महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने थोर समाजसुधारक, विचारवंत व संशोधक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे समग्र साहित्य संपादित करून प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार महर्षी शिंदे यांचे समग्र वाङमय तीन खंडांमध्ये प्रकाशित करावयाचे मंडळाने योजिले आहे. त्यांपैकी पहिल्या खंडात महर्षी शिंदे यांचे अस्पृश्यताविषयक सगळे संशोधन आणि चिंतन, त्याचप्रमाणे त्यांच्या आकलनाला उपयुक्त ठरेल अशा प्रकारची मुलभूत स्वरूपाची संशोधनसामग्री एकत्रिक करण्यात आलेली आहे. महर्षी विठ्ठल शिंदे यांच्या समग्र वाङमयाचा हा पहिला खंड भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न : संशोधन आणि चिंतन या शीर्षकाखाली प्रसिध्द करण्यात येत आहे. त्यांच्या लेखनाचा दुसरा खंड हा वैचारिक लेखनाचा असून तिसऱ्या खंडामध्ये महर्षी शिंदे यांचे आत्मपर स्वरूपाचे समग्र ललित लेखन समाविष्ट करण्यात येणार आहे.
महर्षी शिंदे यांचे सगळे वाङमय उपलब्ध असणे ही महाराष्ट्राची आत्यंतिक निकडीची, सांस्कृतिकदृष्टया महत्त्वाची बाब आहे. महाराष्ट्र आणि भारत यथातथ्य रीतीने सर्वांगीण स्वरूपात समजून घेण्याच्या दृष्टीने महर्षी शिंदे यांचे वाङमय मौलिक स्वरूपाचे आहे, याबाबतीत विचारवंतांचे दुमत होणार नाही. याचे कारण महाराष्ट्राची आणि भारताची सामाजिक पुनर्घटना करण्याचे लोकोत्तर कार्य करणाऱ्या विभूतींपैकी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे एक महान व्यक्तिमत्त्व होते. ही सामाजिक पुनर्घटना न्यायाच्या, समतेच्या व विवेकाच्या पायावर आधारलेली असावी, असा त्यांचा प्रयत्न होता. अन्य सुधारकांपेक्षा महर्षी शिंदे यांचा वेगळेपणा असा, की ते सामाजिक सुधारणा व्हाव्यात एवढेच सांगून थांबणारे नव्हते, तर ह्या सुधारणा प्रत्यक्षात आणण्यासाठी आत्यंतिक तळमळीने कार्य करणारे धडाडीचे कर्ते पुरुषही होते. आपला विचार, उक्ती व कृती यांच्यामध्ये सुसंगती राखण्याचा सच्चेपणा व धडाडीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. म्हणून सुधारकांच्या प्रभावळीतसुध्दा ते आपल्या वेगळेपणाने उठून दिसतात. म्हणूनच त्यांच्या कार्याचे यथायोग्य आकलन होण्याच्या दृष्टीने त्यांचे समग्र साहित्य अभ्यासणे आवश्यक आहे.
सामाजिक पातळीवरील अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला अखिल भारती पातळीवर विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळापासून हात घालणारे; अस्पृश्य, स्त्रिया व शेतकरी या वर्गांच्या सुधारणेसाठी झटणारे, तसेच मुरळी सोडण्यासारख्या दुष्ट सामाजिक रूढी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणारे आणि मौलिक स्वरूपाचे संशोधन व लेखन करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व कसे घडले व त्यांच्या हातून ऐतिहासिक महत्त्वाचे सामाजिक सुधारणाविषयक कार्य कोणत्या प्रकारे घडले, याचा थोडक्यात का होईना परिचय करून घेणे आवश्यक वाटते.
विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म २३ एप्रिल १८७३ रोजी जमखंडी येथे प्रतिष्ठित मराठा कुटुंबात झाला. हल्ली कर्नाटक राज्यात असलेले जमखंडी हे गाव त्या काळी छोटेखानी ब्राह्मणी संस्थान होते. कानडी व मराठी अशा दोन्ही भाषा तिथे बोलल्या जात असत. कर्नाटक व महाराष्ट्र अशा दोन्ही संस्कृतींचा मेळ या गावी होता. लहानपणची श्रीमंती जाऊन त्यांच्या कुटुंबाला पुढे दारिद्रय आले. दारिद्रयाचा अनुभव त्यांच्या मनाच्या घडणीत महत्त्वाचा ठरला असावा. कारण आयुष्यात त्यांनी गरिबांचा, दीनदुबळयांचा व पीडितांचा कैवार घेतला. त्यांचे वडील वारकरी संप्रदायाचे होते. घरातील वारकरी संप्रदायाचे सात्त्वि वातावरण व आईवडिलांच्या शुध्द आचरणाचे संस्कार यातून आपली भावी सामाजिक सुधारणा उदय पावली, असे शिंदे यांना वाटते. ''मी प्रार्थनासमाजात गेल्यामुळे सुधारक झालो नाही, तर आधीच सुधारक होतो, म्हणून प्रार्थनासमाजात गेलो'' असेही त्यांनी म्हणून ठेवले आहे.
शिंदे यांच्या घरातील वातावरण उदारमतवाडी व सुधारकी होते. त्यांच्या घरात पडदा पाळण्याची जुनी रीत पाळली जात नसे, की जातिभेदही पाळला जात नसे. आपल्या घरात जातिभेदाचा संस्कारच कुणाच्या मनावर झाला नसल्यामुळे आधुनिक सुधारकांप्रमाणे जातिभेद सोडण्याचा खटाटोप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. अशा वातावरणात विठ्ठल रामजींच्या मनाची घडण झाली.
१८९१ मध्ये जमखंडी येथून मुंबई विद्यापीठाची मॅट्रिक्युलेशनची परीक्षा चांगल्या तऱ्हेने उत्तीर्ण झाल्यानंतर ते विद्यापीठीय शिक्षणासाठी १८९३ च्या आरंभी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात गेले. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळातच युनिटेरियन या उदारमतवादी धर्ममताचा त्यांना परिचय झाला व त्यासारखीच एकेश्वरवादी धार्मिक तत्त्वप्रणाली असणाऱ्या प्रार्थनासमाजाशी त्यांचा संबंध आला; व ते प्रार्थनासमाजात जाऊ लागले. त्यांचे धर्मविषयक वाचन आस्थेने सुरू झाले. न्या. रानडे, डॉ. भांडारकर, का. बा. मराठे या प्रार्थनासमाजीय ज्येष्ठांची व्याख्याने त्यांना ऐकावयास मिळू लागली. या साऱ्याचा साकल्याने परिणाम होऊन १८९८ मध्ये त्यांनी प्रार्थनासमाजाची रीतसर दीक्षा घेतली. महाराष्ट्रातील प्रार्थनासमाज म्हणजे बंगालमधील राजा राममोहन रॉय यांनी १८३३ मध्ये स्थापन केलेल्या ब्राह्मसमाजाचे भावंडच होय. धर्म ही जीवनातील एक स्वतंत्र बाब नसून सर्व जीवन व्यापून टाकणारी आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे, अशी त्यांची धारणा झाली. भ्रामक धर्मकल्पनेमुळे निर्माण झालेली जीवनातील अनिष्टे नष्ट करण्यासाठी व जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी उन्नत अशा एकेश्वरी धर्माचा आश्रय घेणे व त्याचा समाजाच्या सर्व थरांत प्रसार करणे त्यांना अत्यंत निकडीचे वाटू लागले. ह्या जाणिवेतूनच त्यांनी आपले सर्व आयुष्य उन्नत अशा ब्राह्मधर्माचा प्रसार करण्यासाठी प्रचारक होण्याच्या हेतूने वाहावयाचे ठरविले. त्या हेतूनेच इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथील धर्मशिक्षणासाठी जाण्याचे ठरविले व भारतातील प्रार्थनासमाज व ब्राह्मसमाज यांच्याकडून त्यांची निवडही झाली.
१९०१ ते १९०३ अशी दोन वर्षे विठ्ठल रामजी शिंदे यांनी ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यात व्यतीत केली. या काळात त्यांनी तुलनात्मक धर्मशास्त्र, ख्रिस्ती धर्म, बौध्द धर्म, पाली भाषा, तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. मात्र धर्माचे पुस्तकी शिक्षण घेण्यावरच न थांबता त्यांनी इंग्लंडमधील विविध धर्मसंस्था वेगवेगळया प्रकारची मिशने चालवून परोपकाराची कामे कशी करतात, याचे नीट अवलोकन केले. त्याच वेळी आपण हिंदुस्थानात परत गेल्यानंतर अशाच प्रकारचे कार्य करावे, अशी जाणीव त्यांच्या मनात निर्माण झाली.
१९०३ सालच्या नोव्हेंबरमध्ये ऑक्सफर्ड येथील अभ्यासक्रम संपवून शिंदे भारतात परत आले व मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक (मिशनरी) म्हणून काम करावयास त्यांनी प्रारंभ केला. प्रार्थनासमाजाचे कार्य करीत असताना त्यांना भारतभर प्रवास करावा लागत असे. या काळात, हिंदुस्थानातील विविध प्रांतांतील अस्पृश्यवर्गाची स्थिती किती हलाखीची आहे, स्पृश्यवर्गाकडून त्यांच्यावर किती अनन्वित जुलूम होतो, अस्पृश्यतेच्या दुष्ट रूढीमुळे अवमानित स्वरूपाचे पशुवत जिणे त्यांना कसे जगावे लागते, हे त्यांनी बघितले; व अस्पृश्यवर्गाच्या दुःखाची वेदना त्यांच्या अंतःकरणाला झोंबली. याचा परिणाम म्हणून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि या वर्गाची सुधारणा करण्यासाठी आपण आपले आयुष्य समर्पित करून कार्य करावे, असा दृढ निश्चय त्यांनी प्रबळ आंतरिक प्रेरणेने केला. अस्पृश्यवर्गाची स्थिती व ती सुधारण्याचे उपाय यासंबंधी त्यांनी 'इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशन' पुढे व्याख्यान दिले व त्यानंतर या व्याख्यानाची एक लहानशी इंग्रजी पुस्तिकाही ऑगस्ट १९०६ मध्ये प्रसिध्द केली. याच वेळी त्यांनी अस्पृश्यवर्गाच्या जीवनामध्ये संपूर्ण पालट घडवून आणण्याच्या हेतूने अखिल भारतीय पातळीवर मिशनप्रमाणे कार्य करणारी एक संस्था स्थापन करण्याचा मनोदयही प्रकट केला व प्रत्यक्षात मुंबई येथे १६ ऑक्टोबर १९०६ रोजी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया' या संस्थेची स्थापना केली.
अस्पृश्यतानिवारण कार्याला युगप्रवर्तक प्रारंभ महात्मा जोतीबा फुले यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्याला केला. मात्र समकालीन सुशिक्षित वर्गाच्या साहाय्याच्या अभावी त्यांचा प्रयत्न लवकरच खंडित झाला व विसावे शतक उजाडले. त्या वेळी अस्पृश्यतेसारखी माणुसकीला काळिमा आणणारी रूढी भारतीय समाजामध्ये अस्तित्वात आहे, याची फारशी जाणीवही कोणाला नव्हती. अस्पृश्यवर्गीयांना शिक्षण देण्याचे काहीएक प्रयत्न मुंबई, बडोदा, मद्रास, मंगळूर येथे चालले होते. मात्र त्यांचे स्वरूप स्थानिक होते. सामाजिक पातळीवरील अस्पृश्यतेची जाणीवच कोणाला नव्हती, एवढी ही चाल लोकांच्या अंगवळणी पडली होती व ती स्वाभाविक म्हणून सगळयांनी पत्करली होती. अशा या काळात भारतीय समाजाला कलंकभूत असणारी सामाजिक पातळीवरची अस्पृश्यतेची रूढी नष्ट करण्यासाठी व अस्पृश्यवर्गाची सुधारणा करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी स्थापन केलेली अखिल भारतीय पातळीवर कार्य करणारी मिशनसारखी संस्था म्हणूनच ऐतिहासिकदृष्टया महत्त्वाची ठरते.
एकदा मिशन ही संस्था स्थापन केल्यानंतर शिंदे यांनी तिचे कार्य पश्चिम आणि दक्षिण भारतात झपाटयाने वाढविले. त्यांनी आपल्या कार्याचे स्वरूप द्विविध मानले. एक, शतकानुशतके अस्पृश्य मानले गेल्यामुळे निकृष्टावस्था प्राप्त झालेल्या ह्या समाजाला शिक्षण देऊन, उद्योगाची कौशल्ये शिकवून, त्यांचा स्वाभिमान जागृत करणे व त्यांना उत्तम नागरिक करणे; तर त्यांच्या कार्याचा दुसरा भाग म्हणजे सामाजिक पातळीवरील अस्पृश्यता नष्ट करण्याचा. ही अस्पृश्यता असते कोठे ? तर स्वतःला स्पृश्य म्हणविणाऱ्या लोकांच्या भ्रामक समजुतीमुळे व या समजुतीला रूढ धर्माचे व चालीचे पाठबळ मिळाल्यामुळे ती स्पृश्यवर्गीयांच्या मनात निर्माण झालेली असते. स्पृश्यवर्गीयांच्या मनातील ही अस्पृश्यताविषयक जाणीव नष्ट करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. हे कार्य करण्यासाठी आपल्या जातिनिष्ठ समाजरचनेत ज्याच्या सांगण्यावर स्पृश्य समाजाचा विश्वास बसू शकेल, अशा स्पृश्यवर्गातूनच हे काम करण्यासाठी कर्तबगार मनुष्य अवतरणे आवश्यक होते. ही कामगिरी पार पाडण्याचे इतिहासदत्त कार्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
मिशनच्या स्थापनेनंतर प्रारंभापासूनच शिंदे यांनी या कामाला वेग आणला. मिशनसाठी त्यांना सात आजीव कार्यवाह मिळाले. मुंबई येथे चार शाळा व उद्योगशाळा सुरू केल्या. अस्पृश्यवर्गीय स्त्रियांसाठी निराश्रित सेवासदनाची स्थापना केली. या वर्गातील लोकांसाठी दवाखाना उघडला. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे चालविली. मुंबईबाहेर भावनगर, नागपूर, अकोला, इंदूर, मनमाड, पुणे, इगतपुरी, हुबळी, धारवाड, मद्रास, मंगळूर इत्यादी ठिकाणी, पश्चिम व दक्षिण हिंदुस्थानात मिशनच्या बारा शाखा उघडल्या. १९०९ व १९१२ साली पुण्यास मिशनच्या व्यापक प्रमाणात प्रांतिक परिषदा भरविल्या व १९१८ साली मुंबई येथे भव्य प्रमाणात अस्पृश्यतानिवारक परिषद भरविली.
शिंदे यांनी केलेल्या कार्यामधून अस्पृश्यांसंबंधी करावयाच्या कामाबद्दल त्यांची समज जशी प्रकट होते त्याचप्रमाणे त्यांचे संघटनकौशल्यही दिसून येते. अस्पृश्यवर्गीयांसंबंधी काम करताना त्यांनी आपली राजकीय मते बाजूला ठेवली व ना. गोखले, लो. टिळक, ऍनी बेझंट, लाला लजपतराय, म. गांधी इत्यादी जहाल-मवाळ राजकीय व्यक्तींचे साहाय्य घडले. बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड, इंदूरचे तुकोजीराव होळकर, म्हैसूरचे कांतिरव महाराज यांच्यासारखे संस्थानिक; सर जॉन क्लार्क, सर म्यूर मॅकेंझी, डॉ. मॅन यांसारखे इंग्रज अधिकारी; श्री शिवराम जानबा कांबळे, श्रीपतराव डांगळे, नाथ महाराज यांसारखे अस्पृश्यवर्गातील पुढारी या सर्वांचे सहकार्य मिळविले. अस्पृश्यतानिवारणाचा प्रश्न राष्ट्रीय सभेने हाती घ्यावा, यासाठी त्यांनी सात-आठ वर्षे सातत्याने प्रयत्न केला. अखेरीस १९१७ च्या कलकत्त्याच्या अधिवेशनात डॉ. ऍनी बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर होऊन अस्पृश्यतानिवारण हा राष्ट्रीय सभेच्या कार्याचा एक भाग झाला. महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यतानिवारणाचे कार्य संस्थात्मक प्रयत्नांच्या द्वारा पहिल्यांदाच अखिल भारतीय पातळीवर नेले. यात त्यांची तळमळ, दूरदृष्टी आणि कार्यकुशलता दिसून येते. अस्पृश्यवर्गाच्या उन्नतीचा ध्यास त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत घेतला होता.
अस्पृश्यवर्गाची उन्नती करणे हा असा शिंदे यांच्या जीवनातील कर्तृत्वकाळापासूनचा ध्यास होता, त्याचप्रमाणे अस्पृश्यतेसंबंधी संशोधन करणे, हाही त्यांच्या आस्थेचा एक प्रमुख विषय होता. अस्पृश्यवर्गाची स्थिती सुधारण्यासंबंधी वरच्या वर्गाच्या लोकांनी चालविलेले प्रयत्न त्याचप्रमाणे त्या वर्गातील मंडळींचे स्वतःच्या उध्दाराचे प्रयत्न ध्यानात घेऊन 'इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशन' ने व प्रार्थनासमाजाने एकत्र येऊन त्यांच्यासंबंधी काय करण्याची आवश्यकता आहे यासंबंधी प्रतिपादन करणारा 'इलेव्हेशन ऑफ दि डिप्रेस्ड क्लासेस' हा लेख १९०५ च्या डिसेंबरमध्ये तीन हप्त्यांत 'सुबोधपत्रिके' च्या इंग्रजी बाजूमधून प्रसिध्द केला. भारतामधील विविध प्रांतांतील अस्पृश्यवर्गाची स्थिती, त्यांचे स्वरूप, अस्पृश्यवर्गातील विविध जातींची नावे ह्यासंबंधीचा स्वतःच्या निरीक्षणाच्या आधारे त्यांचा अभ्यास चाललेला होता. त्याला १९०१ मधील सरकारी खानेसुमारीचा आधार देऊन 'ए मिशन ऑप दि डिप्रेस्ड क्लासेस - प्ली' या शीर्षकाचा लेख त्यांनी 'इंडियन सोशन रिफॉर्मर' च्या अंकात तसेच स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपाने ऑगस्ट १९०६ मध्ये प्रसिध्द केला. या लेखामध्ये अस्पृश्यवर्गाच्या सर्वांगीण सुधारणेसाठी व अस्पृश्यतानिवारण्याच्या कार्यासाठी एक देशी मिशन असण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादिली. शिंदे यांचा हा लेख म्हणजे भारतातील अस्पृश्यवर्गासंबंधी लिहिलेला पहिला संशोधनपर लेख म्हणावा लागेल. शिंदे हे आयुष्यभर प्रत्यक्ष अस्पृश्यािनिवारणाचे कार्य करीत होतेच. शिवाय अस्पृश्यता कशी निर्माण झाली, इतिहासकाळापासून तिचे स्वरूप काय होते, याबद्दल यांचे संशोधन व चिंतन चालू होते. त्याविषयी वेळोवेळी ते लेखही लिहीत होते. 'बहिष्कृत भारत' (१९०८), 'अस्पृश्यतानिवारणाचा आधुनिक इतिहास' (१९२२), 'ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग' (१९२८) हे त्यांचे प्रमुख संशोधनपर लेख होत. अस्पृश्यतेसंबंधी समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून लिहिलेला त्यांचा भारतीय अस्पश्यतेचा प्रश्न हा प्रबंध १९३३ साली प्रसिध्द झाला.
महर्षी शिंदे यांच्या समग्र वाङमयाच्या या पहिल्या खंडात त्यांच्या सर्व अस्पृश्यताविषयक लेखनाचा तर समावेश केला आहेच, शिवाय त्यांनी केलेल्या अस्पृश्यतानिवारण कार्यासंबंधी मूलभूत स्वरूपाची संशोधनसामग्री येथे एकत्रित केलेली आहे. या खंडाच्या पहिल्या विभागात महर्षी शिंदे यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा मौलिक स्वरूपाचा भारतातील अस्पृश्यता या विषयावरचा पहिला म्हणता येईल असा प्रबंध समाविष्ट केलेला आहे. ग्रंथाच्या दुसऱ्या भागामध्ये महर्षी शिंदे यांच्या अस्पृश्यताविषयक लेखांचा व व्याख्यानांचा समावेश केलेला आहे. या भागाच्या प्रारंभीच महर्षी शिंदे यांचे १९०५ व १९०९ साली त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेले लेख दिलेले आहेत. इंग्रजी व मराठी अशा लेखांचा येथे एकत्रित स्वरूपात समावेश करण्याच्या पाठीमागे उद्देश असा आहे की महर्षी शिंदे यांनी अस्पृश्यताविषयक लेखनाला, त्यांच्या एतद्विषयक संशोधनाला किती आधीपासून प्रारंभ केला होता, हे वाचकांच्या यथायोग्यपणे ध्यानात यावे. या भागातील अस्पृश्यताविषयक लेखनातून महर्षी शिंदे यांच्या अंतःकरणात अस्पृश्यवर्गाबद्दल किती अपरंपार प्रेम होते, कळकळ होती व या वर्गाच्या प्रश्नांबाबत त्यांची वैचारिकता कशी मूलभूत स्वरूपाची होती, याचा प्रत्यय येऊ शकेल.
प्रस्तुत ग्रंथाच्या तिसऱ्या विभागामध्ये काही महत्त्वपूर्ण परिशिष्टे देण्यात आलेली आहेत. ह्या परिशिष्टांवरून, 'सुबोधपत्रिके'तील स्फुट लेखांवरून अस्पृश्यताविषयक प्रश्नांची समकालीनांची समज व मानसिकता कोणत्या प्रकारची होती, हे आपल्या ध्यानात येऊ शकते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये दुरावा निर्माण होण्याचे एक कारण म्हणजे अस्पृश्यवर्गाचे निवडणुकीतील प्रतिनिधित्व कोणत्या प्रकारचे असावे याबद्दल त्यांच्या भूमिकांबद्दलचे समज-गैरसमज होत. महर्षी शिंदे यांच्याबद्दलची या संदर्भातील भूमिका त्यांच्या साऊथबरो कमिशनपुढील साक्षींचे नाव घेऊन अनेकजणांनी सांगितल्याचे दिसून येते. प्रस्तुत ग्रंथात साऊथबरो कमिशनपुढील महर्षी शिंदे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचया साक्षी जशाच्या तश उध्दृत केल्या आहेत. त्यावरून महर्षी शिंदे यांच्यावर त्या काळामध्ये केली गेलेली टीका कशी अनाठायी होती व नंतर टिकवून धरून वाढीस लावलेला महर्षी शिंदे यांच्याबद्दलचा गैरसमज कसा विपर्यस्त होता, हे वाचकांच्या व अभ्यासकांच्या ध्यानात येऊ शकेल. अस्पृश्यवर्गाबद्दल आंतरिक कळकळ असणाऱ्या या दोन्ही विभूतींच्या भूमिकेत मूलभूत विरोध तर नाहीच, उलट सारखेपणा आहे, असेच ध्यानात येईल. या दोघांच्या साक्षींच्या जोडीनेच तुलना करण्यासाठी बहुजन समाजाचे एक पुढारी श्री. भास्करराव जाधव व अस्पृश्यवर्गाचे पुढारी श्री. गणेश आकाजी गवई या दोघांच्या साक्षी तेथेच समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
ब्राह्मसमाजाने केलेले अस्पृश्यतानिवारणाचे कार्य ज्या एका इंग्रजी पुस्तिकेत नमूद केलेले आहे, ती पुस्तिकाही येथे समाविष्ट केलेली आहे. या पुस्तिकेत नमूद केल्यावरून महर्षी शिंदे यांच्या कार्याचा वेगळेपणा व भरीवपणा ध्यानात येऊ शकतो. महर्षी शिंदे यांचे मिशनच्या प्रारंभिक कामातील एक सहकारी व त्याचप्रमाणे अस्पृश्यवर्गाच्या कार्यातील म. गांधींचे निष्ठावंत सहकारी श्री. ठक्करबाप्पा यांचा महर्षी शिंदे यांच्यावरचा इंग्रजीतील मृत्युलेख समाविष्ट करण्यात आलेला आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांना आपण चार गुरूंपैकी एक व आपल्या जन्मदात्यानंतर त्यांनाच आपण मानतो; त्यांच्या पायाशीच आपण सार्वजनिक कार्याचे धडे घेतले आहेत, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे, की 'ही गोष्ट सर्वज्ञात आहे की मुंबई प्रांताकडील अस्पृश्यवर्गाच्या सुधारणेचे ते जनक होत. पंजाब व उत्तरप्रदेश सोडला तर सर्व भारतातील या प्रकारच्या कार्याला प्रारंभ करणारे ते पहिले पुरुष व या कार्याचे अग्रदूत होते.' ठक्करबाप्पा यांच्यासारख्या अस्पृश्यतानिवारणाच्या कार्याला वाहिलेल्या निष्ठावंत समकालीन पुरुषाने महर्षी शिंदे यांच्या योग्यतेचे यथायोग्य आकलन व मूल्यमापन केले, असे म्हणावे लागेल.
प्रस्तुत खंडाच्या चौथ्या भागात दोन अहवाल समाविष्ट केले आहेत. त्यावरून १९०६ ते १९१२ या पहिल्या सहा वर्षाच्या मिशनच्या कार्याचा वृत्तान्त साधार व विश्वसनीयपणे समजू शकतो. १९१२ साली महर्षी शिंदे यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये मिशनची म्हणजे 'भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळी'ची महाराष्ट्र परिषद भरविलेली होती. तिचा साद्यंत अहवाल परिषदेनंतर प्रकाशित करण्यात आला.
प्रस्तुत अहवाल म्हणजे अस्पृश्यतानिवारण कार्याचा व महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचाही महत्त्वपूर्ण दस्तऐवज म्हणावा लागेल. मिशनच्या स्थापनेला सहा वर्षे झाल्यानंतर मिशनच्या महाराष्ट्रातील हितचिंतकांची ही व्यापक परिषद विठ्ठल रामजी शिंदे यांनी आपल्या सहाकाऱ्यांच्या सहकार्याने ऑक्टोबर १९१२ मध्ये सर रामकृष्णपंत भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजच्या ऍम्फी थिएटरमध्ये भरविली. अस्पृश्यतानिवारण कार्याबद्दल व अस्पृश्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करण्याच्या हेतूने भरविलेल्या या परिषदेची अनेकविध मौलिक वैशिष्टये होती. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्पृश्यवर्गातील सर्व जातींचे प्रतिनिधी तसेच या कार्याबद्दल आस्था असणारी समाजातील कर्ती मंडळी परिषदेला निमंत्रित करण्यात आली होती. या परिषदेचे आयोजन करण्यासाठी स्वागतसमितीने किती अपार कष्ट घेतले व विठ्ठल रामजी शिंदे यांनी किती दूरदृष्टी दाखविली, हे संपूर्ण अहवालावरून दिसून येते. अस्पृश्यवर्गासंबंधी करावयाच्या विविध कार्यासंबंधी समाजातील पुढाऱ्यांनी विद्वत्तापूर्ण व सुधारणेची दिशा दाखविणारी भाषणे केली. अस्पृश्यवर्गातील महार, मांग, भंगी इत्यादी विविध जातींतील पुढाऱ्यांनी आपापल्या जातीचे विशिष्टत्वाने प्रश्न मांडले. सातारा येथील मांग जातीच्या लोकांना जन्मजात गुन्हेगार समजून दैनंदिन हजेरीची कशी सक्ती आहे, हे श्रीपतराव चांदणे यांनी आपल्या निबंधातून मांडले, तर पुण्याच्या नाथा महाराज मेहतर यांनी पुण्याच्या ड्रेनेजचे काम सुरू झाल्याने आपल्या पोटावर पाय येईल, असे सांगून परिस्थितीचा दारुण दैवदुर्विलास लोकांपुढे मांडला. अशा प्रकारे तीन दिवस अस्पृश्यताविषयक प्रश्नांचा मूलभूत स्वरूपाचा तसेच व्यावहारिक पातळीवरून विचार झाला.
परिषदेसाठी सर्व जातींची मिळून दोनशेसाठी पाहुणेमंडळी बाहेरगावावरून आलेली होती. अस्पृश्य मानल्या गेलेल्या वर्गातील चारशे व स्पृश्यवर्गातील पन्नास मंडळींचे मिळून सहभोजनही झाले. स्त्रियांच्याही स्वतंत्र सभा झाल्या. श्री. महाभागवत (भावी शंकराचार्य), प्रोफेसर लक्ष्मणशास्त्री लेले यांच्यासारख्या जुन्या परंपरेतील मंडळींनीही परिषदेत भाग घेतला. अशा तऱ्हेने ही अत्यंत आदर्श स्वरूपाची नमुदेदान परिषद झाली. महर्षी शिंदे यांना तर या परिषदेमुळे पुणे या सनातन शहराचे अंतःकपाट उघडल्यासारखे वाटले. अशा या परिषदेचा साद्यंत वृत्तान्त हा केवळ अस्पृश्यतानिवारण कार्याचाच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा महत्त्वपूर्ण इतिहास होय.
एकंदरीत महर्षी शिंदे यांच्या अस्पृश्यताविषयक सगळया लेखनाच्या बरोबरच अस्पृश्यताविषयक प्रश्नांची सर्वांगीण माहिती व्हावी, अभ्यासकांना व संशोधकांना या प्रश्नाच्या आकलनासाठी व पुढील संशोधनासाठी मूलभूत स्वरूपाची सामग्री उपलब्ध करून द्यावी, हाही उदृदेश या खंडातील सगळे लेखन एकत्रित करण्यामागे आहे.
'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'चे विद्यामान अध्यक्ष श्री. मधु मंगेश कर्णिक यांनी तसेच पूर्वाध्यक्ष प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी महर्षी शिंदे यांच्या समग्र वाङमयाचे संपादन करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली, याबद्दल साहित्य संस्कृती मंडळाच्या या दोन्ही अध्यक्षांचा तसेच मंडळाचा मी अत्यंत ॠणी आहे.
गो. मा. पवार
संपादक