इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २३ शनिवार नवंबर १९०१)
ता. २३ शनिवार नवंबर १९०१
सकाळी फोक्स जॅक्सनच्या चर्चच्या इतिहासाची २५ पाने, १७३ पानापर्यंत वाचली. दोन प्रहरी ३-४।। पर्यंत टेम्स नदीवर बोटीतून फिरावयास गेलो होतो. हा माझा वल्हविण्याचा पहिलाच प्रसंग असता मला चांगले वल्हविता आले. मजबरोबर मि. सोन होता. प्रत्येकास बोटीचे भाडे ५ पेन्स म्हणजे ८६ आणे द्यावे लागले. सुमारे १।। मैल जाऊन परत आलो. व्यायाम चांगला होऊन मनास मोठी हुषारी आली. ४।। वाजता जपानचे वर्गबंधू मि. टोयो साकी२३ याजकडे चहाला गेलो, त्याजकडे जपानची राजकीय व धार्मिक माहिती करून घेतली. ३५ वर्षामागे जपानात जी राज्यक्रांती झाली ती जपानच्या इतिहासातच नव्हेतर जगाच्या इतिहासात महत्त्वाची होणार आहे.
रात्री मिसेस बिझांटचे हिंदुस्थानातील जातिभेद हे व्याख्यान 'Ancient Ideals and Modern Life' ह्या पुस्तकातून वाचले.
गेल्या शुक्रवारी माझी थोडी प्रकृती बरी नव्हती म्हणून मि. कॉकचे घरी आमच्या साधनसभेस मला जाता आले नाही. मि. शोन गेले होते. त्यांची वाट पाहात सकाळ ११ पर्यंत बसलो. ते आल्यावर माझे त्यांचे धार्मिक भाषण १२।। पर्यंत झाले. काही धर्मग्रंथातील वाक्य घेऊन त्यावर प्रत्येकाने आपले विचार सांगणे; मग एकाने काही धरून निवडून आणलेले उन्नती आणि प्रेरणा करणारे उतारे वाचणे, नंतर काही आम्ही आपले पुढे धार्मिक आचरण कसे ठेवावे ह्या बद्दल संभाषण करणे हा तूर्त आमचा क्रम आहे.
ता. २९ शुक्रवार नवं. १९०१
आज रात्री ८ वाजता मार्टिनो क्लबची सभा झाली. मँचेस्टरचे रेव्ह. डॉसन यांनी `टेनिसनची कविता` ह्यावर फार चांगला निबंध वाचला. ह्यावर वादविवादही मनोरंजक झाला. टेनिसनला सृष्टीचे चित्र जशाचे तसेच वठविता येत होते. पण वर्डस्वर्थप्रमाणे सृष्टीत दैवी तत्त्व टेनिसनला दिसले नाही, असा निबंधाचा व वादाचा झोक होता.
ता. ३० शनिवार नवं.
मि. कॉक ह्याचे घरी आमची तिसरी साधनसभा झाली. मि. बार्न्स, मि. कॉक, मि. शोन आणि मी स्वतः असे चौघे तूर्त जमत आहो. आजची सभा ३ री होती. मि. बार्न्स लंडन येथे उपदेश करण्यास गेला होता. आम्ही तिघांनी प्रार्थना केल्या 'Follow after Love, desire for spiritual gifts and prophecy'
अशा अर्थाचा उतारा वाचला. नंतर उच्च प्रेम आणि विरक्ती ह्यावर थोडा वाद झाला. मि. कॉकने बुद्धासंबधाने प्रीतीनेच द्वेषाचे निर्मूलन करावे व करणे शक्य आहे अशा अर्थाची एक गोष्ट वाचली. आम्ही तिघेही सात्त्विक अन्न ग्रहण करणारे आहो. मि. कॉक आणि मि. शोन पक्के Theosophists कर्मवादी आहेत.
ता. १ दिशंबर १९०१
रेव्ह. प्रोफेसर कारपेंटर ह्यांचा "Living Providence" `जीवंत जागृत देव` ह्या विषयावर आज आमचे कॉलेजचे मंदिरात उपदेश झाला, तो अतिशय प्रेरणा करणारा होता. हे सर्वात जास्त सुधारक मताचे आहेत. मि. एडिस दुसरे एक प्रोफेसर युनिटेरियन पण जुन्या मताचे आहेत. इतर प्रोफेसर ह्यांच्यामध्ये आहेत. एक तास धार्मिक सुख अनुभविले.
ता. २ दिशंबर
सकाळी बाइसिकलवर बसण्याचा सुमारे .।।. .।।।. तास अभ्यास केला. मि. शोन ह्याने फार मदत केली. इतक्या वेळात मला मदतीशिवाय बरेच लांब साफ जाता आले हे पाहून मलादेखील आश्चर्य वाटले. पण सहज उतरता अगर थांबविता आले नाही. निघतेवेळी मदत लागते.
दोन प्रहरी मि. मित्र (कलकत्याचे) याजबरोबर शेल्डोनियन थिएटर पाहिले. संध्याकाळी कॉलेजात सोशल युनिअन झाले. ह्या वेळी मि. रिक्स ह्यांनी इजिप्त आणि पॅलेस्टाइनच्या प्रवासातील त्यांनी घेतलेल्या रंगीत फोटोचे मॅजिक लँटर्नने प्रदर्शन केले. तसेच चित्र दाखविताना वर्णन वाचले. हे फारच मनोरंजक झाले. पॅलेस्टाइनचे निरनिराळे ५।६ पोषाक कॉलेजातील काही विद्यार्थ्यांना घालून तेही दाखविले. बाहेरची पाहुणीमंडळी ३०।४० आली होती. ऑक्सफर्डमध्ये आमचे कॉलेज मंदीर हेच एक युनिटेरिअन मंदीर आहे. ह्या मंदिरात जितके लोक उपासनेस येतात तितके युनिटेरिअन असावेत. त्यांच्यामध्ये प्रेमभाव जास्त वाढावा म्हणून हे संमेलन प्रत्येक टर्ममध्ये २ दा होते. आज हवा गरम होती. पारा ५९ अंशावर (खोलीत) होता.