इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १९ जुलै)
ता. १९ जुलै
दोन प्रहरी जेवण आटपल्यावर आम्ही केसिकहून १२ मैलावर कॉकरमाउथ शहरी आगगाडीतून गेलो. हे गाव वर्डस्वर्थ कवीचे जन्मस्थान होय.४६ मेन स्ट्रीटमध्ये एक मध्यम प्रतीचे एक घर आहे, त्यात हा कवी जन्मला. हल्ली येथे दुसरेच कोणी राहतात. घरामागे एक लहानशी पण सुरेख बाग आहे व बागेच्या भिंतीखालून डरवेंट नदी वाहते. कॉकरमाउथ गाव काही प्रेक्षणीय मुळीच नाही. इंग्लंडच्या मानाने, विशेष करून लेक डिस्ट्रिक्टच्या मानाने रस्ते व घरे घाणेरडी आहेत. एक जुना किल्ला पाहण्यासारखा आहे. हा चार्लस् पासून पार्लमेंटने काबीज केला. लहान दारे, भक्कम कामे लाकडी (दरवाजाची), कपाटे वगैरे आमच्या किल्ल्याप्रमाणे धाटणी दिसली. परत येताना पावसाने भिजवले.
रात्री जेवणानंतर दिवाणखान्यात फार चांगले संभाषण झाले. प्रोफेसर कार्पेंटरसाहेबास जेन ऑस्टिनच्या कादंब-याचे विशेष महत्त्व वाटेना म्हणून त्याविषयी माझे त्यांच्याशी बरेच बोलणे झाले. ऑस्टिनबाईंनी वर्णिलेली सामाजिक स्थिती हल्ली अगदी पालटली आहे. आस्टिनच्या नाईका व इतर मुली ह्यांची चिंता म्हणजे लग्नाची. ह्यावरून ऑस्टिनबाईची आयुष्याची फारशी थोर कल्पना होती असे दिसत नाही. हल्ली मध्यम वर्गाच्या मुलींची मुख्य काळजी नवरा कसा मिळेल ही नाही. तिच्या चित्रात बोध विशेष नाही. एखाद्या डुकराचे अगदी हुबेहूब चित्र वठविले म्हणून ते चित्र अगदी मोलवान होईल असे नाही. आंतरात्म्यास रमविणारे व शिकविणारे असे काही असल्याशिवाय चित्राला किंमत येत नाही, वगैरे कार्पेंटरसाहेबांचा पूर्वपक्ष झाला. कादंबरीकाराच्या वास्तविक व काल्पनिक (Realistic & Idealistic) अशा ज्या दोन जाती आहेत, त्यापैकी पहिलीच्या दृष्टीने ऑस्टिनचा नंबर अगदी पहिला लागेल, असे माझे म्हणणे पडले. त्यानंतर दुस-या ब-याच विषयावर बोलणे झाले.
ता. २० जुलै १९०२ आदित्यवार
आजचा दिवस फारच पवित्र आणि सुखाचा व अनुभवाचा गेला. सकाळची न्याहारी झाल्यावर मी व कॉक मिळून शेजारच्या शेपर्डस् क्रॅगवर चढलो. वाटेत जागोजागी बसून आमची आवडती गाणी म्हटली. डारवेंटवाटर सरोवराचा व आसमंतचा देखावा फार मनोहर दिसला. परत ११ वाजता आल्यावर घरी फार चांगली उपासना झाली. लॉकेटने पहिली प्रार्थना केली. फर्ग्युसन व आरलॅकने उतारे वाचले प्रो. कारपेंटर यांनी हरफर्ड ब्रूक ह्यांचे एक व्याख्यान वाचले व मा. आर्नोल्डची कविता वाचली. ही वाचताना त्यांचे डोळे आसवांनी भरले होते. कुटुंबातील व शेजारची काही माणसे आली होती. माझ्या स्वतःवर फारच परिणाम घडला.
दोन प्रहरी ६।। वाजता केसिक येथील वार्षिक कनव्हेन्शनला गेलो. दोन भव्य तंबू उभे होते. बाहेरगावातून शेकडो लोक आले होते. बहुसमाजात धार्मिकता वाढविण्याकरिता ही चळवळ २६ वर्षे चालू आहे. आजपासून ८ दिवस सभेचे काम चालू राहणार आहे. आज समाज निदान (१०००) हजारावर तरी होता. लोकांत अत्यंत भाविकता दिसली. जॉन मॅकनीलचे फारच जोरदार व कळकळीचे भाषण झाले. केसिक हे स्थान ग्रेट बिटनच्या मध्यावर सृष्टिसौंदर्याच्या रमणीय प्रदेशी असल्यामुळे कित्येक लोक आपली सुट्टी घालविण्याकरिता येऊन धर्मही साधतात. सभेचे चालक अगदी जुन्या ख्रिस्ती मताचे असूनही आजच्या वक्त्याचे भाषण भिक्षुकी धर्माचे नव्हते. देव (ख्रिस्त) व साधक ह्यांचे दरम्यान कोणाची ही गरज नाही, हे त्याने जोराने प्रतिपादले. १ तास भाषण झाल्यानंतर सर्व लोकांनी गुडघे टेकले व वक्ता सौम्य शब्दांनी व सुराने त्यांस पश्चाताप पावण्यास सांगून क्षमा मागण्यास व मोक्ष मिळविण्यास त्यांस सांगू लागले. सुमारे ७।८ मिनिटे हा देखावा पहाण्या सारखा होता. बहुजनसमाजावर ह्याचा फार चांगला आध्यात्मिक परिणाम झाला असावा. कोणत्याही प्रकारचा मताभिमान व पंथाभिमान दिसला नाही. लोकाचे लक्ष केवळ ख्रिस्ताकडे लागावे व त्यांचे वर्तन सुधारावे येवढाच हेतू दिसला व त्याप्रमाणे कामही वठले. मला एकंदरीत संतोष झाला!
वाटेने येताना अंधारात व आडवळणीस कित्येक प्रेमी जोडपी प्रियाराधनात गर्क झालेली दिसली. हे मानवी संसारातील अत्यंत गोड पवित्र चित्र मला येथे वारंवार दिसते. गरीब लोकांस दिवाणखाने व बागा नसल्याने त्यांस सार्वजनीक उपवनांत व रस्त्याने आराधना करावी लागते. त्यांस इतराची फारशी शरम वाटत नाही. घरी परत आल्यावर ह्याचसंबंधी प्रोफेसर व पाहुणे स्त्रीपुरुष ह्यांच्याशी मौजेचे भाषण झाले. प्रोफेसर व इतर सभ्य गृहस्थ अशीच आराधना करितात काय असा माझा प्रश्न ऐकून मंडळीस भारी कौतुक वाटले. कार्पेंटरबाई निजावयास जाताना माझ्या कानाशी येऊन म्हणाल्या की "मला एक गुप्त गोष्ट सांगावयाची आहे. ती ही की प्रोफेसरही अशीच आराधना करितात बरे !"