इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २४ जून १९०३)

ऑक्सफर्ड
ता. २४ जून १९०३
आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा मोठा वार्षिक पदवीदान समारंभ झाला. सकाळी ११ वाजल्यापासून शेल्डोनियन थिएटरात स्त्रीपुरुषाची गर्दी जमू लागली. १२ वाजता थिएटर खालवर गच्च भरले. आदमासे २००० दोन हजार समाज असेल. ३/४ वर स्त्रिया होत्या. आत जाण्यात तिकीट मिळवण्यास मोठी पंचायत पडते. Eighth Week बोटीच्या शर्यतीच्या खालोखाल हा आठवडा ऑक्सफर्ड येथे मोठ्या मौजेचा व चैनीचा आहे. चोहीकडे नाच, मेजवान्या व खेळ चालतात. परीक्षा आटपल्यामुळे विद्यार्थी मोकळे असतात. १२ वाजता सेनेटचा च्छबिना आत आला. नंतर ज्या बड्या लोकांस सन्मानाच्या पदव्या घ्यावयाच्या होत्या ते आले. त्यांत सर जॉर्ज व्हाईट, आफ्रिकेतील युद्धातील वीर हे होते. त्यास D. C. L. ची पदवी देण्यात आली. बादशहा एडवर्डचे परलोकवासी बंधू ड्यूक ऑफ आलबनी ह्यांची पत्नी व कन्या हाजर होत्या. समारंभातील सर्व भाषणे लॅटिनमध्ये झाली. अशा गंभीर प्रसंगीदेखील विद्यार्थ्यांनी गोंगाट व वात्रटपणा केलाच. तो पाहून सर्वास मोठी मौजच वाटलीसे दिसले. व्हाइट ह्यांस पदवी दिल्यावर त्यांनी काही बोलावे म्हणून विद्यार्थ्यांनी ३।४ मिनिटे एकसारखे टाळ्यांनी ठिकाण दणाणले. क्रुएन व ह्यांचे लाटीनमध्ये भाषण चालले असता विद्यार्थ्यांनी कित्येक रितीने थट्टा केली. एका गृहस्थानी बदकासारखा आवाज काढला. दुस-या राजश्रीनी मांजराचे अनुकरण. "अजून तुमचे च-हाट संपत नाही काय ?" कोणी मोठ्याने ओरडला. तिस-यानी असा काही मधून मधून स्वर काढला की त्याचे वर्णन करता येत नाही. हे सर्व अंडरग्रॅज्युएट्स होते. पूर्वी ह्याहीपेक्षा जास्त दंगा होत असे, असे सांगतात. म्हणून अंडरग्रॅजुएटांस तिकीट देण्यात येत नाही. तरी काही करून जी थोडी मंडळी आत येते ती असा प्रताप गाजविते. नेहमीचाच प्रकार असल्याने सर्वांस उलट कौतुकच वाटते.

(खालील मजकूर म. शिंदे यांनी प्रस्तुत रोजनिशीत १२ आदित्यवार एप्रिल ०३ च्या मजकुरानंतर रोजनिशीच्या को-या राहिलेल्या दीड पानावर दाटीवाटीने नंतर उतरून काढलेला आहे. पुढच्या उता-याप्रमाणेच हाही भाग ता. २४ मार्च १९२६ ला अथवा त्या सुमारास येथे लिहिलेला असाव - संपादक)

In V. R. Shinde's Unitarian Pocket Diary for 1903 appears the following words ७० "12th April 1903 – Visited the house of Auguste De Compte७१ – a flat in No. 10 of Rue monsieur Le Prince. The Society meets in the house. This contains some portraits and busts – A. Compte, [his] adopted daughter madame Devanse and his disciple Lafetta. All is well kept. His bed is preserved, with him on his death bed."

The same diary notes the following engagements :-

ता. ३० मार्च १९०३
मोस्यू जाँ रेव्हील नावाच्या पॅरिस युनिव्हर्सिटीतील धार्मिक इतिहासाच्या प्रोफेसरांनी आज रात्री जेवणास बोलावले. गेलो. तेथे इतर बरीच सभ्य स्त्रीपुरुष पाहुणेमंडळी आली होती. दिवाणखान्यातून जेवणाचे टेबलाकडे जाण्यापूर्वी रेव्हीलबाईंनी पाहुण्याचे एकेक जोडपे तयार केले. त्यात एकीचा नवरा व एकाची बायको अशांची निवड करून दिली. अशी जोडपी हातात हात घालून टेबलाजवळ गेली. अशी जोडपी करण्यात पाहुण्यांमध्ये समभाव व स्नेह वाढावा, जेवताना संभाषण चांगले व्हावे, अपरिचितांचा चांगला परिचय व्हावा असे अनेक उदात्त उद्देश असतात.

जुलै १९०३
उन्हाळ्याची सुट्टी झाल्याबरोबर ऑक्सफर्ड कायमचे सोडले. अत्यंत वाईट वाटले. प्रथम चेल्टनहॅम येथे रेव्ह. जोन्स जे. फिशर ह्याचेकडे १ आठवडा गेलो. तेथे बेझ हिल्ल चर्चमध्ये रविवारी सां. ७ ला उपासना चालविली. एका बाईने माझे बरेच सुंदर फोटो काढून घेतले. येथे आंग्लोइंडियन व आय.सी.एस. पेन्शनर्सची वसाहत आहे. गाव टुमदार सुंदर आहे.

३१ शुक्रवार जुलै १९०३
टेम्स नदीचा उगम पाहिला. सेव्हन स्प्रिंग्ज म्हणतात.

२ अथवा ९ रविवार ऑगस्ट १९०३
कार्डिफ येथे वेस्ट ग्रुव्ह चर्चमध्ये रविवारच्या सकाळ संध्याकाळ उपासना चालिवल्या. मि. फ्रेडरिक चाईल्ड (Dulverton, Lisvame North Cardiff) ह्यांचा पाहुणा होतो. येथे ब्राह्मसमाज ... ह्या विषयावरील उपदेश. मागून इंग्रजीत पुस्तकरू. प्रसिद्ध झाला.७२

१६ ऑगस्ट ११०३
न्यूटन एबेट येथील युनाइटेड फ्रीचर्चमध्ये रविवार सायंकाळी उपासना चालविली. ह्यापुढे एकदोन आठवडे बॉस कॅसल कॉर्नवॉल येथे मि. कॉक ह्याचे पोलट्रनी ह्या झोपडीत समुद्रकिना-यावर घालविले ? कदाचित जुलै शेवटच्या दोन आठवड्यात मी येथे गेलो असेन. हिल्डा हिच्या ता. ११ ऑगस्ट १९०३ चे एका पत्रावरून दुसरा तर्क खरा असावा.

मार्च १९०३ चे आरंभी मँचेस्टर कॉलेज येथे एक सामाजिक मेळा झाला. त्यात हिंदूंचे सामाजिक जीवन ह्यावर एक व्याख्यान दिले, व सप्रयोग देखावे करून दाखविले. ते व्याख्यान ता. १४ मार्चचे "इन्क्वायरर" पत्रात प्रसिद्ध झाले. लोकांस फार आवडले. 12 Avenue Da Pavillion Sully Le pecq, France येथे राहणारे मिस्तर हॉजसन प्रॅट नावाचे इंग्रज गृहस्थाने ता. १६ एप्रिल १९०३ तारखेचे मोठे कळकळीचे अभिनंदन पत्र पाठविले.७३

३१ ऑगस्ट १९०३. सकाळी ९.२५ वाजता होबर्न येथून निघालो व लंडनला व इंग्लंडला शेवटचा रामराम केला. जर्मन सीमधून इंटरनॅशनल परिषदेसाठी अँमस्टर्डाम येथे गोले. तेथे ता. ४ सप्टेंबरपर्यंत होतो.

ता. ५ सप्टे. ०३ सकाळी (शनिवार) कलॉन (कॉन) जर्मनीतील सुंदर शहरी पोचलो. तेथील कॅथीड्रल, प्रसिद्ध देऊळ, एक दिवस पाहून स्वित्झर्लंडला निघालो. ता. ७ सप्टें. सोमवारी बाझल (बाल) येथे पोचलो. सायंकाळी ७.५० वाजता. त्याच रात्री ११-१४ वाजता लूसर्न ह्या अती रमणीय सरोवराकाठचे लूसर्न गावी पोचलो.

ता. ९ सप्टे. ०३. शॉन हॉटेलमध्ये जागा बदलली. एसलपीक टेकडीवरील देखावे पाहिले.

ता. १० सप्टें. ०३. स्विस गरीब मजूराचे घर पाहून बारीक माहिती घेतली. दरमहा १० फ्रांक एका खोलीचे भाडे. ४ खोल्या व एक स्वयंपाक घराचे द.म. भाडे ३० फ्रांक. कँपाझिटरची दर दिवसाची मजूरी २ फ्रांक.