल्या अस्पृश्यपणाला शास्त्राची संमती किती व कशा प्रकारची आहे याविषयी मला थोडेसे बोलावयाचे आहे.  हिंदू धर्म म्हणजे वेदप्रतिपादित ईश्वरज्ञान व आचार एकद्रूप धर्म आहे.  या धर्माचे आचरण करणाऱ्या चातुरर््वण्यांतील व्यक्तीला हिंदू असे समजतात.  चातुरर््वण्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचा समुदाय. वेदांत चातुरर््वण्य आहे ही गोष्ट ब्राह्मणोऽस्य मुखमासीदित्यादी श्रुतींवरून सिद्ध आहे.  तथापि, स्पर्शास्पर्शाची कल्पना वेदकाली असल्याचे दिसत नाही.  चांडाल, शौष्कल, निषाद, गोघात, पोल्कस, श्वच, यातुधान इत्यादी हीन कर्म करणाऱ्या शूद्र जाती वेदग्रंथांत आहेत.  यजुर्वेदामध्ये नाना प्रकारचे धंदे करणाऱ्या शूद्राची भली मोठी यादी दिली आहे.  त्या काळी ब्राह्मणादी वर्णत्रयाची परिचर्चा करणे हाच केवळ शूद्रांचा धंदा नसे.  अमरकोशामध्ये चांडाळ व अंबष्ठकरणादी संकीर्ण जाती दिल्या असून टीकाकाराने त्या त्या जातीचे वेगळे वेगळे धंदे सांगितले आहेत.  यावरून वेदकाली शूद्र व संकीर्ण जाती ब्राह्मणादिकांच्या परिचर्येशिवाय इतर उद्योगधंदे करीत व ते समाजाचे एक मोठे उपयुक्त अंग होते ही गोष्ट दिसून येते.  वेदांतली चातुरर््वण्याची कल्पना 'चातुरर््वण्य मया सुष्टं गुणकर्मविभागशः' या व्यासवचनात अवतीर्ण झाली.  मनुस्मृतिकारांनीही चातुरर््वण्य व्यवस्था सांगितली आहे व चांडालादिकांची उत्पत्ती कशी झाली हे सांगून त्यांच्याविषयी बहिष्काराचे फार कठोर निर्बंध घालून दिले आहेत.  चार वर्ण परमेश्वराने निर्माण करून त्यांना गुणकर्मे लावून दिली आहेत.  गुणकर्मांच्या योगाने वर्णांतर एकाच जन्मात होत नाही असा मनुस्मृतिकारांचा स्पष्ट अभिप्राय आहे.  सूतसंहितादी ग्रंथांत याच तत्त्वांचा अनुवाद आढळतो.  तथापि भारतांतील कित्येक प्रसंगांकउे आपण नजर दिली तर गुणकार्मांच्या योगे अधमवर्णाचा माणूस, उत्तम वर्णाचा होऊ शकतो असे व्यासांचे मत असल्याचे दिसून येते.  श्रीमदभागवतात व भारतांतही मूळचा वर्ण एकच असून गुणकर्मांच्यायोगानें त्याला विविधता आल्याचा उल्लेख आहे.  भागवतात असे वचन आहे :

एक एव पुरा वेदः प्रणवः सर्व वाङमयः ।
देवो नारायणो नान्य एकोऽग्निर्वर्ण एवच ॥

महाभारतात वनपर्वात -

एकवर्णमिदं पूर्वं विश्वमासीद्युधिष्ठिर ।
कर्मक्रियाविभेदेन चातुरर्वर्ण्यं प्रतिष्ठितम् ॥
सर्वे वै योनिजा मर्त्याः सर्वे मूत्रपुरीषजाः ।
एकेन्द्रियेन्द्रियार्थाश्च तस्माच्छीलगुणैर्द्विजः ॥

शूद्रोऽपि शीलसंपन्नो गुणवान् ब्राह्मणो भवेत् ।
ब्राह्मणोऽपि क्रियाहीनः शूद्रात्प्रत्यवरो भवेत् ॥

अशी वचने आहेत.  यावरून गुणकर्मांच्या अनुरोधाने वर्णांतर संभवते, ही कल्पना दृढ होते.  याप्रमाणे स्मृतिकार मन्वादी व इतिहासकार व्यासादी यांच्यामध्ये वर्णव्यवस्थेच्या उत्पत्तीविषयी व हेतूविषयी विरोध दृग्गोचर होतो.  मनु व व्यास हे दोघेही हिंदू समाजात मान्य आहेत, मग यांच्यापैकी कोणाचे वचन अधिक प्रमाणभूत मानावयाचे, याचा उलगडा एका गोष्टीने सहज करता येण्यासारखा आहे.  खुद्द भगवंतांनी गीतेत 'मुनीनामप्यहं व्यासः' असे स्पष्ट म्हटले आहे.  तेव्हा श्रुतिगत वर्णव्यवस्थेचे मर्म व्यासमुखाने योग्य रीतीने प्रकट झाले आहे असे मानावयाला काय हरकत आहे ?  भारतामध्ये पूर्वोक्त वचनांशिवाय दुसरेही अनेक प्रसंग आहेत.  भारद्वाज व भृगु यांचा संवाद, यक्षयुधिष्ठिरसंवाद, नहुषयुधिष्ठिरसंवाद, सर्पयुधिष्ठिरसंवाद, विदुरनीति इत्यादी स्थले जातिभेद गुणकर्मनिष्ठ आहे अशाची सूचक आहेत.  महाभारतात शांतिपर्वामध्ये जनक-पराशर-संवाद आहे.  त्यात तर अनेक नीच कुलोत्पन्न माणसे तपाच्या योगाने उच्चवर्णाप्रत गेल्याचा स्पष्ट उल्लेख आहे.  ॠष्यशृंग, द्रोण, कृप, मातंग, कश्यप इत्यादी नीच कुलांत उत्पन्न झाले असताही तप व वेदाध्ययन यांच्या सामर्थ्याने उत्तम वर्णाला गेले असल्याचा इतिहास या संवादात आहे.  बृहदारण्यकोपनिषदात 'पौल्कसो अपौल्कसो भवति' हे वचन आहे.  तसेच वज्रसूचिकोपनिषदात ''जातिर्ब्राह्मण इति चेत् तत्र'' अशा प्रकारची वचने आहेत.  त्यावरूनही गुणकर्मांच्या प्रभावामुळे वर्णांतर होत असे, असे ध्वनित होत आहे.  अशा प्रकारे वर्णव्यवस्थेसंबंधाने प्राचीन विचार आहेत.  व्यासांनी या प्रश्नांचा उलगडा उदारबुध्दीने केला आहे.  मनूची यासंबंधाने वेगळी दृष्टी आहे.  योगमार्गाचा व कर्ममार्गाचा अवलंब करणारांच्या ठायी अत्यंत शूचिता लागते.  मांसाहारादी क्रिया व अमंगल आचार, यांपासून योगमार्गानुयायी लोकांना अगदी अलिप्त राहावे लागे, या कारणामुळे अशुचि आचार करणारांना इतरांपासून अगदी दूर ठेवण्याचा मनूचा कटाक्ष दिसतो.  यावरून अस्पृश्य जातीविषयी द्वेषभावाने त्यांनी कडक निर्बंध केले असे म्हणवत नाही.  पण त्याच्या हेतूचे आकलन समाजातील सामान्य लोकांना नीटसे झाले नाही व अज्ञानामुळे अस्पृश्य मानलेल्यांविषयी उत्तरोत्तर द्वेषभाव वाढत गेला.  उच्च जातीतील स्पृश्यास्पृश्याचा विचार केला तर माझे हे म्हणणे आपणास मान्य होईल.  रजस्वला व अशौचात असलेली माणसे यांना अस्पृश्य समजण्याचा अद्यापि उच्च जातीत निर्बंध आहे व तो अबाधित आहे.  यावरून व आजसुध्दा अमंगळ, निंद्य व गचिच्छ व्यवहार करणाराशी आपण मोकळया मनाने व्यवहार करण्याला तयार होत नाही; या मानवी स्वभावावरून स्पृश्यास्पृश्य विचार केवळ ऐच्छिक व द्वेषमूलक नसून, काही विशेष उदात्त तत्त्वावर झालेला आहे असे दिसून येते व इतर समाजातून ज्यांच्यात जातिभेद नाही अशा युरोपियन राष्ट्रांतूनसुध्दा असल्या कल्पनांचा प्रभाव थोडयाबहुत अंशाने दिसून येतो.  मूळची वर्णव्यवस्था आज पुष्कळ शिथिल झाली आहे.  तथापि अस्पृश्यासंबंधाने रूढ झालेल्या कल्पनांची मुळे अद्यापि बहुजनसमाजाच्या अंतःकरणात जीव धरून आहेत.  हा रूढीचा व अज्ञानाचा प्रभाव आहे.  मी स्वतः काश्यपगोत्री ब्राह्मण आहे व या नात्याने समाजात उच्च वर्णांत माझी गणना होते आहे.  वस्तुतः विद्येच्या, तपाच्या, सदाचरणाच्या व इतर उदात्त विचारांच्या बाबतीत माझे व काश्यप मुनीचे कितपत सादृश्य आहे ?  तथापि, मी जन्माचा ब्राह्मण म्हणून माझ्यापेक्षा विद्यादिकांनी अधिक संपन्न असणाऱ्या अन्य वर्णांतील माणसापेक्षा मला अधिक योग्यतेचा समजतात !  हा रूढीचा प्रभाव आहे व अज्ञानाने ही रूढी अद्यापि बलवती आहे, ही शोचनीय गोष्ट आहे.  शास्त्रदृष्टीने अस्पृश्यपणाची कल्पना काय आहे.  याविषयीची माझी समजूत मी आता सांगितली.  या वादाचा निकाल देण्याचे काम व अधिकार माझ्याकडे नाही.  केवळ विचार करण्याकरिता माझ्या समजुती मी येथे मोकळया मनाने, प्राचीन व अर्वाचीन विद्वानांविषयी आदरबुध्दी ठेवून व्यक्त केल्या आहेत.  माझे बोलणे सिद्धांतरूपाचे नाही.  आजच्या प्रसंगी मिळालेल्या वेदशास्त्रार्थसंपन्न पंडित अध्यक्षांनी याविषयी आपला अभिप्राय प्रकट करावा या हेतूने अस्पृश्यपणासंबंधाने येथे मी उल्लेख केला आहे.

आतापर्यंत मी भाषण केले यावरून स्पर्शास्पर्शविचार वेदांत नाही.  चातुरर््वण्याविषयी मनूची व व्यासांची कल्पना भिन्न आहे.  मनूने चांडालादिकांविषयी केलेले कठोर निर्बंध द्वेषमूलक नसून योगकर्म आचरावयाला लागणाऱ्या शुचित्वाकरिता केलेले आहेत.  मनूच्या चातुरर््वण्य कल्पनेपेक्षा व्यासांची त्याविषयीची कल्पना अधिक ग्राह्य आहे; हे माझे मुद्दे आपल्या लक्षात आले असतील.  शास्त्रे काही निकाल देवोत.  जाती राहोत अथवा जावोत; सामाजिक, धार्मिक बहिष्कार चालो अथवा बंद होवो.  आपणाला दुसऱ्या एका भूमिकेवर हा वाद टाळून, एके ठिकाणी येतो येते.  ती भूमिका शाश्वत अथवा सनातन धर्माची होय.  कोणत्याही काली, कोणत्याही स्थली, कोणत्याही व्यक्तीला अबाधितपणे जो धर्म आचरिता येतो, त्याला सनातन धर्म म्हणतात.  उपनिषत्कालामध्ये याचे शुचितम स्वरूप व्यक्त झाले आहे.  ईश्वर एकच असून तो सर्वांचा नियंता आहे.  तो परम मंगल दयाळू व सर्व व्यापक आहे.  तो सर्वांच्या हृदयात वास करितो.  'ईश्वरःसर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठषत' हे गीतावाचन आपणांस ठाऊक आहे.  त्या परमेश्वराची आपण लेकरे आहो, या दृष्टीने आपणांमध्ये भावंडांचे नाते येते.  या नात्याच्या दृष्टीने आपण सगळे सारखे आहो, यात उच्चनीच भाव व जातिभेद नाही.  देवाच्या ठिकाणी अव्यभिचारिणी भक्ती, सर्व भूतांविषयी प्रेम, समदृष्टी व सदाचार ही या सनातन धर्माची प्रमुख अंगे आहेत.  यांत सर्व उदात्त धर्मतत्त्वांचा अंतर्भाव होतो.  मन हे देवाचे अधिष्ठान असल्यामुळे त्याला चांगले वाईट कळण्याचे सामर्थ्य स्वभावसिद्ध आहे.  त्याला सन्मार्गाकडे लावून परमार्थ साधणे हे प्रत्येकाचे काम आहे.  परमेश्वराला प्रेम फार आवडते.  श्रीमद्भागवतात भगवंताने उद्धवाला सांगितले आहे की, बाबा माझे भक्त माझे चरणकमल प्रणयरशनेने दृढ बद्ध करून मला आपल्या अंतःकरणातून बाहेर जाऊ देत नाहीत.  एका मराठी संतकवीने हेच तत्त्व ''प्रेमसूत्र दोरी, नेतो तिकडे जातो हरी'' असें प्रतिपादिले आहे.  तेव्हा प्रेमाने परमेश्वराला वश करणे हे परमार्थात अवश्य असून आध्यात्मिक उन्नतीचे मुख्य साधन आहे.  आपल्यामध्ये भजनाचा प्रसार होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.  मनुष्य परमेश्वरावर भरवसा ठेवून सदाचरणाने व नेकीने वागू लागला, म्हणजे त्याच्या मनाला परमानंदाचा लाभ झालाच पाहिजे.

व्यवहारात तरी हाच न्याय आहे.  पुष्कळांची समजूत अशी असते की, व्यवहारात केवळ सत्य चालत नाही.  म्हणून ते न आचरिले तरी चालेल; पण ही मोठी चूक आहे.  परमार्थाइतकेच सत्य व्यवहारातही पाहिजे.  प्रेमासारखे दुसऱ्याला वश करून घेण्याचे साधन दुसरे नाही.  पराक्रमानेही न होणारी कार्ये केव्हा केव्हा प्रेमाने घडून येतात.  विश्वबंधुत्व मनात बाणण्याइतके प्रेम अंतःकरणातून उदित व्हावयाला मनावर मोठा संस्कार झाला पाहिजे.  असा संस्कार व्हावयाला थोरांचा समागम व ज्ञानप्राप्ती ही दोनच साधने आहेत.  म्हणून ज्ञानार्जन करून उन्नती करून घेणे या मार्गाचे आपण अवलंबन केले पाहिजे.  आज अज्ञानामुळे आपणास मागे पडावे लागते आहे.  आत्मोद्धरपणाचा उपाय आपल्या हातांतला आहे.  उद्धरेदात्मनात्मानं या तत्त्वाचे अवलंबन आपण केले पाहिजे.  अज्ञानमूलक रूढीच्या जोरावर शेकडो वर्षे अस्पृश्यपणाच्या बाबतीत तुम्हाला कठोरपणाने वागविण्यात आले असले तरी आज तुम्हाला निराश होण्याचे कारण नाही.  परिस्थिति बदलत चालली आहे.  साधुसंतांनी तुमचा कैवार घेतला आहे, भगवान बुध्दाने तुमचा अंगीकार केला आहे, इंग्रज सरकाराने तुमच्याविषयी दयार्द्रदृष्टी ठेविली आहे.  समंजस व दयाळू बांधवजन तुमचा परामर्श घेण्यास तयार होत आहेत.  अशी सुचिन्हे दिसत असता तुमच्या अंतःकरणात निराशा का उत्पन्न व्हावी ?  आशावादी व्हा.  प्रयत्न करा.  निर्मत्सर बुध्दीने व प्रेमाने सर्वांस आपलेसे करून घ्या म्हणजे तुमचे कार्य हटकून सिध्दीस जाईल.

आम्ही तुमच्याशी प्रेमाने व सलोख्याने वागण्यास तयार आहो.  हिंदू लोकांचे औदार्य वाखाणण्यासारखे आहे.  ते तुमच्या मदतीला येणार नाहीत, असे होणे नाही.  विपदग्रस्तांना मदत करणे हेच संपत्तीचे खरे फल आहे.  'आपन्नार्तिशमनफलाः संपदोह्युत्तमानाम' ही महाकव्युक्ती सुप्रसिद्ध आहे.  ज्यांच्यापाशी जी संपत्ती असेल त्यांनी तिचा ओघ तुमच्याकडे वळवावा, अशी मी त्यांस विनंती करितो.  द्रव्यवानांनी द्रव्याने, विद्वानांनी विद्यादानाने, इतरांनी प्रेमदृष्टीने तुमचा परामर्श घ्यावा व एकंदर समाजांत प्रेम व सुख ह्यांची वृध्दी करून त्याला दृढता व सामर्थ्य आणावे अशी माझी प्रार्थना आहे.  तुमच्यांतील जे कोणी विपन्नदशेमुळे धर्मांत करतील, त्यांना धर्मांत पुनः परत घेण्याची योजना समाजाने करावी असे मला वाटते. तुमच्या शाळांतून धार्मिक व नैतिक शिक्षणाची सोय करणे अशक्य नाही, व्याख्याने, पुराणे, पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादिकांच्या द्वारे तुम्हांला धार्मिक व नैतिक सर्वसामान्य शिक्षण समाजाने द्यावे व तुमच्या उद्धरणाला मदत करावी हे उचित आहे.  परमेश्वर करो आणि सर्व हिंदुसमाज सर्वांगांनी दृढ व कार्यक्षम होऊन समृद्ध, संपन्न व सुखी होवो.  ॠग्वेदात एक मंत्र आहे.  तो असा :  ''समानो मंत्रः समितिः समानी समानं मनः सह चित्तमेषाम् ।'' याचा अर्थ असा आहे :  यांचा मंत्र एका असो, यांची सभा एक असो, यांचे मन एक असो, यांची प्रवृत्ती एक असो.  मीही तुमच्याआमच्यासंबंधाने हेच म्हणतो.  वारंवार असले प्रेमवर्धनाचे प्रसंग येवोत, अशी इच्छा आहे व ती सफल करणे परमकारुणिक जगन्नियंत्या परमेश्वराकडे आहे.

रा. लेले शास्त्री यांचे वरील भाषण झाल्यावर रा. ब. मराठे यांनी अध्यक्षांचे आभार मानण्याची सूचना पुढे मांडली व तीस रा. शिंदे यांचें अनुमोदन मिळाल्यावर ती पास झाली.

अध्यक्षांचे समयोचित भाषण झाल्यावर मुलांची लष्करी कवाईत झाली.  मग स्वतः अध्यक्षांनी रा. शिंदे ह्यांचे ही परिषद भरविल्याबद्दल मोठया कळकळीने आभार मानिले.  मुलांच्या मेळयाने पंचम जॉर्ज बादशहांच्या अभीष्टचिंतनपर पुढील पद म्हणून दाखविल्यावर परिषद बरखास्त झाली.

॥ अभीष्टचिंतन ॥
पद - (वारी जाऊरे सावरिया.)

रक्षी ईशा तूची आमुच्या जॉर्ज भूपाते ।  आमुच्या जॉर्ज भूपाते ॥धृ॥
रिपुगणद्वेषाते निर्दाळी ।  सहाय होई संकटकाळी ॥
त्रिभुवनि भर यश ।  होवो जनवश ।  जॉर्ज भूपाते ॥१॥
आंग्ल-हिंदभूमीचा हा नृप ।  सत्यनिष्ठ तो वारो ताप ॥
होवो सुखकर ।  सकला प्रियकर ।  जॉर्ज भूपाते ॥२॥
संतति, संपत्ति, विजया ।  आयुर्बल बहु देइ तया ॥
भो परमेश्वर ।  करुणासागर ।  जॉर्ज भूपाते ॥३॥