संपादकीय खुलासा

ग्वाल्हेरच्या रिसाल्यांत नौकरी करीत असतां अपघातानें मला दुखापत झाली.  त्यामुळें रजा घेऊन मी गेल्या हिंवाळ्यांत पुण्यास घरीं आलों.  आजारामुळें जरी दुर्बलता होती तरी लिहिण्या-वाचण्याइतकी शक्ति आली पण करमेना म्हणून माझे तीर्थरूप अण्णासाहेब शिंदे यांचे कागदपत्र चाळण्याची परवानगी घेतली.  त्यांत त्यांच्या ''बाळपणाच्या आठवणी'' हें सुंदर लिखाण मला मिळालें.  शिवाय त्यांच्या अनेक रोजनिशा आणि पत्रव्यवहार यांतून त्यांनीं लिहिलेला बराच मजकूर आढळला.

१९३० सालच्या कायदेभंगाच्या मोठ्या चळवळींत तीर्थरूप अण्णासाहेबांनीं स्वतः भाग घेतल्यानें त्यांना ६ महिने सक्त मजूरीची शिक्षा झाली.  ते येरवड्याच्या तुरुंगांत असतांना त्यांना रात्रीं थोडा वेळ मिळे.  तेव्हां स्वतःच्या करमणुकीसाठीं तुरुंगाच्या अधिकार्यांकडून लेखनसाहित्य मागवून या ''आठवणीचा'' बराच भाग त्यांनीं लिहिला होता.  ता. २४ जुलै १९३० ते ता. १४ ऑक्टोबर १९३० रोजीं त्यांची सुटका होईपर्यंत रात्रीच्या एकदोन तासांत त्यांनीं त्या आठवणी लिहिल्या.  रात्रीं विजेचा दिवा उशिरा लागून लवकरच एकदम मालविला जाई, त्यामुळें एकंदर लिखाणाला बराच विस्कळितपणा आला होता.  हें लिखाण पुढें कधीं प्रसिध्द होईल याची अण्णांना कल्पनाही नव्हती.  केवळ आपल्या करमणुकीसाठीं किंवा फार तर आपल्या घराण्यांतील माणसांच्या माहितीसाठी त्यांनीं हा मजकूर लिहिला होता.  तुरुंगांतून सुटका झाल्यावरही त्यांनीं त्यांत भर घातली नाहीं व तिकडे लक्ष दिलें नाहीं.  यावरून त्याचे त्यांना फारसें महत्त्व वाटलें नाहीं हें सिध्द होतें.  पण मी जेव्हां हे लेख वाचूं लागलों तेव्हां वाचकांना हे लेख मनोरंजक व बोधप्रद होतील असें मला कळून आलें.  ह्या खुल्या दिलाच्या कथानकांत वाचकांना एक नवीनच वाङ्मय लालित्य आढळेल, म्हणून ते तसेच धूळ खात ठेवणें मला बरें दिसेना.  ह्या त्यांच्या इतर आठवणीची जुळवा-जुळव करून ती प्रसिध्द करण्याची अण्णांची परवानगी मागितली आणि ती त्यांनीं नाहीं होय म्हणतां दिली.

या आठवणींतील प्रत्येक शब्द अण्णांच्याच लेखणींतून किंवा मुखांतून उतरला आहे.  त्यांच्या कॉलेजांतील शिक्षणाच्या काळापर्यंतचा मजकूर तुरुंगांतच लिहिला गेला आहे.  १८९८ सालापासून ते आपली रोजनिशी लिहूं लागले.  विशेषेंकरून विलायतेंत लिहिलेल्या रोजनिशीची फार मदत झाली आहे.  अण्णांनीं स्वतः लिहिलेलीं पत्रें जरी मिळत नाहींत तरी त्यांना आलेलीं पत्रें नीट सालवार जुळवून ठेवण्यांत आलीं आहेत.  त्यांचाही उपयोग झाला.  याशिवाय इतिहास, भाषाशास्त्र, धर्म आणि तत्त्वज्ञान, सामाजिक सुधारणा आणि लोकशिक्षण इत्यादि गंभीर विषयांवर वर्तमानपत्रें व मासिकें यांतून प्रसिध्द झालेले अण्णांचे मोठमोठे निबंध नीट राखून ठेवण्यांत आलेले आहेत.  पण आतां प्रकृतीच्या अस्वास्थामुळें अण्णांना स्वतः कांहींच करतां येत नाहीं.  कंपवातामुळें दोन्ही हात एकसारखे हालत असल्यानें त्यांना लिहवत नाहीं.  आणि गेल्या जानेवारींत डोळ्यांतील मोतीबिंदू काढल्यानें त्यांची दृष्टि फार अधू झाली आहे, म्हणून त्यांना वाचवत देखील नाहीं.  तशांत गेल्या ४।५ वर्षांपासून त्यांना जडलेला मधुमेहाचा विकार आहेच.  अशा स्थितींत फारशी सुधारणा होण्याची आशा दिसेना म्हणून त्यांच्या आठवणींचा पूर्वार्ध लवकरच प्रसिध्द करण्याची आवश्यकता वाटूं लागली.

१९०३ सालीं विलायतेहून परत येऊन प्रार्थनासमाजाच्या प्रचाराच्या कामाला सुरवात करून अण्णांनीं आपल्या सार्वजनिक आयुष्याला आरंभ केला.  त्यावेळी ते ३० वर्षांचे होते.  यापुढील त्यांच्या सार्वजनिक कामाचें महत्त्व जरी अधिक असलें व ते लिहून प्रसिध्द करण्याचीं साधनें भरपूर असलीं तरी तें लिहिण्याचें काम अंगावर घेऊन करणारा तज्ञ तूर्त तरी, कोणी पुढें येईलसें दिसत नाहीं.  अशा वेळीं माझे वर्गमित्र रा. जयवंतराव जगताप ह्यांनीं हा पूर्वार्ध प्रसिध्द करण्याची सर्व हमी आपल्याकडे घेतल्यामुळें मी त्यांचा फार आभारी आहें.  शिवाय या पूर्वार्धांतील खासगी माहिती अण्णाशिवाय कोणालाही नसल्यानें त्यांची स्मरणशक्ति शाबूत आहे तोंपर्यंतच हें काम उरकून घेणें अत्यंत आवश्यक होते.  ही कृति लोकादरास पात्र होऊन पुढील प्रयत्नास उत्तेजन मिळेल अशी आशा आहे.  माझ्या पूज्य पित्याची अल्पशी सेवा माझ्या हातून घडविलीं याबद्दल मी देवाचा आभारी आहें.

सेकंद लान्सर्स
बडोदें,
ता. १ जून १९४०.

 रविंद्र विठ्ठल शिंदे.
संपादक