दिवस तिसरा
स्त्रियांची सभा
भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या महाराष्ट्र परिषदेला जोडून स्त्रियांची एक सभा मंडळीच्या लष्करातील शाळेच्या भव्य दिवाणखान्यात भरली होती. या सभेची निमंत्रणपत्रिका श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे व श्री. सौ. सीताबाई भांडारकर यांच्या नावची होती. या सभेस पुण्याचे सेवासदन, फीमेल ट्रेनिंग कॉलेज व हायस्कूल यांमधील आणि लष्करातील उच्च वर्णांतील सुमारे ५० व अस्पृश्यवर्गांतील २५० पर्यंत स्त्रिया हजर होत्या. सभेचे अध्यक्षस्थान श्री. रमाबाईसाहेब रानडे यांनी सुशोभित केले होते. जमलेल्या स्त्रियांत मिसेस हारकर, श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे, श्री. सौ. सीताबाई भांडारकर, श्री. सौ. काशीबाई कानिटकर, श्री. सौ. जनाबाई शिंदे व श्री. सौ. रुक्मिणीबाई शिंदे वगैरे मंडळी होती. आरंभी श्री. सौ. जनाबाई शिंदे यांनी जमलेल्या स्त्रियांचे स्वागत करून त्यांना नि. सा. मं.ची माहिती करून दिली. नंतर त्यांचे बंधु रा. विठ्ठलराव शिंदे यांनी अध्यक्ष श्री. रमाबाईसाहेब रानडे व श्री. सौ. काशीबाई कानिटकर यांची श्रोतृवर्गास ओळख करून दिली. नंतर अध्यक्ष श्री. रमाबाईसाहेब यांचे भाषण झाले. त्या म्हणाल्या : रा. शिंदे यांनी सन्मानपर विशेषणांचा पाऊस पाडून माझा जो गौरव केला आहे, तो सर्वथा अवास्तव असला तरी त्यायोगे त्यांच्या अंतःकरणाचा थोरपणा व्यक्त होत आहे. अशी प्रस्तावना करून त्या म्हणाल्या : निकृष्ट वर्गातील स्त्रियांची सभा भरवून त्यापासून निष्पन्न ते काय होणार ? सभा भरविण्यास श्रोतृवर्ग सुबुद्ध व विचारक्षम असला पाहिजे. हीन जातींतील अडाणी बायकांना असे एकत्र आणण्यापासून फायदा काय ? अशी कोणास या सभेच्या उपयुक्ततेसंबंधाने शंका येईल, परंतु अशांनी सभेत होणाऱ्या सर्व गोष्टींची चर्चा प्रथम सर्वांना समजू लागेल हे ध्यानात आणले पाहिजे. पुराणांतील कथाभाग पाहिल्या वाचनानेच नीट आपल्या मनात उतरला नाही तरी तसेच वाचीत राहिल्याने निव्वळ पाठांतरानेच पुढे त्याचा सर्व उलगडा होतो व आपल्या अंतःकरणात दिव्य ज्ञान उत्पन्न होते, अशी आपणामध्ये समजूत आहे. तसाच प्रकार या सभेचा आहे. सभा भरविणे हे आपल्या बायकांना अपरिचित असल्याने आरंभी त्यांपासून तितका फायदा झाल्याचे दिसून येत नाही. परंतु तेच त्यांच्या अंगवळणी पडल्यानंतर या सभांपासून त्यांस पुरतेपाणी फायदा होऊ लागेल.
आपण अज्ञानी आहोत व ज्ञानसंपादनाच्या मार्गास आपणास लागले पाहिजे अशी इच्छा आम्हा स्त्रियांमध्ये अद्याप उत्पन्न झालेली नाही, व म्हणून आम्हांमध्ये त्या दिशेने काही हालचालही सुरू झालेली नाही. स्त्रियांना हल्लीच्या अज्ञानावस्थेत इतउत्तर ठेवता कामा नये, त्यांना विद्यादान करावे यासंबंधाने जी काही आस्था दिसत आहे ती पुरुषवर्गामध्ये दिसत आहे. बायकांना पुरुष एवढी चिंता व एवढी उठाठेव का करतात, हेच समजत नाही. कारण हल्लीची आपली स्थिती कोणत्याही प्रकारे अनिष्ट व आपणास कमीपणा आणणारी आहे असे त्यांस वाटतच नाही आणि म्हणून त्याने त्या असुखीही होत नाहीत. आपल्या वास्तविक दुर्दशेची ज्याला जाणीव होईल तो प्रयत्न करून स्वतःस उन्नतीप्रत नेईल, किंवा ते न साधले तर आपल्या दुरवस्थेबद्दल तळमळ लागून तो असुखी तरी होईल. परंतु आम्हांमध्ये ही जाणीव नाही म्हणून ती तळमळही नाही. आम्ही आमच्या सध्यांच्या हीन परिस्थितीतही इतक्या रंगून गेलो आहो की, तिजमध्ये काही सुधारणा केली पाहिजे असे आम्हांस वाटतच नाही. उलट दुसऱ्या कोणी सुधारणेचा यत्न केल्यास ती आम्हांस रिकामी पंचाईतशी वाटते. वाईट परिस्थितीही अभ्यासाने बरी वाटू लागते, एवढेच नव्हे तर तिचाच अधिक हव्यास उत्पन्न होतो. ही गोष्ट आपणा सर्वांच्या अनुभवातील आहे. पुराणात अशी एक कथा सांगितली आहे की, एका योग्याला काही दोषामुळे 'पुढील जन्मी तू डुकराच्या जन्मास जाशील' असा शाप झाला. आणि त्यायोगे तो चिंतामग्न झाला, आणि त्याने आपल्या शिष्यास सांगून ठेविले की, 'पुढील जन्मी मी डुकराच्या जन्मास जाशील' असा शाप झाला. आणि त्यायोगे तो चिंतामग्न झाला, आणि त्याने आपल्या शिष्यास सांगून ठेविले की, 'पुढील जन्मी मी डुकराच्या योनीत जन्मेन, तेव्हा माण्या कपाळावर एक पांढारा टिळा असेल. तो पहाताच तो माझा अवतार असे समजून तू मला मारून टाक म्हणजे त्या हीन स्थितीत राहून दुष्कर्मे आचरण्याचा प्रसंग मजवर न येता मला एकदम मुक्ती मिळेल.' शिष्याला त्या वर्णनाचा एक डुक्कर आढळला, तेव्हा तो त्यास मारू लागला तेव्हा त्या डुकराने त्याचा निषेध केला. त्यावर त्या शिष्याने विचारले, 'गुरुजी, तुम्हीच मला मारण्याची आज्ञा केली होती, मग आता असे का ?' तेव्हा गुरुजी म्हणाले, 'त्या वेळी ही डुकराची अवस्था मला हीन असे वाटत असे, म्हणून मी तुला तसे सांगितले, परंतु आता हीच स्थिति मला आवडू लागली आहे, ती नष्ट होईल तरच मला दुःख होईल.' तशीच स्थिति आमची झाली आहे. आपली स्थिति वाईट असे वाटते कोणास ? जे स्वतः उच्च स्थितीत; जातीने नव्हे, तर ज्ञानाने आहेत त्यांना. पुरुषवर्गाला हे ज्ञान आहे म्हणूनच आमच्या अज्ञानाची त्यांना कीव येते व ते दूर करण्याचा ते यत्न करतात. निराश्रितवर्गांतील स्त्रियांची सुधारणा करण्यसंबंधाने पुणे, मुंबई, यवतमाळ, अकोले, अमरावती वगैरे ठिकाणी जे प्रयत्न होत आहेत ते मी सर्व पाहिले आहेत. श्रीमती बेंद्राबाई यांनी आपल्या जातीतील १४-१५ मुलांचे एक स्वतंत्र बोर्डिंग चालविले आहे, त्याचा विशेष निर्देश करावयास हवा. या बोर्डिंगात इतकी स्वच्छता, टापटीप वगैरे दिसून येते की, त्यांत राहणारी मुले निकृष्ट जातीची आहेत असे कोणासही सहज ओळखता येत नाही.
शिक्षणाप्रमाणेच स्वच्छतेकडे आमच्या निराश्रितवर्गाच्या लोकांनी लक्ष पुरविले पाहिजे. या लोकांच्या मार्गांत अस्पृश्यतेची जी मुख्य अडचण आहे, ती माझ्या मते स्वच्छपणाच्या सवयीमुळे दूर होईल. कारण स्पर्श केल्याने विटाळ होतो ही जी समजूत आहे, ती या वर्गाची रहाणी अस्वच्छतेची, त्याचा धंदा अस्वच्छतेचा, त्यांचे राहणे गावाबाहेर या गोष्टीवरून झाली असावी. पुढे स्वच्छतेला अधिकाधिक किंमत मिळून स्वच्छता म्हणजे सोवळेपणा-शूचिर्भूतपणा असे समजून सामान्य जनसमूहाने अशा अस्वच्छ मनुष्यांना व्यवहारापासून बहिष्कृत केले असावे. हे जर खरे असेल तर अस्पृश्यतेचा दोष काढून टाकण्याचा उपाय ज्या मार्गाने ही अस्पृश्यता आली त्याच मार्गाने तिला घालविली पाहिजे हा होय, हे उघड आहे. अस्वच्छ म्हणजे अमंगळ असे ज्या न्यायाने लोक समजतात, त्याच न्यायाने स्वच्छ म्हणजे शुचिर्भूत असे ते समजू लागतील व त्यांना व्यवहार्य लेखतील अशी माझी समजूत आहे. अस्पृश्यतेची वरील मीमासा खरी असो वा नसो, स्वच्छतेच्या सवयी आपणास लावून घेण्याबद्दल निराश्रित लोकांची खटपट पाहिजे व तसे झाल्यास उच्च जातींच्या वर्गात ते सहज मिसळू शकतील यात मला किंचितही शंका वाटत नाही. शेवटी उच्च वर्गाच्या लोकांना निराश्रितांस अंतःकरणपूर्वक साहाय्य करण्याचा उपदेश करून अध्यक्षांनी आपले भाषण संपविले.
यानंतर सौ. पार्वतीबाई जाधव यांचे भाषण झाले. या बाई महार जातीच्या असून मिरज येथील राहणाऱ्या आहेत. बाईंचे माहेर पुणे जिल्ह्यात सासवड येथे आहे. परिषदेत भाषण करताना त्या म्हणाल्या :
प्रिय भगिनींनो, आज आपल्या भेटीचा जो प्रसंग आला आहे तो मला तरी खरोखर अपूर्व असा वाटतो. या कॉन्फरन्सला येण्याबद्दल जेव्हा मला परवानगी मिळाली तेव्हा मला जो हर्ष झाला तो मीच जाणे. पहिल्याने आपण कोठे उतरावे, वगैरेसंबंधी बरीच चिंता वाटत होती. परंतु येथे पाहुण्यांकरिता सध्याचा जो कँप आहे तेथे गेल्यावर आमची ही काळजी अजीबात दरू झाली. कँपमध्ये पोहचल्यावर पाचसहा मिनिटांतच तिघी-चौघी बाया मजजवळ आल्या आणि जेथे बसणे, उठणे मला फार सोईचे वाटले अशाच जागी माझी उतरण्याची सोय झाली. माझ्यासारख्या ज्या थोडया बाया येथे आल्या होत्या, त्यांना येथील बायांनी कोणत्याच प्रकारची अडचण पडू दिली नाही. उलट त्या आमच्याशी जरा मनमोकळेपणाने आणि प्रेमाने वागल्या त्याची फेड लाजून लाजूनच पुरे होण्यापलीकडे आमच्या हातून काही झाली नाही. त्यांच्या त्या प्रेमळ स्वभावाचे मला वारंवार स्मरण होऊन या कॉन्फरन्सचा प्रसंग मी कधी विसरणार नाही. बरे, असो. गेल्या दोन दिवसांत जे काम झाले त्यासंबंधी मला विशेष ते काय समजणार ? परंतु आमच्या उतरण्याच्या कँपमध्ये जो प्रकार दृष्टीस पडला तो पाहून माझी मती अगदी गुंग होऊन गेली. तेथे बहुतेक सर्वच जातींचे लोक जमले होते. त्यांमध्ये, महार, मांग, चांभार, ब्राह्मण यांपैकीच बहुतेक सर्वजण होते. पुणे शहर पाहून त्या सर्वांना फार आनंद झालेला दिसत होता. परंतु कोठे कोठे काही वादही होत असलेले आढळून आले. कित्येक अशी शंका काढू लागले की, आता आपल्या सर्व जातींचे जेवण एका ठिकाणीच होणार की काय ? त्यावर त्यांना अशी समज मिळाली की जातिवार पंक्ती बसविण्यात येतील आणि ज्यांची खुषी असेल त्यांनी सर्व जातींची एक पंगत होईल तीमध्ये जावे. आलेल्या पाहुण्यांपैकीं काहीजण एका पंक्तीस बसण्यास तयार नव्हते. यावर 'तुम्हांस ब्राह्मणांच्या पंक्तीत बसण्याची हौस वाटते, आणि मांगास पंक्तीत येऊ देण्यासंबंधाने तुम्ही नाराज होता' वगैरे वगैरे कांही वाद होऊन शेवटी सर्वजण काहीएक संकोच न बाळगिता एकाच पंक्तीत बसले. ही गोष्ट मोठी आश्चर्यकारक झाली असे मला तरी निदान वाटते. त्यांना तसे करण्यास कोणी आग्रह किंवा जुलूम केला नव्हता. परंतु ब्राह्मण महारास जितके अस्पृश्य मानतात, तितकेच महार लोक मांगास अस्पृश्य मानीत असूनही आज निरनिराळया ठिकाणचे निदान तीनशे बहुतेक महार आणि मांग, एका ठिकाणी जेवलेले पाहून मला वाटते कोणासही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या सभेत मला जे काही विशेष समजले, ते हेच स्पष्ट रीतीने समजले, आणि मला वाटू लागले की, आमचे महार आणि मांग यापुढे जर असेच निश्चय करून धैर्याने वागतील तर आमच्या पंक्तीमध्ये वरिष्ठ वर्गाचा जो कमी भरणा दिसतो, तोही खरोखर वाढल्याशिवाय राहणार नाही. आमच्या लोकांस ज्ञान देऊन त्यांच्यावर होत असलेला जुलूम नाहीसा करावा म्हणून जी ही खटपट होत आहे तिला ईश्वर यश देवो, अशी माझी त्याच्याजवळ फार फार प्रार्थना आहे.
यानंतर जमलेल्या स्त्रियांना उद्देशून मिसेस हारकर यांनी हिंदीत उपदेशपर दोन शब्द सांगितले.
नंतर मिस् शिंगणे व अस्पृश्यवर्गाचे पुणे येथील पुढारी रा. श्रीपतराव थोरात यांची कन्या सौ. लक्ष्मीबाई यांचे निबंधवाचन झाले. नंतर सौ. इंदिराबाई परचुरे यांचे भाषण झाल्यावर मुंबईच्या श्री. सौ. लक्ष्मीबाई रानडे यांनी अध्यक्षांचे आभार मानिल्यावर परिषदेचे काम संपले. या सभेच्या प्रसंगी नि.सा. मंडळीच्या पुणे येथील शाळेतील मुलांची स्वागतपर गीते व संगीत कवाईत प्रेक्षणीय झाली.