इंग्लंडमधील रोजनिशी (ता. ३ दिशंबर)

ता. ३ दिशंबर
आज दोन प्रहरी बॉडलीन लायब्ररीचा काही भाग पाहिला. संध्याकाळी ९ वाजता रा. राणे यांचेकडे काफीला गेलो होतो. तेथे मि. गुप्ता ह्याजबरोबर `मांसाहार` ह्या विषयावर बराच वाद झाला. ता. १० आदित्यावर नवंबर १९०१ पासून आतापर्यंत मी कोणत्याही प्रकारच्या मांसाला शिवलो नाही. पुढेही असाच वनस्पत्याहार चालू ठेवावा असा निश्चय आहे. तो परमेश्वराने चालवावा!

ता. ५ दिशं.
दोन प्रहरी मी आणि रा. मित्र मिळून ऑक्सफर्ड येथील अँश्मोलियन म्यूजीयम पाहिली. ही बहुतेक ब्रिटिश म्यूजीयमप्रमाणेच आहे. पण तितकी मोठी नाही. चित्रसंग्रहात चित्रेही विशेष सुंदर मार्सेलातल्याप्रमाणे नाहीत. खाली पुतळे होते ते बहुतेक भिन्न झाले होते. इमारत भव्य व सुंदर आहे.

शुक्रवार दिशं. ६, १९०१
मि. कॉकचे घरी आमची चवथ्यांदा साधनसभा झाली. तीत पहिली प्रार्थना झाल्यावर मी विवेकासाठी भगवद्गीता अध्याय २ रा, श्लोक ५४ `स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव...` हा घेतला; व पुढील दोन श्लोकांचा इंग्रजीत अर्थ सांगितला. नंतर अव्दैत, कर्म, पुनर्जन्म इ. पौरस्त्य सिद्धांताविषयी मोठ्या शांतपणे विवाद झाला. ह्या सभेस लिंकन कॉलेजचे रो नावाचे नवीन गृहस्थ हाजर होते. हे पक्के थीइष्ट अथवा ब्रह्मो आहेत. व मि. व्हॉयसे२४ ह्यांच्याबद्दल ह्यास फार अभिमान आहे.

सुट्टीःलंडन
ता. ८ दिशं. १९०१
दोन प्रहरी १ वाजता ऑक्सफर्डहून निघून लंडन येथे ३ वाजता पोचलो. रात्री `पॅगेट` ह्यांच्याविषयी व्याख्यानास गेलो. ग्रेज इन रोड, कॉल्थोर्प स्ट्रीट नं. ७ येथे एक खोली घेतली आहे. ती सुमारे दोन खणांची आहे. भाडे रोज १ शिलिंग आहे. मुंबईचे स्वामी निर्विकल्प ह्यांचे शिष्य व कोल्हापूरचे जोशी (योगी) ह्यांचे मित्र रा. राजाराम पानवलकर२५ आणि नाशीकचे व्यापार शिकण्यास आलेले रा. पंगे हे दोघे लगतच्याच खोलीत आहेत. पानवलकर हाताने स्वयंपाक आम्हा तिघांसाठी करितात. तो आम्हांस फार गोड असतो. तो सात्त्विक व शुद्ध वनस्पतीचाच असतो. ह्यामुळे बिनत्रासाने थोडक्यात स्वच्छ अन्न मिळते; आणि ह्यांचे सोबतीत लंडन चांगले पाहण्यास सापडते.
दोन प्रहरी युनिटेरियन सेक्रेटरी बोवीस भेटल्यावर साऊथ केन्सींगटन येथील मोठे प्राणीशरीरसंग्रहालय पाहिले. पण पाऊण तासातच हे बंद झाल्यामुळे दोनच खोल्या पाहिल्या.

ता. ९ दिशं.
दोन प्रहरी २ वाजता ट्रफालगर स्क्वेअरमधील National Picture Gallery चित्रसंग्रहालय पाहिले. जवळ जवळ अर्धी चित्रे धार्मिक म्हणजे येशू आणि कुमारी मेरी ह्यांचीच व काही साधूंची होती. राफील, रूबेन इ. प्रसिद्ध चित्रकारांची सुंदर चित्रे येथे दिसतात. निरनिराळ्या देशांची निरनिराळी अशा व्यवस्थेने मांडणी आहेत. आणि एकेएक चित्र इतके सुंदर होते की ते सोडून पुढे जाववत नसे. १।। (दालन?) पाहिल्यावर दारे बंद होऊ लागली म्हणून काही भाग पहावयाचा राहिला. अशा ठिकाणी प्रेक्षक समुदाय भरला असतो. दालनाच्या मधोमध खुर्च्यांची रांग आहे. त्यांवर बसून कित्येक रसिक प्रेक्षक भिंतीवरील तसबिरीकडे पुष्कळ वेळ टक लावून स्वतःही चित्राप्रमाणेच तटस्थ दिसतात. ह्यानंतर पिकॅडिलीमधील काही चित्रे व तेथील चावटपणाचा मासला पाहिला आणि घरी आलो.

ता. ११ दिशं. १९०१ बुधवार
सकाळी नॅशनल इंडियन असोसियेशनचा १९०१ चा रिपोर्ट वाचला. ब्रि.अँ.फॉ. युनेटेरियन असो. चा रिपोर्ट वाचला. तीन वाजता सेंट पॉलचे देऊळ पाहिले. हे जुने भव्य आणि उंच आहे. बाहेरचा भाग धुराने काळा झाला आहे. ह्याचे भोवताली अरुंद रस्ते असल्याने माणसांची खेचाखेची असते. आम्ही गेलो तेव्हा उपासनेची वेळ झाली होती. म्हणून चहूकडे पाहण्यास मिळाले नाही. ह्यानंतर क्रिस्टमसकरिता गमतीच्या जिनसा विकण्याचे एक ४।५ मजल्याचे भले मोठे दुकान पाहण्यास गेलो. हे एक मोठे प्रदर्शनच होते. ह्यात लक्षावधी रुपयांचा माल होता पण सर्व खेळण्याचे नख-याचे जिन्नसच होते. हा सर्व चैनीचा देखावा पाहून किळस येतो. ह्या लोकांची कमीत कमी एक चतुर्थांश तरी संपत्ती केवळ निरर्थक वस्तूंत गुंतली आहे !