इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २७ शुक्रवार)
ता. २२ आदित्यवारी दिशंबर १९०१
पोर्टलंड स्ट्रीटमधील युनिटेरियन देवळात रेव्ह. पेरिसचे व्याख्यान झाले. शांती हा विषय होता. आफ्रिकेतील लढाईविषयी ह्याने जोराने प्रतिकूल मत दिले. `धर्म जर व्यवहारात येत नसेल, अगर कोणताही नीतीचा व न्यायाचा व्यवहार धर्मात गणला जात नसेल तर मी आजच प्रचारकाचा राजीनामा देईन.`
ता. २३ सोमवारी दिशं. १९०१
११ वाजता `फाउंडलिंग हॉस्पीटल` पाहिले. ह्याची व डॉ. बर्नाडोच्या अनाथ आश्रमाची माहिती मी लवकरच सुबोध पत्रिकेत पाठविणार आहे.२७
ता. २४ मंगळवार, दिशं १९०१
ब्रिटिश म्युझियम नॅचरल हिस्ट्री ब्रँच पुन्हा पाहिली. वाघ, सिंव्ह, हत्ती, गेंडा इ. ची शरीरे जशीच्या तशीच ठेविली आहेत. डार्विनचा पुतळा पाहिला. डार्विनच्या विकासवादावर हजारो व्याख्याने ऐकण्यापेक्षा ही म्युझिअम एकदा नीटपणे पाहून ही अधिक माहिती होते. ४ वाजल्यावर व्हिक्टोरिआ व आलबर्ट म्युजीअम पाहिली. ह्यामध्ये सर्व कलाकौशल्याचे संग्रहालय आहे. नंतर शास्त्रीय उपकरणांचे संग्रहालय पाहिले. वाटेत घरी येताना पिकॅडिलीमध्ये एका तळघरात एका दुतोंडी राक्षसाचे (२००/३०० वर्षापूर्वी मारलेल्या) प्रेत पाहिले.
ता. २५ नाताळ दिशंबर
पोर्टलंड स्ट्रीटमध्ये स्टॉफर्ड ब्रूकची उपासना ऐकली. श्रोतृसमाज २०० वर होता. आज आम्ही फराळ केला. म्हणजे जडान्न खाल्ले नाही. आज रस्त्यात गर्दी मुळीच नव्हती. पण दारू पिऊन बायकामुले व पुरूष ही झुकांड्या खात व गाणी म्हणत जाताना पुष्कळ पाहिली. ह्याशिवाय नाताळ विशेष पाहण्यास मिळाला नाही.
ता. २७ शुक्रवार
पोस्टल मिशनची अध्यक्ष मिस् टॅगर्ट हिचे घरी मी व राजाराम जेवायास गेलो होतो. तेथे चिटणीस मिस् हिल्ल ही आली होती. पोस्टल मिशनची माहिती करून घेतली.
ता. २८ शनिवार
लंडन टॉवर पाहिला. ह्या ठिकाणी पुष्कळ जुन्या ऐतिहासिक इमारती आहेत. एकीत सर्व देशातील हत्यारे व चिलखती ठेविली आहेत. दुसरीत राजकीय जवाहीर आहेत. तिसरीत पूर्वी राजकीय कैदी ठेवीत असत. ह्या ठिकाणी टेम्स नदीवर एक भव्य पूल आहे. आगबोट आली की हा अजस्त्र पूल मध्ये दुभंगून, दोन्हीकडे आपोआप उठतो. दोन्ही बाजूस दोन बुरूज आहेत. ते १५० उंच आहेत. त्यांच्यामधील दुभंगणारा पूल १०० पावले अथवा सु. ३०० फूट लांब आहे. ह्या दोन्ही बुरूजावरूनही एक पूल आहे.
ता. २९ आदित्यवार
साउथ प्लेसमधील नैतिक समाजात उपासना ऐकावयास गेलो. ही इमारत व उपासना देवळातल्याप्रमाणे आहेत. पण परमेश्वराचा येथे उल्लेखही होत नाही. लोकांस जबरीने लढाईवर पाठविणे हे निंद्य आहे असे उपासकाने प्रतिपादले. अँडम्स स्मिथ२९, सिजविक३० वगैरेंचे उतारे वाचले. टेनिसनची३१ काही पदे गाईली. सुमारे २०० श्रोते हजर होते. हे बहूतेक अत्यंत उदार मताचे होते. ही संस्था पाहून मोठा विस्मय वाटला !
ता. ३० सोमवार दिशंबर १९०१
डोमेस्टिक मिशनपैकी रेव्ह. समर्सजे जॉर्जेस रोममधील मिशन पाहिले. ह्या भागातील गरीब लोकांची स्थिती चार पाच ठिकाणी त्यांचे घरांत आम्हास नेऊन समर्सने दाखविली. पैकी तीन ठिकाणी अगदी म्हाता-या बाया फार आजारी होत्या. दोघा आजा-या बायाजवळ मी प्रार्थना केली. एक अगदी बहिरी असल्यामुळे तिच्या कानात मला ओरडून प्रार्थना करावी लागली. ह्या बाईने राजा राममोहन राय३२ बद्दल मोठ्या आदराने व आस्थेने उल्लेख केला. रस्त्यातून हिंडत असता आमच्या मागे २००।२५० मुलांचा घोळका जमला होता. काहींनी आम्हास थोडा त्रास दिला. आम्ही घरात शिरलो की ही गर्दी आम्ही बाहेर येईपर्यंत आमची वाट पाहात उभी असे. एका घरात कामकरी बाया सर्व दिवसभर कामावर गेल्या असता त्यांची मुले सांभाळण्याची व्यवस्था केली होती. एकंदर अशी लहान मोठी २३ मुले होती. प्रत्येक मुलास २ पेन्स ६ आणे रोजचा चार्ज असे. गरीब लोकांची घरे कितीही कंगाल असली तरी त्यात निदान १०।२० चित्रे, काही मूर्ती, काही दिखाऊ सटरफटर सामान होतेच. मिशनचे प्रार्थनामंदीर साधे पण पुरेसे होते. बहुतेक सर्व खर्च युनिटेरिअन असोशियन मार्फत आहेत. अशी ३ मिशने निराळ्या भागात आहेत. आज येथे चहाची पार्टी होती. मुलींचे ताल सुरावर ड्रील व डंबेल झाले. नंतर आम्हाला थोडी भाषणे करावी लागली.