इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ३ शुक्रवार एप्रिल ०३)
३ शुक्रवार एप्रिल
आदले दिवशी प्राथमिक व द्वितीय स्त्रीशिक्षणासंबंधी भाषण झाले होते. आज उच्च शिक्षणाविषयी बोललो. जेवणाचे पंक्तीस आम्ही दोघेच होतो. फ्रेंच विवाहपद्धतीसंबंधी मोठे मौजेचे बोलणे झाले. फ्रान्सात मुलामुलींची लग्ने आईबापच त्यांच्या मोठेपणी त्यांच्या संमतीने लावतात. इंग्रजाप्रमाणे येथेही स्वयंवराची चाल हळू हळू पडत चालली आहे. तरुण मुलीस तेथल्याप्रमाणे स्वातंत्र्य नाही. एका मुलीचे उदाहरण सांगितले की आईला सोडून ती एकटीच अशी केवळ स्नानगृहातच जात असे ! नंतर पारीसच्या नीतीसंबंधाने बाईने मोकळेपणे आपले विचार कळविले. ब्रिटिशापेक्षा फ्रेंच लोकात वैवाहिक नीती कमी आहे. जसजसे दक्षिण युरोपात जावे तसतसे नीतीचे मान कमी कमी होते, असे म्हणाली. गरीब कामकरी स्त्रीपुरुषे लग्न न लावता नवराबायकोप्रमाणेच राहतात. ते केवळ अनीतीचे असतेच असे नाही. ह्याचे एक कारण लग्नाच्या विधीचा धर्मदृष्टीने व कायद्याने फाजील अवडंबर माजविला आहे, तो गरीबांना झेपत नाही. नीती बिघडण्याचे दुसरे एक कारण तरुण मुलांनी २१ वर्षानंतर दोन वर्षे लष्करात नोकरी केली पाहिजे अशा सक्तीचा कायदा आहे. अशा तारुण्याच्या वेळी अशा पेशात स्वैरवृत्ती साहजिक वाढते. शिवाय पारीस हे जगातले करमणुकीचे स्थान असल्याने परकीय चैनी लोकांचे इथे चाळे फार चालतात, हे एक कारण.
नंतर उच्च शिक्षणात स्त्रियांचा कसा थोडा थोडा शिरकाव होत आहे व चळवळीचे काम स्त्रिया कशा अंगावर घेत आहेत, ह्याविषयी बोलणे झाले. एकंदरीत ह्या बाबतीत फ्रान्स अमेरिकेच्या व इंग्लंडाच्या मागे आहे असे बाईने कबूल केले. स्त्रीशिक्षणाचे कामी कॅथॉलिक धर्माकडून कसा अडथळा येतो ते स्वतःच्या अनुभवावरून सांगितले.
ह्याप्रमाणे ह्या दोन दिवसाच्या संभाषणानंतर ह्या विद्वान, आपल्या जातीविषयी झटून यत्न करणा-या ह्या बाईविषयी मला फार आदर व प्रेम वाटू लागली. तसेच तिलाही मजबद्दल व माझ्या धर्माबद्दल आस्था उत्पन्न झाली. आपल्या भेटीची आठवण म्हणून तिने मला एमर्सनविषयी एक पुस्तक दिले. ११ वाजता रात्री मी घरी परत निघालो. ट्राममधून सेन नदीचे काठाने येताना तो रात्रीचा देखावा पाहात, नुक्त्याच घडलेल्या शुद्ध सहवासाविषयी माझे मनात अनेक गोड विचारतरंग येऊ लागले. आत्मा आत्म्यावर लुब्ध झाला होता. म्हणून वियोग झाल्यावरही सुखच होत होते. शरीराची सर्वच सुखे दुःखपर्यवसायी आहेत. आत्म्याला पर्यवसानच नाही. कारण आत्मा अनंत आहे म्हणून त्याची वृत्ती अखंडित राहते.
व्हर्साय्य
Versailles
१२ आदित्यवार एप्रिल ०३
पारीसच्या नैऋत्येस सुमारे १४ मैलावर वरील इतिहासप्रसिद्ध वैभवशाली स्थल आहे. मी दोन प्रहरी ३ वाजता तेथे पोचलो. येथे १४ व्या लुईचा प्रचंड आणि श्रीमंत राजवाडा आहे. मध्ये चौकात १४ व्या लुईचा घोड्यावर बसलेला मोठा धातूचा पुतळा आहे. ह्या ठिकाणी ऐतिहासिक चित्रांचा व पुतळ्यांचा जसा संग्रह आहे तसा जगात कोठेही नाही. बहूतेक फ्रेंच इतिहासाचीच चित्र आहेत, व ती नामांकित चिता-यांनी काढिली आहेत. चित्रे अलिकडे मी इतकी पाहिली आहेत की आता तितके लवकर लक्ष लागत नाही. तरी काही चित्रांनी माझे येथे मन वेधले. शार्लमेन, सां लुई Sain Lui ह्यांची चित्रे पाहवी असे वाटले. क्रुसेड्स हॉलमध्ये क्रुसेड्ससंबंधी चित्रे आहेत. दुस-या मजल्यातील ग्यालरीत १७९७ पासून १८३५ पर्यंतची भव्य चित्रे आहेत. ह्यात नेपोलियनचा पराक्रम वर्णिला आहे. त्याचे सेंट हेलेना येथील थडगे, राटिसबन येथे त्याच्या पायाला झालेली जखम डाक्तर बांधीत (असता) तो आपल्या पांढ-या घोड्यावर चढत आहे, आलेक्झांड्रिया शहरात त्याचा प्रवेश, तेथील राजाचे शरण येणे, आस्टर्लिट्झ लढाईची आदली रात्र, वगैरे चित्रे पाहून वीर व करुण रसाची महती कळली.
नंतर निरनिराळे दिवाणखाने पाहिले. येथे संपत्तीची परमावधी पाहून तोंडावेट गांवढळाप्रमाणेच आपोआप सुस्कारे निघत. लुईची निजावयाची खोली व हांतरुण व चादर राखून ठेविली आहेत. राजदेऊळ फार सुंदर व भपकेदार आहे. वेळ नसल्यामुळे १।। तासात सर्व राजवाडा पाहणे झाले नाही. वाड्याचे खिडक्यातून सुंदर बागेची व उपवनाची अनुपम शोभा दिसत होती. मग आम्ही बागेत आलो. उंच झाडे, वीथिका, पुष्पवाटिका, गुंफा, तटाक, लहानमोठे कारंजे, वाड्यापासून उतरत जाणारी सपाटी, पुढे दूरवर दिसणारा रुंद व प्रशस्त पसरलेला कालवा, त्यावरील क्रीडानौका, एक की दोन असा नानाविध चैनीचा व सुखाचा देखावा पाहून मन समाधान पावले. आज इष्टरचा सण असल्याने हजारो स्त्रीपुरुषे व लहान मुले विहरण्याकरिता येथे आली होती. मजबरोबरही एक सभ्य बाई, तिचा भाऊ व लहानगा अत्यंत गोड व पाणीदार भाचा Andrew Jevonsal इतकेजण होते. फिरून लहान मूल थकल्यावर ती सर्व मंडळी ६ वाजता घरी गेली. मी एकटाच कालव्याच्या काठाने उपवनात हिंडू लागलो. उपवन विस्तीर्ण आहे. सुमारे ८ वाजता उपवन बंद होण्याची वेळ झाली तर मला बाहेर जाववेना. वाड्याचे पुढे पाय-यावर, मागे वाडा, पुढे उद्यान, भोवती क्षितीजापर्यंत पसरलेली वनराजी पाहात मी चित्रासारखा एवढा वेळ अगदी एकटाच उभा होतो. पौर्णिमेचा चंद्र स्वच्छ आकाशात वर येत होता. वाड्यापुढची बाजू (१३६० फूट लांब) रंगीत फोटोसारखी सुबक व प्रमाणबद्ध नजरेत भरली. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्याच्या व सुधारणेच्या वातावरणात असे एकवटलेले माझ्या पाहण्यात तर अद्यापि कोठे आले नाही व पुढेही येईलसे दिसत नाही. म्हणून ८ चे सुमारास बाहेर पडताना थोडे अवघड वाटले !!