माझे सोबती

प्रकरण १२ वें
हायस्कुलांतील माझे शिक्षक व अभ्यासाविषयीं साधारण आठवणी वर दिल्या. आतां सोबती व त्यांच्याशीं करमणुकीचे प्रकार सांगितले पाहिजेत. कारण स्वभाव आणि शील बनण्यांत केवळ पुस्तकी अभ्यासापेक्षां ह्या दोहोंचा परिणाम अधिक महत्त्वाचा आहे.

माझी भावंडें
माझी इंग्रजी पहिली यत्ता मला कठीण व त्रासदायक गेली. त्यावेळीं माझा वडील भाऊ जिवंत होता त्यामुळें मला स्वतंत्र सोबती असणें साहजिक नव्हते. त्याचे सोबती असत त्यांच्याच मागें मागें दुय्यमप्रमाणें वागावें लागे. ह्यावरून माझा भाऊ मजवर वडीलपणा गाजवी असें नव्हें. तो शांत स्वभावाचा होता. बरेच वेळा मी त्याचें ऐकत नसलों तरी तो समजुतीनें माझ्याशीं वागून मला आपल्याबरोबर नेहमीं ठेवी. असा मायाळू भाऊ ह्यावर्षीं एकदम वारल्यामुळें मी एकाएकी उघडा पडल्यासारखें मला झालें. तोंपर्यंत माझ्या भावाशिवाय मी इतर कोणाशीं-मग तीं कोणी मुलें शाळेंतील असोत किंवा आळींतील इतर असोत-मिसळत नसे. हायस्कुलांत जाऊन मला माझ्या स्वतःचा शोध लागेपर्यंत माझीं भावंडेंच माझें मित्रमंडळ होतें. जमखंडी गांवांत मराठे जातींतच नव्हे तर ब्राह्मणेतर समाजांत आमच्या घराण्याचे वजन आजोबापासून चालत आलेलें होतें. तें माझ्या बाबांच्या सुशिक्षणामुळें व दरबारीपणामुळें वाढलें होतें हें मागें सांगितलें आहे. आमचा वाडा ज्या आळींत होता, तेथें मराठ्यांची जीं घरें होतीं ती अगदीं गरीब व खालच्या दर्जाची होतीं. एकाद्या किल्ल्याप्रमाणें आमचा वाडा किंचित एकलकोंडा होता. तशांत माझे प्राथमिक शिक्षण आटोपून इंग्रजी शाळेंत जाऊं लागल्यामुळें, आळींतल्या मुलांतच काय पण मोठ्या माणसांमध्येंहि माझें महत्त्व वाढत असल्याची जाणीव मजमध्यें दिसूं लागली. माझ्या भावांत अशी अहंता नव्हती. मी लहान व अल्लड, पण तो समजूतदार - त्याच्या माझ्यामध्यें पांच वर्षाचें अंतर – असल्यामुळें तो भोंवतालच्या लोकांत अधिक मिसळत असे. अशा वेळीं तो मला एकाएकीं सोडून गेला, इकडे तर शाळेंत नव्या इंग्रजी विषयाशीं माझे नीट जमेना; त्यामुळें मी त्रासलेला व बहुतेक दुर्मुखलेला असें. माझी धाकटी भावंडे म्हणजे दोन बहिणी (जनाक्का, तान्याक्का) - त्यांच्या माझ्यामध्यें अनुक्रमें ५ आणि ७ वर्षांचें अंतर होतें. अशा अनेक कारणांमुळें माझें पहिल्या यत्तेंतलें वर्ष इ. स. १८८५ बहुतेक एकलकोंडेपणांतच गेलें. आळींतील सामान्य लोकांना हीं कारणें कशी कळणारॽ ते मला मोठा गर्विष्ठ समजत. माझ्या भावाच्या तुलनेनें मी जवळजवळ लोकांत अप्रियच होतों.

माणूसघाणेपणा
मी लहानपणीं फार लाजाळू असल्यानें लोकांत न मिसळण्याचा माझा स्वभावच होता. अद्यापिहि मला एकदम एकाद्या समाजांत कारणाविना किंबहुना अगत्यानें बोलाविल्याविना जाणें आवडत नाहीं. ह्यामुळें अजून केव्हां केव्हां मजवर गर्विष्ठपणाचा - निदान मानीपणाचा आरोप येतोच. ह्यामुळें, माझ्या आतेचा कितीहि आग्रह असला तरी मी त्यांच्या आळींत कधीं फिरकत नसे. पण माझा भाऊ मात्र त्या बाजूला फार लोकप्रिय असे. तो तरुण होता. माझ्यापेक्षां रंगानें उजळ व रुपानें देखणा होता. बड्या बापाचा वडील मुलगा आणि स्वभावानें मनमिळाऊ. मग कां लोकप्रिय होणार नाहींॽ विशेषतः त्या बाजूच्या तरूण मुली त्याच्यावर फार फिदा होत्या. आणि मला हें रहस्य त्यावेळीं (माझें वय अवघे ११।१२ वर्षांचें) कळणें शक्य नव्हतें. म्हणून माझ्या भावाच्या चहाड्या घरीं येऊन मी मुग्धपणें आईजवळ सांगें. आई ते मनावर घेत नसे. आणि भावाला तर मजविषयीं कधीं रागच नसें. त्यामुळें माझ्या सासूच्या आळींतील लोक मला चहाडगा व मत्सरी म्हणत. मी जो मुलांशीही न मिसळणारा, तो मुलींत कसा मिसळणारॽ म्हणून त्या मला माणूसघाणा म्हणत. पुढें तर मोठा शिकलों, विलायतेला जाऊन आलों, बाह्य समाजांत शिरून सुधारणेचा अतिरेक केला, दारिद्र्याचें व्रत घेतलें, आणि शेवटीं कुटुंबासह महारामांगांच्या वाड्यांत त्यांची सेवा केली ! ह्यापैकीं एकाहि कारणानें मराठ्यांसारखा मागासलेला समाज मला अद्यापि विक्षिप्त समजणें साहजिक आहे. मग ह्या सर्व कारणांचा कडेलोट करणा-या मला जमखंडीतील मराठेच नव्हेत तर सर्वच लोक अद्यापि माणुसघाणा म्हणतात ह्यांत नवल कां वाटावेंॽ आतां देखील फार दिवसानें मी जन्मभूमीला गेलों तर माझ्या घराण्याचा लौकीक जाणून लोक मला गांवांत तरी घेतात. बाटका, ख्रिश्चन, बहकलेला समजून मला महारवाड्यांत बसवीत नाहींत ह्यांतच मी भाग्य समजतों ! अर्थात मराठेतर समजूतदार माणसें - मग ती ब्राह्मण असोत, लिंगायत असोत कां मुसलमान असोत, मला फार बहुमानानें वागवितात तो प्रकार वेगळा. जमखंडीतील मराठे तरी मला अद्यापि दूरदूरच करीत आहेत. 'कालोध्ययं निरवधि विपुला च पृथ्वी'!! माझा लाजाळू स्वभाव, लोकांत बसण्या उठण्याचा संकोच, माझ्या भावाच्या मृत्युमुळें झालेला विरह आणि अंगवळणी न पडलेल्या इंग्रजी अभ्यासाचा कांच इत्यादि कारणामुळें ह्यावेळीं मी फार घुम्या स्वभावाचा झालों होतों. अशा वेळीं एक लहानशीं सुंदर गोष्ट घडली ती आठवते. ती दिसण्यांत क्षुद्र असली तरी माझ्या त्यावेळच्या अंतःस्थितीवर मोठा मनोरंजक प्रकाश पाडीते, म्हणूनच केवळ येथें देतो.

गोड देखावा
माझा भाऊ वारल्यावर फार तर एक दोन महिन्यांतली ही गोष्ट. ह्या वेळीं मी बारा वर्षांचाहि नव्हतों व माझी बायको फार तर तीन वर्षांची असावी. माझी आत्या वरचेवर समाचाराला आमचे घरीं येई. ह्यावेळीं बरोबर तिनें माझ्या या लहानग्या बायकोला लुगडे वगैरे विशेष कांहीं न नेसवितां तसेंच आणिलें होतें. कारण माझें घर जरी माझ्या बायकोचे सासर तरी तिच्या आईचे माहेर होतें. किंबहुना तीच लहान पोर आईला न कळत अर्धी नागडी उघडी सहज मागें लागून आली असावी. आमच्या वाड्याच्या मोठ्या दरवाज्यांतून आंतील लहानशा चौकांत येतांना दारांत एक मोठी गुळगुळीत ओझरती फरशी होती. तिचेवरून दुडदुड धांवत येतांना हें लहान मूल पाय घसरून कोलमडून पडलें. त्यावेळीं मी जवळच एका खांबाला टेकून खालीं मान घालून दुःखी कष्टी बसलों होतो. मी चटकन् उठून तिला कवटाळून उचललें व जेथें मंडळी सर्व बसली होती त्या कट्ट्यावर नेऊन ठेविलें. हा देखावा पाहून मंडळींत हंशा पिकला. लग्नांत माझी बायको ६।७ महिन्याची होती म्हणतात. तिची मानहि नीट राहात नव्हती. लग्नांत बायको लपवून ठेवितात, तिला नव-यानें शोधून कडेवर घेऊन यावयाचे वगैरे खेळ असतात. माझ्या लग्नांत हा खेळ होणें शक्य नव्हतें. तो खेळ मी आज केला म्हणून मंडळी हांसत माझी थट्टा करूं लागली. मी स्वभावानें लाजाळू, घुम्मा व मंडळींत फारसा न मिसळणारा होतों. तरी प्रसंग पडल्यास उचित असेल ती गोष्ट करण्यास किंवा बोलण्यास मी कधीं कसली फाजील लाज अगर भीड राखीत नसे. माझी बायको अद्यापि फार लहान असल्यामुळें तिला तर लाज ती कशी माहीत नव्हती आणि ती माझी आतेबहीणच असल्यानें मी तरी काय म्हणून लाजावें, हा विचार मी कृतीनें दाखविला. हा गोड देखावा पाहून माझ्या भावाच्या मृत्युनें ज्यांचीं हृदयें दग्ध झालीं होतीं त्या माझ्या आईबापांच्या तोंडावर हासें विलसूं लागलें. माझ्या आत्येला तर माझें इतकें कौतुक वाटलें कीं त्याचें शब्दांनीं वर्णनच शक्य नाहीं. आपल्या मुलीचें पालन आपला लाडका भाचा उर्फ जांवई पुढें उत्तम रीतीनें करील ह्याचें पूर्व चिन्हच ह्या प्रसंगीं तिनें प्रत्यक्ष पाहिल्याचा तिला आनंद झाला! त्यावेळचें माझ्या बायकोचें गुळगुळीत बाळसें, कुरळ्या केसाच्या झिप-या; सहजमधुर चेहरा, अकुंठित धावपळ, आणि पडली असली तरी मी उचलल्या बरोबर तिनें हासलेलें बाळहांसें ह्या सर्वांची छबी माझ्या बाल-हृदयाच्या कॅमे-यांत तात्काळ ठसावली. ती निगेटिव्ह मी अजून राखून ठेविली आहे. कितीदां तरी एकटा असतांना ती मी काढून पाहात माझ्याशींच रमतो! प्रिन्सिपाल गोळे ह्यांनीं आपल्या "हिंदुधर्म आणि सुधारणा" ह्या पुस्तकांत बालविवाहाच्या सात्त्विक प्रेमाचें जें गौरव गाइलें आहे, त्यांतलें रहस्य असेंच असेल कायॽ

मित्रमंडळ
ह्याप्रमाणें इंग्रजी पहिल्या यत्तेंतलें माझें वर्ष बहुतेक एकलकोंडेपणांतच गेलें. दुस-या यत्तेंत गेल्याबरोबर माझ्या अभ्यासाची झपाट्याने प्रगती कशी झाली व मी एकदां जो वर्गांत पहिला नंबर पटकाविला तो शेवटीं सातव्या यत्तेंपर्यंत - नव्हे युनिव्हर्सिटीच्या मॅट्रिकमध्येंहि माझ्या शाळेंतील मुलांमध्ये अखेरपर्यंत कायम राखिला हें मी वर वर्णन केलेंच आहे. वर्गांत पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्याला मित्रांची, निदान सोबत्यांची उणीव कधीं भासणें शक्यच नसते. ह्या न्यायानें माझे भोंवती सोबत्यांचा घोळका जमूं लागला. पहिले माझे गडी ब्राह्मणेतरच होते. चंदू साऴुंखे, लक्ष्मण जाधव हे दोघे मराठे, मलकाप्पा तुंगळ हा लिंगायत, पांडू हा न्हावी, आणि मियासो अथणी हा तर मुसलमान होता. पण मी जसजसा वरच्या यत्तेंत जाऊं लागलों तसतशी ही ब्राह्णेतर मित्रमंडळी साहजिक मागें गळूं लागली. तिस-या चौथ्या यत्तेंपासून माझ्या प्रभावळींत बहुतेक ब्राह्मण मुलेंच दिसूं लागलीं.

मुक्तद्वार वाडा
आमचा वाडा एकीकडे निवांत होता. अभ्यासाला बसावयाला पुष्कळ जागा होती. माझा पुस्तकांचा सांठा भरपूर, कांहीं आडलें नडलें तर सांगावयाला माझी नेहमी तयारी. माझा कोणताहि सोबती असो त्यावर पोटच्या मुलांप्रमाणेंच अकृत्रिम प्रेम करण्याची माझ्या आईबापाचीहि तयारी. शिवाय आमच्या वाड्यापुढें विस्तीर्ण आंगण, आणि वाडा गांवाच्या हद्दीवर असून जवळच डोंगर, आणि दरींतून एक सुंदर आंबराई इतकी साधनें असल्यावर माझें भोवती सोबत्यांची अष्टौप्रहर मांदी जमत असें ह्यांत काय नवल! अभ्यास करीत करीत खेळ आणि खेळ खेळतच अभ्यास हा खेडवळ विद्यार्थ्याचा निसर्गानेंच रेखून दिलेला कार्यक्रम असे. तिस-या यत्तेपासून सातवी अखेर पांच वर्षेपर्यंत आमचा वाडा म्हणजे एक अनरजिस्टर्ड शाळा, एक मोफत वाचनालय, एक मुक्तद्वार विद्यार्थि वसतीगृह, एक धांगडधिंग्याचा जिमखाना असे एक ना दोन - जें म्हणाल तें होता म्हणावयाचा !


नवीन भरणा
तिस-या चौथ्या यत्तेंत, रामू रानडे, सखाराम गोखले, वामन घारे, भिमू निवर्गी, मलकाप्पा तुंगल इत्यादि मंडळीं नेहमी माझें खोलींत पडलेली दिसें. पांचव्या सहाय्या यत्तेपासून ह्या मंडळांत नवीवच भरणा झाला. जमखंडीचें पश्चिमेस मुधोळ संस्थान १२ मैलावर आहे. तेथील इंग्रजी शाळेंत त्यावेळीं चौथीपर्यंतच यत्ता होत्या. म्हणून तेथून विष्णु देशपांडे, हणमंत कुळकर्णी, रामू पाटील व अंतू हनगंडी वगैरे हीं मंडळी जमखंडीच्या शाळेंत शिकावयास आली. थोड्याच दिवसांत हे सारे ग्रह माझ्याच मालकेंत फिरूं लागले. ही सर्व खेड्यांतील देशस्थ ब्राह्मणांची मुलें होती. त्यांच्या आईबापांनीं एका घरीं त्यांच्या जेवणारहाण्याची सोय करून दिली होती. ते सर्व आपसांत जवळचे नातलग होते. थोड्याच दिवसांत ती सर्व माझ्या भावंडाप्रमाणेंच माझ्या घरीं पडून राहूं लागलीं. इतकेंच नव्हे तर सुटीचे दिवसांत त्यांनीं मला आपल्या गावीं न्यावें; त्यामुळें त्यांच्या घराण्यांचा व माझ्या घराण्याचाहि मोठा घरोबा जमला! मुलांकडून वडिलांचा स्नेह जमणे म्हणजे वळचणीचें पाणी आढ्याला चढण्याप्रमाणेंच हा प्रकार होता. सातव्या यत्तेंत कुंदगोलहून जनार्दन सखाराम करंदीकर हे आमच्या शाळेत आलें. स्कॉलर ह्या नात्यानें हे माझे प्रतिस्पर्धि होते. पुढेंहि कॉलेजमध्यें हे व मी बी. ए. पर्यंत सारखेंच शिकत होतो.