इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १८ मंगळवार, मार्च १९०२)
ता. १८ मंगळवार, मार्च १९०२
सकाळी ९ वाजता मि. कॉर्निक, रेव्ह. वुइंटर आणि मी असे तिघे ब्रिडपोर्टपासून ६।७ मैलावर एगार्डन टेकडीवरचे रोमन च्छावणीचे अवशेष पाहवयास गेलो. गार वारे सुटले होते. अगदी डोंगराळ प्रदेशात टेकडीच्या माथ्यावरून ही घोड्याची गाडी अगर बाइसिकल जाण्यासारख्या सुंदर सडका आहेत. ही रस्त्याची सुधारणा बाइसिकल्स आल्यापासून झाली आहे. एगार्डन हिल्ल समुद्रसपाटीपासून... मैल उंच आहे. जमीन मऊ चिकणाईत चुनखडीची आहे. गवताने आच्छादित आहे. टेकडीच्या माथ्यावर रोमन लोकांची एक सडक सरळ बाणासारखी खाली जाते. सडका अगदी सरळ करण्याची रोमन चाल असे. टेकडीच्या माथ्यावर जुनी रोमन च्छावणी होती व अद्यापि आहे. मध्ये दोन पुरुष खोल खंदक व दोन्हीकडे समांतर बांध ह्याप्रमाणे वर्तूल टेकडीच्या माथ्यावर आहे. येथून सुमारे १/१।। मैलावर समुद्र दिसतो. ही चांगली मा-याची जागा आहे. टेकडीवर अद्याप केव्हा केव्हा रोमन लोकांची हत्यारे, हाडांचे सांगाडे सापडतात. बर्टन खेडे येथील शाळेतील म्युजीयममध्ये काही करटी मी पाहिली. टेकडीच्या खाली दरीतून परत येताना पॉवरस्टॉक, एस्करवेल इत्यादी कित्येक खेड्यांचा सुंदर देखावा दिसला. एका खेड्यातील मेथाडिस्ट चर्च पाहिले. सुमारे ५० जणांना सुखाने बसता येतील अशी बाके मांडिली होती. एक बाजाची पेटी होती. I am with you मी तुमच्याबरोबर आहे, हे येशूचे आश्वासन भिंतीवर स्पष्ट पाहून जिवास किती धीर वाटला ! दोन गरीब लोकांच्या घरांत जाऊन पाहिले. पैकी एक बाई १० वर्षे आजारी, ५।६ वर्षे अगदी हांतरुणात खिळलेली होती तिला भेटलो. तिला फार आनंद आणि आभार वाटले. येथे प्रार्थना केली. ही घरे स्वच्छ. मुख्य खोलीत चित्रे, चिमुकल्या वस्तू पुष्कळ होत्या. धर्मपर वाक्ये लिहिलेल्या पाट्या पाहून तर मला फार आनंद झाला. अगदी खेड्यांतील हीन लोकांतही येशूची वाक्यरत्ने चमकत आहेत ! मेथाडिस्ट लोकांची गरीबात धर्मप्रचारणा करण्याची मोठी हातोटी पाहण्यासारखी आहे. आठवडाभर कामधंदा करणा-या तरुणास हुरूप देऊन त्यांना रविवारी खेडोखेडी उपासना करण्यास पाठवितात.
ता. २१ शुक्रवार मार्च १९०२
परवा मि. व्हाईट ह्यांचे घरी जेवणास गेलो होतो. ह्यांस दोन मुली आणि मुलगे आहेत. सारी पोक्त आहेत. मि. व्हाईट मध्यम प्रतीचे व्यापारी असून विनोदी गृहस्थ आहेत. हे जुन्या मताचे ख्रिस्ती (मेथाडिस्ट) असून ह्यांना गौतम बुद्धाविषयी बराच आदर व माहिती आहे. सर्वांनी मला अत्यंत आगत्याने वागविले. मिस् फ्लो. व्हाईट हिची चित्रे पाहून अत्यंत आनंद झाला. तिने आपला एक देखावा मला दिला आहे. ही जशी देखणी तशीच कुशल व नम्र दिसली. हिची वडील बहीण फारच मर्यादशील आहे. ह्या लोकामध्ये सर्वत्र अशी चाल आहे की कोणी सभ्य पाहुणा अगर मित्र घरी आला (असता) त्याच्याकडून आपल्या सुंदर स्मारकबुकात काही लहान, चटकदार, बोधपर कोणा मोठ्या लेखकांची अगर स्वतः त्यांची वाक्ये लिहून घेतात. आणि दुसरे एका बुकात वर्षाच्या सर्व तारखा लिहिल्या असतात. त्यात पाहुण्याचा जन्मदिवस आणि नावगाव त्याच्याकडून लिहून घेतात. वडील बहिणीच्या बुकात मी बुद्धाचा एक उपदेश लिहिला. व धाकटी फ्लो. व्हाईट हिच्याकडे मन अत्यंत ओढ घेऊ लागले म्हणून तिला माझे हे वाक्य दिले.
I Live in Love, I Live for Love.
My Bread, my Salt is Love.
Love Leads me, all my wordly ways,
Love Lights my path Above.
ता. २२ शनिवार.
सकाळी ८-४० वाजता बसगाडीत मी क्रूकर्न स्टेशनास निघालो. ब्रिडपोर्टपासून हा गाव १३ मैल लांब आहे. प्रदेश पाहण्यास मी मुद्दाम ह्या गाडीतून निघालो. गार वारे सुटले होते. मला लवकर आत बसावे लागले. वाटेने काही अगदी साधी खेडी दिसली १०-३० ला क्रूकर्न येथे पोचून १२ वाजता तेथून आगगाडीने डेव्हनपोर्टला निघालो. क्रूकर्न स्टेशनवरील वेटिंग रूममध्ये परोपकारी मंडळ्याच्या धर्मदाय पेट्या पाहिल्या त्या 1 For Rg-widows & Orphans, 2 The blinds, 3 Travellers (female) aid, 4 Deven Mercy House, 5 Krekern Hospital, 6 National Life Boat Association. एक्झिटर येथे गाडी बदलून ३-३० ला डेव्हनपोर्ट येथे आलो. वाटेने टॅव्हस्टॉक दरीत वळणावळणांत बसलेले रमणीय दिसले. शहराच्या माथ्यावरून आमची गाडी घारीसारखी उडून जाताना गावातील कवलारू व धुराडी मात्र खाली खोल दिसली.