इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २४ जुलै)

ता. २४ जुलै
स्कॉफेल नावाचा इंग्लंडातील सर्वात उंच पर्वत चढलो. (३२१० फूट उंच). चढण्यास एकच वाट आहे. आम्ही चौघे विद्यार्थी गेलो. दिवस व ... अत्यंत चांगली होती. एवढ्या कठीण वाटेने व इतक्या उंचीवर ह्याच वेळी दुसरी १५।२० माणसे दिसली. पैकी ७।८ स्त्रिया होत्या. हेलविल पर्वतावर पाहावयास आलेल्या तीन बायका व एक पुरुष दिसली. हिमालय पर्वतावर सर्वात उंच प्रवासही एका अमेरिकन बाईनेच केल्याचे मागे टाइम्स ऑफ इंडिया पत्रात वाचले होते. ह्यावरून सुधारलेल्या देशांत बायकाचा उत्साह दिसून येतो. डरवेंट नदीचा उगम येथूनच आहे. येताना दरीतून ह्या नदीच्या काठाने अत्यंत रमणीय देखावा दिसला व चालण्याचे श्रम मुळीच झाले नाहीत. २२ सप्टेंबर बेनलोमंड पर्वतावर २ बायका व तीन पुरुष भेटले.४९

ता. २५ जुलै १९०२
तिस-या प्रहरी ४ वाजता डरवेंटवाटरच्या किना-यावर झाडीत चहापार्टी केली. आम्ही दहाजण होतो. ही जागा खासगी असल्यामुळे एकाच नेमिलेल्या ठिकाणी विस्तव करण्याची परवानगी होती. डोंगरातून हिंडत आम्ही जेथे जेथे बसून फराळ केला तेथे तेथे मागे कागदकचरा टाकून जंगलाचे सौंदर्य घालविले नाही, तर एकीकडे सर्व कागद जमवून जाळीत होतो. अशा बाबतीत ह्या लोकांची दूरवर काळजी पाहून मला आश्चर्य वाटले. चहानंतर बॉरोडेल पॉझचा दुसरा अंक प्रसिद्ध केला. ह्यात लेख आमच्याच मंडळीचे होते. प्रो. सा. चे We are Seven हे गाणे चटकदार होते. ता. २० संध्याकाळी मी प्रियाराधनाचा जो प्रकार पाहिला त्यासंबंधाचे एक पत्र मी लिहिले होते. मि. लॉकेट एडडिटर होते. त्यांनी सुमारे १ तासभर हा अंक वाचला.

ता. २६ जुलै
ग्रिसडेल शिखरावरून सूर्योदय पहावयास जाण्याकरिता आम्ही आज रात्री १२ वाजता उठून न्याहरी करून निघालो. पण लवकरच पावसाने गाठले म्हणून मंडळी परतली. पण मला ही निराशा सोसवेना म्हणून प्रोफेसरसा. ची परवानगी घेऊन मी एकटाच बॉरोडेल दरीतून फिरावयास निघालो. हातात ६ फूट लांब पहाडी (अल्पाईन) काठी होती. तिला शेवटास बर्चीप्रमाणे लोखंडी टोक होते. ह्यावेळी एकान्ताचा अम्मल होता. चहूकडे अंधार व शांतता होती. ह्या देशी केव्हाही कोठेही विंचूकाट्याची, चोराची अगर वनपशूंची तिळमात्र भीती हे प्रकार ह्यांच्या कादंबरीतूनही आढळत नाही. ह्यासंबंधी मी काही प्रश्न विचारले की सर्वांस कौतुक वाटून हशा पिकतो. शेवटी पॉझ पत्रात ह्यासंबंधी एक लेखही आला ! असो. एक मैल गेल्यावर पाऊस जोराचा आला म्हणून मला आश्रय पहावा लागला. शेवटी दगडाच्या खाणीत मी एका गुहेत जाऊन बसलो. ह्या खोल दरीत, मध्यान्ह रात्री पावसाची शोभा मी सुमारे दोन तास येथे वनचर निशाचराप्रमाणे बसून पाहिली. थंडी लागल्यावर ऊब आणण्यास उठाबशा करीत होतो. २।। वाजल्यापासून अंधूक अंधूक दिसू लागले. ३।। वाजता पहाट झाली. पाऊस थोडा कमी झाला. नंतर मी धावत आमच्या झोपडीत आलो व कपडे बदलून निजलो.

२७ जुलै आदित्यवार १९०२
११ वाजता उपासना झाली. १० जण हजर होतो. जेवणानंतर डरुइडिकल सर्कल पाहवयास गेलो.५० सुमारे २००० वर्षांपूर्वी ह्या देशात डरुइड धर्म होता. ३।४ फूट अंतरावर एकेक मोठी ३।४ फूट उंच शिळा उभारून एक वर्तुल बनविला आहे. पूर्वेकडच्या बाजूस ह्या वर्तुळात दुसरा एक असाच वर्तुल आहे. मोठ्या वर्तुलात ३८ दगड व लहानात १० आहेत. ह्यासंबंधी कोणास काहीच माहिती नाही व तर्कही होत नाही. हे सर्व दगड ह्या प्रदेशात मुळीच सापडणारे नाहीत असे भूगर्भशास्त्रांनी ठरविले. तेव्हा इतके दुरून एवढे मोठाले दगड इतक्या उंच का व कसे आणिले असतील हा मोठा चमत्कार आहे. नंतर आम्ही केसिक गावात चहा घेतला. प्रत्येकास १।। शिलिंग (१८ आणे) पडले. नंतर रास्थवेट चर्चमध्ये उपासनेस गेलो. एथे साउदे५१ कवीचा हांतरुणावर पडलेला सुंदर पुतळा आहे. परत येताना सूर्यास्ताचा अती रमणीय देखावा पाहिला. जेवण आटपल्यावर १० वाजता रात्री बॉरोडेल दरीत पुन्हा एकटाच फिरावयास गेलो. एकांतवासातील सृष्टीसमागम फार हितावह झाला.
कार्लाइल
woodside, Wreay, Carlisle
C/o Rev. James Arlosh