इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २१ जुलै १९०२ सोमवार)
ता. २१ जुलै १९०२ सोमवार
सकाळी बाउडर स्टोन नावाची मोठी शिळा पाहिली. ही सर्वात सुंदर जी बॉरोडेल दरी तीत अगदी नाक्याचे ठिकाणी आहे. ही जगात सर्वांत मोठी शिळा आहे असे म्हणतात. ही ३० फूट उंच व ६० फूट लांब असून वजन १९०० टन आहे. पर्वतशिखरावरून तुटून खाली पडताना ही एक अरुंद कोप-यावर तोल संभाळून आहे, हा सृष्टीचा अत्यंत चमत्कार आहे. ज्या कोप-यावर उभी आहे त्याचा पाया फार तर ३।४ फूटच रुंद असेल. मध्ये पायाशी एक भोक (असून) त्यातून दोहीकडच्या माणसांना हात हालविता येतात. वर चढण्याला एक शिडी लावली आहे. हिच्या टोकावर माझे मित्र मि. कॉक उभे असता मी शिळेचा फोटो घेतला आहे. संध्याकाळी आम्ही कॅट्स बेल नावाचे शिखर ओलांडले. नंतर ग्रेज खेड्याच्या मागे एक सुंदर आरण्य पाहिले. त्यात एका लहानशा टेकडीवर झाडीत आम्ही दोघांनी सु. १५ मिनिटे ध्यान केले.
ता. २२ जुलै १९०२
आज सारखा पाऊस लागला होता म्हणून कोठे बाहेर गेलो नाही. पण कार्पेंटरसाहेबांनी सुचविले की आजचा दिवस केसिक् कनव्हेनशनला आम्ही घालवावा. आपल्या कामात गुंतले असताही आपल्या पाहुण्याची अशा क्षुल्लक बाबतीतही काळजी त्यांची पाहून फार आश्चर्य वाटले. ह्या कनव्हेनशनच्या आज ११।। ते १, ३ ते ४ व ६।। ते ८।। अशा तीन बैठकांत हाजर होतो. कनव्हेनशनचे धर्माचरणाचे कार्य सकाळी ७ पासून रात्री १० पर्यंत राहून चालले असते. असा १ आठवडाभर क्रम चालतो. पहिली साधारण सभा झाली. दोघांची भाषणे झाली. दुसरीत मिशन-यांची भाषणे झाली. सुधारकांची (युनिटेरिअन लोकाची निंदा अगर थट्टा आढळली नाही. एकत्र उल्लेख झाला पण त्यात वरील प्रकार नव्हता). दुसरीत पहिल्या वक्त्याने Students Voluntary Missionary Union मार्फत भाषण केले. ऑक्सफर्ड केंब्रिज यूरोपातील इतर विद्यार्थ्यांचा मिशनच्या कामाकडे कल वळविण्याचा ह्या मंडळीचा हेतू आहे. त्याप्रमाणे कामही जोराने चालू आहे. हजारो विद्यार्थी, मदत व सहानुभूती आहे असे सांगितले. दुस-या वक्त्याने आस्त्रिलियातील कामाचे फार सुरस वर्णन केले. वक्ता नुसता बोलकाच नव्हता तर पदरास खार लावून त्याने मोठे काम केले आहे. तिसरी सभा उपासनेची झाली. लंडनच्या मायर ह्यांनी फार चांगला उपदेश केला. एकंदर कार्यात कळकळ, उत्साह, मनःशुद्धी फार दिसून येत होती. १५००-२००० पर्यंत लोक मावतील असे दोन तंबू उभे होते. दोहोतही एकत्र भरगच्च लोक असत व कामे चालत. संगीत भक्तिपर आणि उदात्त व करुण रसाने भरलेले असे. हजारो स्त्री-पुरुष एकाच आवाजात गाताना ऐकून अंतःकरण कोंडत असे. टीका करण्याची बुद्धी गळून जाऊन मन साधनाकडे लागे. उपासना संपल्यावर मायर ह्यांनी अशी प्रार्थना केली की सर्व मंडप तटस्थ होता व ईशपायी लीन झाला होता. पश्चात्ताप वाटतो काय, तुमची पापे आठवतात काय, दुस-याचे तुम्ही ऋणी आहा काय, अद्यापी ते ऋण देऊ नये असे वाटते काय, हल्ली कोणाचा मत्सर वाटतो काय, देवाच्या क्षमेचा कधी अनुभव आला आहे काय, क्षमेस पात्र आहा असे वाटते काय, असे व दुसरे अंतःकरण भेदणारे प्रश्न उपासक मंद व खोल स्वराने थांबून थांबून विचारीत असे. एकंदरीत ईश्वर व मनुष्य ह्यांच्यामध्ये ह्याने मध्यस्थी चालविली होती. अर्थात ही सर्व चळवळ अगदी जुन्या ख्रिस्ती मताची आहे. तरी येशूच्या ऐवजी देव अर्थ घेतला तर एकंदर कार्यात दुसरा कोणताच फरक दिसणार नाही. खरा साधक असेल तो नावाबाबत तक्रार न करिता साधन करील. बहुजन समाजावर तर असा परिणाम झाला की प्रार्थना संपल्यावर एक तरुण मुलगी तर स्फुंदस्फुंदून रडत होती व एक वृद्ध गृहस्थ तिचे शांतवन करीत होता.
ह्या देशातील उद्धारक चळवळीत व आमच्या उद्धारक चळवळीत काय फरक आहे ते आता ज्याने त्यानेच पाहावे. आमच्याकडे जशा वार्षिक क्षेत्राच्या ठिकाणी यात्रा जमतात तसेच हे कनव्हेनशन मला दिसले. पण आध्यात्मिक दृष्टीने दोहोंत फारच मोठा फरक आहे. आमच्या ज्या कर्मठ यात्रा (काशी, रामेश्वर इ. उच्च वर्गाच्या आणि जोतीबा, जेजूरी, सौंदत्ती इ. खालच्या जातीच्या), (आणि) भक्तीच्या म्हणजे पंढरपूर, आळंदी वगैरेच्या अशा दोन प्रकारच्या यात्रा आहेत. (त्यामध्ये) केसिकची दुस-यांत गणना होईल. सुधारणेला अनुरूप असा समाजावर जोराचा व काही अंशी इष्ट परिणाम होतो. तितका आमच्याकडे हा परिणाम होत नाही. मोठमोठ्या नावाजलेल्या उपदेशकांची व्याख्याने होतात, त्यामुळे जुन्या मतानेच का होईना धर्मग्रंथाचे ज्ञान होते. सॅलव्हेशन आर्मी,४७ अँटिव्हिव्हिसेक्शन, मद्यपान निषेधक वगैरे इतर मंडळ्याच्या जाहीराती असतात. त्यामुळे परोपकाराकडे मन वळते. इ.इ.
ता. २३ जुलै
ग्रासमिअर सरोवराचे काठी ग्रासमिअर खेड्यात डव्हकॉटेज नावाच्या झोपडीत वर्डस्वर्थ राहत होता. ते ठिकाण पाहवयास न्यहारी झाल्यावर गाडीतून आम्ही ८ जण गेलो.४८ झोपडी फार साधी व जुनी आहे. वर्डस्वर्थची चित्रे, बुके, हस्तलिखिते, पत्रे व इतर खुर्च्या, हातरुण वगैरे इतर सामान राखून ठेविले आहे. ६ आण्याचे तिकीट आहे. माथ्यू आर्नोल्डचे रुस्तुम व सोराब ह्या काव्याची मूळ प्रत पाहिली. नंतर रायडल सरोवर पाहिले. व लफ्रीग पर्वतावर चढलो. (११०१ फूट उंच). नंतर ग्रासमिअर चर्चमध्ये वर्डस्वर्थची कबर पाहिली. ती केवळ फरशी, तिथे जन्ममरणाची तारीख लिहिलेली व गवताची सपाट जागा आहे. रात्री जेवणास घरी आलो.