पुरवणी नं. १ - रोजनिशिंतील वेंचे

सन १८९८ च्या आरंभापासून मी डायरींत बराच मजकूर लिहून ठेवला आहे. त्यांतील कांहीं वेंचे येथें देणें बरें वाटतें. बी. ए. मध्यें इतिहास हा विषय ऐच्छिक घेतला होता. त्याचें कारण मला हा विषय खरोखर आवडत होता. त्या वयांत मला स्वतंत्र विचार आणि टीका करण्याची संवय कशी लागत चालली हें खालील उता-यावरून दिसतें.

(१) थोरले शाहूमहाराज
ता. ३१ मार्च १८९८
थोरल्या शाहूचे चरित्रावरील विचार
मल्हार रामराव चिटणीसकृत थोरले शाहुमहाराजांचें चरित्र आतां नुकतेच वाचून संपलें. या बखरींतील कांहीं कांहीं मुख्य गोष्टींचे शक चुकले आहेत. पुष्कळ गोष्टी मागेपुढें लिहिलेल्या आहेत. दाभाड्यांच्या घराण्याची व पेशव्यांची चुरस, पेशव्यांचा व भोसल्यांचा तंटा (नानासाहेब व रघुजी भोसले यांचा), पेशव्यांचा व प्रतिनिधी यांचें वैमनस्य इत्यादि ऐतिहासिक महत्त्वाच्या वादग्रस्त बाबींचा विचार करावा तितका बखरकारांनीं केलेला नाहीं. यावरून चिटणीसाजवळ बरेच कागदपत्र असूनही त्यांचा उपयोग त्यांनीं किती केला असेल याची शंका वाटते. सर्व प्रसंगीं पेशव्यांची तरफदारी केलेली आढळते. ज्या बाळाजीवर ग्रांटडफ आपमतलबीपणाचा व अराजनिष्टतेचा आक्षेप करतो व ज्यानें सकवारबाईस जुलुमानें सती जाण्यास भाग पाडलें असे डफ म्हणतो, ज्या बाळाजीनें शाहूचे मरणानंतर सातारा हा राजकीय तुरुंग व पुणें हीच मराठ्यांची राजधानी केली, हे तर इतिहासप्रसिद्धच आहे, त्याच बाळाजीची एकाद्या कृतयोगांतल्या सेवकांस शोभतील अशी, बावनकशी राजनिष्ठेचीं उदाहरणें बखरींत सांगितलीं आहेत व त्याच उदाहरणांवरून शाहुची हुकुमत किती होती हें दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण ज्याचे विलासी कारकीर्दीत बहुतेक प्रधान व सरदार शिरजोर होत चालले होते त्याचेच आज्ञेवरून सर्व गोष्टी होत होत्या असे म्हणण्यास याहून फारच निराळा पुरावा पाहिजे. शाहूची कारकीर्द म्हणजे मराठेशाहीची (पेशवाईची नव्हे) भरभराट होय. शिवाजी महाराजांनीं कमावले, संभाजी महाराजांनीं गमावलें, राजाराम महाराजांनीं सावरलें, शाहूनें “शहाण्या” प्रधानाच्या मदतीनें वाढवलें व उपभोगिलें. शककर्त्या महात्म्याचा कडवेपणा संभाजी महाराजांत उतरला, राजकीय धोरण व हिंमत राजारामांत उतरली व अवशेष राहिलेला व्यक्ति विषयक चांगुलपणा तेवढाच शाहूमहाराजांचे वांट्यास आला. ह्या राजश्रींनीं मराठ्यास न शोभणारे गुण, विलास, नेभळेपणा व परावलंबिता इत्यादि, मोंगली झनानखान्यांतून आणले होते. त्या योगानें मोठमोठ्या व्यक्तींनीं त्यांचेभोवतीं जमून त्यांचे नांवाचे आश्रयाखालीं राज्याची मर्यादा जरी दूरवर वाढवली तरी सर्वाकर्षक मध्यशक्तीचा कमजोरपणा त्यांना दिसून चुकल्यामुळें ते डोईजड होऊन परस्पराशीं विरोध करूं लागले. व शाहुचे मरणानंतर मध्यशक्तीचा पूर्ण –हास होऊन अगर तिचें रुपांतर होऊन ते स्वतंत्रपणे वागूं लागले. येथेंच मराठेशाही संपली! नारायणरावाचे खुनानंतर पेशवाईचीहि अगदीं अशीच स्थिति होऊन साता-याप्रमाणें पुण्यासहि एक राजकीय तुरुंग झाला. शिंदे व फडणीस यांचे मध्ये दंडेली चालली. पुढें महादजीच्या व सवाई माधवरावांच्या मरणानंतर सर्व जगाच्या इतिहासास काळीमा लावणारी म्हारकी सुरूं झाली. तिचा लय १८१८ त झाला. कुठें शिवाजीमहाराजांनीं केलेला मराठेशाहीचा उदय आणि कुठें रावबाजीनें चालवलेल्या म्हारकीचा अंत! पण या राक्षसी भेदाची जबाबदारी एकट्या शिवाजीमहाराजांवर किंवा रावबाजीवर नाहीं; तर ती सर्व मराठ्यांवर आहे; एवढें तरी समजल्यास पुष्कळ झालें. नाहींतर रावबाजीस शिव्यांची लाखोली व शिवजयंत्युत्सव यांतच आम्ही दमून जाणार.” गतेतिहासाप्रमाणें चालू गोष्टीकडेहि माझी विवेचक नजर होती. हें खालील उता-यावरून कळेल -

(२) वसंत व्याख्यानमाला
 ता. ३० सोमवार, मे १८९८
“यंदा मालेची फार दैना दिसत आहे. दुष्काळ व प्लेग यामुळें फुलें (मालेची) कां महाग व्हावी हें कळत नाहीं. पण ‘वर जातीची’ फुलें मिळाली नाहींत म्हणून कोरांटीची व बाभळीचीं फुलेंच मालाकारांनीं जमवण्याचा सपाटा चालवला आहे. यावरून एक नुसती लांबलचक माळ कशीबशी तयार केली कीं काम आटोपलें असें यांना वाटतें. पुण्यास, जर आपण विद्वत्तेचे आगर आहों, अशी खरीच प्रौढी मिरवायची झाल्यास त्यानें आपली जबाबदारी यापेक्षां चांगल्या रीतीनें जाणली पाहिजे. उठल्यासुटल्यानें भाषणें दिल्यानें महाराष्ट्राची किंबहुना हिंदुस्थानची अब्रू जाणार आहे. माझ्या मतें असल्या मालेच्या द्वारें कांहीं ख-या विद्येचे विलास लोकापुढें आले पाहिजेत. नुसते वक्तृत्व पाजळणें, शाळेच्या चार शेंबड्या पोरांकडून टाळ्या घेणें किंवा सर्वांस माहीत होऊन शिळ्या होत आलेल्या चालू चळवळींचे चर्वीत चर्वण करणें, वगैरेकरतां ही माला नव्हे. महाराष्ट्रांतल्या चार विद्वान डोक्यांत विचारांच्या ज्या कांहीं घालमेली होत असतील त्या सर्व या मालेच्या रूपानें लोकांपुढें आल्या पाहिजेत. म्हणजे माला ही ह्या अंतस्थ उलाढालींचे कार्य झाले पाहिजे. असे न होतां ह्या मालेची संस्थाच माला सुरूं होण्यापूर्वीं फार झालें तर महिनाभर कांहीं महत्वाकांक्षी व अधिक प्रसंगीं तरुणांच्या डोक्यांत आपण काय बोलावे व कसे बोलावे इत्यादीविषयींच्या विचारांचे काहूर उठवण्यास, कारण होते. लोकांपुढें कांहीं महत्त्वाच्या गोष्टी यावयाच्या असतात म्हणून माला होते असे नसून मालेचा संप्रदाय आहे म्हणूनच कांहीतरी शिळोप्याच्या गप्पा होतात. आमच्या व्याख्यानमाला व आमचे विवाह यांच्यात बरेच साम्य आहे. विवाह झाला म्हणून जोडप्यांस एकमेकांवर प्रीति करणें भाग आहे. प्रीति असते म्हणून विवाह होत नसतो."

(३) प्रो. गोखले यांचें व्याख्यान
प्रो. गोपाल कृष्ण गोखले यांचें भाषण आज सायंकाळीं (शनिवार ता.१६ एप्रील १८९८ रोजीं मद्रास टाईम ४ वाजतां) आमच्या कॉलेजांतील हॉलमध्यें “इंग्लंडांतील व हिंदुस्थानांतील शिक्षण” या विषयावर इंग्रजींत सुमारें दीड तास, प्रो. गोखले यांचें उत्कृष्ट भाषण झालें. एकाग्रतेनें भाषण ऐकण्याची उत्कंठा दाबवेल तितकी दाबून मला जी कांहीं थोडीबहुत टिपणें घेतां आलीं त्यावरून खालील सारांश देत आहे. प्रो. गोखले म्हणाले,  “ इंग्लंडला जाऊन आल्यापासून माझ्या आयुष्यांत पालट झाला आहे. विचार, मत व कल्पना यांस निराळेंच वळण लागलें आहे. इंग्लंडांतील उत्तम व विविध प्रकार व त्याचा अवाढव्य प्रसार पाहून मी थक्क झालो. मुलें ७ वर्षांचीं झालीं कीं प्रत्येकास शाळेंत घातलेंच पाहिजे असा सक्तीचा सरकारी कायदाच आहे. हें सक्तीचें शिक्षण प्राथमिक असून Board Schools मध्यें गरिबांस मोफत शिक्षण मिळतें. त्यांत धार्मिक शिक्षणाची भेसळ होत नाहीं. शिक्षणपद्धती मुलांस होतां होईल तों मनोवेधक होईल अशी आहे व मुलांच्या स्वाभाविक शक्तींचा विकास होईल अशीच असते. शिक्षक नेमावयाचे ते हुशार व अनुभविक नेमतात. शिक्षकांनीं तेवढ्याच धंद्याकडे आपलें आयुष्य वाहिलें असतें. मुलांस मानसिक व नैतिक शिक्षणहि दिलें जातें. सभ्य गृहस्थ व सभ्यपणा हे इंग्रजी भाषेंत विशिष्ट गुण होऊन बसले आहेत. दुस-यानें नांवें ठेवण्यासारखें एकहि कृत्य त्यांचे नजरेस आलें तरी ते त्याचा बभ्रा किंवा उहापोह करणार नाहींत. प्रसंगाशिवाय दुस-याच्या वाटेस जाणार नाहींत, अपमान करणार नाहींत किंवा नेभळेपणानें सहनहि करणार नाहींत. असल्या सभ्यपणाचे परिणाम शाळांतून घडतात. तरी ते विशेषकरून गृहशिक्षणापासूनहि होतात. त्याचप्रमाणें कॉलेजचें शिक्षण, तेथील प्रोफेसरांची विद्वत्ता व योग्यता पाहून येथील इंडियन प्रोफेसरशिपची मला फारच लाज वाटली. स्वतःचे बरेच मूळग्रंथ लिहून विषयांच्या ज्ञानांत जास्त भर घातल्याविना प्रोफेसराचें पद मिळत नाहीं. टॉड हंटरनें इतकीं पुस्तकें लिहिलीं तरी तो नुसता फेलोच आहे. क्लासांत रोज लेक्चर देणा-यांचा ट्यूटर्स नांवाचा निराळाच वर्ग असतो. ट्यूटर्सहि फार जाडे विद्वान असतात. प्रोफेसरांचीं व्याख्यानें वर्षांतून फार तर ३।४ होतात आणि तीं वर्षभर केलेल्या अध्ययनांचे दिग्दर्शनेंच असतात. प्रोफेसरांनीं अमुक एक केलें पाहिजे असें कांहीं नियम नसतात. त्यांच्या आवडत्या व्यासंगाला योग्य तो वाव दिला जाण्याची विद्याधिकारी खबरदारी घेतात. आपण शिकत असलेल्या शाळेंतच आपल्या मुलांनीं जावें अशी तेथील आईबापांची इच्छा असते आणि एकदां तो शाळेंत गेला कीं अखेरपर्यंत (सिव्हिल सर्व्हिसपर्यंतहि) तेथेंच त्याचा अभ्यास व्हावा अशी व्यवस्था असते. वरील प्रकारचें शिक्षण शिकण्यांत आपला पुढें चरितार्थ चालावा असा उद्देश तेथें कोणाचा नसतो. त्यामुळें सर्व लक्ष नुसते परीक्षा पास होण्याकडेच नसते. कांहीं दिवस कॉलेजच्या उच्च वातावरणांतच त्यांस अधिक महत्त्व वाटत असते. युनिव्हर्सिटींत असतांना परीक्षेच्या शिक्षणाच्या परिणामापेक्षां मुलांच्या मनावर सहशिक्षणाचा परिणाम होऊन त्यांच्या स्वभावाचा विकास फारच समाधानकारक होतो. क्लब्ज Clubs, Reading Rooms, Play grounds यांतून खेळण्याकडेच अर्ध्यापेक्षां अधिक वेळ जातो. लाखों पुस्तकांच्या जंगी लायब्र-या असतात. हें सर्व पाहून मी इतका स्तिमित झालों कीं आपण दहा वर्षांचा होऊन येथें शिकावयाला राहिलों तर फार बरे होईल असें वाटलें. आमच्याकडे पहावे तर शिक्षणाचा बाजारच भरत आहे. मुलांच्या आवडीकडे दुर्लक्ष्य करून शिक्षण त्यांचे डोक्यांत एकसारखे कोंबले जात आहे. येथील प्रोफेसर्स तेथल्या ट्यूटसर्सची देखील बरोबरी करूं शकत नाहीं. येथील कॉलेजांचा उद्देश हलका, पद्धत दूषित, शिक्षण अपुरे, एककल्ली व नकली!” इत्यादि इत्यादि. भाषण झाल्यानंतर सभेचे अध्यक्ष प्रिन्सिपॉल राजवाडे हे आपल्या अध्यक्षीय भाषणांत घोकंपट्टी व पोकळ ज्ञान याविषयीं म्हणाले कीं, “ज्या अर्थी आम्ही शिकतो हें ज्ञान अगदी नवीन व उसने मागून आणलेलें आहे त्याअर्थी तें आपल्या पदरीं पडलें असें नुसतें वाटायला निदान घोकंपट्टीच पाहिजे. परक्या देशांतील ह्या झाडाची लागवड तूर्त कांहीं दिवस तरी अशा जबरीच्या उपायानेंच एथें करावी लागत आहे हें खरें. पण त्याला उपाय नाहीं. तसेंच तिकडचे प्रोफेसर्स व इकडचे प्रोफेसर्स यांमधील लज्जास्पद अंतर पाहून तर मी खचूनच गेलों. असें वाटते कीं जागेचा (प्रिन्सिपॉल शिपचा) राजीनामा देऊन स्वस्थ बसावे!” तेव्हां गोखले, “छे छे,” असे उद्गारले. त्यावेळीं श्रोतृसमाज मोठ्यानें हसला. स्वतः राजवाडेहि हसूं लागले. शेवटीं समारोपाचे भाषणांनंतर सभा विसर्जन पावली. गोखल्यांच्या भाषणावर मी पुष्कळ विचार केला. त्यांनीं केलेल्या इंग्लंडांतील शिक्षण पद्धतीचें वर्णन पुष्कळच एकतर्फी आहे. खुद्द इंग्लंडांतहि तेथील शिक्षण पद्धतीबद्दल सारखी ओरड आहे. यासाठीं त्यांनीं तिचे कांहीं दोषहि दाखवावयास हवे होते. ती संपूर्णतः निर्दोषी असेल असें मुळींच वाटत नाहीं. हिंदुस्तानाला युरोपांत शिकण्यासारखे अद्यापि पुष्कळच आहे व ते हिंदुस्थान शिकत आहेच. पण स्वतः युरोपलाहि हिंदुस्तानांत शिकण्यासारखे अजूनहि बरेच आहे. तें मात्र स्वतः हिंदुस्तानच पाश्चात्य सुधारणेच्या दडपणाखालीं विसरत चाललेला आहे; मग युरोप कोठून शिकणारॽ

(४) विशाळगडची सफर
सफरीचा बेत     
सन १८९९ च्या उन्हाळ्यांत प्लेगचा कहर पुण्यांत सुरूं झाला. सुटीमुळें मी जमखंडीस आलों होतों. चि. जनाक्का हुजुरपागेच्या शाळेंतून येणार होत्या. अनेक खाजगी गोष्टीनें मन फार उद्विग्न झालें होतें. महाराष्ट्रांतील प्रसिद्ध डोंगरी किल्ले पाहण्याची फार हौस होती. सृष्टीची शोभा पाहणें व ऐतिहासिक दृष्टि हे दोन हेतू होते. मी बरेच किल्ले पाहिले होते. तरी त्यांतल्यात्यांत विशाळगड हा अगदीं एकीकडचा प्रचंड मनोहर किल्ला पाहावयाचे मनांत आले. बरोबर जनाक्काला घेऊन जावयाचा बेत करूं लागलों. कोल्हापूरचे गोविंदराव शासने यांना घेऊन ता. २१ एप्रील १८९९ रोजीं पन्हाळगडाला पोंचलों. चार दिवस पन्हाळा आणि पावनगड पाहिला. वासुदेवराव सुकठनकरांची आईबाप, बहिणभाऊ वगैरे मंडळी पन्हाळ्यास राहात होती. आमचे मित्र चिंतामणराव कुलकर्णी, हर्डीकर, गोविंदरावचे मित्र भाऊसाहेब माने वगैरे मंडळी पन्हाळ्यास आली. सगळे एकत्रच राहात होतो व मजेंत हिंडत होतो.

वाडी रत्नागिरी     
ता. २५ एप्रील रोजीं मंगळवारीं चैत्री पौर्णिमेच्या दिवशीं जवळच्या ज्योतिबाचे डोंगरावर वाडी रत्नागिरीची मोठी यात्रा भरत असे. प्लेगमुळें मोठी यात्रा भरली नव्हती. १२ ज्योतिर्लिंगापैकीं हें एक ठिकाण आहे. आसपासच्या खेड्यांतून ज्योतिबाच्या उंच काठ्या (सासणी) सुमारें २० आल्या होत्या. ह्या काठ्या म्हणजे बांबूचे उंच सोट, कापड अगर चीट गुंडाळलेले व मधोमध तोल राखण्यास दोर लावलेले अशा असतात. खालून ५।६ फूट अंतरावर लाकडी जाड फळी बसवलेली असते. ह्या फळीवर देवाची लहान उत्सवमूर्ती ठेवलेली असते. तरुण उमेदीचे लोक ही फळी काठीसह डोक्यावर घेऊन देवळांस तीन प्रदक्षिणा घालीत असतात. भोंवतीं ७।८ जण दो-यांनीं तोल संभाळतात. वाद्यांच्या गजरांत सर्व बेहोष नाचतात. कितीही तोल संभाळला तरी केव्हां केव्हां काठी माणसावर पडते. देवाला मांसाचा नैवेद्य चालतो. देवाला गुलाल, खारका, खोबरें, यांची मोठी आवड दिसते. मुख्य दैवत ज्योतिबा त्याचे तोंड दक्षिणेस कोल्हापूरकडे आहे. आवारांत तीन उंच शिखरे आहेत. यावरून तीन मुख्य दैवतें येथें दिसतात. एका भागांत महादेवाचें लिंग असून तें स्वयंभू आहे असें म्हणतात. हें ज्योतिबाचे उजवे बाजूस उत्तराभिमुखी आहे. ह्या लिंगाचे उजवे बाजूस पश्चिमामुखी एक देवी उभी आहे. हिचें नांव चोपडाई असून ती ज्योतिबाची आई असें सांगतात. तिसरें दैवत ज्योतिबा अथवा केदारलिंग होय. देऊळ सुंदर, मोठे व मजबूत असून त्यावरील काम सुंदर कोपरेदार आहे. दक्षिणेंतील सौंदत्तीचे यल्लमाचें देऊळ असेंच आहे. मंडपाचे डावे बाजूस तुकाईची मूर्ति आहे. उत्तरेकडे लांब खालच्या बाजूस यमाईची मूर्ति आहे. यमाई ज्योतिबाची बहिण म्हणतात. ती त्यास नवरी पहाण्यास गेली होती. नवरी सांपडली नाहीं म्हणून यमाई बाहेरच राहिली. केदारविजय म्हणून एक पोथी आहे तींत येथील सर्व महात्म्य आहे.

पांडवदरी     
ता. २६ सकाळीं ९ वाजतां दशम्या वगैरे करून घेऊन जनाक्कासह आम्ही सर्व मित्रमंडळी पायीं चालत पांडवदरीस निघालो. ही दरी पन्हाळ्याचे पश्चिमेस पांच मैलांवर आहे. दरम्यान म्हसाईचें मोठे पठार ओलांडावें लागतें. हें पठार बहुतेक पन्हाळ्याइतकेंच उंच असून वर अफाट व सपाट मैदान आहे. पन्हाळ्याचा हंडाबुरुज व हें पठार यांस मध्यें एका उंच पातळ सुळकेदार नैसर्गिक भिंतीनें जोडलें आहे. ही भिंत सुमारें अर्धा मैल लांब असून हिच्या शिरोभागीं दहावीस फूट उंच अणकुचीदार दगड उभे आहेत. ते पांढरे असल्याकारणानें ही भिंत नुकतीच घासलेल्या करवतीप्रमाणें तीक्ष्ण व चमकदार दिसते. या दगडांतून वाघाला राहण्याची चांगली सोय आहे. शिवाय ह्या उंच भिंतीमुळें पन्हाळ्याच्या दक्षिणेस रांगण्यास जावें लागलें तर पावनखिंडींतून वाट आहे. नाहींतर पावनगडास किंवा म्हसाईच्या अवाढव्य पठारांस वळसा घालावा लागतो. म्हणूनच नरवीर बाजी देशपांड्यानें पावनखिंड अडविली होती. अशा मनोहर कड्यास घाटशीळ म्हणतात. पन्हाळा उतरून म्हसाईचे पठारावर चढतांना खंडाळ्यांतील Tiger leap नांवाच्या अतिखोल दरीची आठवण होते. या बाजूवर दाट उंच झाडी आहे. वाटेंत झ-यावर जागजागीं रेडयाची लहान मोठीं पावलें खडकांत खोल रुतलेलीं दिसलीं. महिषासूरमर्दिंनीनें महिषासुरांशीं तुळजापुरापासून लढत येऊन येथें त्याचा वध केला असल्याचें सांगतात. चार मैल चालून गेल्यावर पांडवदरीजवळ म्हसाईचें लहानसें देऊळ लागते. येथें तुंबळ युद्ध झाल्याचे सांगतात. रेड्याची व माणसाची पुष्कळ पावलें वीत वीतभर खोल उमटलीं आहेत. ही देवी नवसास फार पावते. हे नवस म्हणजे “अमक्याने आमचे असे वाईट केले म्हणून म्हसाई तूं त्याचे वाईट कर” असें असतात. येथें नेहमी पशूंचें रक्त सांडलेलें असतें. बारा वाजतां पांडवदरींत उतरलों. तोंच उदास वाटूं लागलें म्हणून जनाक्कानें कांहीं भक्तीपर पदें गायिलीं. पांचाचे सुमारास पन्हाळ्यास परत आलो. या पांचसहा दिवसांचे प्रवासांत आम्हांला रोज निदान १०।१५ मैलांची तरी चाल पडत असे. पन्हाळा व पावनगड हे टुमदार व सुंदर किल्ले असून भोंवतालीं सुंदर वनश्री आहे.

मलकापूर     
ता. २७ एप्रील १८९९ रोजीं संध्याकाळीं ७ वाजतां बैलगाडींतून विशाळगडास निघालों. बरोबर जनाक्का, गोविंदराव शासने, भाऊसाहेब माने, चिंतामणराव कुलकर्णी आणि हर्डीकर इतकी मंडळी होती. रात्रीची वेळ, वाटेंत चोरट्यांची भीति होती म्हणून आम्हीं बराच वेळ गाडीमागून चालत होतों. बांबोड्याचे धर्मशाळेंत दोन तास निजून सकाळीं मलकापुरास ८ वाजतां पोहोंचलों. हा गांव सुमारें तीन चार हजार वस्तीचा असून येथें कोल्हापूरचे पंत प्रतिनिधी श्रीमंत विशाळगडकर यांची राजधानी आहे. हा भाग पन्हाळ्याचे दक्षिणेस २१ मैलांवर आहे.

गजापूरचे रान     
दुसरे दिवशीं मलकापुराहून तिसरे प्रहरीं निघालों. तेथून सारखी चढण लागते. मांजरे गांवाला येईपर्यंत रात्रीचें ११ वाजलें. तेथें जंगलांतच निजून पहाटे तीन वाजतां निघालों. चांदणें पडलें होतें. वाटेनें दाट जंगल लागलें. येथून मात्र पहाटेपर्यंत पारधीचें किर्र जंगल लागलें. दुतर्फा एकमेकांशीं लागलेले गगनचुंबी वृक्ष स्तब्ध तपस्याप्रमाणें उभे होते. त्यावरून दाट रानवेली शेंड्यापासून बुडख्यापर्यंत लोंबत होत्या. वाट चढणीची म्हणून बैल हळू चालले होते. मधून मधून पालवींतून चांदण्याचे ठिपके पडले होते. चहूंकडे इतकी सामसूम होती कीं गाडीच्या चाकाचा आवाज व बैलांच्या गळ्यांतील जंगांचा नाद अरण्यभर गुंगत होता. आमचा गाडीवानही रंगेल गडी होता. “माझ्या चत्तुरा बैला चल. माझ्या पट्टाण्या बैला वड” इत्यादि लके-या मुक्तकंठानें मारूं लागला. त्याचे गंभीर प्रतिध्वनी उमटूं लागले. एकही घातूक जनावर भेटलें नाहीं. आम्हांला वाटलें कीं गाडीवानाच्या ताना ऐकून हिंस्त्र पशुंनाही झोंप लागली असावी. कैद्याप्रमाणें गाडींत बसवेना म्हणून मी खालीं उडी टाकली. कुलकर्णी व हर्डीकरही उतरले. आम्ही उतरूं नये म्हणून जनाक्कानें पुष्कळ आग्रह केला. याच रानांत कोल्हापूरकर व इचलकरंजीकर वाघाची शिकार करतात. इकडून अस्वल येईल काय, तिकडून वाघ येईल काय अशा धास्तींत वाट चालत होतो. पण एका कपिवर्गाशिवाय आमचे कोणीच स्वागत केलें नाहीं. कारण असले अश्रुतपूर्व गाणें-बजावणें ऐकून तटस्थ न होणारा एका चावट माकडाशिवाय दुसरा कोण अरसिक प्राणी आहे! पहाट झाली, आम्हाला अत्यानंद झाला. जंगल संपून उघड्यावर आलों तोंच एक सुंदर स्वच्छ नदी सामोरी आली. ही पहाट मी कधीं विसरणार नाहीं.

विशाळगड     
ता. २९ एप्रील रोजीं सकाळीं गजापुरास पोहोचलों. पुढें गाडीची वाट नाहीं म्हणून ह्या उमद्या गाडीवानाला परत लावले. पेठेपासून पांच पैसे देऊन आमचा बोजा उचलण्यास एक हमाल केला. पेठ नांवाचीच होती. नारळाशिवाय कांहीं सामान मिळालें नाहीं. डोंगर चढलों तरी गड कांहीं दिसेना. शेवटीं अगदीं शिखरावर पोचलें तों एकदम भयंकर खोल खंदक आणि त्यांत बशींत कप ठेवावा असा किल्ला व त्याचे सरळ तुटलेले काळे कडे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. बराच वेळ पहात उभे राहून मग खंदक उतरूं लागलो. आठ वाजतां गडावर पोहोंचलो. हा गड पन्हाळ्याहून सुमारें ४० मैलांवर नैऋत्येस आहे. नांवाप्रमाणें खरोखरीच विशाल आहे. इतर गडाप्रमाणें आसमंतांतील टेकड्यांवरील चौथ-यावर हा आरूढ झाला नसल्यामुळें अगदीं जवळ गेल्याशिवाय गड असा ओळखतच नाहीं. किल्ला पाहण्याचा जर कोणाचा पहिलाच प्रसंग असेल तर त्यांनीं हा किल्ला अवश्य पहावा. मुद्दाम खणून तयार केल्याप्रमाणें दिसणारा अति गंभीर खंदक, त्याचप्रमाणें सरळ उभे असलेले गडाचे कडपे, त्यांना बुरुजाप्रमाणें आधारभूत झालेल्या व टोंकांपासून खंदकांत दूरवर उतरत येणा-या डोंगराच्या तीक्ष्ण धारा, जागजागीं ह्या धारा तुटल्यामुळें कित्येक वर्षे तसेंच खडे राहिलेले, शूर व धिप्पाड
गडक-याप्रमाणें भासणारे, काळे उंच फत्तर हें सर्व निसर्गाचें विराटस्वरूप पाहून प्रेक्षकांस एकामागून एक आश्चर्याचे जबर धक्के बसल्यावांचून राहात नाहीं. गडावर श्रीमंत मलकापूरकरांचा वाडा आहे; त्यांत आम्ही दोन दिवस आनंदांत काढले. भूक इतकी तीव्र लागे कीं एकमेकांस फाडून खाण्याची इच्छा होई.

अंबाघाट     
गेलेल्या वाटेनें परत न येतां पश्चिमेकडे खालीं कोंकणांत उतरलो. कोणी हमाल न मिळाल्यानें सर्व बोजा आम्हीच वाहून घेतला. एकांतांतील कोंकणवस्ति रमणीय दिसली, पण ती पहाण्यास वेळ नव्हता. पुन्हां वर चढून शेवटीं ता. २ मे च्या सुमारास दोनप्रहरीं अंबाघाटावरील आंबेगांवांतील धर्मशाळेंत एक दिवस काढला. कच्च्या फणसाची भाजी अतिशय गोड लागली. भाड्याची दुसरी गाडी करून पन्हाळ्यास परत आलो. हा प्रवास फारच सुखाचा आणि धाडसाचाही झाला.