इंग्लंडमधील रोजनिशी (ता. २७(२८?) गुरुवार)

२७(२८?) गुरुवार
दोन प्रहरी मँचेस्टर येथील एका प्रसिद्ध मोठ्या किंडरगार्टन पद्धतीची शाळा पाहण्यास गेलो. माझी विशेष ओळख नसता बोर्ड स्कूलचे एक अधिकारी स्वतःची गाडी करून मला ही शाळा दाखविण्यास आले. सुमारे २ तास ही शाळा मास्तरणींनी व ह्या अधिका-यांनी दाखविली. सुमारे ६।७ वर्षापर्यंत मुलामुलींस एकत्र शिकविण्यात येत होते. तरूण शिक्षकिणी फारच हुशार दिसल्या. ही लहान मुले सुमारे ५०० होती. ह्यांस बाहुल्या दाखवून, मातीची चित्रे करण्यास लावून, फुले व झाडे ह्यांची रंगीत चित्रे काढण्यास लावून शिकविण्याची त-हा फार मौजेची दिसली. तसेच स्वरज्ञान करून देऊन स्पेलिंग शिकविण्याची पद्धती (Phonetic system) पाहण्यात आली. पण ही पद्धत शिकवणारास व शिकणारास जड जातेसे ह्यांचे मत आहे. नंतर ड्रील व गाणे पाहिली. नंतर वरच्या मजल्यात सुमारे ५०० मोठ्या मुलींचे वर्ग पाहिले. येथे स्वयंपाक व शिवणकाम शिकविण्याचे वर्ग होते. एवढ्या मोठ्या शाळेत शिकविण्याचे सर्व काम व देखरेखही बायकाच करीत होत्या. आणि त्या फार दक्ष दिसल्या. स्त्रियांना येथे अगदी पुरुषाबरोबरच स्वातंत्र्य असल्यामुळे व बहुधा २० वर्षाखाली लग्न करण्याची चाल नसल्यामुळे व पुढेही स्वतंत्रपणे घर चालविण्याची ऐपत पुरुषांस आल्याशिवाय लग्न न करण्याची चाल असल्यामुळे ह्या सर्व गोष्टी येथे साध्य झाल्या आहेत.
संध्याकाळी ७ वाजता मँचेस्टरहून ५ मैलावर एक मोठी दगडी कोळशाची खाण पाहवयास गेलो.६४ ही खाण जमीनीखाली ४४४ यार्ड खोलात होती. १।२ मिनिटांत आम्हा चौघांस खाली सोडले. इतक्या वेगाने खाली उतरताना जीव घाबरा झाला. आत घोडी, माणसे, गाड्या काम करीत होती. हवा व प्रकाशाचीही सोय होती. खाली सुमारे २ मैल लांब खाण होती. ती सर्व हिंडून दाखविण्यात आली. स्लोपवरून कोळशाच्या भरल्या गाड्या आपोआप घसरत जाण्याची योजना मोठी चमत्कारिक होती. खाणीत काम करणारी माणसे पिशाच्चासारखी दिसत होती. बरेच अंतर आम्हाला वाकून जावे लागले. सुमारे ३ तास पाहण्यास लागले.

लिव्हरपूल
४ डिंगल स्ट्रीट, लिव्हरपूल
आगष्ट ता. २८ शुक्रवार ते २ बुधवार
रेव्ह. लॉइड जोन्स ह्यांचे, घरी होतो. आदित्यवारी संध्याकाळी डोमेस्टिक मिशन (मध्ये) उपासना चालविली. सोमवारी लिव्हरपूल येथील कंगाल वस्ती (Slums) पाहिली. बरोबर रेव्ह. जोन्स होते. मंगळवारी पोर्टसन लाइट हे साबणाच्या वखारीचे खेडे पाहिले. येथील मजूरास हिंदुस्थानच्या वरच्या वर्गापेक्षा अधिक सोई सुख मिळते.

क्रूकर्न
ता. २७ आदित्यवार सप्टंबर १९०२
सकाळी व संध्याकाळी क्रूकर्न येथील मंदिरात Harvest festival उत्सवासंबंधी वार्षिक उपासना चालवल्या. हा उत्सव शेतातील मळणी घरी आणल्यावर ईश्वराचे आभार मानण्याप्रीत्यर्थचा आहे. मंदीर अनेक प्रकारची फुले, फळे, धान्ये, भाजीपाला, झाडे, रोपे इ. नी अत्यंत श्रमाने, कुशलतेने श्रृंगारले होते. लोकांमध्ये आदर आणि उत्साह व कळकळ पूर्ण दिसली. सकाळीही देवळात गर्दी झाली. संध्याकाळी वेळेच्या पूर्वी देऊळ गच्च भरले. माझी उपासना सुरू झाल्यावर पुष्कळास जागा नसल्यामुळे परत जावे लागले.

बॉस कॅसल (कॉर्नवॉल)
ता. २८ सोमवारी सप्टंबर
सकाळी शर्ट करण्याचा एक कारखाना पाहिला. सु. १०० मुली यंत्राप्रमाणे यंत्रावर शिवत होत्या. एक्सिटरवरून६५ मि. कॉक् ह्याजबरोबर बॉस कॅसल येथे समुद्र किना-यावर गेलो. इंग्लंडचा दक्षिण व पश्चिम किनारा फार पाहण्यासारखा आहे. किना-यावर डोंगराचे ४००।५०० फूट उंच कडे सरळ तुटले आहेत. समुद्राचा देखावा फार प्रेरक दिसला. टेनिसनने वर्णन केलेला (Idylls if King) आर्थरचा किल्ला जंजीरा पाहिला.६६ येथे मोठ्या गुहा पाहण्यासारख्या आहेत. येथून उत्तरेकडे हवा स्वच्छ असल्यास लॅडी बेट दिसते. प्रदेश सपाट व बिनझाडाचा दिसतो. पण दरीत झाडे व घरे ह्यांचा देखावा अती रमणीय आहे.

टर्नब्रिज वेल्स
ता. ४ ऑक्टोबर १९०२
संध्याकाळी टर्नब्रिज वेल्स येथे मि. जॉय ह्यांचे घरी गुरुवार ७ पर्यंत होते. तेथे टोड रॉक, हाय रॉक वगैरे पाहण्यासारखी आहेत.

ता. २ नवंबर १९०२
टर्नब्रिज वेल्स येथे फ्रीचर्चमध्ये ब्रह्मसमाजासंबंधी व्याख्यान उपासनेच्या वेळी दिले. व्याख्यानानंतर एका बाईने कलकत्ता येथील ब्राह्मो मुलीच्या शाळेच्या इमारतफंडासाठी १ पौंड (१५ रू.) दिले. ते मि. प्रिचर्डमार्फत कलकत्त्यास रवाना करण्यात आले.
ह्या वर्षीची दिशंबरची नाताळची सुट्टी ऑक्सफर्ड येथेच घालविली. डॉ. कार्पेंटरचे घरी नाताळाचे आदले दिवशी जेवणास गेलो. रात्री घरी बरेच खेळ खेळलो. त्यात डॉक्टर कार्पेटरांनी भाग घेतला.