इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २१ सप्टेंबर १९०१)

१९०१-१९०३
श्री जगदीश प्रसन्न
हा माझ्या आयुष्यातला मुख्य दिवस, किंबहुना आज माझा पुनर्जन्म झाला म्हणावयाचा. आजवर बालपणचे, विचाराचे, कल्पनेचे, तयारीचे इ. असे दिवस गेले. आज कृत्यात्मक अथवा कार्यकारी जीवनाचा आरंभ झाला. शेवट परमेश्वरासच ठाऊक. असो. सकाळचे १०।। वाजता आम्ही बि-हाड (रा. बाबणराव कोरगावकर१ ह्यांचे घर) सोडले. आई, जनाबाई, एकनाथ२, कानीटकर व मी एका व्हिक्टोरियामध्ये बसलो. बाबा, गोविंदराव, बंगालचे अखयकुमार बाबू (पुढच्या मेलने जपानास औद्योगिक बाबतीत शास्त्रीय अभ्यास करण्यास जाणारे), कोरगावकर आणि यशवंत जामदार हे दुस-या व्हिक्टोरियामध्ये बसले. शिवाय आप्पा लिखते, कारखाननीस, रामतीर्थकर३ हे तिघे ट्रॅममध्ये बसून आले. वैद्य४, परचुरे, सावंत, ह्यांनी घरीच रजा घेतली. निघताना सदाशिवरावांस५ भेटलो. संत६, पालेकर, शिवरामपंत७, माडगावकर८ ही मंडळी माझे आधीच बंदरावर गेली होती. सुखटणकर९ ब्रिटीश नाण्याची मोड घेऊन परभारे आले. संतांनी सन लाइफ अँशुरन्स कंपनीच्या ३००० च्या पॉलीसीवर माझी सही घेतली. पण एंपायर ऑफ इंडियाची २००० ची पॉलीसी अद्यापि तयार झाली नव्हती. बंदरावर रा. जयवंतराव माडगावकर यांनी पुष्कळ उपयुक्त सूचना केल्या व माहिती दिली. ह्या बद्दल त्यांचा फार आभारी झालो. त्यांनी हाजी हुसेन अल्लीचे कपड्याचे बिल २४० चे कोरगावकरांजवळ दिले. व्हिक्टोरियात कानीटकर म्हणाले की समाजाबाहेरच्या व काही समाजातल्या लोकांना तू विलायतेला जातोस यात नुसता भपकाच वाटत आहे. त्यांच्यापुढे तू अगदी कानाकोप-यात सामान्य बुद्धीचा मनुष्य आहेस. तू अपयश घेऊन येतोस किंवा येथे आल्यावर तुझे हातून काहीच न होऊन तुझा उपहास मात्र होणार ह्या गोष्टीचे ते वाटच पहात आहेत. ते केवळ मजेनेच तुजकडे पाहत आहेत. अशा स्थितीत तुजवर मोठी जबाबदारी येऊन पडली आहे, वगैरे. प्लेग डाक्तरकडे तपासणीला जाण्याची वेळ जशी जवळ येत चालली तशी माझी अवस्था कठीण होत चालली. आईच्या आणि जनाबाईच्या तोंडाकडे पाहून वरचेवर उमळून येऊ लागले. त्या दोघी तर भानावर नसल्यासारख्याच दिसत होत्या. निघताना कानीटकराने एकीकडे नेऊन आपल्यास पत्रे लिहिण्यास सांगितले. त्यावेली त्याचा कंठ अगदी दाटून येऊन तोंडावाटे शब्द निघेनासा झाला. हे पाहून मला किंचित आश्चर्य वाटले. कारण त्याचीदेखील इतकी स्थिती होईल असे वाटले नव्हते. वासुदेवराव आणि गोविंदराव हे दोघे ग्लान होऊन स्तब्ध उभे होते. शेवटी जाताना बाबांनी वरचेवर पत्र पाठवण्यास मला जेव्हा काकुळतीने विनविले तेव्हा तर मला भडभडून आले.

दारावर एक युरेजीयन रखवालदार आणि पोलीस शिपायी होते. ते इतराला सोडून मलाच लवकर सोडीनात. शेवटी थोडा दांडगाईचा प्रसंग आलाच. पण हिंदुस्थानातील ही २ वर्षेपर्यंत तरी शेवटली दांडगाई म्हणून मी ती निमूटपणे सोशिली. दोन मिनिटांतच तपासणी झाली. व्हेनीस कनव्हेनशनमुळे प्लेगचे नियम अगदी कडक केले आहेत. दारात आल्यावर प्रवाशांची आणि पाठवण्यास आलेल्यांची पुन्हा गाठ नव्हे तर दृष्टादृष्ट देखील होत नाही. ह्यामुळे दोघांना फार वाईट वाटते आणि केव्हा केव्हा मोठी गैरसोयही होते. मला स्वतःलाच मी मचव्यात बसल्यानंतर माझे नावाने तीन चिठ्या आल्या. एक आफताफ खानाकडून, दुसरी मंजनाथाकडून व तिसरीचा अर्थच कळला नाही. लवकर येऊन भेटून जा असे चिठ्ठीत होते. पण इतक्यात मचवा निघाला आणि नंतरच मला चिठ्या वाचावयाला सापडल्या म्हणून जाणे झाले नाही. आणि काही तरी झाले आहे की काय ह्याबद्दल जिवास फार हुरहुर लागली. मचव्यात बसेतोपर्यंत मला तितके वाईट वाटले नाही. पण हातातील बॅग खाली ठेऊन बसल्याबरोबर मी केले ह्याचे पूर्ण स्वरूप पुढे उठले व मनाची काही अवर्णनीय स्थिती झाली. सभोवती इतकी गर्दी असता ओळखीचा चेहरा एकही दिसेना. जीवलग माणसांना निदान २ वर्षे तरी अगदी अंतरलो हे मनात येऊन त्या सर्वांची चित्रे चित्तचक्षूपुढे तटस्थ येऊन उभी राहिली. अशात व्हिक्टोरियामध्ये कानीटकरांनी सांगितलेल्याची आठवण झाली. मी केला तो प्रकार अत्यंत मूर्खपणाचा झाला असे वाटू लागले.. छे ! ह्या कठीण स्थितीची मला कधीही विस्मृती पडणार नाही. ईश्वरा, २ मिनिटातच माझी कोण तारंबळ उडाली ! माझ्या धैर्याचा मागमूस देखील उरला नव्हता. अशात मचवा झपाट्याने निघाला. मी घाबरल्यासारखा लोकांचे तोंडाकडे पाहू लागलो. जास्त काय लिहू-असे देखील मनात आले की सामानसुमान टाकून झटकन मचव्यातून खाली उडी मारावी आणि आईबाबांस धावत जाऊन घट्ट मिठी मारावी. निर्दय मचवा माझ्या स्थितीकडे अगदीच दुर्लक्ष करून तसाच पुढे चालला. मला अशी दहशत पडली की आता परतणे तर शक्यच नाही पण अशा भयंकर स्थितीत मला दोन वर्षे काढावी लागतील !! ती दोन मिनिटे मला दोन वर्षांसारखी भासली तर ह्या दोन वर्षांस मी कसली उपमा देऊ ? अशा हताश अवस्थेत मला अखेरीस परमेशाची आठवण होऊन ह्या पाशातून सोडविण्यास मी त्याची गयावया प्रार्थना करू लागलो. त्यानेच गा-हाणे ऐकिले. तरी ह्या वियोगाच्या दुःसह चटक्याची फुणफुण मी आगबोटीवर गेल्यावर देखील किती वेळ तरी होती.

एक वाजता आम्ही पर्शिया आगबोटीवर दाखल झालो. माझे तिकीट दुस-या वर्गाचे आहे. दुस-या वर्गाच्या प्रवाशांची सर्व सोय बोटीच्या पिच्छाडीचे बाजूस व पहिल्या वर्गाच्या प्रवाशांची आघाडीस अशी व्यवस्था केलेली असते. माझ्या जाग्याचा नंबर ३६२ होता. सुमारे दोन दोन खणांची एक एक खोली असते तीस केबिन म्हणतात. प्रत्येक केबिनमध्ये चौघांची सोय असते. त्या प्रत्येकाच्या जाग्यास बर्थ असे म्हणतात. माझ्या केबिनमध्ये आम्ही चौघे प्रवाशी आहो. चौघेही हिंदुस्थानचेच रहिवाशी आहे. ३६१ बर्थमध्ये कलकत्त्याचे बी.ए., मि. मित्र हे कायस्थ आहेत. ३६२ मध्ये मी स्वतः आहे. ३६३ मि. कोतवाल म्हणून कोणी मुंबईचे पार्शी आहेत. ३६४ मध्ये जलालुदिन मिर्झा हे लाहोर मुसलमान गृहस्थ आहेत. मित्र आणि मिर्झा हे माझ्या आधीच बोटीवर गेले होते. कोतवाल व मी मिळून बोटीवर चढलो. आम्ही गेल्यावर १ तासाने आमचे सर्व सामान आम्हांस मिळाले.