इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २१ गुरुवार आगष्ट)

मँचेस्टर
ता. २१ गुरुवार आगष्ट
पाच दिवस ह्या एकांत व स्वच्छ झोपडीत फार सुखाचे गेले. नेहमी पाच मुलात मिसळून घालविले. मॅकलेरनबाईचा स्वभाव तर फार समजूतदार आणि मन थोर आहे. तिने अत्यंत काळजी घेतली. आज सकाळी बॅलॉक पिअरवरून ग्लासगोला आलो. तेथे जेवण करून मँचेस्टर शहरी रात्री ८ वाजता आलो. एका टेंपरन्स हॉटेलात रात्र काढली.
Mr. Holt, 3 Hope Str; Higher Bronghton, Manchester

ता. २२ शुक्रवार आगष्ट
मँचेस्टर शहरात कोणातरी युनिटेरिन आचार्याची गाठ घ्यावी म्हणून हिंडू लागलो तर जो तो सुटीसाठी बाहेर गेला होता. शेवटी एका गृहस्थाची गाठ पडली. ते मि. होल्ट. फार सात्त्विक आहेत. ह्यांनी बोलावल्यावरून ह्यांचेकडेच १ आठवडा राहिलो.

ता. २४ आदित्यवार
हेल येथील युनिटेरिअन मंदिरात सकाळ संध्याकाळ दोन उपासना चालविल्या. सकाळी सुमारे ३०, संध्याकाळी ६० जण हाजर होते. मँचेस्टरपासून हे ठिकाण १०।।११ मैल आहे. गावापासून मंदिर १ मैलावर आहे. बाजूच्या १।२ मैलातील युनिटेरिअन उपासनेस येतात. दिवस सुरेख होता.

ता. २५
ओवेन्स कॉलेज, रायलंड लायब्ररी आणि टेक्निकल स्कूल ही पाहिली. अगदी पाहण्यासारखी होती. बरोबर दाखविण्यास मिस् कॉन्स्टन्स होल्ट व तिची धाकटी बहीण एथेल ह्या दोघी होत्या.

ता. २६ मंगळवार
मँचेस्टर विलर्ट स्ट्रीट डोमेस्टिक मिशनचे युनिटेरिअन मिशनरी रे. बिशप ह्यांच्याबरोबर अत्यंत दरिद्री व गलिच्छ वस्तीच्या सुमारे ८।१० घरी गेलो. बरोबर बिशप हे असल्याने माझ्या मागे मुलांची फारशी गर्दी जमली नाही. पण पहिल्या दिवशी बरीच गर्दी होती. ह्या कंगाल घरातून देखील भिंतीवर १०।५ चित्रे, खुर्च्या, टेबले वगैरे सामान होतेच. पण ह्यांची स्थिती मात्र फार कंगाल दिसली. एका गरीब बाईच्या जेवणाच्या टेबलावर भाकरीचा मोठा तुकडा, लोणी, साखर, चहा वगैरे जिन्नस दिसले. तूप, साखर, रोटी हे पदार्थ आमच्या गरीब लोकांच्या घरी दिसणार नाहीत. एवढ्यावरून ह्यांची स्थिती काही चांगली म्हणता येणार नाही. इतकेच की हे सुधारलेले दारिद्र्य! संध्याकाळी ८।९ पर्यंत मिशनमध्ये मुलीची उपासना झाली. १०।१२ मुली ३।४ मुले होती. १५।२० मिनिटे मी भाषण केले. मुली कंगाल वस्तीतील असून पोषाख सभ्य, स्वच्छ आणि वर्तनही चांगले होते !

२६(२७)? बुधवार
मि. होल्ट ह्यांनी आपला चिटाचे च्छाप उठविण्याचा कारखाना दाखविला. नंतर होम मिशनरी कॉलेज, सन्डे स्कूल पाहिली. मग सेंट्रल हॉल नावाची वेस्लियन लोकाची मोठी संस्था व उपदेशमंदीर पाहिले. ह्यात सुमारे १५०० पासून २००० लोक बसून ऐकतील अशी योजना होती. विजेच्या प्रकाशाची योजना व इतर व्यवस्था पाहून थक्क झालो. दर रविवारी गावातून बँड वाजवीत एक टोळी हिंडते. तिच्या मागे सहजच लोक लागतात. शेवटी हा बँड ह्या लोकांनिशी ह्या मंदिरात येतो. तेथे प्रसिद्ध उपदेशकांचे उपदेश होतात. ह्या प्रकारे खालील व पतित लोकांस फुसलावून आणून त्यांस शुभवर्तमान कळविण्याचा हा यत्न पाहून चमत्कार व आनंद वाटला.