इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २८ जुलै १९०२ सोमवार)

ता. २८ जुलै १९०२ सोमवार
सकाळी ११ वाजता लीथस् कॉटेजमधून निघालो. १।। वाजता कार्लाइल शहरी येथून उडसाईड नावाच्या ४००।५०० वर्षाच्या जुन्या वाड्यात रे. ऑर्लाश ह्याचे येथे आलो. हा वाडा इगलवूड नावाच्या प्रसिद्ध जुन्या आरण्यात आहे. ह्या संबंधी वर्णन जनाबाईचे पत्रात पाठविले आहे. फावल्यास सुबोध पत्रिकेस पाठवीन
एडिंबरो
C/o Mrs. Somerville,
46, Marchmont,
Crescent, Edimburgh

ता. ३१ गुरुवार जुलै
कार्लाइल येथील कॅथीड्रल व किल्ला पाहिला. माहितीचे एक लहानसे पुस्तक घेतले. किल्ल्याचे तळघरात ब्लॅकहोलप्रमाणे १२५ मनुष्यांस ठेविले होते. पैकी २५।३० मेलेले दुसरे दिवशी आढळले. ३।। वाजता एडिंबरो येथे पोचलो. आगबोटीवरचे मित्र नायडू (हैद्राबादचे) ह्यांनी मार्चमाँट क्रेसंट नंबर ४६ मध्ये मजकरिता बि-हाड ठरविले. संध्याकाळी ब्ल्याकफर्ड हिल्लवर फिरावयास गेलो. हे उन्हाळ्याचे दिवस असूनही मला येथे थंडी वाजत होती. फॅशनेबल लोकांची बहुतेक घरे बंद होती. रस्ते शांत व स्वच्छ दिसले. टेकडीवरून एडिंबरोचा सौम्य, शांत व सुंदर देखावा दिसला. पुष्कळ लोक आपल्या प्रिय पात्रास बरोबर घेऊन फिरावयास आले होते. अशा तरुण जोडप्यांची ही टेकडी मोठी आवडती दिसली. टेकडीच्या वळणांतून, खाचखळग्यांत, झुडपांखाली, गवतांतूनही प्रेमाने बद्ध झालेली जोडपी सर्व जगास विसरून आपापल्यातच गर्क झाली होती. वाटेने जाताना अवचितच अनपेक्षित अशा अवघड ठिकाणी जोडपे पाहून चमत्कार वाटे. न जाणो चुकून एकाद्यावर पाय पडेल म्हणून आजूबाजूस पाहून चालावे लागले. मानवी प्रेमाचे हे स्वाभाविक प्रदर्शन पाहून ज्यास विषाद वाटेल तो खरा हतभागी, करंटा, खोट्या तत्त्वज्ञानाने बिघलेला, खोट्या नीतीच्या कल्पनांनी कुजलेला म्हणावयाचा. मि. फर्ग्युसन, आमच्या कॉलेजचा सिनीयर विद्यार्थी एकदा म्हणाला, जगात ह्या देखाव्यापेक्षा अधिक सुख मला कोणत्याही देखाव्याने होत नाही. मला त्याच्या म्हणण्याचा रस कळला ! आम्हा पौरस्त्यांना ह्या सर्व प्रकारांत केवळ अनीतीच दिसण्याचा संभव आहे. पण दिसणे व असणे ह्यांत दोहों पक्षी पुष्कळ वेळा कितीतरी फरक असतो.

ता. २ शनिवार १९०२ आगष्ट
एडिंबरोचा किल्ला (मेरी क्वीन ऑफ स्कॉट्सची खोली, ६ वा जेम्स जन्मला ती खोली वगैरे) पाहिला. किल्ला उंच टेकडीवर बळकट व दुरुस्त आहे. नंतर चित्रसंग्रह पाहिला.

सार्वजनीक पुस्तकालय नावाची गरीब लोकांस फुकट वाचावयास देण्याची एक जंगी संस्था पाहिली. पुस्तके सुमारे ४८००० हजार होती. शिवाय १०।१२ हजार तरुण पोरास वाचण्याकरिता होती. खालच्या मजल्यावर वाचनालय होते. तेथे सुमारे १०० शंभर मजूर वर्तमानपत्रे व मासिकबुके वाचित होते. मे महिन्यात (१९०२) ४६९५७ पुस्तके वाचण्यास देण्यात आली. गेल्या नवंबरात ७१३६९ पुस्तके देण्यात आली. ह्यावर सरासरी कळेल. मजूर लोकांस काम मिळेनासे झाले म्हणजे ते केवळ बसावयास म्हणून येथे येतात, व सहजच एखादे पत्र अगर पुस्तक वाचतात. इमारत भव्य, सुंदर, स्वच्छ होती. व्यवस्थाही फार चांगली दिसली. हे लोकशिक्षण खरे !

ता. ३ आदित्यवार
सकाळी कथबर्ट चर्चमध्ये उपासनेस गेलो. हे फार सुंदर देऊळ होते. उपासकांची संख्या सुमारे ७००।८०० होती. संध्याकाळी फ्री सेंट जॉर्ज चर्चमध्ये उपासनेस गेलो. हे नॉनकन्फॉर्मिस्ट काँग्रिगेशनल् लोकांचे होते. सुमारे १२०० वर लोक हजर होते. हारमोनियम वाजविणारा मनुष्य अगदी आंधळा असून फार सुरेख वाजवीत होता. उपदेशक रे. ब्लॅक् हे तरूण फारच कळकळीने बोलले. विषय धार्मिक ढोंग हा होता. दुराग्रह अगर जुनी मते ह्याचा उल्लेख नव्हता. जोपर्यंत जुन्या धर्माचे उपदेश अशा पद्धतीवर होतात तोपर्यंत युनिटेरिअनसारख्या नवीन चळवळीचा झपाट्याने प्रसार होणे कठीण आहे; व त्याची तितकी जरूरीही नाही. कारण उदारमतांचा शिरकाव हळूहळू जुन्या देवळांतच झाला तर युनिटेरिअनिझमचे काम सहजच झाले म्हणावयाचे. उन्हाळ्यात आगष्ट महिनाभर एथील देऊळ बंद असते. कारण बहुतेक लोक सुटीसाठी बाहरेगावी जातात.