इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २ आक्टो. १९०१)
सकाळचे घंटे १०
ता. २ आक्टो. १९०१
ता. २६ सकाळी ९।। वाजता आमची आगबोट एडन बंदरातून निघाली. बोटीवरच्या घड्याळात ८ वाजले होते. तेव्हा माझे घड्याळात ९-५५ नऊ वाजून ५५ मिनिटे झाली होती. मी माझ्या घड्याळात मुंबईची वेळ कायम ठेविली आहे. आणि प्रत्येक बंदराची वेळ आणि मुंबईची वेळ ह्यात अंतर पाहत आहे. जागोजागच्या दिनमानाप्रमाणे बोटीवरच्या घड्याळातील वेळ बदलत आहे. त्यामुळे माझे घड्याळ कितपत बरोबर चालते हे पाहण्याचे येथे साधन नाही. हवेत फरक पडून माझ्या घड्याळातही काही थोडा फरक होत असेल. असो. मुंबईच्या वेळेपेक्षा एडनचा सुमारे २ तास मागे आहे. १ वाजण्याच्या सुमारास समुद्रात पोर्पस् नावाचे २।३ फूट लांब मासे पुष्कळ दिसले. ते पाण्यावर २।३ फूट उड्या घेत एकमेकामागून धावत जात. काही बोटीबरोबर धावत येत. मध्य समुद्रात ह्या प्राण्यांचा हा खेळ पाहून, सारखा एकच देखावा पाहून कंटाळलेल्या मनास थोडे समाधान वाटले. आगबोट झपाट्याने चालली असता लहान लहान बेडक्याएवढे मासे आगबोटीपासून दूर पाण्यावरून उडत जातात आणि त्यांचे पंख उन्हात चकचकतात.
ता. ३ आक्टो. १९०१ रात्र घंटे ९
ता. २६ संध्या. ४। वाजता आम्ही पेरीम बेटाजवळ आलो. हे बेट आफ्रिकेच्या बाजूस आहे. येथे एक दीपस्तंभ आहे. इथून बाबेल मांडेबची सामुद्रधुनी लागते. ह्या शब्दाची आरबी भाषेतील व्युत्पत्ती बाब् + बिल + मंदब अशी आहे. बाब = दार, बिल = चे (षष्ठीचा प्रत्यय), मंदब = रडणे, अश्रु. एकंदरीत रडण्याचे दार असा ह्या पदाचा अर्था होतो.११ ह्या ठिकाणी एकीकडे पेरीमबेट आणि आफ्रिकेचा किनारा आणि दुसरीकडे आरबस्थानचा आशियाचा किनारा हे दोन्ही जमीनीचे प्रदेश जवळ जवळ आले आहेत. त्यामुळे आगबोटीस जाण्यास येण्यास हे ठिकाण धोक्याचे आहे. २।४ वर्षापूर्वीच एथे एक बोट दगावली आहे. आणि असे अपघात किती तरी झाले असतील म्हणून आरबी लोकांनी पूर्वीपासूनच ह्या स्थळास वरील अन्वर्थक नाव देऊन भयसूचक कायमचे चिन्ह करून ठेविले आहे. पण सर्वांसच कोठे आरबी समजते ? त्यासाठी इथे दीपस्तंभ उभारला आहे. पेरीम बेटावर, किना-यावर तरी निदान विशेष वस्ती दिसली नाही. आरबस्थानच्या किना-यावरील टेकड्या नुसत्या रेतीच्याच बनल्या असाव्यात. कारण पाण्याच्या मा-याने त्या पायाकडे खाली ब-या(च) पोखरल्या गेल्या होत्या. कित्येक ठिकाणी लांबवर प्रदेश खडूचाच बनला होता तो दोन प्रहरच्या उन्हात अगदी शुभ्र दिसत होता.
४।। वाजता आम्ही तांबड्या समुद्रात शिरलो. इतर ठिकाणाप्रमाणे येथीलही पाणी काळेच असून व कोठेही तांबड्या रंगाचा मागमूसही नसून ह्यास तांबडा समुद्र असे का नाव आहे ते कळले नाही. तांबडा समुद्र हे मूळ इंग्रजीतील Red Sea या नावाचे भाषांतर आहे. व Red Sea हे देखील मूळ कुल्झम्१२ ह्या आरबी नावाचे भाषांतर आहे असे दिसते. कुल्झम् ह्याचे आरबीत अफाट, खोल, काळा किंवा तांबडा असे निरनिराळे अर्थ होतात. तथापि ह्यास तांबडा असे कशावरून म्हटले हा प्रश्न तसाच राहतो. असो. वरील दोन्ही नावाची माहिती आमच्या लाहोरच्या मुसलमान सोबत्याकडून मिळाली. ते आरबीचे चांगले जाणते आहेत. तसेच आरबस्थानच्या व इजिप्तच्या किना-यावरच्या गावाची व इतर स्थळांची नावे आरबीच बहूतकरून आहेत ह्यावरून आरबी लोकांनी एके काळी व्यापार, विद्या आणि राज्यकारभार वगैरे गोष्टींत आपले नाव व सत्ता बरीज गाजवली आहेत हे दिसून येते. पण एडन बंदरावर ह्यांनी पाखरांची पिसे, अंडी आणि दुस-याकडून विकत आणलेले तंबाकूचे चुट्टे उर्फ चिरूटे ह्या शिवाय दुसरे काही विकावयाला आणिले नव्हते ह्यावरून ह्यांची सांप्रतची कंगाल स्थितीही दिसून येते.
तांबड्या समुद्रात उष्मा अतिशय होतो. वारा अगदी बंद असल्याने खोलीत मुळीच बसवत नाही. उष्ण हवेचा हा शेवटचाच अनुभव असतो. तशात कपडे सर्व साहेबी थाटाचे असल्यामुळे अंगातून घामाची संततधार चालली असते. एक दोन दिवसातच आशिया मातेचा निरोप घ्यावयाचा असतो, म्हणून जणू ती आम्हास उष्णोदकांचे सचैल स्नान घालीत असते. ता. २७ रोजी सकाळी समुद्र अगदी शांत होता. इतका की जणू एक मोठा तलावच आहे. मंद वारा सुटला होता. देखावा फार सौम्य व रमणीय दिसत होता. दोन प्रहरी पुन्हा मनस्वी उकाडा होऊ लागला पण संध्याकाळी चांदण्याची व गार वा-याची भारी मौज वाटली.
प्रवासाचे सर्व वर्णन सुबोध पत्रिकेत प्रसिद्ध होईल.