खेळकर वृत्ति

प्रकरण २८ वें
मॅंचेस्टर कॉलेजांतील विद्यार्थी पोक्त वयाचे पदवीधर व पुढे धर्मोपदेशकाचे गंभीर काम करणारे होते. म्हणून हे नेहमींच गंभीरपणानें वागत असत असें मुळींच नाहीं. ते बहुतेक खेळकर वृत्तीनें वागत. केव्हां केव्हां तर लहान मुलांप्रमाणें दंगा माजवून सोडीत.

टोयोसाकी
जपानचे एक टोयोसाकी नांवाचे आमचे वर्गबंधु असत. ते ठेंगू असून मोठे गमती होते. त्यांच्याशीं इतर विद्यार्थ्यांच्या नेहमीं चेष्टा चालत. ते कॉलेजच्या वसतिगृहांतच राहात. एकादे दिवशीं रात्रीं नाटकाला जाऊन उशिरां परत आले आणि दार ठोठावूं लागले म्हणजे दारावरील खिडकीवरून त्यांच्यावर पाणी ओतावें; तें असें कीं ते फार भिजूं नये अशाच बेतानें, असे चाळे चालत. एकदां एक अशी टूम निघाली कीं सर्वांची उंची मोजावी. टोयोसाकीला एका भिंतीजवळ उभें केलें. त्याच्या उंचीची रेघ मारण्याच्या मिषानें हात वर करून वर असलेली पाण्याची तोटी खुली केली. टायो दचकून निसटला व सर्वत्र हंशा पिकला. दर रविवारीं टोयो फार सभ्यतेचा पोशाक करी. लाँग कोट, टॉप हॅट घालून स्वारी सडकून सभ्य गृहस्थ बने. आणि शहरांतल्या मुख्य मुख्य रस्त्यावरून हिंडून येई. एकदां एका चावट मित्रानें त्याच्या पाठीवर कोटाला एक कागदाची चिठी लावली व त्यावर Chase Me Girls असे जाड अक्षरांत लिहिलें होतें. टोयो घरीं परत येईपर्यंत त्याला हें कळलेंच नव्हतें. हें पाहून मोठा हंशा पिकला.

मलूल हिंदी
कॉलेजच्या इमारतींत विद्यार्थ्यांसाठीं Common Room म्हणून एक मोठें दालन होतें. त्यांत विद्यार्थ्यांनीं मोकळेपणानें वागावें, सिगारेट्स फुंकाव्यात, खेळावें, खिदळावें असा प्रकार चाले. केव्हां केव्हां प्रोफेसरही या खोलींत येत. त्यांच्यासमोर सिगारेट्स फुंकणें, एकादी त्यांना देणें असेंही चाले. या दालनांत मध्यभागीं एक मोठें गोल मेज होतें. मी इतरांइतका खिदळत नसे म्हणून मला Meek Indian म्हणजे “मलूल हिंदी” असें नांव पडलें होतें. माझा निरुपद्रवीपणा त्यांना जणूं उपद्रवच देत होता. म्हणून सूड उगवण्यासाठींच कीं काय दोघां धटिंगणांनीं मला सपशेल उचललें, गोल मेजावर आडवें ठेवलें आणि गाणें गात, मला घाण्यासारखें फिरवूं लागले. असा वात्रटपणा केलेल्या धटिंगणाला पुन्हा पुढच्या बुधवारीं उपासनालयांत गंभीरपणें उपासना चालवतांना पाहून मला हंसें आवरत नसे. अशा चाळ्यांपासून खुद्द प्रि. ड्रमंड हे सुरक्षित नव्हते. तशांत त्यांचीं व्याख्यानें असल्यानें या चेष्टांना साहजिकच उत्तेजन मिळे.

इव्हर्ट
कॉलेजांत मी केव्हां केव्हां माझा आवडता पिवळा फेटा बांधून शमला सोडीत असे. इव्हर्ट नांवाचा एक स्कॉच विद्यार्थी नेहमींच माकडचेष्टेंत गुंतलेला असे. त्यानें हळू हळू माझा शमला ओढण्यास सुरुवात केली. फेट्याचा खालचा एक विळखा सुटला, दुसरा सुटला तरी इव्हर्टची खोडी थांबेना. सुटलेला भाग आपल्या ताब्यांत घेण्यासाठीं खालीं बाकाच्या पायाला तो गुंडाळू लागलों. असे होतां होतां माझ्या डोक्यावर एकच विळखा राहिला. सगळ्या वर्गाला हंसें आंवरेना. स्वतः प्रि. ड्रमंड यांना तिकडे न पाहिलेसें करून व्याख्यान चालवणें कठीण जाऊं लागलें. ते फार गंभीर आणि शांत गृहस्थ असूनही त्यांच्यावरचा हा हल्ला अवर्णनीय होता. माझ्या तारांबळीला उपमाच नव्हती. स्कॉच लोकांस विनोद समजत नाहीं असा समज आहे, पण हें बाळ ह्या समजाला ‘भयंकर’ अपवाद होतें. प्रोफेसर्स व्याख्यान देत असतांना देखील ह्या चावटपणाला आळा पडत नसे. प्रो. अप्टन हे कानानें बहिरे व वृद्ध होते. म्हणून ते खालीं मेजावर बसून, मुलांना नातवंडाप्रमाणें भोवतालीं घेऊन व्याख्यानें देत असत. अप्टनचें व्याख्यान चाललें असतां तें एकाग्रतेनें ऐकत असलेल्यांच्या कानांत इव्हर्टची पेन्सिल शिरून तो दचकला नाहीं असा एकही विद्यार्थी नव्हता. अर्थात् व्याख्यानापेक्षां ह्या पेन्सिलीकडेच आम्हाला अधिक लक्ष पुरवावें लागे.
लॉकेट नांवाचा एक वेल्स विद्यार्थी कुलुंगी कुत्र्याप्रमाणें ओरडण्यांत प्रवीण होता. नुसतें भुंकूनच आपली तृप्ति करून न राहतां तो केव्हां केव्हां पायाच्या पिंडरीला चावूनही आपली कुशलता प्रगट करी.

मर्कट लिला     
सिगारेट न ओढणारा विद्यार्थी काय तो मीच एकटा होतों. त्यामुळें मी सर्वांच्या डोळ्यांत सलत असें. माझी बसावयाची खोली स्वच्छ, हवाशीर व टापटिपीची असे. अर्थात् हा अपराध कॉलेजबंधूंच्या दृष्टीनें असह्य होता. चिरुटाचा धूर, सिगारेटचीं थोटकें, कागदाच्या गोळ्या वगैरेची खोलींतल्या सामानांत गणना झाली नाहीं तर ती विद्यार्थ्याची खोली कसली! एकदां चार पाच विद्यार्थी चहासाठीं न बोलावतां आले. प्रत्येकानें सिगारेटचे डबे बरोबर आणले होते. माझ्या खोलींत येऊन प्रत्येकजण धुराचे लोळच्या लोळ सोडूं लागला. खोलीं धुरानें इतकी गच्च भरली कीं जणूं काय ती बलूनप्रमाणें उडून जाते कीं काय असें वाटलें. चहा देण्यासाठी लॅंड लेडी जेव्हा आंत आली तेव्हां झालेला हा संपूर्ण प्रकार पाहून खोलीला आग लागली आहे कीं काय असें वाटून भीतीने तिनें किंकाळीच फोडली. तेव्हां कुठें या मर्कटांचा नवस फिटला.

पॉझ मॅगेझिन
उन्हाळ्याच्या सुटींत डॉ. कार्पेन्टर लेक डिस्ट्रिक्टमध्यें राहण्यास गेले. तेव्हां आम्हां सर्व विद्यार्थ्यांना १५ दिवस आपला पाहुणचार व सरोवरप्रांताची शोभा दाखवण्यासाठीं बोलावून नेलें. त्या सुट्टीच्या अनेक करमणुकींत ‘पॉझ मॅगेझिन’ नांवाचे एक तात्पुरतें हस्तलिखित पत्र विद्यार्थ्यांनीं काढलें. त्यांत कार्पेन्टर साहेबांना, “चिप,” अप्टन साहेबांना “अपी” आणि ड्रमंड साहेबांना “डमी” अशीं व्यंग नांवें देऊन त्यापुढें त्यांच्या लक्षणांचें एकएक वाक्य लिहिलें होतें.

    प्रो. कार्पेन्टरच्या नांवापुढें खालील कविता होती---
    Each day he does a mountain climb
    A ten mile row, three meals, a witciam.
    And fills the intervening time with Pali
    Texts and Hebrew Criticism.
     प्रिन्सिपाल ड्रमंड यांना पांच सुंदर तरुण मुली होत्या. त्यांच्या नांवांपुढें खालील वाक्य होतें-
      Happy is the man whose quiver is full
टोयोसाकी—
There came from far Japan
To cheer this gloomy place
A merry little man
With mischief in his face.

He Flirts like any boy
Although a married man
So we must send our Toy
Once more to far Japan.
शिंदे—
A meek and modest Indian
Who will, unless he faints,
Some day duly be worshipped
Among his country saints

He is no vulgur fraction
As single student be
But he and Mrs. Shinde
Form one integrity.