इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २८ शनिवार मार्च १९०३
२८ शनिवार मार्च १९०३
रात्री ८ वाजल्यावर माझ्या मित्राने बॉई बॉला नावाचे सार्वजनिक नाचाचे ठिकाण दाखविण्यास नेले. हे ठिकाण लॅटिन क्वार्टर्स नावच्या विद्यार्थीलोक राहतात त्या भागी आहे, हे ऐकून विशेष आश्चर्य वाटले. एक फ्रँक देऊन पाहिजे (तेव्हा) आत करमणूकीसाठी जावे. व्हायलिनवाल्याचा मनोहर बँड येथे वेळोवेळी सुरू होतो तेव्हा वाटेल त्याने वाटेल तिच्याबरोबर नाचू लागावे, क्रीडावे, हिंडावे, बोलावे, उपहार घ्यावा किंवा संकेत करावा. येथे येणा-या बहुतेकाबद्दल शंका येते. किंबहुना अशा ठिकाणी शंका घेणे म्हणजे रिकामटेकडेपणा आहे ! पारीसच्या करमणुकी अशाच आहेत की त्या परक्यांना सहसा सहन होत नाहीत. निदान त्यांस कळत तरी नाहीत. येथेही रंगेल स्त्रिया अगदी उघड उघड येऊन विचारतात. सुमारे १००० एक हजार तरुण माणसे येथे उल्हास करीत होती. माझे मन क्षमाशील झाले. इतकेच नव्हे, परिस्थितीशी उदात्तपणे हळूहळू सहानुभूती उत्पन्न होऊ लागली. हल्लीच्या उद्योगाच्या झटापटीत मनुष्यास कसल्या तरी करमणुकीची आवश्यकता आहेच. धर्माधिका-यांनी शुद्ध कर्मणुकी जर पुरविल्या नाहीत तर इथल्याप्रमाणे अशुद्ध व केव्हा केव्हा मोठ्या घातुक कर्मणुकी आत शिरतात. इंग्लंडात हल्ली धर्माचे बाबतीत खटपट करणारे मिशनरी, लोकांना ज्या शुद्ध करमणुकी पुरवीत आणि त्याच्या द्वारे धर्माकडे कामकरी वर्गाचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल माझे मत पूर्वी फारच अनुकूल नव्हते. ही सोकावलेली तरुण मंडळी करमणुकीला पुढे व धर्माला मागे होते असे माझे म्हणणे होते. धर्माला एक प्रकारची निवृत्ती निदान समाधान तरी पाहिजे. त्या धर्मप्रवृत्तीला ह्या करमणुकीमुळे अडथळाच येतो असे मला वाटत होते. अद्यापि आहे. पण अशा शुद्ध करमणुकी पुरवल्या नाहीत आणि क्याथालिक धर्माप्रमाणे फाजिल सोवळेपणाचा दंभ माजविला तर मग पारीससारखे मासले दिसणारच.
ता. २९ रविवार मार्च १९०३
मा दिलेन चर्चमध्ये उपासनेस गेलो. नंतर पेति प्यालेस व त्रकोदेरो प्यालेस पाहिले.
ता. ५ आदित्यवार एप्रिल १९०३
सां रोक देवळात उपासनेस गेलो. येथे उपासना सर्वात अधिक थाटाची होते. आज Branch Sunday होता. म्हणून सर्वांनी एक प्रकारच्या नवस्पतीच्या फांद्या घेतल्या होत्या. क्वायर (गाणा-या) मुलांनी मोठ्या फांद्या घेतल्या होत्या. नंतर लुव्हर् येथे अलॅक्झांडरचे व पोरसचे लेब्रने काढलेले चित्र पाहिले.
स्मशान
नंतर ३ वाजता पेर ला शाज नावाची मोठी स्मशानभूमी पाहवयास गेलो. ८ दिवसापूर्वी मों मार्ट ही स्मशानभूमी पाहिली होती. मों पार्नास ही पारीसची तिसरी स्मशानवटिका मी पहावयास गेला असता बंद होती. पेर ला शाज ही सर्वात मोठी आहे. हिच्यात सुमारे ३० लक्ष प्रेते पुरली आहेत. प्रथम गेल्यावर समोरच्या उतरणीवरच्या एका भिंतीत, ज्याच्यासाठी कबरस्थान नाही अशा सर्वच माणसासाठी एक मोठे स्मारक भिंतीत कोरले आहे, ते पाहण्यासारखे. मृत नवराबायको भिंतीतल्या दाराशी अज्ञेय प्रदेशाकडे जात आहे. दोहीकडून कित्येक मृत विन्मुखपणे त्याच्या मागून चालले आहेत. खाली तेच जोडपे अखेर निद्रेत उघडे पडले आहे. त्यावर त्यांचे अर्भक पालथे पडले आहे. आशादेवीने थडग्यावरील शिळा उचलून धरिली आहे ! चित्र फार परिणामकारी आहे.
हे कॅथॉलिक स्मशान पहाण्यासारखे आहे. पुष्कळ थडगी म्हणजे लहान लहान देवळेच आहेत. आत वेदी, त्यावर येशूचा पुतळा, मेरीचा पुतळा, मृताचा पुतळा, मुखवटा अगर निदान फोटो इ. ठेविले होते. त्यावरून फुले, माळा घातल्या होत्या. मोठ्या मेणबत्या होत्या. त्यापुढे बसून प्रार्थना करण्याकरिता खुर्च्या ठेविल्या होत्या. अशा देवळात सर्व कुटुंबाची माणसे पुरलेली असत. स्मशानात स्वच्छ व सुंदर सडका, दोहो बाजूनी उंच झाडी. त्यांच्या खालीही एकाला एक चिकटून असली थडग्यावरची देवळे असा एकंदर देखावा पाहून आपण पाताळ लोकात मृतांच्या स्तब्ध शहरातच आहो असे वाटते. येथे करुणरसपर शिल्पकारागिरीही पाहण्यासारखी आहे. कवी, वक्ते, योद्धे, मुत्सद्दी, चित्रकार, गायक ह्या सर्वांची माती येथे मातीत मिसळली आहे. येथे प्रेते जाळण्याची एका बाजूस टोलेजग व्यवस्था केली आहे. ह्या इमारतीभोवती मृताची रक्षा ठेवण्याकरता एक ग्यालरी बांधली आहे. भिंतीत सु. २ फूट लांबीरुंदीचे कोनाडे केले आहेत. त्यात राख ठेवून वर तावदान अगर संगमरवरी दगड बसवला आहे. मृतांचा फोटो अगर लहानसा मुखवटा वर बसवला आहे. शिवाय त्यांचे नातलग वरचेवर ह्या कोनाड्यावर फुले, माळा, मेणबत्त्या वाहत असतात. हल्ली सुमारे २००० दोन हजार अशी लहान स्मारके येथे दिसतात. फुलामाळांचे निर्माल्य येथे बरेच साचले असते. जळत्या राखेवरही मागच्याची माया कशी लोलूप होते हे पाहून मन द्रवते. तसेच अशा प्रकारे स्मारक करण्याची चाल अगदी रानटी अवस्थेपासून युरोपच्या हल्लीच्या सुधारलेल्या काळापर्यंत कशी अखंड चालू हे पाहून मनात ऐतिहासिक विस्मयही वाटतो. एकंदरीत तत्त्वज्ञान, नीती, काव्य व धर्म इ. अनेक गहन विषयावर गंभीर चिंतन करण्यास ही पारीस येथील कॅथॉलिक स्मशानस्थळे अत्यंत अनुकुल आहेत !