खडतर पांच वर्षें

प्रकरण ८ वें
(१८८५ – १८९०)
स्वभावदोष
येथपर्यंत आमच्या घरांतील दारिद्र्याच्या मीं आठवणी दिल्या त्या केवळ माझ्या बाबांच्या व विशेषतः आईच्या स्वभावाचें वर्णन करण्यासाठीं दिल्या. त्यांच्या स्वभावांतील दोष दाखविण्यासाठीं नव्हे. ह्या दारिद्र्याचें कारण माझ्या बाबांचा कदाचित् फार तर आळस हा असेल. पण कोणत्याही प्रकारची कोणाची फसवणूक किंवा अप्रामाणिकपणामुळें त्यांच्या उत्पन्नामध्यें आलेला तोटा हें नव्हतें. आतां ह्यापुढेंही कांहीं आठवणी द्यावयाच्या त्यांत बाबांच्या स्वभावांतले कांहीं दोष दिसतील. पण ते त्यांचे दोष नसून-निदान दोष दाखविण्याचा माझा हेतु मुळींच नसून, - माझ्या आईच्या स्वभावांतला दैवी चांगुलपणा दाखविण्यासाठींच मी केवळ त्या आठवणी देत आहें. माझ्या आईच्या सहिष्णुतेची-तिच्या स्वभावाची पारख करण्याकरितां व आम्हां मुलांच्या भावी शिक्षणाकरितां देवानें आम्हांला दारिद्र्य हा मित्र दिला. त्याबद्दल आम्ही त्याचे आभारीच आहोंत. पण त्याही पुढें आम्हां मुलांची नसली तरी आमच्या आईची पारख करण्याकरितां आम्हांवर जे दुर्धर प्रसंग आले, त्याबद्दल काय म्हणावें हें समजत नाहीं. ते प्रसंग म्हणजे माझ्या बाबांला निशा करण्याचें व्यसन लागलें हे होत ! बाबांना प्रथम गांजा ओढण्याचें व नंतर कांहीं दिवसांनीं दारू पिण्याचें व्यसन लागलें ! मी या सर्व काळांत आमचे जे हाल झाले त्याबद्दल माझ्या पूज्य व बाणेदार बाबाला मुळीच दोष देऊं इच्छित नाहीं. 

संस्थानी नोकरी
बाबा त्यांचे लहानपणापासून सुखांतच लाडांत वाढलेले. पैशांचा लोभ त्यांच्यामध्यें मुळींच नव्हता. लोभाचा इतका अभाव कीं त्यामुळें त्यांना पैशांची योग्य किंमतही कळत नव्हती असें म्हटलें तरी चालेल. त्यांचें शिक्षण बैठे आणि पांढरपेशी होतें. ही स्थिती त्यांचे अर्धे वय म्हणजे जवळ जवळ ते चाळीस वर्षांचें होईपर्यंत चालून मग त्यांना दारिद्र्य आल्यानें पुढें त्यांच्या स्वभावांत व धंद्यांत फरक पडणें कठीण झालें. जमखंडीचे यजमानाशीं ते भांडून आपण होऊनच घरीं बसले होते; व त्यावर यजमानांनीं दोन तीनदां बोलाविलें तरी गेले नाहींत. मला समजूं लागल्यावर ते म्हणत असलेले मला आठवतें कीं, आपण कोणता धंदा नोकरीशिवाय केला नाहीं व आतां नोकरीही जमखंडीच्या यजमानाशिवाय दुसरीकडे करावयाची नाहीं, असा माझा निश्चय आहे, आणि हा आग्रह मग तो बरा असो - वाईट असो त्यांनीं सोळा वर्षे चालविला. माझ्या जन्माचे सुमारास म्हणजे इ. सन १८८३ चे सुमारास त्यांनीं नोकरी सोडली. पुढें सोळा वर्षांनीं त्यांचा हा करारी आग्रह पाहून यजमान आप्पासाहेबांनीं आपणच इ. सन १८९० चे सुमारास त्यांना आपले स्टोअर - कीपरचे (हिशेबी) विश्वासाचे काम दिलें. पण दरमहा पगार दहा रुपये होता. १६ वर्षे घरीं अभिमानानें बसलेल्या नोकराला पुन्हा बोलावल्याबद्दल आप्पासाहेबांचे आभार मानायचे कीं इतक्या जुन्या अनुभवी माणसाला इतका लहान पगार दिल्याबद्दल त्यांच्या कंजुषपणाची तारीफ करावयाची हें ठरविणें कठीण. पण कांहीं असो बाबांचा हा पगार व माझी स्कॉलरशिप ह्यावर आमच्या आईनें आमच्या संसाराचें ओझें हाकललें. शिवाय ह्यावेळीं मी इंग्रजी ६ आणि ७ व्या इयत्तेत गेल्यानें मला पुस्तकांचा खर्च येऊं लागला तोही भागला. जमखंडी हायस्कुलांत शाळेची फी सातव्या इयत्तेअखेर दरमहा एकच आणा असल्यानें माझ्या दुय्यम शिक्षणांत खंड पडला नाहीं. ह्या आणीबाणीच्या वेळीं बाबांनाही नोकरी लागली नसती तर मात्र काय झालें असतें ह्याची मला नुसती कल्पनाही होत नाहीं.

व्यसनी विराप्पा
इ. सन १८९० चे सुमारास ही नोकरी लागली पण इ. सन १८८५ सालांत माझा मोठा भाऊ वारल्यापासून ह्या पांच वर्षांत माझ्या आईनें काय दुःख व कष्ट सोशिले तें आमच्या डोळ्यासमोर आहे. कारण नुसतें दारिद्र्यच नव्हे तर बाबांना निशेबाजी लागली ह्याचें तिला फारच दुःख होई. तरुणपणीं बाबांचे हातीं जेव्हां मुबलक पैसा खेळत होता तेव्हां त्यांना नुसते तंबाकुचेंही व्यसन नव्हतें. फार तर काय पानाचा विडाही ते नेहमीं खात नसत. उतारवयांत त्यांना हें गांजाचें व्यसन लागलें ह्याचें कारण त्यांची दारिद्र्य-वेदनामुळें उदासिनता आणि त्यांची किंकर्तव्यता हीच होय बाबांना पुढें पुढें कांहीं सुचेनासें झालें. अशांत त्यांच्या भाविकपणामुळें, ते आल्या गेल्या साधूजवळ, बैराग्याजवळ जाऊन बसूं लागले. अर्थात हे बैरागी म्हणजे निःसंग फिरस्ते, गांजेकसच असणार. त्यांच्या बेजबाबदार व बेपर्वाईच्या गोष्टी ऐकत बसतांना बाबांना आपल्या संसाराच्या वेदनांचा विसर पडत असावा. मग त्यांत गांजाच्या व्यसनाची भर पडण्यास काय उशीरॽ तशांत ज्या दत्त सांप्रदायाच्या ते ह्या वेळीं नादीं लागले होते; त्यांतील बरीच मंडळी आळशी, उनाड व गांजेकस होती; त्यांत विराप्पा नांवाचा एक कोष्टी गृहस्थ होता. तो स्वभावानें फार चांगला होता. तो कांहीं कानडी साधुसंतांची पदें फार रसिक त-हेनें म्हणत असे. पण त्याला गांजाचें व्यसन फार जबर होतें. तो माझ्या बाबांचा मोठा सोबती होता. माझ्या बाबांला व्यसन लागण्याचें हें एक कारण. विराप्पा तर ह्या व्यसनापायींच शेवटीं वारला. हा आपल्या मित्राचा नाश झालेला पाहून
दुस-याच्या संगतीला न लागतां माझे बाबा मात्र शुद्धीवर येऊन निवळले!

बबलादीचे सिद्ध
पण इतक्यांत बाबांना दुसरी वाईट संगत लागली. ती म्हणजे मागें सांगितलेल्या बबलादीच्या लिंगायत साधुंची. बबलादीचे हे सिद्ध पुरुष कानडी प्रांतांतले त्या काळीं बरेच प्रसिद्ध देवर्षि होते. जमखंडीच्या पूर्वेस सुमारें १२ मैलांवर कृष्णानदीचे कांठीं विजापूर जिल्ह्यांत बबलादी एक खेडेगांव आहे. त्या गावीं ह्या सिद्धांचा मठ आहे. चंद्रगिरी नांवाच्या एका देवतेचा ह्या सिद्ध घराण्याच्या मूळ पुरुषाला प्रसाद होता. ते मूळ पुरुष चांगले निःसंग साधू असावेत असे त्यांनीं केलेलीं कांहीं कानडी अनुभवी पदें या सिद्धांच्याबरोबर हिंडणारे अनुयायी म्हणत, यावरून दिसतें. ह्या सिद्धांच्या आशिर्वादानेंच पुनः नोकरी लागली अशी आमच्या बाबांची समजूत होती. बबलादीचा संप्रदाय त्या प्रांतांत तेव्हां वाढत होता. त्यांपैकीं सर्वांत वडील सिद्ध शंकराप्पा, त्यांचे चिरंजीव सदाशिवप्पा, आणि त्यांचे दोन पुतणे गंगाप्पा व शिवरुद्रप्पा असे चौघेजण आळीपाळीने कर्नाटकांत फिरतीवर भिक्षेस निघाले म्हणजे आमचे घरीं येऊन उतरत असत. शिवाय त्यांचे शिष्य पडसलगी नांवाच्या एका खेड्यांत (आईच्या माहेर गांवीं) आलगुरास तवनाप्पा नांवाचे एका पूर्वाश्रमीचें जैन जातीचे सिद्ध होते. ह्यांच्याच मार्फत बाबांचा बबलादीशीं संबंध जडला. हा इ. सन १८८९ सालीं जडला असावा. इ. सन १८९० त नोकरी लागली, हे स्वामी उघड उघड अभेद-मार्गी असत, म्हणजे जातीभेद पाळीत नसत. कोणाची पर्वा करीत नसत व निस्पृह आणि धुंद असत. पण दारू पीत व मांस खात. तुळजापूरची देवी आमची कुळदेवता तिला मांसाचा नैवेद्य जरूर लागतो. तुळजापूरचे भोपे भाऊराव कदम आमचेकडे भिक्षेला आले कीं हा नैवेद्य होत असे. शिवाय एक रामदासी ब्राह्मण संन्यासी येत. ते तर दारू व मांस दोन्हीही घेत. अशा अनेकांच्या संगतींत बाबांना दारूचीही चटक लागली व मांसाचा प्रघात आमचे घरांत पडला असावा. तरी पण आमच्या दारिद्र्यामुळें त्यांचें हें व्यसन अनावर होऊं शकले नाहीं हें एक आमच्या दारिद्र्य मित्राचें आम्हांवर मोठें उपकारच ! स्वभावांतील पालट  प्रथम प्रथम बबदालीच्या सिद्धावर माझीही चांगली श्रद्धा होती. ते घरीं आले कीं त्यांची पूजा आमचे घरीं होत असे. चहुंकडून सर्व जातीचें भक्त येत. स्वामी तुळशी कट्यावर बसत व आम्ही ताटांत कापूर ठेवून आरती म्हणत ओवाळावयाचें व त्यांच्या पायावर फुलें घालावयाचीं हीच काय ती त्यांची साधी पूजा होती. आरती झाल्यावर भक्त लोक दारूच्या बाटल्या त्यांचेपुढें ठेवीत आणि आशीर्वाद मागत. ती दारू सर्वजण पीत. त्यांत मोठा वाटा ह्या सिद्धाचा असे. दारूचा निशेंत सिद्धाच्या तोंडून जीं भविष्यवाक्यें निघत तीं खरी होत अशी भक्तांची समजूत असे. ही आरती करीत असतां मीच ताट ओवाळीत असे. व कानडींतील त्यांच्या संप्रदायाच्या आरत्या व इतरही चांगलीं पदें मी नीट चालीवर म्हणत असे. शाळेंतला माझा चांगला अभ्यास व माझी श्रद्धा व निर्व्याज वर्तन वगैरेमुळें मीही त्या सर्व साधूंना आवडत असे. पण पुढें माझी इंग्रजी हायस्कुलांतील मॅट्रीकची परीक्षा पास होऊन मी कॉलेजांत जाऊन पुणे-मुंबईकडचे मला नवे वळण लागल्यावर त्या प्रांतीं सिद्धापेक्षां लोकांत माझीच प्रसिद्धी होऊं लागली. तेव्हां मात्र ही सिद्ध मंडळी मला पाहून चपापूं लागली. मी मोठा विद्वान होईन हें त्यांचे तोंडचे कानडी भविष्य मी कित्येक वेळां प्रत्यक्ष ऐकलें आहे. हें भविष्य कसेंही ठरलें असो, किंवा हे त्यांच्यावर बसलेल्या श्रद्धेचें फळ असो किंवा नसो मॅट्रिक क्लासमध्यें असतांनाच मला या सिद्धांच्या लीला आवडेनाशा झाल्या. आणि बाबांवरही माझ्या सर्व वर्तनांचा दाब बसून हें बंड आमच्या घरांतून अजिबात बंद झाले. इतकेंच नव्हे तर पुढें नोकरी लागल्यावर बाबांच्या भांबावलेल्या मनाला कांहीं व्यापार मिळाल्यामुळें म्हणा किंवा माझ्यामुळें म्हणा बाबांची निशेबाजी अगदीं बंद झाली ! इ. सन १८९१ चे डिसेंबरांत माझी मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि तेव्हां माझ्यांतच नव्हे तर माझ्या घराण्यांतही मोठाच पालट झाला !