प्रकरण २४ वें
बी. ए. मध्यें माझे ऐच्छिक विषय इतिहास आणि कायदा हे होते. माझा विशेष कल तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाकडे असतांना लॉजिक आणि मॉरल फिलासफी, न्यायशास्त्र आणि नीतिशास्त्र हे विषय न घेतां, मी इतिहास आणि कायदा हे विषय घेतले ह्याचें कारण बी. ए. च्या कायद्याच्या पेपरमध्यें शेंकडा ६० वर मार्क मिळाल्यास फर्स्ट एल्. एल्. बी. ची परीक्षा झाली असें गणण्यांत येत होतें. म्हणून मीं या सवलतीचा फायदा घेण्यासाठीं ही निवड केली. दुसरें कारण असें कीं, माझें शिक्षण पुरें झाल्यावर कुठल्याही सरकारी नोकरींत अडकवून घेण्यापेक्षां सार्वजनिक कार्यांत पडण्याचा इरादा होता. त्यासाठीं स्वतंत्रपणें वकिली करणें भाग होतें. त्याशिवाय भावी आयुष्यांत माझा इतिहासाकडेच कल असल्याचें पुढें आढळून आलें. विचारांच्या दोन पद्धति आहेत. एक तत्त्वज्ञानाची मोघम पद्धत; तींत ज्ञात कारणावरून अज्ञात कार्याकडे जाणें आणि दुसरी ऐतिहासिक पद्धत; त्यांत ज्ञात कार्यावरून अज्ञात कारणांचा शोध करीत जाणें. दुसरी पद्धत नवी असून अधिक परिणामकारी म्हणून मला तीच जास्त पसंत पडली. पण ही पसंती पुढील शिक्षणाचे काळांत झाली.
डेक्कन कॉलेज
कायदा ह्या विषयावरील व्याख्यानें त्यावेळीं डेक्कन कॉलेजांत होत होतीं. त्यासाठीं आम्हांला फर्ग्युसन कॉलेजांतून डेक्कन कॉलेजांत जावें लागे. त्यावेळीं जनुभाऊ करंदीकर, माधव नारायण हुल्याळ इतकी मंडळी जमखंडीकरांचे शनवारांतल्या वाड्यांत राहात होती. तेथून फर्ग्युसन कॉलेजांत जाऊन तेथून डेक्कन कॉलेजांत आठवड्यांतून दोनदां पायीं चालत जावे लागे. टांग्याचें भाडें जबर पडत असल्यानें आणि त्यावेळीं पुण्यांत सायकलचा सुळसुळाट झाला नसल्यानें मला पावसांत भिजत, उन्हाळ्यांत शिजत एवढा मोठा पल्ला गांठावा लागे. पण त्याचें मला कांहीं वाटत नसे. संगमावरून होडी चालू असे. तींत बसून शेतावरून डेक्कन कॉलेजला जाण्यास एक जवळची वाट होती. एकदां असें झालें कीं कॉलेजवरून परत येण्यास रात्र पडली आणि होडी बंद झाली होती. मी एकटाच होतों. अंगावरचे सारे कपडे डोक्याला गुंडाळून मी पोहत संगमावर आलों. याचें माझे मित्रांना फार आश्चर्य वाटलें. पावसाळ्यांत नदीला पूर आल्यावर फर्ग्युसन कॉलेजपासून होळकर ब्रिजवरून डेक्कन कॉलेजांत जाऊन, परत येते वेळीं बंडगार्डनवरून यावें लागे.
निकाल
१८९७ सालीं पुण्यास प्रथम प्लेगचा कहर सुरूं झाला त्यावेळीं शाळा कॉलेजें बंद झाल्यानें, माझ्या घरच्या मंडळींना घेऊन जमखंडीस जावें लागलें. या सुमारास मुंबईस हिंदुमुसलमानांचा दंगा सुरूं झाल्यानें पुण्यास सार्वजनिक गणपतीचा उत्सव लो. टिळकांनीं राष्ट्रीय पायावर सुरूं केला. पहिल्या उत्सवाचे वेळीं पुण्यालाही हिंदुमुसलमानांचा दंगा झाला. दंगे, उत्सव प्लेग आणि प्लेगमधील अधिका-यांचे खून अशा अनेक धामधुमींत आमच्या अभ्यासाची फार आबाळ झाली. मी व माझे बरेच मित्र १८९७ सालीं बी. ए. परीक्षेंत नापास झालों. पुन्हा १८९८ सालीं माझी बी. ए. ची परीक्षां एकदाची पास झाली आणि कायद्याच्या पेपर्समध्यें फर्स्ट क्लासचे मार्क पडून फर्स्ट एल्. एल्. बी. ही परीक्षाही पास झाली.
पिळवणूक
अलिकडच्या युनिव्हर्सिटींतील परीक्षेच्या चढाओढीच्या पद्धतीचा मला पूर्ण तिटकारा आला होता. अशा पद्धतीनें जे स्कॉलर ठरतात ते पुढील आयुष्यक्रमांत मोठ्या विद्वत्तेचीं कामें कां करीत नाहींतॽ याचें कारण ऐन तारुण्यांत त्यांची अनैसर्गिक पिळवणूक व खच्ची होते. नुसत्या शर्यतीनें कोण विद्वान होईल! विद्वत्ता हा नैसर्गिक विकास आहे. शर्यतीचे घोडे आणि औताचे घोडे यांची तुलना केली तर अश्वशक्ति (Horse Power) कोणाची व कां जास्त असतें हें कळून येईल. युरोपांतल्या नाणावलेल्या ऑक्सफर्ड व केंब्रिजसारख्या जुन्या विश्वविद्यालयांतून या चढाओढीची पद्धत हिंदुस्थानइतकी हानिकारक दिसून येत नाहीं. हें जरी विलायतेंत गेल्यावर मला दिसून आलें, तरी ही पद्धत अनिष्ट आहे हें कळून येण्यासाठीं मला विलायतेला जाण्याची जरूर नव्हती. तिचे अनिष्ट परिणाम मी स्वदेशींच भोगले होते. माझा बी. ए. परीक्षेंतील शेवटचा पेपर संपल्यावर मी युनिव्हर्सिटीसमोरील पटांगणाचे भिंतीवर बसून राजाबाई टॉवरकडे तोंड करून मनापासून शिव्यांची लाखोली वाहिली. हा टॉवर म्हणजे मला प्राचीन बाबीलोनीया शहरांतील बॉल मरढॉक नांवाच्या उग्र देवतेचा पुतळाच भासला. त्या पुतळ्याच्या हातांत एक तापलेला लाल तवा असून गांवांतील मातांनीं आपल्या प्रथम जन्मलेल्या मुलांस त्यांत टाकून आहूती देण्याची चाल होती. तशीच चाल ह्या युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत खाईंत आपल्या पोटच्या पोरांस होरपळून काढण्याची आहे. यापुढें दोन वर्षे मी सेकंड एल्. एल्. बी. चा अभ्यास केला. श्रीमंत सयाजीराव महाराजांनी दयाळूपणे आपली स्कॉलरशिप सुरूं केली होती. पण खरे पाहतां माझें लक्ष अभ्यासाकडे मुळींच नव्हतें. ह्याला घरगुती कारणें आणि बाहेर प्लेगसारखी व्याधि तर होतीच; पण खरीं कारणें काय होतीं तें पुढें पाहूं, आणि त्यामुळें माझ्या शिक्षणांतच नव्हे तर भावी आयुःक्रमांत मोठी क्रांति घडून आली.
प्रो. मॅक्समुल्लर
ठराविक अभ्यासक्रमाची मला जरी शिसारी आली होती तरी मनांतील विचारविकासाच्या चक्रांची गति मुळींच मंदावली नाहीं. मिल्ल, स्पेन्सरच्या विचारामुळें जो बंडखोरपणा माझ्या मनांत व भोंवताली माजला होता त्यांत माझ्या आत्म्याची भूक शमवण्याची शक्ति नव्हती. नास्तिकपणाच्या वाळवंटांत मनाची तहान भागणें शक्य नव्हतें. अशा क्रांतीच्या वेळीं ज्या एका नवीन तत्वज्ञान पद्धतीची व तत्ववेत्त्याची गांठ पडली तो प्रो. मॅक्समुल्लर होय. धर्मावरील त्याची विस्तृत व्याख्यानें, भाषाशास्त्राचें अलोट ज्ञान, पौरस्त्य विचाराबद्दल त्याचीं समतोल वृत्ति आणि संस्कृत भाषेबद्दलची गाढ सहानुभूति इत्यादि गुणांनीं तो मला एक नवीनच आप्तपुरुष भासूं लागला.
रा. कळसकर
ता. १२ मे १८९८ रोजीं आमच्या बि-हाडीं बारामतीचे रा. रा. कळसकर बारामतीच्या महाराष्ट्र व्हिलेज एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक आले होते. त्यांचे साहस, उद्योग व स्वार्थत्याग हे मी ऐकूनच होतों. त्यांचें स्वतः भाषण ऐकून तर ह्यांनीं महार-मांग या खालावलेल्या जातींविषयीं किती कळकळ दाखविली, त्यांनीं काय काय केलें व आणखी किती करण्यासारखें आहे; हें सर्व मनांत येऊन मला स्वतःची मनःपूर्वक लाज वाटून तिटकारा आला. ता. २९ मे १८९८ रविवारीं सकाळीं आठ वाजतां रा. कळसकर, हुल्याळ व मी पुण्याच्या प्रार्थना समाजांतील उपासना पाहण्यास गेलों होतों. पुण्यांतल्या मंदिरांतली उपासना आजच प्रथम पाहिली, गेल्या डिसेंबरांत मुंबईच्या प्रार्थना समाजांतील उपासना पाहून मला तितकेसें बरें वाटलें नाहीं. उलट किंचित् दुराग्रह झाला होता.
प्रार्थना समाज
मंदिरांतील उपासना पाहून माझ्या मनांत मोठा पूज्यभाव उत्पन्न झाला. ह्याचें एक कारण हें कीं मुंबईच्यापेक्षां हें मंदीर फारच साधें आहे. दुसरें कारण असें कीं माझें मुंबईला प्रथमच जाणें असल्यानें तेथल्या उपासनेंत ख्रिश्चन चर्चमधल्या Prayer चा भास दिसला. माझ्यासारख्या गांवढळास नव्यानें दीक्षा घ्यावयाची असल्यास माझी खात्री आहे कीं तो मुंबईच्या भपकेदार देवळांत कधींच ती घेणार नाहीं. पुणें येथील उपासनेचे चालक सातारचे सबजज्ज रा. ब. काशीनाथ बळवंत मराठे हे होते. त्यांची प्रार्थना व व्याख्यान ह्यांनीं माझें मन फार वेधलें. ह्यावेळीं माझें मन श्रद्धेनें फार पवित्र झालें होतें. मीही सर्वांबरोबर प्रार्थनेचीं पदें अनन्यभावानें गायिलीं. येथेंही हिंदुधर्माचे निर्मळ स्वरुप दिसलें. प्रपंच साधून परमार्थ कसा करावा ह्याची रा. ब. मराठे यांनीं चित्तवेधक रितीनें फोड केली. माझी बहीण चि. जनाक्का आपल्या मैत्रिणींबरोबर प्रार्थनेसाठीं हुजुरपागेंतून आली होती. तिलाही ही उपासना फार आवडली. तिला दर रविवारीं उपासनेस जावेसें वाटलें. मलाही तसेंच वाटलें. दोन्ही भावंडांचा हा स्वतंत्र झालेला निश्चय पाहून तो अधिकच दुणावला. येणेंप्रमाणें ज्या प्रार्थना समाजाला अजाणपणें प्रथम हेटाळलें त्याकडेच लक्ष वेधलें गेलें. याप्रमाणें माझ्या अभ्यासांत बरेवाईट व्यत्यय येऊन माझी अभ्यासूवृत्ति सुटत चालली. रा. कळसकर यांचे खेड्यांतील समाजाच्या शिक्षणाचे प्रयत्न पाहून तसेंच आपण कांहींतरी करावें याविषयीं आमच्या मंडळांत चर्चा सुरूं झाली. मी, रा. हुल्याळ, शासने, कानिटकर वगैरे तासचे तास बसून वाटाघाट करूं लागलों. याबरोबरच प्रार्थना समाजाशीं माझा निकटचा संबंध येऊं लागला. समाजाच्या एका उत्सवास मी रोज जाऊं लागलों. रा. रा. गणपत भास्कर कोटकर नांवाचे एक वृद्ध पेन्शनर गृहस्थ यांचा माझा दाट परिचय घडूं लागला. त्यांच्या उपासना फार प्रेमळ असून गहिंवर आणणा-या असत. मधून मधून समाजाचे प्रचारक रा. शिवरामपंत गोखले हेही मला आपले अनुभव सांगत. त्यांच्या साधेपणाची छाप चांगली बसे. समाजाचे सेक्रेटरी रा. केशवराव गोडबोले यांचा नियमितपणा व निष्ठावंत कार्यतत्परता यांचा फार परिणाम होई. न्या. मू. रानडे आणि सर्वांत अधिक उठावदार म्हणजे परमपूज्य गुरुवर्य डॉ. भांडारकर यांचाही थोडाफार समागम घडूं लागला. समाजांत गाण्याचा पुढाकार घेणारे वृद्ध पेन्शनर गणपतराव आंजर्लेकर यांची संगत घडूं लागली. या सर्व वृद्ध मंडळीनें मला भारून टाकून माझ्या तारुण्याचा आडमूठेपणा, विचारांचा उच्छृंखलपणा व अनुभवांचा हिरवटपणा या भोव-यांतून माझी सुटका करून शुद्ध उदार धर्माच्या शांत प्रवाहांत मला आणून सोडलें.
परिचय
उत्सवांत शेवटीं प्रीतिभोजन होत असते. ते एका वर्षीं गणपतराव कोटकरांच्या राहत्या घरांत झालें. गव्हर्नरच्या बंगल्याच्या उत्तरेकडील बोटॅनिकल गार्डनजवळ शांतीकुटीर नांवाची रा. कोटकरांची साधी झोपडी आहे, तींत हें प्रीतिभोजन घडलें. मी अद्याप सभासद झालों नसतांही मला बोलावणें आलें. ह्या भोजनांत पुणें समाजांतील सर्व वृद्ध मंडळी व मुंबई समाजांतील तरुण मंडळी एकत्र जमली होती. फराळ, भजन, प्रार्थना, उपदेश, भोजन, संभाषण आणि सहल वगैरे प्रकार दिवसभर झाले. हें प्रत्यक्ष दृष्य अनुभवून समाज म्हणजे नुसती एक रविवारची सभा नसून देवाच्या कन्यापुत्रांचें एक शुद्ध कुटुंब आहे हें माझ्या प्रचीतीस आलें. समाजाविषयीं सर्व संशय व तेढ दूर झाली, विशेषतः गणपतराव कोटकर आणि सातारच्या समाजाचे श्री. सितारामपंत जव्हेरे यांच्या समागमांत समाजाचा इतिहास व तत्त्वांचा परिचय घडला.
सभासद दीक्षा
समाजाच्या पुस्तकालयांतून ब्राह्मसमाजांतील कांहीं ग्रंथ वाचावयाला मिळाले. त्यांत विशेषतः प्रतापचंद्र मुझुमदार यांनीं सुंदर इंग्रजींत लिहिलेलें केशव चंद्रसेन यांचे चरित्र वाचून माझी चित्तवृत्ति भडकून गेली. त्यांतलें विशेष प्रकरण Baptism of Fire (अग्नि स्नान) हें वाचून तर प्रार्थना समाजाचा नुसता सभासद न होतां, आजन्म वाहून घेतलेला प्रचारक कसा होईन याची दुर्दम्य तृष्णा लागून राहिली. रात्रंदिवस तेच तेच विचार, त्याच त्याच तरुण आणि वृद्ध मंडळींच्या गांठीभेटी घडल्यानें समाजाशिवाय कांहीं दिसेनासें झालें. डेक्कन कॉलेजांत बी. ए. च्या वर्गांत असलेले श्री. नानालाल दलपतराम कवि (हल्लींचे गुजराथचे कविवर्य), न्यू इंग्लिश स्कूलचे मारवाडी जातीचे एक पदवीधर तरुण शिक्षक श्री. मोतीबुलासा, डॉ. भांडारकरांचे कनिष्ठ चिरंजीव देवदत्त रामकृष्ण भांडारकर, डॉ. वासुदेव अनंत सुकथनकर, श्रीयुत लक्ष्मणराव ठोसर वगैरे तरुण मंडळी समाजांत आडवारी वरचेवर जमूं लागली. त्यांतच कोटकरासारखी वृद्ध मंडळी मिळून मिसळून वागूं लागली. परिणाम हा घडला कीं ही सर्व मंडळी समाजाची रीतसर दीक्षा घेऊन सभासद झाली. मीही यांपैकींच होतों.
पहिली उपासना
१८९८ सालीं बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १८९९ व १९०० हीं दोन वर्षे मला सेकंड एल्एल्. बी. च्या टर्म्स भरण्यासाठीं मुंबईस रहावें लागलें. त्यावेळीं मी मुंबई समाजांत दर रविवारीं जाऊं लागलों. तेथें रा. द्वारकानाथ गोविंद वैद्य, रा. वामन सदाशिव सोहोनी, रा. बा. बा. कोरगांवकर ह्यांचा परिचय झाला. त्यांपैकीं कोरगांवकर हे पोक्त असून वैद्य व सोहोनी हे तरुण होते. कोरगांवकरांचे घरीं माझे विशेष जाणेंयेणें होतें. प्रथम प्रथम पुणें समाजाच्या व्यासपीठावरून आणि नंतर मुंबईच्या व्यसपीठावरून उपासना व उपदेश करण्याची मला पाळी येई. पुण्याच्या व्यासपीठावरून मीं प्रथम उपासना चालवली त्यावेळीं उपदेशाकरितां “धाई अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें” हा तुकारामाचा अभंग घेतला होता. डॉ. भांडारकर, रा. ब. का. ब. मराठे, केशवराव गोडबोले, शिवरामपंत गोखले इत्यादि वडील मंडळी उपासनेस हजर होती. माझा पहिलाच प्रसंग असून उपदेश फार चांगला वठला म्हणून डॉ. भांडारकरांनीं जवळ येऊन माझी पाठ थोपटली व सहृदय अभिनंदन केलें. हें वर्तमान मुंबईस कळल्यावर तेथूनही मला उपासनेच्या पाळ्या येऊं लागल्या. सुटीमध्यें जमखंडीस आल्यावर मी आमच्या घरीं दर रविवारीं सकाळीं मोठ्या थाटानें उपासना करूं लागलों. त्यावेळीं घरचीच मंडळीं नव्हे तर बाहेरील मंडळीसुद्धां जमूं लागली. मी प्रार्थना समाजाचा सभासद झालों हें माझ्या आईबाबांना फार आवडलें. हें पाहून मलाही बरें वाटलें. प्रार्थना समाज म्हणजे बाबांच्या भागवतधर्माचीच एक सुधारून वाढवलेली आवृत्ति असें त्यांना वाटूं लागलें. कारण तुकाराम, एकनाथ, रामदास ह्यांच्या अभंगाची निरूपणें उपदेशाचे वेळीं होत असल्यानें वरील गोष्टींची साक्ष पटत होती. त्यामुळें बाहेरून येणा-या मंडळींनाही हा प्रकार विशेष असा वाटला नाहीं. माझे मित्र मीरासाहेब हथरुट या मुसलमान गृहस्थास व लिंगायत, ब्राहृमण इत्यादि जुन्या मित्रांस ह्या प्रकारचें कौतुकच वाटलें.
रा. सुकथनकर
मी इंटरच्या वर्गांत असताना कोल्हापूरचे वासुदेव अनंत सुकथनकर नांवाच्या एका गरीब सालस विद्यार्थ्याची गांठ पडली. सदाशिव पेठेंत आम्ही पालकर यांचे वाड्यांत असतांना ते आमच्याच जागीं राहूं लागले. ह्यांच्याशीं फारच मैत्री जमल्यावर पुढें हेही माझ्याबरोबर प्रार्थना समाजांत जाऊं येऊं लागून शेवटीं सभासदही झाले. सन १८९५ सालीं पुण्यांस काँग्रेस भरली त्यावेळीं अमेरिकेंतील डॉ. जे. टी. संडरलंड ह्यांची पुण्यास व्याख्यानें झालीं असा वर उल्लेख आहे. अमेरिकेंतील युनिटेरियन समाजाकडून प्रतिनिधी म्हणून युरोप-अमेरिका येथील उदारधर्माच्या समाजांचे हिंदुस्थानांतील प्रार्थना व ब्राह्म इत्यादि उदारधर्माच्या समाजांशीं अधिक दळणवळण व सहकार्य करण्यासाठीं काय उपाय करावा यास्तव सूचनावजा रिपोर्ट करण्यासाठीं हे हिंदुस्थानांत आले होते. त्यांना भेटण्यासाठीं माझेबरोबर सुकथनकर हेही असत.
रा. मोतीबुलासा
सन १८९९ च्या सुमारास न्यू इंग्लिश स्कूलचे पदवीधर तरुण शिक्षक रा. मोतीबुलासा बी. ए. ह्यांस मॅन्चेस्टर येथें हिंदी विद्यार्थी म्हणून तौलनिक धर्माच्या अध्ययनासाठीं पाठवण्याची नेमणूक झाली. विलायतेस रवाना झाल्यानंतर वाटेंत पोर्टसय्यद येथें वातज्वराचा विकार होऊन त्यांचे आकस्मिक निधन झालें. ही बातमी ऐकून पुणें व मुंबई येथील प्रार्थना समाजिस्टांना फार वाईट वाटलें. विशेषतः समाजाचे गुरुवर्य डॉ. भांडारकर यांच्या मनाला ती गोष्ट फारच लागून राहिली. मोतीबुलासाच्या दुखवट्यानिमित्त पुणें प्रार्थना समाजांत डॉ. भांडारकरांनीं एक विशेष उपासना चालविली, त्यावेळीं त्यांनीं मोठे कळकळीचे दुःखोद्गार काढले. त्यांच्या डोळ्यांतून सतत अश्रूधार चालली होती. ह्या प्रकाराचा माझ्या हृदयावर जोराचा परिणाम झाला. गुरुवर्य व्यासपीठावरून उतरतांच मी त्यांचेजवळ जाऊन, ‘मोतीबुलासाच्या निधनानें रिकामीं पडलेल्या जागेसाठीं मला जर गुरुवर्यांनीं पात्र ठरवलें तर मी विलायतेस जाण्यास तयार आहें’ असें सांगितलें. हें ऐकून गुरुवर्यास आनंदाचें भरतें आलें व त्यांनीं मला मोठ्या प्रेमानें कुरवाळलें.
अटींचा खुलासा
मॅंचेस्टर कॉलेजांत हिंदी विद्यार्थ्याला पाठवावयाचे झाल्यास त्याला ब-याच अटी असतात. अशा विद्यार्थ्याची वरिष्ठ विद्यालयीन शिक्षणांत बरीच प्रगति व्हवयाला पाहिजे असते. इतकेंच नव्हे तर ब्राह्म व प्रार्थना समाजाच्या कार्याविषयीं त्याच्यामध्यें पात्रता दिसून कांहीं थोडे बहुत कार्यही व्हावयाला पाहिजे असतें. या सर्व गोष्टीं ध्यानांत घेऊन तो विद्यार्थी ज्या भागांतला असेल त्या भागांतील सभासदांनीं आणि कार्यवाहकांनीं त्यांची एकमतानें शिफारस करायला पाहिजे. डॉ. संडरलंडच्या सूचनेनुसार अशा विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठीं आदि ब्राह्मसमाज, साधारण ब्राह्मसमाज आणि नवविधान ब्राह्मसमाज या कलकत्त्यांतील तिन्ही शाखांच्या प्रतिनिधींची ब्राह्मसमाज कमिटी या नांवानें नेमलेली एक एक समिति आहे. वरील प्रांतिक सभासदांची शिफारस या समितीकडे जाऊन तिनें ती पसंत करावयास पाहिजे असते. विलायतेंतील ब्रिटिश अँड फॉरेन असोसिएशन ही संस्था अशा पसंत झालेल्या विद्यार्थ्यास वर्षाला १०० पौंडांची स्कॉलरशिप दोन वर्षें देत असते. पण विलायतेला जाण्याचा प्रवासखर्च या विद्यार्थ्यानें आपला आपणच पहावयाचा असतो. इतकेंच नव्हें, कॉलेजांतील शिक्षणांतून परत स्वदेशीं आल्यावर सदर विद्यार्थ्यानें ब्राह्मसमाजाच्या प्रचाराचें कार्य आजन्म करावयाचें असतें. निदान ह्या उद्देशाला विसंगत असें उदर भरण्याचें दुसरें कार्य करावयाचें नसतें. उलट अशा विद्यार्थ्याच्या योगक्षेमाबद्दल ब्रिटिश कमिटी, कलकत्त्यांतील कमिटी किंवा दुस-या कोणींही कायदेशीर हमी घेतली नसते. अशा प्रकारच्या मजकुराचा स्पष्ट छापील खुलासा विद्यार्थ्याचे हातीं देण्यांत येतो. अशा बंदोबस्तानें विद्यार्थ्याची जबाबदारी तावून सुलाखून निघते. ह्या सर्व बारीक सारीक अटींचा, माझ्या घरगुती परिस्थितीचा व होऊं घातलेल्या दुस-या एल्एल्. बी. च्या परीक्षेचा कोणताही अडथळा मनांत येऊं न देतां, किंबहुना त्याचा विचारही न करतां केवळ परमेश्वरी आदेश समजून मी गुरुवर्य भांडारकरांकडे माझा निश्चय गंभीरपणें प्रकट केला. गुरुवर्यांनींही तो तितक्याच झटक्या पटकीनें स्वीकारला.
व्यत्यय
डॉ. भांडारकरांनीं मनांत आणल्यावर प्रांतिक सभासदांची, कलकत्त्याच्या समितीची, नंतर ब्रिटिश कमिटीची व अखेरीस मॅंचेस्टर कॉलेज कमिटीची पसंती ह्या ओघाओघानेंच मिळाल्या. मध्यें एकच व्यत्यय घडला तो हा कीं, न्या. मू. रानडे यांनीं रा. परांजपे नांवाच्या दुस-या एका ब्राह्मण तरुणाची पसंती करून शिफारस केली पण त्याची निवड झाली नाहीं. कारण आतांपर्यंत समाजांशीं त्याचा संबंध जडलेला नव्हता. ह्याच परांजप्यानें पुढें वर्धा येथें हनुमानगडावर एक नवीन धर्मप्रथा काढली.
दयाळू महाराज
येथवर झालें ते ठीक झालें. पण “सर्वारंभास्तडुलाःप्रस्थमूलाः”! प्रवासखर्चाची सोय काय हा मुख्य प्रश्न येऊन पडला. निदान दीड दोन हजार रुपये तरी पाहिजे होते. याशिवाय माझा पोषाखखर्च, मी परत येईतों माझ्या परिवाराचा योगक्षेम याचीही सोय व्हायला पाहिजे होती. सर्वांत मोठी अडचण प्रवासखर्चाची होती. पण त्याहून दुसरी अडचण अशी होती कीं, माझ्या बी. ए. च्या व एल्एल्. बी. च्या परीक्षेसाठीं ५ वर्षे मला श्रीमंत सयाजीराव महाराजांनीं सुमारें दीड हजार रुपये दिले होते. आणि मॅंचेस्टरची स्कॉलरशिप घेतल्यानें गायकवाडींतच काय पण कुठेंही नौकरी करणें अशक्य होतें. आणि ती न केल्यास घेतलेली स्कॉलरशिपची रक्कम परत करण्याचा कायदेशीर करार होता. अशा प्रचंड फिकिरींत मी पडलों. पण ईश्वरीकृपेनें मला यांतूनही एक वाट दिसली ती ही कीं श्रीमंतांकडे समक्ष जाऊन झालेला प्रकार सरळपणें निवेदन करून त्यांची मदत मागावी. त्याप्रमाणें वेळ न दवडतां महाराजांकडे बडोद्यास गेलों. भेट झाली. महाराज खरे दिलदार. ते हंसून म्हणाले, “काय शिंदे, आमच्या पैशांची काय वाटॽ” मी अत्यंत नम्रपणानें उत्तर केलें, “महाराज पत्करलेलें कार्य ईश्वराचें आहे आणि तें आपल्यास पसंत पडण्यासारखेंच आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादि प्रागतिक गोष्टींचें बाळकडू आपण आजपर्यंत पुष्कळच पाजीत आलेले आहांत. आतां तर विलायतेंतील युनिटेरीयन समाजानें माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधि आपण दवडणार नाहीं अशा भरंवशावरच आपणाकडे आलों. मला प्रवासास लागणारे सुमारे दीड हजीर रुपये जर आपण कृपाळूपणें द्याल तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचें ऋण फिटलें असेंच मी समजेन.” ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून दयाळू महाराज हंसले आणि म्हणाले, “बरें आहे. शिंदे तुम्ही यशस्वी होऊन या.” सेकंडक्लास डेकचें जाण्यायेण्याचें भाडें देण्याची हुजुराज्ञा झाली.
हें कळल्यावर समाजाचे मित्रमंडळीस फार आनंद झाला. बाकीची लहानमोठी तयारी होण्याला फारशी अडचण पडली नाहीं. ही इतर तयारी करण्यास माझे मुंबई समाजांतील मित्र रा. कोरगांवकर यांनीं प्रामुख्यानें भाग घेतला. इतरांनीं त्यांना सढळ हस्ते मदत केली. हा बनाव सुमारें १९०० सालच्या नवंबर, डिसेंबर महिन्यांत झाला असावा. सेकंड एल्एल्. बी. च्या माझ्या चारही टर्मस भरल्या होत्या. कायदा बहुतेक वाचला होता तरी वरील दगदगीमुळें माझी खात्रीनें पास होण्याची तयारी नव्हती. परीक्षेचा फार्म भरून मुंबई युनिव्हर्सिटीकडे मीं फी देखील पाठविली होती. पण ज्या गोष्टीकडे मनापासून कल नव्हता तिची दगदग मी कसचा वाहतों. कायदा मागें पडला तो कायमचाच. त्याचें स्थान दैवी कायद्यानें पटकावलें.
आश्वासन
हा सर्व घडत असलेला महत्त्वाचा प्रकार मी माझ्या वृद्ध वडिलांस अद्याप कळविला नव्हता. याचें मुख्य कारण हा योग जमून येईल अशी मला खात्री वाटत नव्हती. शिवाय त्यावेळीं विलायतेला जाणें आणि त्यांतलेंत्यांत मागासलेल्या देशांतील माझ्यासारख्या गरीब खेडवळानें जाणें हें फारसे संभवनीय नसल्यानें आईबाबांची सहजासहजीं अनुकूलता मिळेल असें मला वाटेना. ज्या आईबापांनी व इतर बहिणभाऊ, आश्रितांनीं इतके दिवस हालकष्टांत घालवले होते व उच्चशिक्षण दुर्मिळ असलेल्या त्यावेळीं बी. ए.; एल्एल्. बी. वगैरे परीक्षा होऊन बडोद्यासारख्या संस्थानांत माझी चांगली वर्णी लागण्याचा काळ इतका जवळ आला असतांना त्या सर्वांवर निःशंक पाणी सोडून मुलानें विलायतेसारख्या दूर देशांत जाण्याचा मार्ग पत्करला आणि तोही ऐहिक स्वार्थासाठीं नसून परत आल्यावर फकिरी पतकरण्यासाठीं! हे जेव्हां आईबाबांना कळेल तेव्हां त्यांना काय वाटेल याचें दारुण चित्र मला दिसूं लागलें. शेवटीं मला जेव्हां त्यांना सर्व प्रकार कळविणें भाग पडलें तेव्हां वडिलांना धक्का बसून ते कित्येक आठवडे आजारी पडले. पण आश्चर्य हें कीं माझ्या आईनें धीर सोडला नाहीं; ती त्यांची वरचेवर समजूत घालूं लागली. आपल्या निराशेचें दुःख आवरून धरून दोघेही मी स्वीकारलेल्या मार्गांत मला यश मिळावें अशी प्रार्थना करूं लागले. इतकेंच नव्हे तर परत आल्यावर मी जें व्रत पतकरलें होतें त्यांत आपणही भाग घेऊं असे आश्वासूं लागलें. मला धन्यता वाटूं लागली. प्रत्यक्ष मॅंचेस्टर कॉलेजची टर्म १९०१ च्या आक्टोबर महिन्यांत सुरू होणार होती. तोपर्यंत ५।७ महिन्यांचा अवधि होता. या अवधींत मी पुण्याच्या किबेवाड्यांतील नूतन मराठी विद्यालयाच्या हायस्कुलांत इंग्रजी ६ व्या व ७ व्या इयत्तेंत इतिहास व इंग्रजी काव्य या विषयांचा शिक्षक म्हणून काम पत्करलें. त्यावेळीं ह्या शाळेजवळच असणा-या जमखंडीकरांच्या वाड्यांत मी राहात असें. शेवटीं सप्टंबर महिना आला. आईबाप, बहिण भाऊ, पत्नी व मुलगा ही सर्व मंडळी जमखंडीकरांच्या वाड्यांत मजबरोबर राहात होती. आम्ही सगळे मिळून मुंबईस गेलों. “पर्शिया” नांवाच्या आगबोटीनें माझा प्रवास व्हावयाचा होता. शनिवार ता. २१ सप्टंबर १९०१ रोजीं सकाळचे १०॥ वाजतां रा. कोरेगांवकराचे घरांतून निघालों; तेव्हांपासून वियोगाच्या तीव्र वेदना सुरू झाल्या. बॅलार्ड पिअरवर माझ्या आधीं बरीच मित्रमंडळी जमली होती. गुरुजन आशीर्वाद देऊं लागले. मित्रमंडळ अभिष्टचिंतन करूं लागलें. कांहींजण प्रवासांत उपयोगी अशा महत्त्वाच्या सूचना करूं लागले. अशी एकच गर्दी उडाल्यामुळें मी भांबावल्याप्रमाणें झालों होतों. १२ वाजतां प्लेग डॉक्टरची तपासणी सुरूं झाली. १२॥ वाजतां मी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन निघालों. दारावर आंत सोडताना रखवालदारानें थोडासा दांडगाईचा प्रसंग आणिला. पण हिंदुस्थानांतील निदान दोन वर्षेंपर्यंत तरी ही दांडगाई अखेरची असल्यानें मीं ती कौतुकानें सहन केली. तपासणी एका मिनिटांतच आटोपली. एकदां आंत गेल्यावर जाणारांची आणि पोचविण्यास आलेल्यांची नुसती नजरानजरही होत नाहीं म्हणून दोघांसही फार वाईट वाटतें. मी मचव्यांत बसल्यावर मला न भेटलेल्या बाहेरच्या तिघां मित्रांकडून पुन्हा भेटून जाण्याबद्दल तीन चिठ्या आल्या. पण इतक्यांत मचवा निघाल्यानें माझा नाइलाज झाला. हळू हळू माझा मायदेश डोळ्यांदेखत अंतरूं लागला. वियोग मूर्तिमंत पुढें उभा राहून माझ्या जिवलग माणसांची उदास व खेदमय दिसणारीं चित्रें मला एकामागून एक दाखवूं लागला. आणि अशाच कष्टमय स्थितींत मला दोन वर्षें काढावीं लागतील कीं काय अशी धास्ती पडली.