इंग्लंडमधील रोजनिशी (ता. १९ बुधवार)
बर्टन येथील शाळा३५
ता. १९ बुधवार
इंग्रजी खेड्यातील शिक्षण स्वतः डोळ्याने पाहण्याची उत्कट इच्छा मिस्टर कार्निक ह्यास दर्शविल्यावरून मला ही आज शाळा पाहण्यास मिळाली. बर्टन नावाचे सुमारे ४५० साडेचारशे वस्तीचे खेडे ब्रिडपोर्टच्या पूर्वेस ३ मैलावर आहे. येथून एका हाकेवर एका टेकडीच्या पलीकडे समुद्र आहे. गावाबाहेर एका जुन्या पण स्वच्छ इमारतीत शाळा होती. शाळेची मधली मोठी मुख्य खोली ६० फूट लांब २० फूट रुंद होती. भोवती निर्मळ व साधे पटांगण होते. शाळेत शिरताना एक लहानशी देवडी लागली. तीत मुलांच्या टोप्या ठेवण्यास लहान खुंट्या ठोकल्या होत्या. आणि खाली नंबर लावले होते. प्रत्येकाचा नंबर ठरलेला होता. मुलांची संख्या ७१ आणि मुलींची ६७ होती. इंग्लंडात ७ वर्षावर व चौदा वर्षाखाली प्रत्येक मुलामुलीने शाळेत गेलेच पाहिजे असा सक्तीचा कायदा आहे. हा कायदा मोडल्यास पालकास दंड अगर शेवटी कैदेची शिक्षा आहे. अशा खटल्याची आणि शिक्षेची वर्णने वर्तमानपत्रातून येतात. सुमारे २०।२५ वर्षापासून ह्या सक्तीच्या मोफत शिक्षणास आरंभ झाला. तेव्हापासून बोर्डस्कूलची व्यवस्था अमलात आली. ह्या पूर्वी व आताही प्रत्येक धर्मपंथाच्या निरनिराळ्या शाळा असत व आहेत. त्यास सरकारी व चर्चकडून मदत असते. ह्याशिवाय खासगी शाळा व ईटन इ. मोठ्या शाळा आहेत. असो. शाळेत गेल्यावर प्रथम ख्रिस्ताची मोठमोठी चित्रे भिंतीवर दिसली. समोर एका तसबिरीत तो काही लहान मुलांस आपल्याजवळ घेत होता. खाली त्याचे हे वाक्या होते. `लहानग्यास मजकडे येऊ द्या. स्वर्गीय राज्य अशांचेच आहे.` भोवती त्याच्या इतर परोपकाराचे प्रदर्शन केले होते. ह्याशिवाय भिंतीवर चंद्र, गोल, कोन ई. अनेक रंगाच्या निरनिराळ्या आकृती लावल्या होत्या. मधून खंडाचे व देशाचे नकाशे सोडले होते. शिवाय काही प्रसिद्ध स्थळाचे व पुरुषांचे फोटो लावले होते. शाळेचे हेड मास्तर मि. मिल्बोर्न हे फार हुषार संभावीत दक्ष दिसले. आजुबाजू ह्यांची ख्याती आहे. ह्यांची पत्नी शाळेत शिकवित होती व दुसरी मदतनीस शिक्षकीण होती. वहिवाटीप्रमाणे मुलाच्या ७ इयत्ता होत्या. पण शिक्षकांच्या अनुभवाप्रमाणे शिक्षणाच्या सोयी प्रमाणे व मुलाच्या हुषारीप्रमाणे (मुलांचे) खरे वर्ग ४ च होते. ६ अगर ७ व्या वर्षा मूल शाळेत येते, १५ व्या वर्षा कामावर जाते. मुलामुलींचे येथे एकत्र सारखेच शिक्षण चालले होते. मुलांपेक्षा मुली मोठ्या दिसल्या कारण मुलास आपला धंदा शिकण्यास लवकर शाळेतून जाण्याची घाई असते. शाळेतून बाहेर पडल्यावर ५।७ वर्षांत कोणता तरी विशेष धंदा शिकून आपला निर्वाह साधावा लागतो. शाळा सकाळी ९ पासून १२ पर्यंत व २ पासून ५ पर्यंत उघडी असते. दररोज २ प्रमाणे वर्षातून निदान प्रत्येक मुलाच्या ४०० तरी हाज-या असल्या पाहिजेत. ह्या शाळेत ४३० होतात. बाजूच्या एका खोली(त) अगदी लहान मुलांचा वर्ग होता. ह्यांच्या स्लेटीवर खिळ्याने कायमच्या आडव्या उभ्या रेषा मारल्या होत्या. अक्षरे अगर आकडे लिहावयाचे ते प्रत्येक चौकात लिहीत असत. त्यामुळे लहानपणापासूनच प्रमाणशीर व्यवस्थेने लिहिण्याची सवय होत आहे. ७ वर्षापर्यंत मूल अशा वर्गात असते. ३।४ वर्षांची ३ अर्भके लाकडाच्या तुकड्यांनी घरे बांधून एका बाजूस खेळत होती. नंतर काही परिक्षेच्या लेखी उत्तराचे कागद पाहिले. हे छापलेले व आखलेले ठरीव नमुनेच होते. त्यात उत्तरे इतक्या व्यवस्थेशीर रीतीने लिहली होती की परीक्षेच्या घाईत ती लिहिली असावीत हे संभवनीय वाटेना. कोठेही डाग अगर टिपका दिसला नाही. त्याचप्रमाणे नकाशे व ड्रायींगच्या वह्याही व्यवस्थेशीर दिसल्या. शाळेत एक लहानशी म्यूजीअम होती. वरच्या खान्यात साबण तयार करण्याचे सामुग्री क्षार, तेले वगैरे ठेविली होती; व साबणाचे मासलेही होते. खालच्या खान्यात दगडी कोळसा, इतर उद्भिजे होती. दुस-या बाजूस उसाचे कांडे, मक्याचे कणीस ई. पासून तो तयार झालेल्या साखरेपर्यंत रूपांतरे होती. त्याचे खाली रेशमी किड्याच्या वेष्टनापासून तो तयार झालेल्या सुंदर लडीपर्यंत रूपांतरे होती. दुस-या बाजूस शेजारच्या कागडन हिल्लवर सापडलेले जुन्या रोमन लोकांचे दात, हाडे, थडग्यांतील भांडी, काही हत्यारे ह्या जिनसा होत्या. खालच्या खणात धान्ये, बिजे आणि कापसापासून तो कापडापर्यंत गिरणीतील रूपांतरे होती. दुसरीकडे निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे ठोकळे ठेवले होते. एका तावदानी पेटीत शिसपेन्सलीचे पर्याय व दुस-या पेटीत पोलाद आ(णि) तांब्याच्या पट्टी पासून तो निरनिराळ्या टाकाच्या टोकापर्यंत कृती दाखवली होती. एका बाजूस चित्राचे काही कित्ते ठेविले होते. त्यात खेड्याचा पाटीलबुवा आणि दरबारातील रणशूर सेनानी ह्यांचे हावभाव हुबेहुब पण साध्या रेघांनी दाखविले होते. काही निरनिराळ्या रिवाजाचे गोंडस खोजे व मातीची इतर भांडी ठेविली होती. शिवाय एका झाडाचे खोड कित्येक सहस्त्र वर्षांपूर्वी भूगर्भामध्ये दडपून जाऊन साक्षात दगड बनलेले पाहण्यासाठी ठेविले होते. इत्यादी सामुग्रीच्या सहाय्याने निरनिराळ्या वर्गास खालील विषयांवर गोष्टीच्या रूपाने सप्रयोग आणि साक्षात् पदार्थ दाखवून मुलांचे लक्ष खेचले जाते.
एपल फळ. सूर्यकमळ. गवळी |
१,२,३, इयत्ता एंजिन्. सेफ्टी लँप. मिरे. कापड. घडयाळ छत्री. बेडूक. कांच. सुई. झाडांचे भाग आगकाड्या इ.इ. |
४,५,६,७ इयत्ता दगडी कोळसा. वाफेचे यंत्र. पंप, मीठ. पाऊस. मेघ. लोखंड. पोलाद. `आमची निशाणे` गलबते. समुद्र. गवत. |
तारायंत्र इ.इ. |
मुलांस फी पडत नाही. इतकेच नव्हे तर पुस्तके, वह्या, पाट्या, पेना शाळेतूनच मिळतात. शाळा सुटल्याबरोबर ह्या वस्तू एका कपाटात अगदी व्यवस्थेने मांडण्यात येतात. ह्याशिवाय प्रत्येक कौंटीत अगर प्रांतात सुमारे २० मुलांच्या आणि २० मुलींच्या स्कालरशिपा आहेत. गुणाप्रमाणे त्यांची दरसाल वाटणी होते. मुलांचा शाळेत जो अभ्यास होतो तेवढाच. घरी धडे बिलकूल देत नाहीत. घरी धडे घोकित बसलेला अगर लिहित बसलेला असा एकही लहान विद्यार्थी मला अजून तरी दिसला नाही. अशा प्रकारची शाळा उत्तम रीतीने चालविण्यास शिक्षक कसा पाहिजे हे सांगावयास (नको). मि. मिलबोर्न ह्या कामाला अगदी लायख दिसला. मुलावर त्याची अशी जरब होती की कधी न पाहिलेल्या माझ्या फेट्याकडे फारसे न पाहता नेहमी पाहिलेल्या त्याच्याच तोंडाकडे सावधपणे पाहत. मुलांकडून काही गाणी म्हणवली. आरंभी हारमोनिअमधून गाण्याचा सूर मास्तर सांगे. ह्यावरून लहानासही सुरांची माहिती झालेली दिसली. सर्व अगदी ठेक्यात म्हणत. अर्थही फार गोड होता. शेवटी शाळा सुटता सर्वांनी मिळून प्रार्थना केली. `हे दयाळू पित्या.....` इ. आर्त रवाने ह्या अर्भकांची शुद्ध आणि साधी प्रार्थना सुरू झाली. शेवटी प्रभूची प्रार्थना अगर गाइत्री Our Father who art in Heaven - आमच्या स्वर्गीय बापा` ही संपून Amen - तथास्तू म्हटल्यावर माझे डोळे उघडले. ते केव्हा मिटले होते हे मला कळलेच नाही. प्रार्थना आटपल्यावर प्रत्येक मुलगा लष्करी थाटाचा सलाम करून आपली टोपी व्यवस्थेने घेऊन बाहेर पडला. व्यायामशाळेत ह्यांस लष्करी आणि साधे ड्रिल आणि डंबेल शिकविले जाते. कोणत्याही शहरापासून दूर समुद्रकाठच्या डोंगराळ प्रदेशातील आडवळणीच्या खेडेगावातील शाळेची ही व्यवस्था पाहून माझे डोक्यात विचारांचे व मनात विकारांचे काहूर माजले ह्यात काही नवल नाही. ही शाळा नव्हे तर सुधारले देशाचा, राष्ट्राचा आणि समाजाचा अगदी खालच्या दरजाचा घटकावयव बनविण्याची ही गिरणीच होय. इतका पैसा व अक्कल इकडे खर्च होत असूनही राष्ट्रीय शिक्षणाची हेळसांड होत आहे अशी ओरड पत्रातून, सभातून ऐकू येते; तर आमच्याकडे १०० स ७ ला लिहिण्यावाचण्यास येते तर नोक-या मिळत नाही म्हणून शिक्षण फार सवंगले असे कधी कधी उद्गार ऐकू येतात !