कांहीं टिपणें



गुड फ्रायडे
ता. १० एप्रिल १९०३ या दिवशीं भाविक लोक उपवास करतात. मासे, अंडीं हें फराळाचें सामान समजलें जातें. खाटकांचीं सर्व दुकानें बंद असतात. धार्मिक लोक मुख्य देवळांत दर्शनास जातात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवळांतून रीघ लागते. मी आज सां व्हेन सां दि पाल, सां रोक्, मा दि लेन या तीन मोठ्या देवळांत गेलों. गायन, वादन, मंत्रघोष, उपदेश वगैरे चालू होते. फुलें, वेली, पानें यांनीं देव्हारे भरगच्च सजवले होते. एका टेबलावर मखमलीच्या गादीवर सुळावर चढलेल्या येशूची लहान मूर्ति ठेवलेली असे. जवळ एक लहान मुलगा बसला होता. स्त्रीपुरुष एकामागून एक येत व मोठ्या भक्तीनें येशूचे दोन्ही बाहू, गुडघे, पावलें चाटून जात. वृद्ध स्त्रिया फारच प्रेमानें चाटीत आणि जवळ ठेवलेल्या एका ताटांत पैसा टाकून पुढें जात. जवळ बसलेला मुलगा रुमालानें मूर्ति पुशीत असे. हा प्रकार सर्वत्र एकसारखा चालला होता. सां रोक् येथे येशूला सुळावर चढवण्याचा व थडग्यांत नेण्याचा हुबेहूब देखावा दाखवण्यांत आला होता. तो पाहून कॅथॉलिक मूर्तिपूजेचा माझ्या मनावर फार परिणाम झाला.

मॅडोमासील ड्युगा
मॅडामोसील ड्युगा ही बाई कुमारी मोछरी नांवाच्या स्त्रियांच्या कॉलेजांत वाङ्मय व तत्त्वज्ञान विषयांची अध्यापिका आहे. पॅरिस येथील स्त्री शिक्षणाबद्दल माहिती मिळविण्याकरितां ह्या बाईची मीं भेट घेतली. बाई अत्यंत गरीब, सभ्य व साधी होती. हिचा पोषाख व वागणूक इतकी साधी दिसली कीं, पॅरिस नगरांत राहण्यास जवळजवळ अयोग्य वाटली. दर एक माहिती पुरवण्याची हिची अत्यंत उत्कंठा दिसली. मीं अनेक प्रश्न विचारले, त्यांची तिने समर्पक साधार उत्तरें दिलीं. सुमारें दोन तास बोललों तरी तिनें कंटाळा दाखविला नाहीं. उलट माझीं उदार मतें व बारीक चौकसपणा पाहून तिला सानंद आश्चर्य वाटलें व तें तिनें बोलूनही दाखवलें. हिंदुस्थानचे लोक म्हणजे गहन विचारांत गुंतलेले वैराग्यवृत्तीचेच असावयाचे असा तिचा समज होता. माझी हीं प्रगमनशील, बुद्धिवादी मतें पाहून आपणांस आश्चर्य वाटतें असें बोलून दाखविल्याबद्दल तिनें माफी मागितली. दुसरे दिवशीं तिनें मला जेवणास बोलावलें. आदले दिवशीं स्त्रीशिक्षणासंबंधीं भाषण झालेंच होतें. पुढें उच्च शिक्षणाविषयीं बोललों. भाषणांत व्यत्यय होऊं नये म्हणून तिनें दुस-या कोणासही बोलावलें नव्हतें. फ्रेंच विवाहपद्धतीवर मोठें मजेचें बोलणें झालें. फ्रान्समध्यें मुलांमुलींचीं लग्नें त्यांचें आईबाप त्यांच्या संमतीनें मोठेपणीं लावतात. इंग्रजाप्रमाणें हळू हळू येथेंही स्वयंवराची चाल पडत चालली आहे. मात्र तरुण मुलीस तेथल्याप्रमाणें स्वातंत्र्य नाहीं. एका मुलीचें उदाहरण सांगितलें कीं, आईला सोडून ती एकटीच अशी केवळ स्नानगृहांतच जात असे. नंतर पॅरिस शहरच्या नीतीसंबंधीं बाईनें मोकळेपणानें आपलें विचार कळविले. ब्रिटिशांपेक्षां फ्रेंच लोकांत वैवाहिक नीति कमी आहे. जसजसें दक्षिण युरोपांत जावें तसतसें नीतीचें मान कमी कमी होत जातें असें ती म्हणाली. गरीब व कामकरी स्त्रीपुरुष लग्न न लावतां नवराबायकोप्रमाणेंच राहतात. तें केवळ अनीतीचेंच असतें असें नाहीं, ह्याचें एक कारण लग्नाच्या विधीचें धर्मदृष्टीनें व कायद्यानें फाजील अवडंबर माजवलें जातें. गरिबांना तें झेंपत नाहीं. नीति बिघडण्याचें दुसरें कारण तरुण मुलांनीं २१ वर्षांनंतर २ वर्षें लष्करांत नोकरी केलीच पाहिजे असा कायदा आहे. अशा तारुण्याच्या वेळीं या पेशांत स्वैरवृत्ति साहजिकच वाढते. शिवाय पॅरिस जगांतील करमणुकीचें स्थान असल्यानें परकीय चैनी लोकांचे चाळे येथें फार चालतात. उच्च शिक्षणांत स्त्रियांचा कसा थोडा थोडा शिरकाव होत आहे व चळवळीचें काम स्त्रियाच कसें अंगावर घेत आहेत याविषयीं बोलणें झालें. एकंदरींत या बाबतींत फ्रान्स देश अमेरिकेच्या व इंग्लंडच्या मागें असल्याचें बाईनें कबूल केलें. स्त्री-शिक्षणाच्या कामीं कॅथॉलिक धर्माकडून कसा अडसर येतो तें तिनें स्वतःच्या अनुभवावरून सांगितलें.
ह्या प्रमाणें ह्या दोन दिवसांच्या संभाषणानंतर या विद्वान व आपल्या जातीबाबत झटून यत्न करणा-या बाईविषयीं मला फार आदर वाटूं लागला. तसेंच तिलाही मजबद्दल व माझ्या ब्राह्मसमाजाबद्दल आस्था उत्पन्न झाली. आपल्या भेटीची आठवण म्हणून तिनें इमर्सनचें एक पुस्तक बक्षीस दिलें.

व्हर्सायचा राजवाडा
पॅरिसच्या नैर्ऋत्येस १५ मैलांवर इतिहासप्रसिद्ध व वैभवशाली व्हर्साय शहर आहे. मी १२ एप्रिल आदितवारीं दोनप्रहरीं तीन वाजतां तेथें पोचलों. येथें १५ व्या लुईचा प्रचंड आणि वैभवसंपन्न राजवाडा आहे. मध्यें चौकांत ह्या लुईचा अश्वारूढ भव्य पुतळा आहे. या ठिकाणीं ऐतिहासिक चित्रांचा व पुतळ्यांचा जसा संग्रह आहे तसा जगांत कोठेंही नाहीं. कांहीं चित्रांनीं माझें मन वेधलें. शार्लमेन, सां लुई यांचीं चित्रें पहातच रहावेसें वाटलें. क्रुसेड्स हॉलमध्यें क्रुसेड्ससंबंधी चित्रें आहेत. दुस-या मजल्यावरील गॅलरींत १७९७ ते १८३५ पर्यंतचीं भव्य चित्रें आहेत. त्यांत नेपोलियनचा पराक्रम वर्णिला आहे. त्याचें सेंट हेलीना येथील थडगें, राटीसबन येथें त्याच्या पायाला झालेली जखम सर्जन बांधीत असतां तो आपल्या पांढ-या घोड्यावर चढत आहे, अलेकझांड्रिया शहरांत त्याचा प्रवेश, तेथील राजाचें शरण येणें, ऑस्टरलिस लढाईची आदली रात्र वगैरे चित्रें पाहून वीर व करुणरसाची माहिती कळली. लुईची निजावयाची खोली, अंथरूण व चादर हीं राखून ठेवलीं आहेत. वाड्याचे खिडक्यांतून सुंदर बागेची व उपवनाची अनुपम शोभा दिसत होती. उंच झाडें, वीथिका, पुष्पवाटिका, गुंफा, तडाग लहानमोठीं हजारें कारंजीं, वाड्यापासून उतरत जाणारी सपाटी, पुढें दूरवर जाणारा रुंद व प्रशस्त कालवा, त्यावरील क्रीडानौका, एक ना दोन, नानाविध देखावे पाहून मन समाधान पावलें. मानवी ऐश्वर्य, सौंदर्य, स्वातंत्र्याच्या व सुधारणेच्या वातावरणांत इतके एकवटलेले माझ्या पाहाण्यांत तरी अद्याप कोठें आलें नाहीं व पुढें येईलसें दिसत नाहीं. म्हणून ८ चे सुमारास बाहेर पडतांना थोडेंसें अवघड वाटलें.

ऑगस्ट डि कॉम
प्रसिद्ध तत्त्ववेत्ता ऑगस्ट डि कॉम राहात असलेलें घर नं. १० रू मॉसियॉर ल प्रिन्स ह्या रस्त्यांत आहे तें पाहिलें. त्यांनीं काढलेल्या positivist ऊर्फ निश्चितवादी समाज या घरांत भरत असतो. तिथें त्याच्या कांहीं तसबिरी व पुतळे होते. त्याची दत्तक मुलगी मादाम द व्हान्सा आणि त्याचा शिष्य लाफाट हे राहात होते. सर्व कांहीं सामान व्यवस्थित होतें. तो ज्या अंथरूणावर मेला तें अंथरूणही चांगल्या रीतीनें ठेवण्यांत आलें होतें.

राममोहन रॉय     
राजा राममोहन रॉय यांची समाधि ब्रिस्टल शहरांतील एका स्मशानभूमींत सुंदर हिंदी पद्धतीनें बांधली आहे. हिच्याजवळ मी बसून थोडीशी प्रार्थना केली. प्रेक्षकांसाठीं एक मोठें पुस्तक ठेवलेलें असतें. त्यांत समाधि पाहिल्याचा उल्लेख करून मीं आपली सही केली. राममोहन रॉयला लहानपणीं जिनें स्वतः पाहिलें होतें अशी एक वृद्ध बाई या शहरांत रहात होती तिला मुद्दाम जाऊन भेटलो. ही सात वर्षांची असतांना तिची शाळा पाहाण्यास राममोहन गेले होते. त्यांची भव्य मूर्ति पाहून तिच्या लहानग्या मनावर फार चांगला परिणाम झाला होता असें तिनें सांगितलें. “He was every inch a Raja.” असे तिनें मजपाशीं उद्गार काढले. या बाईचें नांव मिस् कॅसल असावें असें वाटतें. राममोहन रॉयचा अनुयायी आपणांस येऊन भेटतो याबद्दल तिला फार आनंद झाला. तिनें स्टॅफर्टन ग्रोव्ह, १८ ऑक्टोबर १८३३ च्या दिवशीं राजा राममोहन रॉयच्या अंत्यविधीचें वर्णन असलेल्या डायरींतलें जुनें पान मला आठवण म्हणून दिलें. याशिवाय राममोहन रॉयच्या डोक्याचे केंस व त्यांच्या नांवाचें एक सुंदर व्हिजीटिंग कार्ड तिनें मला दिलें. हीं सर्व योग्य ठिकाणीं सांभाळून ठेवण्यासाठीं कलकत्त्याला ब्राह्मसमाजाच्या सेक्रेटरीकडे मीं पाठवून दिलीं.

१९०२ ची ईस्टर सुट्टी     
ही सुटी मीं इंग्लंडच्या दक्षिण किना-यावरील प्रांतांत घालविली. या भागांत थंडी कमी असते. सकाळीं ९ वाजतां डेव्हनशायरमधील ब्रेडपोर्ट या गांवीं निघालों. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटींतील चौघांजणांनीं दक्षिण आफ्रिकेंतील लढाईंत स्वेच्छेनें कामगिरी पत्करली होती. त्यांपैकीं दोन विद्यार्थी माझ्याच गाडीनें निघाले होते. त्यांस निरोप देण्याकरितां स्टेशनवर विद्यार्थ्यांची गर्दी जमली होती. लष्करी बॅंन्ड सुरू होता. हें पाहून माझें मन विचारांनीं व विकारांनीं भारून गेलें. दोन प्रहरीं दीड वाजतां ब्रेडपोर्टला पोचलों. माझे मित्र जे वाल्टर कॉक यांच्या परिचयाचे मि. कार्निक मला नेण्यास स्टेशनवर आले होते. हे जुन्या वळणाचे मेथॉडिस्ट पंथाचे. तरी माझ्याशीं त्यांनीं धार्मिक बाबतींत फार सहानुभूति दाखवली. चार दिवस मी त्यांच्याचकडे होतों. दुसरे दिवशीं रविवारीं संध्याकाळीं ब्रेडपोर्टच्या युनिटेरीयन चर्चमध्यें माझी उपासना ठरली होती. मॅंचेस्टर कॉलेज कमेटीचे प्रेसिडेंट श्रीमंत युनिटेरियन मि. कॉलपॉक्स याच गांवांत राहात होते. त्यांची मुलाखत दोन प्रहरीं झाली. रविवारीं संध्याकाळीं युनिटेरियन मंदीरांत उपासना चालविली. एकदोन आठवडे आधींच मजबद्दलच्या जाहिराती वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. मीं लिटनीच्या पद्धतीनें उपासना चालविली. या पद्धतींत आचार्य व उपासक या पद्धतीच्या ठराविक छापील पुस्तकांतून कांहीं वाक्यें आळीपाळीनें म्हणतात. तेणेंकरून दोघांचेंही लक्ष उपासनेंत चांगलें लागतें. ही पद्धत मला आवडली. श्रोतृसमाज ३००।३५० जमला होता. मी परका म्हणूनच इतकेजण जमले असावेत. युनिटेरीयन पंथाशिवाय इतर पंथाचाही भरणा होता. एक तास उपासना झाल्यावर सुमारें २० मिनिटें माझें प्रवचन झालें. विषय ब्राह्मसमाज होता. बहुतेक सर्वांस प्रवचन कळलें. १०।१२ लहान थोरांनीं तसें येऊन सांगितलें. रविवारच्या नेहमींच्या पोशाखाप्रमाणें माझ्या डोक्यावर गुलाबी फेटा होता. निरनिराळ्या वर्तमानपत्रांतून उपासनेचा जो रिपोर्ट आला त्यांत ब्राह्मसमाजापेक्षां माझ्या फेट्याचे आणि विशेषतः शेमल्याचेंच अधिक वर्णन होतें.

‘ए’ गार्डन     
ता. १८ मंगळवार मार्च १९०२ रोजीं सकाळीं ९ वाजतां मी, मि. कॉर्निक व रेव्हरंड विंटर असे तिघे ब्रेडपोर्टपासून ६।७ मैलांवर “ए” गार्डन टेकडीवरचे प्राचीन रोमन अवशेष पाहाण्यास गेलों. अगदीं डोंगराळ प्रदेशांत टेकडीच्या माथ्यावरून घोड्याच्या गाडीला आणि बायसिकलला जाण्यास सुंदर सडका आहेत. ही रस्त्याची सुधारणा बायसिकल सुरू झाल्यापासून झाली आहे. (मोटारींचा प्रघात अजून झाला नव्हता. त्याचप्रमाणें विजेचे दिव्यांचा प्रघातही लंडनसारख्या मोठ्या शहरांतही झाला नव्हता.) ए गार्डन टेकडी समुद्रसपाटीपासून ८१२ फूट उंच आहे. जमीन मऊ, चिकणाईत चुनखडीची व गवतानें आच्छादित अशी आहे. टेकडीच्या माथ्यावरून जुन्या रोमन काळाची एक सडक सरळ बाणासारखी खालीं जाते. सडका अगदीं सरळ करण्याची चाल रोमन आहे. टेकडीच्या माथ्यावर जुनी रोमन छावणी होती. तिचे अवशेष अद्याप दिसतात. मध्यें दोन पुरुष खोल खंदक व दोन्हीकडे समांतर बांध असें एक मोठें वर्तुळ टेकडीच्या माथ्यावर आहे. येथून सुमारें १।२ मैलांवर समुद्र दिसतो. ही चांगली मा-याची जागा आहे. टेकडीवर अद्यापि केव्हां केव्हां रोमन लोकांचीं हत्यारें व हाडांचे सांगाडे सांपडतात. त्यानंतर कॉर्निकसाहेबानें खालीं खेड्यांतून मेथॉडिस्ट समाजाचें काम पद्धतशीर कसें चालतें हें दाखविलें. दोन गरिब लोकांच्या घरांत जाऊन त्यांची स्थिति पाहिली. पैकीं एक बाई १० वर्षें अंथरुणाला आजारानें खिळलेली होती. तिचेजवळ जाऊन मीं प्रार्थना केली. मेथॉडिस्ट लोकांची गरिबांत धर्मप्रचार करण्याची हातोटी पाहाण्यासारखी आहे. आठवडाभर कामधंदा करणा-या तरुणांस हुरूप येऊन रविवारीं खेडोपाडीं उपासना करण्यास पाठविण्यांत येतें. कॉर्निक हे अशापैकीं होते. दर रविवारीं दोन तीन खेड्यांत फेरी मारून ते येत. डेव्हॉनपोर्ट येथील युनिटेरियन मंदीरांत सकाळीं ११ वाजतां व संध्याकाळीं ५ वाजतां मीं दोनदां उपासना चालवली. देऊळ भव्य होते पण युनिटेरियन चळवळ फार मंदावलेली दिसली. उपासकांची संख्या सकाळीं सुमारें ३० व संध्याकाळीं ५० अशी होती. विशेष अगत्य दिसलें नाहीं. सुधारक चळवळीस औदासिन्याप्रमाणें दुसरें कांहींच घातक नाहीं. हें येथें व दुस-या कांहीं ठिकाणीं दिसलें. याशिवाय क्रूकर्न, टनबिजवेल्स, वेल्सची राजधानी कार्डिक, चेस्टनहॅम वगैरे ठिकाणीं माझ्या उपासना व प्रवचनें झालीं. डेव्हनपोर्ट, प्लीमौथ आणि स्टोन हाऊस हीं तिन्ही शहरें एकमेकांस भिडून आतां त्यांचें एक गांव बनलें आहे. पूर्वीं धार्मिक जुलमाला कंटाळून अमेरिकेला ज्या वसाहती गेल्या त्यांपैकीं प्लीमथ ब्रदरेन ही याच गांवांहून गेली होती. हल्लीं लोकसंख्या दोन लाख आहे. हीं गांवें टेकड्यांवर वसलीं असल्यानें एकही रस्ता सपाट नाहीं. ब-याच ठिकाणीं इतके भयंकर चढऊतार आहेत कीं गाडी हाकलणें धोक्याचें होतें. तशांत इंग्लंडचे रस्ते बर्फ पडून निसरट होतात. सपाट रस्त्यांतही केव्हां केव्हां माणसें पडतात. पण अशा चढउतारावरूनही विजेच्या ट्रामगाड्या इतक्या शिताफीनें धांवतात, उतारावर मध्येंच थांबतात कीं पाहात राहावें. हें शहर आरमारी सैन्याचें मोठें स्थान असल्यानें येथें लष्करी देखावे पुष्कळ दिसतात. आदितवारीं लष्करी लोक उपासनेला जातांना कौतुक कां वाटूं नयेॽ

नाताळची सुटी    
१९०२ ची नाताळची सुट्टी मीं ऑक्सफर्डमध्येंच घालविली. ऑक्सफर्ड येथें एक नॅचरल हिस्ट्री म्युझिअम म्हणून भव्य संग्रहालय आहे. त्याच्या मागच्या बाजूस प्रोफेसर टायलर नांवाचे वृद्ध आणि विद्वान संशोधक राहातात. प्रिमिटीव्ह कल्चर नांवाचा त्यांचा ग्रंथ प्रख्यात आहे. मानव समाजाची आद्यस्थिति कशी होती ह्याविषयीं शोध करणें हा त्यांच्या आयुष्यांतील मुख्य विषय आहे. त्यांना मी भेटलों. मी हिंदुस्थानचा विद्यार्थी म्हणून त्यांना मोठा आनंद झाला. संभाषणाचेवेळीं दिव्याची आणि कंदिलाची प्रगति कशी झाली हा विषय निघाला. तेव्हां मी माझ्या जन्मभूमी-जमखंडीमध्यें बाजारांत माळणी कोणत्या प्रकारचे दिवे वापरतात तें सांगितलें. वेळवाच्या चार पायांवर तट्ट्याचा एक लहानसा मनोरा असतो. एका बाजूला हा वेळवाचा कंदील मोकळा असतो. बाकीच्या तिन्ही बाजू मेणानें मेणवल्या असतात. त्यांत करडईच्या तेलाची पणती जळत असते. ज्या दिशेनें वारा वहात नाहीं त्या दिशेकडे या कंदिलाचें तोंड वळवून माळणी आपला रात्रीचा व्यापार करतात. हें ऐकून प्रिमिटिव्ह कल्चरचीं उदाहरणें हिंदुस्थानांत अद्यापि कशीं आढळतात, हें मीं प्रोफेसरांना सांगितल्यावर त्यांनीं माझें फार आभार मानले व स्वदेशीं परत गेल्यावर माळणीच्या दिव्याचे २।४ नमुने अवश्य पाठविण्याविषयीं विनंती केली. या विषयाची माझी ग्राहकता पाहून त्यांनीं दुसरे दिवशीं मला चहाला बोलावलें. त्यांची व्याख्यानें सर्वांस मुक्त असत. तरी तिघां चौघांखेरीज कोणी येत नसे. मीं तीन चारदां व्याख्यानें ऐकलीं. व्याख्यानापेक्षा संभाषणच मला बरें वाटलें. युनिव्हर्सिटीचे हे मोठे जाडे प्रोफेसर आहेत. त्यांना वाटेल तेव्हां अशीं २।४ व्याख्यानें देण्यापलीकडे कांहीं काम नाहीं. ह्यांचें घर म्हणजे एक मोठी म्युझिअमच असे. मी भेटावयास जाई तेव्हां प्रोफेसर टायलर म्हणत, “Come in Mr. Shinde. This is my den.” आणि विचित्र वस्तूंनीं भरलेली आपली भव्य खोली दाखवित.

मिसेस मॅक्समुल्लर     
मि. हर्बट स्पेन्सर, डॉ. मार्टीनो, मॅक्समुल्लर वगैरे अत्यंत नामांकित मंडळीचे ग्रंथ वाचून माझी त्यांच्यावर श्रद्धा बसली होती. त्यांपैकीं मी इंग्लंडांत गेलों तेव्हां कोणी हयात नव्हतें. कांहीं तर नुकतेच वारले होते. प्रो. मॅक्समुल्लर यांचें घर युनिव्हर्सिटी पार्क जवळ चांगलें थाटाचें होतें. तेथें मी मिसेस मॅक्समुल्लर भेटण्यास गेलों. आपल्या नव-याचा एक होतकरू हिंदी चाहता आणि अनुयायी आपल्यास भेटावयास आलेला पाहून तिला फार संतोष वाटला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर तिनें माझा पत्ता विचारून मी लवकरच इंग्लंड सोडणार होतों म्हणून स्वदेशचा पत्ताही विचारून घेतला. मी स्वदेशीं आल्यावर तिनें प्रो. मॅक्समुल्लरची सर्व प्रसिद्ध लेक्चर्स, तुलनात्मक धर्मावरची आणि हिंदु षड्दर्शनें हीं पुस्तकें मला बक्षीस पाठविलीं. मि. हर्बर्ट स्पेन्सर यांच्या आत्मवृत्ताच्या दोन मोठ्या प्रतीं मला ब्रिटिश आणि युनिटेरीयन असोसिएशन मार्फत हिंदुस्थानांत मिळाल्या; तेंही या बाईकडून कीं काय तें आठवत नाहीं. १९०३ च्या उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वींची ऑक्सफर्ड येथील शेवटची टर्म भरत आली. माझ्या कॉलेजच्या प्रोफेसरांचा व मित्रांचा तसेंच सर्व विश्वविद्यालयाचा निरोप घेण्याचे दिवस जसजसे जवळ येत चालले तसतशी मला फार हुरहुर वाटूं लागली. विलायतेंतील हीं दोन वर्षें म्हणजे माझ्या आयुष्यांतील एक मोठें सुखस्वप्नच होय.
ऑक्सफर्डपासून दीड दोन मैलांवर बेझी नांवाचें क्षुद्र खेडें होतें. तेथें एक ओसाड जुनें उपाहारालय होतें. त्यांत मी केव्हां केव्हां विश्रांतीसाठीं जाई. शेवटचा एकांतवास करण्यासाठीं मी तेथें जाऊन या दोन वर्षांचें सिंहावलोकन केलें. आंतून मला असें उदासीन वाटत असतां ऑक्सफर्ड शहरांत मात्र आनंदाचा मोठा गलबला माजला होता.

बोटींच्या शर्यती     
वर्षअखेरीस ऑक्सफर्डच्या विद्यालयांत Eighth week नांवाचा एक अत्यंत गर्दीचा आठवडा घालविण्यांत येतो. निरनिराळ्या कॉलेजच्या आठ बोटींची ही चुरशीची टेम्स नदीवरील शर्यत (Regatta) असते. ऑक्सफर्डजवळील टेम्स नदीच्या भागाला आयशिस हें नांव आहे. मॉडेलिन कॉलेजापासून जवळ जवळ मैल दीड मैल नदीचा प्रशस्त भाग बोटीच्या शर्यतीला फार योग्य आहे. ज्या ज्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मागें यश आलें असतें, त्यांच्यापैकीं आठ आठ विद्यार्थी एकेका बोटींत बसलेले असतात. यशांतील नंबराप्रमाणें बोटीचा अनुक्रम ठरलेला असतो. कॉलेजांतील बहुतेक सर्व विद्यार्थी आपापल्या बोटींच्या बाजूनें किना-यावर उभे असतात. बोटी वेगानें धावूं लागल्या म्हणजे किना-यावरील मंडळी बेहोष होऊन ओरडत, कर्णे फुंकीत, हातवारे करीत, धांवत असतात. ह्यांत केव्हां केव्हां कॉलेजांतील शिक्षकही भाग घेतात. हा रमणा आठवडाभर चालतो.

ऑक्सफर्ड    
ऑक्सफर्ड हे अति प्राचीन विद्यालय असून इंग्लंडच्या इतिहासांतच नव्हे तर चालू वरिष्ठ प्रतीच्या समाज रहाटींतही या विद्यालयाचा अनेक प्रकारें परिणाम घडलेला दिसून येतो. इंग्लिश राष्ट्ररूपी पुरुषाच्या पाठीचा मणकाच हें विद्यालय म्हटलें तरी चालेल. श्रीमंत समाजांतील विशेषतः अमीरउमरावांचीं मुलेंही या विद्यालयांत सामाजिक व संभावीत वळण लावून घेण्यासाठीं येतात. प्रत्यक्ष राजघराण्यांतील तरुणही राजपुत्रासह युनिव्हर्सिटीच्या निरनिराळ्या कॉलेजांत असतात. सुमारे १७।१८ कॉलेजांतून ४।५ हजार विद्यार्थी शिकत असतात. ह्या आठवड्यांत इतक्या कॉलेजांतील विद्यार्थी येथील संमेलनांत भाग घेण्यासाठीं आपल्या आयाबहिणींना बोलावणें करतात. सभा, संमेलनें, पाट्र्या, भोजनें इत्यादि प्रसंगांची गर्दी उडते. इंग्रजी विवाह, स्वयंवर पद्धतीचा असल्यानें परस्पर परिचयाला हा काल फार अनुकूल असतो. इंग्रजी समाजाचा ध्येयवाद व्यवहाराला नेहमीं समांतर असतो. एकंदरींत राष्ट्रीय जीवनांत ही बुढ्ढी युनिव्हर्सिटी बारीकसारीक गोष्टींतही कसें मन घालते आणि बिनबोभाट काम साधून घेते हा एक निरीक्षणाचा मोठा विषय आहे.
पदवीदान समारंभ ता. २४ जून १९०३ रोजीं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा मोठा वार्षिक पदवीदान समारंभ झाला. १० वाजल्यापासून शेल्डोनियन थिएटरांत स्त्रीपुरुषांची गर्दी जमूं लागली. १२ वाजतां थिएटर खालवर गच्च भरलें. सुमारें दोन हजार लोकसमुदाय हजर होता. तीन चतुर्थांशावर स्त्रियाच होत्या; यावरून जमावाचें सामाजिक स्वरूप स्पष्ट दिसलें. मागील Eighthweekच्या (बोटींच्या शर्यतीच्या) खालोखाल हा आठवडा मोठा चैनीचा होता. चोहोंकडे नाच, मेजवान्या व खेळ चालतात. परीक्षा आटोपल्यामुळें विद्यार्थी मोकळे असतात. त्यामुळें मुद्दाम बोलावून आणलेल्या बहिणी व मेहुंण्या यांचा आदरसत्कार करण्यास ते उत्सुक असतात. बारा वाजतां सेनेटचा छबिना आंत आला. नंतर ज्या बड्या लोकांना सन्मानाच्या पदव्या घ्यावयाच्या होत्या ते आले. त्यांत आफ्रिकेंतील बोअर युद्धांतील यशस्वी वीर सर जॉर्ज व्हाईट हे होते. त्यांस D.C.L. ची पदवी देण्यांत आली. बादशहा एडवर्डचे बंधु ड्यूक ऑफ आल्बनी यांची पत्नी व कन्या हजर होत्या. समारंभांतील सर्व भाषणें लॅटिनमध्यें झालीं. (ही पुराणप्रियता किंचित् हास्यास्पदच होती.) अशा गंभीर प्रसंगीं विद्यार्थ्यांनीं गोंगाट व वात्रटपणा केला यांत काय नवल! एका विद्यार्थ्यानें बायकासारखा आवाज काढला. दुस-यानें मांजराच्या आवाजाची नक्कल केली. ही सर्व मंडळी अंडर ग्रॅज्युएट्स होती. व्हाईटसाहेबांनीं कांहींतरी बोलावें म्हणून ३।४ मिनिटें टाळ्यांनीं ठिकाण दणाणलें; तर त्यांचें भाषण सुरू असतांना तें लवकर संपेना म्हणून कांहींनीं गोंगाट व आरडाओरडा सुरू केला. अंडर ग्रॅज्युएट्स असा दंगा करतात म्हणून त्यांना तिकिटें देण्यांत येत नाहींत. तरी येनकेन प्रकारेण जी कांहीं मंडळी आंत येतात ती आपला प्रताप अशा रीतीनें गाजवतातच. हा नेहमीचाच प्रकार असल्यानें सर्वांस कौतुकच वाटलें.