इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २१ मार्च ०३)
ता. २१ मार्च ०३
प्रो. जाँ रेव्हील ह्यांशी संभाषण - प्रॉटेस्टंट लोकसंख्या ६-७ लाख आहे. प्रॉटेस्टंट समाजाच्या एका मंडळास कनसिस्टार्स असे म्हणतात. १०६ कनसिस्टाअर्सपैकी ३३ सुधारक मताचे कमी अधिक (युनिटेरिअन) आहेत. १७८९ पर्यंत प्राटेस्टंटास धर्मस्वातंत्र्य मुळीच नव्हते. आता कॅथॉलिक, प्राटेस्टंट व यहुदी अशा तिन्ही संघास सरकारातून सारखाच आश्रय मिळतो. मदत देताना सरकार मताची अट मुळीच घालीत नाही. सुधारक समाजाची एक त्रिवार्षिक सभा भरते. तिचे नांव Assembly De Protestant Liberal. ह्या सभेने कमीटी निवडल्यावर तिच्या मार्फत सरकारातून खर्च मिळतो. पारीस समाज फार जुन्या मताचा आहे.
सोशालिझमची सामाजिक चळवळ जारीने चालू आहे. पण ह्या चळवळीतले सर्व सुधारक जरी हुषार आणि स्वार्थत्यागी आहेत तरी धर्मबाबतीत हे अत्यंत नास्तिक मताचे आहेत. कारण कॅथॉलिक मताच्या जुलमास कंटाळून सर्व धर्माविरुद्ध हे लोक बंडावले आहेत. ह्याप्रमाणे एकीकडे कॅथॉलिक धर्माचा अडाणीपणा, धर्मवेड व जुलूम, दुसरीकडे सुधारकाचा बुद्धिअंधपणा, औदासीन्य आणि बंडखोरपणा ह्यामध्ये उदार धर्माचे काम मोठे कठीण झाले आहे. सोशालिस्ट लोकांचा कटाक्ष धर्म आणि भांडवलाच्या विरूद्ध आहे.
मॉस्यू वेग्नेअर आणि रॉबर्टी आ-फॉटेनी हे उदार धर्माचे मोठे वजनदार वक्ते आहेत. ला प्रोटेस्टंट हे साप्ताहिक व लिबरल एव्हँजेलिक हे मासिक अशी दोन उदार पत्रे आहेत. (उदार धर्माच्या प्रसाराचे काम व्हावे तसे जोराने चालू नाही. धर्मबाबतीत आता बहुतेक पूर्ण स्वातंत्र्य आहे. व्यक्तीच्याच स्वभावाची वाढ झाल्याशिवाय गती नाही. प्रोफेसर जाँ रेव्हिली हे आधुनिक धर्माच्या इतिहासाचे व्याख्याते आहेत. व्याख्यानास सर्वास मोकळिक आहे. आज सुमारे ९ पुरुष ४ म्हाता-या बायका हाजर होत्या. पारीस येथे धर्माचे नाव काढल्यास कित्येकास हासे येते.
२२ मार्च रविवार १९०३
सुमारे १२ वाजता नॉत्र दाम देवळात उपासनेस गेलो. हे पारीसचे मुख्य देऊळ व आर्च बिशपचे स्थान आहे. फार जुने व भव्य आहे. सुमारे २०००० वीस हजार लोक मावतील इतके मोठे आहे. सुमारे ५००/६०० लोक उपदेश ऐकण्यास होते. पुरूषांची संख्या जास्त होती, स्त्रिया वेगळ्या बसल्या होत्या. गायन व वादन फार गंभीर व प्रेरक झाले. नंतर उपदेशाचे पूर्वी भिक्षापात्र फिरले. थाटाचा लष्करी पोषाक केलेले मोठे धिप्पाड दंडधारी काठ्या आपटीत पुढे जात, मागून धर्माधिकारी सन्यासाश्रमाच्या पोषाखात जात. मोठ्या कित्येक कुलीन स्त्रिया भिक्षापात्र घेऊन स्त्री समाजात फिरत होत्या. उपदेशक एक तरूण संन्याशी होते. त्यांनी मोठ्या कळकळीने व आवेशाने १ तासभर काही टिपणाशिवाय जोरदार उपदेश केला. मला फ्रेंच भाषा कळली नाही. उपासनेचा परिणाम चांगला वठला. त्यानंतर होतेल द व्हील म्हणजे टाऊन हॉल पाहिला. येथे ऐश्वर्याची आणि संपत्तीची परमावधी झाली आहे. कोमल व कठीण भाव, सुंदर व उदात्त रूपे ह्यांचे समीकरण व संमिश्रण फार चांगले वठले आहे. नखशिखांत शोभा ओतली आहे.
ता. २४ मार्च १९०३
मुंबईचे पार्शी व्यापारी मित्र मि. कोतवाल ह्यांची अवचित गाठ पडली. त्यांनी शहराबाहेर बो द बलोनचे उपवन पाहावयास नेले. हे विस्तीर्ण आहे. आज दिवस चांगला असल्याने सुखेच्छू लोकांची स्टेशनावर व उपवनात गर्दी झाली होती. उपवन म्हणण्यासारखे मला काही आवडले नाही. एकाद्या सिंहाचे दात व नखे उपटून काढावीत व त्यास मिंधे करून एकाद्या श्रीमंताच्या लाडक्या पोरास खेळावयास द्यावे तशीच गत ह्या पारीस जवळच्या उपवनाची झाली आहे. झाडे दुकानात ठेवल्याप्रमाणे एकाच नमुन्याची, एकंदर देखावा इतका माणसाळलेला की ह्यास उपवन म्हणण्यापेक्षा. आरण्याचे प्रदर्शन म्हणणे अधिक शोभते. गाड्याधोड्यांची गर्दी, फ्याशनचा ताप, सुधारणेचे चोचले इ. मुळे आपण निसर्गात आलो असे वाटत नाही.