परत प्रवास

प्रकरण ३० वें
शेवटचा निरोप     
३१ ऑगस्ट १९०३ रोजीं सकाळीं मी होवर्न येथून निघालो. लंडनला आणि इंग्लंडलाही शेवटचा रामराम केला. जर्मन समुद्रांतून हॉलंडची राजधानी ॲम्स्टरडॅम येथें इंटरनॅशनल लिबरल रिलीजस कॉन्फरन्स करतां गेलों. तेथें मी ता. ४ सप्टेंबरपर्यंत होतों.

एक अडचण     
विलायतेला येतांना मला बोटीच्या प्रवासाबद्दलचा खर्च श्रीमंत सरकार सर सयाजीराव महाराजांनीं दिला होता. स्वदेशीं परत जाण्याचा खर्च मिळण्यापूर्वी माझ्या कॉलेजांतील अभ्यासाबद्दल कॉलेज अधिका-यांकडून रिपोर्ट मागविण्याबद्दल हुकूम महाराजांकडून झाला होता. त्या प्रमाणें हा इंग्रजींत रिपोर्ट अध्यापकांकडून महाराजांकडे गेला. तो पुरवणी नं. २ मध्यें पुढें दिला आहे. त्याअन्वयें मीं महाराजांकडे अर्ज केला असतां त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीकडून पत्र आलें कीं, मी स्वदेशीं परत गेल्यावर बडोदें संस्थानांत नोकरी करण्याबद्दलचा करार लिहून देईन तर हा खर्च मिळेल. मी ता. १ मे १९०३ रोजीं महाराजांना खुलाशाचें सविस्तर पत्र लिहिलें कीं, “मला जी युनिटेरीयन स्कॉलरशिप मिळाली होती तिची एक शर्त अशी होती कीं, मी आजन्म स्वतःला धर्मप्रचारासाठींच वाहून घेईन. यदाकदाचित् माझ्या योगक्षेमाची कोणीं जबाबदारी घेतली नाहीं, तर या प्रचाराला प्रतिकूल होणार नाहीं असेंच एकादें काम करून उदरनिर्वाह करीन; पण प्रचार सोडणार नाहीं. महाराजांनीं हें सर्व पसंत केलें होतें. म्हणून आतां कोणती हरकत न घेतां स्वदेशीं परत जाण्याला मला ते मदतच करतील.” हें पत्र पावतांच महाराजांनीं, टॉमसकुक कंपनीकडे तारेनें तिकीट देण्याबद्दल हुकूम केला असल्याचें त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरींनीं मला कळविलें.

ॲम्स्टरडॅमचा खर्च     
कॉलेजला उन्हाळ्याची सुटी झाल्याबरोबर माझें इंग्लंडांतील काम संपलें म्हणून स्वदेशीं निघतां आलें असतें. पण ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदार धर्मपरिषदेला मला ब्राह्मसमाजानें हिंदुस्थानचा प्रतिनिधि निवडल्यामुळें आणि ती परिषद सप्टेंबरमध्यें भरणार असल्यानें दरम्यानचा तीन महिन्यांचा खर्च आणि जादा प्रवासखर्च यांची पंचायत पडली. युनिटेरीयन स्कॉलरशिप मला दरसाल १०० पौंडांची होती. तीच अपुरी होती. मी फार काटकसरीनें राहून माझ्या खर्चाची कशीबशी तोंडमिळवणी केली. ॲम्स्टरडॅमच्या जादा खर्चाविषयीं माझे मित्र श्रीयुत बा. बा. कोरगांवकर यांनीं वर्गणीचे परिश्रम करून ता. २५ जुलै १९०३ रोजीं पत्रानें १३ पौंड ६ शिलिंग ८ पेन्सचा (म्हणजे २०० रुपयांचा) चेक पाठविला. कलकत्त्याहून हेमचंद्रसरकारकडूनही निदान तितकीच रक्कम मिळेल असें कळविलें. अशा रीतीनें माझी अडचण भागली.

ॲम्सटरडॅमची परिषद
ता. १ सप्टेंबर रोजीं इंग्लंडहून निघालेल्या पाहुण्यांची बोट ॲम्स्टरडॅमला पोहोंचली. तींतच मी होतों. नदीच्या कांठावरच्या सुंदर अम्सटील हॉटेलांत आमची व्यवस्था झाली होती. व्याख्यानें, उपासना, मेजवान्या, यांची एकच गर्दी उसळली होती. डच लोकांनीं फारच संस्मरणीय स्वागत केलें. मीं वाचलेला, हिंदुस्थानांतील उदारधर्म हा निबंध, ह्या परिषदेचें ‘लिबर्टी’ नांवाचें जें पुस्तक प्रसिद्ध झालें त्यांत प्रसिद्ध झाला आहे.

व्होलंदाम     
ता. ४ सप्टेंबर रोजीं ॲम्सटरडॅमहून व्होलंदाम नांवाचें एक जुनें खेडें पाहाण्यास निघालों. बरोबर सुमारें निरनिराळ्या राष्ट्रांची २०० पाहुणे मंडळी होती. आम्हां पाहुण्यांची व्यवस्था ठेवण्यास डच मंडळी आली होती. सुमारें दोन वाजतां व्होलंदाम येथें पोहोंचलों. हें खेडें समुद्रकिनारीं एका धक्क्याच्या आश्रयाखालीं आहे. समुद्रसपाटीपेक्षां या खेड्याची सपाटी ४।५ फूट तरी खालीं असावी. आमची इतकी गर्दी पाहाण्यासाठीं खेड्यांतील सर्व माणसें, मुलालेकरांना घेऊन दाराबाहेर उभी होती. डच लोकांची स्वच्छतेसंबंधी मोठी ख्याति आहे. त्याप्रमाणें दोन प्रहरीं घरें धुण्याचें काम चाललें होतें. आम्हीं कित्येक घरांत शिरून त्यांच्या चुली आणि निजावयाच्या जागा पाहिल्या. साधेपणा, स्वच्छपणा व टापटीप पाहून आनंद झाला. ह्या लोकांच्या पायांत ओबडधोबड लांकडी जोडे होते. घरांत शिरतांना ते आपले जोडे बाहेर ठेवीत. आम्हांला बुटांसह आंत जाण्याला लाज वाटूं लागली. तरी आम्हांस हे लोक आंत जाण्यास खुशीनें परवानगी देत. धक्क्यावर एक दोन मैलांवर आम्ही हिंडलों. एदाम या खेड्यांत आम्ही आगगाडींतून उतरल्यावर व्होलंदामपर्यंत सुमारें दोन मैल एका कालव्यांतून जुन्या चालीच्या बोटींतून आम्ही कांहींजण निघालों. या बोटींना एक लांब लांकडी दांडा लावला असून त्यांस खांदा देऊन माणसें बोट पुढें ढकलीत असत. संध्याकाळीं ५ पर्यंत इकडे तिकडे हिंडल्यावर आगबोटींतून आम्ही परत ॲम्सटरडॅमला परत आलों. अशा रीतीनें अगदीं आनंदानें ॲम्सटरडॅम येथील परिषदेचा शेवट झाला.

कलोन कॅथीड्रल     
ता. ५ सप्टेंबर रोजीं सकाळीं कलोन येथें पोंहोंचलों. हॉटेल एविग् लॅंम्पमध्यें उतरलों. लगेच न्याहारी करून येथील प्रसिद्ध कॅथीड्रल पाहाण्यास गेलों. एवढी सुंदर इतिहासप्रसिद्ध इमारत असूनही, बाजारांतील गर्दीच्या भागांत ती कोंडल्यासारखी झाली आहे. मी चौकांतून तिच्याकडे पाहात राहिलों. हातांत कॅमेरा होता. पण चित्रासारखा कितीतरी वेळ आ वासून पहात राहिलो असतां, मलाच कितीतरी लोक पाहून गेले असावेत. आश्चर्याचा आवेग उतरल्यावर मी इमारतींत हळूंहळूं शिरलों. बांधकाम गॉथिक थाटाचें आहे. काळ्या कुरुंदाचा दगड वापरला आहे. उंच निमुळत्या कमानी एकावर एक लागलेल्या असून गॉथिक शोभेची एथें परमावधि झाली आहे.  ता. ७ सोमवारीं १९०३ रोजीं स्वित्झरलंड आणि जर्मनीच्या हद्दीवरील बाझल शहरांत थोडा वेळ राहून त्याच रात्रीं ११ वाजतां, आल्पस पर्वतांतील ल्यूसर्न या नांवाच्या अत्यंत रमणीय गांवीं पोहोंचलों. हा गांव ह्याच नांवाचे सरोवराचे कांठीं आहे. चार दिवस विश्रांति आणि एकांतवासांत घालविले. मौंट पिलाटुस नांवाच्या आल्पस पर्वताच्या शिखरावर मी एकटाच सफर करून आलों. समुद्रसपाटीपासून हें ठिकाण ७००० फूट उंच आहे. जर्मनी सोडून स्वित्झर्लंडकडे जातांना आल्पस पर्वतांतून सेंट गॉथर्ड नांवाचा १० मैल लांबीचा एक बोगदा आहे. त्यांतून आमची गाडी गेली.
ता. ११ सप्टेंबर रोजीं मी कोलंबसाच्या जिनोवा या गांवीं गेलों. ता. १२ रोजीं कॅम्पो सॅंटो नांवाची अत्यंत सुंदर स्मशानभूमि पाहिली. इटालियन शिल्पकलेची येथें लयलूट झालेली दिसली. नंतर पांच दिवस रोम शहरीं घालविले. मुंबई विद्यालयांत माझा आवडीचा विषय रोमचा प्राचीन इतिहास असल्यानें हें पांच दिवस माझें मोठ्या बोधाचे गेले. ता. १५ रोजीं रविवारीं व्हटिकन् नावाचा, पोपचा राजवाडा पाहिला. तिसरे दिवशीं पोप पायसचें प्रत्यक्ष दर्शन घेतलें. शेकडों भक्तमंडळी दूर अंतरावरून आलेली, यांच्या दर्शनासाठीं रांगेनें बसलेली होती. पोपची स्वारी जवळ येतांच ही मंडळी त्याच्या चरणाचें चुंबन घेत. माझ्यापुढें आल्यावर मी हिंदुस्थानचा रहिवासी म्हणून माझ्यापुढें आपल्या हातांतील आंगठी चुंबनासाठीं पुढें केली. मी चुंबन घेतलें.

मोझेसचा पुतळा     
सिस्टाईन चॅपेल नांवाच्या एका दालनांत हा प्रसिद्ध भव्य पुतळा एका उंच कट्ट्यावर ठेवला होता. मायकेल् अँजेलो नांवाच्या प्रसिद्ध शिल्पकाराला हा महत्त्वाचा पुतळा कोरण्याला ४० वर्षें लागलीं असें सांगतात. दुसरीकडे सेंट पॉलचा लाईफ साईज पुतळा, हातांत नंगी तलवार घेऊन उभा आहे. चित्रकलेंतील इटालियन लोकांच्या वैभवाला ह्या शहरीं नुसता पूर आला आहे. २००० वर्षांपूर्वींच्या प्राचीन इमारतीचें अवशेष मोठ्या आतुरतेनें पाहिलें; फॅबियन अँफिथिएटर नांवाची एक अर्धवर्तुळाकार प्रचंड इमारत पाहून गतवैभवाची कल्पना आली. ह्यांत ग्लॅडिएटर नांवाच्या मल्लांचें प्राणांतिक मल्लयुद्ध होत असे. पादाक्रांत परकीय कैद्यांना (ह्यांत राजेही असत) ह्या इमारतीचें भुयारांत आणून ठेवीत असत. प्रसंगविशेषीं जनतेची करमणूक व्हावी म्हणून ह्या कैद्यांना बाहेर काढून आपसांत लढवीत असत. तो भयंकर रक्तपात पाहून प्रेक्षकजन आनंद मानीत व मल्लयुद्ध जिंकणा-यावर खुष होत. हे रोमनस्वराज्याचें लक्षण!

नेपल्स     
ता. १८ रोजीं मी नेपल्सला गेलों. ह्या बंदराचा देखावा फारच सुंदर आहे. मुंबईच्या मलबारहिलप्रमाणें, समुद्रकांठावरील एका टेकडीवरून उंच उंच एक रस्ता जातो. आपोलो बंदराप्रमाणें येथें धक्काही फार सुंदर आहे. मात्र लोकांचा विशेषतः व्हिक्टोरियावाल्यांचा अप्रामाणिकपणा वेळोवेळीं नजरेस आला. एक दोनदां तर माझ्या प्राणावरच बेतली होती. माझ्या हॉटेलांतील खिडकींतून धुमसत असलेल्या व्हेसुवियस ज्वालामुखीचा देखावा फार भीषण दिसत होता.

पाँपी     
दोन हजार वर्षांपूर्वीं भूकंपामुळें व ज्वालामुखी पर्वताच्या तप्तरसामुळें हें शहर दडपून गेलें होतें. त्याचें आतां उत्खनन होऊन त्याला आतां प्रेक्षणीय स्वरूप आलें आहे. हें नेपल्सपासून सुमारें ४।५ मैल अंतरावर आहे. हें पाहाण्यासाठीं मी ता. १९ शनिवारीं गेलों. गरम राखेचा ढीग वर पडल्यानें त्याच्या खालीं जीं माणसें, जनावरें व इतर वस्तु सांपडल्या त्यांचे हुबेहूब सांगाडे तेथील म्युझिअममध्यें दाखविण्यांत येतात. हे खरे सांगाडे नसून राखेखाली ह्यांचे जे सांचे बनले होते त्यांत प्लॅस्टर ऑफ पॅरीस ओतून उत्खननकारांनीं हे कौशल्यानें सांगाडे बनविले आहेत. कित्येक इमारतींतील भिंतीवरचे रंग व चित्रें अगदीं ताजी दिसलीं. रस्ते व दुतर्फा ओटे फरसबंदी होते. यावरून जड चाकांच्या चाको-यांच्या खोल खुणा दिसल्या. एका दिवाणखान्याच्या भिंतीवर कांहीं बीभत्स चित्रें दिसलीं त्यावरून त्या ऐश्वर्याच्या काळांत रोमन लोकांची नीति कशी खालावली होती हें कळलें. ता. २१ सप्टेंबर १९०३ रोजीं सोमवारीं नेपल्सहून रुबाँ-टीनो नांवाचे आगबोटीनें मी हिंदुस्थानांत येण्यास निघालों; व ता. ६ ऑक्टोबर रोजीं ४ वाजतां तिसरे प्रहरीं मुंबईला परत स्वदेशीं आलों.

स्वागत     
मुंबई बंदरावर कित्येक मंडळी माझ्या स्वागतार्थ जमली होती. मी विलायतेला निघाल्यावर मुंबई प्रार्थना समाजाचे उपाध्यक्ष शेट दामोदरदास गोवर्धनदास सुखडवाला ह्यांनी परत आल्यावर मिशनरी म्हणून माझ्या राहण्याची स्वतंत्र सोय व्हावी व इतरही कामांची तजवीज व्हावी म्हणून प्रार्थनामंदिराचे आवारांत एक राममोहन रॉय आश्रम म्हणून तीन मजली इमारत मी येण्यापूर्वींच बांधून ठेवली होती. इमारतीच्या लगतच भगवानदास माधवदास नांवाचे गुजराथी समाजबंधु रहात होते. त्यांच्या बंगल्यांत माझ्या स्वागतासाठीं समाजबंधूंचें संमेलन झाले. डॉ. भांडारकर, चंदावरकर, माडगांवकर वगैरे मंडळी व सर्व वडील थोर माणसें हजर राहून त्यांनीं आनंदानें स्वागतपर भाषणें केलीं. माझे वृद्ध मित्र रा. दिनानाथराव माडगांवकर यांनीं माझ्या स्वागतासाठीं एक पद मुद्दाम रचलें होतें. त्यांत खालील चरण होतें -

तरुण असतां स्वार्थत्यागी तुम्ही दिसतां भले।
प्रभुवर कृपें धर्माभ्यासीं तुम्हां यश लाभलें।।
तरि तुमचिया हस्तें धर्मप्रचार बरा घडो ।
तनु मन तसें देवापायीं सदा तुमचें जडो ।।१।।

येथें माझ्या आयुष्यांतील आठवणींचा पूर्वार्ध संपला. ईश्वरकृपेनें उत्तरार्ध निघाल्यास गुरुजनांचा वरील प्रेमळ आशीर्वाद कितपत सफल झाला हें कळेल.