इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २५ मार्च १९०३)

ता. २५ मार्च
७ वाजता रात्री मोस्यू रोज ह्याचे घरी जेवणास गेलो. मादाम रोज ही फार गोड व कुशल बाई आहे. ही इंग्रजी शिकत आहे. निदान तशी मोस्यू रोजची समजूत आहे. मी काही इंग्रजीत विचारले की मादामची जी कासावीस होते मग ती आर्तपणे आपल्या नव-याकडे पाहते, त्याचे मला मोठे कौतुक वाटते. मार्सेला नावाची ३।४ वर्षाची मुलगी ही फार गोड आहे. मादामनी काढलेली काही चित्रे पाहून समाधान झाले. मादामचे आईबाप, बहीण ही जेवणास आली होती. फ्रेंच तरूण मुलीस इंग्रज मुलीइतकी स्वतंत्रता नाही. विवाह मुलीच्या संमतीने आईबापच लावितात. मुलीचे अगदी कमीत कमी वय म्हणजे १६ वर्षाचे असते. अलीकडे १० वर्षात स्त्रीशिक्षणाची अधिक सोय व प्रवृत्ती होत आहे. स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतीत इंग्रजांचेच येथेही अनुकरण होत आहे. इंग्रजांचा संसारी शहाणपणा फ्रेंच शिकतात. आपली च्छानी Fashions त्यास शिकवतात. फ्रेंच इंग्रजापेक्षा अधिक मोकळ्या स्वभावाचे आहेत.

ता. ६ मार्च १९०३ गुरुवार
सा. व्हिनसां द पाल ह्या एका मोठ्या देवळात नित्याची उपासना पाहवयास गेलो. दोन प्रहरी ३ वाजले होते. उन्ह स्वच्छ पडले होते. देवळापुढच्या विस्तीर्ण आणि गोलाकार उतरत्या घाटावर कित्येक मुले खेळत बागडत होती. आणि दाया आपले शिवण करीत मुलांना खेळवीत होत्या. देऊळ सुंदर, भव्य व भपकेदार आहे. मुख्य देव्हारा मातब्बर आहे. त्यावर येशूचा सुळावरचा मोठा सोनेरी पुतळा आहे. सर्व देव्हारा झगझगीत सोनेरी आहे. मागे मेरीचा देव्हारा आहे. तिच्या बाजूच्या भिंतीवर नवसास वाहिलेली सोन्याची काळिजे Hearts टांगिली होती. दोन्ही बाजूस समोरासमोर दोन देव्हारे आहेत. एकात येशूचा बाप सां. जोसेफ येशूस नेत आहे. समोर येशूच्या आईची आई आपल्या मुलीस मेरीस चालवीत आहे. ह्यांच्या पुढे वेली फुले आणि नंदादीप व नवसाचे दिवे तेवत आहेत. कित्येक भावीक बायका मुकाट्याने बसून प्रार्थना करून जात. एक तरूण बाईने कोप-यात विकावयास बसलेल्या एका बाईजवळून एक मेणबत्ती विकत घेऊन ती येशूच्या मूर्तीपुढे पेटवली व काही वेळ प्रार्थना करून गेली. सर्व देवळात अशा अनेक संतांच्या मूर्ती उभ्या आहेत. त्या प्रत्येकापुढे भाविक लोक प्रार्थना, निदान नमन तरी करून पुढे जात. नंतर मी उपदेश चालला होता तेथे गेलो. सुमारे २०० दोनशे बायका ऐकत होत्या. एकंदरीत पुरुष फार तर ५।६ असतील. बहुतेक बायका उतार वयाच्या, साध्या पोषाकाच्या, मध्यम व कनिष्ठ दर्जाच्या आणि विधवाच होत्या.

रात्री ८ वाजता मुंबईचे पार्शी मित्र रा. कोतवाल ह्यांचेबरोबर ऑलिंपिया नाटकगृहात (Music Hall) गेलो. हे पारीस येथील उत्तमपैकी एक आहे. गारूडी चमत्कार झाल्यावर नाचगाणे वगैरे झाले. नव्याचा पाश्चात्य अतिशोष पडल्यामुळे ह्यांची रुची फार बिघडत चालली आहे. तरूण मुलींना तंग पोषाख देऊन त्यांच्याकडून निरनिराळे ढंग करविणे ह्यात ह्यांना मोठे करमणूक होते. एका पोरीचे गाणे मात्र फारच तारीफ करण्यासारखे होते. ती आपला गळा असा बदली, सुराची इतकी बारीक तार ओढी, आणि स्वरांचे इतके चमत्कारिक संमिश्रण करी की जणू यंत्रातूनच हे आवाज निघताहेत असे वाटे. शेवटी एका मोठ्या गोलावरून बायसिकल उलटी नेण्याचे (Looping the loop) काम फारच आश्चर्यकारक झाले.

पारीस येथे स्त्रीपुरूषांच्या परस्परांच्या नात्यासंबंधी ताळ अगदी सुटला आहे, असे ऐकले होते. त्याचा आज रात्री बराच मासला नजरेस आला. नाटकगृहात पुष्कळ वारयोषिता राजरोस विचारीत हिंडत होत्या. इकडेतिकडे हिंडत असून नाटक पहाण्यास अशा नाटकगृहात पैस जागा असते. अशा बायका आपल्या धंद्यासाठी नाटक पाहवयास येतात. त्यांच्याशी बोलण्यात अगर हिंडण्यात कसलाही आडपडदा नसतो. नाटकगृहाच्या खाली तळघरात सुंदर व विस्तीर्ण उपहारगृह आहे (Olymipia tavern). नाटक संपल्यावर अशा बायकांची येथे दाटी जमते. त्यात सर्व प्रकारचे पुरुषही जमतात आणि यथेच्छ स्वैर वर्तन करितात. अशा विलासासाठीच हे एकंदर स्थान आहे असे दिसते. हे स्थळ  दाखविल्यावर माझ्या मित्राने मॅक्झिमम Maximum नावाच्या श्रीमंती थाटाच्या बदफैली उपहारगृहात नेले. येथे फार वेळ राहिलो नाही. रात्री २।४ वाजेपर्यंत येथे रंग उडतो. प्रत्यक्ष अशा ठिकाणी कसलेही अपकृत्य होत नाही. तथापि स्वैराचारी स्त्रीपुरूष येथे अगदी उघड उघड एकत्र बसतात, उठतात, हिंडतात. काही स्त्रिया फार सुंदर आणि श्रीमंत दिसल्या. रात्री परत घरी येताना भेटणा-या सर्व स्त्रिया बहुतेक कुमार्गी आढळतात. असा हा पारीस येथील नित्य घडत असलेला प्रकार पाहून माझे डोके विचाराने भणभणले. सरकारातून ह्या बाबतीत कसलाही प्रतिबंध नाही. धंद्याच्या स्त्रिया निरोगी असल्याबद्दल आरोग्यखाते खबरदारी ठेवते आणि लायसेन्स देते. ह्या नीतीचे बाबतीत पारीस येथे लोकमत फार ढिले दिसते. मुळी ते आहे की नाही ह्याचीही शंका येते. एकंदर प्रश्न मोठा बिकट, निकट आणि अवश्य विचार करण्यासारखा आहे. असे असून नीतिशास्त्री ह्याचा कोठेही उल्लेख करीत नाहीत. किंबहुना वैवाहिक नीतीचा अद्याप अनुभवपद्धतीने विचारच करीत नाहीत ह्याचे मोठे आश्चर्य वाटते. दुसरीकडे मोठ्या शहरात असाच प्रकार असेल. लंडनात तरी आहे. पण इतका उघड नाही. भरभराटीच्या काळी मागे अथेन्स व रोम शहरी नीतीचा असाच बोभाटा इतिहासातून आढळतो. शेवटी प्लेटोच्या तत्वज्ञानात (Republic मध्ये) वैवाहिक व्यवहाराबद्दल अगदी स्वतंत्र विचार आढळतात. वैवाहिक नीतीचा उलगडा पुढे कसा होणार असेल तो असो. नीतिशास्त्र्यांनी पारीस येथील अव्यहार अवश्य निरीक्षावेत व त्यावरून वैवाहिक नीतीचे लक्षण बांधावे आणि समाजशास्त्राचेही धोरण राखावे. मी तर तूर्त दिसतील तितक्या गोष्टी काळजीपूर्वक पाहण्याचा यत्न करणे माझे कर्तव्य समजतो.