इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २७ गुरूवार मार्च)

ता. २७ गुरूवार मार्च
डेव्हनपोर्टच्या दक्षिण भागाकडे फिरावयास गेलो (५ संध्या). येथे अगदी गलिच्छ लोकांची घरे होती. सडका घाणेरड्या होत्या. इकडच्या शहरांतही गरीब लोकांचे मोहले ज्यास इकडे स्लम्स म्हणतात व श्रीमंतांच्या गल्या ह्यांत पुष्कळ फरक दिसतो. पण म्युनिसीपालीटीकडून जरूर ती व्यवस्था केली असते. येथून जाताना माझ्यामागे ४०।५० मुलांचा घोळका जमला. अशा दरिद्री मुलांसही वरील बोर्डस्कुलात सक्तीने शिक्षण मिळते. मि. कुंबी ह्याने मला स्नॅप शॉट कॅमे-याची मोठ्या आगत्याने, तासभर माहिती दिली.

गुड फ्रायडे३७
२८ शुक्रवार मार्च १९०२
ख्रिस्टमसच्या खालोखाल हा ख्रिस्ती लोकांचा मोठा सण आहे. ह्या दिवशी ख्रिस्तास सुळावर चढविले. आजपासून सोमवार संध्याकाळपर्यंत बहूतेक सर्वत्र सुटी असते. शुक्रवारी धार्मिक लोक व्रतस्थ असतात, कोणतीही मौज अथवा चैन करीत नाहीत. पण हे उद्योगी राष्ट्र असल्यामुळे सुटी मिळाल्याबरोबर लोक चैनीत व करमणूकीत घालवितात. सर्वात मोठी करमणूक दारू पिण्याची व फूटबॉल, हॉकी इत्यादी खेळणे व पाहणे ही. धर्माधिकारी ह्या सर्व करमणूकी बंद करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांस मुळीच यश येत नाही. आज सर्व लोक आमच्या एकादशीप्रमाणे उपवास करितात. मासे व आंडी हा मुख्य फराळ. त्यामुळे आदले दिवशीच ह्या जिनसांचा खप होतो. आधिक धार्मिक असतील ते विशेष करून रोमन कॅथोलिक्स अगदी निराहार करितात. फार तर सकाळी १।२ दोन बिस्किटे-ज्यामध्ये मांसांश मुळीच नाही - खाऊन निव्वळ पाणी पितात. सकाळी क्रॉस्ड बन्स म्हणजे ज्यावर दोन आडव्या उभ्या रेषा मारलेल्या असतात असे मोदक खातात. आज कसलेही मांस खात नाहीत. सकाळी एका प्राटस्टेंट देवळात उपासनेस गेलो. उपासकांची तेथे संख्या १० पुरुष ३० बायका आणि सुमारे १०० मुले इतकी होती. आज सारा दिवसभर निरनिराळ्या वेळी उपासना व्हावयाच्या होत्या. म्हणून कदाचित लोक कमी आले असावेत. संध्याकाळी तेथील रोमन कॅथॉलिक कथीड्रलमध्ये उपासनेस गेलो. तेथे बायकापुरुष मिळून सुमारे २००।२५० होते. देवळात आल्यावर प्रत्येकजण देव्हा-यासमोर गुडघे वाकवून पुढे जाई. सुमारे ६० मुलांचा गाण्याचा मेळा (Chorus) होता. ७।८ धर्माधिकारी होते. अग्रभागी बिशप होता. कॅननने उपदेश केला. त्यात ख्रिस्तास सुळी चढवल्याचे वर्णन व त्या गोष्टीचे धार्मिक महत्त्व सांगण्यात आले. उपासना संपल्यावर काही पदे मुलांनी गाईली. स्वर अती करुण होता. नंतर सर्व दिवे मालविले. कारण येशूस फाशी दिल्यावर सर्वत्र अंधार पडून मोठा धरणीकंप झाला असे बायबलात आहे. शेवटी एक मोठा आवाज करण्यात आला.

ऑक्सफर्ड
ता. २० आदित्यवार मे १९०२
११ वाजता दोन प्रहरी कॉलेजच्या देवळात प्रो. रेव्ह. सॉजर्सची फार चांगली उपासना झाली. धर्म म्हणजे केवळ ऐहिक संसारात उपयोगी पडणा-या नियमांची संस्था आहे असे नव्हे. त्याची सत्यता व आवश्यकता (Reality & necessity) उपयुक्तता, नीती वगैरे बाह्य गोष्टीच्या पलीकडची आणि आत्म्याच्या अनिर्वचनीय व्यापारात निगूढ अशी आहे. उदारधर्म व सुधारणा ह्यांस धर्माचे हे श्रेष्ठ स्वरूप कळत नाही अगर कळूनही ते पुष्कळ वेळा दुर्लक्ष करतात, वगैरे उपदेशाचा आशय. ४।। वाजता नदीवर कलकत्त्याचे मि. मित्र आणि मिस् पिअर्सन ह्याजबरोबर बोटीतून फिरावयास गेलो. ७।। वाजता परत आलो. ९।। (वाजता) मनास फार उद्वेग व अनुताप झाला म्हणून भजन केले. "संकट कोण निवारी । प्रभूविण संकट...." हे पद पुष्कळ वेळा गाइले. नंतर रीस डेव्हिड् ह्यांचे `बुद्ध धर्म` पुस्तकाची ८०-११० अशी ३० पाने वाचली. हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. बुद्धाने आत्मा म्हणजे हा एक मोठा भ्रम आहे हे सिद्ध केले आहे. नंतर कर्मवाद सांगितला आहे. त्यामुळे घटांची (प्राणमय) पुनरावृत्ति अथवा पुनर्जन्म कसा होतो हे निरूपिले आहे. मग ह्या फे-यातून कसे पार पडावे ते सांगितले आहे. डेव्हिडसाहेबांस कर्मवाद म्हणजे निव्वळ श्रम वाटत आहे.

१२।। रस्त्यात चांदणे स्वच्छ पडले होते. अगदी सामसूम होते. देखावा सौम्य गंभीर होता. थोडेसे फिरून येऊन निजलो ! माझी परमेश्वरावर श्रद्धा कायम राहिली. पण जीविताचे गूढ काय आहे ते कळेना. संशयाच्या यातना दुःसह झाल्या. परमेश्वरा, हे गूढ कधी तरी उकलेल काय ?